फणस पुलाव

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
23 Mar 2013 - 3:51 pm

साहित्यः बासमती तांदुळ अर्धा कि., एक मध्यम फणसाची कुयरी, एक वाटी ओले खोबरे, दहा-बारा लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, एक वाटी दही, चार कांदे, एक तमालपत्र, दोन काड्या दालचिनी, ७-८ काळी मिरी, दोन चमचे जिरे, चार ओल्या मिरच्या, दोन मसाला वेलची, ओले काजूगर एक वाटी, दोन चमचे गरम मसाला, तूप, मीठ.
क्रुती: तांदुळ धुवून निथळत ठेवावे. फणस चिरून वाफवून घ्यावा. कांदा उभा चिरावा. तांदुळ निथळले की तुपावर परतून दुप्पट पाणी व मीठ घालून दोन शिट्या करून घ्याव्यात. वाफ जिरली की भात ताटात पसरून गार करत ठेवावा. आले, लसूण, खोबरे थोडे पाणी घालून वाटून घ्यावे.
कढईत तूप तापत ठेवावे. त्यात ओल्या मिरच्यांचे तुकडे, जिरे, काळी मिरी, तमालपत्र, वेलची, दालचिनी टाकावे.एक मिनीट परतावे. कांदा घालावा. पारदर्शक होईपर्यंत परतावा. वाट्लेले आले, लसूण, खोबरे घालून परतावे. दही घालून परतावे. गरम मसाला घालावा. चिरून वाफवलेला फणस आणि ग्रेव्हीच्या प्रमाणात मीठ घालावे. ग्रेव्ही पातळ वाटत असल्यास थोडा वेळ गॅसवर ठेवून दाट करून घ्यावी. काजूगर मिसळावे. आता मोकळा केलेला भात ग्रेव्हीत नीट मिसळून घ्यावा. कडेने तूप सोडून झाकण ठेवावे. दहा मिनीटे छान वाफ येऊ द्यावी. गरमागरम फणस पुलाव दही रायते किंवा सूप बरोबर वाढावा.Fanas Pulav

प्रतिक्रिया

अनन्न्या's picture

23 Mar 2013 - 3:53 pm | अनन्न्या

Fanas Pulav

धनुअमिता's picture

23 Mar 2013 - 4:19 pm | धनुअमिता

पहिल्यांदाच हयाप्रकारचा पुलाव बघितला. चविलासुद्धा छान लागत असेल.

खादाड's picture

23 Mar 2013 - 4:41 pm | खादाड

पण तयार पुलाव दिसत नाहीये !! का जो पहिला फोटो आहे तोच आहे ?

मोबाइल अपलोड असल्यामुळे क्लिअर दिसत नाहीय. आणि ग्रेव्हीचा रंग फणसासारखाच आल्यामुळे त्यात फणस कळत नसावा बहुतेक!! चवीला मस्तच लागतो.

दिपक.कुवेत's picture

23 Mar 2013 - 5:53 pm | दिपक.कुवेत

नेहमीच्या पुलावा पेक्शा वेगळा प्रकार दिसतोय. तमालपत्र ओलं आहे का? हिरवं दिसतय म्हणुन?

अनन्न्या's picture

23 Mar 2013 - 6:09 pm | अनन्न्या

म्हणून मी ताजंच वापरते. स्वाद छान येतो आणि कमी पुरते.

दिपक.कुवेत's picture

23 Mar 2013 - 6:41 pm | दिपक.कुवेत

बाकि तु रत्नांगीरित असल्यामुळे घरच्या बागेची जोड असेल मग तर काय सोने पे सुहागा :). आंबे यायला लागले का?

५० फक्त's picture

23 Mar 2013 - 6:48 pm | ५० फक्त

फण्स आवडत नाही, त्यामुळं गपचिप भात तुप आणि मिठ खाल्लं जाईल.

हो. बागेत दालचिनीचं झाड आहे, - पण हे लिहुन जळवायची काय गरज होती का ?

अगदी वेगळा पुलाव असल्याने आश्चर्य वाटले. छान.

स्वाती दिनेश's picture

23 Mar 2013 - 9:43 pm | स्वाती दिनेश

वेगळाच पुलाव दिसतो आहे..छान!
स्वाती

सानिकास्वप्निल's picture

23 Mar 2013 - 10:03 pm | सानिकास्वप्निल

छान आहे पाकृ :)

प्यारे१'s picture

23 Mar 2013 - 10:38 pm | प्यारे१

मस्त दिसतोय!

दीपा माने's picture

24 Mar 2013 - 2:48 am | दीपा माने

नविन पुलाव प्रकार आवडला. इथे ओले काजु मिळत नाहीत तर सुके काजु भिजवुन घातले तर योग्य चव काजुंची लागेल का?

कच्ची कैरी's picture

24 Mar 2013 - 10:19 am | कच्ची कैरी

छान आणि नविन !

पैसा's picture

24 Mar 2013 - 10:36 am | पैसा

पण मस्त लागेल यात काय संशय!

धमाल मुलगा's picture

24 Mar 2013 - 10:37 am | धमाल मुलगा

फणसपोळीपर्यंत माज देशावरल्याची धाव होती, फणस-पुलाव? :) लै खस!

फणसाची पाककृती म्हणलं की कितीही नाही म्हणलं, तरी आमच्या शैलजा आजीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. तशी ती माझ्या मित्राची आजी..त्याच्या आईची आई! पण तिचा माझ्यावर अन माझ्या बायकोवर भारी जीव. शैलजाआजीच्या हातची फणसाची भाजी खाऊनच वेडा झालो होतो :)

अत्रुप्त आत्मा's picture

24 Mar 2013 - 11:12 am | अत्रुप्त आत्मा

पुलाव मस्तच झालाय. :-)
पण अता एकदा फणसाच्या भाजीची
(अगदी चिरण्यापासुन) पाककृती टाका...

बाकी कोकण-स्थ मंडळींनि(ही) टाकली तरी चालेल. ;-)

फणसाची भाजी ऐकली आहे पण फणासाचा पुलाव?
नविनच.
फार छान दिसतो आहे.

फणस भयानक आवडतो. त्यामुळे हा पुलाव पण नक्कीच आवडेल.
पण फणसाचा अतिशय गोड वास मसाल्याच्या चवींना मारून टाकत नाही का?

अनन्न्या's picture

24 Mar 2013 - 3:18 pm | अनन्न्या

@ दिपक, मी शहरात राहते, त्यामुळे आमची घराभोवतीची छोटी बाग आहे. एक आंब्याचेही झाड आहे. पहिल्यांदा थोडे आंबे लागलेत. बाकी बाजारात येऊ लागलेत आंबे!!
@ ५० फक्त, कधी आलात रत्नागिरीला तर देईन तुम्हाला घरचे जायफळ, मिरी, तमालपत्र!!
@दीपा माने, सुके काजू भिजवून वापरता येतील. चव म्हणाल तर ओले काजूगर ते वेगळेच!!
@वल्ली, कच्च्या फणसाची भाजी नाही का होत? तसाच छान लागतो पुलाव. करून पहा.
@ पैसा, रत्नागिरीला या की, करून खाऊ घालते पुलाव!!

गौरीबाई गोवेकर's picture

11 Apr 2013 - 2:10 pm | गौरीबाई गोवेकर

फणसाची बिर्यानी पण छान होते. कृती साधारण नेहमीच्या बिर्याणीचीच पण चिकन ऐवजी वाफवलेला फणस वापरायचा. मसालाही तोच. फक्त शिजायला जरा नेहमीपेक्षा वेळ लागतो.

शुचि's picture

12 Apr 2013 - 7:43 pm | शुचि

कल्पना भारी वाटते.

वाह.. फणसाचे सगळेच प्रकार आवडतात, त्यामुळे हा पुलावही आवडणारच :)
मी ही रत्नागिरीचा, आमच्या घरीही दालचिनीचं झाड आहे. इतर मसाल्यांचीही आहेत. त्यामुळे हिरवी तमालपत्रे, झाडावरुन तोडून आणलेला कडीपत्ता असले चोचले पुरवता येतात.

मस्तच !! आमची मजल फणसाच्या भाजीपर्यंत, पुलाव एकदा करुन बघायला हवा.

अनवट पाककृती. चविष्ट असणार, वादच नाही.