मेथीगोळ्यांचे सांबार

Primary tabs

रेवती's picture
रेवती in अन्न हे पूर्णब्रह्म
6 Feb 2013 - 7:05 am

घरात असलेले 'स्वयंपाक' हे सिंधूताई साठे यांचे पाककलेचे पुस्तक माझ्यासाठी महत्वाचे असले तरी त्यातले मेथीगोळ्यांचे सांबार तसे दुर्लक्षितच राहिले होते. फार खटाटोपाची पाककृती वाटल्याने तसे झाले. तीन चार वर्षांपूर्वी भरपूर वेळ हाताशी ठेवून हे सांबार केले आणि ही पाककृती आधी का केली नाही अशी चुटपुट मनाला लागली. वाटले तेवढी वेळखाऊ पाकृ नसल्याने मी येईल त्याला मेथीगोळ्यांचे सांबार करून घालण्याचा सपाटा लावला होता. मिपाकरांसाठी आज ही पाकृ घेऊन आले आहे. आवडल्यास सर्व श्रेय लेखिकेचे.

साहित्य: २ वाट्या धुवून चिरलेली मेथी, तीन मोठे चमचे डाळीचे पीठ (बेसन), एक मोठा चमचा कणीक, एक चमचा गार तेल मोहनासाठी, तिखट, मीठ, हळद असे अगदी कमी पाण्यात भज्याच्या पिठापेक्षा घट्ट भिजवावे.

वाटणासाठी मिक्सरमध्ये आधी एक मोठा चमचा भाजलेली खसखस वाटून घ्यावी. त्यातच अर्धा मध्यम आकाराचा कांदा, इंचभर आलं, लसणीच्या चार मोठ्या पाकळ्या व तिखटपणानुसार दोन ते तीन हिरव्या मिरच्या असे सगळे वाटून घ्यावे. एक टोमॅटो चिरून घ्यावा. फोडणीचे साहित्य, एक चमचा गोडा मसाला, गूळ, चिंच कोळ, दोन मोठे चमचे दाण्याचे कूट, दोन मोठे चमचे तिळाचे भाजून केलेले कूट.

कृती: कढईत तीन मोठे चमचे तेलाची फोडणी करून त्यात वाटण घालून चांगले परतावे. तेल सुटेपर्यंत परतण्याची गरज नाही. त्यात तीन कप पाणी घालावे. पाण्यास उकळी आली की चिंच, गूळ, गोडा मसाला, दाण्याचे व तिळाचे कूट, तिखट, मीठ घालावे. चिरलेला टोमॅटो घालून उकळी येऊ द्यावी. हे सांबार झाले.
आता कढईत वाटीभर तेल गरम करून त्यात वरील भिजवलेल्या पिठाची सुपारीएवढ्या आकाराची भजी तळावीत. सांबारात ही छोटी भजी घालून गरम करावे व लगेच उपयोगात आणावे. जेवणास वेळ असेल तर मात्र वेगवेगळे ठेवावेत. ही भजी सांबारात घातल्यावर मोठी होतात त्यामुळे करतानाच ती लहान करावीत. अतिशय चविष्ट असे सांबार भात किंवा पोळी दोन्हीबरोबर चांगले लागते.

टीप: मेथीला मिठामुळे पाणी सुटते हे लक्षात असू द्यावे व लागेल तसे वरून पाणी शिंपडत पीठ भिजवावे.

a

प्रतिक्रिया

सानिकास्वप्निल's picture

6 Feb 2013 - 7:17 am | सानिकास्वप्निल

मेथीगोळ्यांचे सांबार कधी खाल्ले नाही, नेहेमीच गोळ्यांचे सांबार घरी बनत असे.
फोटो तर छानच आहे आणी सांबारात मेथीची चव अप्रतिम लागेल ह्यात शंकाच नाही :)
खमंग व उत्कृष्ट अशी पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद रेवती :)

श्रीरंग_जोशी's picture

6 Feb 2013 - 7:35 am | श्रीरंग_जोशी

प्रथमच ऐकतोय.

फारशा प्रचलित नसलेल्या पदार्थाची पाककृती दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.

तर्री's picture

6 Feb 2013 - 9:08 am | तर्री

मला मेथीचे सगळे पदार्थ आवडतात आणि म्हणून ही पाकृ आवडली.

मेथीची भजी मला आवडतात, तेव्हा हा पदार्थही आवडणार...

पैसा's picture

6 Feb 2013 - 9:25 am | पैसा

पारंपारिक असावे पण फारसे प्रचलित नाही. एकदम झक्कास पाकृ.

हेच म्हणतो. मस्त दिसतंय. आजीच्या खास पदार्थांपैकी एक असावं तशा टाईपचं. पण कधी ऐकलंखाल्लं नाहीये. आता करुन पहायलाच पाहिजे...यातले घटक पाहता ते न आवडण्याचा प्रश्नच येत नाही...

पाकृबद्दल धन्यवाद..

परिकथेतील राजकुमार's picture

6 Feb 2013 - 9:40 am | परिकथेतील राजकुमार

ह्या पाकृ बद्दल पहिल्यांदाच ऐकले आणि अनुभवले.

बाकी तीन चार वर्षांपूर्वी केलेली पाककृती आज देण्याचा हेतू कळला नाही. :P

आज्जे हे मला खाउ नाही घातलंस कधी?

क्रान्ति's picture

6 Feb 2013 - 10:49 am | क्रान्ति

आवडली पाकृ. नक्की करून बघणार.

त्रिवेणी's picture

6 Feb 2013 - 10:50 am | त्रिवेणी

मस्त पाककृती.गोळे न तळता रस्साला उकळी आल्यावर टाकले तर चालेल ना. मेथीची भजी तळतानाच सपून जाईल.

कवितानागेश's picture

6 Feb 2013 - 11:22 am | कवितानागेश

ते मेथीच्या भज्यांचे प्रमाण तिप्पट करुन घ्या. थोडी भजी उरतील ती सांबारात टाका. :)

मी कसूरी मेथी वापरुन बघेन.

>>गोळे न तळता रस्साला उकळी आल्यावर टाकले तर चालेल ना.
हम्म तसंही छान लागेलसं वाटतंय. पण तसं करताना डाळीच्या पीठाऐवजी डाळ भिजवून वाटून वापरली तर अधिक छान होईल असा आपला माझा अंदाज !!

निवेदिता-ताई's picture

6 Feb 2013 - 3:13 pm | निवेदिता-ताई


गोळे न तळता टाकले तर

............हे हे हे .............गोळे आणी सांबारची अशी काही आम्टी होईल, की बसा भुरके मारत.........

विवेकपटाईत's picture

24 Nov 2015 - 7:59 pm | विवेकपटाईत

कृती आवडली. बेसनाच्या एवजी, उडदाची डाळ भिजवून , वाटली कि त्यात पालक, मेथी किंवा अन्य कुठलीही आवडती भाजी गोळे करून उकडत्या पाण्यात टाकली कि गोळे फुटण्याची शक्यता कमी. (तेल वाचते) सौ. अश्याच पद्धतीने संभार किंवा नुसती बाही (खोबरं, चिंचेचा कोळ, गुळ टाकून करते).

सूड's picture

24 Nov 2015 - 8:18 pm | सूड

गोळ्यांची आमटी करताना तरी कुठे वाफवत तळत बसतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Nov 2015 - 8:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

गोळे न तळता वाफवून टाकले तरी चालतात (आमची आई तसे करायची). तसेच कच्चे गोळे रश्श्यात टाकले तर ते विरघळून पिठले होईल :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Nov 2015 - 8:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे हो ! पाकृ भन्नाट आहे आणि आवडती आहे !!

दिपक.कुवेत's picture

6 Feb 2013 - 12:06 pm | दिपक.कुवेत

खुप छान पाकॄ....ईथे अजुन मेथीचा सीजन आहे तोवर करुन बघायला हवी! खसखस घातली नाहि तर चवीत कितपत फरक पडेल? ईथे ती मिळण जरा कठिण आहे....बाकि डिश एकदम टेम्टिंग दिसतेय.

प्रभाकर पेठकर's picture

10 Feb 2013 - 1:24 am | प्रभाकर पेठकर

आखती प्रदेशात खसखशीवर बंदी आहे. दुबईत तर सामानात खसखस मिळाली म्हणून ३ भारतियांना १०-१० वर्षांची कैद झाली आहे. तेंव्हा आखाती प्रदेशात कुठल्याही कारणाने भेट द्यायचा प्रसंग आला तर समस्त मिपावासियांनी ही गोष्ट मनावर कोरून ठेवावी आणि कुठल्याही प्रकारची खसखस किंवा खसखशीचे पदार्थ घेऊन येणे टाळावे. जसे, अनारसे, बाखरवडी किंवा आपल्याला 'ह्यात खसखस आहे हेही माहीत नसलेला' एखादा पदार्थ जसे एखादे औषध, केक, बिस्किटं इ.इ. आणू नये.कुठे कोणी चोरून विकत असेल तरी घेऊ नये. असो.

खसखस घातली नाही तर चवीत विषेश फरक पडत नाही. खसखस मुख्यत्वे करून कालवण (ग्रेव्ही) घट्ट करण्यासाठी वापरण्यात येते. त्यामुळे टाळल्याने विषेश फरक पडणार नाही.पण कालवणाच्या घट्टपणाचा परीणाम साधायचा असेल तर तांदूळाचे किंचित पीठ पाण्यात कालवून मिसळावे किंवा उकडलेला बटाटा पाण्यात मिसळून (मिक्सरमध्ये घुसळून) कालवणात घालावा आणि कालवणाला गरजेनुसार घट्टपणा आणावा.

मृत्युन्जय's picture

6 Feb 2013 - 12:14 pm | मृत्युन्जय

मेथीगोळ्यांचे सांबार पहिल्यंदाच बघितले. अर्थात गोळ्यांची आमटी घरी नेहमीच होते आणि लै जबरी लागते हे ही खरे.

स्वीटी's picture

6 Feb 2013 - 12:37 pm | स्वीटी

मस्तच आहो..

अत्रुप्त आत्मा's picture

6 Feb 2013 - 12:38 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.easyfreesmileys.com/smileys/free-party-smileys-788.gif

अतृप्त च्या प्रतिसादाच्या खाली प्रतिसाद लिहिताना ते वर भुरकत असलेले सांबार सांडेल की काय अशी भिती वाटतेय.

मस्त वाटतेय रेसिपी. नक्की करेन.

कच्ची कैरी's picture

6 Feb 2013 - 5:30 pm | कच्ची कैरी

मेथी गोळ्यांचे सांबार खाण्याचा योग कधी आलाच नाही ,आता नक्की नक्की करून बघेल .
http://mejwani.in/

ऋषिकेश's picture

6 Feb 2013 - 6:05 pm | ऋषिकेश

ऐकावे ते नवेच!
करून बघायला पाहिजे

मदनबाण's picture

6 Feb 2013 - 6:21 pm | मदनबाण

अय्यो अक्का,ये क्या जी... गोळावाला सांबार ! यकदम टेस्टी दिखताजी... :)
गोळावाला आमटी में टेस्ट किया जी,लेकिन ये मेथीवाला सांबार कुछ अलग दिखता जी ! ;)

आवडल्यास सर्व श्रेय लेखिकेचे.
अय्यो... अक्का नेक्स्ट आयटम मेथी पराठा क्या जी ? ;) उसके लिये हम तुमको इन आडवान्स श्रेय दे देता हयं. ;)

(सांबार प्रेमी मदनअण्णा) ;)

अरे ..... एकदम वेगळीच आहे ही पाककृती.....!!
एकदम मस्त रसरशीत दिसतेय.. !!
मेथीचा सिझन आहेच. करुन बघायला हवी :)

अभ्या..'s picture

6 Feb 2013 - 7:02 pm | अभ्या..

मेथी हाय ना. ब्येस्ट मग.
स्व्तः करुन खाणेबल असल्याने लैच आवडली आहे.
धन्यवाद

खतरा पाककृती वाटते आहे.
भाजीत भाजी मेथीची :) ..... मेथी फार आवडते.

चिंतामणी's picture

6 Feb 2013 - 11:16 pm | चिंतामणी

फोटो एकदम खतरा आहे.

जेवण झाले आहे तरी भुक लागली.

(अवांतर- पहिल्याच ओळीत श्रेय/ प्रेरणा कोणाची हे आपला स्वभाव दर्शवते.)

सर्व प्रतिसादकांना धन्यवाद.
परा, यावेळी तू तलाश सिनेमा पाहून परिक्षण टाकले नाहीस त्यामुळे माझा तो पहायचा राहिला. आता तुझ्यावर अवलंबून राहणार नाही.
प्रभो, आता येशील तेंव्हा करीन.
त्रिवेणी, भजी तळूनच सांबारात घालावीत नाहीतर त्याचे पिठले होईल.
दिपक कुवेतकर, खसखस मिळतच नसेल तिकडे तर ठीक आहे, चवीत थोडा फरक तर पडेलच पण पदार्थ खाण्याजोगा नक्की होईल.
प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्वांचे पुन्हा आभार.

परिकथेतील राजकुमार's picture

7 Feb 2013 - 10:29 am | परिकथेतील राजकुमार

माफी असावी __/\__

परा, यावेळी तू तलाश सिनेमा पाहून परिक्षण टाकले नाहीस त्यामुळे माझा तो पहायचा राहिला. आता तुझ्यावर अवलंबून राहणार नाही.

इथे चित्रपट सोडा, पण चित्रपटाची पोस्टर्स देखील दृष्टीला पडत नाहीत अशा ठिकाणी आलो आहे.

चित्रपट बघायचा असेल तर कमीत कमी ७० कि.मी. लांब पोरबंदरला जावे लागते. आणि येवढा वेळ आणि पैसा खर्च करण्या येवढ्या लायकीचे अमिरचे चित्रपट नसतात असे आमचे प्रांजळ मत आहे. त्यातून अल पचीनोचा 'Insomnia' पाहिलेला असल्याने, तलाश मध्ये अजून वेगळे काय पाहणार होतो ? ;)

ठीक आहे. मग आता इन्सोमनियाच पाहते.
आणि तुला आमिर आवडत नाही? हैश्शा!

अनन्न्या's picture

7 Feb 2013 - 7:33 pm | अनन्न्या

खाऊन झाल्यावर चव सांगते.

खुप छान पाकॄ रेवती.... करुन बघणार आहे मी लवकरच... सद्ध्या ह्या जॉबमुळे काहि वेळ मिळत नाही... खुप miss करतीये नविन पाकॄ करणे.. पण आपल्या अन्न हे पुर्णब्रम्ह मुळे महिन्यातुन एकदा तरी काहितरी करायला वेळ काढते.

nishant's picture

8 Feb 2013 - 3:50 am | nishant

खुप छान पाकॄ,

पियुशा's picture

8 Feb 2013 - 10:18 am | पियुशा

मस्त दिसतेय :)

प्रभाकर पेठकर's picture

10 Feb 2013 - 1:29 am | प्रभाकर पेठकर

मेथी अत्यंत आवडती भाजी. त्यात आता तर त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे आहारात समाविष्ट आहेच. ह्या पाककृतीत नाविन्य आहे. चित्ताकर्षक छायाचित्रामुळे तर काही पर्यायच राहिला नाही, नक्कीच केली जाईल.

दिपक.कुवेत's picture

13 Feb 2013 - 2:57 pm | दिपक.कुवेत

खसखस घालण्याचा मुख्य हेतु आज कळला :) आणि त्याला पर्यायी उपाय पण.

प्यारे१'s picture

13 Feb 2013 - 5:29 pm | प्यारे१

मस्तच....!

स्मिता.'s picture

13 Feb 2013 - 5:37 pm | स्मिता.

फोटो बघूनच तोंपासु. पाकृ वाचून चवीलाही मस्तच लागत असणार असं वाटतंय. कृती फार वेळखाऊ वाटत नाही फक्त मेथी मिळणं महत्त्वाचं!

ह्याच रवीवारी केली...अप्रतीम चव :)

रेवती's picture

6 Mar 2013 - 2:20 am | रेवती

उत्साहाने पाकृ ट्राय केल्याबद्दल धन्यवाद बोकोबा!

चिंतामणी's picture

14 Feb 2013 - 8:46 am | चिंतामणी

आणि गरम गरम भाताबरोबर खाल्ले.

हाणले हा शब्द जास्त योग्य होइल इथे.

भन्नाट चव आली होती.

अरेच्च्या! तुम्हीही ही पाकृ करून बघितली हे नजरेतून सुटले. कळवल्याबद्दल आभार चिंतुकाका!
प्रतिसाद उशिराने पाहिल्याबद्दल माफ करा.

श्रिया's picture

14 Feb 2013 - 11:26 am | श्रिया

छान रेसिपी, आवडली.

धनुअमिता's picture

22 Feb 2013 - 1:35 pm | धनुअमिता

अप्रतिम आहे रेसिपी. करुन बघण्यात येईल.

हे पहा केलं.. फस्क्लास झालं.. धन्यु रेवती ताई..
a

रेवती's picture

4 Mar 2013 - 7:03 pm | रेवती

ओह्हो! छानच! धन्यवाद.

पिलीयन रायडर's picture

4 Mar 2013 - 7:43 pm | पिलीयन रायडर

मी पण केले.. आणि सगळ्यांना अतिशय आवडले...!!!
अत्यंत धन्यवाद ह्या मस्त रेसेपी साठी......!!!!!!!!!!!

रेवती's picture

4 Mar 2013 - 8:30 pm | रेवती

आज मी एकदम ह्याप्पी!
कळवल्याबद्दल धन्यवाद.

सानिकास्वप्निल's picture

6 Mar 2013 - 5:07 am | सानिकास्वप्निल

छानच झाले ... एकदम चविष्ट आणी मुख्य म्हणजे स्वप्निलला खूप आवडले :)
धन्यवाद गं

कळवल्याबद्दल धन्यवाद सानिके!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Mar 2013 - 8:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे वा....! मेथीगोळ्याचे सांबार भारी दिसतंय. अनेकांनी पाककृती करुन बघितली त्याचंही कौतुक वाटलं.
आमच्याकडे मेथीगोळ्याचा प्रस्ताव टाकून बघतो. मंजूरी मिळाली तर फोटो डकवीन म्हणतो.

-दिलीप बिरुटे

रेवती's picture

6 Mar 2013 - 8:26 pm | रेवती

आम्ही फोटूची वाट पाहू.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Mar 2013 - 9:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मेथीगोळ्याचे भजे झाले पण सांबार पांगायचा अंदाज दिसतो. मेथीगोळ्याचे भजे हादाडले.
अगं माय गं लैच कडवट लागले. सांबार यशस्वी झाले तर बाकीचा फोटू देण्यात येईल नसता यावरच समाधान मानावे. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Mar 2013 - 10:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यज्ञशिष्टाशिन:सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषै:
भुज्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात....

अहं वैश्वानरो भूत्वा....
प्राणापानसमायुक्तः पचाम्यनं चतुर्विधम्

-दिलीप बिरुटे

प्रयोग करून पाहिल्याबद्दल धन्यवाद सर!

खादाड_बोका's picture

10 Mar 2013 - 2:20 am | खादाड_बोका

रेवती ताई ...ही पहीली पाकक्रुती आहे, जी मी लागोपाठ दुसर्या विकांताला सुद्धा केली.
वाह वाह्....अती जेवुन मन त्रूप्त झाले. अनेक धन्यवाद आपल्याला

रेवती's picture

10 Mar 2013 - 8:17 pm | रेवती

छान हो बोकोबा!

रुपी's picture

24 Nov 2015 - 3:50 am | रुपी

मी बरेच दिवस वाचनखूण म्हणून साठवून ठेवली होती. काल करुन पाहिली. खूपच छान झाले. फोटो काढण्याइतपतही धीर धरवला नाही !

एका वेगळ्या पाकृसाठी धन्यवाद!

मस्त पाकृ.नक्की करून पहाणार.

कळवल्याबद्दल धन्यवाद रुपी.
प्रतिसादाबद्दल आभार भिंगरीतै.

मांत्रिक's picture

24 Nov 2015 - 6:32 am | मांत्रिक

क्लासच पाकृ. आज करतोय. सुदैवाने इकडे ठाण्यात सध्या अगदी कोवळी, गोल पानांची, गोडसर देशी मेथी येऊ लागल्ये नुकतीच.

काय सांगता!! ठाण्यात कुठे हो?

सध्या एका प्रचंड मोठ्या मेथीच्या जुडीमुळे मेथीसप्ताह सुरु आहे.आता हे सांबार करून संपवतेच.धन्स रेवाक्का!

पद्मावति's picture

24 Nov 2015 - 12:05 pm | पद्मावति

अरे वाह, मस्तं पाककृती. फोटोही खूप छान आलाय.
वीकेंड्ला नक्की करून बघिन.

वेल्लाभट's picture

24 Nov 2015 - 12:11 pm | वेल्लाभट

खलास्स्स्स

करणार

मधुरा देशपांडे's picture

24 Nov 2015 - 8:05 pm | मधुरा देशपांडे

हा धागा वर आणणार्‍यांचे आभार्स. रेवाक्का हे पुस्तक आहे माझ्याकडेसुद्धा, बघते आणि करते, फक्त मेथी मिळायला हवी.