चित्र: आंतरजालाहून साभार
माझ्या लहानपणी मला दिवाळीला, फटाक्यांच्या आकर्षणाबरोबर अत्तराची बाटली हे एक फार मोठे आकर्षण होते. दरवर्षी दिवाळीला वडील एक अत्तराची बाटली आणायचे, बाटली काय म्हणतोय, कुपीच असायची ती एक लहानशी. अभ्यंगस्नान केल्यावर थोडे अत्तर कपड्यावर चोपडून मिळायचे. नंतर त्याच अत्तराचा फाया कानात घालायला मिळायचा. मग नुसता घमघमाट व्ह्यायचा आणि एकदम राजेशाही वाटायचे. त्या काळातला तो चंगळवादच होता. त्यानंतर पुन्हा वर्षभर काही अत्तर स्वतःच्या अंगावर मिरवायला मिळायचे नाही. हा, पण कधीतरी आईबरोबर हळदी कुंकवाला गेले की तळहाताच्या उलट्या बाजूला थोडेसे अत्तर चोपडले जायचे पण त्यात दिवाळीच्या अत्तराची मजा नसायची. कधीतरी गावातल्या अतिश्रीमंतांच्या लग्नात मोठाल्या पंख्यांवरून सोडलेला अत्तरमिश्रित पाण्याचा फवाराही थोडीफार सुगंधी झुळूक द्यायचा. ह्यापलीकडे कधी अत्तराचा संबंध लहानपणी आला नव्हता.
मोठे झाल्यावर, कॉलेजात जायला लागल्यावर, कॉलेजातल्या श्रीमंत मित्रांकडून डिओ आणि परफ्यूम हे अत्तराचे श्रीमंत अवतार आहेत कळले. ते काही वापरायची ऐपत नव्हती. ते तसले काही घेऊयात का? असे आमच्या पूज्य वडिलांना नुसते म्हटले जरी असते तर दरवर्षी दिवाळीला मिळणारा हक्काचा अत्तराचा फायाही मिळायचा बंद झाला असता. त्यामुळे कॉलेजात असताना डिओ आणि परफ्यूम हे ऐकण्यापलीकडे काही मजल गेली नाही.
चित्र: आंतरजालाहून साभार
पुढे नोकरी लागल्या एक चार्ली नावाची एक सेंटची बाटली घेतली होती. त्या विषयातले ज्ञानही तेव्हा एवढे अगाध होते की डिओ म्हणजे काय, परफ्यूम, सेंट म्हणजे काय ह्यातली काहीही अक्कल नव्हती. काहीतरी छान वास येतो येवढीच काय ती अक्कल. एकदा ऑफिसमधल्या एका मित्राच्या घरी, अंधेरीला, आम्ही काही मित्र पार्टीसाठी मुक्कामी राहिलो होतो. दुसर्या दिवशी सकाळी त्याच्या घरूनच ऑफिसला जाणार होतो. सकाळी अंघोळ झाल्यावर त्याच्या ड्रेसिंग टेबलावरच्या कपाटात बघितले तर बर्याच रंगेबीरंगी बाटल्या दिसल्या. त्यात एक डिओ असे लिहिलेली बाटली होती. मनात म्हटले “च्यायला चला, मुफ्त का चंदन घीस मेरे नंदन” आणि फवारले त्यातले द्रव्य शर्टावर सगळीकडे. तसे करताना त्या मित्राने पाहिले आणि दात काढत म्हणाला,“साल्या, घाटीच आहेस. अरे, डिओ आहे तो परफ्यूम नाही.” मीही दात काढले आणि बळंच हॅ. हॅ.. हॅ... केले. पण तो घाव जिव्हारी लागला होता. मित्राने माप काढले म्हणून नव्हे तर, साला, जे कळत नाही ते करायची हौस दांडगी, ह्या स्वतःच्या वृत्तीमुळे. पण काळाच्या ओघात पुढे ती घटना विसरूनही गेलो.
मुंबईतल्या एका कंपनीत काम करीत असताना एकदा, पहिल्यांदा अमेरिकेत कामानिमित्त जायचा योग आला. तेव्हा त्या कंपनीत आम्हाला एका आठवड्याचे ट्रेनिंग दिले होते अमेरिकेत कसे वागायचे, एक कंसल्टंट म्हणून, ह्याबद्दल. तिथल्या रीतीभाती, खाण्यापिण्यातले आणि दैनंदिन जीवनातले शिष्टाचार ह्यावर सगळा भर होता. त्यावेळी कळले की अमेरिकेत, तिथल्या लोकांची भारतीयांबद्दलची एक तक्रार म्हणजे, ‘इंडियन पीपल स्मेल’. त्यामुळे आम्हाला अमेरिकेत जाण्यासाठी जो ‘किट अलावंस’ (प्रवास तयारी भत्ता) दिला होता त्यात कोणती वेगवेगळी डिओ आणि परफ्यूम्स घ्यावी याची यादी दिलेली होती. त्यावेळी मात्र भत्ता कंपनीने दिलेला असल्याने महागडी डिओ आणि परफ्यूम्स घ्यायची इच्छा पूर्ण झाली, इथेही मुफ्त का चंदन घीस मेरे नंदन हा मंत्र होताच साथीला. पण अमेरिकेत गेल्यावर ते तसे ट्रेनिंग का दिले गेले होते त्याची परिणती आली.
दुसर्यांदा अमेरिकेत गेलो ते एका नवीन कंपनीतून. तोपर्यंत बॉडी शॉपिंगचा धंदा पार फोफावला होता. त्यामुळे पहिल्या कंपनीसारखे काही एटिकेट्स ट्रेनिंग वैगरे देण्याच्या फंदात ही नवीन कंपनी पडत नव्हती. (पण माझा खरा रस होता प्रवास तयारी भत्त्यात, मात्र तो काही ह्यावेळी नव्हता) ह्यावेळी माझ्याबरोबर २-३ दक्षिण भारतीय होते, ज्यांचे आयुष्य ‘ठेविले अनंते तैसेची राहावे’ह्या उक्तीवर उभे होते. त्यांचा आणि डिओ, परफ्यूम्स वगैरेंचा दूरान्वयेही काही संबंध नव्हता. अमेरिकेत गेल्यावर तिथल्या त्या क्लायंटच्या ऑफिसमधल्या मुली कायम काहीही काम (ऑफिसचेच, बरं का) असले की फक्त माझ्याकडेच यायच्या. नाही हो, मी काही मदनाचा पुतळा वैगरे नाहीयेय, त्यामुळे माझा कसलाही गैरसमज झाला नव्हता. पण त्या दक्षिण भारतीय मित्रांना फार जळजळ व्ह्यायची. मग त्यांना ‘इंडियन पीपल स्मेल’चा फंडा समजावून सांगितला तेव्हा कुठे त्यांच्या जिवात जीव आला. त्यानंतर मग त्यांनीही कुठल्यातरी स्वस्तातल्या ब्रॅन्डचे डिओ घेतलेच एकदाचे पण तरीही त्या ऑफिसमधल्या मुली काही माझ्याकडे यायच्या थांबल्या नाहीत. ‘एकदा कानफाट्या नाव पडले की पडले’ही म्हण इंग्रजीत कशी समजावून सांगायची हे काही केल्या मला जमले नाही; म्हणून मग मीही त्या दाक्षिणात्यांना काही समजावून द्यायच्या भानगडीत पडलो नाही. नाही तरी मलाही आतून खूप खूप बरे वाटायचे हो, त्या मुली माझ्याकडे यायच्या तेव्हा, खोटं कशाला बोला.
चला आता ह्या नांदीनंतर आपल्या परफ्यूमच्या गाथेकडे वळूयात.
परफ्यूमचा इतिहास
प्राचीन काळी, त्यावेळच्या पूजाअर्चनेच्यावेळी, काही खास वनस्पती किंवा काही खास झाडांच्या खोडाच्या साली जाळून सुवासिक धूर केला जायचा. रोमन संस्कृतीत (ख्रिस्तपूर्व) पॅगन लोकं देवाची पूजाअर्चना करताना हा सुवासिक धूर वापरीत. त्यांच्या मते देवाकडे जाण्याचा मार्ग ह्या ‘धूरा पासून’ सुरू होतो. लॅटिन भाषेत ‘per fumum’ म्हणजे ‘धूरा पासून’ किंवा इंग्रजीत ‘from smoke’. त्याचेच पुढे काळाच्या ओघातले आधुनिक रूप म्हणजे ह्या सुगंधाला आजचे पडलेले नाव, परफ्यूम. त्यामुळे आजच्या काळात वापरला जाणारा ‘परफ्यूम’ हा शब्द आलेला आहे, लॅटिन भाषेतून, ‘धूरा पासून’.
चित्र: आंतरजालाहून साभार
परफ्यूमच्या सुवासिक इतिहासात डोकावले असता, परफ्यूमचा वापर हा इसवीसनाच्या ४००० वर्षांपूर्वीपासून असल्याचे ह्या विषयातील संशोधक आणि जाणकारांचे मत आहे. ह्या ऐतिहासिक खोलात जर जायचा प्रयत्न केला तर तो इतिहास आपल्याला पार इजिप्त पर्यंत घेऊन जातो. मध्यपूर्वेत इजिप्तजवळ उत्खननात इसवीसनाच्या ४००० वर्षांपूर्वीच्या काही कबरींचा शोध लागला आणि त्या कबरींमध्ये काही कुप्या मिळाल्या. त्या कुप्या ह्या सुगंधी द्रव्यांच्या असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून इजिप्तमध्ये त्या काळाच्या संस्कृतीत सुगंधी द्रव्यांचा फार वापर केला जात होता ह्याचा शोध लागला. पण त्या कबरींमध्ये ह्या कुपी काय करीत होत्या? तर त्या रहस्याची पुराणवस्तुशास्त्रज्ञांनी केलेली उकल अशी की मृतात्म्याचा स्वर्गात जातानाचा प्रवास हा सुवासिक असावा अशी त्या काळी धारणा होती. आहे की नाही हा परफ्यूमच्या इतिहास त्याच्या नावाप्रमाणेच एकदम आल्हाददायक.
परफ्यूम कसे तयार होते?
चित्र: आंतरजालाहून साभार
परफ्यूम कसे बनवतात हे कळले आणि मी आनंदाने बेहोषच झालो. कारण ते बनविण्याची पद्धत ही माझ्या अतिशय आवडीची आहे, अगदी ‘गाळीव’. परफ्यूम तयार करण्याच्या पद्धतीत डिस्टिलेशन (Distillation) ही प्रक्रिया वापरली जाते. जेव्हा ही डिस्टिलेशन पद्धत वापरली जाते हे कळले तेव्हाच ह्या परफ्यूमची गाथा लिहायची हे मनाशी नक्की केले. परफ्यूम तयार करण्यातली पहिली पायरी म्हणजे कच्चा माल मिळवणे. परफ्यूम बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे सुवासिक पाने, फुले, झाडांच्या साली, झाडाची सुवासिक खोडे, सुवासिक वनस्पती (Herbs) आणि प्राण्यांचे सुवासिक अवयव (उदा. कस्तुरी मृग) हा गोळा करून त्याचा साठा केला जातो. हा कच्चा माल मिळवला की मग त्यांपासून सुवास वेगळा करणे ही महत्वाची पायरी असते. हा सुवास वेगळा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कच्च्या मालाच्या प्रकारानुसार ह्यातली एक पद्धत सुवास वेगळा करण्यासाठी वापरली जाते.
उर्ध्वपातनाने अर्क काढणे (डिस्टिलेशन): ह्यात कच्चा माल एका भट्टीत (Still) मध्ये टाकून त्याला उकळवले जाते, हे उकळवण्यासाठी गरम वाफही वापरली जाते. त्या उष्णतेने त्या कच्च्या मालातील सुगंधी द्रव्याचे (तेल) बाष्प तयार होते. हे बाष्प मग एका नळीवाटे जाऊ देऊन त्याला थंड करून त्याचे पुन्हा द्रव पदार्थात रूपांतर केले जाते. हा द्रव म्हणजेच सुगंधी तेल (Concentrated Oil)
द्रावकात विरघळविणे: पेट्रोलियमजन्य द्रावक किंवा बेंझिन असलेल्या मोठ्या फिरत्या भांड्यात कच्चा माल टाकून तो घुसळवला जातो आणि तो कच्चा माल त्या द्रावकात विरघळतो आणि एक मेणचट पदार्थ मागे उरतो. त्याला मग इथिल अल्कोहोलमध्ये मिसळवले जाते. मग त्या मिश्रणाला गरम केले जाते. त्या उष्णतेने त्यातले अल्कोहोल उडून जाते आणि मग मागे उरते सुगंधी तेल (Concentrated Oil).
दाब देणे: ह्या प्रकारात कच्च्या मालावर दाब देऊन त्यातून सुगंधी तेल काढले जाते.
आता इथून पुढे, शास्त्र आणि कला यांचा खरी जुगलबंदी चालू होते. ही वेगवेगळी सुगंधी तेलं ठराविक मापात घेऊन, त्यांच्या सुगंधाची जातकुळी ओळखून, त्यांचा मिलाफ (Blend) केला जातो. हा मिलाफ करणारा किमयागारच (रासायनिक) असावा लागतो. फारच नैपुण्याचे काम असते हे. म्हणून हा मिलाफ करण्याच्या ह्या शास्त्राला, कलेचीही जोड असावी लागते असे म्हटले जाते. आता ह्यात कसली कला आलेय? असा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिकच आहे. सांगतो! आपण जे फिनिश्ड गुड म्हणजे तयार माल असलेले परफ्यूम वापरतो त्याचे, 3 थर असतात. त्या प्रत्येक थराला नोट (Note) असे म्हणतात.
टॉप नोट: परफ्यूम फवारल्या फवारल्या जो गंध दरवळतो तो टॉप नोट असतो.
सेंट्रल किंवा हार्ट नोट: परफ्यूम फवारल्यानंतर काही काळाने जो गंध दरवळतो तो हार्ट नोट असतो.
बेस नोट: परफ्यूम फवारल्यानंतर कित्येक तास दरवळणारा जो गंध असतो तो बेस नोट असतो.
मग आता सांगा, हे सगळे त्या ब्लेंड केलेल्या परफ्यूम जमवून आणायचे म्हणजे कलाकारीच आहे की नाही?
त्यानंतरची पायरी म्हणजे मुरवणे (Aging). ह्या ब्लेन्ड करून मुरवलेल्या सुगंधी तेलांना मग मुरवले जाते. त्याचा कालावधी काही महिने ते काही वर्षे इतका असू शकतो. ह्या ब्लेन्ड केलेल्या सुगंधी तेलांमध्ये पुढे अल्कोहोल मिक्स केले जाऊन त्याची घनता कमी केली जाते. ह्या अल्कोहोल मिश्रीत परफ्यूममधल्या सुगंधी तेलाच्या प्रमाणानुसार त्याचे खालील वेगवेगळे प्रकार पडतात.
परफ्यूमचा प्रकार
सुगंधी तेलाचे प्रमाण
टिकण्याचा कालावधी
Perfume
५ ते ३० %
६ ते ७ तास
Eau de Perfume or EDP
८ ते १५ %
५ ते ७ तास
Eau de Toilette or EDT
४ ते ८ %
४ ते ६ तास
Eau de Cologne
३ ते ५ %
२ ते ३ तास
परफ्यूमच्या सुगंधाचे प्रकार कोणते?
ह्या परफ्यूमचे सध्याच्या आधुनिक काळात वर्गीकरण साधारण पाच ढोबळ प्रकारात केले जाते.
फ्लोरल नोट्स: गुलाब, जाई, चमेली, कार्नेशन इत्यादी विविध फुलांपासून बनवली जाणारी परफ्यूम्स ह्या प्रकारात मोडतात.
ओरिएंटल नोट्स: प्राण्यांच्या सुवासिक अवयवांपासून मिळवलेल्या सुगंधी तेलांना फळांच्या आणि फुलांच्या सुगंधी तेलांबरोबर ब्लेंड करून बनवली जाणारी परफ्यूम्स ह्या प्रकारात मोडतात.
वुड नोट्स: चंदन, देवनार यांसारख्या झाडांच्या खोडापासून मिळवलेल्या सुगंधी तेलांपासून बनवली जाणारी परफ्यूम्स ह्या प्रकारात मोडतात.
फ्रेश नोट्स: सायट्रस (लिंबू, संत्री, मोसंबी) चवीच्या फळं आणि फुले यांपासून मिळवलेल्या सुगंधी तेलांपासून बनवली जाणारी परफ्यूम्स ह्या प्रकारात मोडतात.
Fougère नोट्स: फ्रेंच भाषेत Fern (नेचे सदृश वनस्पती) ला Fougère म्हणतात. ह्या नेचे सदृश वनस्पतींपासून मिळवलेल्या सुगंधी तेलांपासून बनवली जाणारी परफ्यूम्स ह्या प्रकारात मोडतात.
हे ढोबळ आणि मूलभूत वर्गीकरण झाले, ह्यांच्या उपप्रकारांत असंख्य प्रकारचे फ्लेवर्स असलेली परफ्यूम्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यांचे प्रकार दर्शवण्यासाठी खालील फ्रेग्नन्स चक्र वापरले जाते.
फ्रेग्नन्स चक्राचे चित्र विकीपीडियावरून साभार
परफ्यूम आणि डिओडरंट मध्ये फरक काय?
डिओडरंट्सचा (Deodorant) वापर घर्मस्त्राव (Perspiration) रोखण्यासाठी केला जातो. घामामध्ये असलेल्या जिवाणूंमुळे घामाला एक दुर्गंध येत असतो. त्या घामाचा स्त्राव रोखून त्या दुर्गंधापासून मुक्ती मिळवून देण्याचे कार्य हे डिओडरंट्स करतात. त्यामुळे जिथे घाम येतो तिथे शरीरावर हे डिओडरंट्स फवारायचे असतात. बरेच डिओडरंट्स हे सुगंधरहित सुद्धा असतात. त्यांचे काम एकच घर्मस्त्राव रोखणे.
परफ्यूम्समध्ये घर्मस्त्राव रोखण्याचे काही असले काही गुणधर्म नसतात. त्यात फक्त सुगंधच (Fragrance) असतो. त्याचे कार्य फक्त आणि फक्त एकच, सुगंध देऊन शरीराला सुवास देणे.
परफ्यूम कसे वापराल?
परफ्यूम फवारल्यावर त्यातले सुगंधी कण हळूहळू उडून जातात. ते उडून जाताना त्यांच्या नोट्स प्रमाणे गंध दरवळत राहतो. जास्त काळ ह्या परफ्यूमचा गंध दरवळत ठेवायचा असेल तर ते परफ्यूम कसे वापरायचा ह्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. सर्वात आधी तुमच्या आवडीचा परफ्यूम निवडून घ्या. बरेच परफ्यूम्स वापरल्यानंतर तुम्हाला नेमका शोभणारा (सूट होणारा) परफ्यूम ठरवता येईल. आता परफ्यूम निवडून झाला असेल तर मग तो लावण्यापूर्वी छानपैकी अंघोळ करून घ्या. तुमच्या परफ्यूमच्या सुगंधाच्या जवळ जाणारा सुगंध असलेल्या साबणाने अंघोळ केल्यास उत्तम. उदाहरणार्थ जर तुम्हाला फ्रेश नोट्सचे परफ्यूम्स आवडत असतील तर सिंथॉल लाईम वापरल्यास त्याच्या शरीरावर रेंगाळणार्या गंधाबरोबर त्याची जोडी त्या परफ्यूमबरोबर जमून जाईल अगदी.
आता हा परफ्यूम चोपडण्याच्या काही विशेष जागा आहेत तेथे तो लावल्यास त्याचा परिणाम फार काळ टिकून राहतो. आपल्या शरीरावर जिथे नाडीचे ठोके पडतात त्या जागा हा परफ्यूम फवारण्यास अती उत्तम म्हणजे हाताचे मनगट, हाताच्या कोपराची आतली बाजू, छाती (स्त्रियांसाठी ही जागा अतिशय उत्तम! ह्यात कसलीही अश्लीलता नाहीयेय. कसलेही भलते विचार मनात आणू नका). शिवाय मान आणि कानाच्या पाळीच्या मागची बाजू ह्या जागा तर खास महत्त्वाच्या. का ते विचारा? जेव्हा जोडीदाराला आपण कवेत घेतो तेव्हा नाकाच्या सर्वात जवळ असणारे शरीराचे भाग हेच असतात. त्यामुळे तिथून येणार्या सुगंधाने जोडीदाराला कवेत घेण्याच्या उन्मादाला आणखीनंच बहर येतो. साधारण जिथे जिथे हे परफ्यूम फवारले आहे ती जागा अंगावरच्या कपड्यांनी झाकली जाईल अशी काळजी घेतल्यास त्या परफ्यूमचा परिणाम जास्त काळ राहू शकतो. परफ्यूममधले उडून जाणारे सुगंधी कण कपड्यामुळे हवेत विरून जायला वेळ लागतो आणि त्याचा परिणाम जास्त काळ टिकतो.
चला तर मग, ह्या वर्षीची दीपावली तुमच्यासाठी अतिशय सुगंधी आणि सुवासिक अशी असो, ही शुभेच्छा व्यक्त करत ही परफ्यूमची गाथा इथे सुफळ संपूर्ण करतो.
प्रतिक्रिया
12 Nov 2012 - 11:06 am | बहुगुणी
धन्यवाद, सोत्रि!
दिवाळीतला सुगंधी लेख आहे तर सुगंधी उटण्यांविषयीही माहिती मिळाली असती तर आवडली असती, जमलं तर प्रतिसादात द्या.
बरेचदा लोक antiperspirants आणि deodorants या द्र्व्यांना एकच समजतात. पण antiperspirants त्वचेची घर्मछिद्रे बुजवून वा बंद करून घामाची निर्मिती थांबवतात किंवा कमी करतात (यासाठी अॅल्युमिनियम क्षारांचा astringents म्हणून वापर केला जातो) , तर deodorants घामाच्या वासाला प्रतिरोध करतात (बहुतेक वेळा या द्रव्यांमध्ये बॅक्टेरिया मारणारी किंवा त्यांच्या वाढीला विरोध करणारी रसायनंही असतात), त्यांच्या वापराने घर्मछिद्रे उघडी राहून एक आवश्यक अशी शरीरक्रिया अनिर्बंध चालू राहते. शिवाय antiperspirants मध्ये असणार्या अॅल्युमिनियमच्या क्षारांच्या दीर्घकालीन वापराने जो मज्जासंस्थेवर दुष्परिणाम होऊ शकतो तो deodorants मुळे होत नाही. साधा बेकिंग सोडा हा परिणामकारक deodorant आहे.
12 Nov 2012 - 1:25 pm | चौकटराजा
माझ्या आत्याचे यजमान घरोघरी जाउन अत्तरे विकत. दसरा आला की जुन्या ग्राहकाना पत्रे टाकत. त्याना नातेवाईक व मित्राना भेट म्हणून अत्तराची बाटली देण्यात आनंद असे.
मस्त नाजुक छोट्या बाटल्या त्यावर लेबल्स वर बुचाचे झाकण व आत अत्तर !
आता सेंट आल्यामुळे अत्तराची लोकप्रियता कमी झाली आहे. बरीचशी अत्तरे कनोज येथून ते आणीत. अत्तरांच्या नावाची माझ्या बालमनाला मोठी गंमत वाटे. मदनबाण, पॉपी, कवठीचाफा, गुलाब, हीना, हिरवा चाफा, सोनाचाफा, मोगरा, जुई, रातराणी, खस, केवडा ई नावे.
12 Nov 2012 - 2:40 pm | सुहास झेले
वाह सोत्रि... एकदम अभ्यासपूर्ण लेख... :)
12 Nov 2012 - 2:43 pm | क्रान्ति
खासच सांगितली आहे गंधवार्ता! :)
कृत्रिम सुवासाचा त्रास होतो, हे कळलं तेव्हापासून त्याचं कौतुक कमी झालं, पण अत्तराच्या छान छान चिमुकल्या बाटल्या जमा करण्याचा छंद मात्र बरीच वर्षं जपला होता.
12 Nov 2012 - 7:16 pm | तुषार काळभोर
बोअर न करणार्या माहितीने परिपूर्ण!!
12 Nov 2012 - 7:52 pm | तिमा
थोडक्यांत भरपूर माहिती देणारा आहे. पेट्रोलियमजन्य द्रावणांत बेंझिनचा उल्लेख खटकला. कारण बेंझिन हे 'कार्सिनोजेनिक' असल्याने ते कुठल्याही प्रक्रियेमधे वापरायला अघोषित बंदी आहे. पण इतर द्रावक वापरता येतात.
13 Nov 2012 - 1:05 am | योगप्रभू
सोकाजी,
सुरेख लिहिलंत.
वाचून कसं प्रसन्न वाटलं.
13 Nov 2012 - 3:32 pm | मी-सौरभ
एक्दम सुगंधी लेख...
अजुन थोडा मोठा चालला असता
13 Nov 2012 - 11:17 pm | इष्टुर फाकडा
परफ्युम- अ स्टोरी ऑफ अ मर्डरर हा चित्रपट आवर्जून बघा असे सुचवतो, आवडेल तुम्हाला :)
बाकी तुमची अभ्यासपूर्ण रसिकता कायमच भावते. मस्त लेख !
14 Nov 2012 - 7:59 am | नगरीनिरंजन
माहितीपूर्ण लेख!
या परफ्यूम्स आणि डिओडरंट्स मध्ये बरीच कर्कजनक रासायने असतात असे ऐकून आहे.
14 Nov 2012 - 12:34 pm | प्रीत-मोहर
आवडल्या गेल्या आहे!~!~
14 Nov 2012 - 7:59 pm | इन्दुसुता
बहुगुणींशी सहमत.. दिवाळी निमित्ताने आपल्या संस्कृतीतील अत्तरे / सुगंधी द्रव्ये / उटणी यांचाही आढावा घेता आला असता तर अधिक चांगले झाले असते असे वाटून गेले.
14 Nov 2012 - 8:44 pm | सुधांशुनूलकर
वा! सुंदर, प्रसन्न, 'सुवासिक' वाटलं हा लेख वाचून.
सुधांशुनूलकर
14 Nov 2012 - 10:04 pm | आनंदी गोपाळ
लक्ष्मीपूजनासाठी आई अत्तराचा दिवा लावत असे. त्याची आठवण झाली. यंदा ते अॅरोमावाले चिनीमातीचे जाळीदार दिव्यात मेणबत्ती लावून भागवले. कारण चांगले गुलाब अत्तर मिळेना :(
16 Nov 2012 - 7:08 pm | चाफा
सोत्री तुम्ही म्हणजे द्रवपदार्थातले विकीपिडीया आहात. परफ्युमबद्दल इतकी माहीती आजच कळली :)
16 Nov 2012 - 9:47 pm | पैसा
एखाद्या विषयाचा अभ्यास करून लिहावे तर सोकाजीनेच१ मग विषय बाटल्यांचा असेल तर क्या कहने!
19 Nov 2012 - 5:12 am | स्पंदना
सुरवात एकदम छान झाली आहे लेखाची. आवडली.
बाकी अत्तरांचा इतिहास फारच मनोरंजक.
वाराणशीतल्या अत्तरियाकडे म्हणे सगळ्यात महाग अत्तरे मिळतात, अन त्यातला एक सुवास आहे 'मिट्टी' . हो! मातीच अत्तर.
बाकी, इंडीयन्स स्मेल म्हणणार्या लोकांची दया आली. आपण रोज अंघोळ केल्याशिवाय घर सोडत नाही राव! अन बाकिच्या साफसफाईला सुद्धा आपण पाणी वापरतो. कोरड्या साफसफाईमुळे शरिराला वास रहातो अन मग डिओज ची आवश्य्कता भासते.
22 Nov 2012 - 12:20 am | सूड
मस्त लेख !!
23 Nov 2012 - 12:53 am | श्रीरंग_जोशी
कमी अधिक प्रमाणात माझेही अनुभव असेच आहेत. कित्येक वर्षे परफ्यूम हा शब्द ऐकलाही नव्हता त्याऐवजी सेंट म्हणायचो.
आजही माझा परफ्यूमचा वापर अगदी नगण्यच आहे. अमेरिकेत हापिसातील वातावरणच असे असते की कुठलाही वास पटकन ओळखला जातो त्यामुळे अनेक भारतीयांची गोची होते. काही लोक हापिसात जायचे कपडे घालून स्वैपाक करतात मग काय हापिसात पोचल्यावर लगेच इतरांना कळून चुकते.
अन बरेचदा लिफ्टमध्ये अमेरिकन स्त्रियांच्या परफ्युमचा परिणाम इतका वेळ राहतो की आपणच त्या सुगंधात न्हाऊन निघतो :)
बाकी परफ्यूमबद्दलची माहिती जोरदार आहे.
26 Nov 2012 - 9:58 am | सुधीर कांदळकर
अगदी झकास. लेख आवडला.
16 Dec 2012 - 12:41 am | एस
वाह्, क्या बात है सोत्रि...
1 Jan 2013 - 7:29 pm | यशोधरा
आपली भारतीय अत्तरे अधिक मुरवलेली असतात का?
बहुगुणींची सूचना मस्त आहे
3 Dec 2014 - 10:51 pm | रुस्तम
सुगंधी माहिती. ज्ञानात भर पडली.