नमस्कार मंडळी,
काही दिवसापूर्वीच ई-सकाळमधल्या ह्या baatamee ने लक्ष वेधले आणि समाजातल्या काही घटकांच्या तरी जाणिवा अजूनही जागृत आहेत याचा एक सुखद प्रत्यय आला.
ही गोष्ट आहे पुण्याजवळच्या हडपसर मधील डॉ. गणेश राख यांची आणि त्यांनी चालू केलेल्या एका जगावेगळ्या आणि सेवाभावी उपक्रमाची. अतिशय गरीबीतून आणि कष्टातून पुढे आलेल्या डॉ राख यानी आपल्या व्यवसायाच्या आत्ता घटत चाललेल्या नीतिमत्तेची आणि आदर्शाची बूज ठेवत चालू केलेल्या ह्या उपक्रमाने समाजातल्या विझत चाललेल्या माणुसकीचा एक गहिवर आणून दिला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
मुलगी जन्माला आल्यानंतर जणू दुःखच जन्माला आले, या भावनेने लेबर रुममध्ये रडणारी आई आणि तिचे नातेवाईक... पुढे बिल भरण्यावरून सासर-माहेरच्यांचे वाद... कोणाही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारे रुग्णालयातले हे चित्र... डॉ. गणेश राख यांनी ते बदलायचे ठरवले आणि गेले वर्षभर ते मुलगी जन्माला आल्यानंतर बाळंतपणाचे बिलच घेत नाहीत.
आजवर गेल्या वर्षात सुमारे १३६ प्रसूती त्यांनी विनामोबदला केल्यात! साधारणपणे, एका प्रसूतीमागे होणारे अंदाजे १० हजार रु. बिल धरले तर जवळपास १३-१४ लाख रु.चे स्वतःचे नुकसान त्यांनी आनंदाने सहन केले आहे. खोट्या-खोट्या कारणावरुन रुग्णांना लुटणार्या आणि बिल द्यायला उशीर केला इ. कारणावरुन गोरगरीब रुग्णांची अडवणूक करणार्या आमच्या दुसर्या व्यवसायबंधूंना आपण कशासाठी हा व्यवसाय करायचा असतो त्याची जणू आठवणच करुन दिली आहे.
डॉ राख यांचे आणि त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन!
या निमित्ताने काही प्रश्न उभे राहातात-
१. ज्या प्रसूता स्त्रियांना आणि त्यांच्या कुटुंबाना या सेवेचा लाभ मिळाला आहे, त्यांच्या मनातील स्त्री-अपत्याबद्दल दृष्टीकोण आता निकोप असेल किंवा तो पुढचे आयुष्यभर तसाच असेल अशी अपेक्षा भाबडेपणाची ठरेल का?
२. स्त्री-अपत्यजन्माबद्दल आणि स्त्री-भ्रूणहत्येबद्दल समाजमन जागृत करण्यासाठी अशाच तर्हेचे आणखी कुठले-कुठले उपाय करता येतील किंवा इतरत्र चालू आहेत?
या उपक्रमाची माहिती सर्वांना मिळावी व अशा उपक्रमांवर काही उपयुक्त चर्चा घडून यावी हाच या चर्चाप्रस्तावाचा उद्देश.
प्रतिक्रिया
30 Jan 2013 - 5:34 am | नेत्रेश
या उपक्रमाच्या निमित्ताने त्या डॉक्टरना भरपुर बिझनेस मिळुन त्यांची भरभराट व्हावी.
आणी या यशस्वी बिझनेस मॉडेलची कॉपी भारतातील अन्य डॉक्टर / हॉस्पिटलस नी करावी.
30 Jan 2013 - 9:36 am | इनिगोय
इतका उमदा उपक्रम चालवत असल्याबद्दल डॉक्टरांचे आभार.
केवळ एकवेळचा आर्थिक लाभ झाल्याने संपूर्ण दृष्टीकोन बदलेल ही अपेक्षा खरोखरच भाबडी आहे. इथे समुपदेशनाची जोड देणंही आवश्यक आहे.
२. स्त्री-अपत्यजन्माबद्दल आणि स्त्री-भ्रूणहत्येबद्दल समाजमन जागृत करण्यासाठी अशाच तर्हेचे आणखी कुठले-कुठले उपाय करता येतील किंवा इतरत्र चालू आहेत?
अशा उपक्रमांबद्दल वाचायला उत्सूक.
30 Jan 2013 - 11:47 am | धमाल मुलगा
डाॅ. राख ह्यांचं कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. विशेषतः जेव्हा इतर बहुतांश तुग्णालये आणि डाक्टर्स पै पैसाठी हपापल्यासारखं वागतात, तेव्हा डाॅ. राख ह्यांचं काम सोन्यासारखं झळाळून दिसतं.
डाॅ.राख ह्यांचं हे काम निःसंशय चांगलं आहेच, त्यामागची भावनादेखील उदात्त आहे. पण हा प्रशरश्र ह्नाहून खूप मोठा आहे, ड.ना ह्याबाबत. इतर क्षेत्रांकडून मदत मिळाली तर होणाराफायदा बराच मोठा असेल.
मदत: समुपदेशक, वकिल, पोलिस आणि असे संबंधित घटक साम दाम दंड भेद वापरुन मुलगी जन्माला आली त्या कुटुंबांना योग्य रस्ता दाखवतील तर उत्तम.
कदाचित माझा हा विचार पुर्णतः अव्यवहार्य असू शकतो. पण असा विचार करणारे मिळणं दुर्मिळ असलं तरी अशक्य नसावं. :-)
30 Jan 2013 - 9:44 am | संजय क्षीरसागर
डॉक्टरांच अभिनंदन आणि तुम्हाला धन्यवाद.
30 Jan 2013 - 11:59 am | सुहास झेले
बातमी आधीच वाचली होती. डॉक्टरांचे करावे तितके कौतुक कमी आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा :)
30 Jan 2013 - 12:19 pm | गवि
प्रथमदर्शनी हा अतिशय उत्तम उपक्रम आहे अशी खात्रीच होते. आणि हे डॉक्टरमहोदयसुद्धा खूप सच्च्या दिलाचे आहेत हे नि:संशय स्पष्ट होतं. पण वाटतो त्यापेक्षा या गोष्टीचा परिणाम वेगळा आणि कदाचित चुकीच्या दिशेचा, दुरित आहे. पण ठसठशीतपणे दिसत नसल्याने तो जाणवत नाही.
मुलगी होणं हे मुळातच दु:खाचं मानणारा एक मोठा समाज अस्तित्वात आहे. हे नाकारणं म्हणजे डोळे बंद करणं आहे. अर्थातच ही गोष्ट दुरित आहे आणि ती बदलली पाहिजे.
अशा वेळी "मुलगी होणे म्हणजे वाईट, दु:खद, दुर्दैव" या विचाराला रोखणारे इन्सेंटिव्ह्ज आणि तो विचार बळकट होण्यापासून रोखणारे डिस इन्सेण्टिव्ह्ज असे दोन्ही वापरले पाहिजेत.
-मुलगी हा नुकसानाचा भाग नव्हे, तीही मुलाइतकीच फायद्याची ठरु शकते, तिच्यावरची गुंतवणूक वाया जात नाही,अशी परिस्थिती निर्माण करणं.
-वंशाचं नाव चालू ठेवण्यासाठी मुलगाच हवा अशी समजूत नष्ट होण्यासाठी आपल्या एका लेव्हल पिढीपर्यंत (आई आणि बाबा) या दोघांची मूळ आडनावं लावावीत, म्हणजे पिढीनुसार तेच ते नाव टिकणं हीच कन्सेप्ट नाहीशी होईल.
असे काही सार्थ आणि निरर्थ उपाय असतील आणि ते मूळ रचनाच बदलण्यावर अवलंबून असल्याने भरपूर वेळ घेणारे असतील.
डिसइन्सेण्टिव्ह्ज मधे लिंगनिदानाला बंदी आणि केल्यास शिक्षा, गर्भात मुलगी आहे हे समजून गर्भपात करण्याला शिक्षा, मुलीचा छळ केला तर तुरुंगवास किंवा अशा प्रकारचे विरोधी उपाय केले जाताहेत.
या सर्वामधे मुलगी झाल्याने दु:खी होणार्या (किंवा न होणार्याही.. कारण या डॉक्टरांकडे अशी निवड दिसत नाही) पालकांची फी / खर्च माफ करणं ही कृती कुठे बसते?
यामुळे या डॉक्टरांच्या क्लिनिकमधे जाऊन मुलगी जन्माला घालणं "फुकट" झालं. पण हा काही इन्सेंटिव्ह नव्हे. हे कॉम्पेन्सेशन झालं. मुलगी झाल्याचं दु:ख झालंय.. त्यात आणि बाळंतपणाचा खर्च झाला असता तो वाचला हा मर्यादित आनंद अशा कुटुंबाला मिळेल. पण हा नक्कीच मुली जन्माला घालण्यासाठी इन्सेंटिव्ह नव्हे.
उलट मुलगी झाली म्हणून सहानुभूती दाखवल्यासारखा संदेश (अर्थात उद्देश तसा नाही) यातून जातो आहे. याचाच अर्थ मुलगी होणं हे काहीतरी फुंकर घालण्यासारखं दु:ख आहे, निराशाजनक भाग आहे या विचाराला असलाच तर पाठिंबा मिळतो.
आणि हे सर्व पदराला खार सोसून.. त्यामुळे ही पद्धत त्यांनी चालू ठेवली नाही तरी चालेल असं म्हणावंसं वाटतं.
30 Jan 2013 - 6:49 pm | दादा कोंडके
सहमत!
काही गुजराथी बांधव सुद्धा समाजातर्फे मुलगी जन्मली की तिच्या नावे एक-दिड लाख बँकेत ठेव म्हणून ठेवतात. हे म्हणजे मुलींचं आयुष्य असच असणार आहे. तुमच्या जीवाला आयुष्यभर घोर असणार आहे. तिचं पुरषप्रधान समाजाकडून एक्सप्लॉईटेशन होणारच आहे. पण म्हणून आमच्या पोरांना बायका मिळण्यासाठी तुम्ही पोरी पैदा करा त्यासाठी आम्ही मदत करू. खाण्यासाठी प्राणी लठ्ठ्वण्यासाठी ते पाळणार्याला थोडासा चारा देण्यासारखं आहे. :(
3 Feb 2013 - 9:40 am | ५० फक्त
अगदी हेच लिहिणार होतो, पण गविकाकांनी आमचं काम हलकं केलं, धन्यवाद.
31 Jan 2013 - 4:34 am | बाळकराम
मुलगी झाली तर तिच्या बाळंतपणाचा खर्च सहन करणे ही काँपेन्सेशन नव्हे तर तर इन्सेन्टिव्ह आहे. दुर्दैवाने आपला समाज इतका निगरगट्ट आहे की बरेच इन्सेन्टिव्ह आणि डिसिन्सेन्टिव्ह वापरले गेलेत पण लोकांच्या वृत्तीत फरक पडत नाही. शासनाचे काय कमी इन्सेन्टिव्ह आहेत- व्हाऊचर स्कीम आहे, मुलींचे शिक्षण मोफत आहे, गर्भिणी व नवप्रसूता मातांसाठी सकस पोषण आहार योजना इ. झालच तर इतरही अनेक योजना आहेत. पण त्याने काय फरक पडला? भारतात सर्वात जास्त दरमाणशी उत्पन्न असणार्या दिल्लीमध्ये स्त्री-पुरुष जन्म गुणोत्तर भारतात सर्वात कमी आहे- अतिमागास बिहार वा उत्तरप्रदेशपेक्षाही कमी. अजूनही इन्स्टिट्युशनल डीलिव्हरी चे प्रमाण आपल्याकडे कमीच आहे- श्रीलंका आणि बांगलादेशापेक्षाही कमी. बाळंतपणातील मातेच्या मृत्यूचे प्रमाणही सब-सहारन आफ्रिकन देशांच्या जवळपास म्हणावे इतके आहे. आणि हे सगळे नानाविध इन्सेन्टिव्ह आणि डिसिन्सेन्टिव्हज वापरून. स्त्री-भ्रूणह्त्या हा कायदेशीर गुन्हा कधीपासूनच झाला आहे पण त्याने ते गर्भपात थांबले? निव्वळ कॅरट-स्टिक वापरुन सुटेल असा हा फंक्शनल प्रश्न नाही तर कोअर आहे- समाजाच्या मानसिकतेचा जी अशा उपायातून बदलू शकते. कारण बघा- पैसा आणि प्रतिष्ठा यांचा समवाय संबंध लोक लावतात. पैसा=प्रतिष्ठा, मग ज्याने पैसा मिळतो भरपूर ती गोष्ट प्रतिष्ठेची. पर्यायाने, जी क्षेत्रे पैसा मिळवून देतात त्याला प्रतिष्ठा. आधीच्या परीक्षापद्धतीच्या लेखात असेच मुद्दे मांडले गेले होते. त्यामुळे, स्त्रीचा जन्म म्हणजे पैसा जाणार- विशेषतः हुंडा, लग्नखर्च इ. म्हणून त्याला कमी प्रतिष्ठा असा काहीसा समज वरच्या सिद्धांताच्या व्यत्यासातून मांडला जातो. तर हे समीकरण कुठेतरी भेदलं गेलं तर या प्रश्नाला आळा बसू शकतो. मला वाटते डॉ राख यांची अशीच काहिशी भूमिका असावी. निदान माझ्यापुरता तरी विनामोबदला प्रसूती करण्याचा हा उपक्रम समाजाच्या तोंडात मारतो आहे- म्हणजे " बाबारे, वाटल्यास तुझ्या मुलीच्या डीलिव्हरीचे पैसे घेत नाही पण मुलीला मारू नकोस" असंच जणू म्हटल्यासारखं आहे, आणि अशी वेळ समाजाने आपल्यावर आणावी हेच दुर्दैव!
30 Jan 2013 - 1:11 pm | विलासिनि
ह्या कार्यातून डॉक्टरांना जर आर्थिक नुकसानाएवजी अमूल्य असे मानसिक समाधान मिळत असेल तर त्यांनी आपले कार्य असेच चालू ठेवावे. त्यांच्या कार्यासाठी त्यांना शुभेच्छा.
मुलगी होणं ह्याबद्द्लचे समाजाचे विचार पूर्णपणे बदलण्यासाठी आधी असा विचार का रुजू झाला हे पडताळले पाहिजे असे मला वाटते.
मुलगी काही काळाने घर सोडून जाणार आणि मुलगा जन्मभर आपल्यासोबत राहणार. लग्न झाल्यावर मुलीला तिचे घर सोडून सासरी जावे लागते व त्यानंतर सासरच्या लोकाचा विचार पहिला करावा (कितिही शिकलेली व स्वावलंबी स्त्रि असली तरी) व त्यानंतर माहेरच्या माणसांचा विचार करावा असे बंधन नकळत तिच्यावर येतेच.
लग्न झाल्यावर मुलीने घर सोडून न जाणे ही प्रथा आपण बद्लू शकतो का?
30 Jan 2013 - 6:27 pm | अनन्न्या
चला आता मुलगा होईपर्यंतची सगळी(?) बाळंतपणे यांच्या दवाखान्यात फुकटात करून घेऊ!! अजूनही मुलासाठी चार चार चान्स घेणारे महाभाग आहेत.
30 Jan 2013 - 6:45 pm | पैसा
असे उपक्रम चालवणारे डोक्टर्स आहेत हे वाचून बरं वाटलं. स्त्री भ्रूणहत्यांमधे सहभागी होऊन काही डॉक्टर्संनी या उदात्त व्यवसायाला काळिमा लावला होता तो काही प्रमाणात तरी पुसून निघेल. डॉक्टर राख यांचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा!
30 Jan 2013 - 7:13 pm | उर्जिता
अतिशय स्तुत्य उपक्रम अहे हां. मुलगि वाचवा असा नुसतच म्हणण्यापेक्शा हे योग्य आहे.!
30 Jan 2013 - 8:07 pm | अग्निकोल्हा
सरकारने या पुढे जन्माला येणार्या प्रत्येक मुलीच्या बाळंतपणासाठी झालेला खर्च उचलावा.
30 Jan 2013 - 8:24 pm | पैसा
म्हणजे सगळ्याच का?
30 Jan 2013 - 8:34 pm | अग्निकोल्हा
करायचं तर सगळ्याच मुलिंसाठी. उगाच मुली मुलीं मधे नंतर भेदाभेद नकोत.
30 Jan 2013 - 8:36 pm | अग्निकोल्हा
दहा पैकी दोन मोफत जन्माला आल्या म्हणुन समाजमन बदलत नसतं ना म्हणुन....
30 Jan 2013 - 8:56 pm | पैसा
फक्त प्रत्येक मुलीच्या बाळंतपणासाठी हे वाचून माझा जरा गोंधळ उडाला. पण आता नीट वाचल्यावर "जेव्हा जेव्हा मुलगी जन्माला येईल त्या वेळचा म्याटर्निटी होमचा खर्च" हा अर्थ लक्षात आला.
30 Jan 2013 - 8:50 pm | शुचि
फार स्तुत्य उपक्रम आहे. सलाम!
30 Jan 2013 - 9:31 pm | रेवती
प्रत्येकजण (येथे चांगले मनुष्य म्हणायचे आहे) आपापल्या परिने शक्य तेवढा हातभार लावत असतो. डॉ. साहेबांना अश्या प्रकारे शक्य आहे तर त्यांनी ते कार्य नुकसान सोसून सुरु ठेवले आहे हे कौतुकास्पद आहे. आता तिथे एखाद्या जन्मलेल्या मुलीचा पिता येऊन जर " ते काही नाही, माझी मुलगी आहे, मीच बील देणार." असे हटून बसला तर खरा आनंद होईल.
एका अतिश्रीमंताघरच्या लेकीला मुलगी झाल्यावर म्याटर्निटीचे होमचे बील कोणी द्यायचे (सासरच्यांनी की माहेरच्यांनी) यावरून वाद झाला आणि बील दिले गेले नाही. डॉ. नी सकाळमध्ये लेख लिहून नाव न घेता या घटनेचा उल्लेख केल्यावर वर्षभराने माहेरचे लोक जाऊन बील भरून आले. खरी गंमत यापुढेच आहे. बील देताना "हे सगळं पेप्रात लिहायची काही गरज होती का?" असा वाद घातला. चोर तो चोर, वर शिरजोर!
ती फ्यामिली मला साधारण माहित आहे म्हणून लक्षात राहिले. काय हे? असल्या आणि कितीक गोष्टी घडत असतील.
31 Jan 2013 - 4:36 am | बाळकराम
साधारणपणे जरा डांबरटच असतात!
31 Jan 2013 - 8:00 am | रेवती
साहेब, निदान वर्षभराने तरी माहेरच्यांनीच बील दिलं (फार ग्रेट झालं असं नाही पण तरीही, दगडापेक्षा वीट मऊ). सासरचे तरी कुठं धुतल्या तांदळासारखे आहेत. बाळाच्या बापाला काहीच वाटू नये काय? अगदी आधी मुलगी झाल्याचे वाईट वाटले असे समजून चालू पण आपलं लेकरू म्हणून वर्षभरात लळा लागू नये? एरवी शेजार्यांकडच्या बाळाचाही आपल्याला लळा लागतो. जगातले सगळे (नॉर्मल) आईवडील लेकराचे हसणे, खिदळणे, ओळखणे यांनी मोहरतात. आपल्याकडून बाळाचे सर्व नीट केले जात आहे ना? याचा सतत आढावा घेतला जातो. यात गरीब, श्रीमंत, देश, वर्ण, जातीधर्माच्याही पलिकडची भावना असते. घरातल्या सासरच्या आज्जी आजोबांना जाऊ देत पण बाप म्हणून निदान कर्तव्यबुद्धीने तरी वागावे. तुम्ही केलेला सरसकट आरोप आहे असे वाटत नाही काय? माझ्यामते ज्याचे मूल आहे त्याने/तिने दवाखान्याचे बील द्यायलाच हवे. मुलीच्या आईवडीलांनी (किंवा डॉक्टरांनी) हा खर्च का म्हणून करावा? जर खर्च परवडत नसेल तर मूल होऊ देण्याबाबत आणखी विचार करावा.
31 Jan 2013 - 8:50 am | स्पंदना
एव्हढच नव्हे तर जी आई/आजी आपण मुलीला जन्म दिला म्हणुन रडते तिला पहिला तू का जीवंत आहेस? हा प्रश्न विचारला पाहिजे. अन त्या नवर्याला तू कुणाच्या पोटी आलास, कुणी पाजल तूला हे ही विचारलं पाहिजे.
3 Feb 2013 - 1:01 am | बाळकराम
असं लिहायला विसरलो! सरसकट बायकांच्या माहेरचे लोक डांबरट असतात असं कसं लिहीन मी? (मिपावर राहयचय मला!)
3 Feb 2013 - 1:57 am | रेवती
हां मग ठीक आहे. ;)
31 Jan 2013 - 9:04 am | नन्दादीप
असाच स्तुत्य उपक्रम सरकार ने देखिल राबवला आहे.
"जननि शिशु सुरक्षा कार्यक्रम"
१. बाळंतपणासाठी घरून सरकारी रुग्णालयात तसेच रुग्णालयातून घरी जाताना तसेच अधिक उप्चारांसाठी Higher Center (Govt. only) ला नेण्यासाठी "मोफत वाहन व्यवस्था". TOLL FREE NO. 102
२. बाळंतपणातील आहार, औषधे, सर्व चाचण्या, तसेच गरज पडल्यास रक्त पुरवठा पूर्णपणे मोफत.
३. तसेच जर ३० दिवसाचे आतिल बालक जर गंभीर आजारी पडले तरी देखील वरील सर्व सोयी सुविधा मोफत पुरविण्यात येतात.
2 Feb 2013 - 9:20 pm | इन्दुसुता
'बातमी' येथे दिल्याबद्दल धन्यवाद. डॉ.राख यांचे स्तुत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन.
गविंचा प्रतिसाद काहीसा एकतर्फी आणि संपूर्ण माहितीशिवाय दिला आहे असे मला वाटते. त्यांच्याशी असहमत.
बाळकराम यांचा प्रतिसाद अतिशय योग्य व माहितीपूर्वक ( मला येथे informed and informative असे म्हणायचे आहे )आहे. त्यांच्याशी सहमत.
भारतातील याबद्दल विदा चिंताजनक आहे. सरकार व अन्य माध्यमांतून/ अनेक स्तरांवर, अनेक आणि सतत प्रयत्न होऊन देखिल जनमानसात ह्या प्रवृत्तीत जरासाही बदल पडलेला नाही, येवढेच काय तर अत्यंत जलद गतीने जनमानसाचा प्रवास याच्या अगदी उलट दिशेने सुरू आहे असे वाटावे ईतकी गंभीर परिस्थिती एक ते दीड पिढ्यांच्या कालावधीत निर्माण झाली आहे.
चर्चा प्रस्ताव उपायांबद्दल आहे. धमाल मुलगा म्हणतात, साम/दाम्/दंड/ भेद या सर्वांचा उपयोग व्हावा. या सर्वांचा उपयोग आधी करूनही परिस्थितीत फरक पडलेला नाही ( याचा अर्थ तो उपयोग थांबावा असे नाही). त्याशिवाय आणखी एक्/दोन प्रस्ताव वर आले आहेत ( अपत्याचे आडनाव ई. ).
अधिक उपायांवर काय चर्चा होते ते पाहण्यास उत्सुक आहेच. माझ्यामते प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्यात स्वतःला रूचेल अशी एक गोष्टं जरी केली तरी / तरच काही सुधारणा होण्याची शक्यता आहे.
माझा व्यक्तिगत प्रयत्न गेली अनेक वर्षे स्त्रियांच्या / मुलींच्या शिक्षणा साठी सुरू आहे. या चर्चेतून आणखी प्रेरणा मिळतील अशी आशा आहे.
3 Feb 2013 - 5:01 pm | बॅटमॅन
मलाही गविंचा प्रतिसाद एकांगी वाटतो, ऑफ द टार्गेट वाटतो.
3 Feb 2013 - 6:34 pm | गवि
एकांगी आणि अपुर्या माहितीवर हे म्हणणं नॉन अॅप्लिकेबल आहे. कारण सर्वांनीच उपलब्ध माहितीवर अवलंबून प्रतिसाद दिला आहे. पण हो.. माझा प्रतिसाद तर्कदुष्ट नसून तर्ककर्कश आहे असं म्हणता येईल. मला सर्वांची मतं, विशेषतः कारणमीमांसा करणारी वाचून नक्कीच वाटतं आहे की माझं म्हणणं जास्त तीव्र झालं आहे. माझ्या विचारपद्धतीत या ठिकाणी दोष आहे, पण तो "डीनायल"चा आहे. कोरडेपणाचा आहे.. ...... एकांगीपणाचा नाही.
पण तरीही डॉक्टरसाहेबांच्या या कृतीची दिशा आपल्याला हवंय तशा दिशेने समाजाला नेण्याकडे आहे की विपरीत हे अजूनही नि:शंक पटत नाहीये हे खरं (पुन्हा पुन्हा म्हटलंय, की त्यांनी निश्चित मोठ्या दिलदारीनेच ही प्रथा सुरु केली आहे..)
... मुलगी जन्मली की कुटुंबाला तात्कालिक आनंद मात्र नक्कीच मिळेल हे पटलं. अशा उपायांनी कदाचित दीर्घकालीन सकारात्मक फरक पडू शकेल हे तत्वतः पटलं.. काही तर्काच्या विपरीत कृती परिवर्तनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कराव्या लागत असतील आणि नंतर एक पातळी गाठल्यावर त्या उलट करता येतील हाही अँगल लक्षात आला. त्याबद्दल विरोधी संयत मत देणार्यांचे आभार मानतो.
3 Feb 2013 - 6:48 pm | बॅटमॅन
ओक्के बॉस. :) तुम्ही आणि तर्कदुष्ट? हाय दैवा, हे म्हण्ण्याआधी माझा आंजावर मृत्यू का नै झाला ;)
मुळात हे पाऊल म्हंजे पृथ्वीप्रदक्षिणेतील एक लहानसे पाऊल आहे फक्त. त्यामुळे हे असेच चालले तर पुढे काय होईल वगैरे प्रश्नांचा विचार सध्यातरी करायचे कारण दिसत नाही. सध्या तरी पोरींशी संबंधित किमान एक तरी खर्च वाचवणारे स्तुत्य पाऊल, अशीच याची जाहिरात करायला हवी.
बास्स, इतकेच. :)
4 Feb 2013 - 12:10 am | बाळकराम
एका चांगल्या विषयावर साधक-बाधक चर्चा झाली, संयमी आणि माहितीपूर्ण प्रतिसाद व विचारांची देवाण-घेवाण झाली. सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल आभार!