देव निवृत्त झाला !

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
23 Dec 2012 - 5:41 pm
गाभा: 

1

2

3

4

5

सचिनने आज एकदिवसीय सामन्यातून निवृत्ती जाहीर केली आणि एकदम उदास वाटायला लागले. क्रिकेटचा बादशहा या प्रकारातून आज अधिकृतरित्या बाहेर पडला. त्याची कसोटी सामन्यातील निव्रुत्तीही दूर नाही. पुढील १-२ महिन्यांतच त्या प्रकारातूनही तो निवृत्त होईल. भारतीय संघाला त्याची उणीव अनेक वर्षे भासेल.

सचिनच्या ह्या महान एकदिवसीय कारकीर्दीवर हा एक दृष्टीक्षेप -

प्रथम खेळलेला एक दिवसीय सामना - विरूद्ध पाकिस्तान १८ डिसेंबर १९८९, धावा - शून्य, भारत पराभूत
शेवटचा खेळलेला एक दिवसीय सामना - विरूद्ध पाकिस्तान १२ मार्च २०१२, धावा - ५२, भारत - विजयी

एकूण खेळलेले एकदिवसीय सामने - ४६३

फलंदाजी -
डाव - ४५२, नाबाद - ४१,
धावा - १८४२६, सर्वोच्च - नाबाद २००,
सरासरी - ४४.८३,
एकूण खेळलेले चेंडू - २१३६७, धावगती (प्रति १०० चेंडू) - ८६.२३,
शतके - ४९, अर्धशतके - ९६,
चौकार - २०१६, षटकार - १९५, झेल - १४०

गोलंदाजी -
एकूण टाकलेले चेंडू - ८०५४, एकूण दिलेल्या धावा - ६८५०, प्रति षटक दिलेल्या धावा - ५.१०
एकूण बळी - १५४, सरासरी (प्रत्येक बळीसाठी) - ४४.४८, प्रत्येक बळीसाठी टाकलेले चेंडू - ५२.२
सर्वोच्च - ३२ धावात ५ बळी
५ किंवा अधिक बळी घेतलेले सामने - २
४ बळी घेतलेले सामने - ४

तसं पाहिलं तर एप्रिल २०११ मध्ये संपलेल्या विश्वचषकानंतर गेल्या २० महिन्यात तो फक्त १० एकदिवसीय सामने खेळला. त्यात त्याने २ (भारत पराभूत), ४८ (भारत विजयी), १५ (सामना बरोबरीत), ३ (भारत पराभूत), २२ (भारत पराभूत), १४ (भारत पराभूत), ३९ (भारत विजयी), ६ (भारत विजयी), ११४ (भारत पराभूत) व ५२ (भारत विजयी) अशा धावा केल्या होत्या. शेवटच्या १० सामन्यात त्याने एक अर्धशतक व एक शतक केले. त्यापैकी भारताने ४ सामने जिंकले, १ बरोबरीत सुटला व ५ सामन्यात पराभव झाला.

त्याने कारकीर्दीत एकूण १०० आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत. त्यापैकी ५५ सामने भारत जिंकला आहे. तो एकूण ६ विश्वचषक स्पर्धा खेळला. त्यापैकी १९९६, २००३ व २०११ मधल्या विश्वचषक स्पर्धेत त्याने भरपूर धावा करून भारताच्या अनेक विजयात हातभार लावला होता.

आज माझ्या दृष्टीने दु:खाचा दिवस आहे. मी त्याचा भक्त आहे. क्रिकेटमधला हा खराखुरा सभ्य खेळाडू आणि हा क्रिकेटमधला परमेश्वर काही काळातच क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नाही, ही कल्पनाच करवत नाही.

प्रतिक्रिया

पैसा's picture

23 Dec 2012 - 6:18 pm | पैसा

संकलन चांगले आहे. पण दु:खी होणे वगैरे पटत नाही. प्रत्येक गोष्टीचा शेवट असतोच. आणखी एक महान भारतीय क्रिकेटर सुनील गावस्करने म्हटल्याप्रमाणे " रिटायर का होत नाहीस?" असं लोकांनी विचारण्यापेक्षा आधीच रिटायर व्हावे हे बरे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Dec 2012 - 6:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सच्या आता ग्राउंडवर दिसणार नाही, त्याची हुरहुर लागेल खरी पण त्याच्या धावा होत नव्हत्या ही गोष्ट तितकीच खरी आहे. सच्यानं एकदिवसीय सामन्यातून निवृत्तीची घोषणा केली तो निर्णय उत्तमच आहे. फक्त निर्णयाला उशीर लागला इतकेच. आत्ता वंडेत मुंबईच्या मैदानावर सचिनच्या नावानं हाय हायचा नारा लावल्या गेला तेव्हा एक रसिक म्हणून वाईट वाटत होतं. सचिननं ही वेळ येऊ द्यावी. असो.

एक भावनिक विचार इतकाच मनात आला की पाकिस्तान विरुद्ध कारकिर्द सुरु झाली होती तर आत्ता पाकिस्तानचा दौरा संपल्यानंतर त्याने एकदिवसीय खेळाचा निरोप घ्यायला हवा होता. असो.

सच्या, चांगला निर्णय घेतला आहेस. कसोटी सामन्यात आत्ता तुझी फलंदाजी पाहूच. अर्थात फार अपेक्षा नाहीत, पण मैदानावर सचिन आहे, हा आनंद अजून घेता येईल.

सच्या तुझ्या फलंदाजीचा पुरेपुर आनंद लुटला आहे. तेव्हा तुझ्या बहरलेला फलंदाजीचा आम्ही मनसोक्त आनंद घेतला आहे. आम्ही तुझ्या पिढीचे तु आमच्या पिढीचा हे सांगायला आम्हाला नेहमीच आनंद वाटेल. फलंदाजीच्या पुस्तकात नसलेले असलेले फटके तुझ्या ब्याटीतून बघायला मिळाले ते कधीच विसरता येणार नाही. बाकी, तुझ्या वाटचालीला एका रसिकाच्या खूप खूप शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

आनन्दिता's picture

23 Dec 2012 - 9:02 pm | आनन्दिता

या काही दिवसात सचिन, आधीचा सचिन राहिला नसला तरी माझ्यासारख्या अनेकजणांसाठी सचिन म्हणजेच क्रिकेट होतं.. क्रिकेटमधलं थोडफार कळायला लागल्यापासुन पाहीलाय तो याचा झंझावात.. आता तो नसलेलं क्रिकेट imagine करता करवत नाहिये,,, हे कधीतरी होणार हे समजत असुनही..:(

अनुप कुलकर्णी's picture

23 Dec 2012 - 9:11 pm | अनुप कुलकर्णी

एका वृत्तवाहीनीच्या वृत्तानुसार सचिनला यापुढे टीम मध्ये घेण्यास निवड समितीवरील काही सदस्यांचा विरोध होता... त्यातूनच सचिनने हा तडकाफडकी निर्णय घेतला...

खरे खोटे देव(सचिन) जाणे!

अत्रुप्त आत्मा's picture

23 Dec 2012 - 10:04 pm | अत्रुप्त आत्मा

@एका वृत्तवाहीनीच्या वृत्तानुसार >>>हम्म्म ... अता दोनचार दिवस पिठ पडू दे,दळणं दळू दे सगळ्या वृत्त वाहिन्यांना...! मग सत्य काय आहे ते आपल्या हाती लागेल. ;-)

श्रीगुरुजी's picture

23 Dec 2012 - 9:54 pm | श्रीगुरुजी

सचिन महत्त्वाच्या सामन्यात खेळत नाही. तो खेळला की भारत हरतो. तो फ्लॉप गेला तरच भारत जिंकतो असे अनेक निराधार गैरसमज पसरवले गेले आहेत. त्याच्या शतके केलेल्या एकूण १०० आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी भारताने ५५ सामने जिंकले आहेत. त्यामुळे हे सर्व गैरसमज आहेत हे आपोआपच सिद्ध होते.

अजून एक उदाहरण. भारताने एकदिवसीय सामन्यात आजतगायत एकूण १४ वेळा ३०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वीपणे पाठलाग करून सामने जिंकले आहेत. हा एक जागतिक विक्रम आहे. त्या खालोखाल द. आफ्रिकेने ६ व ऑस्ट्रेलियाने ६ जिंकले आहेत. या १४ सामन्यांपैकी ८ सामन्यात सचिन खेळला व त्यापैकी ५ सामन्यात त्याने चांगल्या धावा करून सामना जिंकण्यात मोलाची मदत केली होती. एका सामन्यात त्याने ८० चेंडूत ९२ धावा करून सामनावीराचा किताब देखील मिळविला होता. अगदी २०१२ मध्ये सुद्धा असे २ सामने भारताने जिंकले. श्रीलंकेविरूद्ध ३२० धावा करून व पाकड्यांविरूद्ध ३०० हून अधिक धावांचा पाठलाग करून भारताने सामना जिंकला. या दोन्ही सामन्यात सचिनने अनुक्रमे ३० चेंडूत ३९ व ४८ चेंडूत ५२ धावा करून विजयात आपलाही हातभार लावला होता.

सचिनने खेळलेल्या ४६३ सामन्यांमध्ये ४६ सामन्यात (म्हणजे १० टक्के सामन्यात) तो सामनावीर होता. कोणत्याही सामन्यात २२ खेळाडूंपैकी एकच खेळाडू सामनावीर होतो. म्हणजे कोणताही खेळाडू साधारणपणे खेळलेल्या ४.५ टक्के सामन्यात सामनावीर होऊ शकतो. सचिनच्या बाबतीत हेच प्रमाण दुपटीहून अधिक आहे.

मृत्युन्जय's picture

24 Dec 2012 - 11:00 am | मृत्युन्जय

सचिनने खेळलेल्या ४६३ सामन्यांमध्ये ४६ सामन्यात (म्हणजे १० टक्के सामन्यात) तो सामनावीर होता.

बहुधा ६०+ सामन्यात तो सामनावीर आहे. तो जर ४६ च सामन्यात सामनावीर असेल तर मग मला वाटते तो बाकी महान खेळाडुंप्रमाणेच आहे. कारण कॅलिस, गांगुली, रिचर्ड्स हे देखील साधारण १०% सामन्यांत सामनावीर होते / आहेत.

श्रीगुरुजी's picture

24 Dec 2012 - 11:15 am | श्रीगुरुजी

बरोब्बर! माझा आकडा चुकला. सचिनने ४६३ एकदिवसीय सामन्यातून तब्बल ६२ वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळविला आहे. म्हणजे तब्बल १३ टक्क्यांहून अधिक सामन्यात तो सामनावीर होता. कोणताही खेळाडू सामनावीर होण्याची शक्यता ही सर्वसाधारणपणे २२ सामन्यातून एकदाच येते. पण सचिन आपल्या प्रत्येक ८ व्या सामन्यात सामनावीर झालेला आहे.

श्रीगुरुजी's picture

23 Dec 2012 - 10:03 pm | श्रीगुरुजी

सचिनवर एक चांगला लेख

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8670221.cms

शेखर काळे's picture

24 Dec 2012 - 6:14 am | शेखर काळे

आता विटी-दांडू, गोट्या, कबड्डी इत्यादि खेळांकडे लक्ष द्यायला जास्त वेळ मिळेल.
लोकं आता दुरदर्शन कमी बघतील, कार्यालयी कामे होऊ लागतील, मुले शाळेत वेळ घालवतील.
सचीनने आबालवृध्दांना जो आनंद दिला आहे, त्याला तोड नाही.

इनिगोय's picture

24 Dec 2012 - 11:07 am | इनिगोय

आता विटी-दांडू, गोट्या, कबड्डी इत्यादि खेळांकडे लक्ष द्यायला जास्त वेळ मिळेल.
लोकं आता दुरदर्शन कमी बघतील, कार्यालयी कामे होऊ लागतील, मुले शाळेत वेळ घालवतील.

सहमत.

सचीनने उशीरा का होईना निवृत्त होऊन आबालवृध्दांना जो आनंद दिला आहे, त्याला तोड नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते.

दादा कोंडके's picture

24 Dec 2012 - 1:37 pm | दादा कोंडके

खर्‍या क्रिकेटप्रेमींना आनंद देणारी बातमी. :)

श्रीगुरुजी's picture

24 Dec 2012 - 10:31 pm | श्रीगुरुजी

ही कॉमेंट अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्याला क्रिकेट कितपत कळते ते मला माहित नाही, पण असे उद्गार केवळ अज्ञानातून व मत्सरातूनच येतात. अतिशय खेदाने हे मला सांगावे लागत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Dec 2012 - 8:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ही कॉमेंट अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्याला क्रिकेट कितपत कळते ते मला माहित नाही, पण असे उद्गार केवळ अज्ञानातून व मत्सरातूनच येतात. अतिशय खेदाने हे मला सांगावे लागत आहे

ब्वॉरं.....!!! सच्याचा मत्सर किंवा द्वेष करुन आम्हाला काय भारतीय क्रिकेट संघात त्याची जागा घ्यायची आहे काय !
सच्या निवृत्त झाला हे बरंच झालं. सच्या, विनाकारण विनींग लांबवत होता, हे कोणा येरागबाळ्याळाही कळत होते आणि नेमकं ते सचिनला कळत नव्हते, हे खेदाने म्हणावे लागते.

-दिलीप बिरुटे

५० फक्त's picture

27 Dec 2012 - 10:54 am | ५० फक्त

+१ टु प्राडॉ बिरुटे सर आणि श्री.परा,

मिड ऑन आणि मिड ऑफ याचे फार वेगळे अर्थ माहित असलेला एक येरागबाळा.

श्रीगुरुजी's picture

24 Dec 2012 - 10:37 pm | श्रीगुरुजी

इतर सर्व फलंदाजांप्रमाणेच धावा करणे हे सचिनचे काम होते व हे काम त्याने इतरांपेक्षा जास्त प्रमाणात व अतिशय प्रामाणिकपणे केले. फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही १५४ बळी मिळवून क्रिकेटच्या सर्व क्षेत्रात आपले योगदान दिले. त्याच्या समकालीन सर्व खेळाडूंच्या तुलनेत तो श्रेष्ठ होता व आहे. अशा महान खेळाडूबद्दल अशा हिणकस कॉमेंट करणे अयोग्य आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

25 Dec 2012 - 1:06 pm | परिकथेतील राजकुमार

इतर सर्व फलंदाजांप्रमाणेच धावा करणे हे सचिनचे काम होते व हे काम त्याने इतरांपेक्षा जास्त प्रमाणात व अतिशय प्रामाणिकपणे केले.

ओक्के !
मग जशा इतर सर्व फलंदाजांना दर्शकांच्या रोषाला सामोरे जावे लागते / लागले तसे सचिनला लागले तर अडचण काय आहे ?

फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही १५४ बळी मिळवून क्रिकेटच्या सर्व क्षेत्रात आपले योगदान दिले. त्याच्या समकालीन सर्व खेळाडूंच्या तुलनेत तो श्रेष्ठ होता व आहे.

मान्य ! पण तुमच्या मताशी 'सगळ्यांनीच' सहमत व्हायला हवे असे थोडेच आहे ? आज ब्रॅडमेन पेक्षा देखील व्हिक्टर ट्रंपर ह्यांना श्रेष्ठ फलंदाज मानणारे बरेच आहेत की.

अशा महान खेळाडूबद्दल अशा हिणकस कॉमेंट करणे अयोग्य आहे.

मला तरी त्या प्रतिक्रियेत सचिनवर कुठेही हिणकस कॉमेंट केलेली आढळली नाही. एका सो कॉल्ड खर्‍या क्रिकेटप्रेमीची स्वतःची प्रतिक्रिया असे तिचे स्वरुप म्हणता येईल.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा प्रतिक्रिया येईपर्यंत आणि स्वतःच्या घरच्या मैदानात 'हाय हाय' ऐकायला लागेर्यंत सचिन सारखा समंजस खेळाडू वाट बघतो ह्याचे आश्चर्य नक्की वाटले.

जाता जाता पुन्हा एकदा जालावरची प्रसिद्ध वाक्ये आठवून गेली :- एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. माणसाला देव मानले की त्याच्या चुका गायब होऊन जातात. त्या एखाद्याने लिहिल्या तर त्याचा वकूब काढला जातो आणि कीव केली जाते.

बॅटमॅन's picture

26 Dec 2012 - 1:04 pm | बॅटमॅन

एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. माणसाला देव मानले की त्याच्या चुका गायब होऊन जातात. त्या एखाद्याने लिहिल्या तर त्याचा वकूब काढला जातो आणि कीव केली जाते.

सर्व संदर्भांत मनापासून सहमत या वाक्याशी. राजकारणात तर हे लैच दिसून येते.

शेखर काळे's picture

25 Dec 2012 - 3:28 am | शेखर काळे

सचीनच्या अप्रतीम खेळामुळेच लोक दूरदर्शन समोर किंवा मैदानावर गर्दी करायचे.
त्याच्या एकट्यामुळे कितीतरी लोक क्रिकेटकडे वळले आहेत.
आणि हे विसरू नका की ५-६ सामन्यांपूर्वीच त्याने शतकी खेळी खेळली होती.
केवळ सचीनने आपल्या धावा काढण्याच्या सातत्यामुळे आपल्याला त्याने प्रत्येक डावात धावा; केवळ काही धावा नव्हेत, तर शतक आणि केवळ शतक नव्हे तर भारताला जिंकून देणारी खेळी, अशी अपेक्षा ठेवण्याची सवय लावलेली.
जगात इतर कुठल्याच खेळाडूने इतका अपेक्षांचा भार झेलून सातत्याने कामगिरी केलेली नाही.
केवळ गेल्या काही डावात त्याने धावा (शतकी) केल्या नाहीत म्हणून काही तो संपला असे म्हणण्याचे कारण नाही.

दादा कोंडके's picture

26 Dec 2012 - 1:39 am | दादा कोंडके

सचीनच्या अप्रतीम खेळामुळेच लोक दूरदर्शन समोर किंवा मैदानावर गर्दी करायचे.
त्याच्या एकट्यामुळे कितीतरी लोक क्रिकेटकडे वळले आहेत.

पण मग पुढे काय? त्यामुळे क्रिडा संस्कृती रुजली आहे काय? गावोगाव मैदानं तयार झाली आहेत काय? असलेली मैदानं मेंटेन केली आहेत काय? आधीपेक्षा संख्येनी जास्त चांगले खेळाडू तयार झाले आहेत काय?

क्रिकेटकडे वळणं म्हणजे काय ते कळलं नाही. शाळा, कॉलेज, ऑफीसची काम सोडून टीवी ला चिकटून बसणं? तसं असेल तर मान्य आहे. त्यामुळेच कमी कपड्यात मुली नाचवणारं आयपीएल आलं.

शेखर काळे's picture

27 Dec 2012 - 4:46 am | शेखर काळे

जास्त क्रिकेट खेळाडू तयार झाले आहेत. जास्त लोकांनी खेळ पाहिल्यामुळे जास्त जाहिरातदार आलेले आहेत.
गेल्या काही वर्षांत असे दिसले की रणजी खेळाडू फक्त क्रि़केट खेळून ऊपजिविका करू शकतो. पूर्वी सगळे
क्रिकेट खेळाडू शहरांतून असायचे. आता खेड्यांतून असूनही भारताच्या संघात खेळाडू दिसतात - ऊदा. ऊमेश यादव.
अर्थात हे सगळे केवळ सचिनमुळे झालेले नाही. पण मला हे दाखवायचे आहे की प्रगती झाली आहे.
मैदानं - नवीन नक्कीच झालेली आहेत. मला मुंबई-पुण्याची एव्ह्ढी माहिती नाही, परंतु नागपुरात नक्कीच नवीन मैदाने
झाली आहेत.
क्रिकेटकडे वळणं म्हणजे त्याची माहिती हवी असणं, त्या विषयाबद्दल ऊत्सुकता वाटणं. दूरदर्शन हे त्या ऊत्सुकतेला शमवायचं एक माध्यम आहे. तुम्ही म्हणता - "टीवी ला चिकटून बसणं?" ज्यांना खेळणं शक्य नाही ते दुसरं काय करणार ?
तसं म्हटलं तर इतर नट नट्या, प्रसिद्ध लोक टीवी वर आले की प्रेक्षक टीवीला चि़कटतातच की.
आणि आय.पी.एल. चं म्हणाल तर जे क्रिकेट बघायला जातात त्यांना क्रिकेट दिसतं, जे मुली बघायला जातात त्यांना मुली दिसतात.

दादा कोंडके's picture

27 Dec 2012 - 2:09 pm | दादा कोंडके

वी आर ऑन अ डिफरंट वेवलेंग्थ ड्युड!

शेखर काळे's picture

31 Dec 2012 - 11:52 am | शेखर काळे

सो बी इट.

लाल टोपी's picture

24 Dec 2012 - 6:32 am | लाल टोपी

क्लाईव्ह लॉईड, इम्रान खान यांनी अगदी यशाच्या शिखरावर असतांना आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला होता त्यामानाने सचिनने थोडा उशिरच केला तरी पण सचिनचे नसणे काहीकाळ खटकणारचं

विटेकर's picture

24 Dec 2012 - 10:06 am | विटेकर

एका पर्वाचा अंत !
त्याच्या खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटेला..

पिंपातला उंदीर's picture

24 Dec 2012 - 10:26 am | पिंपातला उंदीर

Respects

ऋषिकेश's picture

24 Dec 2012 - 11:31 am | ऋषिकेश

:(

नानबा's picture

25 Dec 2012 - 9:10 am | नानबा

आता माझ्यासारख्या हजारो सचिन पंख्यांची अवस्था म्हणजे "देव देव्हा-यात नाही" अशी झाली असेल. पण कधीतरी हा दिवस बघावा लागणारच होता. २०१५ च्या वर्ल्ड कपनंतर हा दिवस येईल असं वाटत होतं. असो. २०१२ ला जग बुडो न बुडो, पण क्रिकेटजगतात मात्र जगबुडी झाली एवढं नक्की.

सचिन रिटायर्ड हर्ट सारखा निवृत्त झाला...
मैदानावर सामना खेळून रिटायर व्हायला हवे होते असे वाटते..

बाकी त्या सामन्यातही धावा झाल्या नसत्या तरी त्याच्या महानतेवर तो डाग पडला नसता. सर डोनाल्डही आपल्या अखेरच्या इनिन्ग्समधे शून्यावर बाद झाले होते...

मुळात त्याने रिटायर्ड कधी व्हावं या विषयाचा सचिनपेक्षा इतरांनीच जास्त बाऊ केला होता... (विशेषतः रिकामटेकडे मिडीया वाले) आणि काहीही झालं तरी शेवटी तोसुद्धा माणूसच आहे हो.... लोकांनी इतकं क्रिटीसाईज केल्यावर त्याने अजून काय करणं अपेक्षित होतं??

आनन्दिता's picture

26 Dec 2012 - 1:41 am | आनन्दिता

+१०० सहमत... त्या
IBN lokamatच्या वट'वागुळ' सारखे अतिशहाणे असल्यावर अजुन काय होणार आहे...

सुचेल तसं's picture

26 Dec 2012 - 9:16 pm | सुचेल तसं

काही गोष्टींकडे आपण नेहेमीच भावनेच्या चष्म्यातून पाहतो. त्याचे परखड विश्लेषण करण्याची आपली अजिबात मानसिकता नसते. सचिन हे त्याचंच एक उदाहरण आहे. कित्येकदा आपण असं म्हणतो की भारत हरला पण सचिनच शतक झालं ना बास.. मी सुद्धा पुर्वी सचिन बाद झाला की उरलेला सामना पण नाही पहायचो.

मला खात्री आहे सचिन २०१५ च्या विश्वचषकानंतर जरी निवृत्त झाला असता ना तरी आपल्याला इतकंच वाईट वाटलं असतं..

श्रीगुरुजी's picture

27 Dec 2012 - 12:58 pm | श्रीगुरुजी

"मी सुद्धा पुर्वी सचिन बाद झाला की उरलेला सामना पण नाही पहायचो."

मी पण. मी अजूनही सचिन बाद झाला की टिव्ही बंद करून उरलेला सामना पहात नाही.

>>> मला खात्री आहे सचिन २०१५ च्या विश्वचषकानंतर जरी निवृत्त झाला असता ना तरी आपल्याला इतकंच वाईट वाटलं असतं..

नक्कीच. तो कधीच निवृत्त होऊ नये असं वाटतं!

सचिनच्या फलंदाजीत एक कमजोरी होती आणि ती म्हणजे इनस्विंगरसारखा किंवा ऑफकटरसारखा आत येणारा वेगवान चेंडू. तो त्याच्या पॅड आणि बॅटमधील फटीतून कधी थेट यष्टीवर जायचा तर कधी त्याच्या बॅटच्या आतल्या कडेला स्पर्शून मग यष्टीवर जायचा. अशा पद्धतीने तो पूर्वीही अनेक वेळा बाद झालेला आहे. त्याच्या गेल्या वेळच्या "कमी धावांच्या ग्रहदशे"त तो असाच बर्‍याचदा बाद झालेला आहे. पण त्या कमजोरीवर त्याने प्रयत्नांती विजय मिळवून शतकांवर शतके ठोकली आहेत! या वेळीही त्याने असेच नेत्रदीपक यश मिळविले असते. पण त्याच्या टीकाकारांनी त्याचे 'वय' काढून त्याला अशा कांहीं चोचा मारल्या कीं तो त्याने व्यथित झाला असणार आणि त्याने शेवटी सेवानिवृत्ती पत्करली! या टीकाकारांत अर्थातच मराठी मंडळी "कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ" या म्हणीनुसार आघाडीवर होती!
थोडक्यात जे भल्या-भल्या गोलंदाजांना जमले नाहीं ते शेवटी खेळाच्या समीक्षकांनी चोचा मारून मिळविले! काय हा दैवदुर्विलास!

श्रीगुरुजी's picture

30 Dec 2012 - 4:45 pm | श्रीगुरुजी

वाईट याचं वाटतं की सचिनच्या अपयशाचा उल्लेख करून निवृत्त होण्यासाठी त्याच्यामागे लागणार्‍यांनी सेहवाग, रोहीत शर्मा, गंभीर हे वारंवार अपयशी होत असताना आपली लेखणी म्यान केली होती. आज रोहीत शर्मा ४ धावा करून बाद झाला. याआधी श्रीलंकेविरूद्ध सप्टेंबर २०१२ मध्ये झालेल्या ५ एकदिवसीय सामन्यात त्याची कामगिरी ०, ०, ४, ४, व ९ अशी होती. त्या ५ सामन्यात फक्त एकूण १७ धावा करूनसुद्धा तो संघात आहे व आज पुन्हा एकदा ४ धावा करून आपल्या कामगिरीची प्रचिती दिली. सेहवागने २०१२ मध्ये एकाही एकदिवसीय सामन्यात बर्‍यापैकी म्हणाव्यात अशा सुद्धा धावा केलेल्या नाहीत. गंभीर बहुतेक सामन्यात अपयशी आहे. त्या तुलनेत सचिनने २०१२ मध्ये ३९, ५२, ११४, ४८ अशा बर्‍यापैकी धावा केल्या होत्या. वास्तविक सचिनला निवृत्त व्हायला सांगताना सेहवाग, रोहीत शर्मा व गंभीर यांना निदान काही सामन्यांपुरते तरी वगळावे अशी फारशी मागणी झाल्याचे दिसले नाही.

आणि केवळ या कुकर्मासाठी BCCI ने संदीप पाटील या मराठी व्यक्तीला निवड-समितीचा अध्यक्ष म्हणून निवडले असावे असे मला राहून-राहून वाटते. आपणा सर्वांना काय वाटते?

दादा कोंडके's picture

30 Dec 2012 - 6:54 pm | दादा कोंडके

वाईट याचं वाटतं की सचिनच्या अपयशाचा उल्लेख करून निवृत्त होण्यासाठी त्याच्यामागे लागणार्‍यांनी सेहवाग, रोहीत शर्मा, गंभीर हे वारंवार अपयशी होत असताना आपली लेखणी म्यान केली होती.

ही वरील मंडळी निवृत्त झाल्यावर तुम्ही "देव रिटायर झाला" असा धागा काढाल का?

परिकथेतील राजकुमार's picture

31 Dec 2012 - 12:51 pm | परिकथेतील राजकुमार

'राक्षसांनी धडा घेतला' असा धागा काढायला हरकत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jan 2013 - 11:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सच्याचं निवृत्तीचं तुणतुणं किती दिवस वाजत राहील कोणास ठाऊक. सामना खेलून मैदानावरुन वाजत गाजत ब्याट वर करत मानानं निवृत्त व्हायचं तर खोलीत बसून निवृत्तीची घोषना करणार्याचं मला तर अजिबात कौतुक नाही. (सत्यसाइबाबांचा तर द्रष्टांत तर झाला नसेल )