कैरीची डाळ, पन्हे आणि जालिंदर जलालाबादी!

रेवती's picture
रेवती in पाककृती
9 Apr 2009 - 7:02 am

भडकमकर मास्तरांचा जालिंदरजींबद्दल लिहिलेला लेख वाचला आणि आमच्या मनात खळबळ उडाली.
इतक्या थोर साहित्यिकाचे साहित्य आतापर्यंत न वाचल्याने मनात विषाद उत्पन्न झाला, त्यामुळे प्रतिक्रिया काय द्यावी हे समजेना.
तशीच उठून स्वयंपाकघरात गेले व वाटीभर हरभर्‍याची डाळ नीट धुवून भिजत टाकली.
पुन्हा मिपावर येऊन बघते तो पाषाणभेद यांनी 'लिहिते व्हा' ह्या जालिंदरजींच्या पुस्तकाबद्दल खरडवहीत विचारणा केली होती.
फारच अस्वस्थता आल्याने पायात सपाता अडकवून जवळच्याच पुस्तकाच्या दुकानात जालिंदरजींचे साहित्य शोधण्यास बाहेर पडले.
दुकानात पोचताच दोन सुकुमार ललनांनी स्वागत केले आणि काय हवे असे विचारले. 'जालिंदर जलालाबादी' हे नाव ऐकताच दोघींचे आधीच पांढरे असलेले चेहेरे आणखीनच पांढरे पडले!
'भाकरीच्या बदल्यात भाषण' हा संदर्भ आठवल्याने मी तडक पाककृती विभागाकडे वळले.
माझी पुस्तकांच्या शेल्फशी सुरु असलेली खुडबूड ऐकून साधारण २०० पौंड वजनाची विशाल महिला माझ्याजवळ येऊन विचारती झाली.
'जालिंदर जलालाबादी' हे नाव माझ्या तोंडून ऐकताच ती तिच्या मदतनिसांकडे वळली आणि शक्य तितक्या वेगाने चालत जाऊन तिने नेमक्या ठिकाणाहून
'जॅलिंडर जलॅलॅबॅडी' यांची पुस्तके ताबडतोब आणावयास सांगितली! मिनिटभरातच माझ्यापुढे चार पुस्तके आली - पहिले पुस्तक 'पेंग्विन्स व गोठलेले शब्द' हा कविता संग्रह,
दुसरे 'भाकरीच्या बदल्यात भाषण', तिसरे 'बुरुंडीतील खरबुजे' हे आफ्रिकेतले प्रवासवर्णन आणि चौथे 'चालते व्हा!'
शेवटच्या पुस्तकाचे नाव जणू काही मलाच उद्देशून लिहिले आहे असे वाटून हिरमुसून मी घरी आले.

जालिंदरजींचे साहित्य मिळाले नसले तरी मी कैरीच्या डाळीचे साहित्य गोळा करायला सुरुवात केली.
एव्हाना डाळ चांगलीच भिजली होती. डाळीचा उग्रपणा जाण्यासाठी ती स्वच्छ धुतली.
दोन हिरव्याकंच मिरच्या, पाव टी स्पून जिरे, अगदी छोटा आल्याचा तुकडा व मीठ असे एकत्र फूड प्रोसेसरमधे जाडसर वाटले.
बुरुंडीमधील काही सुगरणींनी सांगितल्यानुसार कैरी किसली. डाळीच्या वाटणात सव्वा टेबलस्पून कैरीचा कीस, बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीपुरती साखर घालून कालवले.
भरपूर तेलातली, भरीचा हिंग घालून केलेली आफ्रिकन रंगाची फोडणी गार होण्यासाठी ठेवली.
अजूनपर्यंत मनातला 'चालते व्हा' मुळे आलेला राग शांत झाला नव्हता, एवढ्यात नवरा घरी आला.
तो नुकताच एके ठिकाणी 'बुद्धीबळ कसे खेळू नये' ह्यावर एक भाषण देऊन आला होता. पहाते तो त्याच्या हातात भाकरी; त्यावरुन जालिंदरजींच्या साहित्यप्रसाराची कल्पना आली.

एक मोठी कैरी कुकरला उकडण्यास लावली. आतामात्र 'चालते व्हा' ची हकीकत नवर्‍याला एका दमात सांगून टाकली. त्याला ह्यात कुठलाही अपमान वाटाला नाही.
भारतातल्या लोकांना लेखनासाठी प्रोत्साहित करण्याकरता 'लिहिते व्हा' असे पुस्तक जलालाबादींनी लिहिले असून जाडजूड अमेरिकन बगलबच्चांना वाढते वजन नियंत्रित करा असा संदेश देण्यासाठी 'चालते व्हा!' हे पुस्तक लिहिले आहे असे नवर्‍याचे म्हणणे पडले. थंड झालेल्या डोक्याने तेवढीच थंड झालेली फोडणी डाळीवर ओतून नीट कालवले.

'चालते व्हा' हे पुस्तक जर अमेरिकेत मुबलक संख्येने उपलब्ध आहे तर 'लिहिते व्हा' पाषाणभेद साहेबांना भारतात का मिळू नये? ह्यात गुजरात सरकारचा काही डाव असावा अशी आम्हाला शंका आली. एवढ्यात कुकरची तिसरी शिट्टी झाली व मी गॅस बंद केला. नवापूर रेल्वेस्थानकाच्या गुजरातकडल्या बाजूला पुस्तकांच्या स्टॉलवर 'लिहिते व्हा' हे पुस्तक मिळते व ते मराठी वाचता येणार्‍या गुजराती बांधवांनाच दिले जाते अशी माहिती समजली. एव्हाना उकडलेल्या कैरीचा गर हलकेच काढून मिक्सरच्या जारमध्ये घातला होता. फार सालाजवळचा आणि कोयीजवळचा गर घेतल्यास त्याची कडवट, तुरट चव पन्ह्यात उतरते म्हणून तो गर घेतला नव्हता. (ही टीप 'भाकरीच्या बदल्यात भाषण' ह्या पुस्तकात वाचली होती!).
माझ्या आवडीप्रमाणे एक वाटी गराला पाऊण वाटी गूळ व अर्धी वाटी साखर (कैरीच्या आंबटपणानुसार प्रमाण बदलेल) व पाव चमचा मीठ गरात घालून वर थोडे पाणी घातले.
मिक्सरमधे एकजीव घुसळून झाल्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे केशर अथवा वेलची पूड घालायची असते, मी केशर घातले. आता थंडगार पाणी ओतून हवे तेवढे पातळ करुन घेतले.

खमंग कैरीची डाळ व चवदार पन्हे यांचा नैवेद्य चैत्रगौरीला दाखवला आणि जलालाबादी 'क्षणभंगूर सिंगूर' हे महाकाव्य कधी बरं पूर्ण करतील ह्यावर विचार करत करत त्याचा आस्वाद घेतला! :)

रेवती

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

9 Apr 2009 - 7:09 am | विसोबा खेचर

जबरा फोटू, खुसखुशीत लेखन! :)

अहो रेवतीवैनी, आपण उत्तम सुगरण आहात हे माहीत होतं परंतु आपण लिहिताही उत्तम हे नव्यानेच समजलं! :)

येऊ द्या प्लीज अजूनही असेच काही लेखन..

बाय द वे, फोटूंबद्दल धन्यवाद. वस्तु कुठली लुटणार आहात तेही कळवा. की एखाद्या पर्सचा वगैरे फोटू देऊ टाकून? :)

आपला,
(साग्रसंगीत) तात्या.

धन्यवाद तात्या.
लुटायच्या वस्तूचा फोटू व्यनि केलाय तो पहा.

रेवती

स्मिता श्रीपाद's picture

9 Apr 2009 - 10:20 am | स्मिता श्रीपाद

झक्कास पाकॄ..आणि सोबत खुसखुशीत लेखसुद्धा...:-)
मस्तच ....पाकॄ कम लेख हे कॉम्बीनेशन भारीच.... :-)
अजुन येउदेत....

अवांतरः
वस्तु कुठली लुटणार आहात तेही कळवा. की एखाद्या पर्सचा वगैरे फोटू देऊ टाकून?
तात्या,
वस्तु चैत्रागौरीच्या हळदिकुंकवाला नाही लुटत...संक्रांतीला लुटतात ना?

जालिंदर जलालाबादींच्या कुठल्याशा पुस्तकात हळदिकुंकवाच्या नव्या पद्धतींचा पण समवेश आहे कि काय?

नंदन's picture

9 Apr 2009 - 7:11 am | नंदन

पाकृ आणि फोटू खल्लास. जय जालिंदर जलालाबादी! :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Apr 2009 - 7:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>पाकृ आणि फोटू खल्लास. जय जालिंदर जलालाबादी!

नंदनशी सहमत !

धनंजय's picture

10 Apr 2009 - 12:08 am | धनंजय

>>पाकृ आणि फोटू खल्लास. जय जालिंदर जलालाबादी!

जालिंदरजींचे साहित्य मिळाले नसले तरी मी कैरीच्या डाळीचे साहित्य गोळा करायला सुरुवात केली...तो नुकताच एके ठिकाणी 'बुद्धीबळ कसे खेळू नये' ह्यावर एक भाषण देऊन आला होता. पहाते तो त्याच्या हातात भाकरी
खिखिखि....

मस्त लेखन...
जालिंदरजी पाककृतीतही... !!!! गुरुजी थोर आहेत..
अनंतकोटी ब्रम्हांडनायक भगवान श्री व्यासावतार जालिंदरमहाराज की जय... !!!

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Apr 2009 - 10:13 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

रेवतीताई, या पाकृबद्दल खास आभार. फोटो आणि पाकृ मस्तच! या विकेण्डचा बेत ठरला! तुझं स्वयपाकाएवढंच खुमासदार लेखन पाहून फारच मस्त वाटलं, सकाळी सकाळी मज्जा आली.

जय हो जालिंदर महाराज की जय हो! त्यांच्या कृपाशीर्वाद आणि ज्ञानप्रसारामुळेच तुला एवढी रसभरीत डाळ आणि पन्हं बनवता आलं याची मला खात्री आहेत. जालिंदरजी माझे परात्पर गुरू असल्याचा मला सार्थ अभिमान वाटला.

तुझा नवरा तुला प्रोत्साहन देत आहे हे पाहून बरे वाटले. काल माझी एक पोळी थोडी जळली ती तर "जळ्ळ्या त्या जाळींदरची वर्णनं जालावर जाऊन वाचू नकोस", असा कुजकट टोमणा कानावर आला. असो. जालिंदरजी महान आहेत, लवकरच त्यांच्या प्रकृतीला आराम मिळेल आणि मी लिहिलेल्या विडंबनावर त्यांची सही मास्तरांना घेता येईल ही आशा!

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

नंदन's picture

9 Apr 2009 - 7:20 am | नंदन

दूरदेशीच्या प्रौढ लेकरांसाठी पन्ह्याची ही सोपी रेसिपी

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मदनबाण's picture

9 Apr 2009 - 7:20 am | मदनबाण

व्वा. ताई एकदम चवदार लिहलं आहेस. :)
फोटु सुंदर आलेत्,,,पन्हाची चव घेऊन पहाविशी वाटली !!! आणि कैरीच्या डाळीवरची खमंग फोडणीची चव जिभेवर तरळुन गेली.काही ठिकाणी हिरव्या मिरच्यांच्या जागी लाल मिरचीची फोडणी देतात काय ???

(खादाडनाथ)
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

रेवती's picture

9 Apr 2009 - 6:15 pm | रेवती

बाणा, तुझी निरिक्षणशक्ती चांगलीच आहे.
बरोबर आहे, काही जण फोडणीत लाल मिरच्याही घालतात.
प्रत्येकाची तिखटपणाबरोबरची मैत्री वेगळी असते, त्यामुळे....

रेवती

चकली's picture

9 Apr 2009 - 7:28 am | चकली

:) मस्त लिहलय!
चकली
http://chakali.blogspot.com

प्राजु's picture

9 Apr 2009 - 7:30 am | प्राजु

अतिशय खुमासदार!
कैरीची डाळ... आणि पन्हं... क्या बात है! जालिंदर जलालाबादी म्हणजे.. एक उत्तम पाककृती मार्गदर्शक आहेत हे त्यांच्या "भाकरीच्या बदल्यात भाषण" या पुस्तकात अत्यंत साध्या शब्दांत लिहिले आहे. गुरूजींच राहणंच साधं ना!!! पण रेवतीताईनी.. त्यांनी सांगितल्या बरहुकुम पाककृती करून आणि त्यांना एकप्रकारे सन्मानितच केले आहे. जलालाबादी गुरूंना इतकी शिष्योत्तमा मिळाली याबद्दल आम्हांला रेवती ताईंचा अभिमान वाटतो. :)
अशाच "भाकरीच्या बदल्यात भाषण" या पुस्तकातल्या उत्तमोत्तम रेसिपीज ज्यांना हे पुस्तक वाचायला मिळालं नाहीये त्यांच्यासाठी रेवतीताईंनी द्याव्यात अशी आग्रहाची विनंती.
जय जलालाबादी! ;)

ता. क. : जलालाबादींच्या "फुटफुटला फोटो" या पुस्तकातून वरील छायाचित्रे घेतली आहेत .. अशी माहिती नुकतीच मिळाली आहे. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रेवती's picture

9 Apr 2009 - 6:18 pm | रेवती

अशाच "भाकरीच्या बदल्यात भाषण" या पुस्तकातल्या उत्तमोत्तम रेसिपीज ज्यांना हे पुस्तक वाचायला मिळालं नाहीये त्यांच्यासाठी रेवतीताईंनी द्याव्यात अशी आग्रहाची विनंती.

आपल्या प्रेमळ आग्रहापुढे आम्ही बापडे काय बोलणार?
गुरुजींच्या पुस्तकातील अश्याच थोर पाकृ देण्यात येतील.
अवांतर: आत्ताच त्यांची 'थरथरती थालीपिठे' की पाकृ केली होती.
चव फारच छान!
रेवती

अवलिया's picture

9 Apr 2009 - 7:46 am | अवलिया

रेवतीदेवींचा विजय असो !!!!
व्वा !! एकदम दणकेबाज !!
फोटु सुंदर !
:)

--अवलिया

पाषाणभेद's picture

9 Apr 2009 - 7:46 am | पाषाणभेद

जालिंदरजींचे आभार मानावे तितके थोडेच.
पा.क्रु. पाहुन ती मॉनिटर भेदुन बाहेर आली तर बरे होईल असे वाटले.
- पाषाणभेद

निखिल देशपांडे's picture

9 Apr 2009 - 7:59 am | निखिल देशपांडे

पाकृ आणि फोटू जबरदस्त जय जालिंदर जलालाबादी!!!!!!!

निखिल

समिधा's picture

9 Apr 2009 - 9:43 am | समिधा

मस्त ग रेवती. अजुन इथे कैरी मिळत नाही. मिळाल्या की नक्की करेन.

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

भाग्यश्री's picture

9 Apr 2009 - 9:45 am | भाग्यश्री

=))

आनंदयात्री's picture

9 Apr 2009 - 9:55 am | आनंदयात्री

:)

श्रावण मोडक's picture

9 Apr 2009 - 10:26 am | श्रावण मोडक

आता 'जालिंदर सत्ताविशी' वगैरे व्हायला हरकत नाही.
सुरवात मास्तरांनी करून दिली. उत्तम प्रेरणास्रोत. रेवती यांनी एक माळ लावलीये. पाकृ. आता प्रवास वर्णन, ललित, निबंध, कविता, कथा, लघुत्तमकथा, रुपककथा... भरपूर वाव आहे. आणि असा वाव असला की खुलणारे मानकरीही येथे भरपूर आहेत. घ्या मनावर मंडळी...
मास्तर, काय म्हणता?

भडकमकर मास्तर's picture

9 Apr 2009 - 4:56 pm | भडकमकर मास्तर

मास्तर, काय म्हणता?

अहाहा, उत्तम कल्पना... जालिंदर सत्ताविशी
जालिंदरजींना आंतरजालाने स्वीकारले याची अजून कोणती मोठी खूण असावी ?
....

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

श्रावण मोडक's picture

9 Apr 2009 - 5:03 pm | श्रावण मोडक

तुम्ही अनुमोदन दिलंत म्हणजे झालं सारं.
एवीतेवी रेवतीच्या लेखानंतर दोन रचना पडल्या आहेत. भाकरीतला जलालाबादी आणि साधू, साधू, साधू. म्हणजे तुमच्यासकट एकूण चार झाल्या. तेवीस अजून केल्या की सत्ताविशी पूर्ण.
जालिंदरजी सध्या हिमालयात आहेत हे सुखाचे. तिथं उपग्रहजोडणी वगैरे नाही ना? तप सोडून परतायचे हे पाहून. ते किती काळ तिथे असतील? म्हणजे तेवढ्या काळात इथल्या शिलेदारांनी लेखन पूर्ण करायला बरं.
अर्थात, हे असे व्हावे ही जालिंदरजींचीच इच्छा.

रेवती's picture

9 Apr 2009 - 6:27 pm | रेवती

गुरुजींना प्रसिद्धीची हाव अजिबात नव्हती. शिष्यगणाच्या आग्रहाला बळी पडून त्यांनी कधीही आपले साहित्य बाजारात खपवले नाही.
प्रकाशकच विनंती करकरून त्यांचे साहित्य छापावयास नेत असत. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे 'बुरूंडीतील बरबटलेले बगळे' हे
पक्षीजीवनावरील, त्याच प्रमाणे 'घानातील घोणस' हे सर्पजीवनावरील, अशी दोन पुस्तके दुर्लक्षीत राहीली.
गुरुजींच्या शिष्यगणापैकी कुणी जर पुस्तकांचे परिक्षण लिहिलेत तर तीच गुरुदक्षिणा ठरेल यात संशय तो कसला?

रेवती

श्रावण मोडक's picture

9 Apr 2009 - 6:35 pm | श्रावण मोडक

सहमत आहे मी. गुरूजींना प्रसिद्धीची हाव अजिबातच नव्हती. हे असे दडलेले हिरे क्वचितच कुठे कोणी केलेल्या लेखनातून समाजासमोर येऊन झळकत असतात. हे पवित्र कार्य आहे. मास्तरांनी सुरू केले. तुम्ही एक सुरेख माळ लावलीत. हे कार्य पुढे सुरू राहते आहे हे पाहून गुरूजींच्या मनास तोष होईल यात शंका नाही.
त्यांना प्रसिद्धीची हाव नाही, पण सिद्धीची मात्र आहे. हाव शब्द नको वापरायला. सिद्धीची आकांक्षा आहे असे म्हणूया. तूर्त ते हिमालयात आहेत. दक्षिण धृव झालाच आहे. काही काळात ते उत्तर धृवाचा दौरा करणार आहेत अशी मास्तरांच्या निकटवर्तीय गोटातून आलेली खबर आहे. तिथून आल्यानंतर 'निःशब्द पक्ष्यांचे पक्षांतर' हे त्यांचे प्रवासवर्णन येतेय. फॉक्सहोर्ड पब्लिशिंगने त्यासाठी त्यांना आत्ताच दशलक्ष मुद्रांचे आगाऊ मानधन देऊ केल्याचीही खबर सीबीबीच्या सहित वाहिनीने दिली आहे.
बाकी जालिंदरजींचा छाप किती ठळक असते पहा. बुरूंडीतील बुरसटलेले बगळे, घानातील घोणस यात एखाद्याला शब्दांची कसरत दिसेल, प्रत्यक्षात ती कसरत नाही. गुरूजींना मल्लखांबाच्या कसरती करताना मिळालेल्या दिव्य साक्षात्काराचा तो शब्दरुपी आविष्कार आहे. आणि आता त्याच मालिकेत तुमचे थरथरते थालिपीठ जाऊन बसणार आहे.

बेसनलाडू's picture

9 Apr 2009 - 10:28 am | बेसनलाडू

आताच जेवण झाले असूनही पन्हे-डाळीपुरती नव्याने भूक लागल्यासारखी वाटते.
(हावरट)बेसनलाडू

परिकथेतील राजकुमार's picture

9 Apr 2009 - 11:12 am | परिकथेतील राजकुमार

अ प्र ति म !
कैरीची डाळ म्हणजे आमचा विकपॉईंट ;)
चरचरीत लेखन आणी चरचरीत पाकृ !

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

स्वाती दिनेश's picture

9 Apr 2009 - 11:13 am | स्वाती दिनेश

रेवती, एकदम दणक्यात!!
जय हो जालिंदरबाबा की..
डाळ आणि पन्हे जीवघेणे आहे...पाणी सुटून तळे झाले. आता लवकरच दोन्ही करावेच लागणार.
स्वाती

शाल्मली's picture

9 Apr 2009 - 1:21 pm | शाल्मली

रेवती,
लैच भारी! फारच खुशखुशीत लेखन.
तिकडे जालिंदरबाबांचे डोळे डबडबले असतील.
डाळ-पन्ह्याचा आस्वाद घेण्याआधी जालिंदरजींना नैवेद्य दाखवला होतास ना गं बाई? ;)
फोटो तर झकासच एकदम!

--शाल्मली.

रेवती's picture

9 Apr 2009 - 6:33 pm | रेवती

होय शाल्मली. नक्कीच गुरुजींचे स्मरण केले होते डाळ, पन्ह्याचा नैवेद्य दाखवताना.
तुही त्यांच्या लेखनाची फॅन दिसतीयेस. 'जगात कुठलीही वस्तू निर्जीव नसते' हे जालींदरजींचे
वाक्य माझ्या मनावर खोल ठसा उमटवून गेले आहे. तू उल्लेखल्याप्रमाणे 'डबडबले डाळीचे डोळे'
अश्यात शब्दात जालिंदर महाशयांनी मला इ मेल करून पाकृस शुभेच्छा दिल्या होत्या.

रेवती

कवटी's picture

9 Apr 2009 - 1:38 pm | कवटी

जय हो जालिंदरबाबा की..
जलालाबादी हे असेच सगळ्याना प्रेरणादायी ठरत आलेले आहेत.
त्यांच्या प्रेरणेने तयार झालेले डाळ आणि पन्हे उत्तमच झाले असणार.
पाक्रु ही सुंदर लिहिली आहे. अर्थातच याचा सिंहाचा वाटा जलालाबादींचा.
येउद्या अजुन.

कवटी

पाषाणभेद's picture

9 Apr 2009 - 3:37 pm | पाषाणभेद

हा लेख पुन्हा पुन्हा वाचला. मनात खुप हसत होतो. जालिंदरजी हे बहुदा फारच प्रसिद्ध होतील.
भडकमसरांचा हा मानस साहित्तीक आता नाव काढणार.
कदाचीत 'जालिंदर जलालाबादी' हा एक वाक्प्रचार पण जन्माला येईल. याला ईतरही भाषांमध्ये प्रसिद्धी देण्याचे काम आता आपण मराठी माणसांना घ्यावे लागेल.
- पाषाणभेद

लिखाळ's picture

9 Apr 2009 - 4:36 pm | लिखाळ

वा .. फारच मजेदार लेख आणि रुचकर पाकृ :)
लिहिते व्हा आणि चालते व्हा अशी दोन पुस्तके वेगळ्या खंडातल्या लोकांच्या जीवनपद्धतीला समजाऊन घेऊन लिहिणारे जालिंदर खरेच थोर साहोत्यीक आहेत. 'पेंग्विन्स व गोठलेले शब्द' हा काव्यसंग्रहसुद्धा वाचनीयच असणार. याची स्कॅन कॉपी जमल्यास मिपावर टाकावी नाहितर त्यातल्या चारदोन कविता तरी रसग्रहण करुन लिहाव्यात अशी विनंती.
-- लिखाळ.

रेवती's picture

9 Apr 2009 - 6:41 pm | रेवती

आपल्या विनंतीला मान देउन काव्यसंग्रह स्कॅन करून मिपावर टाकण्यास आम्हाला अभिमानच वाटला असता.
दुर्दैवाने स्कॅनर बिघडला असल्याने 'पेंग्विन आणि कंपनी'कडे दुरूस्तीस दिला आहे. तो परत आल्यानंतर
आधीपासूनच स्कॅनींगसाठी वेटींगला पडलेली अत्यंत नवी अशी नृत्यमार्गदर्शिका 'पेंग्विन कांन्ट डान्स साला'
मिपावर चढवण्यात येइल. त्यानंतर आपलाच नंबर. कृपया तोपर्यंत धीर धरा.

रेवती

शितल's picture

9 Apr 2009 - 6:44 pm | शितल

रेवती,
मस्त लिहिले आहेस, डाळ-पन्ह्याचा फोटो तर वा.. :)

सूहास's picture

9 Apr 2009 - 6:48 pm | सूहास (not verified)

सुहास

टिउ's picture

9 Apr 2009 - 7:26 pm | टिउ

उत्तम लेख, झकास पाककृती...गुरुवर्य जालिंदरजींची कृपाद्रुष्टी आपणावर सदैव अशीच राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

संदीप चित्रे's picture

9 Apr 2009 - 9:01 pm | संदीप चित्रे

आवडला रेवती ...
>> 'क्षणभंगूर सिंगूर'
मस्त :)

अवांतर -- व्हर्च्युअल पन्हे मिपाकरांना तितकेसे मान्य नाही ...
(सूज्ञास अधिक सांगणे....) :)

रेवती's picture

9 Apr 2009 - 9:15 pm | रेवती

व्हर्च्युअल पन्हे मिपाकरांना तितकेसे मान्य नाही ...
या गोष्टीची कल्पना आधीपासूनच असल्याने ती व्यवस्थाही करण्यात येणार आहे.
प्राजु येताना तीन लठ्ठ कैर्‍या घेउन येतीये.:)

रेवती

टिउ's picture

10 Apr 2009 - 1:01 am | टिउ

:W
कधी? कुठे? जलालाबादींच्या 'गुपचुप गेटटुगेदर' या पुस्तकापासुन प्रेरणा घेउन हा जो काही प्रकार चाललाय त्याबद्दल त्रिवार निषेध!

चित्रा's picture

10 Apr 2009 - 3:59 am | चित्रा

भन्नाट पाककृती!

झाडाला लागलेल्या कैर्‍या घराच्या आतून लांब काठीला आकडा लावून खिडकीतून कशा काढाव्यात या पुरातन कलेचा र्‍हास होऊ नये म्हणून केलेले चलतचित्रण खुद्द जालिंदरजींनी मागे यूट्यूबवर टाकले होते त्याची यानिमित्ताने आठवण झाली. देशांतरी असणार्‍या मराठी बांधवांच्या मुलामुलींच्या घरगुती शिक्षणाची किती काळजी जालिंदरजी करतात हेच त्यामुळे अधोरेखित झाले होते. पण हाय, समाज कंटकांनी केलेल्या या ज्ञानाच्या गैरवापरामुळे ते सध्या यूट्यूबच्या अधिकार्‍यांनी काढून टाकले आहे असे कळते. काय ही अधोगती.

रेवती's picture

10 Apr 2009 - 8:53 pm | रेवती

सर्व वाचकांचे व प्रतिसादकांचे आभार!
पाककृतीतले जालिंदर गुर्जी आपण तेवढ्याच चवीने वाचलेत,
पचवलेत त्याबद्दल धन्यवाद.

रेवती

कवितानागेश's picture

22 Apr 2013 - 10:29 pm | कवितानागेश

कैरीच्या डाळीची पाकृ शोधत होते.
बघते तर काय??!!
जलजलीत डाळ मिळाली. ;)

पैसा's picture

22 Apr 2013 - 10:39 pm | पैसा

कैरीचे पन्हे गायब?

श्रीरंग_जोशी's picture

22 Apr 2013 - 10:46 pm | श्रीरंग_जोशी

पाकृ चे वर्णन जोरदार दिसत आहे.

माझा 'गणेशा' झाल्याने सध्यातरी फटू दिसत नाहीये.

समग्र जालिंदर जलालाबादी कुठे मिळेल? बिंगल्यावर केवळ इन मिन चार दुवे मिळाले त्यापैकी सदर धाग्याचा एक :-(.

जालिंदर जलालाबादींचं साहित्य नेटवर कुठलं मिळायला?
सक्त बंदी आहे त्यांचं साहित्य आंतर्जालावर आणायला.
त्यांनीच सांगितलेलं १४७ वर्षापूर्वीच. तुम्हाला खोटं वाटेल कदाचित. पण त्यांना आधीच हे सगळं समजलेलं. (म्हणजे शब्द अगदीच तेच नाहीत पण तसंच)
इंटरनेट वापराबद्दल नि एकंदर इंटरनेट वापरणारांबद्दल थोडीशी जास्तच करुणा होती.
राग येतच नाही त्यांना त्यामुळं करुणा.

बाबांचं लिखित साहित्य मिळायला काही परिक्षा उत्तीर्ण व्हावं लागतं. त्याची योग्य तर्‍हेनं जोपासना व्हावी असा हेतू.
साहित्य हवंच असेल तर उत्तराखंडला एक नवीन प्रकाशन संस्था आली आहे. मूळची आफ्रिकन आहे. त्यांनी एकोणीस श्यामसुंदर बांधवांना आणून स्वाहिली भाषेसारखीच असलेली दुसरी लीहीस्वा व अस्वलई (आपल्याकडचा अस्वल शब्द तिकडून आला. अस्वल ओरडते तेव्हा अस्वलई भाषेतले उद्गार बाहेर पडतात.) या लोकभाषांचा वापर करुन जालिंदर बाबांचं अप्रकाशित साहित्य लिखित स्वरुपात आणायचं ठरवलं आहे.

सुदैवानं आपल्याकडच्या मिसळपावच्या काही जुन्या सदस्यांनी हे सगळं छुप्या स्वरुपात बाहेर आणून थोडंसं प्रकाशित केलं त्याबद्दल त्यांचे आपण आभारच मानायला हवेत. धर्मासाठी अधर्म करावा लागतो तो असा.

कैरी मस्त झालीये रेवतीतै. पन्हे गोड मानून घेतो. बाबांच्या शिष्यांब्वानांची काही नवीन खबर असल्यास सांगणे. रंगाकाकांना नमस्कार.

श्रीरंग_जोशी's picture

23 Apr 2013 - 11:40 pm | श्रीरंग_जोशी

नमस्कार,

चारही दुव्यांचे चार चार वेळा पारायण करतो.

बोला श्री जालिंदरबाबा जलालाबादी की जय!!

रेवती's picture

23 Apr 2013 - 11:54 pm | रेवती

श्यामसुंदर बांधव?
हा हा हा. भारी हो प्यारेश्वर!

जुइ's picture

24 Apr 2013 - 12:17 am | जुइ

लेख व पाककृती छान!!चैत्रगौरीच्या हल्दि कुंकवाची आठवण झाली

रेवती's picture

24 Apr 2013 - 12:20 am | रेवती

लीमाऊजेट, पैसाक्का, श्रीरंगपंत, प्यारे१, जुइ, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

सानिकास्वप्निल's picture

24 Apr 2013 - 12:23 am | सानिकास्वप्निल

कालचं मेथांबा बनवून झालाय ,२-३ दिवसात कैरीची डाळ बनवतेच
फोटो बघून तोंपासू :)