ट्रेक करताना...

मोदक's picture
मोदक in भटकंती
13 May 2013 - 11:33 pm

.

"ट्रेकिंग" या अनुभवावर अनेक धागे येत आहेत. अनेक जण नवनवीन किल्ल्यांना भेटी देत आहेत ही चांगली गोष्ट आहे परंतु हे धागे वाचत असताना; ट्रेकर्सचे त्या त्या ठिकाणचे अनुभव वाचत असताना "धाडस आणि अनावश्यक धोका" या दोन गोष्टींमधला फरक लक्षात न घेवून अपघाताच्या अगदी जवळ जाणार्‍या काही घटना वारंवार दिसल्याने हा माहितीपर धागा.

सर्वप्रथम - "मी निष्णात ट्रेकर नाही" त्यामुळे इथे दिलेले सल्ले / सूचना हे अत्यंत सामान्य परिस्थितीमध्ये लागू होण्यासारखे आहेत व माझ्या अनुभवातून आलेले आहेत. दुरूस्त्या असल्या तर जरूर सुचवा.

"लोकं ट्रेकिंग का करतात..?", "काय मिळते..?", "याचे फलीत काय..?" वगैरे प्रश्न विचारू नयेत.
उत्तर दिले जाणार नाही!! :-D

सुरूवात -

१) सर्वप्रथम आपण कोणत्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणाची व्यवस्थित माहिती घेवून / ऐतिहासीक दृष्टीने अभ्यास करून जावे. त्या ठिकाणी फिरताना या माहितीचा उपयोग होतो.

२) आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत ते ठिकाण नक्की कसे आहे याचीही माहिती घेणे आवश्यक आहे. गड / भुईकोट किल्ला / दरी / कडा वगैरे ठिकाणी भेट देताना वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य सोबत बाळगावे लागते त्यानुसार तयारी करावी.

३) ठरवलेल्या ठिकाणी आधी कोणी गेले असेल तर "सध्याची परिस्थिती काय आहे" याची माहिती जरूर घ्यावी. बहुतांश गडकिल्यांवर दर पावसानंतर पडझड होण्याची शक्यता असते. शिड्या / पायर्‍या / गडावर जाणारे रस्ते नाहीसे झाले असतील तर पायथ्यावरून परत यावे लागते.

४) सोबत काय साहित्य घ्यायचे ते ठरवावे. एक दिवसाचा ट्रेक असेल तर फार विचार करावा लागत नाही मात्र मुक्कामाचा ट्रेक असेल तर व्यवस्थित तयारी करावी लागते. तसेच सुरूवातीपासून शेवटपर्यंत सोबत असलेल्या बॅगा आणि बाकीच्या वस्तू सर्वांच्या पाठीवर वागव्या लागणार आहेत याची योग्य ती कल्पना सहकार्‍यांना असावी.

५) ट्रेकमधील सहकारी निसर्गाच्या सान्निध्यात आनंद शोधणारे असावेत.

६) प्रवासासाठी बस / सार्वजनीक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणार असल्यास वेळापत्रक 'योग्य ऑथॉरिटीकडून' व्यवस्थीत पडताळून घ्यावे. बसचे वेळापत्रक ऑनलाईन मिळाले तरी ते न चुकता जवळच्या आगारातून तपासून घ्यावे.
प्रवासासाठी खाजगी वाह्न वापरणार असल्यास व डोंगरदर्‍यांचा प्रवास असल्यास एकदा वाहनाचे चेकअप करून घ्यावे.

७) Plan B चा विचार करून ठेवावा व त्यानुसार तयारी करावी - या पर्यायी वेळापत्रकाबाबत ट्रेक लीड्स मध्ये एकवाक्यता असावी.

८) निघण्यापासून ते परतीच्या प्रवासापर्यंतचे वेळापत्रक (Plan B सह) ट्रेक ला न येणार्‍या एखाद्या व्यक्तीकडे देवून ठेवावे.

नेहमी सोबत असाव्यात अशा वस्तू -

१) उन्हापासून संरक्षण होईल अशी टोपी
२) पुरेसे पाणी
३) खाद्यपदार्थ
४) औषधे व फर्स्ट एड बॉक्स
५) स्वीस नाईफ
६) काडेपेटी - दोन ठिकाणी, किंवा लाईटर - काडेपेटी भिजून पटकन निरूपयोगी होवू शकते - लाईटरच्या बाबतीत ही शक्यता कमी असते.
७) प्लॅस्टीक पिशव्या
८) जुनी वर्तमानपत्रे
९) हळद - जंगलामध्ये फिरताना जळू चिकटल्यास हळद हा एक उत्तम उपाय आहे. आणखी एक जालीम उपाय म्हणजे तंबाखू - निकोटीनमुळेही जळू गळून पडते. परंतु हळदच ब्येष्ट!
१०) या शिवाय आपल्याला आवश्यक वाटेल ते साहित्य.

आता काही महत्वाच्या सूचना.

१) ट्रेकिंग सॅक - ट्रेकला जाताना शक्यतो ट्रेकिंग सॅक न्यावी. या सॅकमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची सेटींग असतात. या सॅकमध्ये प्रचंड प्रमाणात वजन भरता येते व हे वजन शोल्डर लोड, बॅक लोड, वेस्ट लोड असे विभागलेले असते. दुहेरी शिवण आणि मजबूत कापडामुळे या सॅक ट्रेकदरम्यान दगा देत नाहीत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सॅकच्या बॅकसाईडला व्यवस्थित कुशन असते व त्या कुशनच्या आत अ‍ॅल्युमिनीयम रॉड असतात. या रॉडना आपली पाठ व खांदे यांच्या सर्वसाधारण नैसर्गीक आकाराप्रमाणे बारीकसा बाक दिलेला असतो. हे रॉड सॅकला आधार देतात, सॅकमधील वजनाला एकाच आकारात ठेवतात व वजन सम-समान विभागण्यास मदत करतात.
सॅक पाठीवर वागवताना ती शरीराच्या शक्य तितक्या जवळ असावी, यामुळे वजन जाणवत नाही व चालताना योग्य नियंत्रण राहते. ट्रेकिंग सॅकला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्देशाने पट्टे दिलेले असतात. त्यांचा सुयोग्य वापर करावा. ही सॅक आपल्या शरिराचा एक भाग होईल अशा प्रकारे सांभाळावी.
सॅकसोबत रेन कव्हर असावे
सॅक व्यवस्थीत भरणे हा ही एक शिकण्याचा विषय आहे.

२) शूज - ट्रेकला जाताना शक्यतो ट्रेकिंग शूज अथवा सवयीचे असे मजबूत शूज असावेत. ट्रेकिंगच्या मुहूर्तावर नवीन शूज चे उद्घाटन करू नये, जर नवीन शूज व्यवस्थीत बसणारे नसतील अथवा सवयीचे नसतील तर ट्रेक दरम्यान त्यांच्यामुळे त्रास होवू शकतो.
ट्रेकमधे दगडधोंड्यांवरून चालताना पावलांजवळ तयार होणारी उष्णता + घाम यांमुळे पायाची त्वचा मऊ होते व यामुळे दुखापती / जखमा (ब्लिस्टर्स) होवू शकतात. वेळोवेळी शूज व सॉक्स काढून, घाम टिपून पायांची शक्य तितकी काळजी घ्यावी.

३) कपडे व जर्कीन - ट्रेकदरम्यान जंगलाशी एकरूप होणारे व साध्या हलक्या रंगाचे कपडे असावेत. खूप भडक कपड्यांमुळे प्राणी व पक्षी विचलीत होण्याची शक्यता असते. कपड्यांचे जादा जोड सोबत असावेत.
पावसाळ्यामध्ये ट्रेक असेल तर जर्कीन सोबत बाळगावे. शक्यतो रेनकोट टाळावा त्यातही रेनकोटची पँट. कारण एखादा काटा / टोकदार फांदीमुळे रेनकोट लगेच फाटतो. जर्कीनला जोडलेली टोपी असेल तर उत्तम. कारण मान व शर्टाची / जर्कीनची कॉलर यातून पावसाचे पाणी मार्ग काढू शकत नाही.

फुलपँट व फुल टीशर्ट असावा. थ्री फोर्थ वगैरे प्रकारांमुळे पायांचा जंगलातील वनस्पती व पर्यायाने त्यावरील जीवजंतूंशी बिनविरोध संपर्क येतो व जळवा, सुरवंट वगैरेंचा त्रास जास्ती तीव्रतेने होवू शकतो.

४) सहकारी - सहकारी शक्यतो नवीन परिस्थितीशी जुळवून घेणारे व कोणत्याही आव्हानास तोंड देणाची तयारी असणारे असावेत. किरकोळ अपघात किंवा एखाद्याचा पाय मुरगळणे, पडणे वगैरे साध्या प्रकारांमुळे ट्रेक दरम्यान विलक्षण परिस्थिती उद्भवू शकते. अशा प्रसंगानुरूप जबाबदारीने वागणारे व सर्वतोपरी मदत करणारे सहकारी असावेत.

जंगलातून चालताना चित्र विचित्र आवाज काढून प्राणी पक्ष्यांना त्रास देणे, एखाद्या पाण्याच्या टाक्यामधले पाणी विनाकारण गढूळ करणे; कचरा टाकून खराब करणे. आजूबाजूला वावरणार्‍या लहान प्राण्यांना त्रास देणे (उदा. खेकडे!) हे व असे प्रकार टाळावेत.

ट्रेकदरम्यान सोबत असणारे सर्वजण एकाच वयोगटातील व एकाच शारिरीक क्षमतेचे असतीलच असे नाही. अनोळखी ठिकाणी / नवीन जागी ट्रेक आखला असेल तर संपूर्ण ग्रूपने एकमेकांसोबत ट्रेक पार पाडावा. टीम मधल्या अतीउत्साही मंडळींना अशावेळी उत्साहाला आवर घालावा लागतो तसेच चालण्याचा वेगही कमी करावा लागतो. अशा वेळी काय निर्णय घ्यायचा हे संपूर्णपणे त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असते. दोन ग्रूप करून गड सर करणे सोपे वाटत असेल तरी एखाद्या प्रसंगाला तोंड द्यायची क्षमता निम्मी होते याचेही भान राखणे गरजेचे ठरते.

ट्रेकदरम्यान व्यसनांना पूर्णपणे फाटा द्यावा.

५) पाणी व खाद्यपदार्थ - ट्रेकदरम्यान सोबत पाणी आणि अन्नपदार्थांचा भरपूर साठा सोबत बाळगावा. पाणी जास्ती असेल तर परतताना वाटेतल्या झाडांना घातले तरी चालेल मात्र एखाद्या कड्यावर, गडाच्या वाटेवर पाणी संपल्यानंतर दमलेल्या अवस्थेमध्ये टाके शोधण्यामध्ये कोणताही शहाणपणा नसतो.
पाण्याच्या टाक्यामधले पाणी शुद्ध आहे का पहावे. प्लॅस्टीक पिशव्या, केरकचरा वाले पाणी रूमालाने गाळून घ्यावे व "मेडीक्लोअर-एम" या औषधाचे दोन लिटरला एक दोन थेंब टाकून पाणी वापरता येते.

टाक्यामधले पाणी बाहेर काढल्यानंतर बाकीचे पाणी गढूळ करू नये.

ट्रेकदरम्यान सोबत्यांना किंवा अगदी अनोळखी ट्रेकर्सना पाण्याची गरज लागेल या हिशेबानेही सोबत पाणी बाळगावे आणि अशा ठिकाणी पाणी देताना विचार करू नये - अगदी पाणी न बाळगण्यामध्ये त्या लोकांची चूक असली तरी त्या ठिकाणी तत्वांना चिकटून निर्णय घेवू नयेत.

६) निसर्ग - निसर्गाच्या ताकदीला कमी लेखू नये - कधीही!!
धबधबा, कडे, पाण्याचे साठे, विहीर अशा ठिकाणी जपून वावरावे. "विनाकारण धोका पत्करण्याची गरज आहे का..?" हा प्रश्न स्वतःला विचारावा.
Mountains have their ways of dealing with overconfidence. हे विसरू नये!

पाऊस, ओले गवत, कडे, भर्राट वारा, धबधबा, धुके, मोठमोठाले दगड व त्यांवरून केलेली चढउतार या गोष्टी आनंददायी असतात परंतु एखादा छोटासा अपघात, पाय मुरगळणे, दगडावर हात पाय आपटून जायबंदी होणे या कांही क्षणात घडणार्‍या गोष्टी असतात. पाऊस पाणी वगैरे सगळ्या आनंददायी गोष्टी एखादा अपघात होईपर्यंत चान चान वाटतात परंतु अपघातानंतर त्या व्यक्तीला सांभाळत गडावरून खाली उतरणे प्रचंड कठीण काम असते.

७) प्राणी / पक्षी - आपण ट्रेक करताना प्राणीपक्ष्यांच्या अधिवासातून जात असतो. आपला वावर / मुक्काम त्यांच्यासाठी त्रासदायक होणार नाही याची काळजी घ्यावी. साप, खेकडे, विंचू वगैरे प्राणी विपुल प्रमाणार आढळतात. त्यांच्या क्षेत्रात विनाकारण ढवळाढवळ करू नये. साप दिसला की खडे मारणे, काठीने ढोसणे वगैरे प्रकार कोणत्याही परिस्थितीमध्ये करू नयेत. सापाचा एखादा दंश, विंचू खेकड्याने घेतलेला चावा खूप महाग पडू शकतो.

८) अन्न शिजवताना - ट्रेकदरम्यान अन्न शिजवताना चूल पेटवायची असल्यास अत्यंत काळजीपूर्वक हवे तितकेच वाळलेले लाकूड / फांद्या तोडाव्यात - हे ही टाळता येणे शक्य असेल तर टाळावे.
स्वयंपाक झाल्यानंतर चूल व्यवस्थीत विझवावी. राहिलेले लाकूड / जळण एखाद्या छ्ताखाली / गुहेमध्ये ठेवावे ज्यायोगे नंतर येणार्‍या ट्रेकर्सना त्याचा वापर करता यावा.
चूल पेटवणे टाळण्यासाठी सोबत रॉकेलचा छोटासा स्टोव्ह बाळगावा - प्रवासादरम्यान त्यातले रॉकेल बाटलीत काढावे कारण रॉकेलने भरलेला स्टोव्ह हिंदकळून रॉकेल बाहेर येते व वाया जाते.
गॅसच्या छोट्या शेगड्या मिळतात - हा सर्वोत्तम उपाय, मात्र या शेगड्या वजनाने थोड्या जड असतात.

अनेक ठिकाणी / देवळांमध्ये / गुहेमध्ये स्वयंपाकासाठी भांडी ठेवलेली असतात. यांचा आपल्याआधी वापर कधी केला गेला असेल याची कल्पना नसतेच त्यामुळे ही भांडी स्वच्छ धुवून घ्यावीत व आपल्या स्वयंपाकानंतर तितकीच स्वच्छ करून ठेवावीत.

अनोळखी वनस्पती, झाडांची मुळे यांचा अन्नाशी संपर्क येवू देवू नये. (दातपाडीची कथा सर्वांना माहिती असेलच! ;-))

स्थानीक नियम / श्रद्धांना धक्का पोहोचवू नये. गावकर्‍यांशी सौदार्हपूर्ण संबंध ठेवावेत. ऐनवेळी कांही झाले तर हेच लोक आपल्या मदतीला येणार आहेत याची जाणीव ठेवावी.

आपण सर्वसाधारणपणे ६ / ७ जण ट्रेकला जातो. एखाद्या आडगावामध्ये जाताना तिथल्या ग्रामस्थांसाठी उपयोगी असे काहीतरी घेवून जावे. ६ / ७ जणांमध्ये प्रत्येकी १५ / २० रूपये जमा केले तरी त्या रकमेमध्ये क्रोसीन सारखी डोकेदुखीवरची औषधे, डेटॉल, कापूस वगैरे प्रथमोपचाराचे साहित्य येवू शकते. अगदी तिथल्या लहान मुलांसाठी बिस्कीटचे पुडे नेले तरी त्यांना त्यामध्ये आनंद वाटू शकतो.

आपण घरगुती व्यवस्थेमध्ये जेवण करणार असल्यास काही गोष्टी "अ‍ॅडजेस्ट" करण्याची तयारी असावी. आपल्या घरामध्ये आपण अनेकदा अनेक गोष्टी "अ‍ॅडजेस्ट" करतोच. एखादे हॉटेल व रिसॉर्ट असेल तर त्याची गोष्ट वेगळी मात्र खेड्यापाड्यांमधील लोकांना अनेक गोष्टींसाठी लांब अंतर चालत किंवा दिवसातून एक दोनदा येणार्‍या बसवर अवलंबून रहावे लागते याची जाणीव ठेवावी.

९) पायवाटा व नकाशे - होकायंत्र व नकाशे सोबत असावेत. आपण जाताना एखाद्या खुणेच्या आधाराने स्टार्टिंग पॉईंट व मार्ग बघून ठेवावा. गूगल मॅप्स, GPS वगैरे बाबींबर फारसे अवलंबून राहू नये कारण या यंत्राने, मोबाईलच्या रेंजने किंवा कनेक्टिवीटीने दगा दिला तर आपण अक्षरश: हतबल होतो.

समजा रस्ता चुकला आणि मोबाईलला रेंज जरी असेल तरी "आपण कुठे आहोत" हे कोणत्या आधारावर सांगणार..?

गड किल्ल्यांवर पायवाटा तयार झालेल्या असतात. शक्यतो त्यावरूनच जावे. विनाकारण वेगळे मार्ग वापरणे, कड्यावरून उतरताना नवीन ठिकाणाहून उतरणे वगैरे प्रकार करू नयेत. कडे उतरताना कोणत्याही परिस्थितीमध्ये ओढण्या, कच्ची दोरी वगैरेंचा वापर करू नये.

अनोळखी ठिकाणी पायवाटा व गुरांच्या वाटांमध्ये गोंधळ होवून रस्ता चुकू शकतो. त्याची काळजी घ्यावी.

रस्ता चुकल्यावर ग्रूपमध्ये रहावे. रस्ते शोधण्यासाठी सर्वांनी सर्व दिशेला जाण्यापेक्षा अनुभवी लोकांनी दोन तीनच्या ग्रूपने बाहेर पडावे. समजा ग्रूपमध्ये दोनच अनुभवी लोक असतील तर एकाने रस्ता शोधण्यासाठी व एकाने संपूर्ण ग्रूपसोबत रहावे. सहकार्‍यांचा आत्मविश्वास हरवू देवू नये.

जंगलातून वावरताना कोणत्याही परिस्थितीमध्ये कचरा व प्लॅस्टीक फेकू नये. खास कचर्‍यासाठी एक मोठी पिशवी सोबत बाळगावी. तसेच चालता चालता दिसणारा व सहज हाताशी येणारा कचराही गोळा करावा.

ट्रेकदरम्यान प्रातर्विधी आवरताना पाण्याचे साठे दुषीत होवू देवू नयेत. शौचास जाताना शक्यतो वाहत्या पाण्यापासून लांब व शक्य असेल तर एखादा खड्डा करून पाणी प्रदुषीत होणार नाही याची काळजी घ्यावी.

**********************************************************

There have been joys; too great to be described in words, and there have been griefs upon which I have not dared to dwell, and with these in mind I say, climb if you will, but remember that courage and strength are naught without prudence, and that a momentary negligence may destroy the happiness of a lifetime. Do nothing in haste, look well to each step, and from the beginning think what may be the end.
— Edward Whymper.

**********************************************************
हा धागा इंटरॅक्टीव्ह स्वरूपाचा असावा अशी अपेक्षा आहे. नवीन सूचनांचे स्वागत आहे!
**********************************************************

प्रतिक्रिया

कंजूस's picture

15 May 2013 - 9:52 am | कंजूस

इंद्रावणी ( Citrus Colocynthis)चा वैद्य लोक दाताच्या रोगासाठी वापरत .फळाचा नुसता धूर वापरायचे .याचा जास्त वापर करू नये असे म्हणतात हिरड्या सुजतात किँवा सैल होतात .याचा अतिराक अथवा दुरुपयोग होऊन दात पडत असावेत .( शाळेतली मुले खाजकुईलीचा दुरुपयोग करतात ते केस खरं म्हणजे थोडयाप्रमाणात गुळाबरोबर पोटदु:खीचे रामबाण औषध आणि बियांपासून शक्तिवर्धक पाक बनतो .

मालोजीराव's picture

14 May 2013 - 6:33 pm | मालोजीराव

त्याचा रस तोंडात इ. गेला तर हिरड्या कमकुवत होऊन दात पडतात

हिरड्या प्रचंड सुजून दात जवळपास बाहेरच येतात, आमच्या भागात याचे अनेक उपयोग करतात वैद्य पण आणि काही बाराचे लोक पण.
जनावराच्या बाजारात गुरं विकायला न्यायाच्या आधी ह्याचा रस काढून वाळक्या गुरांना लावतात त्यामुळे गुरं तेवढ्यापुरती पुष्ट वाटतात… मग हे लोक चढ्या किमतीला विकून मोकळे

बॅटमॅन's picture

14 May 2013 - 7:10 pm | बॅटमॅन

बाबौ! औघड आहे. बरं झालं ते फूल फेकून दिलं नैतर कवळीमॅन झाला असता माझा =)) =))

कंजूस's picture

14 May 2013 - 4:49 pm | कंजूस

आता एक कामाचे सांगतो .एक प्लास्टीकचा डबा साधारण ५ बाय ४ आणि उंचीला ९ ईंचाचा घेऊन त्याला चाळीसेक फूट नायलॉनची दोरी गुंडाळून ठेवावी .हा डबा सैकमध्ये टोमाटो वगैरे मऊ गोष्टीसाठी वापरता येतो .नंतर गडावरच्या टाक्यातून ,गावाबाहेरच्या खोल विहिरीतून पाणी ओढण्यास,अथवा बोअरवेलचे पाणी भरून घेण्यास ,नदीवर आंघोळीला हा डबा फार उपयोगी पडतो .

शैलेन्द्र's picture

14 May 2013 - 5:22 pm | शैलेन्द्र

तसचं एक प्लॅस्टीकची बाटली असु द्यावी जवळ.. सपाट बुडाची किंवा झाकणाची .. नाहीतर उगी धरुन बसायला लागते..

आदिजोशी's picture

14 May 2013 - 5:33 pm | आदिजोशी


बॅग भरताना आतले कपडे आणि भिजून खराब होण्यासारख्या इतर वस्तू आधी प्लॅस्टीकच्या वेगवेगळ्या पिशव्यांत गुंडाळून मग बॅगेत भराव्या.


आपल्याला सहज झेपेल इतकेच सामान भरावे.


शायनींग मारायला नी फोटो काढायला येणार्‍या मुली आणि मुलांना नेणे टाळावे. खूप त्रास आणि ताप होतो. जीन्स आणी स्पोर्ट्स शूज घालून आलेल्यांना फाट्यावर मारावे आणि परत पाठवून द्यावे.


रॅपलींग करायचे असो वा नसो, कायम रोप सोबत ठेवावा. धोधो पाऊस पडत असताना ओढ्यातून उतरताना कामी येतो.


ओढ्यातून उतरताना सावधान. पाण्यामुळे मातीची धूप होऊन दगड सैल झालेले असतात. सटकले तर ट्रेकर आणि अजून काही दगड घेऊन खाली गडगडतात.


जे कुणी ट्रेकला येणार आहेत त्यांना ट्रेकची अगोदरच पूर्ण कल्पना द्यावी. मेंबर जमवण्यासाठी टेपा लाऊन माणसं आणू नये. उदाहरणार्थ - '१-२ तासाचा सोप्पा ट्रेक आहे, चढण फारशी नाहीच' असे म्हणून त्यांना मे महिन्यात प्रबळगडावर नेऊ नये.


१ टॉवेल प्लॅस्टीकच्या पिशवीत ठेवावा. सिगारेट प्यायची असेल तर आधी हात कोरडे करायला उपयोगी पडतो. सोबत लायटर ठेवावा.


रात्रीचा ट्रेक असेल तर ट्रेकींग नाईफ वगरे जवळ बाळगावेत. झाडं कापायला आणि स्वसंरक्षणासाठी उपयोग होतो.
a


फुकटची रिस्क घेऊ नये. दिसेल ते फळ खाऊ नये. दिसेल त्या रोपाला, झाडाला हात लाऊ नये. झाडांची, वेलींची पानं ओरबाडत जाऊ नये.

१०
इलेक्ट्रॉलची पाऊडर नुसती खाऊ नये. बेक्कार डिहायड्रेशन होतं. भरपूर लिंब न्यावीत. डिहायड्रेशन मधे उपयोगी पडतात.

११
खुणा करायला क्रेयॉन्स वापरावे. खडूनी केलेल्या खुणा पावसात पुसल्या जाऊन गोची होते.

सद्ध्या इतकंच, सुचेल तसं अ‍ॅड करेनच.

ऋषिकेश's picture

14 May 2013 - 5:38 pm | ऋषिकेश

शायनींग मारायला नी फोटो काढायला येणार्‍या मुली आणि मुलांना नेणे टाळावे. खूप त्रास आणि ताप होतो.

+१११११
पण

जीन्स आणी स्पोर्ट्स शूज घालून आलेल्यांना फाट्यावर मारावे आणि परत पाठवून द्यावे

का बरे?

बाकी,

खुणा करायला क्रेयॉन्स वापरावे. खडूनी केलेल्या खुणा पावसात पुसल्या जाऊन गोची होते.

सहमत आहेच. मात्र पावसाळ्यात आम्ही तीन दगड, त्यावर दोन, त्यावर एक असा छोटा पिरॅमिड रचतो खुणेसाठी. धुक्यात वगैरे त्या फुल्या अनेकदा दिसत नाहित.

आदिजोशी's picture

14 May 2013 - 5:45 pm | आदिजोशी

का बरे?

जीन्स काचून मांड्यांची वाट लागल्याने आणि स्पोर्ट शूज घालून पाय सारखे सरकल्याने चढण्याची स्पीड अर्ध्याहून कमी होतो. सगळे लटकतात.

(३ तासांचा ट्रेक अशा लोकांमुळे ५ तासात केलेला) आदि जोशी :)

जीन्सचं ठीके पण ट्रेकमध्ये बुटं पाहिजेतच, नाही का? तसे आम्ही चपलीने सिंहगड, लोहगड, पुरंदर, राजगड, तिकोना अन तुंग चढलोत, पण बुटं वापरायला सुरुवात केल्यावर मग त्यांचा ट्रेकमधला फायदा कळ्ळा. रॉक क्लाइंबिंगमध्ये तर बुटं मष्ट.

आदिजोशी's picture

14 May 2013 - 5:53 pm | आदिजोशी

अहो मी स्लिपर घालून ट्रेक केलेत. आणि हंटर शूज / ट्रेकींग शूज असतील तर गोष्ट वेगळी. स्पोर्ट शूज हे ट्रेकसाठी नाहीत.

बॅटमॅन's picture

14 May 2013 - 5:55 pm | बॅटमॅन

ओह ओके. रैट्ट.

डोंगरयात्रा या पुस्तकात याच स्परूपाची अत्यंत मौल्यवान माहिती आहे. प्रत्येकाकडे हवं असं पुस्तक आहे ते.

आजानुकर्ण's picture

14 May 2013 - 5:40 pm | आजानुकर्ण

अनेक वर्षांपूर्वी वेड्यासारखे ट्रेक करत होतो. अजूनही ट्रेकिंगची सॅक, स्लीपिंग बॅग आणि कॅरीमॅट घरी पडून आहेत

मोदक's picture

14 May 2013 - 6:15 pm | मोदक

जालावर फिरत असलेला एक टाईमपास मेल..

ट्रेकरची लक्षणे - अर्थात ट्रेकर कसा ओळखावा :-

१.चेहरा: बहुधा रापलेला . दाढ़ी मिश्यांचे नक्कीच काही ना काही कीडे केलेले असतात. त्यातही French beard किंवा सैफच्या टशन स्टाइल मिश्या यांच्या फार आवडत्या. काही ट्रेकर्स असेही असतात जे दाढ़ी मिश्या ठेवत नाहीत त्यांना मुली असे म्हणतात :)

२.केस: एकतर अतिशय बारीक़ कापलेले किंवा खुप लांब ..मुले मुली दोघांचेही :)

३.वेशभूषा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे
सोमवार ते गुरुवार: चेक्सचा शर्ट , जीन्स, पायात चप्पल. खांद्याला चिंगुली सैक हीला ट्रेकच्या भाषेत पिट्टू म्हणतात. त्याला एखादा snap किंवा रंगीबेरंगी स्लिंग जरुर अडकवलेली असते.
शुक्रवार रात्र: निघायची तयारी ...ख़राब फीटिंगची पण प्रचन्ड comfortable ट्रैक पँट , Bombay Natural History Society चे कुठल्या तरी दुर्मिळ पक्ष्याचा फोटो असलेले टी शर्ट , कमरेला वेस्ट पाउच (ही एकखासचीज आहे ...हिच्याविषयी विस्ताराने पुढे येईलच ) ,पायात अनुभवी बनचुका ट्रेकर असल्यास स्लीपर / मध्यम अनुभवी असल्यास फ्लोटर्स / अगदीच नवखा असल्यास भारी बूट :)
शनिवार दुपार ते रविवार दुपार: वर उघडाबंब , डोक्यात माकडटोपी , खाली ट्रैक पँट ...काही ट्रेकर्स उघडे नसतात त्यांना मुली असे म्हणतात :)

४.सापडण्याची जागा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे
सोमवार ते शुक्रवार सकाळ: आपापला धंदा नोकरी व्यवसाय ...नाईलाजाने.
शुक्रवार रात्र: CST स्टेशनच्या मोठया घडयाळाखाली ... ही trek साठी भेटण्याची जागा.
शनिवार पहाट: कर्जत, मुरबाड, लोणावळा, कसारा, इ. इ. S T stand
शनिवार दुपार ते रविवार दुपार: कुठल्यातरी गडावरील केव्ह

५.अन्य विशेष लकबी:हे कुठल्या ना कुठल्या ट्रेकिंग क्लबचे मेंबर जरुर असतात , पण ९० % वेळा दुसऱया club बरोबर ट्रेकला जातात :)
ट्रेकला वा शहरात कुठेही कोणताही प्लास्टीकचा कचरा टाकत नाहीत .... साधी गोळी जरी खाल्ली तरी कागद व्यवस्थीत खिश्यात ठेवतात. कोणत्याही प्रदूषणाचा यांना तिटकारा असतो. पण किल्ल्यावर केव्हमध्ये कधी कधी ध्वनी + वायु प्रदुषण जरुर करतात :) त्यातही त्यांची फारशी चूक नसते. रात्री उशिरा निघणे, वेळी- अवेळी खाणे, दगदग यामुळे बिचार्यान्चे पोट थोड़े फार बिघडते :)
बोलता बोलता मध्येच खालील शब्द फेकतात : आजोबा, अलंग, कुलंग, कोल,केव्ह, traverse , तिकोना, पिंचहोल्ड, हंप इत्यादी इत्यादी
यांचे एकंदरीत काम अगदी सुबक असते , एखाद्या सराईत गृहिणीसारखे : उदाहरणार्थ सैकमध्ये प्लास्टीकची पिशवी, तिच्यात कपडे, कपड्यांच्या घडीत प्लास्टीकची छोटी पिशवी, तिच्यात छोटी डबी , तिच्यात कागदाची पुडी आणि तिच्यात शिट्टी :) यांचा wastepouch ही एक धमाल चीज असते : यात caluclator , nail कट्टर पासून सुई दोर्यापर्यंत जगातील काहीही अफलातून गोष्ट असते . एका ट्रेकरच्यापाउच मध्ये मी एकदा फॉर्म १६ A बघीतला होता आता बोला :) सैक सुद्धा अशी सुरेख भरतील की पाहत रहावं .

६.खाण्या पिण्याच्या सवयी:
कशालाही नाही म्हणणार नाहीत :) हवे ते हक्काने मागून घेणार :)
काहीतरी विचित्र करून दुसरयाचे लक्ष वेधून घेण्याची वाईट खोड . बिस्किटे पाण्यात बुडवून खाणे , श्रीखंड पाव , केळ पाव खाणे इत्यादी :)
पाणी अतिशय जपून वापरतात . बाटलीतील पाणी ओतायची यांची खास पद्धत असते . बाटलीचे झाकण उघडून बाटलीच्या तोंडावर डाव्या हाताची तर्जनी आणि मधले बोट दाबून धरायचे आणि थोडीशी मोकळी जागा ठेवून बाटली हळूवार कलती करायची यामुळे पाणी भस्सकन पडत नाही

७.गडावर असताना यांची करमणुकीची साधने:
खणखणित आवाजात पोवाडे गाणे
जुन्या ट्रेकच्या आठवणित रमणे
बैटिंग ला जाणे :) (बॅटिंग म्हणजे क्रिकेटमधील नाही. सक्काळी सक्काळी खुल्या आभाळी एखाद्या आडोशाच्या पिचवर जी होते ती.)

८.यांची दैवते:
off course शिवाजी महाराज
रायगडचा जगदीश्वर
हरिश्चंद्र गडाचा खिरेश्वर ,
रतन गडचा अमृतेश्वर इ . इ .

९.यांची तिर्थस्थळे:
राजमाचीचा तलाव
बाण चा ब्लू लगून
नाणे घाटातील केव्ह
कोंकण कडा इ . इ .
आणि हो ज्याप्रमाणे प्रत्येक आज्जीचं एकदातरी काशीयात्रा करण्याचे स्वप्न असते त्याचप्रमाणे प्रत्येक ट्रेकरचे निम् (नेहरू इंस्टिट्यूट ऑफ़ mountaineering) ला जाऊन बेसिक कोर्स complete करून A ग्रेड घेउन यायचे स्वप्न असते :)

१०.ट्रेकर्स विषयी काही मोठ्ठे गैरसमज - यांना मुली आवडत नाहीत

gogglya's picture

5 Jun 2015 - 7:47 pm | gogglya

एका ट्रेकरच्यापाउच मध्ये मी एकदा फॉर्म १६ A बघीतला होता आता बोला :)

ठ्ठो...

ए मोदका, रायगडावरुन उतरताना झालेल्या काशीचे कारण समजले.

स्पोर्ट शूज.
उतरताना सॉलिड भीती वाटत होती सटकायची.

आदिजोशी, मै आपका मरते दम तक शुक्रवार करुंगा आपलं शुक्रगुजार रहूंगा थोडक्यात आपला जल्मोजल्मी ऋणी आहे. ;)

अनिरुद्ध प's picture

14 May 2013 - 6:40 pm | अनिरुद्ध प

आपण पुण्याचे का? कारण आपण विनोद करुन दातपाडिच्या वनस्पतिची माहिती देणे टाळत आहात कस बर जमत एखद्याला!

मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगितलं, त्यापलीकडे माहिती नाही. अन मी पुण्याचा नाही. पुणेकरांना पिना मारायच्या असतील तर वेगळे बरेच्च धागे इकडे आहेत, तिकडे त्यांना शिव्या घाला जावा. ट्रेकिंगच्या धाग्यावर अवांतर नको.

बाबा पाटील's picture

15 May 2013 - 10:43 am | बाबा पाटील

खर तर कर्णबाधिर्यावर याच्या सिद्ध तेलाचा अत्यंत चांगला उपयोग होतो. बाकी वनस्पतींच्या उपयोग विषयी वेळ मिळाला तर एखादा लेख नक्की लिहीतो.

उपास's picture

14 May 2013 - 7:06 pm | उपास

मोदकराव आणि इतर, माहितीपूर्ण आणि संग्राह्य धागा..
माझ्याकडून थोडी भर -
१. ट्रेक करताना मोठमोट्याने रेडिओ लावून ध्वनि प्रदूषण टाळावे, काव आणतात अशी लोकं.
२. गडावर पोहोचल्यावर फिरण्यासाठी म्हणून एखाद स्लीपर्स चा जोड जो ऐनवेळी उपयोगी पडू शकतो.
- (येसोमिटीतला हाफ डोम ट्रेक करायची मनिषा असलेला..) उपास

कपिलमुनी's picture

14 May 2013 - 8:39 pm | कपिलमुनी

यावर नक्की काय करायचे ?
ते अजुन कळले नाही ! दुर्गम ठिकाणी काय प्रथमोपचार करावेत ?

इतर काही अपघातावर प्रथमोपचार :

१. खरचटणे ( एखादी क्रीम किंवा हळद काय नाय तर दगडी पाला लावायचा )
२. पाय मुरगाळणे : कधीही मुरगळेला भाग चोळू नये .. सुज आली असेल तर शरीरापेक्षा उंचावर ठेवावा..
३. पाय / हात मोडणे : ?? हा प्रसंग अजुन आलेला नाही ...पण काय करावे या बद्दल कोणी सांगू शकेल का ?
४. उलट्या होणे / जुलाब होणे ( या साठी आम्ही बर्‍याचदा टाक्यामधले पाणी उकळूनच वापरतो ) बाकी गोळ्या व ग्लु़कॉन डी घेणे उत्तम
५. भाजणे : रात्री शेकोटी करतानाभ/ स्वैपाक करताना भाजते त्यासाठी एखादे मलम असलेले बरे ..

एखाद्या ट्रेक मेंबर ला फीट येण्याचा त्रास आहे का हे अगोदरच विचारा ...एका ट्रेक मधे अशा मेंबर चा खुप त्रास झाला आहे..फीट , दमा असे आजार असलेल्यांची पुर्वकल्पना असलेली बरी ..

सौंदाळा's picture

14 May 2013 - 9:09 pm | सौंदाळा

उतारावरुन चालत खाली येताना एकमेकान्चे हात पकडुन साखळी करुन अजिबात उतरु नये.
उतारावरुन चालत खाली येताना पाय सरळ टाकण्याऐवजी आडवे टाकावेत. यामुळे उतारच्या दिशेशी तळपाय काटकोनात होतो आणि सरळ पाय टाकुन मिळेल त्यापेक्षा जास्त सर्फेस एरिया मिळतो, शरिराचा समतोल राहतो आणि उतारवरुन घसरायचे चान्सेस कमी होतात.

सौंदाळा's picture

14 May 2013 - 9:13 pm | सौंदाळा

आणि एक रहिलेच..
थोड्या थोड्या वेळाने खांद्यावरचे सॅकचे पट्टे खांद्यावरच इकडुन तिकडे सरकवावेत, जबरदस्त फरक पडतो.

मोदक's picture

15 May 2013 - 12:06 am | मोदक

बरोबर..

सॅक आपण कशी भरतो व कोणत्या पद्धतीने खांद्यावर घेतो यावर बरेच काही अवलंबून असते.

सॅकचे सर्व पट्टे घट्ट बांधले गेले पाहिजेत. तसेच सॅक पाठीला शक्य तितकी चिकटूनच राहिली पाहिजे. शोल्डर व वेस्ट बेल्टसुद्धा घट्ट असावेत. एखाद्या अरूंद जागेवरून जाताना सॅकमुळे आपला तोल जाता कामा नये.

जर प्रॉपर ट्रेकिंग सॅक सोबतीला असेल तर कितीही सामान खांद्यावर घेतले तरी काही फरक पडत नाही. (मात्र अँकल सपोर्ट वाले शूज असावेत.. पाठीवरच्या वजनामुळे पाय मुरगळण्याचे, दुमडण्याचे प्रमाण कमी होते.)

खालच्या फोटोमध्ये मी घेतलेल्या सॅकमध्ये पाच सिलींग फॅन व त्यांची फुल साईझ ब्लेड्स खोक्यासहीत भरली आहेत. आणि हे वजन पाठीवर घेवून वावरताना मला कोणताही त्रास झाला नाही. ;-)

.

नेह्मीप्रमाणेच तपशीलवार.. हॅट्स ऑफ टु मोदक.. :)

सुहास झेले's picture

14 May 2013 - 11:20 pm | सुहास झेले

मस्त रे.... अगदी जमलाय लेख. सगळंच तू नीट सांगितले आहेस.

मला इतकेच सांगायचे आहे की हल्ली ट्रेकिंग म्हणजे फ्याशन झालीय. मोठमोठ्या कंपन्या काही तरी चित्त थरारक अनुभव म्हणून हल्ली सर्रास ट्रेकला जात असतात. अजून काही मुद्दे आहेतच. सांगतो निवांतपणे :)

आशु जोग's picture

14 May 2013 - 11:55 pm | आशु जोग

>एकदा वेळा अशा मित्रामुळे यशस्वी चढाईऐवजी यशस्वी माघार घ्यायला लागली होती.(तीदेखील शिवनेरीला साखळदंडाच्या मार्गाने)

सौंदाळा

हा माझाच बालपणीचा किस्सा नाही ना सांगत.
साखळदंडापाशी पोचल्यावर एका पायरीपाशी मला पुढे जाणे जमेना.
माझ्या वडीलांनी मग मला पाठीवर बसवून परत खाली नेले
किल्ल्याला वळसा घालून पुन्हा डांबरी सडकेच्या मार्गाने वरती नेले तेही भर उन्हात.

आशु जोग's picture

15 May 2013 - 12:02 am | आशु जोग

टाक्यातून पाणी काढण्यासाठी दोरी आणि पाण्यात बुडेल असे काही तांब्या, बाटली वगैरे.

डोंगरावर आग लावू नये हा अगदी बरोबर मुद्दा.
असे करणे हा फौजदारी गुन्हा ठरू शकतो.

ट्रेकिंगला गेल्यावर दारु, सिगारेट या गोष्टी टाळाव्यात

नर्मदेतला गोटा's picture

15 May 2013 - 12:14 pm | नर्मदेतला गोटा

ट्रेकिंगला मुले मुली एकत्र जाणार असतील तर मुलींनी जाण्यापूर्वी दहादा विचार करावा.
(सिनेमातील हिरॉईन जशी झुरळाला घाबरते)
मुली छोट्या छोट्या गोष्टींनी घाबरून जावून हाय हूय, आऊच करीत असतात.

पण ट्रेकिंगच्या गडबडीत पुरुष सहकार्‍यांना मुलींना धीर द्यायला, त्यांना सावरायला अजिबात वेळ नसतो.
अशावेळी मुलींची निराशा होऊ शकते.

चिगो's picture

15 May 2013 - 3:43 pm | चिगो

उत्तम लेख आणि प्रतिसाद.. माझ्यापेक्षा भरपुर जास्त अनुभव असलेल्या लोकांनी प्रतिसाद दिलेयत, त्यात थोडीशी भर..

ट्रेकला जाताना शक्यतो ट्रेकिंग शूज अथवा सवयीचे असे मजबूत शूज असावेत

मान्य.. पण म्हणून ट्रॅक्टर सोलचे किंवा अगडबंब शुज घालून जाऊ नये. एकतर त्यांच्या वजनानेच थकायला होतं, आणि फ्लेक्जिबिलीटी नसल्याने ग्रीप मिळत नाही.. माझातरी वुडलँडच्या शुजचा अनुभव वाईट आहे. त्यापेक्षा बर्यापैकी ग्रीप असलेले स्पोर्ट शुज बरे होते..;-)

दुसरी गोष्ट म्हणजे उतरतांना घ्यायची काळजी.. पाय सरळ न टाकता आडवा टाकावा. शरीराचा तोल नेहमीच पहाडाच्या बाजुला असावा. आणि कुणाला हात, आधार देतांना आधी स्वत: भक्कमपणे उभे असल्याची खात्री करुन घ्यावी.. नाहीतर 'हाथ तो मिला, पर साथ नहीं' अशी हालत व्हायची. :-D. ट्रेक आणि पहाड ही फालतू रोमँटिक व्हायची जागा नव्हे.. आमच्या गुर्जींच्याप्रमाणे 'पहाड किसी को माफ नहीं करता..' :-(

वुडलॅंड शूजबद्दल अजूनपरेंत खास काही चांगलं ऐकलंच नाही!

अर्धवटराव's picture

16 May 2013 - 12:09 am | अर्धवटराव

काहि ट्रॅकर्स अवलीये असतात... काहिंना आपण अवलिया व्हायला पात्र आहोत याचि खरी/खोटी खात्री असते. मग हे लोक्स लास्ट मोमेण्ट प्लान बदलुन वेगळच काहितरी एक्स्प्लोर करायला जातात. अशावेळी इतरांनी, खास करुन नवख्यांनी विवेकाचा कौल ९९ टक्क्याच्या कमी असेल तर अशा अवलीयांच्या मागे जाऊ नये. त्यातला त्यात जो सुजाण लीडर ठरलेल्या प्लॅनप्रमाणे मार्गक्रमण करेल त्याच्या सोबत जावे, किंवा सरळ मागे फिरावे.

अर्धवटराव

श्रीरंग_जोशी's picture

16 May 2013 - 12:56 am | श्रीरंग_जोशी

एवढे बौद्धिक झाल्यावर आणखी एक महत्वाचा नियम

इफ यु कान्ट ट्रेक इट, देन फेक इट.

एखाद्या गडावरील अवघड चढण ऐनवेळी भिती वाटल्याने सोडून माघार घ्यावी लागली तरी कमीपणा मानू नये.
फोटोशॉप कशाकरिता आहे? मित्रमंडळींचे त्या गडाचे फोटोज ढापून त्यावर आपला फोटो मॉर्फ करावा अन द्यावा टाकून चेपूवर वगैरे. सगळे नाही पण काही लोक तर नक्की भूलतील अन 'लै भारी' अशा प्रतिक्रिया लिहितील ;-).

वेल्लाभट's picture

16 May 2013 - 7:31 am | वेल्लाभट

आंतरजालावर अनेक्क्क ठिकाणी वाचलं की अ‍ॅक्शन ट्रेकिंग शूज भनाट असतात. त्याबद्दल माहिती मिळेल का? नेमकं मॉडेल, सिरीज, कुठे मिळतात (विशेषतः मुंबईत)?

कपिलमुनी's picture

16 May 2013 - 12:49 pm | कपिलमुनी

मला ह्या शूज ची माहिती जातिवंत भटका यांज कडून मिळाली .. कोणत्याही अ‍ॅक्शन च्या दुकानात मिळतात .. ७०० रु. च्या आसपास किंमत आहे ..वजनाला स्पोर्ट्स शूज पेक्षा जड असतात ..पण ग्रीप छान आहे ..

मोदक's picture

16 May 2013 - 2:13 pm | मोदक

भारी शूज आहेत.

फक्त या शूजमध्ये दोन प्रकार असतात.. अँकल वाले आणि साधे.

शक्यतो अँकलवाले घ्यावेत.

हे शूज जर पाण्यात भिजले तर ट्रेकहून परत आल्यावर व्यवस्थीत वाळवावेत अन्यथा खराब होण्याची शक्यता असते. एकदा घेतल्यानंतर यांच्याकडे अनेक वर्षे बघावे लागत नाही..

कपिलमुनी's picture

17 May 2013 - 1:07 pm | कपिलमुनी

मोदका ,
तीव्र उतारावर अँकलवाले शूजने त्रास नाही का होत ?

मला तरी झाला नाहीये अजून.

अँकलवाल्या शूजने पाय ट्विस्ट होण्याची शक्यता बरीच कमी होते.

वेल्लाभट's picture

17 May 2013 - 4:28 pm | वेल्लाभट

कपिलमुनी आणि मोदक; धन्यवाद. शोधायला हवेत हे. सध्या 'वेनब्रेनर' चे आहेत, तेही अफाट आहेत (जिथे बाकी घसरत होते तिथे मी घसरत नव्हतो, सो!)

अमोल केळकर's picture

16 May 2013 - 11:46 am | अमोल केळकर

छान माहिती. धन्यवाद :)

अमोल केळकर

हेम's picture

16 May 2013 - 6:15 pm | हेम

ट्रेक करतांना ग्लुकॉन डी अजिबात वापरु नका असा सल्ला ट्रेक करणार्‍या डोक्टर्सनी दिला होता. त्याने डिहायड्रेशन होते. जाणकार अधिक स्पष्टपणे सांगू शकतील कांय??

जातवेद's picture

16 May 2013 - 8:56 pm | जातवेद

गूगल मॅप्स, GPS वगैरे बाबींबर फारसे अवलंबून राहू नये कारण या यंत्राने, मोबाईलच्या रेंजने किंवा कनेक्टिवीटीने दगा दिला तर आपण अक्षरश: हतबल होतो.

माझ्या माहितीनुसार GPS साठी रेंज ची आवश्यकता नसते. मोबाईल ऑफ़लाईन केला तरी GPS काम करते आणि ठराविक भागाचे मॅप्स रेंज असेल तेव्हा सेव्ह करुन ठेवता येतात व नंतर हवे तेव्हा वापरता येतात.

ट्रेकला जाताना हल्ली दुर्मिळ झालेले असुस, जिपिएस असलेले फोन घेउन जावे शक्य असेल तर, किंवा बाहेरुन असुस+गार्मिन चे जिपिएस फोन घ्यावेत शक्य असेल तर. त्यातलं लोकेशन कुरियर हे आणि ट्रॅकर ही दोन उत्तम अ‍ॅप आहेत.

ढालगज भवानी's picture

16 May 2013 - 9:02 pm | ढालगज भवानी

माहीतीपूर्ण धागा आहे. आवडला.

jaypal's picture

17 May 2013 - 12:42 pm | jaypal

खंगरी प्रतीसाद. धागा वाचन खुण म्हणुन साठवला आहे.

अनिरुद्ध प's picture

17 May 2013 - 3:38 pm | अनिरुद्ध प

मोदक साहेब,
उत्तम माहिती नेहमि प्रमाणे उत्तम सादरिकरण.

बॅटमॅन साहेब,
रागावु नका हो,बराचवेळ तुमचा प्रतिसाद न मिळाल्याने तुम्हाला नावाने साद घातली,बाकी पुणेकरान बद्द्लचि खात्री प्रतिसादात दिल्याबद्दल धन्यवाद,असो नहितर अवान्तर लिहीले असे वाटल्याने धाग्याचा ईस्कोट झाला असे वाटुन आण्खी राग यायचा जर कुणाच्या भावना अनवधानाने दुखवल्या गेल्या असतिल तर क्षमस्व.

तुमच्या लेखाची वाट पहात आहे.

सुबोध खरे's picture

17 May 2013 - 11:52 pm | सुबोध खरे

साप मारणे हा वन्य प्राणी संरक्षण कायद्याखाली अजामीनपात्र गुन्हा आहे
http://www.indiansnakes.org/snake_laws_of_india.html

सुनिल५०८६'s picture

20 Jun 2013 - 6:12 pm | सुनिल५०८६

५) स्वीस नाईफ - पुण्यामध्ये मिळण्याचे ठिकाण कृपया सांगावे.

फिनीक्स मॉल - नगर रोड येथे विक्टॉरीनॉक्स (विक्ट्रियॉनीक्स) चे शोरूम आहे.

खल्लास स्विस नाईफ मिळतात!

अमर विश्वास's picture

16 Sep 2016 - 7:37 pm | अमर विश्वास

ट्रेकसाठी स्वीस नाईफपेक्षा साधा नाईफ (चाकु) जास्त उपयोगी पडतो

तसेच सह्याद्रीत फिरताना साधे बाटाचे हन्टर शुज हा उत्तम पर्याय आहे