कलाकृति मधलि एखादि व्यक्तिरेखा आपली चौकट मोडुन वाचक अथवा प्रेक्षक यांच्या मनोव्यापाराचा हिस्सा बनते तेंव्हा ती कलाकृती यशस्वी होते असे म्हणायला हरकत नाही. शेरलॉक होम्स च बेकर स्ट्रीट वरील घर बघायला अनेक पर्यटक जायचे. मध्यंतरी हॅरी पॉटर या अती लोकप्रिय मालिकेमधले Dumbeldore हे पात्र कसे 'गे' आहे हे अहमहीकेने सांगणार्या लेखांचा वरवा पाडण्यात आला होता. उल्लेखनीय बाब अशी की दस्तुर्खुद लेखिका जे.के. रोलिंग बाई नि पण या थियरी ला दुजोरा देऊन एकच खळबळ उडवून दिली. या कपोकल्पित पात्राना मानवी गुणधर्म चिकटवने हा वाचकांचा / प्रेक्षकांचा अट्टहास असतो. मध्यंतरी विशाल भारद्वाज या दिग्दर्शकाचा 'कमिने' नावाचा एक अफलातून चित्रपट आला होता. त्यातले शाहीद कपूर ने रंगवलेले चार्ली नावाचे पात्र ( त्याच्या मित्रावर त्याचे मैत्री खात्यात खूप प्रेम असते) पण सम लैंगिक आहे का अशा अर्थाच्या चर्चा इंग्लीश मीडीया मधून झाडल्या होत्या.मराठी मनावर गारुड घालणारी एक कलाकृती म्हणजे 'कोसला' आणि प्रचंड लोकप्रिय पात्र म्हणजे पांडुरंग सांगवीकर. कोसला ला तुम्ही एक तर खूप शिव्या घालू शकता किंवा त्याचे प्रचंड गोडवे गाउ शकता. कोसला आणि पांडुरंग सांगवीकर कायम या द्वेष आणि प्रेमाच्या दोन ध्रुवानमध्ये वावरले. पांडुरंग सांगवीकर हा बंडखोर की अती सामान्य इसम, कोसला ही आयुष्याच्या निरर्थकतेची कहाणी की मनोरंजक कादांबरी या वर अनेक विवाद झाडले. यात मला माझा एक मुद्दा अजुन वाढवायचा आहे. पांडुरंग सांगवीकर हा सम लैंगिक आहे का?
पांडुरंग सांगवीकर ला मुलींची Allergy असते हे कोसला वाचताना वारंवार जाणवते. कॉलेज मध्ये असताना मुली दिसल्या की पांडुरंग आपला रस्ता बदलतो. सहली ला गेल्यावर मुली पासून दूर पळण्याला प्राधान्य देतो. प्रसंग कुठलाही असो आपण मूलीना शरण जात नाही असा सार्थ अभिमान त्याला असतो. नाही म्हणायला रमि नावाची एक मुलगी त्याच्या आयुष्यात येते. पण तिला असणार्या फुफ्फुस च्या विकारामुळे निव्वळ सहानुभूती पोटी पांडुरंग तिला बोलतो . एकूणच करमणूक म्हणून पण मुली वैतागच असे पांडुरंग चे मत.
जेंव्हा पांडुरंग सर्व सोडून कायमचा सांगवी ला येऊन राहतो तेंव्हा त्याचे लग्न ठरवण्याचे दांडगे प्रयत्न होतात. एक मुलगी तर त्यांच्या घरी पण येऊन राहते काही दिवस. पण पांडुरंग इथे पण मुलीनपासून दूर पळण्याचा आपला बाणा कायम ठेवतो. पण हे काही महत्वाच नाही. पांडुरंग आणि सुरेश तांबे यांच्यात जे काही आहे ते एकदमच थोर आहे. दोघांाही एकमेकाची सोबत जाम आवडते. दोघे ही एकत्र फिरायला जात असतात. सिंहगड, वेताळ टेकडी सगळीकडे. पांडू ला सुरेश तांबे बद्दल प्रचंड जिव्हाळा आहे. पण एक विचित्र खंत पण आहे. पांडुरंग च्याच शब्दात सांगायच तर : शेवटी दोघा पुरुषाना पाहिजे तितक जवळ जवळ येता येत नाही. एकमेकात शिरता येत नाही. शरिराण सगळी गोची करून ठेवली आहे.
ना राहावून तू मुलगी असतास तर मी तुला सोडल नसत अशी स्पष्ट कबूली पांडुरंग सुरेश तांबे ला देतो. पण सुरेश कधी पांडुरंग च्या भावना समजूनच घेत नाही. तो ही मैत्री आणि आकर्षण यातली सीमारेषा कायम पाळतो. पांडुरंग ला हे लागत. त्याच्याच शब्दात सांगायच तर : हेच. सुरेश च दुसर टोक. तो नेमक्यवेळी धो धो पाणी टाकून मोकळा. रिकामी स्थिती तो पुन्हा टाकतो. त्याला रिकामा अर्थ जेमतेम दुरून दिसला होता. काठावरून. बाकी स्वताहाला त्याने कधीच झोकून दिल नाही.
पांडुरंगाची ही सुरेश बद्दलची खंत बरेच काही सांगून जाते. पण नेमाडे यांच्या लिखाणात २ + २= ४ असे असेलच असे काही नाही. नेमाडे यांचे लिखाण ज्यानी वाचले आहे त्याना हे चांगलेच माहीत आहे.नेमाडे स्वताहा पुढे येऊन पांडुरंग च्या लैंगिकतेचा खुलासा करतील ही शक्यता सूतराम नाही. त्यामुळे पांडुरंग च्या लैंगिकतेची पण अनेक perceptions आणि versions तयार होतील. पण चर्चा होणे हे नेहमीच चांगले. शेवटी चर्चा केल्याशिवाय तरणोपाय नाही. मग काय वाटत तुम्हाला? पांडुरंग सांगवीकर सम लैंगिक आहे?
पांडुरंग सांगवीकर सम लैंगिक आहे का?
गाभा:
प्रतिक्रिया
15 Jun 2013 - 5:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोसला वाचली होती पण अशा मुद्द्याचा विचार मनात कधी आला नव्हता बाकी, तुम्हाला जे सुचलं त्याला आपण मानलं. आणि समजा ते पात्र तसं आलं असतं तर काय झालं असतं ?
गावगाड्यात वावरणारा पांडुरंगाला घरातल्या वातावरणातून जगण्याचे प्रश्न महत्त्वाचे वाटले आणि त्याभोवतीच तो घुटमळतो त्याला मुली जवळच्या कशा वाटतील ?
बाकी, तुम्ही पुन्हा एकदा कोसला वाचायला लावता असे वाटले.
-दिलीप बिरुटे
15 Jun 2013 - 6:40 pm | पिंपातला उंदीर
@बिरुटे सर धन्यवाद. पण पांडुरंग सांगवीकर हा सधन सुखवस्तू घरातला. त्यामुळे जगण्याचे थेट असे कुठलेच प्रश्न त्याला नव्हते. जगण्याचे प्रश्न म्हणजे नेमके कुठले हे स्पष्ट केले तर चांगले होईल : )
15 Jun 2013 - 7:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पांडुरंग सधन शेतकर्याचा मुलगा आहे ते माहिती आहे. एका खेड्यातून शहरात शिकायला गेलेला हा मुलगा म्हणून तो गावगाड्यातून आला आहे, असे मी म्हणतो. तरुणांचे जे प्रश्न आहेत ते सर्व तरुणांचे जे प्रश्न त्यालाही सतावतात, समाजातील भंपकपणाची त्याला चीड येते हे आणि अनेक सर्व प्रश्न त्याचे जगण्यासंबंधीच्या निमित्तानंच येतात अनेक गोष्टी त्याच्याभोवती फेर धरतात लग्न, शिक्षण, अध्यात्म, असे अनेक विषय...प्रश्नच आहेत. तो समाजापासून तुटतो, दु:खी होतो, त्याला सूड घ्यावा वाटतो... हे सर्व कोसलात आहे.
पांडुरंग एका जिवाभावाच्या मित्राबरोबर मला वाटतं बोलतो म्हणून त्याला तशा अंगाने पाहणं मला काही झेपलं नाही. म्हणूनच म्हणालो की पुस्तक आणून तशा काही अर्थाने वाचावं लागतं की काय ?
मिपाकर नंदन ने 'कोसला आणि कॅचर इन द राय'वर मागे लिहिलं होतं. अगदी तपशिलवार दोन कादंबर्याची तुलना केली होती. अधिक अधिकारवाणीनं नंदनचं मत वाचायला आणि तसं काही दिसतं का तेही समजून घ्यायला आवडेल...!
अवांतर :'चिंटू'कार प्रभाकर वाडेकर कालवश :(
-दिलीप बिरुटे
15 Jun 2013 - 5:25 pm | पैसा
कोसलाचा वेगळ्या कोनातून विचार आवडला. अर्थातच एखाद्या साहित्यकृतीतून अनेक अर्थ काढता यावेत हे त्या साहित्यकृतीचं यश मानावं का याबद्दल मला जरा संभ्रम आहे, अनेक शक्यता व्यक्त करणारी कथा चांगली समजावी की सुस्पष्ट एकच अर्थ (जो कदाचित लेखकाला अभिप्रेत आहे तो) वाचकापर्यंत पोचवणारी कृती जास्त श्रेष्ठ समजावी? मुळात लेखकच असे लिहिताना संभ्रमात असेल तर?
त्या काळात समलैंगिकता ही उच्चार सुद्धा न करण्याची गोष्ट होती. हिंदी सिनेमातही नायक आणि त्याचा मित्र यातली दोस्ती अनेकदा नायिकेपेक्षा जास्त जवळची वाटेल अशा प्रकारची दाखवली जायची. शक्य आहे की सांगवीकरवर अशाच सिनेमांचा प्रभव पडलेला असू शकतो, किंवा बिरुटे सर म्हणतात तसे जगणे हीच चैन असेल तर इतर गोष्टी पार दुय्यम वाटू लागतात...
15 Jun 2013 - 6:36 pm | पिंपातला उंदीर
पैसा ताई कलाकृती मधून अनेक अर्थ निघन हा अनेक वेळा महान कलाकृतीच लक्षण मानल जात. अकिरा कुरोसावाची फिल्म राशोमान जी जगातल्या सर्वोत्कृष्ट कलाकृती मध्ये मानली जाते तिचा शेवट पण तसा ओपन एंडेड आहे. अनेक शक्यता असल्यावर अन्वयार्थ लावण्याची जबाबदारी येते ती वाचक / प्रेक्षक यांच्यावर. And that's the beauty. तुमच मत पण विचार करायला लावणार आहे पण
15 Jun 2013 - 6:50 pm | पैसा
राशोमान सारखी कलाकृती जेव्हा त्याच उद्देशाने तयार होते तेव्हा ती नि:संशय महान बनते हे नक्कीच. ते अनेकदा ती कलाकृती सादर करणार्या कलाकाराच्या क्षमतेवर अवलंबून असते. पण जेव्हा लेखकाचा स्वतःचा उद्देश तसा नसेल तर ती कलाकृती फसली असे म्हणता येईल. कदाचित लेखक स्वत:च गोंधळलेला असेल तर कलाकृती गोंधळलेली वाटेल. तरीही एखाद्या कलाकृतीमुळे रसिकाला येणारी अनुभूती माणसागणिक बदलू शकेल. ते त्या वाचणार्याच्या विचारावर आकलनशक्तीवर अवलंबून असेल. 'कोसला' च्या बाबतीत तुम्ही म्हणताय तसे स्वतः नेमाडे याबद्दल काही बोलत नाहीत तोपर्यंत आपण असे अंदाजच व्यक्त करू शकतो. त्यातले तुम्ही दिलेले अनेक उल्लेख असे गोंधळवणारे आहेत हे नक्कीच.
15 Jun 2013 - 10:19 pm | चित्रा
विचार करण्यासारखे आहे, कादंबरी परत वाचावी लागेल असे वाटते. पूर्वी वाचली होती तेव्हा मी बरीच लहान होते आणि अशी काही शक्यता ध्यानी येण्याइतकी प्रगल्भता नव्हती असे वाटते.
>>कलाकृती मधून अनेक अर्थ निघन हा अनेक वेळा महान कलाकृतीच लक्षण मानल जात.
हम्म, इंटरेस्टिंग.
21 Jun 2013 - 3:37 am | जे.जे.
दुसरे उदाहरण - शटर आयलंद नावाचा विन्ग्रजी सिनेमा, किवा झालच तर इन्सेप्शन.
15 Jun 2013 - 7:51 pm | अत्रुप्त आत्मा
15 Jun 2013 - 8:10 pm | आदूबाळ
हं.... विचारात पाडणारा प्रश्न...
पण मला नाही वाटत सांगवीकर समलैंगिक असेल असं. तुम्ही दिलेले सुरेश वगैरेचे उल्लेख बरोबर आहेत, पण आयुष्याच्या एका टप्प्यावर समलिंगाच्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणे आणि समलैंगिक "असणे" यात फरक आहे. बरं ते आकर्षण जरी सातत्याने वाटत राहिलं, तर किमान ते स्वतःशी कबूल करण्याइतका प्रांजळपणा* पांडुरंगकडे असेल असं वाटत नाही. (पण हा कदाचित मी लावलेल्या कोसलाच्या अन्वयार्थाचा परिणाम असेल.) "कमिंग आउट ऑफ द क्लोजेट" जगासाठी तर सोडाच, पण स्वतः पांडुरंगसाठी तरी होताना दिसत नाही.
अजून एक शुद्ध वैयक्तिक मतः समजा नेमाड्यांना पांडुरंगला समलैंगिक दाखवायचं असतं, तर कदाचित कादंबरी वेगळ्या वाटेने गेली असती.
*अधिक योग्य शब्द न सुचल्याने
16 Jun 2013 - 12:11 am | बॅटमॅन
+१.
कोसलात तसे दिलेले उल्लेख किती, त्यांची सूचकतेमधीलही स्पष्टता किती हे पाहिल्यास जनरलायझेशन अंमळ जास्तच वाटते.
16 Jun 2013 - 1:16 am | रमताराम
हिंदी चित्रपटवाल्या बिनडोकांनी गे' व्यक्तिमत्त्वांचा विनोद निर्मितीसाठी उपयोग सुरू केल्यापासून (अपवाद ऋतुपर्णो घोषच्या 'मेमरीज इन मार्चचा', पण इथेही पिफ्फसारख्या ठिकाणी देखील प्रेक्षकांना अस्थानी हसताना पासून पूर्वग्रह हेच बलवान असतात याचा प्रत्यय आला, पण ते असो.) किंवा तथाकथित स्वातंत्र्यवाद्यांनी स्वातंत्र्याची सांगड 'होमोफिबिया'शी घातल्यापासून जिथे तिथे या गे असण्याचे/नसण्याचे मूल्यमापन सुरू झालेले दिसते. पांडुरंग 'गे' आहे की नाही याबाबत मत व्यक्त करायचे त्याने करावे पण इथे कार्यकारणभावाची जी भयंकर गल्लत होते आहे तेवढ्याच मुद्द्याबाबत मी बोलतोय.
<<कॉलेज मध्ये असताना मुली दिसल्या की पांडुरंग आपला रस्ता बदलतो. सहली ला गेल्यावर मुली पासून दूर पळण्याला प्राधान्य देतो. प्रसंग कुठलाही असो आपण मूलीना शरण जात नाही असा सार्थ अभिमान त्याला असतो. नाही म्हणायला रमि नावाची एक मुलगी त्याच्या आयुष्यात येते. पण तिला असणार्या फुफ्फुस च्या विकारामुळे निव्वळ सहानुभूती पोटी पांडुरंग तिला बोलतो . एकूणच करमणूक म्हणून पण मुली वैतागच असे पांडुरंग चे मत.>>
यातून फारतर पांडुरंगाला स्त्रीद्वेष्टा म्हणता येईल वा त्याला फीमेल-फोबिया आहे असे म्हणता येईल. भारतासारख्या लैंगिक-दमन-संस्कृती देशात असे हजारो पांडुरंग सापडतील. तेवढ्यावरून त्याचे 'गे' असणे सिद्ध होत नाही. (उरलेले सुरेशबाबतचे विवेचन अलाहिदा). 'गे' प्रवृत्ती निर्णायकरित्या सिद्ध करण्यासाठी समलैंगिक आकर्षण सिद्ध करावे लागेल (विरुद्धलिंगी तिरस्कार पुरेसा नाही!!!)
एखाद्या साहित्यिक कृतीने, चित्रपटाने, ध्वनिमुद्रिकेने मला/समाजाला/लेखकाला काय दिले, तिचा/त्याचा त्या त्या माध्यमात परिणाम वा स्थान याची चर्चा करणे समजू शकतो. एखादे पात्र समलैंगिक आहे की नाही याची चर्चा नक्की काय साध्य करते? कदाचित धागाकर्त्याने 'समजा तो समलैंगिक असेल तर त्या कादंबरीच्या आकलनात असा असा फरक पडतो, पारंपारिक/आजवरचे आकलन असे असे उघडे पडते वा बाधित होते' हे मांडून दाखवले असते तर काही उजेड पडला असता. अन्यथा हा धागा नुसतेच निरर्थक चर्चेचे गुर्हाळ चालू केल्यास कारणीभूत होईल नि लेखकाला फारतर प्रतिसाद मोजून आपले लेखन लैच प्रतिसादांचे धनी झाले म्हणून कॉलर वर करून हिंडायला सहाय्यभूत होईल इतकेच.
या संदर्भात अन्यत्र 'डोरियन ग्रे' चा उल्लेख झाला आहे. डोरियन ग्रे ही कादंबरी माझ्या अतिशय आवडती आहे. केवळ लेखकाच्या नावावरून नि त्याच्याबद्दलच्या कथित प्रवादांवरून त्यात समलैंगिकता आहे असे म्हणावे हे थोडे अन्यायकारक आहे असा माझा समज आहे समलैंगिकतेचा आरोप (आरोपण या अर्थी, गुन्हा या अर्थी नव्हे) फक्त बेसिलच्या डोरियनबद्दलच्या भावनांबाबत करता येऊ शकतो. पण तिथेही तो फक्त डोरियनच्या चित्राबद्दल (खुद्द डोरियनबद्दल नव्हे) बोलतो आहे. 'मी या चित्रात स्वतःला फारच जास्त ओतले आहे.' असे त्याचे वाक्य आहे. कदाचित हे एखाद्या गायकाला, कलाकाराला बेसिलची भावना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल. एखादी कलाकृती जीव ओतून करावी नि प्रेक्षकांसमोर ठेवताच त्यांनी तिची निर्दयपणे चिकित्सा करावी हे अतिशय वेदनादायी असते. माझ्या मते केवळ याच भावनेतून बेसिलने डोरियनच्या चित्राला प्रदर्शनात ठेवण्यास नकार दिला आहे. या पलिकडे वैयक्तिक, भावनिक पातळीवर दोघांचे कोणतेही बंध निर्माण झालेले दिसत नाहीत. याउलट डॉ. हेन्री नि डोरियन यांच्यात एकप्रकारे मेंटॉर नि प्रोटेजी या स्वरूपाचे नाते दिसते, पण ते ही अ-भावनिक दिसते.
16 Jun 2013 - 1:40 am | चिंतामणी
भालचंद्र नेमाडे ना.
बस. नाम ही काफी है.
20 Jun 2013 - 6:50 am | स्पंदना
कादंबरी वाचली आहे.
ज्या जमान्यात (म्हणजे काळात) पांडुरंग वाढतो आहे, त्या काळात मुल अन मुली इतक्या मोकळेपणाने मिसळत नव्हते. अन मित्राबरोबर भावनिकदृष्ट्या अॅटॅच असण याला लैंगिकता म्हणन ही फार मोठी गोष्ट झाली. आम्ही देखील मैत्रीणींबरोबर बरच काही शेअर करायचो. फार जवळची वाटायची मैत्रीण तेंव्हा. ते वयच तस एकांड असत. अन त्या हार्मोनल चेंजेस मधुन जाताना, असे एकांडे कुणा एखाद्यावर असे जीव ओवाळुन टाकतात की काय सांगाव.
मला तरी कोसला वाचल्यावर मुलांच मोठ होण सुद्धा किती अवघड अन जीवघेण असत याची जाणिव झाली. तोवर पुरुष आहेत म्हणुन बरच सोप असाव जगण अस वाटायच. घरात भावांना मिळणार स्वातंत्र्य, जरा उजवी झुकते वागणुक या सगळ्यामुळे तसा विचार मनात यायचा, पण कोसलाने खरच खुप काही उलगडल.
मला तर कोठेही पांडुरंग समलैगिक नाही वाटला. उलट दोन पुरुषांना एकमेकाच्या हव तेव्हढ जवळ येता येत नाही मध्येच त्याला तश्या संबंधांची पुसटशीही कल्प्ना नाही, वा आवड नाही हेच जाणवुन देते.
शेवटी लग्न झाल की संसार अन पुढच्या सार्या गुंत्यात मैत्री हवी तितका वेळ मिळवु शकत नाही हे दर्शवणारे वाक्य तुम्ही अर्थ बदलुन इथे दिल्या सारखे वाटते आहे.
22 Jun 2013 - 5:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पांडुरंग सांगवीकराला आपल्याला अजून पुढे घेऊन जाता येतं का ?
का इथेच आभार मानायचे ?
-दिलीप बिरुटे
23 Jun 2013 - 8:32 am | पिंपातला उंदीर
मला हे वाचून २ लिखाणे आठवली .
१. साने गुरुजींच्या श्यामवर शांता गोखले ह्यांनी लिहिलेला समलिंगी-संशय घेणारा लेख.
२. करीना माझी वियाग्रा ही माझी कथा. जिच्या नायकाला उतारवयात आपण समलिंगी होतो की काय असा संशय येतो!
( ही कथा तुम्ही वाचली नसलीत आणि तुम्हाला वाचायची इच्छा असेल तर mail Id कळंवा .
मुद्दा असा आहे की समलिंगी आकर्षण हे सनातनी वातावरणात दाबून जाऊ शकते.
23 Jun 2013 - 8:33 am | पिंपातला उंदीर
माझया या ब्लॉग वर सतीश तांबे यानी चपखल प्रतिक्रिया दिली होती. त्यांचा कोसला वरचा अभ्यास दांडगा आहे. प्रतिक्रिया खाली कॉपी पेस्ट करत आहे.
मला हे वाचून २ लिखाणे आठवली .
१. साने गुरुजींच्या श्यामवर शांता गोखले ह्यांनी लिहिलेला समलिंगी-संशय घेणारा लेख.
२. करीना माझी वियाग्रा ही माझी कथा. जिच्या नायकाला उतारवयात आपण समलिंगी होतो की काय असा संशय येतो!
( ही कथा तुम्ही वाचली नसलीत आणि तुम्हाला वाचायची इच्छा असेल तर mail Id कळंवा .
मुद्दा असा आहे की समलिंगी आकर्षण हे सनातनी वातावरणात दाबून जाऊ शकते.