मिपाकरांची वारी: शिवतीर्थ रायगडावर

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
17 Apr 2012 - 9:13 pm

शिवतीर्थ रायगडवारीची बीजे ३ महिन्यांपूर्वीच रोवली गेली होती. पुण्याहून मी आणि मोदक निघालो ते सकाळी ६.३० च्या पिंपरी चिंचवड-दापोली एसटी बसने. स्वारगेटला धनाजीराव आणि प्यारे त्याच बसमध्ये आम्हांस येऊन मिळाले. वप्याला ऐनवेळी हापिसात काम निघाल्यामुळे येता आले नाही. भरपूर गप्पा टप्पा करतच ११.३० च्या सुमारास महाडमध्ये पोहोचलो. मुंबईहून किसनदेव, मन्या फेणे, विमे, चतुरचाणक्य उर्फ चचा, सौरभ उप्स आणि नवमिपाकर तानाजी मालुसरे हे ६ जण सकाळी ६ वाजताच निघाले होते पण कर्नाळ्याच्या आसपास त्यांची एसटी पंक्चर झाल्यामुळे त्यांना महाडात पोचायला २.३० वाजले तोपर्यंत आम्ही चौघे एकाच हाटेलात बसून कणाकणाने खाद्य ग्रहण करत क्षण क्षण वेळ वाढवत होतो. महाड एसटी स्थानकावर मन्या फेणेचा 'फास्टर फेणे टोला हाणतो' हे पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. ३ वाजताची महाड-रायगड बस ऐनवेळी रद्द झाल्यामुळे रायगडपायथ्याला जाण्यासाठी प्रवासी जीप ठरवून अर्ध्यापाऊण तासातच पायथ्याला पोहोचलो. एकंदरीत झालेला उशीर, उन्हाची काहिली या सर्वांचाच विचार करून रज्जुमार्गाने जायचे ठरले. अवघ्या ४ मिनिटात गडावर पोहोचलो. रज्जुमार्गाचा प्रवास थरारक आहे. रायगडाच्या उत्ताल कड्याचे, सभोवतालच्या खोल दरीचे एका वेगळ्याच कोनातून अनोखे दर्शन होते.

१. रज्जुमार्ग

धन्याने रायगडावरील डॉर्मिटरीचे अगोदरच बुकिंग करून ठेवले असल्याने तिथे पोहोचताच सर्वांनी आपापल्या पाठपिशव्या खोलीत टाकल्या. मुंबैकर तसे उपाशी असल्याने त्यांनी तिथे नाष्टा उरकून घेतला मग लगेचच आम्ही गडदर्शनासाठी बाहेर पडलो. रज्जुमार्गाचा प्रवेश गडावर येणार्‍या राजमार्गाच्या विरूद्ध बाजूस असल्याने आम्ही मेणा दरवाजातून राजवाड्यात प्रवेश केला. डावीकडे राणीवसा अर्थात राण्यासाठी बांधलेले सात महाल आहेत. तर उजवीकडे मंत्र्यांची निवासस्थाने आहेत. आजमितीस महालांच्या मोठमोठ्या भिंती व आतमध्ये फक्त चौथरे शिल्लक राहिले आहेत. मेणा दरवाजा ते पालखी दरवाजा हा मार्ग एका सरळ रेषेत बांधून काढला आहे. उंचसखल भागात चढ उतार करण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या आहेत. मंत्रीमंडळ निवासाच्या पुढे एक तळघर आहे. ती पूर्वीची रत्नशाळा अर्थात खजिना ठेवण्याची जागा असावी. स्थानिक लोक त्याला धान्यकोठार म्हणतात पण हे पटत नाही. एकतर धान्यकोठाराच्या मानाने हे तळघर लहानच आहे. शिवाय राजाच्या निवासस्थानापाशीच धान्यकोठार असावे असे वाटत नाही. हे सर्व पाहातच आम्ही सर्व मिपाकर पालखी दरवाजात पोहोचलो. पालखी दरवाजाच्या शेजारीच दोन मोठाले स्तंभ अथवा मनोरे बांधलेले आहेत. द्वादशकोनी असलेल्या त्या स्तंभावर विविध कमानी कोरलेल्या असून त्यावर नक्षीकाम केले आहे. एका स्तंभामध्ये कारंजासदृश रचना दिसते. हे स्तंभ पूर्वी पाच मजली होते असे म्हणतात सध्या त्यांचे ३ मजले शिल्लक आहेत. स्तंभामध्ये जायला सदरेतूनच भुयारी जिने खोदलेले आहेत. या दोन्ही स्तंभांच्या वरच्या बाजूला अजून एक देखणा स्तंभ कोरलेला आहे. त्याच्या बाजूने आम्ही आता मुख्य राजभवनात प्रवेश केला. हे ठिकाण राजसिंहासनाच्या मागील बाजूस आहे. अतिशय प्रशस्त असलेले महाराजांच्या ह्या निवासस्थानी सध्या फक्त एक प्रचंड चौथरा शिल्लक आहे. एका ठिकाणी कोपर्‍यात न्हाणीघरासदृश बांधकाम दिसते. तसेच इतरही अनेक लहानमोठी बांधकामे दिसत जातात. सिंहासनावरच्या मेघडंबरीच्या मागील बाजूस दोन प्रवेशद्वारे आहेत. ह्या राजभवनातच महाराजांचा राज्याभिषेक होऊन यापैकी एक दरवाजातून राजे सिंहासनारूढ होण्यासाठी निघाले.

२. मेणा दरवाजा

३. राणीवसा

४. राणीवसा

५. मंत्रिमंडळाची निवासस्थाने

६. मंत्रिमंडळाची निवासस्थाने

७. मेणा दरवाजा, उजवीकडे राणीवसा, डावीकडे मंत्र्यांची निवासस्थाने

८. राजभवन

९. राजभवन

राजभवनातून आम्ही सर्वजण राजसभेत- तिथे असलेल्या सिंहासनापाशी आलो. मेघडंबरीत शिवाजी महाराजांचा पुतळा हल्लीच बसवला आहे. यादवांच्या विनाशानंतर ३५० वर्षांची काळरात्र संपवून स्वतंत्रपणे प्रस्थापित झालेले हे आपले स्वराज्य. सर्वजण अक्षरश: भारावून गेले होते. महाराजांना मुजरा करतच आम्ही नगारखान्यापाशी आलो. राजसभेचे प्रवेशद्वार असलेला नगारखाना ही अतिशय भव्य वास्तू आहे. प्रवेशद्वारावर दोन सुंदर कमळाकृती कोरलेल्या आहेत. त्यांचा अर्थ येथे श्री आणि सरस्वती म्हणजेच लक्ष्मी आणि विद्या ह्या दोन्ही सुखेनैव नांदत आहेत. कमळांच्या बाजूला शरभाचे शिल्प कोरलेले आहे. सिंहासदृश असलेल्या या काल्पनिक पशूच्या चारही पायात चार हत्ती दाबलेले असून त्याने शेपटीत एक हत्ती उचललेला आहे. मोंगल, आदिलशाही, सिद्दी, इंग्रज आणि पोर्तुगीज ह्या पाच सत्तांच्या नाकावर टिच्चून ह्या राजाने आपले स्वतंत्र, बलाढ्य राज्य स्थापन केले आहे असा याचा अर्थ आहे.

१०. राजसभा

११. मेघडंबरीत विराजमान झालेले महाराज

१२. भव्य दिव्य नगारखाना

१३ व १४. शरभ

नगारखाना बघतच आम्ही होळीच्या माळावर आलो. होळीचा माळ हे गडावरचे प्रशस्त पठार. माळावरच गोनीदांच्या प्रयत्नाने स्थापन झालेला शिवाजी महाराजांचा देखणा पुतळा आहे. समोरच एका सरळ रेषेत असणारी बाजारपेठ आहे. पेठेच्या दोन्ही बाजूंस प्रत्येकी २२ दुकाने आहेत. मध्येच एका दुकानावर नागाची मूर्ती कोरलेली आहे.

१५. होळीच्या माळावरील शिवपुतळा

बाजारपेठ बघूनच आम्ही जगदीश्वर मंदिराच्या वाटेवर लागलो. जगदीश्वराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या पश्मिमेकडच्या प्रवेशद्वारातून आम्ही प्रांगणात प्रवेश केला व पूर्व बाजूस आलो. प्रवेशद्वारासमोरच नंदीची सुरेख कोरीव मूर्ती आहे. सभामंडप, गर्भगृह अशी याची रचना. कळसाचा आकार कमळासारखा आहे. जगदीश्वराच्या पायरीवरच गडाचा शिल्पकार हिरोजी इंदुलकर याच्या नावाचा शिलालेख कोरलेला आहे.

सेवेची ठायी तत्पर हिरोजी इटळकर

सभामंडपात भलेमोठे कासव कोरलेले आहे. भिंतीपाशी वीर हनुमानाची रेखीव मूर्ती आहे. पायाखाली राक्षस चिरडलेला आहे. हा हनुमान पूर्वी गडाच्या प्रवेशमार्गावर असावा. बहुतेक शिवकालीन किल्यांवर गडाच्या प्रवेशमार्गानजीक हनुमानाच्या मूर्ती आढळतात. तो तिथून जगदीश्वर मंदिरात कधी आला असावा याची कल्पना नाही. गाभार्‍यात गेलो. जगदीश्वराची पिंडी साक्षात शिवाजी महाराजांनी स्थापन केली आहे. मंदिराच्या डाव्या बाजूस अजून एक अतिशय स्पष्ट असा संस्कृत शिलालेख कोरलेला आहे.

श्री गणपतये नमः|

प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनुज्ञय

श्रीमच्छत्रपते: शिवस्यनृपते: सिंहासने तिष्ठत:|

शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ||१||

वापीकूपडागराजिरूचिरं रम्यं वनं वीतिकौ स्तम्भे: कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रं लिहे मीहिते|

श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हिराजिना निर्मितो यावच्चंद्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ||२||

सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमत् छत्रपती शिवाजीराजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजीने विहीरी, तलाव, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे अशांची उभारणी केली आहे. ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.

१६. जगदीश्वर मंदिर

१९. जगदीश्वर महादेव

१८ व १९. जगदीश्वर मंदिरात असलेले शिलालेख

शिवपिंडीला मनोभावे वंदन करून आम्ही पूर्वेकडेच असलेल्या महाराजांच्या समाधीनजीक आलो. एका किल्ल्यावरच जन्म घेतलेल्या थोर राजाने आपले संपूर्ण आयुष्य गडांवरच घालवून शेवटी एका गडावरच अखेरची चिरनिद्रा घेतली. सभासद म्हणतो "क्षत्रियकुलावतंस श्रीमन्ममहाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२ चैत्र शुद्ध १५ या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्वराचा जो प्रासाद त्याच्या महाद्वाराच्या बाहेर दक्षणभागी केले."

समाधी म्हणजेच अष्टकोनी जोते असून वरून दगडी छत्र बांधलेले आहे. आतमध्ये फरसबंदी केली असून शिवस्मारक केले आहे. फरसबंदीखालच्या पोकळीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षामित्र मृत्तिकारूपाने सापडतो.

शिवसमाधीच्या बाजूलाच कमानीकमानींची रचना असलेली ओसरी बांधलेली आहे.

२०. राजांचे विश्रांतीस्थान

आता सूर्यास्त होऊन अंधार पडू लागला होता. त्यामुळे लांबवरच्या भवानी टोकावर जायचा बेत रहित करायला लागला. शिवसमाधीच्या पठारावरच पुढे भग्न इमारतींची रांग आहे. त्यालाच शिबंदीची घरटी असे म्हणतात. समाधीपासच्या असलेल्या हिरवळीवर आम्ही सर्वजण बसलो. समोरच सह्याद्रीच्या रांगेत असलेला भव्य लिंगाणा ठळकपणे दिसत होता. रायगडाला तिन्ही बाजूंनी सह्याद्रीच्या अजस्त्र रांगांनी फेर घातलेला आहे ते दृश्य मोठे मनोरम दिसत होते. आता आमच्या गप्पाटप्पांना बहार आली. वेगवेगळे किस्से, मिपावरील गंमतीजंमती सांगणे चालू झाले. आता अंधार गडद होऊन एकेक चांदणी चमकायला लागली. दरीतल्या छोट्या वाड्यावस्त्यांवरचे दिवे लुकलुकायला लागले. दूर सह्याद्रीच्या डोंगरात कुठेतरी वणवा लागला होता. साधारण ८.३० ला आम्ही तिथून निघालो. बाजारपेठेनजीक अवकीरकरांच्या धनगराच्या झापावर झुणका भाकरीची ऑर्डर दिली होतीच त्या झापावर गेलो. मिणमिणत्या दिव्यात सारवलेल्या अंगणात झुणका भाकर, ठेचा, पापड, ताक, दही असे सुग्रास जेवण उरकले. सन १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरच्या वरवंट्याखाली गड भाजून निघाल्यानंतर वेबसाऊ झाला. तेव्हा ही धनगरं चार्‍याच्या ओढीने गडावर शिरली. ओसाड गड त्यांनीच आतापर्यंत जागता ठेवला. तेव्हापासूनच ही घरं येथे नांदती आहेत.

२१. शिबंदीची घरटी, दूरवर भवानी टोक

२२. शुक्राची चांदणी

२३. भोजनाच्या तयारीत बसलेले मिपाकर

आता परत खोलीवर यायला निघालो. होळीच्या माळावरून खोलवणांत उतरलो. धर्मशाळेवरून गंगासागरापाशी आलो. तिथून एक टेप चढून पालखी दरवाजाच्या मार्गाने गडद अंधारातून चालत मेणा दरवाजा उतरून परत खोलीत आलो. परत गप्पाटप्पा चालू झाल्या. मिपाचे संदिप खरे श्री चचा यांनी तेथे आपली 'मन' ही कविता सर्वांना म्हणून दाखवली. विमे अणि धनाजीराव वाकडे यांनी आपले अमेरीकेतील काही मजेदार किस्से ऐकवत सर्वांचेच मनोरंजन केले. थोडावेळ गप्पा टाकून आम्ही परत एकदा शिवसमाधीपाशी जाण्यास बाहेर पडलो. पुन्हा बाहेर पडण्यास अनुत्सुक असलेले प्यारेकाका आणि सौरभ उप्स हे दोघेही तसे नाईलाजानेच निघाले.

मेणा दरवाजातून पुन्हा राजभवनातून सिंहासनापाशी गेलो. सिंहासनापाशी पणत्या आणि उदबत्या प्रज्वलित केल्या. महाराजांच्या पुतळ्यावर त्यांचा पडलेला मिणमिणता उजेड अतिव समाधान देऊन गेला. तिथून होळीच्या माळावर आलो. तिथल्या महाराजांच्या पुतळ्यापाशीही पणती प्रज्वलित केली. तिथून बाजारपेठेमार्गे जगदीश्वर मंदिरात आलो. जगदीश्वराच्या पिंडीपाशीही पणती लावून आम्ही समाधीपाशी आलो. तिन्ही बाजूं मोकळ्या असल्याने भर्राट वारा येत होता त्यामुळे तिथे पणत्या पेटू शकल्या नाहीत मात्र धूप आणि उदबत्ती मात्र लावल्या गेल्या. भावविभोर होऊन आम्ही सर्व समाधीपाशीच गप्पा मारत बसलो. रात्रीचे बारा, सव्वाबारा वाजलेले. प्यारेकाका, मोदक, विमे आणि स्पा यांची अध्यात्मावर खोलवर चर्चा सुरु झाली. बाकी मंडळी चर्चा एकदम तन्मयतेने ऐकत होती. मी आणि धन्या मात्र समाधीकडे एकटक पाहात अध्यात्माचीच अनुभूती घेत होतो. मधूनच एखादी तेजाळती उल्का झगझगीत प्रकाश टाकून निमिषार्धात अदृश्य होत होती. सप्तर्षी डोक्यावर येऊन मृग क्षितीजाला टेकलेला होता. चंद्रोदय पहाटेचा असल्याने नभांगण तारकांनी गच्च भरून गेले होते. तिथेच १/१:३० पर्यंत बसून आम्ही परत निघालो. ह्यावेळी मात्र राजवाड्यामार्गे मेणादरवाजातून उतरलो. गडद अंधारामुळे वातावरण एकदम गूढरम्य भासत होते. परत तिथल्या पायर्‍यांवर बसून आम्ही खोलीवर गेलो. मंडळी थकलेली असल्याने लगेच निद्राधीन झाली.

२४. राजसिंहासनापाशी लावलेल्या पण पणत्या

२५. रात्रीच्या अंधारात शिवसमाधी

मी पहाटेच उठलो. मिपाकर गाढ झोपलेलेच होते. आंघोळ उरकून बाहेर पडलो. एकटाच. शेजारचे दोन मोठे खळगे ओलांडून मोकळवणात आलो. तिथे काही इमारतींचे अवशेष आहेत. एक टेप ओलाडून एका छोट्या शिवमंदिरापाशी आलो. बाजूलाच कुशावर्त तलाव आहे. त्यापासून थोड्या वरच्या बाजूस मूर्ती नसलेली, कळस नसलेली एक मंदिरासदृश भग्न वास्तू आहे. तिथेही काही इमारतीचे चौथरे शिल्लक आहेत. वरील बाजूस असलेली नगारखान्याची अर्धवट दिसणारी वास्तू तिथून फार सुरेख दिसते. जवळच पायर्‍या आहेत. त्या चढून नगारखान्यापाशी आलो. तिथून होळीच्या माळावरून गडाची मुख्य देवता शिर्काई हिच्या छोटेखानी मंदिरापाशी आलो. अष्टभुजा शिर्काईचे दर्शन घेऊन खालच्या लवणांतून गंगासागरापाशी पोचलो. तिथे स्नानं उरकून आलेले स्पा आणि चचा भेटले. त्यांना घेऊन एमटीडीसीच्या उपाहारगृहात आलो. प्यारेकाका नाष्ट्याची वाट बघत होतेच. पोहे खाऊन परत खोलीवर आलो. एव्हाना इतर मंडळी आंघोळी उरकत होतीच. सकाळी एकटाच मी बाहेर पडल्याने मिपाकरांच्या थोड्याफार शिव्या बसल्याच. त्या निमूटपणे ऐकून घेऊन आम्ही सर्वांनी चेकआउट केलं. परत पायर्‍या चढून मेणादरवाजातून शिवसिंहासनाला मुजरा करून आम्ही बाजारपेठेच्या पुढे असलेया टकमक टोकावर जाण्यास निघालो. टकमक वर जाण्यासाठी एक टेप उतरून जावे लागते. तिथेच एका दारूकोठाराचे अवशेष आहेत. तिथल्या कड्यावरून सह्याद्रीच्या रांगा अतिशय सुरेख दिसतात. धारेसारख्या अरूंद मार्गावरून चालत आम्ही टकमक टोकावर पोचलो. तिथून राजवाडा, स्तंभ यांचे अतिशय सुरेख दर्शन होते. गडाचा महादरवाजा, खाली उतरणारा पायर्‍यांचा मार्ग, गडाचा उत्ताल कडा अतिशय सुरेख दिसतो.

२६. काही अवशेष

२७. शिवमंदिर, पाठीमागे नगारखाना

२८. बाजारपेठ

२९. स्तंभ

३०. स्तंभाचे एका वेगळ्याच कोनातून दर्शन

३१. शिर्काई मंदीर (फोटोसौजन्यः मन्या)

३२. टकमक टोकावरून दिसणारा राजवाडा

३३. टकमकावरून दिसणारी रायगडाची पायवाट , महादरवाजा व उत्ताल कडा

आता आम्हाला गड उतरून पायथ्याला जायचे होते. नेहमीच्या बाजारपेठेतून जाणार्‍या वाटेने न उतरता आम्ही टकमकाखालच्या एका अरूंद पायवाटेने महादरवाजानजीक मुख्य पायर्‍यांना गाठायचे ठरवले. एक एक टेप उतरत आम्ही टकमकाच्या खळग्यांत आलो. तिथे अगदी बारीकशी वाट होती, खाली घसारा, तीव्र घळघळीत उतार. ती वाट उतरताना प्यारेकाकांची भंबेरी उडाली. मूर्तीमंत भीती त्यांच्या चेहर्‍यावर दिसू लागली. कसेबसे प्यारेकाकांना सावरून आम्ही बर्‍यापैकी रूंद पायवाटेला लागलो. तिथून तीन फाटे फुटले. मी आणि विमे वरच्या फाट्याने निघून पुरुषभर उंचीची तटबंदी चढून पायरीमार्गाला लागलो, मधल्या वाटेने मन्या आणि प्यारेकाकापण पायरीमार्गाला लागले .प्यारेच्या चेहर्‍यावर आता प्रचंड सुटकेचे भाव होते. बाकी मिपाकर मंडळी अजून थोड्या खाली पायर्‍यांना मिळाली. तिथून थोड्याच खालते असलेल्या महादरवाजात आलो. महादरवाजाची रचना गोमुखी बांधणीची असून बाजूला दोन भव्य बुरुज आहे. बुरुजांवर जायला दगडी जिने आहेत व जागोजागी बंदूकांचा मारा करण्यासाठी जंग्या खोदलेल्या आहेत. दरवाजावर नगारखान्याप्रमाणेच हत्ती पायांतळी घेतलेल्या शरभाचे शिल्प आणि कमळचक्रे खोदलेली आहेत. अजिंक्य असा हा महादरवाजा उतरऊन आम्ही गड भराभरा उतरूलागलो. कड्याला ट्रॅव्हर्स मारत पदरातल्या दाट झाडीतल्या वाटेपाशी पोहोचलो. दाट झाडी ओलांडताच वाटेच्या खालच्या बाजूस पठारावर मशीद मोर्चाची नावाचे ठिकाण आहे. तिथे पहार्‍याचे मेटाचे अवशेष आहेत. रायगडवाडीतून येणारी नाना दरवाजाची वाट तिथून स्पष्ट दिसते.

३४. रायगडाचा महादरवाजा त्यावरील शरभ आणि कमलचक्रांसह

३५ व ३६. महादरवाजाची गोमुखी बांधणी

३७. रायगडावरून येणारी नाना दरवाजाची वाट

३८. खूबलढा बुरुजावरून होणारे रायगडाचे अप्रतिम दर्शन

वाळूसर्‍याच्या खिंडीशेजारून उंच उंच पायर्‍या उतरत आम्ही खूबलढा बुरुजापाशी आलो. इथून रायगड आणि टकमक टोकाचे अतिशय भव्य दर्शन होते. अजून काही उंच पायर्‍या ओलांडत आम्ही चित्त दरवाजापाशी आलो. इथे डांबरी रस्ता आहे. तिथून महाडला जाण्यास खाजगी वा एसटी बस मिळू शकतात. तिथल्या हाटेलापशी सर्वजण एखाद्या वाहनाची वाट पाहू लागले. पलीकडच्या बाजूस असलेल्या डोंगरात वाघबीळ म्हणून एक निसर्गनवल आहे. मी, किसनदेव आणि धनाजीराव तिकडे निघालो. अरूंद अशा पायवाटेने लहानसा चढ चढत पाचेक मिनिटातच वाघबिळापाशी पोहोचलो. ही एक आरपार नेढं असणारी नैसर्गिक गुहाच आहे. रायगडाच्या बाजूला एका छिद्र आणि पाचाडच्या बाजूला दोन छिद्र आहेत. गुहेत बसून रायगड आणि पाचाडचे अतिशय सुंदर दर्शन होते.

३९. वाघबीळ -पाचाडकडंच नेढं

४०. वाघबीळ - रायगडाकडंच नेढं

हे बघून आम्ही परत उतरायला लागलो. तेवढ्यात प्यारेकाका आणि तानाजी मालुसरे सोडून इतर सर्व मिपाकर वाघबीळ बघायला येतांना दिसले. वाघबीळ बसून सर्वजण परत चित्त दरवाजापाशी आलो. तितक्यात एक पिकअप व्हॅन आलीच त्यात बसून आम्ही सर्वजण महाडात पोहोचलो. जेवण उरकून स्टँडवर पोहोचायला जवळजवळ साडेतीन झाले. ३.३० च्या मुंबई आणि पुणे या दोन्ही एसट्यांचे रिझर्वेशन आधीच झाले असल्याने लगेचच गाडीत बसलो. धानाजीराव लोणेरे फाट्यानजीक असलेल्या त्यांच्या गावी मुक्कामाला निघून गेले. प्यारेने पोलादपूर मार्गे वाई गाठले. मुंबैकर पनवलेला तर आम्ही मी आणि मोदक पुण्यात निघालो ते रायगडाच्या आठवणी कायमस्वरूपी मनात जतन करूनच.

४१. गडावरचे मिपाकरांसोबात घालवलेले काही क्षण: पालखी दरवाजात

४२. टकमक टोकाजवळील दारूकोठाराजवळ

एकाच भागात रायगडाचा वृत्तांत टाकायचा ठरवल्याने हा भाग तसा मोठाच झालाय. सहभागी मिपाकर प्रतिसादांमधून अजून भर टाकतीलच.
सहभागी मिपाकरः विश्वनाथ मेहेंदळे, मन्या फेणे, किसन शिंदे, चचा, तानाजी मालुसरे, सौरभ उप्स, मोदक, प्यारे१, धन्या आणि वल्ली

प्रतिक्रिया

sneharani's picture

19 Apr 2012 - 4:56 pm | sneharani

मस्त वृतांत अन् फोटो देखील!
:)

स्पा's picture

20 Apr 2012 - 9:03 am | स्पा

ठरल्याप्रमाणे मी सौरभ आणि चचा पहाटे ५.४५ ला डोंबिवलीला जमलो.. तिथून पनवेल बस होती. ती बस मस्त वेळेत पनवेल ला पोचली
विमे दादर हून "खेड" बशीत येणार होता, त्याच बस मध्ये आम्ही पनवेल हून चढणार होतो. पनवेलला पोचल्यावर बराच मोकळा वेळ हाताशी होता.. मस्त पैकी नाष्टा - चा उरकला
तोवर किस्ना आणि तानाजी राव पण आले. थोड्याच वेळात बस आली. पण जेमतेम पळस्पे गावापर्यंत पोचलो.. आणि बस आचके देत थांबली .. पुढचा टायर लोला गोळा होऊन रस्त्यावर विसावला होता .. चायला..
म्हटल झाली नाट लागायला सुरुवात.. सर्व खाली उतरलो .. ड्रायवर तोंड घेऊन कुठेशी गेला होता... बस मधोमध थांबल्याने ५ मिनिटात अक्खा रस्ता जाम.... नुसता गोंधळ.. मग आम्ही बाजूच्या शेताडीत एका झाडाखाली विसावलो...
उन्ह तापायला सुरुवात झालेली होती.. आणि आम्ही "behind shedule " होतो. करायचं काय.. मग विमेच्या डोक्यात पत्ते खेळण्याची आयड्या आली.. नेमके चचा ने सुद्धा पत्ते आणलेले होतेच..
जेब्बत.. मग बस मधल्या एकाचा पेपर ढापला ... मस्त झाडाच्या सावलीत. आरामात पसरलो.. आणि झब्बू टाकायला सुरुवात केली.. त्यात जबर्या वेळ गेला.. थोड्याच वेळात बस सुरु झाली.. आणि आम्ही ११ वाजता तिथून हललो (खरतर आम्ही एव्हांना महाड गाठायला हव होत) पण महाडला पोचायला आम्हाला ३ वाजून गेले होते.. पुण्याची मंडळी कधीची खोळंबून बसलेली होती.. गेल्या गेल्या. .आमचा पुस्तक देऊन जाहीर सत्कार झालाच ;)
रायगड रोप वे ने जाणे.. हा एकदमच भारी अनुभव होता .. सह्याद्रीचा तो रौद्र कडा जसजसा जवळ येत जातो.. आपल्या खुजेपणाची भावना तेवढीच वाढते. रूम च बुकिंग झालेलं होतंच. समान टाकल.. मस्त खाल्लं आणि गड भटकायला निघालो.. तास पाहायला गेल तर १८१८ ला इंग्रजांनी अक्खा गड जाळून टाकला.. आणि आता फक्त चौथरे उरलेत.. तरी ते वातावरण भन्नाट होत.. फोटो काढायला खूप छान फ्रेम्स मिळाल्या.. राजाचं सिंहासन पाहून एकदम त्या काळात गेल्यागत वाटल... मधून मधून.. ताक.. लिंबू सरबत.. ढोसण सुरूच होत. होताहोता संध्याकाळ कलली.. आणि शुक्र तारा चमकायला लागला.. गार वार वाहायला लागल.. तोवर आम्ही जगदीश्वर देवळाच्या पुढे राजांच्या समाधीपाशी आलेलो होतो. गप्पा मारण्यात ८ कधी वाजले कळलच नाही. मस्त मग खाली एका खोपट्यात रात्रीच जेवण उरकलं ..
सकाळी वल्ली एकटाच गुपचूप कोणाला न उठवता गड भटकायला निघून गेला... त्याच्या त्याला सविस्तर शिव्या नंतर पडल्याच.. मग मी नि चचा मागून बाहेर पडलो/... थोड्या वेळात सगळेच आले.
टकमक टोक पाहून.. एका भलत्याच वाटेने उतरायला लागलो... प्यारे काका अमळ अवघडलेले होते .. पण एकदा पायर्या लागल्यावर त्यांच्या जीवात जीव आला :)
तिथून परत महाड.. महाड हून पनवेल बस.. आणि तिथून घर ...
एकूण रायगड ट्रेक दणका झाला.. आता पावसाळ्यात असाच एखादा भन्नाट गड सर करू....

कौन्तेय's picture

20 Apr 2012 - 10:40 am | कौन्तेय

उत्कृष्ट वृत्तांत नि जबरी फ़ोटोज हो वल्ली भाऊ! ॥ जय भवानी ॥
फ़ारच मजा आली. मुख्य म्हंजे फ़ोटोत बाकी मान्सां दिसत नाहीत. गर्दीची वेळ टाळून रायगड करण्यासारखं पुण्य़ नाही. गर्दीत जायलाही एक वेगळी मजा येते पण. त्यावेळी गडदर्शन हे उद्दीष्ट न ठेवता गर्दीदर्शन हे असावं. चावटपणा म्हणून म्हणत नाही, पण गावोगावाहून आलेल्या वेगवेगळ्या स्तरांतल्या, परिस्थितींतल्या आबालवृद्ध नरनारींच्या नि मुख्यतः बच्चेकंपनीच्या डोळ्यांत शिवाजीराजाबद्दल दाटून येणारं अपार प्रेम पाहून या देशाला अजून भवितव्य आहे याची खूणगाठ बांधता येते. पिकाड नि फ़डतुस पब्लिकही कुठे कुठे भेटतं, पण त्यांना नजरेआड करता येतं (एकदा एखाद्याला तरी कुठल्याशा कड्याआड करायची विच्छा आहे). आमचे फ़ोटू इथे -
जगदीश्वर - होळीचा माळ - राजे

चिगो's picture

1 May 2012 - 5:31 pm | चिगो

तीर्थाटनाचं पुण्य लाभलं, बाबांनो तुम्हाला..

वल्ली, अतिशय सुंदर वृत्तांत.. त्यात बाकीच्या मंडळींनी वेळोवेळी चांगली भर टाकलीय. नशीबवान आहात, मित्रहो..
@ कौंतेय, तुमचा फोटोही सुंदर आहे.
आज महाराष्ट्रदिनी हा धागा वाचला, आणि दिवसाचं सार्थक झालं..

स्पा's picture

3 Aug 2013 - 10:15 am | स्पा

भारी रे ...

स्पा's picture

3 Aug 2013 - 10:19 am | स्पा

धमाल आली परत वाचायला

जबरा फोटु वो वल्लीशेट. लेखन पन भारी. अगदी बसल्या बसल्या रायगडचे दर्शन घडविले कि वो.

असाच एक विचार आला,काल्पनिक असणाऱ्या कथेवर ते ३०० सारखा भव्यदिव्य चित्रपट बनवू शकतात तर आपल्या महाराजांनी त्यांच्या आयुष्यात लढलेल्या लढायांवर - शाहिस्तेखानाचा काटा काढण्याचा प्रसंग ,उंबरगाव ची लढाई,अफझलखानाचा वध,विशाळगडाची लढाई यांच्यावर असे किती चित्रपट तयार करता येतील.

सुबोध खरे's picture

4 Aug 2013 - 11:12 am | सुबोध खरे

+१

जबरा रे वल्ली. एक लम्बर शाही मोहीम. तुज्या एकेक मावळ्याचे नाव वाचून मन भरुन आले. काय एकेक शिलेदार हुडकलायस . वा वा वा

प्रचेतस's picture

3 Aug 2013 - 4:11 pm | प्रचेतस

हेहेहे. मीही त्यातलाच एक मावळा.
राजे फ़क्त एकच._/\_

अत्रुप्त आत्मा's picture

3 Aug 2013 - 5:17 pm | अत्रुप्त आत्मा

अगोबाचा धागा..आणी त्यात आमची शंभरावी जागा!!!! =))

http://www.sherv.net/cm/emoticons/rage/steamboat-troll-rage-smiley-emoticon.gif

=)) =)) =))

फोटो बघून लै भारी वाटले. २००९ मध्ये निनाद बेडेकरांबरोबर रायगड ट्रिप केली होती त्याच्या आठवणी जाग्या झाल्या. रात्रभर भूषणाच्या कविता सांगून जी बहार आणली होती, केवळ वाह!!!!!

अजून एकः तेव्हा मेघडंबरीत राजांचा पुतळा नव्हता, आता बसवलेला दिसतोय.

आशु जोग's picture

6 Aug 2013 - 8:03 pm | आशु जोग

पहाटे किंवा सायंकाळी बहुतेक फोटो काढलेले दिसतात. त्यामुळे निश्चितच छान आले आहेत फोटो.