"ट्रेकिंग" या अनुभवावर अनेक धागे येत आहेत. अनेक जण नवनवीन किल्ल्यांना भेटी देत आहेत ही चांगली गोष्ट आहे परंतु हे धागे वाचत असताना; ट्रेकर्सचे त्या त्या ठिकाणचे अनुभव वाचत असताना "धाडस आणि अनावश्यक धोका" या दोन गोष्टींमधला फरक लक्षात न घेवून अपघाताच्या अगदी जवळ जाणार्या काही घटना वारंवार दिसल्याने हा माहितीपर धागा.
सर्वप्रथम - "मी निष्णात ट्रेकर नाही" त्यामुळे इथे दिलेले सल्ले / सूचना हे अत्यंत सामान्य परिस्थितीमध्ये लागू होण्यासारखे आहेत व माझ्या अनुभवातून आलेले आहेत. दुरूस्त्या असल्या तर जरूर सुचवा.
"लोकं ट्रेकिंग का करतात..?", "काय मिळते..?", "याचे फलीत काय..?" वगैरे प्रश्न विचारू नयेत.
उत्तर दिले जाणार नाही!! :-D
सुरूवात -
१) सर्वप्रथम आपण कोणत्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणाची व्यवस्थित माहिती घेवून / ऐतिहासीक दृष्टीने अभ्यास करून जावे. त्या ठिकाणी फिरताना या माहितीचा उपयोग होतो.
२) आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत ते ठिकाण नक्की कसे आहे याचीही माहिती घेणे आवश्यक आहे. गड / भुईकोट किल्ला / दरी / कडा वगैरे ठिकाणी भेट देताना वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य सोबत बाळगावे लागते त्यानुसार तयारी करावी.
३) ठरवलेल्या ठिकाणी आधी कोणी गेले असेल तर "सध्याची परिस्थिती काय आहे" याची माहिती जरूर घ्यावी. बहुतांश गडकिल्यांवर दर पावसानंतर पडझड होण्याची शक्यता असते. शिड्या / पायर्या / गडावर जाणारे रस्ते नाहीसे झाले असतील तर पायथ्यावरून परत यावे लागते.
४) सोबत काय साहित्य घ्यायचे ते ठरवावे. एक दिवसाचा ट्रेक असेल तर फार विचार करावा लागत नाही मात्र मुक्कामाचा ट्रेक असेल तर व्यवस्थित तयारी करावी लागते. तसेच सुरूवातीपासून शेवटपर्यंत सोबत असलेल्या बॅगा आणि बाकीच्या वस्तू सर्वांच्या पाठीवर वागव्या लागणार आहेत याची योग्य ती कल्पना सहकार्यांना असावी.
५) ट्रेकमधील सहकारी निसर्गाच्या सान्निध्यात आनंद शोधणारे असावेत.
६) प्रवासासाठी बस / सार्वजनीक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणार असल्यास वेळापत्रक 'योग्य ऑथॉरिटीकडून' व्यवस्थीत पडताळून घ्यावे. बसचे वेळापत्रक ऑनलाईन मिळाले तरी ते न चुकता जवळच्या आगारातून तपासून घ्यावे.
प्रवासासाठी खाजगी वाह्न वापरणार असल्यास व डोंगरदर्यांचा प्रवास असल्यास एकदा वाहनाचे चेकअप करून घ्यावे.
७) Plan B चा विचार करून ठेवावा व त्यानुसार तयारी करावी - या पर्यायी वेळापत्रकाबाबत ट्रेक लीड्स मध्ये एकवाक्यता असावी.
८) निघण्यापासून ते परतीच्या प्रवासापर्यंतचे वेळापत्रक (Plan B सह) ट्रेक ला न येणार्या एखाद्या व्यक्तीकडे देवून ठेवावे.
नेहमी सोबत असाव्यात अशा वस्तू -
१) उन्हापासून संरक्षण होईल अशी टोपी
२) पुरेसे पाणी
३) खाद्यपदार्थ
४) औषधे व फर्स्ट एड बॉक्स
५) स्वीस नाईफ
६) काडेपेटी - दोन ठिकाणी, किंवा लाईटर - काडेपेटी भिजून पटकन निरूपयोगी होवू शकते - लाईटरच्या बाबतीत ही शक्यता कमी असते.
७) प्लॅस्टीक पिशव्या
८) जुनी वर्तमानपत्रे
९) हळद - जंगलामध्ये फिरताना जळू चिकटल्यास हळद हा एक उत्तम उपाय आहे. आणखी एक जालीम उपाय म्हणजे तंबाखू - निकोटीनमुळेही जळू गळून पडते. परंतु हळदच ब्येष्ट!
१०) या शिवाय आपल्याला आवश्यक वाटेल ते साहित्य.
आता काही महत्वाच्या सूचना.
१) ट्रेकिंग सॅक - ट्रेकला जाताना शक्यतो ट्रेकिंग सॅक न्यावी. या सॅकमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची सेटींग असतात. या सॅकमध्ये प्रचंड प्रमाणात वजन भरता येते व हे वजन शोल्डर लोड, बॅक लोड, वेस्ट लोड असे विभागलेले असते. दुहेरी शिवण आणि मजबूत कापडामुळे या सॅक ट्रेकदरम्यान दगा देत नाहीत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सॅकच्या बॅकसाईडला व्यवस्थित कुशन असते व त्या कुशनच्या आत अॅल्युमिनीयम रॉड असतात. या रॉडना आपली पाठ व खांदे यांच्या सर्वसाधारण नैसर्गीक आकाराप्रमाणे बारीकसा बाक दिलेला असतो. हे रॉड सॅकला आधार देतात, सॅकमधील वजनाला एकाच आकारात ठेवतात व वजन सम-समान विभागण्यास मदत करतात.
सॅक पाठीवर वागवताना ती शरीराच्या शक्य तितक्या जवळ असावी, यामुळे वजन जाणवत नाही व चालताना योग्य नियंत्रण राहते. ट्रेकिंग सॅकला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्देशाने पट्टे दिलेले असतात. त्यांचा सुयोग्य वापर करावा. ही सॅक आपल्या शरिराचा एक भाग होईल अशा प्रकारे सांभाळावी.
सॅकसोबत रेन कव्हर असावे
सॅक व्यवस्थीत भरणे हा ही एक शिकण्याचा विषय आहे.
२) शूज - ट्रेकला जाताना शक्यतो ट्रेकिंग शूज अथवा सवयीचे असे मजबूत शूज असावेत. ट्रेकिंगच्या मुहूर्तावर नवीन शूज चे उद्घाटन करू नये, जर नवीन शूज व्यवस्थीत बसणारे नसतील अथवा सवयीचे नसतील तर ट्रेक दरम्यान त्यांच्यामुळे त्रास होवू शकतो.
ट्रेकमधे दगडधोंड्यांवरून चालताना पावलांजवळ तयार होणारी उष्णता + घाम यांमुळे पायाची त्वचा मऊ होते व यामुळे दुखापती / जखमा (ब्लिस्टर्स) होवू शकतात. वेळोवेळी शूज व सॉक्स काढून, घाम टिपून पायांची शक्य तितकी काळजी घ्यावी.
३) कपडे व जर्कीन - ट्रेकदरम्यान जंगलाशी एकरूप होणारे व साध्या हलक्या रंगाचे कपडे असावेत. खूप भडक कपड्यांमुळे प्राणी व पक्षी विचलीत होण्याची शक्यता असते. कपड्यांचे जादा जोड सोबत असावेत.
पावसाळ्यामध्ये ट्रेक असेल तर जर्कीन सोबत बाळगावे. शक्यतो रेनकोट टाळावा त्यातही रेनकोटची पँट. कारण एखादा काटा / टोकदार फांदीमुळे रेनकोट लगेच फाटतो. जर्कीनला जोडलेली टोपी असेल तर उत्तम. कारण मान व शर्टाची / जर्कीनची कॉलर यातून पावसाचे पाणी मार्ग काढू शकत नाही.
फुलपँट व फुल टीशर्ट असावा. थ्री फोर्थ वगैरे प्रकारांमुळे पायांचा जंगलातील वनस्पती व पर्यायाने त्यावरील जीवजंतूंशी बिनविरोध संपर्क येतो व जळवा, सुरवंट वगैरेंचा त्रास जास्ती तीव्रतेने होवू शकतो.
४) सहकारी - सहकारी शक्यतो नवीन परिस्थितीशी जुळवून घेणारे व कोणत्याही आव्हानास तोंड देणाची तयारी असणारे असावेत. किरकोळ अपघात किंवा एखाद्याचा पाय मुरगळणे, पडणे वगैरे साध्या प्रकारांमुळे ट्रेक दरम्यान विलक्षण परिस्थिती उद्भवू शकते. अशा प्रसंगानुरूप जबाबदारीने वागणारे व सर्वतोपरी मदत करणारे सहकारी असावेत.
जंगलातून चालताना चित्र विचित्र आवाज काढून प्राणी पक्ष्यांना त्रास देणे, एखाद्या पाण्याच्या टाक्यामधले पाणी विनाकारण गढूळ करणे; कचरा टाकून खराब करणे. आजूबाजूला वावरणार्या लहान प्राण्यांना त्रास देणे (उदा. खेकडे!) हे व असे प्रकार टाळावेत.
ट्रेकदरम्यान सोबत असणारे सर्वजण एकाच वयोगटातील व एकाच शारिरीक क्षमतेचे असतीलच असे नाही. अनोळखी ठिकाणी / नवीन जागी ट्रेक आखला असेल तर संपूर्ण ग्रूपने एकमेकांसोबत ट्रेक पार पाडावा. टीम मधल्या अतीउत्साही मंडळींना अशावेळी उत्साहाला आवर घालावा लागतो तसेच चालण्याचा वेगही कमी करावा लागतो. अशा वेळी काय निर्णय घ्यायचा हे संपूर्णपणे त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असते. दोन ग्रूप करून गड सर करणे सोपे वाटत असेल तरी एखाद्या प्रसंगाला तोंड द्यायची क्षमता निम्मी होते याचेही भान राखणे गरजेचे ठरते.
ट्रेकदरम्यान व्यसनांना पूर्णपणे फाटा द्यावा.
५) पाणी व खाद्यपदार्थ - ट्रेकदरम्यान सोबत पाणी आणि अन्नपदार्थांचा भरपूर साठा सोबत बाळगावा. पाणी जास्ती असेल तर परतताना वाटेतल्या झाडांना घातले तरी चालेल मात्र एखाद्या कड्यावर, गडाच्या वाटेवर पाणी संपल्यानंतर दमलेल्या अवस्थेमध्ये टाके शोधण्यामध्ये कोणताही शहाणपणा नसतो.
पाण्याच्या टाक्यामधले पाणी शुद्ध आहे का पहावे. प्लॅस्टीक पिशव्या, केरकचरा वाले पाणी रूमालाने गाळून घ्यावे व "मेडीक्लोअर-एम" या औषधाचे दोन लिटरला एक दोन थेंब टाकून पाणी वापरता येते.
टाक्यामधले पाणी बाहेर काढल्यानंतर बाकीचे पाणी गढूळ करू नये.
ट्रेकदरम्यान सोबत्यांना किंवा अगदी अनोळखी ट्रेकर्सना पाण्याची गरज लागेल या हिशेबानेही सोबत पाणी बाळगावे आणि अशा ठिकाणी पाणी देताना विचार करू नये - अगदी पाणी न बाळगण्यामध्ये त्या लोकांची चूक असली तरी त्या ठिकाणी तत्वांना चिकटून निर्णय घेवू नयेत.
६) निसर्ग - निसर्गाच्या ताकदीला कमी लेखू नये - कधीही!!
धबधबा, कडे, पाण्याचे साठे, विहीर अशा ठिकाणी जपून वावरावे. "विनाकारण धोका पत्करण्याची गरज आहे का..?" हा प्रश्न स्वतःला विचारावा.
Mountains have their ways of dealing with overconfidence. हे विसरू नये!
पाऊस, ओले गवत, कडे, भर्राट वारा, धबधबा, धुके, मोठमोठाले दगड व त्यांवरून केलेली चढउतार या गोष्टी आनंददायी असतात परंतु एखादा छोटासा अपघात, पाय मुरगळणे, दगडावर हात पाय आपटून जायबंदी होणे या कांही क्षणात घडणार्या गोष्टी असतात. पाऊस पाणी वगैरे सगळ्या आनंददायी गोष्टी एखादा अपघात होईपर्यंत चान चान वाटतात परंतु अपघातानंतर त्या व्यक्तीला सांभाळत गडावरून खाली उतरणे प्रचंड कठीण काम असते.
७) प्राणी / पक्षी - आपण ट्रेक करताना प्राणीपक्ष्यांच्या अधिवासातून जात असतो. आपला वावर / मुक्काम त्यांच्यासाठी त्रासदायक होणार नाही याची काळजी घ्यावी. साप, खेकडे, विंचू वगैरे प्राणी विपुल प्रमाणार आढळतात. त्यांच्या क्षेत्रात विनाकारण ढवळाढवळ करू नये. साप दिसला की खडे मारणे, काठीने ढोसणे वगैरे प्रकार कोणत्याही परिस्थितीमध्ये करू नयेत. सापाचा एखादा दंश, विंचू खेकड्याने घेतलेला चावा खूप महाग पडू शकतो.
८) अन्न शिजवताना - ट्रेकदरम्यान अन्न शिजवताना चूल पेटवायची असल्यास अत्यंत काळजीपूर्वक हवे तितकेच वाळलेले लाकूड / फांद्या तोडाव्यात - हे ही टाळता येणे शक्य असेल तर टाळावे.
स्वयंपाक झाल्यानंतर चूल व्यवस्थीत विझवावी. राहिलेले लाकूड / जळण एखाद्या छ्ताखाली / गुहेमध्ये ठेवावे ज्यायोगे नंतर येणार्या ट्रेकर्सना त्याचा वापर करता यावा.
चूल पेटवणे टाळण्यासाठी सोबत रॉकेलचा छोटासा स्टोव्ह बाळगावा - प्रवासादरम्यान त्यातले रॉकेल बाटलीत काढावे कारण रॉकेलने भरलेला स्टोव्ह हिंदकळून रॉकेल बाहेर येते व वाया जाते.
गॅसच्या छोट्या शेगड्या मिळतात - हा सर्वोत्तम उपाय, मात्र या शेगड्या वजनाने थोड्या जड असतात.
अनेक ठिकाणी / देवळांमध्ये / गुहेमध्ये स्वयंपाकासाठी भांडी ठेवलेली असतात. यांचा आपल्याआधी वापर कधी केला गेला असेल याची कल्पना नसतेच त्यामुळे ही भांडी स्वच्छ धुवून घ्यावीत व आपल्या स्वयंपाकानंतर तितकीच स्वच्छ करून ठेवावीत.
अनोळखी वनस्पती, झाडांची मुळे यांचा अन्नाशी संपर्क येवू देवू नये. (दातपाडीची कथा सर्वांना माहिती असेलच! ;-))
स्थानीक नियम / श्रद्धांना धक्का पोहोचवू नये. गावकर्यांशी सौदार्हपूर्ण संबंध ठेवावेत. ऐनवेळी कांही झाले तर हेच लोक आपल्या मदतीला येणार आहेत याची जाणीव ठेवावी.
आपण सर्वसाधारणपणे ६ / ७ जण ट्रेकला जातो. एखाद्या आडगावामध्ये जाताना तिथल्या ग्रामस्थांसाठी उपयोगी असे काहीतरी घेवून जावे. ६ / ७ जणांमध्ये प्रत्येकी १५ / २० रूपये जमा केले तरी त्या रकमेमध्ये क्रोसीन सारखी डोकेदुखीवरची औषधे, डेटॉल, कापूस वगैरे प्रथमोपचाराचे साहित्य येवू शकते. अगदी तिथल्या लहान मुलांसाठी बिस्कीटचे पुडे नेले तरी त्यांना त्यामध्ये आनंद वाटू शकतो.
आपण घरगुती व्यवस्थेमध्ये जेवण करणार असल्यास काही गोष्टी "अॅडजेस्ट" करण्याची तयारी असावी. आपल्या घरामध्ये आपण अनेकदा अनेक गोष्टी "अॅडजेस्ट" करतोच. एखादे हॉटेल व रिसॉर्ट असेल तर त्याची गोष्ट वेगळी मात्र खेड्यापाड्यांमधील लोकांना अनेक गोष्टींसाठी लांब अंतर चालत किंवा दिवसातून एक दोनदा येणार्या बसवर अवलंबून रहावे लागते याची जाणीव ठेवावी.
९) पायवाटा व नकाशे - होकायंत्र व नकाशे सोबत असावेत. आपण जाताना एखाद्या खुणेच्या आधाराने स्टार्टिंग पॉईंट व मार्ग बघून ठेवावा. गूगल मॅप्स, GPS वगैरे बाबींबर फारसे अवलंबून राहू नये कारण या यंत्राने, मोबाईलच्या रेंजने किंवा कनेक्टिवीटीने दगा दिला तर आपण अक्षरश: हतबल होतो.
समजा रस्ता चुकला आणि मोबाईलला रेंज जरी असेल तरी "आपण कुठे आहोत" हे कोणत्या आधारावर सांगणार..?
गड किल्ल्यांवर पायवाटा तयार झालेल्या असतात. शक्यतो त्यावरूनच जावे. विनाकारण वेगळे मार्ग वापरणे, कड्यावरून उतरताना नवीन ठिकाणाहून उतरणे वगैरे प्रकार करू नयेत. कडे उतरताना कोणत्याही परिस्थितीमध्ये ओढण्या, कच्ची दोरी वगैरेंचा वापर करू नये.
अनोळखी ठिकाणी पायवाटा व गुरांच्या वाटांमध्ये गोंधळ होवून रस्ता चुकू शकतो. त्याची काळजी घ्यावी.
रस्ता चुकल्यावर ग्रूपमध्ये रहावे. रस्ते शोधण्यासाठी सर्वांनी सर्व दिशेला जाण्यापेक्षा अनुभवी लोकांनी दोन तीनच्या ग्रूपने बाहेर पडावे. समजा ग्रूपमध्ये दोनच अनुभवी लोक असतील तर एकाने रस्ता शोधण्यासाठी व एकाने संपूर्ण ग्रूपसोबत रहावे. सहकार्यांचा आत्मविश्वास हरवू देवू नये.
जंगलातून वावरताना कोणत्याही परिस्थितीमध्ये कचरा व प्लॅस्टीक फेकू नये. खास कचर्यासाठी एक मोठी पिशवी सोबत बाळगावी. तसेच चालता चालता दिसणारा व सहज हाताशी येणारा कचराही गोळा करावा.
ट्रेकदरम्यान प्रातर्विधी आवरताना पाण्याचे साठे दुषीत होवू देवू नयेत. शौचास जाताना शक्यतो वाहत्या पाण्यापासून लांब व शक्य असेल तर एखादा खड्डा करून पाणी प्रदुषीत होणार नाही याची काळजी घ्यावी.
**********************************************************
There have been joys; too great to be described in words, and there have been griefs upon which I have not dared to dwell, and with these in mind I say, climb if you will, but remember that courage and strength are naught without prudence, and that a momentary negligence may destroy the happiness of a lifetime. Do nothing in haste, look well to each step, and from the beginning think what may be the end.
— Edward Whymper.
**********************************************************
हा धागा इंटरॅक्टीव्ह स्वरूपाचा असावा अशी अपेक्षा आहे. नवीन सूचनांचे स्वागत आहे!
**********************************************************
प्रतिक्रिया
13 May 2013 - 11:39 pm | मोदक
अमोल - जातीवंत भटका, झेलेश, वल्ली - भर घाला रे काही विसरलो असलो तर!
14 May 2013 - 12:04 am | कवितानागेश
ग्लुकॉन-डी. :)
14 May 2013 - 1:44 am | प्यारे१
एवढ्या सूचना????
ट्रेकच्या लांबीपेक्षा मोठा झाला हा सूचनाफलक. ;)
14 May 2013 - 2:30 am | मोदक
शक्य तितक्या सूचना दिल्या आहेत. ज्याला ज्या घ्याव्याश्या वाटतील त्या घ्याव्यात! :-)
14 May 2013 - 5:13 am | स्पंदना
मला तरी आण्खी काही सुचत नाही. तसही ट्रेकला जाउन आता दहा वर्ष होतील.
मस्क्युटो रिपेलन्ट सुचवेन मी.
अन मधाच्या पोळ्यांपासुन दुर रहायला पण सुचवेन.
उतरणीवर बर्याचदा बारीक मुरुमासारखी खडी असते ज्यावरुन तुम्ही सहजा सहजी घसरु शकता, अश्या ठिकाणी जी काळजी घ्यायची त्याबद्दल माहिती द्यायची र्हायली आहे.
आजकाल बर्याच ठिकाणी बिबटे दिसतात, त्याबद्द्लच्या सुचना.
बरोबर मुली अथवा स्त्रीया असतील तर घ्यायची काळजी.
14 May 2013 - 5:33 pm | टवाळ कार्टा
बरोबर मुली अथवा स्त्रीया असतील तर घ्यायची "काळजी".
=)) =)) =))
14 May 2013 - 6:23 am | श्रीरंग_जोशी
हौशी भटक्यांसाठी वरील माहिती अत्यंत मौल्यवान आहे.
काही वर्षांपूर्वी विसापूरहून परतताना वाट चुकून अन धोधो पावसात भिजून जी वाट लागली होती त्यावरून या माहितीचे मूल्य मी चांगलेच जाणून आहे.
14 May 2013 - 7:03 am | वेल्लाभट
अतिशय उत्तम मोदक साहेब. खूप चांगली आणि उपयोगाची माहिती. पुढे ट्रेकिंगला जाताना नक्कीच याचा फायदा होईल. आजच आमच्या मित्रांसोबत शेअर करतो हा धागा.
थँक्स !
14 May 2013 - 8:29 am | स्पा
चान चान
14 May 2013 - 9:05 am | यशोधरा
'दखल' मध्ये यावा असा झकास लेख.
14 May 2013 - 9:06 am | शैलेन्द्र
मस्त धागा मोदकराव..
काही गोष्टी नक्की जवळ बाळगाव्यात - जसे ओडोमॉस- स्लिपींग बॅग/मॅट (चादरींचा पसारा नको), दोरखंड, कोयता/मजबुत चाकु, पेन किलर..
एखाद्या गडावर जाताना, बर्याचदा खालच्या गावातुन एखादा कुत्रा सोबतीला येतो.. त्याला येवु द्याव.. गावात जर तुम्ही न्याहारी करत असाल, किंवा एखाद्या घरात चहा घेत असाल तर त्यांना आपला ट्रेकचा प्लॅन सांगावा. मुद्दाम संभाषण वाढवून माहिती घ्यावी. पावसाळ्यात विजा चमकत असताना, झाडाखाली उभे राहू नये. लाकडाचा मोठा ओंडका, दगड ओलांडताना आधी त्यावर चढून मग पलीकडे पाय टाकावा. गंमत म्हणून कोणतीही फळ तोंडात टाकू नये. गडवाटेने खालीवर जाणार्या गावकर्यांशी मुद्दाम संवाद साधावा.. माहिती घ्यावी. प्यायचे पाणी कुठे- किती लांब आहे ते विचारावे.
खाद्य पदार्थ शक्यतो सुके असावे, ते झिप्लॉक्च्या पिशव्यांत बंद करुन वर न्यावे. पेपर प्लेट वापराव्या. एक रिकामी पिशवी खास कचरा गोळा करायला न्यावी.
सध्या इतकेच..
14 May 2013 - 10:47 am | शिल्पा ब
+१
तसेच फळं बरोबर घ्यावीत अन तेलकट , तिखट पदार्थ जसे की चिप्स, शेव इ. टाळावेत.
14 May 2013 - 9:11 am | श्रीरंग_जोशी
फोटो जालावरून साभार असे लिहिले नसल्याने फोटो कदाचित मोदक यांचा असावा अशी शंका आहे.
14 May 2013 - 10:25 am | मोदक
माझा फोटो नाहीये तो.
जालावरून साभार आहे.
14 May 2013 - 9:11 am | प्रचेतस
उत्तम माहिती रे.
उन्हाळ्यात शक्यतो ट्रेक टाळावेत (बागलाणातील तर अजिबात करूच नयेत).
आपल्या गरजेपेक्षा दिडपट पाणी नेहमीच बरोबर असू द्यावे.
एक प्रसिद्ध वाक्य उद्धृत करावेसे वाटते
सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका.
पाऊलखुणांशिवाय काही ठेवू नका
Take nothing but memories, leave nothing but footprints!
14 May 2013 - 9:42 am | सुज्ञ माणुस
निसर्गाच्या ताकदीला कमी लेखू नये - कधीही!! >>> हे अगदी खरे :)
ट्रेकमधील सहकारी निसर्गाच्या सान्निध्यात आनंद शोधणारे असावेत.>>> हे जास्त महत्वाचे आहे.
"लोकं ट्रेकिंग का करतात..?", "काय मिळते..?", "याचे फलीत काय..?" वगैरे प्रश्न विचारू नयेत.
उत्तर दिले जाणार नाही!! >>>>>>> तुफान रे :)
14 May 2013 - 10:24 am | अत्रुप्त आत्मा
जबरदस्त माहिती पूर्ण आणी उपयुक्त धागा :-)
@आजूबाजूला वावरणार्या लहान प्राण्यांना त्रास देणे (उदा. खेकडे!)हे व असे प्रकार टाळावेत. >>> =))
14 May 2013 - 10:25 am | डॉ सुहास म्हात्रे
आंधळेपणाने धाडस न करता या लेखात दिलेल्या माहितीचा उपयोग करून डोळसपणे ट्रेक केला तर...
"सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका.
हे खरे होईल.पाऊलखुणांशिवाय काही ठेवू नका" ---इति वल्ली
14 May 2013 - 10:33 am | विश्वनाथ मेहेंदळे
म्या पामराची सूचना अनेक महिन्यांनी का होईना मनावर घेतलीस आणि हा लेख लिहिलास त्या बद्दल धन्यवाद :-)
१-२ सूचना वाचून नुकतेच केलेले काही ट्रेक आठवले आणि अगदी म्हणजे अगदी गहिवरून आले आहे.
लेख उत्तम, वाचनखूण साठवण्याजोगा. बरीच मेहनत घेऊन लिहिला आहेस.
14 May 2013 - 10:36 am | सौंदाळा
मोडक्या स्टोव्ह पिन आणल्यामुळे हरिश्चन्द्र गडावर एका मित्राला बुकलून काढले होते.
सुदैवाने कही वेळाने स्टोव्ह पिन एका ग्रुपकडुन मिळली. तोपर्यन्त भूकेने जीव जायची पाळी आली होती.
नंतर ट्रेक संपेपर्यंत तो मित्र गिर्हाइक झाला होता हे सांगणे न लगे.
रात्रीचा ट्रेक असेल तर ग्रुपमधल्या किमान एकाने तरी आधी केलेला असावा. या ट्रेकसाठी प्रत्येकाकडे चांगली विजेरी मस्ट. भरपेट जेवण, नशापान केलेले नसावे.
टरकू, फट्टू लोक ट्रेक मध्ये घेवू नयेत. बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी त्यांची मनधरणी करण्यात वेळ जातो.
एकदा वेळा अशा मित्रामुळे यशस्वी चढाईऐवजी यशस्वी माघार घ्यायला लागली होती.(तीदेखील शिवनेरीला साखळदंडाच्या मार्गाने)
अशांना आधी सिंहगड, हडसर, पुरंदर अशा छोट्या ट्रेक्सना नेऊन ट्रेकाळवावे.
14 May 2013 - 12:18 pm | वेल्लाभट
मनधरणी करण्यात वेळ जातो हे खरं आहे राव... त्याचा थोडाफार त्रासही होतो.
पण आलाच असा एखाद दुसरा हौशीने तर त्याला नेतो मग आम्ही. मोटिवेट करून, चियर करून नेतो. ट्रेक पूर्ण केल्यावर ती व्यक्ती खूश झाली तर त्यात आपल्यालाच आनंद मिळतो. नाहीच झाली तर राहिलं....
14 May 2013 - 3:24 pm | चावटमेला
+१००००००
ह्याशिवाय, जरूरीपेक्षा जास्त निरुत्साही, उदासीन अशा लोकांना उगाचच आग्रह करून घेवून जावू नये. अशा लोकांमुळे कधी कधी सगळ्या ग्रुप चा विचका होवू शकतो
14 May 2013 - 10:57 am | nishant
माहिती पूर्ण आणी उपयुक्त धागा :)
14 May 2013 - 11:07 am | जातीवंत भटका
सगळ्या महत्त्वाच्या बाबी अधोरेखीत झाल्या आहेतच.
माझे २ पैसे !
रात्री मुक्काम उघड्यावर किंवा जंगलात असेल तर सुरक्षित अंतरावर शेकोटी असावी (अर्थातच आग पसरणार नाही याची काळजी घेऊन)
शक्यतो रात्री कोणत्याही कारणास्तव बाहेर पडावयाचे झाल्यास एकट्याने जाऊ नये सोबतीस कोणीतरी असावे.
जंगलातील किंवा डोंगरातील वाटचालीमधे "हेडर" आणि "टेल- एन्डर" असावेत. साधारण एकाद्या अनुभवी सदस्याने हेडरचे (वाटचालीमधे सर्वात अग्रस्थानी) काम करावे. यामधे योग्य वाटेची निवड, सावधगिरीचे इशारे इत्यादी गोष्टी समाविष्ठ होतात.
टेल-एन्डर वाटचालीत सगळ्यात शेवटच्या स्थानावर असावा. मागे कुणी रहाणार नाही, वाटेत कुणी थांबल्यास/थकल्यास हेडरला कळवणे इत्यादी जबाबदारी याची.
14 May 2013 - 11:18 am | सस्नेह
संपूर्ण लेख काळजीपूर्वक (?) वाचल्यानंतर ट्रेक करणे ही साक्षेपाने संसार करण्याइतकीच अनवट गोष्ट आहे हे पटले...
14 May 2013 - 11:21 am | मोदक
छ्या.. लावलीस आग..????
आता ५० राव येतील "सिलेंडर" घेवून - आगीत भर घालायला. :-D
14 May 2013 - 2:48 pm | सूड
काही दिवसांनी मोदक 'संसार करताना' असा धागा काढणाराय का?
14 May 2013 - 3:09 pm | प्यारे१
लग्नानंतर मोदक धागाच काय मिपावर देखील वेळ काढेल (काढू शकेल असं म्हणत नाहीये) असं वाटत नाही.
बडा करमठ लडका है! जो काम करता है दिलसे करता है.
(युपी वाल्या एखाद्याला भेटून 'करमठ' चा अर्थ विचारावा. ;) )
14 May 2013 - 11:20 am | इरसाल
ग डांवरील गवतामधे विंचु, साप किंवा तत्सम विषारी प्राणी यांच्या चाव्यावर तात्पुरता उपाय म्हणुन स्नेक बाईट लॅन्सेट जवळ बाळगावे. शक्यतो फर्स्टएड बॉक्स मधे हे असते.
14 May 2013 - 11:37 am | मोदक
धन्यवाद इरसालबुवा.
या निमीत्ताने स्नेकबाईट व त्यावेळी घ्यायची काळजी यांवर डॉ.खरे, बाबा पाटील व इस्पीक एक्का या तज्ञांकडून माहिती मिळाली तर आनंद आहे.
मला असलेली माहिती.
भारतात सापांच्या विषारी जाती प्रमाणात आहेत. बिग फोर ग्रूप - नाग, मण्यार, फुरसे आणि घोणस(?)
साप चावल्यानंतर शांत रहावे. टेन्शन घेतल्याने, शरीराचे जास्ती चलनवलन केल्याने हृदयाची गती वाढते व विषयुक्त रक्त शरीराच्या इतर भागांमध्ये लवकर पोहोचते. (हे "शांत रहावे" वगैरे लिहायला ठीक आहे - परंतु त्यावेळी काय परिस्थीती असेल देव जाणे!)
साप चावलेल्या ठिकाणाहून हृदयाकडे जाणार्या दिशेवर घट्ट पट्टी बांधावी - रक्ताचा हृदयाकडे जाणारा फ्लो कमी होतो.
रक्त शोषून बाहेर थुंकणे हा तद्दन फिल्मी प्रकार आहे.
खालच्या दोन गोष्टींबाबत तज्ञांमध्ये मतभेद आहेत.
१) साप चावलेली जखम धुणे - एक वर्ग म्हणतो, जखम धुवावी त्यामुळे इन्फेक्शन वाढत नाही तर दुसरा वर्ग म्हणतो जखम धुवू नये कारण जखमेच्या आजूबाजूस; त्वचेवर विषाचे अंश शिल्लक असतील तर डॉक्टरांना विषाचे निदान करून त्यानुसार अँटीव्हेनम देता येईल.
२) साप चावलेल्या ठिकाणी आणखी मोठी जखम करून रक्त (विषयुक्त?)शरीराबाहेर जावू देणे - याबाबतीत एक वर्ग म्हणतो की हे केल्याने फारसा फरक पडत नाही उलट ट्रॉमा होवून रक्ताचा अनावश्यक र्हास होतो.
दुसरा वर्ग म्हणतो यामुळे विषयुक्त रक्त हृदयाकडे न जाता जखमेतून बाहेर पडते व विषाचा प्रभाव कमी होतो.
तज्ञांच्या मतांच्या प्रतिक्षेत!
************************
मिपाकरांना एक प्रश्न - समजा सापाचे विष आपण पाण्यासारखे घटाघटा पिले तर काय होईल..?
(मला उत्तर माहिती आहे!)
14 May 2013 - 11:45 am | सौंदाळा
उत्तर: तोंडाला कोंबड्या लावायला लागतील :):):)
कृ्.ह.घ्या.
14 May 2013 - 11:56 am | आदूबाळ
ओजस चौधरी हे मिपाचे स्तब्ध-सदस्य निष्णात सर्पमित्र आहेत. त्यांनी या विषयावर प्रकाश टाकला तर उत्तम होईल.
@मोदक: सापाचे विष घटाघटा पिऊन काहीही होत नाही - असं कुठेतरी ऐकल्याचं वाटतंय.
14 May 2013 - 12:13 pm | इनिगोय
सापाचे विष पाण्यासारखे प्यायले तर ते पचते आणि शरीराला अपाय होत नाही. मात्र तोंडाच्या आत जखमा असता कामा नयेत. विष रक्तात भिनले तरच ते धोकादायक असते. बरोबर का हो?
साप चावल्याची जखम धुवू नये, हे जास्त लॉजिकल वाटते, कारण विष मुख्यतः रक्तातून शरीरात पसरते, त्यामुळे त्वचा धुवून फारसा उपयोग होईल असे वाटत नाही. मात्र ही पूर्णतः ऐकीव माहिती आहे.
14 May 2013 - 12:21 pm | मोदक
सापाचे विष पाण्यासारखे प्यायले तर शरीराला अपाय होत नाही
आदूबाळ आणि इनिगोय - बरोबर.
"आपल्या पोटामध्ये असलेली जहाल अॅसीड्स त्या विषाला त्वरीत नमोहरम करतात" असे मी वाचले आहे.
14 May 2013 - 12:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
सापाचे विष म्हणजे काही (साधारण २०) प्रकारचे प्रोटीन्स आणि प्रोटीन्सचे उपघटक (पॉलिपेप्टाईडस्) असतात.
मात्र तसे व्रण नसल्यास जेवणातील इतर प्रोटीन्सप्रमाणेच विषाचे "अमायनोअॅसिडस्" मधे पचन / विघटन होउन ती रक्तात शोषली जातात आणि विषबाधा होत नाही.
जर तोंडात, जठरात अथवा छोट्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागात व्रण असला तर विष मूळ रुपांत रक्तात शोषले जाउन विषबाधा होउ शकते.
धोक्याची सुचना: विषबाधा होण्यासाठी व्रण अगदी क्षुल्लक (मायक्रोस्कोपीक) असला तरी पुरे असतो... कारण अतीविषारी सापांचे ३०-४० मिलीग्रॅम किंवा कमी (व्यक्तीच्या वजनाप्रमाणे) विष प्राणघातक असते, तेव्हा:
" गंम्मत अथवा धाडस म्हणून विषाची परीक्षा करू नये."
14 May 2013 - 12:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
वरच्या प्रतिसादातील वाक्यांचा क्रम जरा उलटासुलटा झाला आहे... तो प्रतिसाद खालीलप्रमाणे आहे...
सापाचे विष म्हणजे काही (साधारण २०) प्रकारचे प्रोटीन्स आणि प्रोटीन्सचे उपघटक (पॉलिपेप्टाईडस्) असतात.
जर तोंडात, जठरात अथवा छोट्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागात व्रण असला तर विष मूळ रुपांत रक्तात शोषले जाउन विषबाधा होउ शकते.
मात्र तसे व्रण नसल्यास जेवणातील इतर प्रोटीन्सप्रमाणेच विषाचे "अमायनोअॅसिडस्" मधे पचन / विघटन होउन ती रक्तात शोषली जातात आणि विषबाधा होत नाही.
धोक्याची सुचना: विषबाधा होण्यासाठी व्रण अगदी क्षुल्लक (मायक्रोस्कोपीक) असला तरी पुरे असतो... कारण अतीविषारी सापांचे ३०-४० मिलीग्रॅम किंवा कमी (व्यक्तीच्या वजनाप्रमाणे) विष प्राणघातक असते, तेव्हा:
" गंम्मत अथवा धाडस म्हणून विषाची परीक्षा करू नये."
14 May 2013 - 1:04 pm | मोदक
धन्यवाद.
आता विषय निघाला आहे म्हणून..
अँटीव्हेनम कसे तयार करतात..? सापाच्या विषापासूनच अँटीव्हेनम तयार करतात असे वाचले आहे.
तसेच सापाचे विष आणि विंचवाचे विष शरीरावर एकदम विरूद्ध परिणाम करते. (उदा. विंचवाच्या विषामुळे रक्तातली इन्शुलीनची पातळी घसरते व हायपर ग्लायसेमीया - बहुदा साखरेचे प्रमाण अतीजास्त वाढणे होते, सापाच्या विषामुळे पांढर्या पेशींवर परिणाम होतो)
अशावेळी अँटीव्हेनम "संपूर्णपणे" वेगळे वेगळे असते का..? की काही कॉमन अँटीव्हेनम असते?
14 May 2013 - 1:21 pm | बॅटमॅन
अँटीव्हेनम सापाच्या विषापासून तयार करतात. सापाचे विष काढण्याची प्रोसेस कधीकाळी जवळून पाहिलेली आहे. एका सळीला एक भांडे बांधलेले असते आणि त्याच्या तोंडावर फडके असते. सापाला त्याच्या पेटीतून बाहेर काढतात, त्याचे तोंड दाबून हातात पकडतात. मग साप चिडतो आणि दिसेल त्या वस्तूला चावू पाहतो. त्याच्यासमोर ते भांडे आणले की मग तो चावतो. त्याच्या दाताजवळील ग्रंथींतून असे टपोरे थेंब गळतात- पिवळसर रंगाचे. ते विष कलेक्ट करून मग त्यापासून अँटीव्हेनम बनवले जाते. आणि विष कलेक्ट करण्यात अमुक एका जातीच्याच सापांचे विष घ्यायचे असेही काही तेव्हा दिसले नाही. फुरसे-घोणस अन इतर काही जातींच्या सापांचे विष एकाच भांड्यात जमवलेले पाहिले होते. तेव्हा मजा म्हणून सापाच्या पोटाला हात लावला होता. लै गार अन मऊ, किळसवाणेपणाचे जबरी पोटेन्शिअल असलेला स्पर्श होता.
ते विष घेऊन त्याचा डायल्यूट केलेला डोस घोड्यांना टोचून त्यांचे रक्त काढले जाते आणि त्या रक्ताचा अॅनॅलिसिस करून मग त्यातील विशिष्ट अँटिबॉडीज वापरून अँटिव्हेनम बनवले जाते. हेही पाहिलेय. घोड्याला असे उभे करून रक्त काढले जाते आणि ते मोठमोठ्या बरण्यांमध्ये साठवले जाते. एखाद्या १० बाय १० किंवा त्यापेक्षा बर्याच मोठ्या खोलीच्या आकाराचा फ्रीज असतो त्यात त्या बरण्या हारीने मांडलेल्या पाहिल्या आहेत.
विंचवाचे माहिती नाही, पण सापांप्रमाणे विंचूही बाळगलेले पाहिले आहेत, तस्मात त्या अँटीव्हेनमची मेथड तीच असते.
14 May 2013 - 1:23 pm | बॅटमॅन
*मेथड तीच असते ऐवजी तीच असावी असे वाचावे.
14 May 2013 - 1:25 pm | भटक्य आणि उनाड
marathi typing jamat naslyane eng madhe saangat ahe..
anti venom is made from horse blood. only horse's blood can resist venom of snake or small quantity of venom is injected to horse and slowly dose in incereased. after specific time when antibodies are made by horse blood then that blood is extracted and dehydrated and powder form anti venom is ready. while injecting only water is mixed with powder and injection is given as per requirement.
If someone is bit by non venomous snake and if u give him anti venom then it acts as venom on human body and he/she may die.
The medicine which we give for scorpion bite id vaso-dilater Prazocine.
14 May 2013 - 1:32 pm | मोदक
If someone is bit by non venomous snake and if u give him anti venom then it acts as venom on human body and he/she may die.
यावर अधिक माहिती असेल तर कृपया द्यावी.
मराठीकरण करणे / मराठी टाईपिंग शक्य नाही म्हणून माहिती देण्याचे थांबवू नये ही विनंती. तुम्हाला जमेल तशी आणि जमेल त्या स्वरूपात माहिती दिली तरी चालेल.
The medicine which we give for scorpion bite id vaso-dilater Prazocine.
बरोबर. महाडच्या डॉ. हिम्मतराव बावस्करांनी याचा शोध लावला, याबद्दल त्यांचे लेख लॅन्सेटमध्येही छापून आले आहेत.
14 May 2013 - 8:10 pm | भटक्य आणि उनाड
As of today there is no case registered that a human was given anti venom when it was not required and he/she died. Normally 100cc(initial dose)of anti venom do no harm human body. But if someone is bit by venomous snake then side effects of that are big headache.(Diet restrictions for may be 6-8 months etc)
Prevention is better than cure..always..
More info in available on wikipedia.. http://en.wikipedia.org/wiki/Antivenom
http://en.wikipedia.org/wiki/Snake_venom
14 May 2013 - 11:19 pm | ojas
मी काही सर्पतज्ञ नाही, फक्त मी सर्पोद्यान बरोबर (५ वर्ष) काम केले आहे आणि पुण्यात लोकांच्या घरी जाऊन साप पकडले आहेत.तसेच काही पुण्यातले सर्प दंशाने झालेले मृत्यू पण पहिले आहेत (आणि काही वाचवले पण आहेत).
साप चावल्या वर फक्त दाब पट्टी बांधून त्या व्यक्तीला आडवे झोपवावे. (त्याची हालचाल मर्यादित ठेवावी)नंतर त्याला ताबडतोप सरकारी दवाखान्यात 'हलवावे' (हा शब्द महत्वाचा आहे, टेबल उचलून हलवतो तसे)तसेच सरकारी दवाखाना कारण तिकडे अनुभवी डॉक्टर असतात. सर्पदंशाच्या उपचाराला अनुभवी डॉक्टर लागतो तो फक्त सरकारी दवाखान्यात असू शकतो कारण भारतातले सर्पदंश जास्त खेड्यात किंवा शेतात होतात. म्हणून शेतकरी नेहमी सरकारी दवाखान्यात जातात.(सरकारी दवाखान्यात उपचार स्वत असतो: मण्यार चावल्यावर private दवाखान्याचा फक्त प्रतीविषाचा(antivenom) चा खर्च ५०००० ते ६०००० पर्यंत गेलेला मी पहिला आहे आणि तो माणूस वाचला पण नाही)
१) जखम धुण्यात वेळ घालवू नये कारण खूप वेळा जखम हि मोठी नसते, साप फक्त दात लावून जातो (दाढी करताना किवा भाजी कापताना जी जखम होते तेवढी). काही पुस्तकामध्ये विषारी सापाच्या दातांचे व्रण दिलेले असतात, तशी जखम व्हायचे प्रमाण खूप कमी असते.
त्वचेवरचे विष बघून ओळखणे खूप कठीण आहे कारण विषाला अगदी थोडा पिवळा रंग असतो. डॉक्टर नेहमी रोग्यावरून ठरवतो की कुठल्या सापावरचे प्रतिविष द्यायचे(हे खूप वेळा खूप अवघड असते, त्या साठी मी लिहिले तसा अनुभवी डॉक्टर लागतो)
म्हणून जखम धुण्यापेक्षा चावलेला साप कुठला आहे ते आजूबाजूला बघायचा प्रयत्न करा.
२)सर्पदंशाच्या जखमेवर कधी पण ब्लेड मारू नये (लोकं ब्लेड मारताना मी पहिले आहे). चुकून नस कापली जावून जास्त रक्तस्त्राव व्हायची शक्यता असते. समजा तसे झाले तर रक्तस्त्रावामुळे ग्लानी येऊ शकते किंवा मृत्यू पण येऊ शकतो.काही बाबतीत मी असे ऐकले आहे कि खराब ब्लेडमुळे जखम सडून गेली आणि डॉक्टर ला प्रतिविष द्यायला त्रास झाला. विष शरीराबाहेर पडू शकत नाही कारण ते खूप लवकर शरीरात पसरते (१०^-९ सेकंदात). सर्पदंशाचे उपचार सोपे नसतात (animal-planet किंवा discovery सारखे ) आणि माणूस वाचल्यावरसुद्धा जखमेमध्ये बाधा होऊन कधी कधी अवयव कापून टाकावा लागतो. त्यामुळे सर्पदंश झाल्या वर जास्त जखमेशी खेळ न करता सरकारी दवाखान्याचा मार्ग पकडावा.
सापाचे विष पाण्यासारखे प्यायले तर ..१)पोटात किंव्हा तोंडात जखम (ulcer) असेल तर माणूस मरेल.२) जखम नसेल तर त्याचे पोट बिघडेल ;) (जास्त प्रोटीन पचवणे अवघड असते ).
14 May 2013 - 11:27 pm | मोदक
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!!!!
पुण्यातील सर्पमित्रांचे नंबर मिळतील का..?
एरीयावाईज नंबर मिळाले तर आणखी चांगले!!
15 May 2013 - 3:24 am | ojas
आत्ता तरी माझ्या कडे नवीन नंबर नाहीत, मला पुणे सोडून ५ वर्ष झाली आहेत. पण साधारणपणे कात्रज सर्पोद्यानकडे सगळे नंबर असतात, आणि तेच एरिया प्रमाणे साप पकडायचे कॉल देत असतात...म्हणून तुम्ही सर्पोद्यान ला फोन केला तरी तुमचे काम भागते .
कात्रज सर्पोद्यान: ०२०-२४३७०७४७
15 May 2013 - 10:56 am | भटक्य आणि उनाड
http://www.indiansnakes.org/snake_search.html
u will find most of the information what u need also snake friend/rescuer in all over india.
15 May 2013 - 11:05 am | आदूबाळ
श्री. ओजस (उर्फ सापाड्या) या क्षेत्रातली "पंहुची हुई चीज" आहेत. एक काळ असा होता की अभियांत्रिकीच्या या विद्यार्थ्याकडे पेन असेल की नाही याची खात्री नसायची, पण खांद्यावरच्या धोपटीत एखादा साप नक्कीच सापडायचा.
साप पकडताना आलेल्या अनुभवांच्या अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा त्याच्याकडे आहेत. एकदा एका झोपडपट्टीत निघालेला साप पकडायला मला घेऊन गेला होता. घाबरलेल्या रहिवाशांना माझ्या अंगावर सोडून हा निवांत सापाच्या मागे लागला. त्यांच्या प्रस्नांना उत्तरं देतादेता मी संपलो. :) व्यवस्थित साप पकडून एका पोत्यात भरला, आणि जणू काही गिरणीतून पीठ आणलं आहे अशा थाटात पोतं धरून माझ्या मागे दुचाकीवर बसला. पोत्यातूनसुद्धा सापाचा गारगार स्पर्श माझ्या पाठीला होत होता. वळवळ जाणवत होती. साध्या शब्दांत सांगायचं तर फा ट ली होती. सर्पोद्यानात तो साप सुपूर्त केल्यावर माझ्या जिवात जीव आला.
ओजसला विनंती करतो की आपले अनुभव मिपावर लिहावेत.
16 May 2013 - 8:08 pm | सुबोध खरे
साप चावल्या वर फक्त दाब पट्टी बांधून त्या व्यक्तीला आडवे झोपवावे. (त्याची हालचाल मर्यादित ठेवावी)नंतर त्याला ताबडतोप सरकारी दवाखान्यात 'हलवावे'--शंभर टक्के बरोबर
त्वचेवरचे विष बघून ओळखणे खूप कठीण आहे--शंभर टक्के बरोबर.पक्षी शीटला तरी तसेच पांढरे पिवळसर दिसू शकते आणि त्यावरून पक्षी ओळखता येतो काय ?
आवळ पट्टी बांधतात ती आपण पट्टी बांधली कि त्यात आतून एक बोट फिरेल एवढीच घट्ट असावी. जास्त घट्ट बांधली तर त्या भागाचा रक्त पुरवठा कमी होऊन उलट त्या भागाला गैंगरिन होण्याची शक्यता असते. ब्लेड ने चिरा देऊ नयेत त्याने कोणताही फायदा होत नाही तर अपायच होतो.सरकारी दवाखान्यात जाण्याचे कारण सर्वसामान्य डॉक्टर आपल्याकडे प्रतिविष ठेवत नाहीत किंवा ते केमिस्ट कडे सुद्धा सहज उपलब्ध असते असे नाही. काही वेळेस इतके जास्त प्रतिविष द्यायला लागते कि ते सरकारी दवाखान्यात सुद्धा उपलब्ध नसते.
विष आपण प्यायले तर जर तोंडाला जखम नसेल आणी जठरात अल्सर नसेल तर आपल्याला काहीही अपाय होणार नाही. पण आजच्या बैठ्या जीवनशैली असणार्या लोकांच्या पोटात अल्सर नाही हे सांगणे कठिण आहे.
मी सर्प दंशाच्या १३ रुग्णांवर उपचार केले आहेत. अर्थात हा आकडा फारच लहान आहे त्यामुळे त्यावर अधिकार वाणीने बोलणे कठीण आहे पण त्यासंदर्भात काही वाचन सुद्धा झाले आहे त्यावरून मी थोडीफार माहिती देऊ शकतो
यावरील( ट्रेक वर लागणारी वैद्यकीय मदत) अधिक माहिती मी एक वेगळा धागा काढून दिल्यास श्रेयस्कर होईल.एक जिलबी टाकावी काय ? संकोच होत आहे.
16 May 2013 - 11:12 pm | मोदक
एक जिलबी टाकावी काय ? संकोच होत आहे.
नेकी और पूछ पूछ..??
आनेदो.
3 Jun 2015 - 1:46 pm | पाटील हो
मस्त धागा.
ट्रेक वर लागणारी वैद्यकीय मदत
संकोच नको येवुद्या.
14 May 2013 - 12:00 pm | अक्षया
ट्रेकींग साठी उपयुक्त माहीती..
धन्यवाद. :)
14 May 2013 - 12:07 pm | कंजूस
मिपावर लेखन करणारे डोंगरयात्री हे खरंतर पोहोचलेले गडी आहेत पण इकडे जरा आपली कशी फजिती झाली वगैरे ललित लेख लिहितात . बहुतेक सर्व सूचनांचा उल्लेख आला आहे .मी एकटाच भटकतो त्यामुळे मला थोड्या वेगळ्या वस्तु जवळ बाळगाव्या लागतात .
14 May 2013 - 12:12 pm | सौंदाळा
नाही म्हणजे कधी एकटा गेलो तर उपयोग होइल.
14 May 2013 - 10:28 pm | कंजूस
तुरटीचा खडा ,चिमटा (ट्विझर) आणि घडयाळवाले वापरतात ते भिंग जवळ असावे .पायात काटा मोडल्यास(बुट घालणाऱ्यांना नाही) भिंगाने पाहून चिमट्याने लवकर काढून टाकावा आणि तुरटी चोळावी .विशेषत: पावसाळयात जखम चिघळत नाही .डोळयातही काही गेल्यास अथवा लाल झाल्यास तुरटीच्या पाण्याने धुवावे .टॉच दोन जवळ ठेवावेत . पावसाळयात अडिच बाय दोन मिटरचे प्लास्टीक दोन टोकाशी बांधले की डोक्यावरून सैक झाकून घेता येते आणि फ्लैपवाली टोपी घालावी .सर्व खात्रीशीर कोरडे राहाते .उन्हाळयात टोपीपेक्षा काळी छत्री जास्ती गारवा देते ,टोपी घामाने भिजते . पाण्यासाठी दोरी लावलेला डबा असावा . अगोदर दोन दिवस केसांना खोबरेल तेल लावू नये ,देवळात झोपल्यास पिटुकले उंदिर केस कुरतडतात .भिंतीपासून फूटभर लांब झोपावे चिचुंद्रि वगैरे प्राण्यांची जाण्याची जागा असते .
14 May 2013 - 11:23 pm | मोदक
फेवीकॉल / फेवीस्टीक (फेवीक्वीक नव्हे!!!!) अशा वस्तूंच्या सहाय्याने काटे लीलया काढता येतात.
काटा मांसामध्ये घट्ट रूतला असेल व सहजासहजी निघत नसेल तर, काट्याच्या आजूबाजूला थोडे टोकरून जागा मोकळी करून घ्यावी तसेच काट्याचे डोके स्पष्ट दिसेल अशा प्रकारे सर्व स्किन काढून टाकावी. फेवीकॉलसारख्या अडेसिव्हचा पातळ थर द्यावा - तो काट्याच्या डोक्याला चिकटला पाहिजे. नंतर हे सगळे प्रकरण संपूर्णपणे वाळून द्यावे व ते अडेसिव्ह पातळ त्वचेप्रमाणेच ओढून काढावे. त्या पातळ थरासोबत काटाही चिकटून बाहेर निघून येतो.
कृपया प्रतिसाद शांतपणे वाचावा ;-)
फेवीक्वीक वापरू नये!!!!!
15 May 2013 - 4:34 pm | तुषार काळभोर
फेविकॉल हाताशी नसल्यास रुईच्या पानांचा चीक सुद्धा हेच काम करतो.
16 May 2013 - 7:05 pm | कवितानागेश
लोकांना वाचायला घाण वाटू शकेल, पण गायीच्या ताज्या शेणानीसुद्धा काटे निघून येतात. काधीकधी काही पानांवर अगदी बारीक काटे असतत आणि ते हातावार/ पायावर मोठ्या भागात एकदम चिकटतात. आणि तिथे आग व्हायला सुरुवात होते. अश्या वेळेस हम्मा किंवा तश्याच कुठल्याही प्राण्याचे ताजे गरम शेण बिन्धास्त फासावे. सगळे काटे निघून येतात. या उपायाचा अनुभव घेतलेला आहे.
14 May 2013 - 12:18 pm | मोदक
मी एकटाच भटकतो
तुमच्या आवडीचा आणि सवयीचा आदर आहे.. परंतु हे चुकीचे आहे.
दुर्दैवाने काही झाले तर निरोप* पोहोचवायला कुणीतरी हवे. निरोप पोहोचून मदत मिळेपर्यंत नेहमीच वेळ जातो.
* प्लीज येथे "शेवटचा निरोप" असा अर्थ घेवू नये !!
14 May 2013 - 9:33 pm | कंजूस
एकटे जाणे आवडीपेक्षा निरूपाय आहे .आपल्याला भटकायचे तर आहे पण प्रत्येकवेळी हव्या असलेल्या ठिकाणी शनिवार रविवार सोडून मधल्या वारी येणारा कोण मिळणार ? यावेळी सर्व गुहा रिकाम्या असतात आणि गाववाले तुम्हाला एक गिऱ्हाईक म्हणून पाहात नाहित . आपली सुखदु:खे सांगतात . जोखमीची जवळची वाट ( उदा: भिमाशंकर शिडी वाट) न धरता लांबची सोपी धरायची .काही संकटे आली आहेत .परंतू सकाळी सुरूवात करत असल्यामुळे पुढे बारा तासांचा उजेड मिळतो .मागे एकदा मे महिन्यात दुपारी ढाक भैरीला भरकटलो .पाणी संपले भोवळ येऊ लागली .पुस्तकात वाचलेले डीहायडरेशनचे वर्णन आठवले .मी विचार केला हेच असावे . उपायही आठवले .शेवटच्या थोडया पाण्यात रुमाल भिजवला ,चेहरा मानेवर टाकून झाडाखाली पाचोळ्यात पडून राहिलो .पाउण तासाने हुशारी आल्यावर खाली परत सांडशीला बोरवेलपाशी आलो .पाणी भराभर काढून चार डबे एकादमात प्यायलो .गाववाले म्हणाले "कोंडेशवर झाले का ?" "नाही ,आता पुढच्या वेळेला " .घरी आल्यावर मोजले तर आठ लिटर भरले .
14 May 2013 - 9:41 pm | सौंदाळा
वा कंजूसशेठ,
आपला द्रुष्टिकोन आणि उत्साह आवडला. तरीहि काळजी घ्या ही विनंती.
14 May 2013 - 12:38 pm | आतिवास
लेख आणि बरेच प्रतिसाद हे 'अनुभवी' ट्रेकर्सच्या दृष्टिकोनातून आले आहेत असं वाटलं :-)
मला हल्ली क्वचित संधी मिळते -पण मी कुठे जाणार असेन तर कोणता ग्रुप आहे (लीडर टीम) ते पाहते ; ओळखीच्या लोकांकडे चौकशी करते. बरेचदा असे ग्रुप आधी एक मीटिंग बोलावतात; त्याला जाते आणि मनात असलेल्या सगळ्या शंका बिनधास्त विचारते. आपल्याला काय झेपेल आणि काय नाही याचा अंदाज घेऊन सामील व्हायचे का नाही हे ठरवते.
हं! गेलं पाहिजे आता एखाद्या ट्रेकला :-)
14 May 2013 - 12:52 pm | सानिकास्वप्निल
उपयुक्त माहिती आणी उत्तम लिखाण
14 May 2013 - 12:59 pm | चौकटराजा
गडावर एखादा भुकेला, दुर्गप्रेमी वाघ रात्री आला तर काय करणार ? आधी कोण याच्या चिठ्ठ्या काढणार का ?? समजा वाटाड्याच वाघाला आवडला तर .... ??
( शुभ बोल रे नार्या ...असे म्हणून गप्प करू नका राव ....आम्ही शक्यता सांगितली.
आपला वात्रट चौरा
14 May 2013 - 1:10 pm | मोदक
काय नाय हो.. शिंपल हाये. धूम पळून जायचे. पळायला न जमणारे वयस्कर लोक त्यासाठीच तर ट्रेकमध्ये घ्यायचे असतात.
(त्यांची शिंग मोडून कळपात शिरायची हौस अशी जिरवायची) ;-)
कित्ती क्रूर रे मोदक ...असे म्हणून गप्प करू नका राव ....आम्ही वस्तुस्थिती (?) सांगितली.
(संपूर्ण प्रतिसाद हलकेच घ्यावा!!)
14 May 2013 - 2:47 pm | सूड
वाघाचा पिवळा रंग आणखी गडद होऊ शकतो.
15 May 2013 - 4:36 pm | तुषार काळभोर
वाघ पळता पळता घसरून पडूही शकतो!!
16 Sep 2016 - 6:26 pm | औरंगजेब
वाघाला गरम वरण भात करुन वाढतो म्हणा म्हणजे वाघाला चक्कर येईल नी तुम्हाला पळता येईल :-)
14 May 2013 - 1:10 pm | कंजूस
घ्या माझा एक सिलेंडर (आग लावण्याचा) काही गड आणि धोकदायक (अथवा जीवघेण्यासुध्दा)गोष्टी १.माहुलि - दरीत पडणे .२ईर्षाळगड - दरीकडच्या पायवाटेवरचे पडलेले बारीक पिवळे गवत यावर पाय ठेवल्यावर घसरते .३.सिध्दगड -गुहेनंतर वर जाण्याच्या वाटेवरचे धोंडे पाय ठेवल्यावर निसटतात .४ ढाक भैरी -वाटेत भरकटणे .५महाबळेश्वर- पावसाळयात पॉईंटजवळ फोटो काढणारे शेवाळयावरून घसरतात .६जीवधन -फाजील धाडस करून गडावर घाटघर कडून पावसात पायऱ्या( ??) चढणे .सह्याद्री अवघड समजून गेलात तर सोपा वाटेल ,सोप्पा म्हणून गेलात तर चांगलीच फजिती करेल .
14 May 2013 - 2:14 pm | मोदक
सह्याद्री अवघड समजून गेलात तर सोपा वाटेल ,सोप्पा म्हणून गेलात तर चांगलीच फजिती करेल .
क्या बात है!!!
"The mountains have rules. they are harsh rules, but they are there, and if you keep to them you are safe. A mountain is not like men. A mountain is sincere. The weapons to conquer it exist inside you, inside your soul." — Walter Bonatti.
14 May 2013 - 2:27 pm | इनिगोय
कोकणकडा? तिकडं गेल्यावर पायबिय घसरण्याचे सोडा, माणसाला परत येऊच नयेसे वाटते अशा आशयाच्या कथा एेकल्यात. :-(
27 Apr 2017 - 10:56 am | इरसाल कार्टं
मी तर हळवाच होतो, आवंढे गिळायचे बाकी असतात.
14 May 2013 - 1:41 pm | अमित राव
उपयुक्त अशी माहिती नक्कीच उपयोगी पडेल.
14 May 2013 - 1:55 pm | मन१
अत्यंत उपयुक्त माहिती.
विशेषतः ग्रामस्थांशी जुळवून घ्यावे, व जाता येता त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून थोडेफार घेउन जावे हा तर अत्यंत योग्य असा सल्ला. व्यावहारिक दृष्टिकोनातूनही आणि माणूसकीच्या दृष्टीकोनातूनही.
भटकायला जाताना मसालेदार्,चमचमीत्,तेल्कट वगैरे पदार्थ टाळा(ह्याने सारखी तहान लागेल म्सांगणाव त्याऐवजी भरपूर फळे न्या(सीझन नुसार जी कुठली असतील ती त्या त्या मोसमात ब्येष्ट) असे लिवणार होतो; पण तोही सल्ला वरती देउन झाला आहे.
थ्री फोर्थ वगैरे नको असे धाग्यात म्हटले आहे, पण साधी प्यांटही किंवा जीन्सही कित्येकदा गैरसोयीची ठरते.सर्वात सोयीस्कर म्हणजे ट्रॅक प्यांट वाटते. टी शर्ट सुती, त्यातल्या त्यात होजिअरीवाला असला तर उत्तम. सर्व सीझनसाठी ब्येष्ट. अंगावर उगा डिओ वगैरे मारुन जाउ नयेत म्हणतात. त्याने प्राणी अस्वस्थ होतात म्हणे. मोकळ्या वातावरणात निढळाचा,श्रमातून आलेला घाम असेल तर तो येउ द्यावा, त्याला टाळायला कृत्रिम पावडरी वगैरे वापरु नयेत म्हणतात.
ट्रेकिंग दरम्यान काही सुकन्या,सुबक सुंदर्या आलेल्या असतील तरी त्यांना इम्प्रेस करण्याच्या नादात अतिसाहस करु नये.
गावी सुखरूप पोचल्यावर हवे तेवढे इम्प्रेस करता येइल हे ध्यानात घ्यावे.
.
ट्रेकिंगबद्दल अप्पा जोगळेकर वगैरे ट्रेकर मंडळी अधिक भर घालू शकतील.दुरुस्ती सुचवू शकतील.
ता . क :-
ट्रेकिंगला जाण्याचा माझा अनुभव नगण्य आहे. लांब लांब पायी फिरण्याचे उद्योग केलेत.(मळवली पासून आख्खा लोणावळा परिसर,लोहगड वगैरे) पण अवघड क्याटॅगरीतले ट्रेक केलेले नाहित.
14 May 2013 - 2:28 pm | पैसा
अगदी माहितीपूर्ण आणि उपयुक्त धागा! वाघ आल्यावर काय करावे हे सांगण्याची गरज नाही. काय करायचे ते तोच करील!
14 May 2013 - 2:46 pm | जयंत कुलकर्णी
मी जेव्हा ट्रेकिंग करायचो- १९७०-८० तेव्हा एक स्लिंग व एक कॅराबिनर हमखास घेउन जायचोच. फार उपयोगी गोष्ट.
14 May 2013 - 3:06 pm | कवितानागेश
अजून एक. जंगलात जाताना जवळ काठी बाळगावी. मुलींनी तर नक्कीच बाळगावी. नाहितर माकडे येतात पटकन अंगावर. करण मुलींकडे सहसा खाउची पिशवी असते अशी इन्फर्मेशन माकडांना असते. मला पुष्कळ अनुभव आहे! :)
14 May 2013 - 3:08 pm | बॅटमॅन
माकडांबद्दल सहमत. वरंधा घाटात, महाबळेश्वरातल्या आर्थर शीट प्वाइंटात अन गगनगड नीअर गगनबावडा इथे हा अण्भव घेट्लेला आहे.
14 May 2013 - 3:27 pm | लाल टोपी
+१००० मूळचा लोणावळ्याचा रहिवासी असल्यामुळे भुशी डॅम मध्ये दरवर्षी पावसाळ्यात जाणारे अनेक बळी पाहीले आहेत. नियमीत ट्रेकर असल्यामुळे देखील अतिउत्साहाचे दुष्परीणाम पाहिले आहेत. ट्रेकिंग मध्ये अतिरीक्त मद्यपान करुन अनोळखी ठिकाणी पोहणे टाळावे.
14 May 2013 - 3:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
छान माहिती येत आहे. वाचकांचा गैरसमज होऊ नयेत म्हणून फक्त काही अधिक माहिती...
@ भटक्य आणि उनाड :
horse's blood can resist venom of snake
घोड्याला विष अत्यंत छोट्या प्रमाणात (सब-लिथल डोस) पण त्याचे शरीर antivenom करण्याची प्रक्रिया सुरू करे इतपतच तज्ञांच्या देखरेखीखाली दिले जाते. जर घोड्याला मोठा डोस दिला तर तोही विषबाधेने मरु शकतो.
blood is extracted and dehydrated and powder form anti venom is ready.
ही प्रोसेस् इतकी सरळ नाही. रक्तातून फक्त antivenom ---जे टोचलेल्या विषाविरुद्ध निर्माण झालेली antibody असते--- ते शुद्ध स्वरुपात (रक्ताच्या इतर घटकांच्या भेसळीविना) गोळा करण्यासाठी खास तंत्रयुक्त प्रोसेस वापरली जाते.
If someone is bit by non venomous snake and if u give him anti venom then it acts as venom on human body and he/she may die.
antivenom हे antibody म्हणजे घोड्याच्या शरिराने बनविलेले एक विषविरोधक प्रोटीन असते. ते प्रोटीन आणि त्याच्याबरोबर असलेले घोड्याच्या रक्तातील काही घटक (हे पुर्णपणे १००% वेगळे करणे शक्य / आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते) हे मानवी शरीरात परके (फॉरीन) असतात त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मानवी शरीरात अॅलर्जीक रिअॅक्शन होउ शकते. ही रिअॅक्शन कोणात आणि किती प्रमाणात होईल हे अगोदर सांगणे शक्य नसते. यात त्या व्यक्तीला विषारी / बिनविषारी सर्पदंश झाला याने काही फरक पडत नाही. याच करिता विषारी सर्पदंश झाल्याची खात्री करून मगच antivenom देणे योग्य आहे.
@ बॅटमॅन :
आणि विष कलेक्ट करण्यात अमुक एका जातीच्याच सापांचे विष घ्यायचे असेही काही तेव्हा दिसले नाही.
यापद्धतीने पॉलिव्हॅलंट antivenom बनवले जाते. ते जर विषारी सापाची जात कळूच शकली नाही / मोनोव्हॅलंट antivenom उपलब्द्ध नसेल तरच वापरायचे असते.
मात्र अचूक निदान व मोनोव्हॅलंट (एकाच प्रकारच्या सापाच्या विषबाधेला उपयोगी असलेले) antivenom हे जास्त सुरक्षीत आणि जास्त परिणामकारक असते.
@ मोदकः
महाडच्या डॉ. हिम्मतराव बावस्करांनी याचा शोध लावला, याबद्दल त्यांचे लेख लॅन्सेटमध्येही छापून आले आहेत.
अगदी बरोबर !
महाडसारख्या दूरदराजच्या जागेवर राहून त्यांनी हे संशोधन १९७० च्या दशकाच्या पहिल्या भागात आणि विशेष म्हणजे केवळ MBBS ची पदवी असताना केलेले आहे. त्याकाळची महाड परिसरातलीची बिकट परिस्थिती पाहता आणि पद्व्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि कोणत्याही संशोधन व्यवस्थेचे पाठबळ नसतानाही त्यांनी केलेल्या या संधोधनाचे श्रेय दिसते त्यापेक्षा अनेक पटींनी मोठे आहे. त्यांचे विंचूदशावरचे मूलभूत संशोधन आणि अधिकार आता जगभर मान्य झाला आहे. अशा महाभागाबरोबर पद्व्युत्तर आभ्यासक्रम करण्याचे सौभाग्य आम्हाला लाभले होते !
14 May 2013 - 3:59 pm | बॅटमॅन
पॉलिव्हॅलंट आणि मोनोव्हॅलंट ही भानगड माहिती नव्हती, माहितीकरिता बहुत धन्यवाद :)
14 May 2013 - 8:18 pm | भटक्य आणि उनाड
चुका दुरुस्त केल्या बद्दल धन्यवाद !!
14 May 2013 - 4:03 pm | इरसाल
डिस्कव्हरीवर की दुसरे कुठेशे पाहिले आहे की ३/४ वेळा साप चावुन व अॅन्टिव्हेनम देवुन वाचलेल्या माणसाला घोड्याची अॅलर्जी येवु/असु शकते.
14 May 2013 - 4:07 pm | अनिरुद्ध प
या विषयीची अधिक महिती मिळालि तर उत्तम
14 May 2013 - 4:10 pm | बॅटमॅन
तेच म्हणतोय. रायगडावर प्रत्यक्ष निनाद बेडेकरांकडून ही कथा ऐकायला मिळाली होती. मी शहाजहान-अकबर स्टाईलमध्ये त्या फुलाचा वास घेत होतो तर बेडेकर म्हणाले ते काय माहिती आहे का? मी म्हटले नाही. मग ते म्हणाले की त्याचा रस तोंडात इ. गेला तर हिरड्या कमकुवत होऊन दात पडतात. अशी टरकली, फेकून दिले मग ते फूल =)) =))
14 May 2013 - 4:47 pm | सूड
फक्त वास घेऊन रस तोंडात कसा जाईल. असो, असेल काहीतर तथ्य!!
14 May 2013 - 5:24 pm | बॅटमॅन
अर्थातच, वास घेऊन तोंडात रस जाणार नाहीच. पण चुकूनमाकून गेला तर उगीच रिस्क कशाला म्हणून ती भानगड नकोच असे म्हण्णे.
14 May 2013 - 5:24 pm | बॅटमॅन
आय मीन चुकूनमाकून फूल ना फुलाची पाकळी चावली जाऊन रस गेला तर.
14 May 2013 - 5:11 pm | सौंदाळा
६-जूनला (शिव-राज्याभिषेक) रायगडावर काही ट्रिप्स असतात का हो पुण्यातुन?
संपर्क क्रमांक, इ-मेल देवू शकता का?
निनाद बेडेकर आदी मंडळींकडून रायगड,राजे यांचा इतिहास ऐकायची इच्छा आहे.
14 May 2013 - 5:26 pm | बॅटमॅन
असतात असे ऐकले आहे पण माहिती नाही. मिपाकर याबद्दल माहिती सांगू शकतील. मी कॉलेजच्या ट्रिपबरोबर गेलो होतो.
14 May 2013 - 5:26 pm | अनिरुद्ध प
मला एका नव्या वनस्पतीची माहिती मिळेल अशी अपेक्शा होती पण निराशा झाली.