एबीएस वाली रिक्षा

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in भटकंती
20 Apr 2013 - 1:43 pm

काल पुन्हा एकदा रिक्षाने लॉंग ड्राइव्ह अनुभवायचा योग आला. रिक्षात बसताना रिक्षा चालकाकडे एक आपली जस्ट नजर टाकली. चेहरा, स्टान्स वगैरे बघून अंदाज येतो साधारण की ही 'राइड' कशी असणार आहे ते. तेंव्हा संतुलित वाटला माणूस. अमूक ठिकाणी जाणार का? मी विचारलं. भविष्यवेत्त्याने भविष्य सांगण्याआधी जसा विचार करावा तसा एक ५-६ सेकंद विचार करून मानेला एक होकारार्थी आणि त्याचबरोबर आज्ञार्थी झटका देऊन तो रिक्षात बसला. त्या ५-६ सेकंदात काय गणित मांडलं त्याने कोण जाणे. मीही बसलो.

आपलं डावं बूड सीट च्या उजव्या भागावर स्थापून त्याने रिक्षाला किक मारलीन, खट्ट कन फर्स्ट गियर टाकला आणि झर्र्र्कन पिकप घेतला. व्हॉट अ स्टार्ट ! पहिल्याच डाव्या वळणावर मागून पुढे जाऊ पाहणा-या कार ला जे कोरणार केलंय त्याने ! तेंव्हाच कळलं, किक फक्त रिक्षाला बसली नव्हती !

सिग्नल आला. सिग्नल ला शेट थांबले. 'नशीब' असं म्हणतोय इतक्यात रिक्षा जवळ जवळ काटकोनात वळली, थेट राईट लेन ला आली, आणि बस आणि डिव्हायडर यांच्यातल्या खबदाडीतून डायरेक्ट पहिल्या पोझिशन ला येऊन उभी झाली. बसच्याही पुढे ! जस्ट वेटिंग फॉर द ग्रीन लाईट. मी सांगायला नको की ग्रीन लाईट लागल्यावर काय झालं. मग हायवे आला. आता खरी मजा!

बाकी सगळे गरीब रिक्षावाले डावीकडच्या दोन लेन मधून मूग गिळून चालले होते. त्या सगळ्यात आमची रिक्षा उजवी होती. आणि उजवीकडे होती. अख्खी रिक्षा एखाद्या मोबाईल प्रमाणे व्हायब्रेट होत होती, आणि उजव्या लेन मधून दणक्यात क्रूज करत होती. टर्बो-चार्ज्ड इंजिन असावं. समोर येणारे खड्डे त्या रिक्षावाल्याला बरोब्बर आणि स्पष्ट दिसत होते, प्रोजेक्टर हेडलाईट होते ना ! आणि ते दिसले कि तो सपकन एक छोटासा टर्न घेऊन ते चुकवत होता. अर्थात ! पॉवर स्टिअरिंग शिवाय हे शक्य आहे का? हे सगळं सुमारे सत्तर ऐंशी च्या स्पीडला. आमच्यापुढे असलेल्या गाडीला लाईट देणं चालूच होतं. साईड दिली असती तर ओव्हरटेकही केली असती म्हणा. न राहवून मी दोनदा म्हटलं त्याला की आरामात घे मित्रा घाई नाही आपल्याला. पण ते कसलं ऐकतंय ! सुसाटच चाललेलं पात्रं.

as

मग आमचं डेस्टिनेशन आलं. आलं म्हणजे, दृष्टीक्षेपात आलं. तोच ! तोच काय ! तोच पुढच्या बाईक वाल्याने ब्रेक मारला ! आणि की………क! असा आवाज करून आमची रिक्षा ५ एक फुटात थांबली. जागच्या जागी उभी. सरकली नाही की हलली नाही. इन द लाईन आणि ऑन द स्पॉट. माझ्या भीतीला समजावत मी म्हटलं, 'एबीएस आहे, त्यामुळे टेन्शन नाही.'

प्रतिक्रिया

तर्री's picture

20 Apr 2013 - 1:50 pm | तर्री

एबीएस आहे, त्यामुळे टेन्शन नाही.'
खरे की काय ?

गणपा's picture

20 Apr 2013 - 1:59 pm | गणपा

=)) भनाट लिव्हलय राव.
असे अनुभव कधी काळी घेतलेत.

प्यारे१'s picture

20 Apr 2013 - 2:42 pm | प्यारे१

मस्तच लिहीलंय!

प्रभाकर पेठकर's picture

20 Apr 2013 - 3:32 pm | प्रभाकर पेठकर

एबीएस असो नाहितर दुसरे कांही. पण रिक्षाचा वेग प्रमाणात असावा. तीन चाकांचा तो पांगुळगाडा कधी उलटेल सांगता येत नाही. माझ्या एका मित्राच्या हाताची ३ बोटे फ्रॅक्चर झाली आहेत. जीवावरचं बोटावर निभावलं.

दादा कोंडके's picture

21 Apr 2013 - 2:52 am | दादा कोंडके

तीन चाकांचा तो पांगुळगाडा कधी उलटेल सांगता येत नाही.

सहमत. रिक्षाइतकं अनस्टेबल वाहन दुसरं कुठलं नसेल. पण वाहनक्षेत्रातली लोकं बळंच जगातल्या काही निवडक लोकप्रिय मॉडेल्समध्ये बजाज च्या तीनचाकी रिक्षांना नेउन बसवतात. चांगला अ‍ॅवरेज आणि जागेचा उपयोग केलेला आहे त्यामुळे अविकसीत देशात ट्याक्सीपेक्षा बरे, पण सुरक्षेच्या दृष्टीनं काय? आमच्या जीवाला काही किंमत नाही का? टॉयोटा, जीएम पासून फोल्सव्यागन च्या ऑफीसमध्ये कुणा भारतीयांनी सुवेनीअर म्हणून दिलेल्या प्लास्टीकच्या रिक्षा बघितल्या आहेत.

अत्यंत अन्स्टेबल आणि असुरक्षित वाहन ! त्या वेळी सरकारने कशी परवानगी दिली कोण जाणे ! आज जर दीडेक लाखात न्यानो येऊ शकते तर त्या वळी दोन हजारांत नक्की आली असती. चारचाकी वाहनांत पुढेही सुधारणा होत राहिली असती.

त्या वेळचा जो कोणी मंत्री आणी सरकारी अधिकारीअसेल्क, ज्याने याला परवानगी दिलीत्याला जरुरी असेल तर स्वर्गात (?) जाऊन कारणे दाखवा नोटीस बजावली पाहिजे !

पैसा's picture

20 Apr 2013 - 6:08 pm | पैसा

पण रिक्षातून जाताना फार विचित्र अनुभव येतात. आम्ही असेच एकदा "जेट" रिक्षातून जात होतो. मी, नवरा, माझी मावशी आणि दीड वर्षाचा मुलगा. रिक्षावाल्याला हळू घे सांगूनही तो अजिबात ऐकायला तयार नव्हता. आणि अचानक बाजूच्या गल्लीतून सुसाट वेगाने एक ट्रॅक्स रस्त्यावर आली. दोघेही भयंकर स्पीडमधे होते. त्याला चुकवण्यासाठी रिक्षावाल्याने रिक्षा अचानक ९० अंशात वळवायचा प्रयत्न केला. २ गोलांट्या खाऊन रिक्षा एका बाजूवर कलंडली. आमच्या मागच्या बाजूला ठेवलेले नारळाचे पोते मावशीच्या अंगावर पडले. नवर्‍याने प्रसंगावधान राखून मुलाला आपल्या हातावर तोलून धरले. मी कुठे कशी पडले आता आठवतही नाही. जरा भानावर आले तेव्हा मुलगा आकांताने रडत होता आणि मी त्याला जवळ घेण्यासाठी आंधळ्यासारखी शोधत होते एवढंच आठवतंय. रस्त्यावरचे लोक आमची चौकशी करत आहेत हे पाहून ट्रॅक्सवाला सरळ पळून गेला.

नशीब म्हणून कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मुका मार आणि खरचटणे एवढ्यावर सगळे कसे सुटलो माहित नाही. पण त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या मनात समोरून गाडी येताना पाहिली की एक भीती दाटून येते. १५ वर्षे झाली पण त्यातून अजून बाहेर पडू शकले नाहीये.

वेल्लाभट's picture

20 Apr 2013 - 6:18 pm | वेल्लाभट

नमस्कार ज्योती,

नाही, मला कल्पना आहे की काहीवेळा; नव्हे बहुतेक वेळा हे रिक्षावाले फार रिस्की चालवतात. आणि त्यात आपल्या रस्त्यांवर मायकल शुमाकरांची कमी नाही. त्यामुळे एकंदर प्रकार फार महागात पडू शकतो. तुमचा अनुभव वाचून खूप वाईट वाटलं. अशा रिक्षावाल्यांना जबरदस्त अद्दल घडवली पाहिजे.

मी स्वतः या अशा प्रकारच्या ड्रायव्हिंग मधे कधीच क्म्फर्टेबल नसतो. त्या दिवशीही त्या रिक्षावाल्याला मी २ दा सांगण्याचा प्रयत्न केला. पण मग तो बधत नाही हे लक्षात आल्यावर शांत बसलो पण सतत लक्ष ठेवून होतो; की कुठेही अती करताना दिसला की ताबडतोब आवर घालायचा हे ठरवून.

अभ्या..'s picture

21 Apr 2013 - 1:19 am | अभ्या..

पुढ्यच्या काचेवरचं 'सिर्फ तुम' आणि मोबाइल नं., आरशावरचे रेडीयमचे दोन डोळे आणि फुल्ल बास वाला टेप असला तरच ती खरी रिक्षा. :)

एकदम पर्फेक्ट रे!!! त्यात परत शिवतेज, शिवराज, असे शब्द मागे ष्टिकररूपाने चिकटवून साईडच्या काचांवर काहीवेळेस मृत्युंजय स्टाईल कर्ण-रथाचे चाक वर काढणारा किंवा काहीवेळेस तलवार घेतलेले बाजीप्रभू किंवा अर्धाच चेहरा चितारलेले शिवराय अशी रंगरंगोटीही मस्त बघिटलोय मिरजेत. :)

पण तुझे निकष वाचून पुलंच्या "गादीचा पानवाला" आणि "अस्सल/खरा पानवाला" यांच्या लक्षणांची आठवण झाली बघ बे अभ्या :)

पाषाणभेद's picture

21 Apr 2013 - 1:47 am | पाषाणभेद

या. या. तुम्हीच बाकी होता आता.
आता येतील सारे जण आमच्यासारख्या रिक्षावाल्यांना झोडपायला. अहो पण जरा वेगात नेली रिक्षा तर लगेच जेट होते का?
तुमच्या ऑड्या, जाझ, करोला, क्रूझर, फिएस्टा झालंच तर पोलो अगदीच नाही तर सफारी, मंझा गेला बाजार स्क्रॉर्पीओ अगदीच नाही तर स्वीप्ट, अल्टो वेगाने हाकलल्या तर चालते तुम्हाला.

गाडीत (म्हणजे रिक्षात हो) टकारा स्पिकर अन झंकार सर्कीट असेल ना तर काय भन्नाट मजा येते माहीत आहे का रिक्षा चालवण्याची. नुसती झिंग. अन त्यातल्या त्यात जर का पुडी लावून बसलो ना बाप तर एकदम पायलट! हां कधीकधी मामा आडवा येतो पन मग त्याला मामा बनवावा लागते नाय तर मग पन्नास-शंभरची पत्ती गूल.

पन मजा आहे ब्वॉ या धंद्यात. साली कुनाची किटकिट नाही. आपन आपले राजे. सकाळी उठायचे, आवरलं की धंद्यावर. या कधी मधी पव्वनन्नगरच्या स्टॉपवर. तिथंच आसते आपली गाडी. काय बोल्तो?

- पाभे रिक्षावाला.

प्रभाकर पेठकर's picture

21 Apr 2013 - 2:44 am | प्रभाकर पेठकर

रिक्षावाला प्रमाणाबाहेर वेगाने रिक्षा चालवत असेल तर त्याला वेग आवरण्यास सांगावे. तरीही त्याने नाही ऐकले तर रिक्षा उभी करण्यास सांगून रिक्षा सोडून द्यावी. तेही जमत नसेल तर रिक्षाच्या आंत रिक्षाचा क्रमांक लिहिलेला असतो. तुमच्या भ्रमणध्वनीतील कॅमेराने त्याचे (रिक्षा क्रमांकाचे) छायाचित्र काढून 'पोलीसात तक्रार करतो असा दम द्यावा.' ह्याचा परिणाम होतोच होतो.
मी एकदा मुंबई विमानतळावरून घरी जात असताना टॅक्सीवाल्याने लाल सिग्नल ओलांडला.(पहाटे ५.३० वाजता). मी त्याला ताबडतोब सांगितले, 'लाल सिग्नल तोडायचा नाही. अगदी रस्त्यावर एकही वाहन नसेल तरीही थांबायचे.' त्याने ऐकले. सर्व सिग्नल व्यवस्थित पाळले. घरी सुखरुप पोहोचल्यावर तो म्हणाला,' साहेब, तुम्ही पहिले भेटलात सिग्नल पाळायला सांगणारे. बाकी सर्व प्रवासी गाडी पळवायला सांगतात. पोलीसाने पकडले तर मी दंड भरेन असा विश्वास देतात.' मी त्याला म्हणालो,' आणि अपघातात तुम्ही मेलात किंवा दोन्ही पाय तुटून जन्मभरासाठी पांगळे झालात तर तो प्रवासी तुमच्यासाठी काय करतो? स्वतःच्या कुटुंबासाठी, मुलांसाठी जीवाला सांभाळा. असा प्रवासी आग्रह करू लागला तर त्याला अर्ध्या रस्त्यात उतरवून टाका. भलत्या मोहाला बळी पडू नका.' पटलं असावं त्याला.

स्तुत्य! असं सांगितलं पाहिजेच आणि केलंही पाहिजे.
मागच्याने कितीही होर्नचा शंख केला तरीही. मग तावातावाने ओव्हरटेक करून जाताना (सिग्नल लालच असताना) तुम्हाला काहीबाही बोलला तरीही तुम्ही गौतम बुद्धासारखं फक्त सिग्नल कडे बोट करून त्याच्याकडे बघत बसावं. जाम जिरते साल्यांची.

टवाळ कार्टा's picture

21 Apr 2013 - 9:46 am | टवाळ कार्टा

=)) =)) =))
हे बरेच वेळा केले आहे...बर्याचदा मागे रिक्शाच असते :)

बाबौ! अशा रिक्षा असतात. वेगात चालवणे- रिक्षा व मिटर दोन्ही, गाणी लावणे, एक तेरा सहारा, अण्णांची कृपा या सारखे प्रकार वाहनावर गोंदवून घेणे, मनात येईल तसे वळणे, ओलांडणे, तोडणे इ. असे फक्त पुण्यातच आहे वाटल्याने आधी अभिमान तरी होता पण इतर गावच्या रिक्षावाल्यांनी कॉपी मारलीन् (त्या गावचे लोकच सांगतात). चेन्नैच्या रिक्षावाल्यांनी तर अस्सा हिसका दावलाय की बात नको!दिल्लीकर रिक्षावाल्यानीही फसवून झाले आहे.
पुण्यात माझ्या घरापासून माहेरापर्यंत साठ ते एकशेवीसपर्यंत कितीही रुपये एका भारतवारीत दिले आहेत. भांडणे, बा चा बा ची, बघे गोळा होईपर्यंत करून झाले. पण मेले ऐकत नाहीत. माझी मैत्रिण उलटलेल्या रिक्षाखाली होती तर बघे फक्त चर्चा करत बसले होते. एखाद्या मिनिटात तिने स्वत:ला अपघातातून सावरले आणि दुसर्‍या बाजूने सरपटत बाहेर आली तरी लोक आपली चर्चा करतायत की आतल्या मुलीला कसे काढायचे. ;) एकदा तर एक रिक्षेवाला निलायम टॉकीजच्या समोरून जाताना शिनेमाचे पोस्टर बघत चालवत होता. मला भीती हीच की आपटतोय का. काही नाही बरे नेलेन्.

सामान्यनागरिक's picture

11 Oct 2014 - 6:17 pm | सामान्यनागरिक

घाबरु नका एक अत्यंत कडक कायदा येतोय ! इतका की कडक की लघुसंदेशात आलेल्या त्यातल्या तरतुदी वाचुनच घाम फुटला. अर्थातच बाहतुक पोलीसांना पाचवा वेतन आयोग लागु न करता यातुनच त्यांनातिप्पत्ट कमाईची शाश्वती आहे.

वेल्लाभट's picture

21 Apr 2013 - 7:40 am | वेल्लाभट

रिक्शातलं आणि रिक्शावरचं साहित्य; त्यातले डेक, आणि त्यात वाजणारी गाणी हा एक स्वतंत्र विषय आहे आणि त्याची व्याप्ती खूप मोठी आहे हो ! मी बसलेलो ती रिक्शा त्यांपुढे काहीच नाही.
'तशा' रिक्शा शोधून शोधून त्यात बसलेलो आहे मी. त्यासाठी ५-७ सामान्य रिक्शा सोडायलाही पुढे मागे बघितलेले नाही कधी. पण रिक्शा हवी तर 'गादीवाली-गाणीवाली'

सविस्तर नंतर सांगेन त्याबद्दल.

सुज्ञ माणुस's picture

22 Apr 2013 - 2:49 pm | सुज्ञ माणुस

किक फक्त रिक्षाला बसली नव्हती ! :) :)

तुमचा अभिषेक's picture

11 Oct 2014 - 6:39 pm | तुमचा अभिषेक

छान लेख

पुण्यातले माहीत नाही, पण मुंबईतले रिक्षावाले एकेकाळी ईथून तिथून मिथुनची स्टाईल मारायचे. मग रजनीकांतची मारू लागले. त्यानंतर रवीकिशन वगैरे. हल्लीची कल्पना नाही पण मराठी लोकांनी या धंद्यात मोठ्या संख्येने उतरणे गरजेचे एवढे नक्की.

शेअर रिक्षा हा एक आणखी भन्नाट प्रकार,
यात मागे तीन कोंबून बसलेले असतातच. भले मग ते कोणत्याही साई़जचे प्रवासी असोत, क्वांटींटी नंबरमध्ये तीनच. याउपर रिक्षावाल्याच्या ७० टक्के सीटवर चौथा पॅसेंजर बसवला जातो. उरलेल्या ३० टक्केवर रिक्षावाला प्रभूदेवाच्या वरताण कंबर लचकवून बसतो आणि त्याच पोजिशनमध्ये ट्राफिकमध्ये वाट शोधत, सिग्नलचे नियम धाब्यावर बसवत रिक्षा चालवतो. सिग्नल चुकवायच्या नादात वेळप्रसंगी हायवेवरच्या वॉल्वो बसेसना देखाल कट मारून जायची हिंमत असते यांच्या अंगात हे विशेष.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Oct 2014 - 7:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

जस्ट वेटिंग फॉर द ग्रीन लाईट. आँ ???!!!

हा नक्कीच पुण्यातला रिक्षावाला नाही ! पुण्यात लाईट ग्रीन होईपर्यंत वाट पाहणे हे भ्याडपणाचे लक्षण समजले जाते... आणि या मोहिमेत पुणेरी रिक्षावाल्यांचा एक लंबर्चा सिंहाचा वाटा आहे... खबर्दार जर कोणी त्याला धक्का लाव्ला तर्र ;) :)