'लेह' वारी, भाग १
'लेह' वारी, भाग २
'लेह' वारी, भाग ३
'लेह' वारी, भाग ४
हा भाग टाकायला थोडा उशीर झाला... त्या बद्द्ल क्षमा असावी.....
असो.... गरम गरम, चटपटीत मॅगी खाऊन थोडा वेळ बसल्यावर हॉटेलवाल्याचा निरोप घेतला आणि आम्ही दोघे रूमवर आलो. सगळा हिशोब केला आणि नव्या दिवसाची नवी सफर करण्यासाठी झोपी गेलो.
सकाळी लवकर ५.३० लाच उठलो. रात्री झोपताना लाईट जी गेली होती ती परत आलीच नव्हती. लाईट गेली म्हणून झोपताना एक मोठ्ठा स्क्रूड्रायवर आणि हातोडी जवळ घेऊन झोपलो होतो. तुषारने पण जवळ हातोडी ठेवली होती. बरोबर आणलेल्या सामानाचा असा नाही तर तसा उपयोग. एक तर दुर्गम भाग, कधी कोण येऊन काय करेल याचा नेम नाही. रात्री एकदा जाग आली तेव्हा सगळं समान जाग्यावर असल्याची खात्री केली आणि पुन्हा निर्धास्त झोपलो. सकाळी उठल्यावर पटापट सगळं आवरलं आणि रखवालदाराला निघण्यासाठी सांगावा धाडला. तो आला तेव्हा सगळा हिशोब केला आणि ६.३०ला निघालो. सुर्यनारायणाने सगळीकडे वर्चस्व गाजवायला सुरुवात केली होती. सकाळची कोवळी किरणे अंगावर घेण्याची खूप इच्छा होती पण गारवा इतका होता कि ती इच्छाच रहिली. निर्सर्गाच कोवळं रूप मनात आणि कॅमेऱ्यात साठवून पुढे पुढे जात होतो. सकाळी सकाळी आमच्या सोबतीला HPSTC (हिमाचलच महामंडळ) बरोबर होतं. कधी ते पुढे कधी आम्ही पुढे असा खेळ चालू होता. अर्थात आम्ही जेव्हा कुठे थांबू तेव्हाच त्यांना पुढे जाण्याची संधी मिळायची.
१. निघण्याची तयारी.
२. इन्स्पेक्टर तुषार.
३. वरती उन्हाची सोनेरी झाक, डोंगर आणखी ऊंच आहे.
४.
५.
६. रस्त्यावरील आणखी एक ओढा.
७. बार्लाचालाला आराम.
जे आदल्यादिवशी केलं तेच चालू होतं. हवं तिथे थांबणे आणि डोळे भरून सगळं पहाणे. गाडीचा काहीही त्रास नव्हता. फक्त काही काही वेळा वेग कमी केला कि बंद पडत होती. कारण होतं हवेतील ऑक्सिजनची कमतरता. जसे जसे आपण वर जातो तस तस ते प्रमाण कमी होत जातं. मग एके ठिकाणी थांबून, तुषारने दोनीही गाड्यांचा एयर इन्टेक वाढवला. मग लागल्या एकदम डौलात चालायला. तुषार म्हणाला काल रोहतांगलाच हे करायला हवा होतं. तिथेहि मधे मधे गाडी बंद पडण्याचा जो त्रास झाला तो झाला नसता. असो...आता आलं ना लक्षात!!! झालं तर मग. प्रवास मजेत चालू होता. कधी बार्लाचाला आलं कळलच नाही. महामंडळ आमच्या आधीच येउन थांबलं होतं. नाष्ट्याचा स्टॉप आला म्हणजे नाष्टा हा केलाच पाहिजे. दोनच पर्याय उपलब्ध होते. ब्रेड ऑम्लेट आणि मॅगी. त्यातला मला एकच मॅगीचा पर्याय होता. मग काय मी हाणलं पोटभर मॅगी आणि तुषारने ब्रेड ऑम्लेट. टाकी फुल झाली. गाडीची टाकी फुल करण्याचा प्रश्नच नव्हता. महामंडळात प्रवास करणारे जवळपास सगळेच पर्यटक होते. एका ग्रुप बरोबर गप्पा सुरु झाल्या. आम्ही सरावलेल्या प्रश्नांची उत्तर दिली आणि इतर गप्पा झाल्या. 'लेह'च्या जवळ पास हिंडायच असेल तर परवानगी घ्यावी लागते हे माहितच होतं. शिवाय 'लेह' मधलं ते कार्यालय, जिथे परवाना मिळतो ते शनिवारी अर्धवेळ आणि रविवारी पूर्णवेळ बंद असतं. आजचा दिवस होता शुक्रवारचा. महामंडळ त्याच दिवशी 'लेह'ला पोहोचणार होतं आणि आम्ही शनिवारी पोहोचणार होतो म्हणून मग परवान्यासाठी लागणारी कागदपत्रे आम्ही एकाला दिली आणि परवाना काढण्यासाठी सांगितलं. ते पुढे निघून गेले. आम्ही राहिलो मागे. निवांत आराम करून निघालो. आता पुढे शब्दात वर्णन करण्यापेक्षा फोटोच बघा..
८.
९.
१०.
११.
१२. तुषार.
१३. रस्त्याचं काम चालु होतं...मुरुमावरुन गेलो.
१४.
१५.
सगळं काही मनात साठवत पुढे पुढे जात होतो. आजही तो रस्ता, तो निसर्ग डोळ्या समोर उभा असल्यासारखा भासतो इतका तो भिनला आहे. तर पहाता पहाता आम्ही 'सरचू' (एक छोटंसं गाव) क्रॉस केलं आणि गाटा लुप्सच्या पायथ्याशी आलो. एक एक वळण घेत वर चढत होतो. मधेच एके ठिकाणी आमचे साहेब थांबले. फोटो वगैरे काढून झाल्यावर निघताना चांगला रस्ता सोडून आमच्या साहेबांना शॉर्टकट मारण्याची हुक्की आली. मी नको म्हणत असताना सुद्धा गडी घुसला मातीच्या रस्त्या मधे. मग मी हि घुसलो, दुसरं काय करणार ?, ठरवून जे आलो होतो!!! काहीही झालं तरी जिकडे जायचं तिकडे बरोबर जायचं. थोडंच वर गेल्यावर गाडी मातीत घुसायला लागली. चालवता चालवताच तुषार खाली उतरला आणि चालू गाडी (पहिल्या गियर मधे) ढकलू लागला. अखेर तो दमला आणि थांबला. तो थांबला होता त्याच्या बाजूनेच मी पुढे वर गेलो पण एके ठिकाणी मलाहि तेच करावं लागलं. खाली उतरून गाडी ढकलू लागलो. टायर मातीत गेल्यामुळे दिसतही नव्हता. मी पण दमलो आणि थांबलो. आम्ही होतो १४००० - १४५०० हजार फुटावर. दम लागण्याचा मुख्य कारण होतं हवे मधील प्राणवायूची कमतरता आणि आम्ही त्या परीस्थितीत केलेले नाहक परिश्रम. १५-२० फुटाच्या अंतराने आम्ही दोघेही थांबलो होतो. ते सुद्धा जमिनीला ५० - ६० अंश कोनात मातीत फसलेली गाडी धरून. सगळी माती भुसभुशीत असल्यामुळे गाडी स्टँडलाही लावता येत नव्हती. इतक्यात महामंडळ चांगल्या रस्त्याने आमच्या पुढे गेलं. आम्ही ५ मिनिटे दम खाल्ला आणि पुन्हा प्रयत्न चालू केला. पहिल्याच प्रयत्नात तुषारने पूर्ण ताकद लावली आणि कसेबसे माझ्या शेजारून गाडी ढकलत ढकलत वर गेला. वर गेल्यावर गाडी लावली आणि डोकं धरून बसला. त्याच डोकं दुखायला लागलं होतं. मला सांगितलं त्याने, पण मी काहीच करू शकत नव्हतो. हतबल होतो. माझी गाडी काही केल्या हलायला तयार नव्हती. कारण मागच्या चाकाच्या पुढे माती मधे एक न दिसणारा पण जाणवणारा मोठ्ठा दगड होता. धड मला गाडी पुढे नेता येत नव्हती आणि बाजूला ओढताहि येत नव्हती. खाली परत उलटं जाणे म्हणजे गाडीबरोबर गडगडत जाणे अशी परिस्थिती होती. वरून तो म्हणाला थांब १० - १५ मिनिटे. बर वाटलं कि मी येतो तिथे. पुन्हा थांबलो. कालच्या सारखे खांदे भरून आले होते. थोडा वेळ गेल्यावर तो खाली आला. स्टार्टर मारला आणि गाडी चालू केली. जर गाडीला बटन स्टार्टर नसता तर?? बापरे!!! दुसऱ्या बाजूने किक मारायला तिसरा जण कुठून आणणार होतो आम्ही.....जाऊदेत कल्पना पण नको त्याची. मग तो मागून आणि मी बाजूने अशी चालू गाडी ढकलत वर नेली. माझही डोकं दुखायला लागलं होतं पण तीव्रता त्याच्या इतकी नव्हती, कमी होती. पुन्हा आम्ही १५ मिनिटे थांबलो. आराम केला, जरा बर वाटायला लागलं म्हणून मग निघालो. तुषारच डोकं दुखायचं थांबलं नव्हतच. ती फक्त पुढे काय होणार याची चाहूल होती. प्रवास सुरु झाला. १५-२० मिनिटे गाडी चालवल्यावर पुन्हा थांबलो. त्याने ग्लुकोस घेतलं, गोळी घेतली. मग थोडा आराम केला आणि निघालो. मी पुढे पुढे जात होतो मागे वळून पाहतो तर तुषार मागे नाही. लगेच थांबलो. आमचा हिरो कुठे दिसतोय का पाहू लागलो. डोंगरावरील रस्ते दिसत होते. परत जावं अस वाटत असतानाच एक काळा ठिपका पुढे पुढे येताना दिसायला लागला. मधेच तो ठिपका थांबला. तो तुषार होता. तो का थांबलाय हे कळायला काहीच मार्ग नव्हता. कॅमेरा लेन्स मधून झूम करून पाहिलं तेव्हा कळलं कि त्याचा त्रास अजून गेला नाही. डोके दुखीने त्याला सोडलं नव्हतं. मग मी तो येई पर्यंत तिथेच थांबलो. बऱ्याच वेळाने तो आला. जेव्हा आला तेव्हा त्याला बर वाटतंय असं दिसत होतं. पुढच्या प्रवासाचा आमचा वेग मंदावला. हळू हळू पुढे जायला लागलो. आम्ही मारलेला शॉर्टकट खूप महागात पडला होता.
१६. गाटा लूप्स
१७.
१८. आम्ही मारलेला शॉर्टकट.
१९. वरती डाव्या कोपर्यात तुषार.
२०. झुम करुन पहिलं, तेव्हाचा तुषार.
२१. वाट बघत थांबलेलो ति जागा.
२२. थोडा आराम.
'लाचुलुंगला' पास केला आणि 'पांग'ला पोहोचलो. बघतो तर तिथे महामंडळ थांबलेलं होतच पण आम्ही पोहोचताच ते पुढे निघाले. आम्ही चहा प्यायला, १०-१५ मिनिटे थांबलो आणि निघालो. मानालीतून निघाल्या नंतर, जीस्पा पहिला तर 'पांग' हा बऱ्याच जणांचा दुसरा मुक्काम असतो पण आम्ही तिथे दुपारी २.०० लाच पोहोचलो होतो. मी एका मित्राला (जो आधी येउन गेला होता) विचारून ठेवलं होतं त्याच दिवशी पुढे 'उप्शी'ला पोहोचण्याबद्दल बद्दल आणि त्याने आरामात पोहोचाल असं सांगितलं होतं. तुषारला काही त्रास होत नव्हता म्हणून मग पुढे जाण्याचा निर्णय घेतला. 'पांग' सोडलं कि पुढे लागातात 'मूर प्लेन्स ' (उंची साधारण १५५०० फुट). एक लांब आणि भरपूर रुंद पठार. त्या पठारावर काही ठिकाणी आहे काळा डांबराचा पट्टा आणि बाकी ठिकाणी कच्चा रस्ता ज्याचा काही उपयोग नाही. जेव्हा आपण 'मूर प्लेन्स' वर गाडी चालवतो तेव्हा ध्येय फक्त एकच असतं. समोर दिसणारा डोंगर पायथा. अख्या पठारावर तुम्हाला वाट्टेल तिथून वाट्टेल तशी गाडी चालवायची मुभा असते. जेव्हा आम्ही 'मूर प्लेन्स' ओलांडायला सुरुवात केली तेव्हा १५ km वगैरे एकदम चांगला रस्ता होता, अशा वेळेला आधीच एवढे दगड धोंडे खाल्यावर उगाच दगड धोंड्यातून कोण जाईल ? मस्त सुसाट गेलो तेवढा रस्ता, पण नंतर रस्ता संपला आणि सुरु झाला रस्ता शोधण्याचा खेळ. रेफरन्ससाठी होता मधोमध असलेला निरुपयोगी कच्चा रस्ता आणि इतरत्र आधी गेलेल्या वाहनांच्या टायरचे ठसे. पठारावर बरीच झुडुपं आणि भुसभुशीत माती होती. झुडूपांमधून वाट काढत काढत आम्ही पुढे जात होतो. मातीत दोनीही चाकं रुतायची पण तसेच पुढे गाडी दामटत होतो. एव्हाना अशा प्रदेशात गाडी चालवायला सरावलो होतो. कधी खाली उतरून गाडी ढकलायची, कधी रस्ता चुकला (चुकला म्हणजे पुढे जाण्यास जागा नसायची) आणि अडकलो कि पुन्हा थोडं मागे जाऊन नवीन रस्त्याने पुढे जायचं असं चालू होतं. डोंगर माथ्यावर पाणी भरलेल्या ढगांनी गर्दी केलेली दिसत होती. पावसाचा सावट जाणवू लागलं. पण तो नुसतीच हूल देत होता, बरसत नव्हता.
२३.
२४.
२५.
२६.
२७.
२८.पांग, इथे 'फक्त' टेंट मधे रहाण्याची सोय आहे.
२९.
३०.छोटासा पुल, एकच ट्रक कसाबसा जाईल.
३१. निसर्गाची किमया.
३२. निसर्गाची किमया.
३३.
३४.
३५. ह्या खाली पडत नाहित.
३६.
३७. 'मुर प्लेन्स'ची सुरुवात.
३८.
३९.झुडुपातुन रस्ता काढताना.
४०. धुळलेलो मळलेलो.
४१.
४२.
मजेत डोंगर पायथ्याजवळ पोहोचलो आणि पुन्हा तुषारला डोकं दुखायचा त्रास सुरु झाला. काय करावं ते कळेना? आम्ही बरेच पुढे आलो होतो त्यामुळे मागेहि जाता येईना. पुढेच जात रहाणे हा एकच पर्याय होता. पुढे जे पाहिलं गाव लागेल तिथे थांबायचं ठरवलं. डोंगर चढून पुन्हा तो उतरल्या नंतर मग गाव मिळण्याची अशा होती. घाट चढायला सुरुवात केली. आमचा वेग खूपच कमी झाला होता. तसही रस्ता नावाचा प्रकार नव्हताच. होते फक्त दगड, धोंडे आणि मुरूम. हळू हळू पुढे जात होतो. मधे मधे BRO कामगार दिसायचे. त्यातल्याच एकाला थांबून विचारलं तर म्हणाला डोंगर उतरलात कि आहेत दोन तीन छोटी गावं, किती लांब विचारलं तर उत्तर आलं इथून टांगलांगला टॉप (१७५०० फुट) ६ km आणि तिथून पुढे खाली १५ km. मी ते उत्तर जसंच्या तसं तुषारला सांगितलं. टांगलांगला टॉप आम्हाला दिसतच होता.
आम्हाला लवकरात लवकर जवळचं गाव गाठणे आणि मुक्काम ठोकणे एवढच लक्ष होतं. जगातला दुसरा सर्वात उंच रस्ता आल्यावर आम्ही थांबलो. पाहतो तर 'रुम्त्से' (डोंगर पायथ्याच गाव) आणखी २८ km. ते वाचून तुषारच अवसानच गळालं. पुढे
तुषार: मी इथून पुढे गाडी चालवू शकत नाही. इथे पर्यंतच कसा आलोय ते माझं मला माहिती.
मी: अजून थोडा धीरधर. आता डोंगर उतार आहे. जस जसं खाली जाऊ तस तसं बरं वाटेल तुला.
तुषार: आजची रात्र इथेच राहू, उद्या सकाळी जाऊ.
मी: शक्यच नाही, अशा या आड जागी एक तर राहायचं नाही आणि इतक्या उंच तर नाहीच नाही. आधीच इथे ऑक्सीजनची कमतरता, त्यात आणखी काही व्हायला लागलं तर काय करणार ? खाली जाऊ, पाहिलं ठिकाण मिळेल तिथे थांबू.
४३. टांगलांगला
४४.
४५.
आणखीनही बरच काही बोलणं झालं पण आता आठवत नाही. शेवटी तुषार मला शिव्या घालत घालत खाली येण्यास तयार झाला आणि आम्ही निघालो. एक बरं होतं कि अंधार अजून झाला नव्हता. डोकेदुखीमुळे त्याचं डोकं ठिकाणावर नव्हत त्यामुळे त्याची बडबड चालू झाली. कुठून किती अंतर आहे याची आणखी तपशिला सकट माहिती का नाही काढली म्हणून माझ्या नावाने शंख चालू झाला होता. आणखीनही बरीच मुक्ताफळं उधळायला सुरुवात झाली. त्याच्या प्रत्येक वाक्यावर माझं एकच वाक्य ठरलेलं होतं. "तू आधी खाली चल, रूमवर गेलं कि काय शिव्या घालायच्या तेवढ्या घाल पण थांबू नकोस". शक्य तितकं त्याला दरीच्या कडेला न ठेवता आतून गाडी चालवायला सांगत होतो आणि स्वतः दरीच्या बाजूने गाडी चालवत होतो. जेणे करून काही गडबड होऊ नये. एकदा तर हा थांबलाच आणि पुन्हा तेच चालू झालं. इतक्या लांब आलो, अजून काही पाहिलं नाही.. सविस्तर आठवत नाही आता पण एक ना अनेक गोष्टींची उजळणी करत बसला . अगदी कि पार मारामारी करतो कि काय अशी वेळ आली. मला त्याचा त्रास दिसत होता पण त्याला खाली सुखरूप घेऊन जाणे एवढी एकच गोष्ट साधायची होती म्हणून मग माझा ठरलेलं वाक्य मी पुन्हा पुन्हा त्याला ऐकवत होतो. कसेबसे आम्ही खाली 'रुम्त्से' मधे आलो. एक रेसोर्ट दिसला आणि आत घुसलो. रूम आहे का विचारून पुढे सगळं समान काढून रूम मधे घेऊन गेलो. पण तिकडचा संस्थापक आला आणि रूम बुक्ड आहे म्हणून सांगू लागला. मी आधी का नाही सांगितलं म्हणून भांडत होतो आणि रूम सोडायला तयार नव्हतो. शेवटी तुषार म्हणाला जाऊदेत सोड, पाहू दुसरी कडे. पुन्हा सगळं समान बांधलं आणि निघालो. पुढे ३-४ km गेल्यावर एक छोट्या घरात विचारपूस केली आणि दोन रूम घेतल्या. तुषारने वाटेतच येताना "आपण वेगळ्या रूम घेऊ" म्हणून फतवा जाहीर केला होता. मी नको म्हणालो पण माझा नाईलाज होता. त्याला काहीही करून सुखरूप खाली आणणे भाग होतं. थांबलो तेव्हा तुषार तापला होता. त्याचं अंग चांगलंच भाजत होतं. हॉटेल वजा घर असल्यामुळे, गरम पाणी आणि जेवणाची सोय होती. तो फ्रेश झाला आणि लगेच झोपला. मी जेवणाची ऑर्डर दिली आणि STD ची माहिती विचारून फोन करायला बाहेर पडलो. घरी फोन करून सुखारूप असल्याची महिती दिली आणि परत रूम वर आलो. थोडा वेळ थांबल्यावर जेवण तयार झालं. तुषारला जाऊन उठवलं. अंगात ताप होताच. घरी फोन करून खुशाली कळवायला सांगितलं. आधी नाही म्हणाला पण थोडा आग्रह केल्यावर तयार झाला. त्याने पण घरी फोन करून सुखरूप असल्याचं सांगितलं आणि आम्ही परत रूम वर आलो. आता तुषार बराच शांत झाला होता. डोक्यातला ताप उतरला होता पण अंगातला ताप अजून उतरायचा होता. शांतपणे जेवलो आणि तुषारच्या रूम मधे गेलो. औषध घेतलं (आम्ही लागतील म्हणून बरोबर आणलीच होती) आणि तो झोपला. मीहि मग झोपायला गेलो. तो निवांत झोपला पण मी मात्र मधून मधून रात्री दर एक तासाला उठून त्याच्या कडे येऊन ताप चेक करत होतो.
पहाटे चांगली झोप लागली पण लगेच सकाळ झाली. ७.०० वाजले तरी तुषार अजूनही झोपलाच होता पण तेव्हा ताप उतरला होता. थोड्या वेळाने उठला. आता साहेब चांगले ताजे तवाने आणि नॉर्मल झाले होते. थोड्या वेळाने बाहेर आलो तर उन्ह वर यायला लागली होती. पाहतो तर तुषार गायब आणि त्याची गाडी पण गायब. लगेच घर मालकाला विचारलं, तर म्हणाला नाही गेला अजून. मग आहे तर कुठे आहे? शोधाशोध करू लागलो. मला वाटलं हे बेनं आणखी रुसून खरच निघून गेलं कि काय पुढे? पण नाही, साहेब होते. मागच्या अंगणात गाडी धुवत होते. नळाला भरपूर पाणी (थंडगार) होतं. मग काय मी पण माझी गाडी धुवून घेतली. पुन्हा घरात आलो आणि गप्पा सुरु झाल्या. गप्पा मारताना आदल्या दिवसाचा विषय निघाला तेव्हा साहेबांनी "जे झालं ते चुकीचं झालं म्हणून कबुली दिली". मी तर ते तेव्हा हि मनावर घेतलं नव्हतं आणि पुढेही घेणार नव्हतो. असो...गप्पा मारताना, घर मालकाने दोन कंदमूळं आम्हला खायला आणून दिली. नाव विचारलं तर म्हणाला "शल्घम". बीटा सारखं दिसणारं ते पांढर कंदमूळ खात खात गप्पा झाल्या.
४६. शल्घम
घरून निघताना प्रवासाची जी आखणी केली होती तिचा पार बट्ट्याबोळ झाला होता. रोज नवीन आखणी करायची वेळ आली होती आणि हे सगळं करून आम्ही आज 'लेह' ला पोहोचणार होतो. आरामशीर सगळं आवरलं, नाष्टा केला आणि १२.०० - १२.३० ला निघालो. 'लेह' काही फार लांब राहिलं नव्हतं. छान दिवस उगवला होता. त्या रम्य दुपारी आणि तो रम्य निसर्ग बघत शक्य तितक्या जोरात आम्ही 'लेह' कडे धावत होतो. दोनीही बाजूला अवाढव्य डोंगर, मधे दरीतून वाहणारी नदी आणि नदीच्या शेजारील रस्त्यावरून धडधड करत जाणारे आम्ही दोघे. मनाली नंतर पुन्हा दोन दिवसांनी आम्हाला नदीची साथ लाभली होती. एकदम मस्त वाटत होतं. कधी एकदा 'लेह'ला पोहोचतो असे झाले होते. जाता जाता वाटेत आम्हाला MH १४ ची गाडी घेऊन एक तरुण थांबलेला दिसला. आम्ही पुढे गेलेलो पुन्हा मागे वळलो आणि त्याला जाऊन भेटलो. गाडी पंक्चर झाली म्हणून तो थांबला होता. मनाली कडे निघाला होता आणि गाडी ट्रक मध्ये टाकून नेण्यासाठी एखाद्या ट्रकची वाट बघत होता. त्याचा मित्र आधीच पुढे निघून गेला होता आणि हा एकटाच मागे राहिला होता. त्याला पुढील प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या आणि निघालो. हे असलं काही आमच्याबरोबर होऊ नये म्हणून आम्ही पुरेपूर काळजी घेतली होती आणि सगळीकडे एकत्रच प्रवास केला होता आणि करणार होतो. तिथून निघालो आणि रमत गमत 'लेह'ला पोहोचलो. का कुणास ठाऊक पण मनाली पासुन 'लेह' पर्यंतच्या प्रवासात 'लेह'कडे जाणारे आम्ही दोघेच होतो. जे कोणी फटफटीवाले आम्हाला दिसले ते सगळे उलट्या दिशेने मनालीकडे जाणारे होते. जेव्हा डोकं जाग्यावर नव्हतं तेव्हा तुषारने त्याच्यावरही विशेष टिप्पणी केली होती. कसे का असेना आम्ही 'लेह' मधे पोहोचणार होतो. नदीच्या कडेकडे ने, डोंगर दरीतुन अम्ही लेहला पोहोचलो. तिथे पोहोचलो तेव्हा काय वाटत होतं हे मला शब्दात सांगता येणार नाही. मस्त मार्केट मधे हिंडत हिंडत हॉटेल शोधलं आणि रूम बुक केली. आता पुढची घाई होती ती लवकरात लवकर परवानगी मिळवण्याची. आदल्या दिवशी ज्या हिरोला पावनागी काढण्यासाठी सांगितलं होतं त्याचा फोन लागत नव्हता म्हणून मग आम्हीच तडक 'लेह' कार्यालयात गेलो. जर परवानगी मिळाली नसती तर रविवारचा दिवस फुकट जाणार होता आणि ते आम्हाला नको होतं. ४.०० ला ते बंद होतं आणि आम्ही अगदी वेळेत ३.३० ला तिथे पोहोचलो. लगेच पैसे भरून ज्या ज्या प्रदेशात जायचय त्याची परवानगी काढली आणि परत आलो. भूक लागली होती म्हणून एका हॉटेल मध्ये गेलो. पंजाबी जेवण होतच (ते कुठे कधी नसतं का ?) पण आम्ही त्याला 'लेह' स्पेशल 'थूपा' आणायला सांगितलं. जिथे गेलोय तिथली स्पेशल डिश न खाऊन कसं चालेल? वेगवेगळ्या भाज्या आणि नुडल्स घातलेल्या थूपा वर मस्त ताव मारला आणि रूम वर गेलो.
४७.
४८.
४९.
५०.
फ्रेश झालो आणि पुन्हा हिंडायला बाहेर पडलो. तिथली लोकं कशी राहतात, कशी बोलतात, तिथलं वातावरण अनुभवत हिंडत होतो. भर-भर चाललं कि लगेच धाप लागत होती. कोणताही काम करा पण एकदम हळू करा हे इथलं नवीन माणसासाठी सूत्र आहे. उगाच घाई गडबड केली तर दमून बेजार व्हाल. सेल लागलेली दुकानं जशी असतात तसं एक दिसलं आणि आम्ही आत घुसलो. दोन तीन कानातले आवडले. म्हंटल घेउयात महिला मंडळासाठी. भाव विचारला तर बाई म्हणाली कमीत कमी ८०० रुपये. मी आ करून तिच्याकडे पाहत होतो तर म्हणाली सगळे चांदीचे आहेत. लगेच विचार मनातून काढून टाकला आणि तिथून काढता पाय घेतला. बाहेरच्या लोकांना बघून फालतू फालतू गोष्टींचे चढे भाव सांगत होते सगळेच. एके ठिकाणी किचेनचा भाव पहायला. बाईने सांगितला २०० रुपये. बराच वेळ हुज्जत घातली तेव्हा कुठे ती ५० रुपया वर आली आणि मी लगेच २०० ची चार घेतली. असेच उनाडक्या करत वेळ घालवला आणि रात्री एका हॉटेल मधे जेवलो. जेवण झाल्यावर शतपावली करताना घरी फोन करून सगळा रिपोर्ट सांगितला, रूम वर गेलो, हिशोब केला आणि झोपलो.
क्रमश:
प्रतिक्रिया
23 Jan 2013 - 3:14 pm | बॅटमॅन
अप्रतिम!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
23 Jan 2013 - 11:00 pm | मोदक
+१ हेच बोल्तो...
23 Jan 2013 - 3:48 pm | चेतन माने
फोटू बघून हा भाग टाकायला केलेला उशीर माफ केला :)
जबरदस्त आवडला हा भाग. फोटू निव्वळ अप्रतिम आणि जोडीला तुमचं लिखाण ..... लई भारी
पुभाप्र :)
23 Jan 2013 - 4:18 pm | सूड
मस्त !! अजूनही क्रमशः दिसतंय हे बघून बरं वाटलं. पुभाप्र.
23 Jan 2013 - 4:20 pm | स्पंदना
कितवा दिवस हा? अन लेहला किते दिवसांनी पोहोचलात?
फोटोज फारच छान. अन मित्राला तुम्ही ज्या पद्धतीने सांभाळुन घेतलत त्याबद्दलतर अक्षरशः दंडवत! भाग्यवान आहे मित्र तुमचा.
23 Jan 2013 - 5:21 pm | मनराव
आठव्या दिवशी पोहोचलो....
23 Jan 2013 - 5:40 pm | स्पंदना
हे एव्हढ एकच लिखाण नवरा मला मोठ्याने वाचायला लावतो अन फोटो पहातो. (जळतो तुमच्यावर अक्षरशः) अन त्यालाच ऐकायच होत तुम्ही कधी पोहोचला ते. :-)
23 Jan 2013 - 5:09 pm | सुधीर
मला वाटायचं कोकणातलेच रस्ते खराब आहेत. फोटो चांगले आले असले तरी निसर्ग फारच ओसाड वाटतोय. (खूप खूप उंचावर असंच असावं बहुदा)
23 Jan 2013 - 5:22 pm | प्रचेतस
निसर्ग ओसाड वाटणारच.
लडाख हे सर्वाधिक उंचीवरचं शीत वाळवंट आहे.
24 Jan 2013 - 7:40 pm | यशोधरा
ओसाड? एकदा जाउन या, म्हणजे त्या निसर्गाचा रंग कसा वेगळा आहे ते लक्षात येईल आणि पुन्हा पुन्हा जावसं वाटेल. तिथली शांतता ऐका एकदा. :)
23 Jan 2013 - 5:31 pm | तिमा
त्या ओसाड निसर्गाची वेगळीच मजा आहे. एकदा जाऊन या म्हणजे तुम्हालाही आवडेल.
- लेहला (ऐषारामात) जाऊन आलेला तिमा
हा भाग जबरदस्त झाला आहे. माणसांना ऑक्सिजन कमी पडतो हे अनुभवले होते. पण वाहनांना पण असे होते हे कधी डोक्यातच आले नाही.
23 Jan 2013 - 5:42 pm | पिंगू
सही. लेह दर्शन हापिसात बसल्या बसल्या घडतयं..
- पिंगू
23 Jan 2013 - 5:50 pm | इनिगोय
आधीच्या भागांप्रमाणे हाही भाग न थांबता वाचून काढला. मस्तच.
तुमच्या मित्राची तुम्ही जी काळजी घेतलीत आणि त्या तशा स्थितीतही डोकं जेवढं शांत ठेवलंत, त्याबद्दल मनापासून दाद द्यावीशी वाटतेय. एकदम भारी!
बाकी ते सगळे गंभीर डोंगर आणि नि:शब्द निसर्ग बघून एकदम हिमालयाची ओढ लागली पुन्हा कितव्यांदातरी.
23 Jan 2013 - 11:59 pm | अत्रुप्त आत्मा
अता शब्द संपले...पुन्हा भेटाल तेंव्हा अजून एक नमस्कार घालणार आहे. __/\__
24 Jan 2013 - 3:21 am | लुप्त
+१ हेच अगदि !!
24 Jan 2013 - 12:07 am | अभ्या..
फोटो आणि तुमचे प्रवासवर्णन छानच. मस्त.
24 Jan 2013 - 12:08 am | अग्निकोल्हा
माय गॉड व्हॉट अ ट्रिप!
24 Jan 2013 - 12:11 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
फोटु नेहेमी प्रमाणे भारी...!!! लेह वारी करायची जाम हुक्की आलीये...
24 Jan 2013 - 12:48 am | nishant
फोटॉ आणि वर्णन दोन्हि... पुढ्चा भाग लवकर येउद्या :)
24 Jan 2013 - 4:45 am | रेवती
सुरेख वृत्तांत आणि फोटूही. काही फोटू खोटे वाटावेत असे चांगले आलेत.
24 Jan 2013 - 10:25 am | नरेंद्र गोळे
अतीविरळ हवेने प्राण पणाला आले ।
फटफटीचेही वायूसेवन मग वाढविले ॥
थांबेही पुढले, त्यामुळेच झाले थोडे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ १४ ॥
कधी बार्लाचा“ला[१]” आली कळले नाही ।
पसरे रस्त्यावर पाणी, ठायी ठायी ॥
अतिउंच प्रदेशी, उंचीचा तापही वाढे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ १५ ॥
दुखू लागे डोके, भ्रमले मन संतापे ।
उल्लंघणे गाटा लाटा[२] , नव्हते सोपे ॥
भासला जवळ तो रस्ताही, चढ चढे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ १६ ॥
लाचुलुंगला नंतर, पांगही ला आक्रमली ।
मग ’मूर’ पठारी, माती भुसुभुसू झाली ॥
पाऊस संभवे, भीती चिखलाची वाढे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ १७ ॥
अरूंद पूलही दिसले, दिसल्या खिंडी ।
चालती कड्याच्या वरती शेळ्या, दिंडी ॥
साकारती पर्वती साज, दृष्टी ये नेढे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ १८ ॥
माखले धुळीने अंग, दुचाक्या मळल्या ।
मग टांगलांगला उंच, दुचाक्या चढल्या ॥
बुटक्या झुडुपांतून स्वार वाट वरी काढे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ १९ ॥
किती दूर राहिला पडाव, ठाऊक नाही? ।
का काहीच आपण अजून पाहिले नाही? ॥
भ्रम स्वैर निघाला, अंतर उरले थोडे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ २० ॥
भ्रम चढला, तापही चढला, तापे अंग ।
रुम्त्सेस पोहोचता पडाव झाला संग ॥
तरी कुणास नव्हते उमेदीचे वावडे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ २१ ॥
खाण्यास मिळाले ’शल्घम’ ताजेताजे ।
पहाटे क्षितिजावर कोवळे ऊन विराजे ॥
नदी बाजूस एका, दुसर्या बाजूला कडे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ २२ ॥
रस्त्यावर दिसला असाच अडला वीर ।
पंक्चर चाकातच, असे नसो तकदीर ॥
मग अंतिम टप्पा ’लेह’, अधीरता वाढे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ २३ ॥
उलटेच प्रवासी दिसले, ’लेह’हून आले ।
मन पाहून हेही, अनेक वाटा चाले ॥
ईप्सित गाठले, शेपूट उरले थोडे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ २४ ॥
काढले परवाने, पोहोचताच मुक्कामी ।
अडखळले, पळले, प्रवास झाला नामी ॥
’लेह’चा विशेषच ’थुपा’ परी आवडे ।
इच्छाशक्तीचे, हिमगिरीस पडले कोडे ॥ २५ ॥
[१] खिंड
[२] गाटा ह्या नावाने ओळखल्या जाणार्या, डोंगर-उतारावर वळशा-वळणांच्या रस्त्याने घेतलेल्या लाटा
24 Jan 2013 - 10:26 am | ५० फक्त
धन्यवाद आणि पुन्हा पुन्हा तेच लिहिणार नाही, एकदा घरी जेवायला या. दोन्ही जोडीदारांना घेउन.
24 Jan 2013 - 11:39 am | रोहन अजय संसारे
भन्नाट चालू आहे प्रवास. क्रमश वाचून खूप बरे वाटले. आधीच्या भागांप्रमाणे हाही भाग न थांबता वाचून काढला.
संयम मानला राव तुमचा. फोटो तर सोलिड आले आहेत. निसर्गे मस्त मस्त आहे.
फोटो पाहून जाण्याची इच्चा पक्कि होत आहे.
जानार जानार नक्कि जानार, तेव्हा मदत घेइन च तुमचि महिति मिलवायला.
नुडलस पण फोटो मस्त आला आहे, चवदार असणार नकीच.
24 Jan 2013 - 1:05 pm | रणजित चितळे
माझ्या पोस्टींगचे दिवस आठवले. पण माझ्याकडे एवढे फोटो नाहीत :-(
मॅग्नेटीक हिलचे वर्णन व पथ्थर साहिबचे वर्णन करा जमले तर.
अवांतर
पण आम्ही त्याला 'लेह' स्पेशल 'थूपा' आणायला सांगितलं.
त्याला थुकपा म्हणतात. मस्त लागते. आपल्या मॅगी पेक्षा!!!!
24 Jan 2013 - 1:07 pm | पियुशा
मस्त मस्त मस्त !!!
25 Jan 2013 - 12:02 am | मेघनाद
नेहमीप्रमाणे उत्तम फोटो आणि लिखाण प्रत्येक भागागणिक उत्सुकता ताणली जात आहे. अशी वारी काही जणांनाच शक्य होते....
क्रमशः वाचून बरे वाटले....पुढील भागाच्या प्रतीक्षेत आहे.....
25 Jan 2013 - 11:25 am | मी-सौरभ
लई भारी :)
सर्वात महत्वाच म्हणजे एवढ्या शांतपणाने अन जबाबदारीने वागलास याच पण खूप कौतुक आहे.
भविष्यात अश्याच अजुन वार्या करा, आम्ही पण सामील होऊ तुम्हाला....
25 Jan 2013 - 12:12 pm | चौकटराजा
मनराव, मुळातच सलग बरेच वाचावयाचे ठरवले असल्याने आतपर्यन्त त प्रतिसाद दिला नव्हता. हा प्रतिसाद म्हणजे ज्योतीने तेजाची आरती असाच आहे. आग्रारोड चुकभूल, किल्ली तुटणे. १४००० फूट ओलांडल्यावर आपल्या बरोबर वहानाचीही दमछाक होणे, जगातील अद्वितीय ( high alititude desert)निसर्गाचे तपकिरट दर्शन, मढी गुलबा ,रोहतांग रस्त्याची धोकादायक भिंत सारेच चित्तथरारक आहे. यातून पुढच्या साहसासाठी मन तयार होते.पुण्यातील काही मुले सायकलवरून खारदुंगला येथे गेली होती. त्याना मी भेटलोय, बोस्टन हून एकट्याने पुण्याला विमान आणणार्या सदाशिव पेठ्याला मी भेटलोय आता अभिमानाने मनरावाचे नाव त्यात घालतो. या रस्यावरच्या माझ्या काही आठवणी जाग्या झाल्या . लेखनशैली व एकूणच हे साहस डोक्यावर घेण्याजोगे .
25 Jan 2013 - 12:33 pm | धन्या
काय फोटो आहेत राव... मानलं तुम्हाला...
अशा प्रवासासाठी बुलेट, अॅव्हेन्जर वगैरे गाडयाच लागतात काय? पॅशन प्रो वगैरे नाही चालत का? चालत असेल तर मी ही एकदा सुडसोबत लेहला जाईन म्हणतो. ;)
25 Jan 2013 - 6:36 pm | अत्रुप्त आत्मा
@चालत असेल तर मी ही एकदा सुडसोबत लेहला जाईन म्हणतो. smiley>>> =)) जवळ जवळ पुढचा ९५% प्र-वास आरश्यातून मागे बघत एकट्यानी करावा लागेल,,,चालेल ना रे...................................!!!!!!!!!!! =))
25 Jan 2013 - 1:14 pm | मुक्त विहारि
फोटो आणि तुमचे प्रवासवर्णन आवडले..
25 Jan 2013 - 2:59 pm | Mrunalini
खुपच छान झालाय लेख... फोटो पण मस्त.. आवडेश!! :)
25 Jan 2013 - 8:44 pm | मदनबाण
कधी जायला मिळणार मला इथे ? :(
वेळ मिळताच सर्व भाग परत वाचीन. :)
5 Feb 2013 - 1:19 pm | विलासराव
मस्त आहेत फोटो.
जायची इच्छा होतेय.
5 Feb 2013 - 2:17 pm | प्यारे१
तारीख उलटली हरकत नाही, परत भेटू तेव्हा सरुटॉबाने नक्की ! :)
सौरभ, मोदक नि इतर कंपू लक्ष ठेवा!
5 Jul 2016 - 11:55 am | Nitin Palkar
अफलातुन राव! आणखी शब्दच नाहीत.