महाभारत युद्धामागील राजकीय समीकरणे

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in काथ्याकूट
11 Jul 2013 - 11:44 am
गाभा: 

महाभारत युद्धामागील राजकीय समीकरणे

हस्तिनापूरचे राज्य हे तसे छोटेसेच. या एवढ्याश्या राज्याच्या वाटणीवरून जे युद्ध झाले, ते मात्र एवढे विराट. त्यात तात्कालीन भारतवर्षातील जवळ जवळ सर्व राजे आपापल्या सैन्यासह लढायला आले. वस्तुत: हा तंटा एकाच कुलातील दोन शाखांचा असताना दूर-दूरच्या राजांना त्यात काय स्वारस्थ्य होते? या युद्धातून त्यांचा काही लाभ होण्यासारखा होता का? त्यातील काही राजांनी दुर्योधनाची बाजू घेतली, तर काहींनी युधिष्ठिराची. यामागे त्यांची काय भूमिका होती? त्यात काही राजकीय समीकरणे होती का? या प्रश्नांचा मागोवा घेण्याचा हा एक प्रयत्न.
* * * * *
महाभारतकालीन भारतवर्षात अनेक लहान-मोठी राष्ट्रे (वा राज्ये) अस्तित्वात होती: पूर्वेकडील कोसल, मगध, चेदि, अंग, विदेह, हैहय, पौंड्र, वंग, वगैरे राष्ट्रे, मध्य प्रांतातील कुरु, पांचाल, भोज, मत्स्य वगैरे राष्ट्रे, तसेच पश्चिम व दक्षिणेकडील अनर्त, विदर्भ, गांधार, अश्मक व अन्य राष्ट्रे.
या राष्ट्रांत आपसातील भांडण-तंटे, लढाया नेहमीच होत असत, शिवाय अधून मधून आर्यावर्ताच्या बाहेरील संस्कृतींशी त्यांचे संघर्ष घडून येत. या राष्ट्रांच्या जडण-घडणीत दोन प्रकारच्या प्रवृत्ती कार्यरत होत्या. पहिल्या प्रवृत्तीचे स्वरूप हे 'एकछत्री साम्राज्य' निर्माण करण्याच्या प्रयत्नातून व्यक्त होत होते, तर दुसरीचे अश्या साम्राज्यापासून स्वतंत्र होण्याच्या/राहण्याच्या प्रयत्नातून.

f

ही राष्ट्रे एकछत्री साम्राज्याच्या अधिपत्याखाली पाच वेळा आलेली दिसतात:

१. (इक्ष्वाकु कुल) युवस्वानचा पुत्र मांधाता याचे साम्राज्य
२. (इक्ष्वाकु कुल) राजा मरुत याचे साम्राज्य
३. (हैहय वंश) कार्तिवीर्यार्जुनाचे साम्राज्य
४. (इक्ष्वाकु कुल) सागर - भगिरथाचे साम्रज्य
५. (कुरुवंश) राजा भरत याचे साम्राज्य.

यापैकी हैहय साम्राज्याचा काळ हा प्राचीन यज्ञप्रधान वैदिक संस्कृतीच्या वाताहतीचा ठरला...हैहय हे भारतवर्षाच्या पूर्वेकडील लोक असून त्यांचा कल आर्य संस्कृतीपासून असलेले स्वतःचे वेगळेपण जपण्याचा होता. पुढे ब्राम्हणांशी घडून आलेल्या हिंसक संघर्षात, जमदग्नि-पुत्र परशुरामाचे हातून त्यांचा संहार होऊन (एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रीय इ.) त्यांचे साम्राज्य विलयाला गेले.

हैहय साम्राज्याच्या पतनानंतर इक्ष्वाकु आणि कुरु या दोनच प्रबळ सत्ता उरल्या, आणि भगिरथापासून दाशरथी रामापर्यंतचा काळ इक्ष्वाकु कुळाचे सुवर्णयुग ठरला. त्यानंतर मात्र त्या कुळाचा र्‍हास होऊन कुरुवंशीय भरताचे साम्राज्य आले.

भरताने स्थापन केलेले कुरु साम्राज्य पुढे खिळखिळे, विघटित होत, शंतनु-विचित्रवीर्य-पंडु च्या काळापर्यंत हस्तिनापुरच्या लहानश्या राज्याएवढेच काय ते उरले होते. असे असले, तरी कुरुवंश हा अद्याप अग्रगण्य मानला जात असे.
या काळापावेतो इतर बरेच राजे सामर्थ्यसंपन्न झालेले होते, उदा. पांचालाधिपती द्रुपद, भोजांचा भीष्मक, चेदींचा प्रमुख शिशुपाल, मगधाधिपती बृहद्रथ व जरासंध, सिंध प्रांतातील जयद्रथ, वंग देशातील पौंड्रवंशी वासुदेव ( हा कृष्णासारखी वेशभूषा करून मीच खरा वासुदेव असे म्हणत असे. याला कृष्णाने अनेकदा "जादा शानपंती दिखानेका नै, वरना इधरिच डाल दूंगा… समझा क्या ? अशी तुंबी दिली होती. तरी तो ऐकेना, म्हणून शेवटी त्याचा गेम केला होता ). तसेच यादवांचे लष्करी सामर्थ्य आणि हुशारी यामुळे तात्कालीन राजकारणात त्यांचे स्थान निर्णायक ठरण्यासारखे असले, तरी त्यांच्यात एकीचा अभाव होता.
सारांश, त्याकाळी अनेक राजे सामर्थ्यसंपन्न असले, तरी कुरूकुलास आव्हान देऊन स्वत:चे मोठे साम्राज्य स्थापित करण्याची क्षमता त्यांच्यात नव्हती.

जरासंधाने आपले सामर्थ्य वाढवत नेऊन शिशुपालाच्या सहकार्याने साम्राज्य- स्थापनेचा प्रयत्न चालवला होता. अनेक राजांवर आक्रमण करून त्यांना बंदी बनवले होते, आणि नरमेध यज्ञ करून त्यात त्यांना बळी द्यायचे ठरवले होते. (शतपथ ब्राम्हणादि ग्रंथात वर्णिल्याप्रमाणे-) नरमेध यज्ञ हा अश्वमेध यज्ञापेक्षा वरचढ असून तो करणार्‍याला अमर्याद सत्तेचा लाभ होतो, असे फळ सांगितले गेलेले होते.

परंतु श्रीकृष्णाने भीमाकरवी जरासंधाचा, आणि स्वत: शिशुपालाचा वध करून त्या साम्राज्याची शक्यताच नष्ट केल्याने आता नवीन साम्राज्याचा उदय झाला, तर तो कुरुवंशातूनच होणार, असेच सर्वांना वाटत होते.

खुद्द कुरुवंशात मात्र, दुर्योधनाने पाडवांना राज्याचा वाटा देण्यास दिलेला नकार, युधिष्ठिराने केलेला राजसूय यज्ञ, द्यूतात झालेली पांडवांची हार, द्रौपदीची कौरवांनी केलेली विटंबना, वगैरे घटनांतून कौरव-पांडवातील वैमनस्य वाढत जाऊन त्यांच्यातील युद्ध अटळ झाले होते, आणि त्या दोन्ही पक्षांनी अन्य राजांची मदत आपणासच लाभावी, असा प्रयत्न चालवला होता.
या राजांपैकी काहींचे कौरव वा पांडवांशी नातेसंबंध होते, जसे पांचाल-नरेश द्रुपद हा द्रौपदीचा पिता, विराट हा अभिमन्यूचा सासरा, यादव हे सुभद्रेचे माहेर, श्रीकृष्ण हा कुंतीचा आतेभाऊ, शल्य हा नकुल-सहदेवांचा मामा, जयद्रथ हा धृतराष्ट्राचा जावई, गांधार हे गांधारीचे माहेर… इत्यादि.

अश्या नातेवाइकांनी त्या त्या पक्षात जाणे साहजिकच असले, तरी याला काही अपवादही होते. उदा. यादवांनी, तसेच शल्याने दुर्योधनाचा पक्ष घेतला, तर कौरवांपैकी विकर्ण हा पांडवांकडे गेला. त्रिगर्ताचा राजा सुशर्मा (याचेकडे 'संशप्तक' हे कडव्या योद्ध्यांचे दल होते) याने अर्जुनाशी असलेल्या वैयक्तिक वैरामुळे दुर्योधनाचा पक्ष घेतला.

श्री अरविंद यांनी (१९०१ च्या सुमारास) मांडलेल्या सिद्धांतानुसार,तात्कालीन राष्ट्रे ही खालील तीन प्रकारच्या विचारांपैकी कोणत्या ना कोणत्याने प्रेरित होऊन युद्धात सहभागी झालेली होती:

१. कांही झाले, तरी स्वत:चे स्वातंत्र्य जपण्याची इच्छा असणारी राष्ट्रे. (शल्य, यादव इ. ??)
२. कुरुकुलाच्या मोठेपणावर मात करून स्वत:चे वर्चस्व स्थापित करण्यास आतुर राष्ट्रे. (मत्स्य, पांचाल ??)
३. पूर्वीच्या वैभवशाली साम्राज्याची स्मृती जपणारी, आणि तश्या एकछत्री साम्राज्याचा पुरस्कार करणारी राष्ट्रे. (चेदी,मगध, कुंतिभोज ??)

यातील पहिल्या वर्गातील राष्ट्रे दुर्योधनाच्या पक्षात गेली. कारण त्यांना असे वाटत असावे, की दुर्योधनाचे राज्य हे फार काळ टिकणारे नव्हे. याउलट युधिष्ठिराचे वर्धिष्णु राज्य मात्र दीर्घकाळ टिकेल... असे वाटण्यामागे दुर्योधनाच्या मर्यादा, तसेच युधिष्ठिराने केलेल्या राजसूय यज्ञातून दिसून आलेले त्याचे वाढते सामर्थ्य, आणि या सामर्थ्यामागे असलेले श्रीकृष्णाचे सूत्र-संचालन या गोष्टी असाव्यात.

श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्व हे काहींच्या मनात भक्तियुक्त आदर निर्माण करणारे, तर काहींच्या मनात तिरस्कार, द्वेष आदि निर्माण करणारे होते. कारण, त्यांच्या मते श्रीकृष्ण हा तात्कालीन नीति, धर्म आणि राजकारणात नको नको ते बदल घडवून आणू पाहणारा धूर्त, कपटी, कावेबाज आणि अविवेकी माणूस होता ( हे शिशुपालाने केलेल्या आगपखडीतून, तसेच भूरिश्रवा सारख्या आदरणीय, सर्वमान्य बाल्हिक राजाने केलेली श्रीकृष्णाची निंदा यातून दिसून येते).
श्रीकृष्ण आणि पांडव यांच्या युतीतून आकारास येत असलेल्या साम्राज्याचे मांडलिक होण्याच्या भीतीने ग्रस्त झालेली, साधारणत: आर्यावर्ताच्या बाह्य परीधीवरील राष्ट्रे (मद्र, सिंधु, अवंती, गांधार, यादव ???), तसेच गंगेच्या दक्षिण खोर्‍यात वसलेले आर्य राजे दुर्योधनाच्या पक्षात गेले.

जरासंध आणि शिशुपाल यांचे वध भीम-श्रीकृष्ण यांनी केलेले असूनही ( की त्यामुळेच ?) वधानंतर त्यांची राष्ट्रे मात्र पांडवांच्या पक्षात गेली.

भीष्म व द्रोण यांना पांडवांविषयी ममत्व होते, आणि पांडवांचा हक्कही मान्य होता, तरीही युद्धात पांडवांकडून न लढता कौरवसेनेचे नेतृत्व करून त्यांनी पांडव-सेनेचा संहार केला. याचे कारण, त्यांना पांडवांच्या पाठीशी सर्व शक्तीनिशी ठाकलेले द्रुपद आणि विराट हे बलाढ्य राजे भविष्यात सर्व सत्ता काबीज करतील, अशीही भिती वाटत असावी.
* * * * * *

वाचकहो, माझ्या अल्पमति आणि अतिअल्प अभ्यासाच्या आधारे हे सर्व लिहिले आहे. या विषयावर अन्य लेखकांनी काय सांगितले आहे, मूळ महाभारतात याविषयी कोणते उल्लेख आहेत, तसेच श्री अरविंद यांचा सिद्धांत कितपत ग्राह्य मानला जाऊ शकतो, असल्यास त्यानुसार कोणकोणते राजे त्या त्या पक्षात गेले, वगैरेंवर विद्वान अभ्यासक अधिक प्रकाश टाकतील, अशी आशा आहे.
सदर लेखनात काही त्रुटि असतील, तर त्या अवश्य नजरेस आणून द्याव्यात.

काही चित्रे:
बलराम-जरासंध युद्ध:
d

जरासंधवध:
s

कृष्णाची द्वारका:
l

कौरव-पांडव युद्ध:
j

प्रतिक्रिया

विवेचन अन चित्रे दोन्हीही आवडले. कॉलिंग वल्ली आणि इतर जाणकार. पुन्हा एकदा नीट वाचून मत देतो, तोपर्यंत ही पोच.

अग्निकोल्हा's picture

11 Jul 2013 - 5:11 pm | अग्निकोल्हा

माणसं आहेत. कुरुबुरि चालायच्याच. युध्दे व्हायचीच. यातुन खरच काहि निष्पन्न होतेय असं वाटत नाही. या लेखाचे प्रयोजन काय ?

चित्रगुप्त's picture

11 Jul 2013 - 5:23 pm | चित्रगुप्त

....या लेखाचे प्रयोजन काय ? ....
>>>>भारतीय पुराणेतिहासातल्या अतिशय मोठ्या आणि महत्वाच्या घटनेचे समग्र आकलन करून घेणे.
या आकलनाचा उपयोग काय, असे कुणी विचारणार नाही, ही आशा.

अग्निकोल्हा's picture

11 Jul 2013 - 5:37 pm | अग्निकोल्हा

आपल्याला आकलन व्हावे यासाठी माझ्या मनःपुर्वक शुभेछ्चा.

प्रसाद गोडबोले's picture

12 Jul 2013 - 2:28 am | प्रसाद गोडबोले

पुराणेतिहास ह्या श्ब्दात जरा घोळ आहे ...हा प्रश्न मी मागेही इतरत्र व्हिचारला होता ...की पुराणे संपुन इतिहास सुरु होती ती बाअ‍ॅडरी लाईन नक्की कोणती ...मी जे काही थोदं फार वाचलं आहे त्या पुराण इतिहासा नुसार जनमेजय हा पुराणातील शेवटचा राजा ...आणि मग एकदम गौतम बुध्दावर ऊडी मारली आहे ... म्हणजे जवळपास सुमारे २५०० वर्षांचा हिशोब नाही :( तेही जर महाभारताची सर्वश्रुत टाईम लाईन खरी मानली तर ...

ह्यावर कोणि अधिक प्रकाश टाकु शकेल काय ??

(बाकी चित्रे मस्त आहेत पण त्याकाळी घोड्यावर बसण्याची कला अवगत न्हवती असे इरावती बाई म्हणाल्या अहेत युगान्त मधे )

प्रसाद गोडबोले's picture

12 Jul 2013 - 2:31 am | प्रसाद गोडबोले

महाभारतात कृष्णाने कालयवनाचा पराभव केल्याचा उल्लेख आहे ...हा कालयवन म्हणजे झर्क्सिस( आपला ३०० वाला हो नथ घालणारा ) किंव्वा त्याचा कोणी पुर्वज असावा काय ?

मालोजीराव's picture

11 Jul 2013 - 5:11 pm | मालोजीराव

युद्धानंतर पांडवांनी किती वर्षे राज्य केलं आणि नंतर त्यांना कोणी टेकओवर केलं हेही वाचायला आवडेल

अवांतर : आधुनिक काळातील अणुबॉम्ब, स्ट्रिंगर मिसाईल, विमान, लाइव ब्रॉडकास्टिंग यांची तुलना त्या काळात वापर्ल्या गेलेल्या काही गोष्टींशी होते यावर हि जाणकारांनी प्रकाश टाकावा.

युद्धानंतर पांडवांनी सुमारे ३६ वर्षे राज्य केले. युधिष्ठिर कायम पश्चातापाच्या आगीत जळत राहिला. त्यानंतर स्वर्गारोहणास जातांना हस्तिनापुराचे राज्य परीक्षितास दिले. त्याच्यानंतर जनमेजयाच्या रूपाने पांडववंश चालूच राहिला. तर इंद्रपस्थाचे राज्य कृष्णाचा नातू (का पणतू?)वज्र यास दिले गेले.

पैसा's picture

11 Jul 2013 - 6:59 pm | पैसा

कृष्णाचा रुक्मिणीपासून मुलगा प्रद्युम्न. प्रद्युम्नाचा अनिरुद्ध. अनिरुद्धाचा वज्र.

लॉरी टांगटूंगकर's picture

11 Jul 2013 - 5:29 pm | लॉरी टांगटूंगकर

पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

11 Jul 2013 - 5:50 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अभ्यासपूर्ण लेख मनापासून आवडला. फक्त एक अजुन त्यात हवे असे वाटते, आपण जी राज्यांची नावे दिली आहेत ती त्या काळात त्या राज्यांना ओळखणारी नावे आहेत, आज तीच राज्ये कुठल्या देशात, राज्यात येतात, ते कळले तर समजायला सोपे जाईल असे वाटते. तुम्हाला माहीत असेल तर तेही लिहा, नाहीतर, मिपावर जाणकार आहेत त्या विषयावरचे त्यांनी लिहावे असे आवाहन करतो.

मनिम्याऊ's picture

12 Jul 2013 - 3:18 pm | मनिम्याऊ

उत्तरेपासुन दक्षिणेकडे त्या काळाचा भूगोल पाहुया.
१. पारसिक = पर्शिया (आजचे इराण)
२. हूण = ताजकिस्तान
३. चीन = चीन
४. सिंहल = श्रीलंका
ही झाली शेजारी राष्ट्रे

आता भारतवर्षातील राज्ये पाहू.
बाल्हिक = बल्ख/बक्ट्रिया, अफगाणिस्तान
यवन+ काम्बोज = काबुल, अफगाणिस्तान
गांधार = कन्दाहार, अफगाणिस्तान
परित्राज = बलुचिस्तान, पाकिस्तान
काश्मीर = काश्मीर
दरद = अक्साइ चीन
परतन्गण = वायव्य तिबेट
तन्गण = वायव्य तिबेट+ हिमाचल प्रदेश
केकय = जम्मू
कुरु = हरियाणा
इन्द्रप्रस्थ = दिल्ली
मरु + मस्या + दशार्ण= राजस्थान (अंशत:)
सौवीर= सिंध
आभीर = माउन्ट अबू
पान्चाल = उत्तरप्रदेश (पश्चिमेकडील)
कोसल = मध्य उत्तरप्रदेश
काशी + विदेह= पूर्वेकडील उत्तरप्रदेश
मगध = बिहार
अंग = बिहार + उत्तरेकडील बांग्लादेश
प्रागज्योतिष = आसाम
मणिपूर = मणिपूर
ब्रह्मदेश = ब्रह्मदेश (म्यानमार)
वंग = बंगाल (उत्तरेकडील)
पौन्ड्र = बंगाल (दक्षिणेकडील)
ताम्रलिप्तक = सुंदरबन, प.बंगाल
काशी + विदेह= पूर्वेकडील उत्तरप्रदेश
मगध = बिहार
अंग = बिहार + उत्तरेकडील बांग्लादेश
प्रागज्योतिष = आसाम
मणिपूर = मणिपूर
ब्रह्मदेश = ब्रह्मदेश (म्यानमार)
वंग = बंगाल (उत्तरेकडील)
पौन्ड्र = बंगाल (दक्षिणेकडील)
ताम्रलिप्तक = सुंदरबन, प. बंगाल
उत्कल + कलिंग= ओडिसा
अवंती = मध्यप्रदेश
द्वारका+ आनर्त + सौराष्ट्र = गुजरात
विदर्भ = विदर्भ
परान्त + अपरान्त = कोंकण
शूर्पारक = दक्षिण कोंकण + गोवा
अश्मक = मध्य महाराष्ट्र
माहिषक = कर्नाटक
पान्ड्य+ द्रविड+ चोल = तामीळनाडू

ही झालीत भारतवर्षातील प्रमुख महाजनपदे. जमल्यास नद्या, पर्वत आणि अरण्यान्ची नावे पण देण्याचा विचार आहे....

तिमा's picture

12 Jul 2013 - 8:20 pm | तिमा

कुरु = हरियाणा
म्हणजे कौरव पांडव हे जाट की काय? म्हणूनच असा सर्वनाश करुन घेतला. त्यांचे आणि यादवांचे वंशज सध्या काय करताहेत ते दिसतेच आहे.

विवेकपटाईत's picture

10 Mar 2023 - 11:29 am | विवेकपटाईत

त्याकाळात यादवांचे राज्य होते.महाभारत युद्धात क्षत्रिय यादव, गोपालक होते. जाट म्हणजे शेतकरी समुदाय, युद्धात नव्हता.. बाकी जाट पुणेकर लोकांपेक्षा निश्चित जास्त हुशार असतात. जाटांच्या गाव (बिंदापूर, उत्तम नगर ) जवळ राहतो. अनुभवाचे बोल. एक तर मैदानी भाग आणि सतत परकीय आक्रमण तरीही जाटानी संस्कृती टिकवून ठेवली, यातच सर्व आले.

@ विवेक भौ, तुमचे "जाट पुणेकर लोकांपेक्षा निश्चित जास्त हुशार असतात" हे विधान मिपावर खळबळ माजवणारे ठरू शकते. तरी यावर तुमचे अनुभव जरा विस्ताराने लिहावेत अशी विनंती करतो.
हस्तिनापूर, कुरुक्षेत्र वगैरे भाग सध्याच्या हरियाणात येत असल्याने कौरव्/कुरुवंशीय आणि यादव्/यदुवंशीय हे आजच्या संदर्भात नेमके कोण असावेत ? त्या वंशाचे लोक सध्या कोणते आहेत ? सध्याचे जाट तापट आणि उद्धट आहेत असे जाटेतर लोकांचे एकंदरित मत असलेले दिसते.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

13 Jul 2013 - 6:10 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

__/\__!!
धन्यवाद.

प्रास's picture

15 Aug 2013 - 8:46 am | प्रास

मला वाटतं, शूर्पारक म्हणजे कोकणाचा उत्तर दिशेचा भाग असावा कारण तसे अवशेष सोपारा या वसई तालुक्यातील गावात आढळतात.
अपरान्त म्हणजे दक्षिण कोकण असावे.
बाकी चित्रगुप्तकाकांचं लेखन विचारप्रवण करणारं आहे यात काहीही संशय नाही.

नितिन थत्ते's picture

11 Jul 2013 - 6:09 pm | नितिन थत्ते

विवेचन आवडले.
तत्कालीन राजकारणाचा वेध घेण्याची संकल्पनाही आवडली.

पैसा's picture

11 Jul 2013 - 7:01 pm | पैसा

महाभारत एका जराशा वेगळ्या दृष्टीकोनातून बघूयात! सोबतची चित्रेही नेहमीप्रमाणे छान!

प्रचेतस's picture

11 Jul 2013 - 8:35 pm | प्रचेतस

उदा. यादवांनी, तसेच शल्याने दुर्योधनाचा पक्ष घेतला, तर कौरवांपैकी विकर्ण हा पांडवांकडे गेला.

शल्याला दुर्योधनाने वाटेत जोरदार आदरातिथ्य करून गोड बोलून वचनात फसवल्यामुळे नाईलाजाने दुर्योधनाचा पक्ष घ्यावा लागला.
यादवांनी सरसकट कौरवांचा पक्ष घेतल्याचे दिसून येत नाही. बलरामाच्या जवळचा हार्दिक्य कृतवर्म्याने दुर्योधनाला पाठिंबा दिला तर कृष्णाच्या जवळचा अर्जुनशिष्य सात्यकीने पांडवांचा पक्ष घेतला. खुद्द बलराम तर युद्धापासून अलिप्तच राहिला. तर श्री़कृष्ण पहिल्यापासून पांडवांच्या बाजूनेच होता. नि:शस्त्र कृष्ण किंवा त्याची नारायणी सेना ही गोष्ट नक्कीच प्रक्षिप्त असावी. कारण नारायणी सेनेचा पुढे उल्लेख येत नाही, एक दोन ठिकाणी तसा आहे पण ते भाग बाहेरून घुसडलेले आहेत हे उघड दिसते.
विकर्णाने वेळोवेळी पांडवांची बाजू घेतली असली तरी युद्धात तो दुर्योधनाच्या बाजूनेच लढला. पांडवांच्या बाजूने गेला तो युयुत्सु.

आता अरविंदांच्या सिद्धांताबद्दल

१. कांही झाले, तरी स्वत:चे स्वातंत्र्य जपण्याची इच्छा असणारी राष्ट्रे. (शल्य, यादव इ. ??)

शल्य आणि यादवांबद्दल वर लिहिलेच आहे तरी अजून लिहितो.
मद्र आणि यादवांना तत्कालिन आर्यावर्तात फारसा मान नव्हता. मद्र देशातील लोकांना कसे हीन समजले जात असे याचे सविस्तर वर्णन कर्ण-शल्य संवादात प्रकट होते. तर यादव हे आर्य नव्हेतच असे बहुतेकांचे मत होते. किंबहुना त्यांना क्षत्रियच समजले जात नसे. वृष्णी, अंधक कुळाला फारशी प्रतिष्ठा नव्हती. कंसवधानंतर तर ती अजूनच कमी झाली होती. कृष्ण तर गवळ्याचा पोर म्हणूनच ओळखला जात असे. तशातच जरासंधाच्या भितीने मथुरा सोडून दूर आनर्त देशात जाऊन राहिल्यामुळे यादव घराणे पळपुटेच समजले जात असे. अग्रपूजेच्या वेळी शिशुपालाकडून झालेली कृष्णनिंदा, रूक्मिणीविवाहाचे कृष्णास आमंत्रण नसणे ह्या घटना पुरेशा बोलक्या आहेत.
अर्थात पुढे कृष्ण, बलरामाने स्वःपराक्रमाने स्वतःचा दरारा निर्माण केला ही गोष्ट वेगळी. किंबहुना यामुळेच त्यांना स्वतःचे राज्य प्रिय असावे. पण युद्धापासून यादवांचा कसलाही फायदा झाल्याचे दिसून येत नाही. यादववंश आपापसात लढून नष्ट झाला.

२. कुरुकुलाच्या मोठेपणावर मात करून स्वत:चे वर्चस्व स्थापित करण्यास आतुर राष्ट्रे. (मत्स्य, पांचाल ??)

मत्स्य राष्ट्र अगदी लहानसे होते. त्यांनी कुणावर स्थापण्याचा प्रश्नच येत नव्हता. विराटनगरीतील पांडवांच्या अज्ञातवासानंतर मत्स्य आणि पांडव दोघेही एकमेकांच्या ऋणात तर पुढे नात्यात बांधले गेले. पांचाल मात्र महत्वाकांशी होते. भीष्मामुळे जरी हस्तिनापुराचे उघड शत्रुत्व घेण्याचे धैर्य त्यांच्या नसले तरी द्रोणांमुळे ते कौरवांचे वैरी झालेच. द्रौपदी स्वयंवरानंतर तर कट्टर पांडवपक्षी झाले. पांडवांकडील मुख्य सेना ही पांचालांचीच होती.

पूर्वीच्या वैभवशाली साम्राज्याची स्मृती जपणारी, आणि तश्या एकछत्री साम्राज्याचा पुरस्कार करणारी राष्ट्रे. (चेदी,मगध, कुंतिभोज ??)

शिशुपाल आणि जरासंध वधानंतर चेदी, मगध राज्ये अतिशय कमजोर झाली. त्यात पांडवांनी दोघांच्याही पुत्रांना त्यांचे राज्य न बळकवता उलट त्याच राज्यांवर त्यांचा अभिषेक केल्या गेल्याने पांडवांच्या ऋणात आली व युद्धात त्यांनी पांडवांचा पक्ष घेतला.
प्रागज्योतिषपुराचा राजा भगदत्त मात्र पांडवांचा प्रिय होता मात्र कृष्णाचा कट्टर वैरी. (नरकासुराचा हा मुलगा). हा दुर्योधनाचाही स्नेही होता. त्याने शेवटी कौरवांचा पक्ष घेतला.
बाल्हिक राजा भीष्माचा चुलता. खरा तर सर्वात जेष्ठ कुरु (शांतनुचा सख्खा भाऊ). हा साहजिकच आपले पुत्र, पौत्र सोमदत्त, भूरिश्रवा यांसह कौरवपक्षास जाऊन मिळाला.
बाकी इतरही राजे काही नातेसंबंध तर काही परस्परांच्या वैरापायी एकेकाचा पक्ष घेते झाले. उदा. कृष्णाच्या वैरापायी अवंतीच्या विंदानुविंदांनी कौरवांचा पक्ष घेतला तर विंदानुविंदांचे वैरी केकयांनी पांडवांचा. अलंबुषादी रा़क्षस भीमसेनाने केलेल्या बक-किर्मिरादी राक्षसांचा वधाचा सूड घेण्यासाठी दुर्योधनास जाऊन मिळाले.
सिंधु-गांधार देश तर दुर्योधनाच्या अगदी जवळच्या नात्यातीलच होते. साहजिकच ते कौरवांकडेच गेले.

भीष्म व द्रोण यांना पांडवांविषयी ममत्व होते, आणि पांडवांचा हक्कही मान्य होता, तरीही युद्धात पांडवांकडून न लढता कौरवसेनेचे नेतृत्व करून त्यांनी पांडव-सेनेचा संहार केला. याचे कारण, त्यांना पांडवांच्या पाठीशी सर्व शक्तीनिशी ठाकलेले द्रुपद आणि विराट हे बलाढ्य राजे भविष्यात सर्व सत्ता काबीज करतील, अशीही भिती वाटत असावी

असे वाटत नाही. भीष्म हस्तिनापुराला कायमस्वरूपी बांधला गेलेला होता. अर्थात त्यानेही एकाही पांडवांचा वध करणार नाही असे आधीच सांगितले होते. जिथे भीष्म तिथे द्रोण. एकतर हा द्रुपदाचा कट्टर वैरी शिवाय द्रोणपुत्र अश्वत्थामा दुर्योधनाच्या पक्षातला. पुत्रमोह, भीष्माचे ऋण यांतच अडकून द्रोणाची वाताहत झाली.

मला तरी अरविंदांच्या सिद्धांतात फारसे तथ्य वाटत नाही. नातेसंबंध, तसेच एकमेकांच्या वैरापायी केले गेले स्कोअर सेटलिंग असेच काहीसे वाटते.

राघव's picture

12 Jul 2013 - 3:02 am | राघव

काही टीपा:
- यदूवंशजांना क्षत्रीय समजत नसत ते ययातीच्या संदर्भानेच.. बरोबर ना?
- यादव बरेच होतेत. द्वारिका-मथुरा सोडलेत तरी आणखीही होतेत. संदर्भ वाचावे लागतील परत. सापडलेत की डकवतो इथे.
- माझ्या वाचनाप्रमाणे यादवांचे तीन चतुर्थांश सैन्य महायुद्धात नष्ट झाले. अर्थात् तुम्ही वर म्हटले आहे की हे उल्लेख बाहेरून घुसडल्यासारखे वाटतात. ते का ते समजले नाही.
- बलराम लढले नाहीत कारण त्यांना दुर्योधन प्रिय होता. पण कृष्णाच्या प्रतिपक्षात उभे रहायची कल्पना त्यांना सहन झाली नाही. तसेही पांडवांसोबत असलेले नाते हे आणखी एक कारण.
- यादवांचा नाश युद्धानंतर ३ तपांनी झाला. प्रभासक्षेत्री झालेल्या यादवीत बहुतांश मारल्या गेलेत. बरेचसे कृष्णांनी स्वतःच मारलेत.
- मगध पांडवांकडून लढलेत की नाही याचा संदर्भ मिळाला नाही. जरासंधपुत्र सहदेवाचा उल्लेखच सापडला नाही. तुमच्याकडे काही संदर्भ असल्यास द्यावेत.
-

- यदूवंशजांना क्षत्रीय समजत नसत ते ययातीच्या संदर्भानेच.. बरोबर ना?

हो. ययातीच्या शापामुळे यदु राज्यभ्रष्ट झाला होता.
बाकी यादवांची १८ कुळे होती असे काहिसे वाचल्याचे आठवतेय. वृष्णी, अंधक, भोज ही त्यातली काही प्रमुख कुळे. अवंतीचे विंदानुविंद, चेदीदेशाचा शिशुपाल हे पण मूळच्या यादवकुळांपैकीच.

- माझ्या वाचनाप्रमाणे यादवांचे तीन चतुर्थांश सैन्य महायुद्धात नष्ट झाले. अर्थात् तुम्ही वर म्हटले आहे की हे उल्लेख बाहेरून घुसडल्यासारखे वाटतात. ते का ते समजले नाही.

ते मी यादवांच्या संदर्भांत म्हटले नाही. दुर्योधन आणि अर्जुन जेव्हा श्रीकृष्णाची मदत मागण्यास एकाच वेळी आले तेव्हा कृष्णाने नि:शस्त्र मी किंवा माझी नारायणी सेना यापैकी एकाची निवड करण्यास सांगितले. हा सर्वच कथाभाग प्रक्षिप्त असावा असे मला वाटते. कारण पुढे कृष्णाच्या नारायणी सेनेचा उल्लेख अगदी एकदा ते दोनदाच आलेला आहे.
बाकी द्वारकेचे यादव मात्र सात्यकी आणि कृतवर्म्याच्या नेतृत्वाखाली पांडव आणि कौरव या दोन्ही बाजूंकडे विभागले गेले होते.

मगध पांडवांकडून लढलेत की नाही याचा संदर्भ मिळाला नाही.

जरासंधपुत्र सहदेव पांडवांच्या बाजूने लढला पण तेव्हा मगध साम्राज्य अतिशय क्षीण झालेले होते त्यामुळे पुढे त्यांचा उल्लेख फारसा आलेला नाही. सहदेवाचा मृत्यु बहुधा द्रोण अथवा कर्णाकडून झालेला असल्याचे आठवतेय. संदर्भ मिळाला तर नक्की शोधून देतो.

संदीप जगदाळे's picture

13 Jul 2013 - 5:59 pm | संदीप जगदाळे

दुर्योधनाच्या मुलाने ज्याचे नाव लक्ष्मण होते . . . ज्याचा अभिमन्यूच्या वधामध्ये महत्त्वाचा सहभाग होता त्याचे पुढे काय झाले ?

प्रचेतस's picture

14 Jul 2013 - 7:53 pm | प्रचेतस

नाही हो.
उलट त्या युद्धात अभिमन्यू कडून दुर्योधनपुत्र लक्ष्मण याचा वध झाला तर अभिमन्यूचा वध अंतिमत: दौ:शासनी (दु: शासन पुत्र) याच्या हातून गदाप्रहाराद्वारे होतो.

मृत्युन्जय's picture

12 Jul 2013 - 12:59 pm | मृत्युन्जय

पण युद्धापासून यादवांचा कसलाही फायदा झाल्याचे दिसून येत नाही. यादववंश आपापसात लढून नष्ट झाला.

उलट आहे युद्धामुळे फक्त त्यांचाच फायदा झाला. ते स्वतःच्या दुष्कृत्यांमुळे यादवीत युद्धानंतर ३६ वर्षांनी मारले गेले हे जरी खरे असले तरीही त्यांचा कुठलाही मोठा यौद्धा मारला गेला नाही हेही तितकेच खरे.

कृतवर्म्याची एक अक्षौहिणी सेना आणि कृष्णाची नारायणी सेना जरी पुर्णपणे खपली तरीही सात्यकीची फौज थोड्याफार प्रमाणात वाचली. युधिष्ठिराची स्वतःची अशी सेना फारशी उरलीच नाही. आधीही नव्हतीच. पांचाल, मत्स्यांचा पुर्ण निर्वंश झाला. बाल्हिक सगळे मारले गेले. उरता उरले यादव. जे सगळेच वाचले. युद्धात भाग घेतलेले तीनही प्रमुख यौद्धे कृष्ण, सात्यकी आणि कृतवर्मा आश्चर्यकारक रित्या वाचले. शेवटच्या रात्रीच्या क्रौर्याची शिक्षा फक्त अश्वत्थाम्याला दिली गेली. कृतवर्मा वाचला. या तिघांव्यतिरिक्य युद्धापासुन पुर्ण दूर राहिलेले बलराम, गद, सारण, अनिरुद्ध, प्रद्युम्न, सांब हे प्रमुख यौद्धे तर होतेच. कृष्णाची सगळीच्या सगळी ८० मुले वाचली. इतर सगळी राष्ट्रे प्रमुख यौद्धे मेल्यामुळे, एक आख्खी पिढी गारद झाल्याने आणि युद्धामुळे आर्थिक स्थिती खालावल्याने दुर्बळ झाली. एक यादवांचे राज्य तेवढे स्वहस्ते त्यांनी बुडवेपर्यंत समृद्ध होत राहिले. त्यामुळे फायदा फक्त यादवांचाच झाला आणि भरपुर झाला.

खरंय. पण पुढची फक्त ३६ वर्षे.

मृत्युन्जय's picture

12 Jul 2013 - 4:50 pm | मृत्युन्जय

हो पण ते स्वहस्ते स्वतःची घाण करुन घेतली म्हणुन. नाहितर अजुन कैक वर्षे. युद्धाचा फायदाच झाला.

राघव's picture

13 Jul 2013 - 6:31 pm | राघव

विदर्भ युद्धात सामील होऊ शकले नाहीत. रुक्मी उशीरा पोहोचल्यामुळे पितामह अन् धृष्टद्युम्न दोघांनीही त्याला युद्धात सामील होऊ दिले नाही. पण नंतर विदर्भाचे काय झाले याचा उल्लेख काही सापडत नाही. आणखीही कोणती तटस्थ राष्ट्रे असल्यास कल्पना नाही..

मृत्युन्जय's picture

15 Aug 2013 - 8:11 am | मृत्युन्जय

रुक्मीला त्याच्या बढाईखोरपणामुळे दोन्ही बाजुंनी सामावुन घेतले नाही. पहिल्यांदा तो दुर्योधनाकडे गेला होता आणि मग युधिष्ठिराकडे. युद्धौत्तर काळात द्युतात बलराम हरल्यामुळे रुक्मीने त्याची चेष्टा केली त्यामुळे राग येउन बलरामाने रुक्मीला भर सभेत मारले.

काही संदर्भ असल्यास द्यावेत. वाचण्यास आवडेल.

मृत्युन्जय's picture

16 Aug 2013 - 4:48 pm | मृत्युन्जय

माझ्याकडे मराठी भाषांतर नाही. हा इंग्रजी उतारा वाचावा:

Endued with great energy, that hero, cased in mail and armed with bows, fences, swords and quivers, quickly entered the Pandava camp, surrounded by an Akshauhini of troops. And Rukmi entered that vast army, under a standard effulgent as the sun, and made himself known to the Pandavas, from desire of doing what was agreeable to Vasudeva. King Yudhishthira, advancing a few steps, offered him worship. And duly worshipped and eulogizedby the Pandavas, Rukmi saluted them in return and rested for a while with his troops. And addressing Dhananjaya, the son of Kunti in the midst of the heroes there assembled, he said, 'If, O son of Pandu, thou art afraid, I am here to render thee assistance in the battle. The assistance I will give thee wll be unbearable by thy foes. There is no man in this world who is equal to me in prowess. I will slay those foes of thine whom thou, O son of Pandu, wilt assign to me. I will slay one of those heroes, viz., Drona and Kripa, and Bhishma, and Karna. Or, let all these kings of the earth stand aside. Slaying in battle thy foes myself, I will give thee Earth.' And he said this in the presence of king Yudhishthira the Just and of Kesava and in the hearing of the (assembled) monarchs and all others (in the camp). Then casting his eyes on Vasudeva and Pandu's son king Yudhishthira the Just, Dhananjaya the intelligent son of Kunti smilingly but in a friendly voice said these words, 'Born in the race of Kuru, being especially the son of Pandu, naming Drona as my preceptor, having Vasudeva for my ally, and bearing, besides the bow called Gandiva, how can I say that I am afraid? O hero, when on the occasion of the tale 'of cattle, I fought with the mighty Gandharvas, who was there to assist me? In that terrific encounter also with the Gods and Danavas banded together in great numbers at Khandava, who was my ally when I fought? When, again, I fought with the Nivatakavachas and with those other Danavas called Kalakeyas, who was my ally? When, again, at Virata's city I fought with the numberless Kurus, who was my ally in that battle? Having paid my respects, for battle's sake, to Rudra, Sakra, Vaisravana, Yama, Varuna, Pavaka, Kripa, Drona, and Madhava, and wielding that tough celestial bow of great energy called Gandiva, and accoutred with inexhaustible arrows and armed with celestial weapons, how can a person like me, O tiger among men, say, even unto Indra armed with the thunderbolt, such words as I am afraid!--words that rob one of all his fame? O thou of mighty arms, I am not afraid, nor have I any need of thy assistance. Go therefore, or stay, as it pleaseth or suiteth thee.'

Hearing these words of Arjuna, Rukmi taking away with him his army vast as the sea, repaired then, O bull of Bharata's race, to Duryodhana. And king Rukmi, repairing thither, said the same words unto Duryodhana. But that king proud of his bravery, rejected him in the same way.

इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे युद्धात जमलेले सग्ळेच राजे स्वतःच्या पराक्रमाचा अभिमान बाळगायचे. द्रोणांनी स्वतःहुन विजय धनुष्य रुक्मीला दिले होते म्हणजे तो श्रेष्ठ यौद्धा असणार. पण इतरांमधील आणि त्याच्यामधील मुख्य फरक म्हणजे इतर यौद्धे स्वतःच्या शौर्याचा आणि युद्धनैपुण्याचा अभिमान बाळगायचे पण इतरांना कमी लेखायचे नाहित. रुक्मीच्या बोलण्यावरुन तो इतरांना क्षुद्र समजायचा हे दिसुन येते. मुख्य म्हणजे तो सेनाधिपात्याला कमी लेखत होता. असा माणुस पुढे स्वतःच्या वागण्यामुळे इतर यौद्ध्यांमध्ये नाराजी निर्माण करेल हे ओळखुन कौरव - पांडव दोघांनीही त्याला थारा दिला नाही

हे मूळ महाभारताचे इंग्रजी भाषांतर का?

मृत्युन्जय's picture

16 Aug 2013 - 6:48 pm | मृत्युन्जय

"मूळ महाभारत " ही खुप मजेशीर संकल्पना झाली. पण तेवढ्या तपशीलात न जाता बोलायचे झाले तर हो, हे मूळ महाभारताचे भाषांतर आहे.

प्रचेतस's picture

16 Aug 2013 - 8:42 pm | प्रचेतस

अगदी अगदी. :)

तेही खरंच. कॉलेज च्या लायब्ररीत फिरताना महाभारताची १५-२० पुस्तकं पहिली होती. आदी पर्वाच्या ५-६ पानापालीकडे गेलो नाही. त्यालाच मूळ महाभारत असं म्हणण्याची प्रथा पडली आहे हिकडे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jul 2013 - 9:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

फार छान लेख !

नातेसंबंध, तसेच एकमेकांच्या वैरापायी केले गेले स्कोअर सेटलिंग असेच काहीसे वाटते.

सगळ्या मानव व्यवहाराचे इंगित "यातून मला काय मिळणार आहे?" या एका प्रश्नाच्या उत्तरात दडलेले असते... कधी ते उत्तर एकदम उघड असते तर कधी मानवी मनाच्या अनेक पदरांखाली दडलेले असते... पण अखेर उत्तर त्याच एका प्रश्नाचे असते.

त्याकरिताच महाभारत ही केवळ एक कवीकल्पना नसून इतिहास असल्याच्या वादास बळकटी मिळते. त्याची वर्णनाची पद्धत आणि शब्द काही एक उद्देश समोर ठेवून रंगवलेल्या कथेपेक्षा जास्त "जसे होते तसे" लिहिलेला इतिहास असल्यासारखे आहेत.

अर्धवटराव's picture

11 Jul 2013 - 10:45 pm | अर्धवटराव

इरावती कर्व्यांनी या पक्षापक्ष भेदावर छान टिपण दिलं आहे. त्यांच्या मते मत्स्यनरेश जरी नकुल-सहदेवांचा मामा होता, तरी मत्स्य कुळाची सोयरीक कौरवांशी होती, व जेष्ठांनी चालवलेली सोयरीक मत्स्यराजाने पुढेही जपली.

अगदीच सारांश द्यावा म्हणावं, तर परस्पर वैरभाव, राजकारणी दीर्घकालीन समीकरणे, नवीन राज्यस्थापनेच्या शक्यता वगैरे धरुन क्षत्रीय समाजात आग घुमसतच होती. कौरव-पांडव आणि श्रीकृष्ण हि नावे हि लार्जर दॅन लाईफ टाईपची होती व त्यांचा निर्णायक संघर्ष त्या लौकिकाला साजेसाच होणार हे प्रत्येकाने हेरलं असावं. मग आपला शत्रु कुठल्या पक्षात जातोय, उपकार-अपकारांच्या आठवणी व पोस्ट वॉर सिनॅरीओमधे आपल्याला काय वाटा मिळेल याचे हिशोब लक्षात घेऊन जवळपास प्रत्येकजण युद्धात उतरला. युद्धात जो विजयी होईल, कौरव किंवा पांडव, तो आपल्या पक्षातर्फे कोण लढलं व विरोधात कोण गेलं याचा हिशोब ठेऊन युद्धोत्तर काळात त्याची परतफेड नक्की करेल हि भिती/आशा संपूर्ण क्षत्रीय समाजाला होती. कदाचीत नि:पक्ष राहिलं तरी ते विरोधात गेल्यासारखं घेतल्या जाईल. त्यामुळे काहि अपवाद वगळता नि:पक्ष कोणालाच राहता आलं नाहि.

अर्धवटराव

अर्धवटराव's picture

12 Jul 2013 - 2:48 am | अर्धवटराव

>>त्यांच्या मते मत्स्यनरेश जरी नकुल-सहदेवांचा मामा होता
->मस्त्य आणि मद्र मधे घोळ झालाच.

अर्धवटराव

धमाल मुलगा's picture

12 Jul 2013 - 3:38 am | धमाल मुलगा

महाभारत = काय नाय रं बाला! जल्ली सगली इष्टेटची लफ्री बोल. :)

येऊंद्या पुढची माहिती. वाट पाहतोय.

अवांतरः बलराम-जरासंध युध्दाचं चित्र कोणत्या काळात चितारलं आहे? डावीकडील सैन्यातील हत्तीवर स्वार झालेल्याचा मुकुट इंग्रजी चित्रांमध्ये असायचा तसा दिसतोय. आणि उजवीकडचं सैन्य (दाढ्या आणि मंदीलांच्या ठेवणीवरुन) अंमळ मुसलमानी पध्दतीचं वाटतंय.

बलराम-जरासंध युध्दाचं चित्र हे १७६०-६५ मधील गुलेर (पंजाब) शैलीतील आहे:
http://ecatalogue.art.yale.edu/detail.htm?objectId=83917

बलराम-जरासंध युध्दाचं चित्र हे १७६०-६५ मधील गुलेर (पंजाब) शैलीतील आहे:
http://ecatalogue.art.yale.edu/detail.htm?objectId=83917

चित्रगुप्त's picture

12 Jul 2013 - 1:31 pm | चित्रगुप्त

या धाग्यातील विषयाशी तसा संबंध नाही, पण अलिकडे असे ऐकले, की भीष्म नपुंसक असल्याने तो नियोग करू शकत नव्हता, म्हणून व्यासास बोलवावे लागले. भीष्मप्रतिज्ञा वगैरे या गोष्टीवर पडदा टाकण्यासाठी रचले गेले.
याच्या पुष्ट्यर्थ्य उज्जैन मधील हिजडे हे आजतागायत भीष्मास त्यांचे दैवत वा मूळ पुरुष(?) मानून पूजा करतात, असे दिले गेले आहे. कुणास याविषयी ठाऊक आहे का काही?
(....कुणी मिपाकर उज्जैन मधे आहेत का चवकशी करायला?)

संदीप जगदाळे's picture

13 Jul 2013 - 5:53 pm | संदीप जगदाळे

जर पितामह भीष्म तृतीयपंथी होते तर त्यांना प्रतिज्ञा करण्याची गरज काय ?

आदूबाळ's picture

14 Jul 2013 - 7:07 pm | आदूबाळ

तसं असेल तर कसा काव्यात्म न्याय दिला आहे पहा. द्रौपदीवस्त्रहरणाच्या प्रसंगी भीष्म गप्प राहिले म्हणून तिने त्यांच्यावर नपुंसक असल्याचा आरोप केलाच होता. आणि भीष्माचा मृत्यू शिखंडीच्या आडून अर्जुन या (काही काळासाठी उर्वशीच्या शापाने झालेल्या) हिजड्याच्या हातून!

गंमतच.. भीष्म हिजडा होता, तर आजच्या हिजड्यांचा तो मूळपुरुष कसा होईल? हिजड्याला मूल तरी व्य्हायला हवे ना?

चित्रगुप्त's picture

21 Jul 2013 - 10:22 am | चित्रगुप्त

@ उद्दाम : ......गंमतच.. भीष्म हिजडा होता, तर आजच्या हिजड्यांचा तो मूळपुरुष कसा होईल? हिजड्याला मूल तरी व्य्हायला हवे ना?
....
याचे उत्तर खरेतर उज्जैनला जाऊन त्या मंडळींना भेटून, बोलूनच मिळू शकेल. 'मूळ पुरुष' की 'कुलदैवत' वगैरेचे स्पष्टीकरण त्यातून होऊ शकेल... कदाचित आपण 'सूर्यवंशी' 'चंद्रवंशी' वगैरे असल्याचे काही लोक सांगतात, तसा काही प्रकार असेल.
महाभारतात इतकी गुंतागुंत आहे, की खरे काय, हे आता शोधणे कठिणच. त्यातून बरेचसे महाभारत हा निव्वळ कल्पनाविलास असल्याची शक्यता पण आहेच.

आनंदी गोपाळ's picture

14 Aug 2013 - 9:34 pm | आनंदी गोपाळ

बैलांचा मूळ पुरुष वळू असतो
बैल नंतर बनवलेले असतात.
पहा बुवा मी काय म्हणतोय ते समजते आहे का ;)

ही माहिती नवीन समजली. काही संदर्भ असल्यास वाचायला आवडतील.

बाकी हिजडे भीष्मांची पूजा करत असतील तर फार काही विशेष नाही. शिखंडीची उत्पत्तीच मुळात भीष्मावरच्या रागामुळे झालीये. त्यामुळे शिखंडी हा हिजड्यांचा मूळ पुरुष म्हणायला हवा. आणि तसं असेल तर भीष्म या उत्पत्तीला कारण म्हणून त्यांची पण पूजा केली जात असेल. हाय काय अन् नाय काय! ;-)

आदूबाळ's picture

12 Jul 2013 - 1:39 pm | आदूबाळ

क्रमशः आहे ना?

मृत्युन्जय's picture

12 Jul 2013 - 1:43 pm | मृत्युन्जय

कोण कुणास्तव जगतो मरतो
कोण कुणास्तव सतत कष्टतो
माणुसकीचा गहिवर येतो
ज्याला जेव्हा जिथे सोयिचे
जगात नसते कुणी कोणाचे.

महाभारताचे युद्धही यात तत्वावर आधारित होते. दुर्योधन बरोबर किंवा युधिष्ठिर भला म्हणून कोणी कोणासाठी लढला नाही. बाल्हिकांचेच उदाहरण घ्या. त्यांना कृष्णाचे वाढते वर्चस्व मान्य असणे शक्य नव्हते. पांडव जिंकणे म्हणजे तत्कालीन भारतात कॄष्णाचे राज्य येणे. जे मान्य नसल्याने बाल्हिकांनी दुर्योधनाची बाजू घेतली असावी. कित्येक राक्षस यौद्धे दुर्योधनाकडे आले कारण अर्जुनाने त्यांची कत्तल् करुन त्यांचे वैर ओढवुन घेतले होते. सहदेव पांडवांकडुन लढला कारण त्याच्या राज्याच्या सीमा हस्तिनापुरला लागुन होत्या आणि दोघांमध्ये सतत कुरबुरी होत. त्याला मदत करणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडुन घेणे. मत्स्य आणि विरात नातेसंबंधांमुळे बांधले गेले होते. त्यांच्यासाठी कोणाची बाजू घ्यायची असेल तर ते पांडवच होते. त्याहुनही महत्वाचे म्हणजे पांचालांची तर द्रोणांशी वैर असल्याने ते कौरवांसमोर उभे ठाकणे साहजिक होते कारण जोवर द्रोण कौरवांच्या बाजुने होते तोपर्यंत पांचाल कायम त्यांच्या ऋणात राहणार.

मत्स्यांची गोष्टच वेगळी. कीचकवधानंतर ते खुपच दुर्बळ झाले असते. पांडवांना मदत करुन किमान त्यांचे अस्तित्व तरी शिल्लक राहणार होते. दुर्योधन जिंकला असता तर पुढचा घास त्यांचाच असला असता. यात फक्त शल्याचा राजनैतिक संबंध समजुन येत नाही. कदाचित केवळ कर्णाला नामोहरम करण्यासाठी त्याचा उपयोग करावा असे ठरले असावे म्हणुन तो दुर्योधनाकडे आला असावा.

थोडक्यात सगळे स्वहितासाठी लढले.

राजा सोव्नी's picture

13 Jul 2013 - 9:06 pm | राजा सोव्नी

खूप माहिती पूर्ण लेख

प्रचेतस's picture

14 Jul 2013 - 7:55 pm | प्रचेतस

नाही हो.
उलट त्या युद्धात अभिमन्यू कडून दुर्योधनपुत्र लक्ष्मण याचा वध झाला तर अभिमन्यूचा वध अंतिमत: दौ:शासनी (दु: शासन पुत्र) याच्या हातून गदाप्रहाराद्वारे होतो.

अभ्या..'s picture

21 Jul 2013 - 2:12 am | अभ्या..

चित्रं छान आहेत

महाभारतकालीन राजकीयपट व ऐतिहासिक व्यक्तिमत्वे यांच्या तात्कालीक संबंधावर आधारित हिन्दी भाषेतील वरिष्ठ उपन्यासकार म्हणून सुप्रसिद्ध श्री. नरेन्द्र कोहली यांच्या महासंग्राम नामक कादंबरीचेसात खंडीय वाचन जरूर करा.अनेक कारणांचे संदर्भ व अंतर्गत मनोविश्लषणातून बरेच काही उलगडे होतील.

चित्रगुप्त's picture

16 Aug 2013 - 10:03 am | चित्रगुप्त

@ शशिकांत ओकः नरेन्द्र कोहली यांच्या पुस्तकांबद्दल तुमच्याकडूनच ऐकून पुस्तकांच्या दुकानात शोध घेतला होता, तेंव्हा तिथे रामायणावरील पुस्तके होती. महाभारतावरही 'महासंग्राम' आहे, हे ठाऊक नव्हते. हे कळवल्याबद्दल अनेक आभार.
आता दिल्लीला गेल्यावर बघतोच.

शशिकांत ओक's picture

16 Aug 2013 - 9:36 pm | शशिकांत ओक

Narendra Kohali

कादंबरीचे शीर्षक महासंग्राम नसून महासमर आहे. सकाळी प्रवासात होतो. जे नाव आठवले ते लिहिले होते.
वरील लिंकवरून त्यांच्या कार्याची माहिती मिळेल.

विकीवरील लिंक

राही's picture

16 Aug 2013 - 12:43 pm | राही

कृष्णाचा पणतू वज्र याचा वंश विस्तारला. हा वज्र म्हणजे अनिरुद्ध आणि बाणासुरकन्या उषा यांचा पुत्र. म्हणजे अर्धा असुर. शेवटी द्वारकेतला यादववंश निर्भेळ राहिला नाहीच.
एक तर्कसुसंगत मनोज्ञ कहाणी जुन्या पिढीतल्या बायकांकडून ऐकली आहे. कृष्णाच्या सोळा सहस्र नारी या सर्व जरासंधवधानंतर त्याच्या अंतःपुरातून कृष्णाने सोडवून द्वारकेत आणलेल्या स्त्रिया होत्या. त्यांना कृष्णाने आपले मानले, त्यांची जन्मलेली आणि गर्भावस्थेतली मुले आपली म्हणून स्वीकारली. कृष्णाच्या निर्वाणानंतर हीच यादवरूपी राक्षसबीजे आपापसात लढून मरण पावली. या कथेला अर्थातच महाभारतात 'कृष्णाने त्यांची सुटका केली' इतक्यापुरताच आधार आहे. पण कृष्ण हा योगेश्वर आणि पुरुषोत्तम कसा, यावर या कथेतून प्रकाश पडतो.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

16 Aug 2013 - 2:03 pm | विश्वनाथ मेहेंदळे

जरासंध नाही नरकासुर.

राही's picture

16 Aug 2013 - 3:36 pm | राही

मोठीच गडबड. होय, तो नरकासुरच.
दुरुस्तीसाठी धन्यवाद.

चित्रगुप्त's picture

16 Aug 2013 - 4:20 pm | चित्रगुप्त

... जरासंध नाही नरकासुर....
बरोबर. जरासंधाने बंदी बनवलेले राजे (किती? कोणकोणते??) त्याने सोडवले. (या राजांना जरासंध 'नरमेध यज्ञ' करून बळी देणार होता, त्यामुळे त्याला अमर्याद सत्ता लाभेल, असे फळ शास्त्रांतरी सांगितले गेलेले होते).

नरकासुराबद्दल अधिक तपशीलवार कथा काय आहे?

यदुवंश पूर्वीपासूनच अनार्य होता. म्हणून तर कृष्णाने इंद्राची पूजा बंद केली होती.

आजच्या आर्यांनी कृष्णाला आर्य अवतार करुन ठेवले.

--- असुर फॅन उद्दामासूर

चित्रगुप्त's picture

17 Aug 2013 - 3:34 pm | चित्रगुप्त

कोण आर्य, कोण अनार्य वगैरेबद्दल निश्चित अशी माहिती कोणत्या ग्रंथात मिळते ? त्याकाळी 'आर्य' नेमके कुणाला म्हणत?

चिगो's picture

18 Aug 2013 - 11:15 pm | चिगो

मी थोडासा कनफ्युज्ड आहे.. आसामात "तेजपुर/ शोनीतपुर" नावाचे एक शहर आहे, जिल्ह्याचे ठीकाण असलेले. हे शोनीतपुर म्हणजे बाणासुराचे राजधानीचे शहर. उषेशी लग्न करायला आलेल्या अनिरुद्धाला बाणासुराने पकडले आणि कैदेत ठेवले. त्यातून त्याला सोडवायला आलेल्या कृष्णाच्या आणि बाणासुराच्या सैन्यात जे युद्ध झाले, त्या युद्धात वाहलेल्या रक्ताच्या पाटांमुळे "तेजपुर/ शोनितपुर" हे नाव पडले. ह्या पौराणिक घटनेचे चित्रण दर्शवणारा एक "थीम-पार्क"पण आहे इथे..

ह्याच उषेची मैत्रिण चित्रलेखा.. शोनितपुरमध्ये अनेक पुरातन्कालीन शिल्पे आढळतात. आसामच्या दमट वातावरणात गोष्टी जास्त टिकत नाहीत म्हणून ह्या शिल्पांचे आणि अवशेषांचे महत्त्व अधीक.. १९९५-९६च्या दरम्यान तिथे जिल्हाधिकारी असलेल्या श्री. भानू ह्यांनी लोकांनी नेलेल्या, नाल्या-गटारांत पडलेल्या, धुण्याचा दगड म्हणून वापरात असलेल्या अनेक शिल्पांना इतर लोकांच्या मदतीने, अगोदर "डंपींग ग्राऊंड" असलेल्या जागेत "चित्रलेखा उद्यान" उभारले.. बहूतेक शिल्पे ही गुप्तकाळातील असावीत, असे आठवते..

राही's picture

16 Aug 2013 - 3:34 pm | राही

मोठीच गडबड. होय, तो नरकासुरच.
दुरुस्तीसाठी धन्यवाद.

2013 चा हा लेख आज योगायोगाने पुन्हा एकदा नजरेस पडला. मूळ लेखनापेक्षा प्रतिसाद खूपच माहितीपूर्ण आहेत.