चित्रगुप्त यांनी सुरु केलेल्या चित्रकला (१) : देवादिकांच्या तजबिरीतील चित्रांची कहाणी धाग्यामुळे पाच सहा महिन्यांपूर्वी साताऱ्याजवळील औंध येथे केलेल्या भ्रमंतीची आठवण झाली .
औंध हे श्रीमंत पंडित पंतप्रतिनिधी यांच्या संस्थानाचे मुख्य ठिकाण होते. त्या आगोदर औंधला जसा पौराणिक इतिहास आहे तसा मध्य युगीन इतिहासाच्या पाऊल खुणा पाहवयास मिळतात. त्याचा पुरावा म्हणजे औंध गावच्या नैऋत्य दिशेस एका लहानश्या टेकडीवर श्रीमूळपीठ देवीचे जागृत स्थान आहे. शिवाय गावात पद्माळें, नागाळें व विशाळें हि तीन तळी अस्तित्वात होती, त्यापैकी विशाळे हे तळे बुझलेले आहे. व उर्वरित दोन तळी अस्तित्वात आहेत.
इ.स. १००० ते ११५० पर्यंत औंध वरती देवगिरीच्या यादवांचा अंमल होता.
सोळाव्या - सतराव्या शतकात आदिलशाहीचा अंमल कऱ्हाड, सातारा, करवीर या प्रांतावर होता. याच काळात मसूर व औंध या दोन परगण्यांची देशमुखी मसूरचे जगदाळे - पाटील यांच्याकडे होती. औंध परगण्यांत तेव्हा २७ गावे होती. तद्नंतर रक्ताजी रुपजी यांच्याकडे देशमुखी गेल्याचे उल्लेख आढळतात.
१६ शतकात शिवाजींनी बादशाही विरुध्द अभारलेल्या बंडा मुळे त्रस्त झालेल्या आदिलशाहीने महाराष्ट्र मराठी संस्कृती राज्य धुळीत मिळवण्याचा चंग बांधला होता. तेव्हा अफजल खानाने तुळजापूर व पंढरपूर हि ठिकाणे फोडल्यावर औंधकडे मोर्चा वळवला तेव्हा औंधच्या पुजाऱ्यांनी श्रीयामाई देवीला लहानश्या देवळात बंध करून टाकले व तिच्या देवळाला मास्जिदीचे रूप दिले. तेव्हापासून यमाईच्या पुजाऱ्यांपैकी एका शाखेस (फकीर) पुजारी असे म्हणतात. यावेळी औंध मधील दीपमाळ व तिचे सौदर्य पाहून अफजल खानाचे सुध्दा तिला फोडण्याचे धाडस झाले नाही असे बॉम्बे गॅझेट मध्ये नोंद आहे.
इ.स. १७०१ ते १८०६ पर्यंत परशुराम पंतप्रतिनिधी औंधच्या गादीवर राज्य करीत होते. १८०६ साली पेशवाई जप्त झाल्यानंतरच्या १८११ चा कालावधी वागळ्यास सर्वकाळ पंतप्रतिनिधींचा अंमल चलू राहिला.
संदर्भ: औंध संस्थानाचा माहिती फलक
अतिशय सुंदर असे राजेशाही यमाई देवीचे मंदिर हे तेथे असलेल्या लाजवाब चित्रांमुळे अधिकच खुलून दिसते
सदर चित्रे हि राजा रवि वर्माने काढली आहेत असे म्हणतात , इतक्या वर्षांनंतर सुद्धा हि चित्रे तितकीच ताजी , मोहक वाटतात .
१. देवळाच्या सुरुवातीस असलेली हि प्रचंड दीपमाळ
२. देऊळ हे एखाद्या राजवाड्यासार्खेच सजलेले आहे
३.छतावर असलेले नक्षीकाम आणि काचेची मौल्यवान झुंबरं
प्रत्येक खांबावर २ मोठी या हिशोबात चित्र लावलेली आहेत.
चित्रांमध्ये अगदी दुर्गा सप्तशती ते शिवाजी महाराजांच्या जीवनातले प्रसंग चितारलेले आहेत
४.
५.
६.
७
८.
९.
१०.
११.
१२.
१३.
१४.
१५.
१६.
१७.
१८.
१९.
२०.
देवळाबाहेरील एक वीरगळ
देवळाचा सुंदर कळस
राजवाड्याची पडझड झाल्याने तो पर्यटकांना बघू देत नाहीत .
एकूण चित्रकलेची आवड असणार्यांना यमाई देवीचे देऊळ म्हणजे खाशा पर्वणीच आहे
प्रतिक्रिया
19 Aug 2013 - 10:25 pm | चित्रगुप्त
वाहवा. मंदिर खरोखर खूपच प्रेक्षणीय असणार. फोटोही खूपच छान काढले आहेत.
कळसावरील मूर्ती अप्रतिम आहेत.
चित्रे रविवर्माची वाटत नाहीत, मात्र औंध संग्रहालयाच्या प्रमुखांना याविषयी माहिती असेल.
लहान मुलाला घेऊन पायर्या उतरणार्या स्त्रीच्या चित्राखालचे नाव वाचता आले नाही, पण सन बहुतेक १९२७ लिहिलेला आहे.
मी हा धागा आजच सुहास बहुलकर यांना पाठवतो आहे, ते कदाचित सांगू शकतील.
हे मंदिर आणि औंध म्युझियम बघायला आत नक्कीच यावे लागेल.
19 Aug 2013 - 11:27 pm | किसन शिंदे
ते चित्र राजमाता जिजाऊंचे आहे. लहानग्या शिवरायांना शिवाई देवीच्या मंदिरातून त्या परत घेऊन येत आहेत असं दिसतंय. मागे शिवाई देवीचे मंदिर दिसतेय आणि त्याहीपाठी डोंगरात खोदलेली अर्धवट लेणी दिसताहेत.
19 Aug 2013 - 11:39 pm | धन्या
छान आहेत चित्रे.
20 Aug 2013 - 12:04 am | मोदक
कळस आणि दीपमाळ अप्रतीम आहे!
20 Aug 2013 - 9:29 am | सुधीर
दीपमाळेचा फोटो छान आला आहे.
27 Aug 2013 - 8:04 am | श्रीरंग_जोशी
हेच म्हणतो.
उत्तम माहिती व सादरीकरण.
20 Aug 2013 - 7:05 am | यशोधरा
वीरगळ, दीपमाळ आणि मंदिराच्या कळस भागाचा शेवटचा फोटो खूप आवडले.
20 Aug 2013 - 7:10 am | यशोधरा
२० क्रमांकाच्या चित्रात झोपलेल्या व स्वप्न पाहणार्या स्त्रीच्या चेहर्यावरचे भाव अतिशय अप्रतिम.
आठ क्रमांकाचे रामराज्याभिषेकाचे चित्रही खूप आवडले.
20 Aug 2013 - 7:40 am | स्पंदना
१,९,१४ आणी १६. फोटो काढायचा अॅगल आवडला.
बाकी त्या चित्रांबद्दल काय बोलावे?
औंधच्या संग्रहालयात राजारवीवर्म्याची चित्रे आहेत. देवळात किती आहेत ते माहीत नाही. पण त्यातल एक पंतसरकारांच राजारवीवर्म्याच्या हातच वाटतंय.
स्त्रीया चितारण्याची राजारविवर्म्याची स्टायल जरा वेगळी होती, त्यातच बर्याचदा पुराणचित्रात एकाच स्त्रीचा चेहरा जाणवतो, सुगंधाचा!
20 Aug 2013 - 11:40 am | llपुण्याचे पेशवेll
औंधची चित्रे बरीचशी औंधच्या राजाने स्वतः काढलेली आहेत. त्याना स्वतःला चित्रकला अवगत होती म्हणून ते स्वतः भरपूर चित्रे काढत असत. तसेच त्याच कारणामुळे चित्रकलेची कदर होती म्हणून त्यानी यमाईच्या डोंगराकडे जाताना पठारावर जे संग्रहालय आहे तिथे भरपूर देशविदेशातील चित्रे, काही स्वतः काढलेली चित्रे याचे कायमस्वरुपी प्रदर्शन तयार केले आहे.
20 Aug 2013 - 8:50 am | मदनबाण
सुरेख ! :)
महिषा सुराचा ( तोच आहे हे गॄहीत धरुन ) वध दर्शवणारे चित्र फार आवडले.देवीच्या १८ भुजा जबरदस्त वाटतात.
त्या खालील तसबीरीत ७ सोंडेंचा हत्ती आहे आणि युद्ध करणारे सर्व स्त्रीयांच्या वेषात आहेत.
20 Aug 2013 - 9:46 am | स्पा
बाणा ,अरे सप्तशतीतले ते असुर वधाचे चित्र आहे, त्या तसबिरीतली ती सर्व देवीचीच विविध रूपे आहे.
नवदुर्गा म्हणतात तिला .
सगळी नावं बहुधा खालील प्रमाणे असावीत
शैलपुत्री
ब्रह्मचारिणी
चंद्रघंटा
कुश्मांडा
स्कंदमाता
कात्यायनी
कालरात्री
महागौरी
सिद्धीदात्री
20 Aug 2013 - 10:06 am | मदनबाण
अरे पण त्यात ७ देवीच दिसत आहेत !
20 Aug 2013 - 10:10 am | स्पा
हो २ मिसिंग आहेत
:)
बाकी ७ देवींची वर्णने जुळत आहेत
20 Aug 2013 - 10:31 am | प्रचेतस
नाय ब्वॉ.
त्या ७ जणी सप्तमातृका आहेत.
१. मोरावर बसलेली कौमारी
२. गरूडारूढ वैष्णवी
३. हत्तीवर (ऐरावतावर) बसलेली ऐन्द्री अथवा इंद्राणी
४. वृषभारूढ माहेश्वरी
५. हंसावर बसलेली ब्राह्मणी अथवा ब्राह्मी
६. सिंहाचा चेहरा असलेली नारसिंही
७. वराहमुखी वाराही.
20 Aug 2013 - 10:21 am | प्रचेतस
चित्रे फारशी आवडली नाहीत. शिवाजी महाराज व मावळ्याचे मात्र आवडले.
नृसिंहाच्या मांडीवर नऊवारी साडीतील स्त्री (बहुधा प्रल्हादाची आई) बघून तर अगदी भडभडून आले.
बाकी दिपमाळ, वीरगळ आणि मंदिराचा कळस अतिशय सुरेख.
20 Aug 2013 - 11:55 am | llपुण्याचे पेशवेll
अहो प्रल्हादाची आई कशाला नृसिंहाच्या मांडीवर बसेल? कैतरीच काय?
ती लक्ष्मी आहे नटून आलेली. आणि ती नृसिंह अवतार बघून घाबरली आहे. आठवा हिरण्यकशिपू वधाचे आख्यान.
20 Aug 2013 - 12:38 pm | प्रचेतस
असंय का. बरं बरं.
बाकी हे आख्यान नक्की कशातलं बरं?
भागवत आणि महाभारतात तरी लक्ष्मी आल्याचा उल्लेख वाचल्याचे आठवत नाही.
20 Aug 2013 - 1:25 pm | चित्रगुप्त
....देवता डर गये, ब्रह्मा जी अवसन्न हो गये, महालक्ष्मी दूर से लौट आयीं; पर प्रह्लाद-वे तो प्रभु के वर प्राप्त पुत्र थे। उन्होंने स्तुति की। भगवान नृसिंह ने गोद में उठा कर उन्हें बैठा लिया। स्नेह से चाटने लगे। प्रह्लाद दैत्यपति हुए।
......
यावरून लक्ष्मीच असावी.
दुवा:
http://hi.brajdiscovery.org/index.php?title=%E0%A4%A8%E0%A5%83%E0%A4%B8%...
21 Aug 2013 - 11:41 am | सूड
पायाचा फोटो द्या तुमच्या. =))
असं वाटलं तर तेही साहजिकच आहे म्हणा. तुमच्या सातवाहन काळात ज्या देवता नसतील तुमच्या दृष्टीने अस्तित्त्वात असण्याची शक्यताच नाही. तेव्हा समजू शकतो.
20 Aug 2013 - 11:20 am | डॉ सुहास म्हात्रे
छान ! चित्रे पाहून एकदा जरूर भेट द्यायला लागणार हे नक्की.
सहाव्या चित्राचा अर्थ समजला नाही???
20 Aug 2013 - 1:46 pm | अनिरुद्ध प
पाचव्या चित्राचा असे म्हणायचे आहे का? कारण सहावे चित्र हे शन्कर-पार्वतिच्या विवाहाचे आहे असे वाटते,बाकी पाचव्या चित्राचा अर्थ जाणकार सान्गतीलच्,वाट पाहावी लागेल.
20 Aug 2013 - 11:21 am | मालोजीराव
श्री भवानी संग्रहालय सुद्धा अप्रतिमच आहे…मराठा,राजपूत,दक्खनी चित्रे शिवाय रविवर्मा,ठाकूरसिंग यांची दमयंती,सैरंध्री, ओलेती सारखी प्रसिद्ध चित्रेहि इथे आहेत.
सैरंध्री
ओलेती
20 Aug 2013 - 11:29 am | वाटूळ
Thik ahet
20 Aug 2013 - 12:01 pm | सौरभ उप्स
वा छान, चित्रे मस्तच आहेत… पहिला आणि शेवटचा क्क्लीक पण चान आहेत.
20 Aug 2013 - 12:10 pm | llपुण्याचे पेशवेll
वाटूळराव अजून जिलब्या टाकतच आहेत का?
20 Aug 2013 - 1:40 pm | दत्ता काळे
मस्तं.. देवळातली चित्रे छानच आहेत. म्युझियममधली चित्रे पण सुंदर आहेत. हे 'ओलेती' चे चित्र म्युझियममधले असावे. हे मूळ चित्र पाहताना अंगावरच्या साडीच्या भिजलेल्या शेडस् बघून थक्क व्हायला होते. आपण चित्रकाराच्या कलेला उस्फूर्त दाद देऊन जातो.
20 Aug 2013 - 3:06 pm | दिपक.कुवेत
थट्टा नाहि पण ती पंगतितली स्त्रि अशी का उभी आहे कोणी सांगेल काय?
20 Aug 2013 - 6:50 pm | कपिलमुनी
तिला ४ हात आहेत असा वाटतय !
21 Aug 2013 - 5:03 am | स्पंदना
ती दौप्रदी आहे. राजसूय यज्ञात पंक्तीत तूप वाढत असताना तीची काचोळीची गाठ सुटली तेंव्हा कौरव बांधव तिला चेकाळुन जाऊन आणखी तूप वाढ असे फर्मावु लागले.हे त्या दृष्याचे जरा वेगळे वर्णन (जास्त दैवी, की मग तिला आपोआप आणखी दोन हात फुटले अन तीने स्वतःचे वस्त्र सावरले) वाटते आहे.
20 Aug 2013 - 6:45 pm | कपिलमुनी
यमाई देवी आमची कुलदेवी ! फोटो मस्तच आहेत !
औंधच्या पंतप्रतिनिधींचा रत्नसंग्रह पण छान आहे ..पूर्वपरवानगीने पहाता येतो !
खुले कारागृह , लोकनियुक्त मंडळ , निवडणुका , ओगले , किर्लोस्कर यांसारख्या उद्योगांना दिलेले उत्तेजन ,सर्वांना सहज शिक्षण अशी अनेक कामे पंतप्रतिनिधींनी काळाच्या पुढे राहून केली ..
त्यांच्याबद्दल पुढे कधीतरी लिहिन लेख..
27 Aug 2013 - 8:16 am | निवेदिता-ताई
आमचीपण कुलदेवी हीच आहे...................डोंगरावरची देवीपण भव्य-दिव्य आहे,
फोटो सुंदर, आम्ही नेहमी जातो पण फोटो नाही कधी काढले.......
तेथे पाहिजे जातीचे.
20 Aug 2013 - 8:27 pm | विकास
फोटो एकदम आवडले! औंध गावातील राजवाड्याजवळील ह्या देवळा व्यतिरीक्त गडावरील यमाईमातेचे देऊळ पण बघण्यासारखे आहे. गडाच्या मध्याला असलेले म्युझियमपण खूप बघण्यासारखे आहे.
किंचित अवांतरः
औंधचे संस्थानीक पंतप्रतिनिधी यांना कलेची खूप आवड होती... तिथल्या बाहेरच्या बागेत सहा ऋतुंचे वर्णन केलेल्या सहा स्त्रीयांच्या सुंदर शिल्पकृती आणि छोटेसे काव्य आहे. ते देखील बघण्यासारखे आहे.
(चित्र संदर्भ)
ब्रिटीश शिल्पकार हेन्री मूर याच्या नावाची संस्था (अथवा ब्रिटीश सरकार, आठवत नाही) त्याने तयार केलेली "मदर अँड चाईल्ड" शिल्पकृती जगभर शोधत होती. ती त्यांना शेवटी या औंध संस्थानाच्या वस्तुसंग्रहलयाच्या आवारात मिळाली!
त्या व्यतिरीक्त पंतप्रतिनिधी हे राजास योग्य असे गुणग्राहक होते आणि गरजू-होतकरू विद्यार्थी-तरूणांस मदत करायचे. त्याची महाराष्ट्रातील दोन दृश्य फळे : ग.दी, माडगुळकर आणि लक्ष्मणराव किर्लोस्कर (किर्लोस्करवाडीची जागा त्यांना दान म्हणून दिली )
21 Aug 2013 - 11:39 am | सुबोध खरे
दो आंखे बारह हाथ हा सिनेमा ज्यावरून व्ही शांताराम यांनी केला ती अट्टल गुन्हेगारांचे पुनर्वसन किंवा सुधार करण्याची संधी श्रीमंत राजे साहेब पंतप्रतिनिधी यांनी प्रत्याखात अमलात आणली होती.
किर्लोस्कर आणि ओगले यांना आपल्या औद्योगिक साम्राज्याची सुरुवात करण्यात सुद्धा त्यांनी फार मोलाची मदत केली. नुसतेच असे नव्हे तर तळागाळातील कोणत्याही मुलास धंदा सुरु करण्यासाठी त्यांनी निस्वार्थपणे मोठ्या प्रमाणावर भांडवल पुरवले. (बर्याच लोकांनी ते बुडवले हा भाग अलाहिदा).परन्तु असा द्रष्टा राजा सयाजीराव गायकवाडांच्या पंगतीला बसेल अशा दर्ज्याचा होता.
22 Aug 2013 - 12:41 am | विकास
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोशातील (खंड ९) खालील माहिती देखील वाचनीय आहे:
राजा असून देखील जनतेला सुधारण्याचे सुधारकी कदाचीत जाणीवपूर्वक न बोलता केल्याने त्यांचे नाव कधी घेतले गेलेले दिसत नाही. वर उल्लेखलेल्या स्वदेशीच्या संदर्भात देखील ऐकलेल्या माहितीप्रमाणे, स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतात पटकन विलीन होणार्या संस्थानांपैकी एक संस्थान आहे.
20 Aug 2013 - 10:04 pm | अत्रुप्त आत्मा
:)
20 Aug 2013 - 11:43 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
स्पाकाका, लै भारी फटू...
ती दिपमाळ खुपच भव्य आहे रे...
त्या दिपमाळेवर खरोखर दिवे लावले तर काय दिसेल राव!!
21 Aug 2013 - 11:36 am | आदूबाळ
स्पासाहेबः
औंधच्या भवानराव पंतप्रतिनिधींचं चरित्र हवं आहे. औंधाला मिळेल का?
21 Aug 2013 - 11:49 am | सूड
फोटोतली सर्वच चित्रे अप्रतिम. चेहेर्यावरचे भाव चित्रात टिपण्यातलं कौशल्य वाखाणण्याजोगं आहे.
21 Aug 2013 - 11:07 pm | पैसा
फोटो मस्तच आलेत! पण चित्रं रविवर्म्याची वाटत नाहीत. १९२७ चं चित्र असेल तर ते राजा रविवर्म्याचं असणं शक्य नाही. त्याचं निधन १९०६ मधे झालं.
22 Aug 2013 - 12:29 am | विकास
ती (देवळात असलेली आणि वर दाखवलेली) चित्रे स्वतः भवानराव पंतप्रतिनिधींनी काढलेली आहेत. त्यावर राजा रविवर्म्याच्या चित्रकलेचा प्रभाव आहे... त्यांच्या वस्तुसंग्रहालयात काही राजा रविवर्म्याने काढलेली चित्रे आहेत पण त्या चित्रांचे फोटो काढता येत नाहीत.
24 Aug 2013 - 2:51 am | चित्रगुप्त
ही चित्रे पंतप्रतिनिधींनी काढलेली आहेत, हे वाचल्यावर फोटोंच्या खालील सही वाचण्याचा पुन्हा प्रयत्न केला, त्यात 'बाळासाहेब' अशी इंग्रजी अक्षरे वाचता आली. अन्यत्र त्यांची सही आहे, तशीच या चित्रांवरही आहे.
पंतप्रतिनिधींबद्दल खालील मराठी दुवा सापडला:
http://www.aundh.info/marathi/balasaheb.php
26 Aug 2013 - 7:15 pm | विकास
खूपच माहितीपूर्ण संस्थळ. दुवा दिल्याबद्दल धन्यवाद!
अजून एक गोष्ट: बाळासाहेब पंतप्रतिनिधींना सूर्यनमस्काराचे प्रचंड प्रेम होते. त्यावरील विडंबन म्हणून आचार्य अत्र्यांनी "साष्टांग नमस्कार" हे नाटक लिहीले होते. कुठेतरी वाचल्याप्रमाणे, बाळासाहेब पंतप्रतिनिधींनी मनमोकळे हसत ते अत्र्यांबरोबर पाहीले देखील होते.
26 Aug 2013 - 11:38 pm | विजुभाऊ
औंधच्या देवळाच्या परीसरात गारेच्या गणपतीचे एक शिल्प आहे रिद्धी आणि सिद्धी सोबत.
तसेच तेथे सहा ऋतुंची सहा शिल्पे आहेत. संगमरवरी. अत्यंत अद्भूत आहेत. वर्षा ऋतुच्या शिल्पातील गालावरचे पाण्याचे थेंब तर अगदी वास्तव वाटतात
27 Aug 2013 - 7:34 am | विकास
ते वस्तुसंग्रहालयाच्या परीसरात आहे, जे गडाच्या मध्यावर आहे.
9 Jul 2017 - 2:56 pm | उपेक्षित
स्पा भाऊ तुम्ही औंधचे का ? आमचे गावच हाये त्ये दरवर्षी जायचो पण गेले काही वर्ष नियम चुकतोय.
बाकी धागा आणि त्यातील चित्रे मस्त
14 Jul 2017 - 8:00 pm | अनिवासि
ह धागा एकदम वर आला व मला बघावयास मिळाला हा मोठाच योगायोग.
पंतप्रतीनिधीना कलेची काय कदर होती ह्याचे एक फारच सुंदर उदाहरण काही वर्षापूर्वी लंडन मध्ये लोकांपुढे आले.महायुधापुर्वीची गोष्ट: त्यांचे चिरंजीव - अप्पासाहेब पंत ओक्सफोर्ड ला शिकावयास गेले होते. तेथे त्यांची एका पूर्व युरोपियन देशातल्या कलाकाराची ओळख झाली. त्याचे नाव बोसांनी. बोसांनी स्टेन्ड काचेचा कलावंत होता. रंगीत काचेच्या कलापूर्ण खिडक्या बनवणे हे त्याचे काम -- नाझी वावटळी नंतर तो इंग्लड ला आला होता. अप्पासाहेबांनी त्याच्याबद्दल वडलांना कळवले. पंतप्रतिनिधींनी त्याला शिवाजीमहाराजांच्या जीवनावर आधारित चित्रे काढावयास सांगितली. अशा ह्या खिडक्या सर्वसाधारणपणे येशू व त्याच्या शिकवणीवर आधारित असतात.बोसांनीने भारताचे नावही आत्ताच ऐकले होते तर महाराजांचे कोठून ऐकणार? त्याने बाळासाहेबांना (पंतप्रतेनिधींचे नाव) अधिक माहिती पाठवण्यास सांगितली व ती त्यांनी पाठवली. त्यात त्यांनी स्वतः लिहिलेली पुस्तके व चित्रे होती. ते सगळे बघून बोसांनी 'शिवाजीमय' झाला व त्याने कामाची रूपरेषा सुरु केली. संपूर्ण इतिहास येथे लिहिणे शक्य नाही. ७/८ अप्रतिम चित्रे
तयार झाली. साधारण प्रत्येक चित्र १०क्स८ फुटाचे असावे . (हे आठवणीवरून लिहीत आहे.) काचा आणल्या.
बाळासाहेबांच्या मनात औंधलाच मोठे आणखी एक मंदिर बांधावयाचे होते - खास महाराजांसाठी.
पण -- हा नेहमीच असतो- त्यांनी संस्थान लोकार्पण केले आणि त्या काळात हे काम मागे पडले.
स्वातंत्र्यानंतर मा. यशवंतराव चव्हाण लंडनला आले होते. त्यांना हे समजले. त्यांनी चित्रांचे फोटो पाहिले व हे काम झालेच पाहिजे असे म्हणून परत गेल्यावर मदत करण्याचे आश्वासन दिले. दुर्देवाने त्यांचे निधन झाले व परत काम संपले!
त्यानंतर लंडन मधील एकदोन आणि भारतातील एकदोन तथाकथित 'नेत्यांनी' बोसांनीकडे आम्हाला चीत्रे द्या आम्ही बघू काय करावयाचे ते. अर्थातच ते कलाकार उगाच कोणाकडे आपली कला देण्यास तयार नव्हते.
बोसांनी आता गेले . माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे सर्व काम लंडनमधील व्ही अँड ए म्युझी मध्ये आहे. त्यांच्या कडे न प्रदर्शित केलेल्या हजारो वस्तूंपैकी एक.
हा सर्व इतिहास आज माहीत असण्यास कारणीभूत : लंडनचे एके काळाचे अभ्यासू रहिवासी - कैलासवासी मुकुंद सोनपाटकि
मुकुंदाने कुणकुण ऐकली आणि शोध घेण्यास सुरवात केली. बोसांनीना शोधून काढले . ते ऑक्सफोर्डजवळच राहत होते. त्याने जाऊन ती मूळ चित्र बघितली - फोटो काढले- स्लाईड्स तयार केल्या. महाराष्ट्र मंडळात त्यांना आणले. छान मुलाखती झाल्या. भारतात अनेकांकडे जाऊन माहिती दिली. पण ---
लंडनच्या मंडळाचे एक अनियतकालिक -tamasaa तरंग निघत असे. त्याचा एक अप्रतिम अंक सर्व माहितीनिशी- फोटो सहीत निघाला. आज कोणाकडे असेल का शंकाच आहे. काही वर्षांपूर्वी मी एक अंक लोकसत्ताला पाठवला हता. त्यांनी एक लेख लिहिला पण पुढे काहीच झाले नाही.
शेवटी: वरील सर्व मी आठवणीतून लिहीत आहे. माझ्याकए अंक आणि इतरहि काही माहिती आहे पण ती आहे लंडन मध्ये व मी आहे पुण्यात. मिपामुळेतरी हे माहिती अधिक लोकांना कळेल हे अपेक्सा.
बाळासाहेंडब व अप्पासाहेब ह्यांच्या भेटरी होण्याचे योग आले पण त्या बद्दल परत कधीतरी.
ह्या लेखनात चुका आहेत हे मान्य आहे. पण कॉम्युटर त्रास देतो आहे तेव्हा असाच प्रकाशित करतो. माफी मागतो.
14 Jul 2017 - 8:16 pm | आदूबाळ
काका, तुम्ही परत आलात की बोलू. याबद्दल काहीतरी करण्याची इच्छा आहे.
15 Jul 2017 - 12:02 pm | अनिवासि
तुमच्याकडे माझा नंबर आहेच ना? दिवाळी नंतर मी परत येत आहे. दिसेम्बेर मध्यापर्यंत तेथे आहे, व्यनी करा,
जरूर भेटू,
14 Jul 2017 - 9:48 pm | अभ्या..
आईशप्पथ, तुम्ही साक्षीदार आहात ह्या सारयांचे?
मी वाचलेले हे कधीतरी. एकदा ही काचचित्रे बघायला मिळावीत. बस्स.
मीही बरंच व्हिज्युअलाईज करून पाह्यलं, कसं जडवल असेल ते चित्र. कसे रेखाटले असतील महाराज, नाही जमत डोळ्यासमोर आणायला. :(
15 Jul 2017 - 12:14 pm | अनिवासि
ह्या शब्दांची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.
दिवाळीच्या सुमारास लंडनला १-२ महिन्यासाठी जाणार आहे त्यवेळेस (लक्षात राहिले तर!) बरेच कागदपत्रे आणावयाची आहेत त्यात तो अंक नक्की आणेन.
त्यापूर्वी काही हाती लागले तर येथे कळवीन,
15 Jul 2017 - 12:56 pm | स्पा
जबरदस्त प्रतिसाद अनिवासी साहेब
16 Jul 2017 - 1:19 pm | इशा१२३
सुंदर फोटो!हे आणि गडावरचे दोन्ही देऊळ बरेचदा पाहिलेली आहेत.छानच आहेत.
16 Jul 2017 - 1:19 pm | इशा१२३
सुंदर फोटो!हे आणि गडावरचे दोन्ही देऊळ बरेचदा पाहिलेली आहेत.छानच आहेत.