नमस्कार मंडळी ,
मी मिपावर आतापर्यंत प्रेक्षक म्हणूनच वावरलो आहे . हापिसात उघडणाऱ्या खूप कमी वेब साईट पैकी मिपा एक. त्यामुळे कधीपण काम नसले कि मिपा उघडून सानिका ताई, अपर्णा ताई , पेठकर काका , गणपा आणि अगदी अलीकडे दीपक कुवैत यांच्या पाककृती बघणे आणि इतके छान छान पदार्थ आपल्याला कधी खायला मिळणार म्हणून हुरहुरणे हाच तो काय माझा छंद .
लेखन या प्रकारात माझे ज्ञान अगदीच नगण्य आहे त्यात मी केलेले प्रवास हे वर्णन करण्याजोगे कधीच नव्हते म्हणून कधीच लिहायची वेळ आली नाही. पण काही दिवसांपूर्वी अचानक जॉर्डन ला जायचा योग आला आणि त्याच्या आठवणी सांगाव्याश्या वाटल्या म्हणून काय तो हा लेखनप्रपंच
असो.
आयुष्यातला हा माझा पहिलाच लेख आहे, चू भू माफ करावी.
तर त्याचे झाले असे कि साडे तीन वर्ष संगणक तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरी केल्या नंतर आणि बराच आटापिटा केल्यानंतर शेवटी आमचा नंबर परदेश वारी साठी लागला आणि आमची रवानगी दुबई ला झाली.इकडे आल्यानंतर काही काळ स्थिरस्थावर होण्यात आणि नवीन देशाची नवलाई बघण्यात गेला . ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात ईद उल अधा
(आपल्याकडे बकरी ईद ) च्या सुट्ट्या जाहीर झाल्या आणि सलग ९ दिवस सुट्ट्या मिळणार म्हणून अतिशय आनंद झाला. मी लगेचच घरी जायची तयारी सुरु केली . पण मातोश्रीने स्पष्ट सांगितले , "तुला काही तिकडे फार काळ राहता येणार नाही आणि पुढच्या वर्षी तुझे लग्न करणार आम्ही तर तू आताच काय बघायचे ते बघून घे, परत संधी मिळणार नाही ".आईने इतका मोठा बॉम्ब टाकल्यानंतर मला काही बोलताच आले नाही.
पण आईची आज्ञा शिरसावंद्य मानून मी लगेच कुठे फिरायला जायचे ह्याच्या मागे लागलो. आधी वाटले तर्की ला जावे पण पर्यटक विसा साठी ऑफिस ची परवानगी आवश्यक होती ती दोन दिवसात मिळणे अशक्य होते. मग ईजीप्त , लेबेनॉन या ठिकाणी जावे असे वाटले पण त्या देशात चालू असलेल्या अंतर्गत धुमाळी मुळे तिकडे जाणारी सर्व विमानं रद्द झाली होती. मग दुबई पासून सगळ्यात जवळ असलेल्या ओमान ला जायचे नक्की केले पण एका सहकार्याने "अय्यो वाट यु विल डू फार फ़्याइव डेज इन वोमान आं. स्टे इन दुबई . " असे काहीसे बोलून सगळ्या उत्साहावर पाणी फेरले. मग आता काय करावे बरे. सरते शेवटी आंतरजालावर जॉर्डन या देशाची व तिथल्या वैविध्य पूर्ण पर्यटनाची माहित मिळाली आणि फारसा काही विचार न करता लगेच तिकीट काढले. आंतर्जालावरूनच हॉटेल पण बुक केले .२ दिवसानीच जायचे असल्याकारणाने तयारीला वेळ असा नव्हताच. मग लोनली प्लानेट आणि तत्सम साइट धुंडाळली . काही पर्यटक कंपन्यांना फोन केले पण त्यांनी ऐन वेळेस वैयक्तिक सहलच शक्य आहे असे सांगून अव्वाच्या सव्वा भाव सांगितले. सरतेशेवटी जे काय होईल ते तिकडे गेल्यावरच बघू असा विचार करून मी २ कपडे ब्यागेत भरले, पासपोर्ट घेतला , थोडे पैसे बरोबर घेतले. आणि एअर पोर्ट वर गेलो. ईमिग्रेशन चे सोपस्कार पूर्ण करून रात्री साडे नऊ वाजता विमानाने उड्डाण केले आणि माझी सहल सुरु झाली. आतापर्यंत कायम मित्रांबरोबर फिरलो होतो , पहिल्यांदाच एकटा भटकायला चाललो असल्याने आणि तेही एकदम परक्या देशात त्यामुळे थोडी धाकधूक होतीच पण तेवढीच उत्सुकताही वाटत होती.
विमानातून दिसणारा दुबई चा झगमगाट आणि विमानातील चविष्ट जेवण जेवत वेळ कसा गेला कळलेच नाही. होर्मुझ ची सामुद्रधुनी आणि नंतर सौदी अरेबिया चे विस्तीर्ण वाळवंट पार करून विमान रात्री बरोबर साडे अकरा वाजता राजधानी अम्मान येथील क्वीन आलिया अंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. विमानातून उतरल्या उतरल्या जाणवली ती एकदम कोरडी आणि थंड हवा. आपण गरम कपडे का आणले नाहीत ह्याचे वाईट वाटले. हे विमानतळ खूप छोटे आहे त्यामुळे येणाऱ्या सर्व विमानांना फलाट मिळतोच असे नाही. आमचे विमान उतरल्यानंतर धावपट्टीच्या थोडे कडेला नेउन थांबवले गेले , तिकडे २ बस थांबल्या होत्या. मग सगळ्यांना बस मधून विमानतळाच्या दाराशी नेउन सोडले आणि पुढे ईमिग्रेशन साठी सगळे प्रवासी निघाले. जॉर्डन हा जगातल्या फक्त ३३ देशांपैकी एक आहे जिथे भारतीय पारपत्र धारकांना " on arrival " विसा मिळतो. जगातल्या एकूण देशांची संख्या बघता हा आकडा खूपच कमी आहे पण अलीकडेच वाचण्यात आलेल्या बातमी नुसार अजून ४० देशांशी आपले सरकार बोलणी करत आहे " on arrival " विसा साठी . ते जर झाले तर उत्तमच. असो. जॉर्डन साठी विसा शुल्क हे २० जॉर्डन दिनार इतके आहे. म्हणजे साधारण १७५३ रुपये प्रती व्यक्ती . पण जर तुम्ही जॉर्डन मधल्या अधिकृत प्रवासी कंपनी तर्फे सहल करत असलात तर हे शुल्क माफ आहे. माझी वैयक्तिक सहल असल्याने मला हे शुल्क भरावे लागले. जॉर्डन मध्ये जाताना शक्यतो तिथले चलन हे आधीच घेऊन जावे. तिकडे दुसरे चलन स्वीकारत नाहीत. काही ठिकाणी अमेरिकन डॉलर चालतात पण इतरत्र दिनारच चालते. विमानतळावर चलन बदलून मिळते पण भाव अतिशय महाग असतो त्यामुळे ते टाळावे . मी ५०० जॉर्डन दिनार घेऊन गेलो होतो त्यामुळे पुढे कुठे अडचण आली नाही. विसा साठी फार मोठी रांग नव्हती. माझ्यापुढे काही अमेरिकन आणि काही स्वीडिश लोक होते. त्यांना विसा पटापट मिळाला एकही प्रश्न न विचारता . मला मात्र पारपत्र बघताच तिथल्या अधिकार्याने १०० प्रश्न विचारले. का आलास , कशासाठी, कधी परत जाणार , कुठे कुठे फिरणार आहेस वगैरे वगैरे . हा अनुभव परदेशात बर्याच ठिकाणी येतो. आपल्याला अनेक प्रश्न विचारले जातात , खूप चौकशी केली जाते जी इतर देशातल्या नागरिकांची होत नाही. भारतीय पर्यटक अजून तितका सवयीचा झाला नसेल लोकांना पण हे वागणे खटकते मात्र नक्की. चालायचंच.... "on arrival " विसा मिळतो हे काय कमी झाले. जॉर्डन मध्ये १४ दिवसापर्यंत प्रवासी विसा मिळू शकतो . माझे परतीचे तिकिट ५ दिवसानंतर असल्याने मला एक आठवड्याचा विसा मिळाला. विसाचा शिक्का मारून मी बाहेर पडलो. अम्मानचे विमानतळ हे शहरापासून ४० किमी दूर आहे त्यामुळे विमानतळावर ने-आण करायला मी आधीच हॉटेल तर्फे वाहन ठरवून ठेवले होते . पण त्याची काही आवश्यकता नाही. अम्मान विमानतळा पासून शहरात जायला बस आहेत ज्या खूप कमी दरात प्रवाश्यांची ने आण करतात. रात्री उशिरा मात्र काही साधन उपलब्ध नाही . taxi असतात ज्या साधारण 35 दिनार घेतात एका खेपेचे. मी बाहेर आलो तोपर्यंत गाडी येउन थांबली होती. मग सरळ हॉटेल वर गेलो आणि उद्या काय करायचे हा विचार करत कधी झोपलो ते कळलेच नाही .
क्रमश:
वाचल्याबद्दल आभार
पुढील भागात जॉर्डन विषयी थोडेसे आणि पहिल्या दिवसाचे प्रवास वर्णन टाकेन.
प्रतिक्रिया
5 Nov 2013 - 4:34 am | रेवती
पुढील लेखनाची वाट पहात आहे.
5 Nov 2013 - 8:12 am | प्रचेतस
वा....!!!
एका अनोख्या देशाची अनोखी सफर बघायला मिळणार तर.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
5 Nov 2013 - 9:47 am | अमेय६३७७
व्वा. छान सुरुवात आहे. या देशाबद्दल मीना प्रभूंच्या पुस्तकातून थोडे वाचले होते. आता तुमच्या लेखमालेतून नवीन माहिती मिळेल.
5 Nov 2013 - 3:41 pm | प्यारे१
मस्त लेख.
आणखी लिहा. म्हणजे लेखमाला पूर्ण कराच पण त्यानंतरसुद्धा देखील लिहा.
5 Nov 2013 - 3:44 pm | केदार-मिसळपाव
मस्त सुरुवात आहे. जॉर्डन बद्दल काही विशेष महिती नव्हती.. आता मिळेल असे वाटते आहे.
5 Nov 2013 - 8:14 pm | कंस
जॉर्डन सूंदर आहे. तूम्ही पेट्रा आणी ईतर ठिकाण बघितलीच असणार. मजा येईल लेख वाचायला.
5 Nov 2013 - 10:43 pm | पैसा
मिपावर स्वागत! पहिलाच लेख जोरदार लिहिला आहे. पुढच्या भागात जास्त फोटो देता आले तर बघा जरा!
6 Nov 2013 - 2:56 am | पाषाणभेद
काय राव जॉर्डनला आले अन न भेटता परत गेले? काय हे?
6 Nov 2013 - 4:02 am | अर्धवटराव
पुढील भाग लवकर येऊ देत.
6 Nov 2013 - 8:28 pm | सौरभ_बडे
सर्वांचे लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिसादा बद्दल मन:पुर्वक आभार. पुढील भाग लवकरच टाकेन .
@पाषाणभेद : आपण जॉर्डन मध्ये आहात ह्याची कल्पना नव्हती. परत यायची संधी मिळाली कि नक्की आपली भेट घेईन
6 Nov 2013 - 10:18 pm | रोहन जैन
एकदम मस्त सुरुवात..
पुढील भागाची वाट पाहत आहे..
6 Nov 2013 - 10:21 pm | कंजूस
स्वत: जाऊन आलात म्हणून तुमचे प्रवासाचे अनुभव वाचायला खूप मजा येईल .(१)लोनली प्लानेट पुस्तक फार चांगले .(२)ट्रावल कंपनीतर्फे जाणाऱ्यांचे अनुभव काही उपयोगाचे नसतात .भोजाला हात लावतात आणि कमिशनच्याच हॉटेलात ,दुकानात नेतात .(३)आईचे ऐकलंत ते बरं केलंत (४)पुढच्या वर्षी जोडीने नवीन ठिकाणी जाऊन लेख नक्की लिहा (५)वर्षानुवर्षे समुद्र किनारा तोच आहे फक्त कोणा बरोबर जातो त्याला महत्व आहे .नवीन शंख सापडतात .
7 Nov 2013 - 1:29 pm | अनिरुद्ध प
सुरुवात पु भा प्र.
7 Nov 2013 - 1:36 pm | आतिवास
वाचतेय.
7 Nov 2013 - 4:50 pm | सौंदाळा
सराईतपणे लिहीले आहे. पहीला प्रयत्न आहे असे वाटलेच नाही.
पुढच्या भागांची (फोटोसहीत) वाट बघतोय.
7 Nov 2013 - 6:28 pm | मी-सौरभ
सहमत
7 Nov 2013 - 10:23 pm | राजेंद्र मेहेंदळे
झकास...पुभाप्र
8 Nov 2013 - 7:27 pm | बाळराजे
उत्तम प्रवासवर्णन. येवु द्या पुढचा लेख लवकरात लवकर. फोटो अवश्य टाका.
बाय द वे खुपच डेरिंगबाझ राव तुम्ही. रनटाईमला प्लान करून एक्झ्युक्युट पण केलात.
*good*
- बाळराजे
8 Nov 2013 - 7:42 pm | अशोक पतिल
लवकर पुढ्चा भाग येवु द्या.
8 Nov 2013 - 7:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त सुरुवात. पुभाप्र.
9 Nov 2013 - 9:36 am | त्रिवेणी
पुभाप्र. फोटो पण अॅड करा.