✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !

ज
जॅक डनियल्स यांनी
Wed, 06/26/2013 - 10:14  ·  लेख
लेख
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद ! एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला ! एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ ! ....मला घरी फोन यायचा "अहो ते साप वाले आहेत का ? आमच्या घरी/बागेत/रस्त्यावर/गच्चीवर/स्वयंपाकघरात इ.भला मोठा साप आहे...तुम्ही ताबडतोब या":- ही अशी वाक्य ते एका दमात बोलायचे. मी तर जे हातात असेल ते सोडून पूर्ण जीव फोन मध्ये लावायचो. एका हातात पेन आणि मानेत फोन आणि माझा प्रश्न असायचा "साप कशात आहे ,मी पोहचेपर्यंत कोणाला पण जवळ जाऊ देऊ नका आणि सापावर लक्ष ठेवा. आत्ता सांगा पत्ता ?"( भाग पहिला) पत्ता घेऊन मी तडक सुटायचो आणि सापापर्यंत तडक पोहोचायचो.( वाचा: भाग पहिला म्हणजे हे "तडक" प्रकरण समजेल ;)) साप पकडायचा म्हणजे तो पहिल्यांदा दिसला पाहिजे, पण तेच अवघड असायचे. आपल्या एकडे सापा विषयी जेवढी भीती आहे तेवढीच उत्सुकता पण आहे. त्यामुळे एखाद्या घरात साप निघाला तर, त्या घरचे लोक, त्यांचे नातेवाईक, रस्त्यावरून जाणारे लोक, बाजूच्या सोसायटीमधले लोक, मुलांच्या मित्र-मैत्रिणी असे सगळे त्या ठिकाणी पिच्चर चे शुटींग असल्या सारखे जमतात. या गर्दीत मी माझी गाडी घालायचो ( घोडा युद्धात घालतात तसा, कारण पुण्यात लोकं नुसत्या होर्नने बाजूला होत नाहीत !) माझ्या कडे बघून लोकांचे हजार प्रश्न:काका(वय ४०) तुम्ही नक्की साप पकडता का ? म्हणजे तुम्ही तसे दाढी-मिशीवाले दिसत नाही म्हणून विचारले है ..है; काकू (वय:?): तुमचा चेहरा ओळखीचा वाटतो, बँक ऑफ इंडिया मध्ये तुमचे खाते आहे का ?; पोरगा (एस.पी ते पुणे विद्यार्थी गृह इ.): तो ऑस्टिन स्टीवन डिस्कवरी मध्ये वापरतो तसा 'स्नेक टोंग' (tong) आहे का तुमच्या कडे ?; सुबक ठेंगणी (बृहन्महाराष्ट्र ते सिंहगड इ.):तुमची डिस्कवरी ची कॅमेरा टीम कुठे आहे,; अश्या प्रश्नांतूर लोकांमधून मी 'ज्याच्या घरात साप निघाला आहे किंवा ज्याने साप पहिला आहे' असा योग्य तो माणूस शोधून काढायचो. जेंव्हा कॉल करणे सुरु केले तेंव्हा ही पहिली पायरी पण खूप अवघड होती. हरचन पालवाच्या कपाटाची दुरुस्ती करून येताना साप 'प्रतेक्ष' पहिले लोक खूप असायचे.(पुलं:म्हैस !)आणि ही लोकं वाट्टेल ते वर्णन करायचे: फुल फणावाला नाग आहे,दहाचा आकडा पण दिसला, काळा केसवाला भुजंग आहे इ. शास्त्रोक्त किंवा मुद्देसूद वर्णन फार कमी लोक करतात आणि हीच लोकं माझ्या कामाची असायची. बागेमध्ये, विटांच्या ढिगाऱ्यात, बाथरूममध्ये , अडगळीच्या खोलीत, पंप हाउस मध्ये, छपरामध्ये, घुशीच्या बिळात, मोरीत, फ्रीज, टी.व्ही. खाली ( आतमध्ये सुद्धां ! : आतला भाग उबदार असतो म्हणून तिकडे साप जाऊन बसतात :)), वेलीच्या जाळीत, कुत्र्याच्या घरात, ट्यूबलाईटच्या मागे,माठाच्या खाली, भाजीच्या पेटाऱ्यात,उशीच्या अभ्र्या मध्ये...अश्या अनेक ठिकाणी निघालेले साप मी पकडले आहेत. योग्य त्या व्यक्ती कडून माहिती घेऊन मी साप शोधायला लागायचो. मी गेलो- साप समोर दिसला-मी पकडला हे फार कमी वेळा व्हायचे. लोकांच्या त्रासामुळे खूपवेळा बाहेर निघालेला साप लपून बसायचा. दुसऱ्यांच्या घरात साप शोधणे ही एक कला आहे. 'होम-मिनिस्टर' मध्ये लोकांना त्यांच्या स्वतः च्या घरातला कुंकवाचा करंडा शोधणे जमत नाही,इकडे मला अनोळखी घरात साप शोधायचा असायचा. अश्या वेळो मी पहिला विचार करायचो की 'हा साप इकडे कुठून आला असेल? ज्या भागात शेवटी साप पहिला असेल असेल त्या जागेचा अंदाज घ्यायचो, म्हणजे त्यातला पसारा, जमिनीचा प्रकार (फरशी, माती इ.),साप बाहेर पडू शकेल अश्या जागा इ. आणि मग इन्कमटॅक्सवाले घर खाली करतात, तसच पण थोडे सभ्यपणे ती जागा खाली करायला लागायचो. खरं नाही वाटणार पण मी २-३ वेळा तळजाई वस्ती मधील काही घरे पूर्णपणे खाली केली होती. पसारा साफ करताना लोकं का एवढी अडगळ जमवतात असा प्रश्न पडायचा:फुटलेल्या कप-बश्या,मोठी फुटलेली पिंप, मोडक्या खुर्च्या,कपाटे, वाळ्याचे तुटके पडदे, फुलदाण्या, महागडे खेळण्यांची खोकी( जी खेळणी कधी तुटतील म्हणून मुलांच्या हाती पोहोचलीच नाहीत !)आणि असंख्य कपड्यांची गाठोडी. हा अवाढव्य पसारा हलवायला पण खूप वेळा मला कोणी मदत करायला यायचे नाही. आधी डिस्कवरी-डिस्कवरी म्हणणारे आणि मला ऑस्टिन स्टीवनचे सल्ले देणारी लोकं कामाच्यावेळी गुल व्हायचे. बागेत किंवा मैदानात, घुशीच्या बिळात साप असेल तर उन्हातानात अंगमेहनत करून कुदळ-फावडे घेऊन ती बिळे खोदायला लागायची. घुशीची बिळे ही एकमेकाना जोडलेली असतात,त्यामुळे एक बीळ खोदून उपयोग नसतो. कधी कधी साप (धामण) अर्धा बाहेर असेल तर तिची शेपटी एका हाताने पकडून दुसऱ्या हाताने बीळ खोदायला लागायचे. पटांगणात असलेला साप लोकांनी उचकवला म्हणून खूप वेळा बिळात जाऊन बसायचा आणि मग ते १० मिनिटाचे काम लोकांच्या चुकीमुळे ३-४ तासाचे होऊन बसायचे. मिपाकर आदुबाळ आणि अजून एक माझा मित्र (चिन्मय) यांना घेऊन मी अशीच एक अर्धी बिळात असलेली धामण पकडली होती,साधारण पणे मी कोणाला कॉल ला घेऊन जात नसे पण त्यावेळी पर्याय नव्हता. ५०-६० लोकं जनता वसाहती मध्ये (पार्वती पायथा)त्या धामणीच्या आजूबाजूला कोंडाळ करून उभे होते, मी एका हाताने धामण पकडून दुसऱ्या हाताने खोदत होतो,हे साधारण १५-२० मिनिटे चालू होते..... इतक्यात ती ७-८ फुटी धामण बाहेर निघाली,आणि कबुतरे उडून जातात तसे माझ्या बाजूचे लोकं सैरावैरा पळून गेले. असो. बिळातला साप ओढून काढता येत नाही, स्क्रू जसा बोल्ट मध्ये घट्ट बसतो त्याप्रमाणे साप बिळात स्वतःला घट्ट (शरीराची जाडी कमी जास्त करून )अडकवून घेतो. त्यामुळे बाहेर येत नसेल तर परिस्थितीचा अंदाज घेऊन (मैदान, टेकडी) बिळातला साप सोडून द्यावा लागायचा. एकदा साप दिसला की दुसरी पायरी म्हणजे तो ओळखणे. साप ओळखल्या शिवाय मी त्याला हात लावत नसे. बिनविषारी समजून विषारी साप चुकीच्या पद्धतीने पकडल्याने खूप अपघात होतात. पुण्यात चारही मुख्य (नाग, घोणस, फुरसे आणि मण्यार) विषारी साप सापडतात. पूर्ण साप दिसत असेल तर 'दुधात साखर' पण ती वेळ फार कमी वेळा यायची. शेपटी, डोके, डोक्याच्या भाग, पोट, पाठीवरची नक्षी किंवा त्यांचा आवाज या वरून मी हे आधी विषारी साप आहेत का बघायचो. घोणस साप प्रेशर कुकरच्या शिट्टी सारखा दीर्घ आवाज काढतो. बिनविषारी साप साधारण करून जास्त आवाज करत नाहीत. माझ्या सुरवातीच्या काळात, एका बांधकामाच्या कामचलाऊ गोदामात दोन घोणस असल्याचा कॉल होता. राजाभाऊंनी एक घोणस पकडून पिशवीत टाकला होता आणि मी दुसरा शोधात होतो. प्रेशर कुकर च्या शिट्टी सारखा आवाज येत होता आणि इतक्यात कोणीतरी गोदामाच्या छताचा सांधा हलवला आणि आख्खे छत खाली आले. बेक्कार धुराळा उठला,त्यातच मी टारझन सारखे दोन्ही हाताने छत पकडले. त्या धुराळ्यात तो प्रेशर कुकर चा आवाज येत होता पण मला काहीच दिसत नव्हते. तेंव्हा भीती वाटून पण उपयोग नव्हता, त्यांमुळे त्या आवाजाचा मी आध्यात्मिकपातळीवर ;) आनंद घेतला. नंतर तो आवाज हळू हळू कमी होत गेला, मग माणसे आली, छत उचलले वगैरे. पुढे आयुष्यात असे (घोणस बरोबरचे)एकांतातील क्षण फार कमी आले. ;) असो. विषारी सापासाठी आम्ही सर्पोद्यान ची माणसे फक्त प्रश्न चिन्ह (?) सारखा आकडा तर बिनविषारीसाठी हात वापरायचो. 'डोळ्याचे पाते लवते न लवते तो पर्यंत साप (नाग, घोरपड, उदमांजर, घार, घुबड, गरुड इ.) पिशवीत गेला पाहिजे' अशी सर्पोद्यान ची शिकवण होती. ३०-४० लोकं आजूबाजूला असताना ही शिकवण खूप महत्वाची होती, त्यामुळे अपघात व्हायचे प्रमाण खूप कमी होते आणि सापाला पण त्रास कमी व्हायचा. डिस्कवरी प्रेरित सर्पतज्ञ जागोजागी सापडायचे, त्यांच्याकडे मी दुर्लक्ष करायचो कारण यांची फक्त तोंडाने बडबड असते, खरी भीती असायची ती तळीरामांची ! रात्री तळजाई वस्ती, जनता वसाहतीत गेलो तर खूप वेळा हे तळीराम सर्पतज्ञ भेटायचे, २-४ क्वार्टर लावल्यामुळे त्यांची किंग कोब्रा पण पकडायची तयारी असायची, अशा वेळी खूप शांतपणे परिस्थिती सांभाळायला लागायची. विषारी साप रात्री वस्तीच्या ठिकाणी नाग पकडताना खूप मोठी जवाबदारी असायची: तो नाग आधीच या तळीराम लोकांनी दिवचलेला असायचा त्यामुळे बेक्कार फुत्कार टाकत असायचा, खूप वेळा लाईट नसायची, सगळे फुल औट असायचे, बायका- पोर धिंगाणा घालत असायची, अश्या वेळी या लोकांना सांभाळून, आपल्या पण जीवाची काळजी घेउन तो नाग पकडायला लागायचा. सर्पोद्यान चा अजून एक नियम म्हणजे: 'एकदा पिशवी मध्ये घातलेला साप स्वतः चा बाप आला तरी त्याला दाखवायला बाहेर काढायचा नाही.' खूपवेळा नाग पकडला तर त्याच्या आध्यात्मिक महत्वामुळे (फुकटची अंधश्रद्धा !) लोकं पूजा करायला पुढे यायचे, नागपंचमीला नागाचा कॉल केला तर अजूनच मजा. अशा वेळी मी पिशवीत टाकलेला साप-नाग कधीच बाहेर काढायचो नाही. माझ्या एका मित्राचा, असाच पूजेसाठी बाहेर काढलेला नाग परत पिशवीमध्ये घालताना अपघात झाला होता. कॉल केल्यावर खूपवेळा लोकं अंगाला हात लावून बघायचे, माझ्या अंगावर कुठले आवरण आहे आहे का बघत असायचे, 'तुम्ही काय खाता ? सापासाठी औषध कुठले घेता ? तुम्हाला कुठली सिद्धी प्राप्त आहे का ?' असे अनेक प्रश्न यायचे. ही उत्तरे देताना खूप काळजी घ्यावी लागायची, समाजात अंधश्रद्धा या वणव्या सारख्या पसरतात. सगळ्या लोकांना माझे एकच उत्तर असायचे "मला साप ओळखता येतात आणि त्यांच्या विषयी माझा सखोल अभ्यास आहे म्हणून मी त्यांना पकडू शकतो, जर अपघात झाला तर मी सुद्धा ससूनलाच जाणार आहे." हे पकडलेले साप मी तडक सर्पोद्यान ला घेऊन जायचो आणि नंतर ते निसर्गात- अभयारण्यात सोडले जायचे. कॉल येण्यापासून- ते साप पकडे पर्यंत दर वेळी नवी आव्हाने असायची, ती पेलण्याची ताकत मला फक्त सर्पोद्यान ने दिली. सर्पोद्यानने दिलेली जवाबदारी मी ४-५ वर्ष एक पण अपघात न होऊ देता पार पाडली आणि थोडेसे का होईना पुण्यातले साप वाचवले. साप पकडणे हे काम सोपे नाही,जिवावरचा खेळ आहे.. त्यामुळे असे लेख वाचून, डिस्कवरी वर बघून चुकून पण त्याच्या वाटेला जाऊ नका, त्यांच्या बरोबर फोटो काढून घेऊ नका. हे लक्षात ठेवा " जो सापांबरोबर फोटो काढतो तो लवकरच फोटो मध्ये जातो !"

Book traversal links for एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !

  • ‹ एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ !
  • Up
  • एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग. ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
वावर
समाज
तंत्र
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
लेख
अनुभव

प्रतिक्रिया द्या
61436 वाचन

💬 प्रतिसाद (92)

प्रतिक्रिया

हो ती खूप जुनी डॉक्युमेंटरी

जॅक डनियल्स
Sun, 06/30/2013 - 20:48 नवीन
हो ती खूप जुनी डॉक्युमेंटरी आहे. मंबा आहे खूप जहाल विषारी असून तो खूप चपळ असतो. तसेच त्याची लमी ८-९ फुट असते. त्यामुळे त्याला नुसत्या हुक ने पकडणे खूप अवघड असते म्हणून संशोधक चिमटे वापरतात. त्याचे विष खूप औषधात वापरले जाते त्यामुळे त्या वरती खूप संशोधन चालू आहे.भारतामध्ये पण चेन्नई सर्पोद्यान मध्ये किंग कोब्रा वर उपचार करभर्त, त्याला भूल येणारा ग्यास देऊन उपचार केले जातात. पण याचा खर्च खूप असल्यामुळे साध्या सापांसाठी तो संशोधकांना परवडत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

रोचक लेखमाला अन खुसखुशीत शैली

सस्नेह
गुरुवार, 06/27/2013 - 10:35 नवीन
रोचक लेखमाला अन खुसखुशीत शैली. आवडले.
  • Log in or register to post comments

अमेरिकेत

इच्चक
गुरुवार, 06/27/2013 - 10:58 नवीन
पण कोण्या एका राज्यात म्हणे खुप साप आहेत. तिकडे बर्क्ले युसी, टेक्सास असं काहिसं ऐकलं आहे. तुम्ही तिकडे असाल तर अजुनही जमेल की .... अमेरिकन साप वेगळे असतात का हो ?
  • Log in or register to post comments

म्हयशीनां चालती

lakhu risbud
Sat, 07/27/2013 - 14:49 नवीन
हा हा म्हयशीनां चालती काय वो तुमची होमोपदी ? (साभार म्हैस-पुलं ) या चालीवर अमेरिकन साप वेगळे असतात का हो? वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इच्चक

भारतीय सापांचा माज !

जॅक डनियल्स
Sat, 07/27/2013 - 23:25 नवीन
अमेरिकेमध्ये सापांचे प्रकार भारतापेक्षा खूप कमी आढळतात. भारत हा उष्ण कटिबंधीय देश असल्यामुळे सापांना पूरक वातावरण आहे. एकडे ज्या कोरड्या जागा आहेत, अरिझोना, उत्तर टेक्सास इ. तिकडे वायपर प्रजाती मधले साप- रेटल स्नेक,कॉपरहेड हे विषारी साप आढळतात. या रेटल स्नेक च्या खूप उपजाती आहेत, जसा भारतात घोणस सगळी कडे आढळतो तसा रेटल स्नेक हा अमेरिकेमध्ये सगळीकडे आढळतो. कॉटनमाउथ नावाचा विषारी साप पाणथळ प्रदेशात आढळतो. उत्तर अमेरिकेमध्ये अनाकोंडा सापडत नाही, फक्त तो त्यांच्या सिनेमा मध्ये सापडतो. नाग, मण्यार या प्रजाती आपली दक्षिण आशियाई प्रदेशाची पेशालीटी आहे ती एकडे बघायला मिळत नाही. अमेरिकेमध्ये लोकसंख्या कमी आणि झाडे जास्त असल्याने भारतात जसा माणसांचा सापांशी संबध येतो तसा एकडे येत नाही. खूप लोकांनी एकडे साप फक्त झू मध्ये पहिला असतो. एक माझा एकडचां मित्र रेटल स्नेक चा अभिमान दाखवायला लागला, मी त्याला -घोणस, फुरसे, मलबार चापडा , हिरवा चापडा,नाग, मण्यार आणि किंग कोब्रा च्या गोष्टी सांगून गप्पा केला. त्याला म्हणलो, "अजून आहेत, हे तर मी पुण्यात पकडलेले साप आहेत, अजून जंगलात घुसलो नाही मी."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud

एक माझा एकडचां मित्र रेटल

बॅटमॅन
Sun, 07/28/2013 - 00:01 नवीन
एक माझा एकडचां मित्र रेटल स्नेक चा अभिमान दाखवायला लागला, मी त्याला -घोणस, फुरसे, मलबार चापडा , हिरवा चापडा,नाग, मण्यार आणि किंग कोब्रा च्या गोष्टी सांगून गप्पा केला. त्याला म्हणलो, "अजून आहेत, हे तर मी पुण्यात पकडलेले साप आहेत, अजून जंगलात घुसलो नाही मी."
है शाबास!!! कळायचं बंद झालं असेल त्याला एकदम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

दक्षिण अमेरिका उष्णकटिबंधीय

आदूबाळ
Sun, 07/28/2013 - 00:12 नवीन
दक्षिण अमेरिका उष्णकटिबंधीय असल्यामुळे त्यात बरेच प्रकार सापडत असावेत. हॅरी पॉटरमधला boa constricter ब्राझीलियन असतो बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

तो boa constricter आपल्या

जॅक डनियल्स
Sun, 07/28/2013 - 00:18 नवीन
तो boa constricter आपल्या अजगराचा इकडचा लहान भाऊ आहे. साप पाळणाऱ्यांमध्ये तो खूप फेमस आहे, बंगले वाले लोकं अल्शेशिअन पळतात तसे सापवाले त्याला पाळतात. शांत असतो, गिळायचे आणि पडायचे हे तो करतो.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

सहीच!!

सहज
गुरुवार, 06/27/2013 - 11:11 नवीन
कोण म्हणतं सिद्धी नाही? लेखनसिद्धी चांगलीच अवगत आहे :-) लेखमाला आवडली.
  • Log in or register to post comments

वाचतोय..

वात्रट
गुरुवार, 06/27/2013 - 11:18 नवीन
अत्यन्त रोचक लिखाण..
  • Log in or register to post comments

मस्तच!

पैसा
गुरुवार, 06/27/2013 - 20:06 नवीन
झकास लेखमालिका चालू आहे. आता यापुढे अभ्यास सुरू ना!
  • Log in or register to post comments

जबराट..

चिगो
Mon, 07/01/2013 - 17:32 नवीन
एकदम जबरदस्त विषयावर अत्यंत मार्मिक, खुमासदार विनोदी शैलीत लेखमालिका लिहीतोयस, त्याबद्दल अभिनंदन आणि आभार, मित्रा.. लेखनसिद्धी अवगत आहेच की तुला. इकडे मेघालयात पण बरेच साप आढळतात. एक सहाएक फुटांचा हिरवाकंच साप रोडवर इथेच बघितला.. मागच्या दोनेक वर्षांपासून इथल्या कुठल्यातरी यात्रेत निघालेल्या नागाच्या (काळा साप, आणि फण्याच्या आतल्या भागावर गर्द पिवळा रंग... नागच ना?) फोटोला फोटोशॉप करुन तीन किंवा पाच फणे असलेल्या सापाचे फोटोजपण पाहीलेत.. ;-) एका शहाण्याने तर १५-१५ रुपयात एक कॉपी विकून कमाईपण केली..
  • Log in or register to post comments

मीच तो

अभ्या..
Tue, 07/02/2013 - 01:40 नवीन
फोटोला फोटोशॉप करुन तीन किंवा पाच फणे असलेल्या सापाचे फोटोजपण पाहीलेत.
म्याच तो फोटोशॉपवाला :)
एका शहाण्याने तर १५-१५ रुपयात एक कॉपी विकून कमाईपण केली..
हा मात्र म्या न्हाय/ :(
  • Log in or register to post comments

हाट..

चिगो
Fri, 07/26/2013 - 08:29 नवीन
आधी तुझ्याकडचा फोटु पाठव मला.. मग सांगतो तोच का दुसरा ते.. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मी पण तो किंग चा रस्त्याच्या

जॅक डनियल्स
Fri, 07/26/2013 - 08:38 नवीन
मी पण तो किंग चा रस्त्याच्या कडेचा फोटो पहिला होता. नंतर त्या त्याच्या फण्याचा गोल फणा पण कोणी तरी केला होता. ;) चक्रधारी नाग होता तो बहुतेक. कमळाची पाकळी मिटते तसा तो फणा मिटत असेल बहुतेक ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

हाच काय..?

मोदक
Fri, 07/26/2013 - 13:19 नवीन
हाच काय..? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

आहे का आवाज ?

जॅक डनियल्स
Fri, 07/26/2013 - 20:28 नवीन
सात फणे वाला शेष नाग ! Image removed. शेषनागाने रूप बदलले ! Image removed. यामुळे किती अंधश्रद्धा पसरली असेल याची कल्पनाच करवत नाही. मला खात्री आहे की आत्ता मी जर कॉल करत असतो, तर लोकांनी हा नाग तुम्ही पहिला आहे का असे विचारले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

वरती न पोस्ट झालेले फोटो बघा ...

जॅक डनियल्स
Sat, 07/27/2013 - 00:56 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

अग्गंगंगंगंगं.....

धमाल मुलगा
Sat, 07/27/2013 - 01:00 नवीन
काय नाग है का मोर? फण्याचा डायरेक्ट पिसाराच फुलवलान की. कोण है रे ते इतकं अतिशाणं फोटोशॉपकर बेनं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

तो ७ फणे वाला नाग फोतोशोप आहे

जॅक डनियल्स
Sat, 07/27/2013 - 04:52 नवीन
तो ७ फणे वाला नाग फोतोशोप आहे हे दाखवण्यासाठी कोणी तरी हा फणा फुलवला. कली युगातला शेष नाग आहे हा ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हांग्गाशी..

चिगो
Sun, 08/18/2013 - 23:50 नवीन
जेडी, ह्यातला पहीला फोटो.. मी तीन आणि पाच फण्याच्या सापाचा फोटो पाहीला होता.. आता सात आणि चक्राकार फणा काढून तू आणखी पुण्य पदरात टाकलंस.. ;-) च्यामारी, येडभोक्यांनी फोटोशॉप करतांना साप सोडून बाकीचा फोटोपण फोशॉ करावा की.. बरं, "आम्ही स्वतः पाहीला हो, अमुक तमुक ठीकाणी !" म्हणून सांगतात लोकं च्यामारी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

आरररर लोकांना खरच वाटत नाय

अभ्या..
Sat, 07/27/2013 - 10:20 नवीन
आरररर लोकांना खरच वाटत नाय :-( जौदे ते नागाचे लै शिम्पल होते. तुम्ही तुमचा फोटो पाठवा. तुम्हाला बेमालूम रामलीलातला धातोण्डि रावण करून पाठीवतो. मग इश्वास करा:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

बेष्टेष्ट!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 07/08/2013 - 15:17 नवीन
बेष्टेष्ट!
  • Log in or register to post comments

मस्तच लिहिताय.

कवितानागेश
Mon, 07/08/2013 - 15:30 नवीन
मस्तच लिहिताय. अवांतरः सापाला सगळेच घाबरतात. पण साप कशाकशाला घाबर्तो?
  • Log in or register to post comments

साप?

हर्षद खुस्पे
Wed, 07/24/2013 - 23:27 नवीन
  • Log in or register to post comments

https://www.facebook.com

हर्षद खुस्पे
Wed, 07/24/2013 - 23:29 नवीन
https://www.facebook.com/photo.php?v=231142600353701&set=vb.100003738882260&type=3&theater
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद खुस्पे

थाई चमत्कार - खूप वर्षाची साधना.

जॅक डनियल्स
गुरुवार, 07/25/2013 - 00:15 नवीन
मी आधी अश्या प्रकारचे विडीयो आणि काही documentary पण पहिल्या होत्या. त्या वरून आणि सर्पोद्यानातील लोकांच्या अनुभवावरून असे अनुमान काढले की थाईलंड मध्ये काही जमाती आहेत (आपल्या गारुडी-मदारी ) जमाती सारख्या, त्यांच्या कडे सापांबद्दल वडिलोपार्जित ज्ञान आहे. आपल्या कडे कसे गुराख्याला गाईची पूर्ण माहिती असते तसे त्यांना सापांबद्दल ज्ञान असते. तसेच त्यांच्या कडे नैसर्गिक उपचार पण असतात. त्यामुळे खूप वेळा कसे पण खेळ करू शकतात. सगळ्या वेळी हि लोक नागाबरोबरच खेळ करतात, मण्यार, घोणस वापरात नाहीत कारण नाग फक्त समोरच्या बाजूला हल्ला करू शकतो म्हणून त्यांना खेळ करणे सोपे जाते. सर्पोद्यान मध्ये हे विडीयो मध्ये दाखवलेले आम्ही सगळं करू शकतो, भारतात परवानगी नाही. तसेच मला ते आवडत नाही कारण मी सापांचा आदर करतो. हे विडीयो बघून खूप अपघात पण झाले आहेत, आणि खूप लोकांनी प्राण पण गमावले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद खुस्पे

नाग फक्त समोरच्या बाजुने

शिल्पा ब
Sat, 07/27/2013 - 06:56 नवीन
नाग फक्त समोरच्या बाजुने हल्ला करु शकतो म्हणता तर मग बाकीचे विषारी साप कुठुन हल्ला करतात? समोरअसल्यावर समोरुनच हल्ला करनार ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

नागाचे चुंबन !

जॅक डनियल्स
Sat, 07/27/2013 - 07:48 नवीन
घोणस, फुरसे (कुठला पण व्हैपर प्रजातीतला)किंवा मण्यार हे ३६० अंशात डोके फिरवून चावू शकतात. थोडक्यात म्हणजे तुम्ही तूनळी पहिले असेल की नागाच्या फण्यावर लोकं चुंबन देतात तेंव्हा तो नाग डोके उलटे करून चावू शकत नाही. पण याउलट कोणी घोणसाचे चुंबन घ्यायचे प्रयत्न केले तर डोळ्याची पापणी लवते न लवते तो पर्यंत घोणसच त्याचे चुंबन घेईल. नागाच्या डोक्यामागे असलेल्या (छत्री सारख्या) फण्यामुळे त्याला ते शक्य नाही. हे वाचून नागाचे चुंबन घ्यायला कोणी जाऊ नका, जगात चुंबन घ्यायला अनेक गोष्टी आहेत की ज्यांचे चुंबन घेतल्यावर कमीतकमी जीवावर बेतणार नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

असं होय ! हे माहीतीच नव्हतं.

शिल्पा ब
Sat, 07/27/2013 - 10:15 नवीन
असं होय ! हे माहीतीच नव्हतं. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

साप?

हर्षद खुस्पे
Wed, 07/24/2013 - 23:27 नवीन
  • Log in or register to post comments

अरेच्चा

सुबोध खरे
Wed, 07/24/2013 - 23:52 नवीन
चुकून सर्प सुखी व्हावे हि तो साईंची इच्छा असे वाचले
  • Log in or register to post comments

वत्सा जेडी, पुढचा भाग कधी?

आदूबाळ
गुरुवार, 07/25/2013 - 12:15 नवीन
वत्सा जेडी, पुढचा भाग कधी?
  • Log in or register to post comments

अंदमान चा मित्र !

जॅक डनियल्स
गुरुवार, 07/25/2013 - 21:32 नवीन
अरे पुढच्या भागात फोटो टाकायचे आहेत म्हणून एका मित्राकडून फोटो यायची वाट बघतो आहे. तो सध्या अंदमान च्या जंगलात आहे म्हणून या वीकांत पर्यंत टाकीन नवीन भाग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

सुंदर लेखमाला

सुधीर
गुरुवार, 07/25/2013 - 18:00 नवीन
खुमासदार शैली, वेगळ्या जगाची सफर आवडली.
  • Log in or register to post comments

मस्तच लिहीले आहे. अनुभवी आणि

अरुण मनोहर
Fri, 07/26/2013 - 14:30 नवीन
मस्तच लिहीले आहे. अनुभवी आणि लेखन कला अवगत असणारा जॅक डी! मग काय विचारता! काही प्रश्न आहेत- -नाग खरेच दूध पितो कां? -नाग जर स्वत:ला चावला तर त्याला विष बाधते कां? -नाग जर दुसर्‍या विषारी सापाला चावला तर विष बाधते कां? -नाग नागीणीचे मिलन जे हिंदी सिनेमात दाखवतात, ते खरेच तसे असते कां?
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

जॅक डनियल्स
Fri, 07/26/2013 - 20:37 नवीन
धन्यवाद ! पुढचा जो लेख लिहिणार आहे त्यात हे सगळे प्रश्न सोडवण्यात येतील. :) आत्ता फक्त एवढेच सांगतो की 'हिंदी सिनेमाच्या ..@##@#@#.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

जेडी, पुढचा भाग लिहा लवकर.

यशोधरा
Sat, 07/27/2013 - 10:36 नवीन
जेडी, पुढचा भाग लिहा लवकर. वाट बघत आहे.
  • Log in or register to post comments

ब्येश्ट्ट्ट्ट लेखमाला

प्रीत-मोहर
Sat, 08/03/2013 - 16:16 नवीन
कही वर्षांपुर्वी आम्च्या गोव्यात सर्पमित्रांनी सापांची ओळख करुन द्यायचा एक प्रोजेक्ट केला होता त्याची आठवण झाली. आमच्या शाळेत त्याचा एक "शो" झाला होता. बरेच बिनविषारी साप कसे ओळखायचे हे शिकवले होते. बाकी पु.भा. प्र.
  • Log in or register to post comments

"सर्पमित्र कसले हे तर सर्पवैरी!" ही बातमी वाचली

बहुगुणी
Fri, 08/01/2014 - 23:01 नवीन
"सर्पमित्र कसले हे तर सर्पवैरी!" ही बातमी वाचली आणि या लेखातील अखेरच्या वाक्यांची आठवण झाली: साप पकडणे हे काम सोपे नाही,जिवावरचा खेळ आहे.. त्यामुळे असे लेख वाचून, डिस्कवरी वर बघून चुकून पण त्याच्या वाटेला जाऊ नका, त्यांच्या बरोबर फोटो काढून घेऊ नका. हे लक्षात ठेवा " जो सापांबरोबर फोटो काढतो तो लवकरच फोटो मध्ये जातो !"
  • Log in or register to post comments

मस्त आणि माहिती पूर्ण लेख !!!

vikrammadhav
गुरुवार, 08/11/2016 - 08:45 नवीन
मस्त आणि माहिती पूर्ण लेख !!! www.youtube.com/watch?v=Nvtq644m-VA या विडो मध्ये लोकांचा दंगा बघा !!!! खरंच साप पकडणारा खूप अलर्ट असायला हवा ... कोब्रा पकडणार्यान किती जाम पकडलाय त्याचा जबडा!!! थोडी जरी पकड सैलावली तर .... बापरे !!! पोलीस लोक पण हिरोगिरी करतायत
  • Log in or register to post comments

मस्त.. हा भाग फारच छान झाला

रुपी
Fri, 06/02/2017 - 01:25 नवीन
मस्त.. हा भाग फारच छान झाला आहे. अगदी शहारे आले वाचताना!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा