गेली ३५ वर्ष ही अपराधीपणाची भावना काहीकेल्या पाठ सोडत नाही. नकळत झालेली चूक. वय पण लहान. आई मल्टीपल ऑर्गन फेल्युअरने के.ई.एम. मध्ये दाखल होती. आईचा छोटा म्हणुन माझी ड्युटी कायम हॉस्पिटलमध्ये. त्या २१ दिवसात डॉक्टर ह्या संस्थेवरचा विश्वास उडाला. शिकाउ मंड्ळीनी केलेले आईच्या देहाचे हाल याची देहा याची डोळा बघितले. आजही तो एक अविभाज्य भाग असतो डॉक्टर होण्याचा हे माहित असुन राग डोक्यातुन जात नाही.
आई जाण्यापुर्वी चार दिवस -रेसिडेन्ट डॉक्टर तपासुन गेले. एक्स-रे आणि इतर तपासणी करता आईला वॉर्डातुन हलवायचे होते.
आईला सारखी ग्लानी येत होती. तीला जागे ठेवायची जबाबदारी माझ्यावर आली.वॉर्ड्बॉयने स्ट्रेचर वर आईला दणकवल्यावर राग आवरेनासा झाला. पण त्या राक्षसा बरोबर मी झुरळ काय लढ्णार. तपासणी ला जाता जाता आई परत ग्लानीत जाउ लागली. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिच्या गालावर चापट्या मारुन तीला जागे करायचे होते. नक्की माहीत नाही पण कुठ्ली तरी चापटी स्ट्रेचर हलता असल्यामुळे जराशी जास्त लागली असणार. आई जागी झाली. "मला मारु नकोस रे विनायका" हे आईचे वाक्य आज पर्यंत विसरु शकलो नाही. हा प्रसंग मी अगदी जवळ्च्याना पण सांगितला नाही. कदाचित इथे लिहुन मुक्ति मिळेल काय?
टोचणी
गाभा:
प्रतिक्रिया
10 Sep 2008 - 4:47 pm | वेताळ
परतुं तुम्ही हे सगळे आई ठिक व्ह्यव्या म्हणुन केले. त्यात तुमचा काही दोष नाही. उगाच ह्या दु:खात झुरत राहु नका.
वेताळ
10 Sep 2008 - 4:56 pm | आनंदयात्री
विनायकराव .. आम्ही उगाच वाचले तुमचे हे लेखन असे झाले आहे आम्हाला !
आता आम्हाला पण ही टोचणी न जाणो किती दिवस छळतेय कोण जाणे ?
-
(हळवा) आंद्या
10 Sep 2008 - 4:57 pm | प्रकाश घाटपांडे
आपला हेतु वय हे सारं लक्षात घेता यात तुमचा दोष काहीच नाही. आठवणीची बोच राहील पण अपराधीपणाची टोच नक्की जाईल. दु:ख हे वाटल्याने हलके होते.
प्रकाश घाटपांडे
10 Sep 2008 - 4:58 pm | जैनाचं कार्ट (not verified)
हेच म्हणतो !!
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
10 Sep 2008 - 10:45 pm | धनंजय
दु:ख वाटून हलके होते.
आता ही टोचणी आम्हालाही लागेल.
10 Sep 2008 - 5:06 pm | पद्मश्री चित्रे
खरच वाईट वाटलं वाचून.
काही जखमा अशाच सोबत रहातात...आयुष्य्भर.
10 Sep 2008 - 5:13 pm | स्नेहश्री
नसत वाचल तर खरच बर झाल असत पण यात तुमचा दोष नाही.
वय लहान होत ना.. आणि तुम्हाला आई ची चिंता पण असेल तेव्हा.
आणि गोंधळला पण असाल्.... आशा असते ना...!!!
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
10 Sep 2008 - 5:20 pm | स्वाती दिनेश
तुमचा हेतू चांगला होता.. आणि तुमचा निरुपाय होता.. सल राहणार.. पण प्रकाशराव म्हणाले तसं,
आठवणीची बोच राहील पण अपराधीपणाची टोच नक्की जाईल. दु:ख हे वाटल्याने हलके होते.
स्वाती
10 Sep 2008 - 5:31 pm | निशा
असच होत एखादा सल टोचणी आयुष्यभर राहते. पण तुम्ही वाईट वाटून घेउ नका.
काळाबरोबर ही टोचणी कमी होत जाईल.
10 Sep 2008 - 6:03 pm | राघव
काय बोलणार यावर... तुम्ही जे केले ते त्यावेळेनुसार योग्यच होते हे तर तुम्हासही माहित आहे. तुमच्या भावना समजू शकतो. काही वेळाच अशा असतात की असे वागावेच लागते. त्यातून सुटका नसते.
बोच कमी होण्यासाठी म्हणून विशेष प्रयत्न करू नका असे मी म्हणेन. कारण ठरवून एखादी गोष्ट तुम्ही विसरू शकत नाही.
गरजूंना शक्य तेवढी मनापासून मदत करत जा. तुमची बोच आपोआप कमी होत जाईल, काळजी करू नका.
कर्तव्यनिष्ठ मुमुक्षू
10 Sep 2008 - 6:08 pm | चतुरंग
तुम्ही त्या परिस्थितीत जे केलंत त्या चौकटीतून आत्ता तुम्ही विचार करु शकत नाही. आपल्या आईबाबत अजाणतेपणे घडलेल्या घटनेचेही वाईट वाटणार, सल रहाणार, कदाचित शेवटपर्यंत.
काळानुरुप ती बोच कमी झाली आहे ह्याचे निदर्शक म्हणजे तुम्ही हा अनुभव इथे मांडलात, आणि स्वतःला मुक्त केलंत! ह्या आधी तो अनुभव तुम्ही स्वतःमधे पुरुन टाकला होतात (स्वतःच्या जवळच्यांनासुद्धा सांगितला नव्हता ह्यावरुन म्हणतोय..). काही गोष्टींवरचे औषध काळ असते ही गोष्ट सुद्धा त्यातलीच असावी!
चतुरंग
10 Sep 2008 - 6:49 pm | येडा खवीस
विनायकराव,
तुमचे तेव्हाचे वय आणि परिस्थिती याचा विचार केल्यावर तुम्ही जे करत होतात ते रास्तच होते पण आई ग्लानीत असल्याने तिची मानसिकता थोडी संभ्रमाची असण्याची शक्यता आहे. तुमची बोच किंवा टोचणी लक्षात येतेय पण "काळ" हाच यावर मोठा मित्र असतो, तेव्हा आता शक्यतोवर यातुन बाहेर पडा आणि एकदा "स्वसंवाद" करा...हवं तर एकदा केव्हातरी आईची प्रतिमा डॉळ्यासमोर आणुन तिला हे सगळं सांगा......मग बरं वाटेल पहा!!!!
-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com
10 Sep 2008 - 6:53 pm | रामदास
ह्या असल्या आठवणी म्हणजे खासगी नरक असतो.
नसत्या आठवणी करून देता राव.
पायाखाली दाबून ठेवलेल्या सावल्या अपरात्री भिंतीवर लांबलचक दिसायला लागतात.
क्या कहे...
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
10 Sep 2008 - 7:57 pm | रेवती
होती आईला जागं ठेवण्याची. त्यासाठी तसे करणे जरूरीचे होते. आपण आपले कर्तव्य करत होता, माणूसच आहात (त्यावेळी तर वयही लहान), प्रोग्रॅम्ड मशीन नाहीत की ठरावीकच प्रकारे चापट बसली पाहीजे.
जर त्या सगळ्याचा उपयोग होऊन आपल्या मातोश्री बर्या झाल्या असत्या तर अश्या लहानमोठ्या गोष्टी लक्षातही राहील्या नसत्या.
वॉर्डबॉयची कृती वाईटच होती. आपण कधी कधी हेल्पलेस असतो. हे सगळं वाचून वाईट वाटले. माझे मामेसासरे अगदी ह्याच कारणास्तव हॉस्पिटलमध्ये होते व नंतर निवर्तले. त्यांचा मुलगा तर तिथला मुख्य डॉक्टर, त्याने बिचार्याने काय करावे? सर्व भावना बाजूला ठेवून डॉक्टर म्हणून आपले कर्तव्य चोख बजावले. तीच त्यावेळची गरज असते.
रेवती
10 Sep 2008 - 8:21 pm | भास्कर केन्डे
विनायकराव,
एकदा एका प्रवचनात ऐकले होते की असा एकही मणुष्य या जगतात नाही ज्याला कसलीही बोच नाही. प्रत्येक माणसाच्या मनात पुर्वायुष्यात घडलेल्या काही चुका/टोचण्या एखाद्या चेटकी प्रमाणे मागे लागलेल्या असतातच. त्यातून सुटका करण्यासाठी त्या प्रवचनकाराने एक उपाय सुचवला होता जो मी स्वतः अवलंबून त्याचे योग्य परिणाम पहात आहे.
त्या बोचणार्या आठवणीच्या क्षणी आपण काय अधिक करू शकलो असतो ते ठरवा. विचार करा की कुणी मायेने प्रेमाचा हात त्या क्षणी तुमच्या पाठीवर ठेवला असता तर तुम्हाला किती धीर वाटला असता. विचार करा की त्या क्षणी अश्रूंना वाट मोकळी करुन देण्यासाठी एक खांद्या तुम्हाला मिळाला असता तर तुम्हाला काय वाटले असते. अन विचार करा की असा एक व्यक्ती तुमच्या सोबत असल्याने तुमच्या आईच्या शेवटच्या वेदना काही सुलभ झाल्या असत्या का?
दुर्दैवाने ते क्षण या भूतलावरून नष्ट झालेले नाहीत. ते दररोज कुठे ना कुठे कोणाच्या ना कोणाच्या वाट्याला येत आहेत. आपले डोळे आणी मन उघडे ठेऊन आपल्या अजूबाजूला पहा. अशा संकट क्षणी जर तुम्ही कोणासाठी धावून जाऊ शकलात तर पहा. ती व्यक्ती तुम्हाला जन्मभर विसरणार नाही. त्या व्यक्तीच्या डोळ्यातून तुमच्या बद्दल व्यक्त होणार्या भावना तुमचे शल्य नक्कीच कमी करतील.
आपला,
(समदु:खी) भास्कर
आम्ही येथे वसतो.
10 Sep 2008 - 8:51 pm | सखाराम_गटणे™
तुम्हाला तुमच्या आईला चापट्या मारायच्या होत्या कारण तीला ह्या प्रुथ्वीतलावर तुमच्या सानिध्यात सुखात ठेवायचे होते.
म्हणजे तुमचा हेतु अतिशय चांगला व निस्वार्थी होता. तुम्ही जे करत होता, ते तुमच्या आईच्या भल्यासाठीच करत होता, तुमचा कोणताही स्वार्थे नव्हता.
भगवान श्रीक्रुष्णाने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मोठे आणि चांगले ध्येय प्राप्त करायचे असेल, थोडे फार वाईट किंवा वाईट सद्रुश्य क्रुत्य म्हणजे पाप ठरत नाही.
10 Sep 2008 - 11:00 pm | प्राजु
उगाच वाचेल मी. डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहिला आणि माझ्याही मनाला बोचणी लागून राहिली आहे आता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Sep 2008 - 11:20 pm | केशवराव
विनायका,
तू कृती करतावेळचा उद्देश लक्षात घ्यावा असे वाटते. तुझ्या मनाच्या यातना समजु शकतो; पण तूला हे कुठेतरी सांगावेसे वाटले हेच महत्वाचे. आईला स्मरुन एकदा माफी माग. आई नक्कीच माफ करेल. मनाची समजूत घालणे कठीण असते. एक ऊपाय करुन बघ. चांगल्या कौंसिलरकडे जा. [ ठाण्याला आय. पी. एच. सेंटरशी सम्पर्क साध.] नाहीतर रोज ज्ञानेश्वरीचे काही श्लोक वाचत जा. ईश्वर तुला मनोधैर्य देवो.
11 Sep 2008 - 12:08 am | सर्वसाक्षी
तिला असे म्हणायचे असेल, की "मला सोडु नकोस रे विनायका". आपल्या मुलाला सोडुन जावे असे जगातल्या कुठल्या आईला वाटेल?
मुक्ती कसली विनायकराव? आई आपल्या मुलाला कुठलही बंधन कधीच घालत नाही. आई आपल्या मुलावर कधी रागावत नसते. म्हणुनच ती आई असते. किंबहुना म्हणुनच आपण आईला देव मानतो. एखाद्या मुसलमानावर आपत्ती आली तर तो या अल्ला म्हणतो. ख्रिस्तावर संकट आले तर तो जिझस ख्राईस्ट असे उद्गारतो. आपण मात्र साधी ठेच लागली तरी 'आई ग' असे म्हणतो. कारण आपण ईश्वर हा सर्वप्रथम आईच्या रूपात पाहिलेला असतो.
टोचणी विसरा, आईच्या शब्दापेक्षा डोळे आठवुन पाहा. आपला मुलगा आपल्या जवळ आहे याचे विलक्षण समाधान त्याक्षणी तिच्या डोळ्यात असणार, ते आठवायचा प्रयत्न करा.
11 Sep 2008 - 11:43 am | विसोबा खेचर
आपल्या भावना मी समजू शकतो आणि त्याबद्दल माझी सहानुभूतीही आहे, परंतु के ई एम रुग्णालयात असे सहसा होत नाही. उलटपक्षी, मुंबईतल्या इतर कोणत्याही रुग्णालयापेक्षा तिथे अधिक चांगले उपचार मिळतात असे माझ्या पाहण्यात आले आहे!
असो,
आपल्या मातोश्रींच्या स्मृतीला माझी विनम्र आदरांजली...
तात्या.
22 Sep 2008 - 1:53 pm | प्रभाकर पेठकर
श्री. विनायकराव,
टोचणी - २ पाहिल्या पासून टोचणी -१ आधी वाचण्याची ईच्छा होती. आज सापडली.
मला असे म्हणायचे आहे की आईंना झोपू न देणे, जागे ठेवणे, हे वैद्यक शास्त्रानुसार गरजेचे होते. आणि त्यासाठी आईंच्या गालावर चापटी मारून त्यांना जागे ठेवणे ही जबाबदारी 'रुग्णाच्या व्याधीवरील उपाययोजनेतलाच' एक भाग होता. म्हणजे जवळ जवळ डॉक्टरी कर्तव्यच तुम्ही आज्ञाधारकपणे पार पाडलेत. तिथे तुमचे आणि आईंचे नाते 'आई-मुलाचे' नसून 'डॉक्टर आणि रुग्णाचे' होते. तुम्ही तुमच्या कर्तव्यात कसूर केली नाहीत ह्याचे समाधान माना. डॉक्टरानी सांगूनही तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडले नसतेत तर ती टोचणी 'अपराधी' भावनेची झाली असती. मला नाही वाटत तुमच्या मनात तुम्ही काही अपराधी भावना बाळगावी.
माझ्या वडीलांना तर हॉस्पिटलातच जायचे नव्हते. त्यांचे म्हणणे होते जे व्हायचे ते घरीच होऊ दे. पण आम्ही मनावर दगड ठेवून त्यांच्या मनाविरूद्ध त्यांना केईएम मध्ये दाखल केले होते. त्यांना चांगली वैद्यकिय सेवा मिळावी आणि लवकरात लवकर ते बरे होऊन आमच्यात घरी यावेत अशीच आमची इच्छा होती. दुर्दैवाने तसे घडले नाही. केईएम मधून त्यांच्या देहाला आम्ही घरी आणू शकलो. ते मात्र आम्हा सर्वांना सोडून गेले होते. त्यांच्या शेवटच्या इच्छेला आपण मान दिला नाही असे क्षणभर वाटले पण आपण जे केले ते त्यांच्या भल्या करीता, त्यांच्या आरोग्या करीता, त्यांच्या दीर्घायुष्या करीता केले ही भावना मनात जागविली.
तेंव्हा ही टोचणी मनातून प्रयत्न पूर्वक काढून टाका. ही विनंती.