हे आधीचे दुवे -
http://www.misalpav.com/node/2432
http://www.misalpav.com/node/2540
http://www.misalpav.com/node/2696
परवा हापिसात नशिबाला पुजलेली इडली गिळताना नेमकी एका मराठमोळ्या सुबक ठेंगणीशी गाठ पडली. 'काय, कसं काय'वर न भागता तिचा पाकशाळेत स्वहस्ते रांधलेला डबाही दृष्टीस पडला.
अंमळ असूयेनंच मी कसंबसं म्हटलं, "वा, साबुदाण्याची खिचडी कशी काय?"
'मला साबुदाणा भिजवायचं वेळच्या वेळी आठवतं, जमतं. माझ्याकडे दाण्याचं कूटपण असतं,' असलं काहीतरी प्रामाणिक प्रॅक्टिकल उत्तर द्यावं ना? पण नाही. मस्ती. 'अय्या, तुम्ही उपास नै करत चतुर्थीला?' ऐकावं लागलं.
मग मलापण चेवच चढला. मान्य आहे, असेल बिचारी चतुर्थी-बोडण-चतुर्मास पंथातली, तर उगीच मूर्तिभंजनाचं काही कारण नव्हतं. पण एक तर मला ऑफर न करता खिचडी खातेय आणि वर ही जुर्रत? शी आस्क्ड फॉर इट, यू नो?
हिरवी चटणी भरलेलं पापलेट, बांगड्याचं कालवण, काळ्या मसाल्यातलं चिकन... इथपासून सुरुवात करून मी 'ससापण ट्राय करून पाहिलाय मी, फार नाही वेगळा लागत. मोर खाल्ला होता एकदा चंद्रपूरला गेले होते तेव्हा. तू खाल्लायस?'पर्यंत मजल मारली आणि तिच्या खिचडीचं यथाशक्ती वाट्टोळं केलं.
'खातेय मी, जरा गप बसायला काय घेशील?' हे स्पष्ट छापलं होतं तिच्या थोबाडावर. पण म्हटलं ना, खिचडीच्या बाबतीत मला नडू नये कुणी.
त्या दिवशी घरी आल्यावर पहिलं काय केलं असेल तर साबुदाण्याला जलसमाधी दिली. (साबुदाणा मिळवण्याचं क्वालिफिकेशन = साबुदाणा म्हणजे काय; नायलॉन साबुदाणा, साधा साबुदाणा आणि बारीक साबुदाणा यांतलं साम्य आणि फरक कोणते हे बंगळूरकर दुकानदाराला समजावून सांगण्याचे पेशन्स.) खिचडीत काय करायचं होतं मोठंसं? साबुदाणा भिजवायचा, तूप-जिर्याची फोडणी करून त्यात टाकायचा नि वरून दाण्याचं कूट मारायचं. झालं.
संध्याकाळी अ नि ब येऊन खिचडी पाहतील, तेव्हा त्यांना लाळेरं द्यावं लागेल की कसं, यावर थोडा विचार करून मी ताणून दिली.
संध्याकाळ.
अ, ब आणि क्ष.
कढईला चिकटलेला खिचडीचा लगदा.
"तूप. थोडं तूप घालून गरम कर अजून. म्हंजे मोकळी होईल ती."
"तूप? मी ऑलरेडी काकूंनी आणलेला साजूक तुपाचा डबा संपवलाय. आता उरलेलंही घातलं, तर उद्या वरण-भातावर इथलं पिवळं तूप घ्यावं लागेल. घालू?"
"न-नको."
"जिरं अजून तडतडायला हवं होतं नै?"
"माझी आई दाण्याचं कूट खूप घालते. आपल्याकडे नैये का?"
"आयडिया, आपण यात बटाटा घालून थालिपिठं लावू या याची?"
"पण अजून तूप लागेल त्याला."
"नाही, मग - हे वाईट नाही लागतेय तसं..."
"दही आहे आपल्याकडे? आणतेस प्लीज?"
खरं सांगायचं तर खिचडी तशी सुरेखच झाली होती. अ, ब नि क्षच्या अंगात नाटकंच जास्त.
पण मग आई-बाबा आले, तेव्हा मी ठेवणीतला आवाज काढून 'बॉबॉ, खिचडी नै खाल्लीय खूप दिवसांत...' असं एक वाक्य योग्य मौका पाहून हवेवर सोडून दिलं.
(नाही, त्याचं काय्ये, आमच्या आईची खिचडी काही फार सुरेख नाही होत. म्हंजे, तिला आपलं असं वाटतं, की साबुदाणा मऊ नि मोकळा भिजला, की खिचडी आपल्याला जमलीच. पण दुर्दैवानं तसं नसतं ना? तिच्या हातून धड मीठ-साखर नाही पडत. शिवाय दाण्याच्या कुटाचे मोठ्ठाल्ले गोळे होऊन बसतात. ते दाताखाली आले की कसंसंच होतं. याउलट बाबांची खिचडी काय वर्णावी... ते इतक्या मनापासून करतात ना खिचडी, की बास. थोड्या हिरव्या मिरच्या फोडणीत घालायला, हिरवा रंग तसाच राहून खिचडी छान दिसावी म्हणून थोड्या नंतर वरून घालायला, साबुदाण्यातच मिसळून घेतलेलं दाण्याचं कूट, सढळ हस्ते मीठ-साखर, छान ब्राउन करून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी. 'मिरची भाजून हवीय दह्यात?' असं तर हमखास विचारणार. वाढून घ्यायला गेलं की 'अग अग, एक वाफ निघू दे की...' आणि मग 'घे की आणिक थोडी...' असं असताना आईला कोण भाव देणार?)
तर ते वाक्य रामबाण ठरलं. दुसर्या दिवशी खिचडी. क्ष नेमका गावाला गेला होता, त्यामुळे त्याची हुकली. पण अ, ब आणि मी मन लावून खिचडी खाल्ली नि बाबांनी डोळे भरून पाहिलं. मग मी त्यांनी साबुदाणा भिजवायची ट्रिक विचारून घेतली. ती कृती अशी -
रात्री साबुदाणा पाण्यात नीट चोळून चोळून धुऊन घ्यायचा. भांडं कलतं केल्यावर किंचित पाणी दिसेल, इतकंच पाणी त्यात ठेवून बाकीचं ओतून टाकायचं. सकाळी साबुदाणा एकदा हातानी हलवून पाहायचा. फारच कोरडा वाटला, तर पाण्याचा एक हबका मारायचा. त्यात बरचंसं दाण्याचं कूट, मीठ, साखर असं एकत्र कालवून ठेवायचं. मग तुपात जिरं नि हिरव्या मिरच्यांची फोडणी करायची. थोड्या हिरव्या मिरच्या बाजूला ठेवायच्या हे असेलच लक्षात! त्यात बटाट्याच्या फोडी चांगल्या परतून घ्यायच्या. त्या ब्राऊन झाल्या, की वर ते साबुदाण्याचं प्रकरण घालायचं. साखर थोडी जास्तच. नि झाकण ठेवायचं नाही. नाहीतर लगदा झालाच समजायचा. साधारण नेहमीसारखी दिसायला लागली खिचडी, की ताबडतोब खायची. वर लिंबू, कोथिंबीर, नारळ असले सोपस्कार नसले तरी का-ही-ही फरक पडत नाही.
सोबत सायीचं दही आणि माझी फेवरिट भाजलेली मिरची असेल, तर जगात उपास असावेत, हे मी ब्रह्मदेवाच्या बापालाही पटवून देऊ शकते. ग्यारण्टी!
प्रतिक्रिया
22 Aug 2008 - 6:17 pm | ब्रिटिश टिंग्या
आपली लिहीण्याची शैली आवडली :)
अवांतर - ससा खरचं खुप रुचकर लागतो.....एकदा ट्राय करुन पहा! ;)
22 Aug 2008 - 7:52 pm | मेघना भुस्कुटे
मी खरंच खाल्लाय. तुम्हांला खोटं वाटलं की काय? :(
22 Aug 2008 - 6:34 pm | सहज
'मला साबुदाणा भिजवायचं वेळच्या वेळी आठवतं, जमतं. माझ्याकडे दाण्याचं कूटपण असतं,' असलं काहीतरी प्रामाणिक प्रॅक्टिकल उत्तर द्यावं ना?
हा हा हा
आवडला हा भाग.
साबुदाणा खिचडी बनवायला हा सुरवातीला लई अवघड प्रकार असतो. लगदा होतो. :-(
पण खात्रीने अजिबात लगदा न व्हायला मायक्रोव्हेवचे जबरदस्त वरदान आहे. ज्यांच्याकडे मायक्रोव्हेव आहे त्यांनी ह्या पद्धतीने नक्की करुन बघा, गॅरंटीने सांगतो परत खिचडीसाठी तुम्ही कढई वापरणार नाही. सो ईझी. नॉन मेसी. चित्रफीत दुवा २ मिनीटात मॅगी पेक्षा लवकर :-)
22 Aug 2008 - 6:51 pm | आनंदयात्री
गोळीबार मस्तच !!
बाकी या पुण्याला एकदा, वटवाघुळ फ्राय खाउ घालतो ! ;)
23 Aug 2008 - 8:49 am | शितल
लेख मस्तच झाला आहे.
शाबुदाण्याची खिचडी पहिला ३/४ वेळा चुकली पाहिजे आणि मगच जमली पाहिजे असा काही अधिलिखित नियम आहे का ;) (मला ही त्या खिचडीने अनेक वर्ष पिडले होते )
शाबु भिजत घालण्यापासुन खरे कैशल्य लागते ते खरेच आहे. :(
>>>>बाकी या पुण्याला एकदा, वटवाघुळ फ्राय खाउ घालतो !
आंद्या,
अरा रा काय बोलला तु, याक, जेवताना आता हे आठवले तरी मळमळेल येईल. :(
22 Aug 2008 - 7:25 pm | धनंजय
(साबूदाण्याची खिचडी फार वेळा गच्च गोळा झालेला)
धनंजय
22 Aug 2008 - 7:32 pm | बिपिन कार्यकर्ते
मेघना... भारी लिहिलं आहेस. बाकी तुझा स्वभाव खुनशी आहे का गं? कसला सूड घेतलास त्या बिचारीचा. :D
बाकी, खिचडी काय, सायीचं दही काय आणि भाजलेली मिरची... मला लाळेरं (स्वतःलाच) बांधून घ्यायची वेळ आली.
बिपिन.
22 Aug 2008 - 7:55 pm | स्वाती दिनेश
मेघना..
काय पण आठवण करून दिलीस ग.. आता सा. खि लवकरच करावी लागणार तर..
स्वाती
तुझ्या बाबांच्या हातची सा.खि. फंडूच असते!
22 Aug 2008 - 8:10 pm | मनस्वी
>नाहीतर लगदा झालाच समजायचा.
:D
मस्त लिहिलंएस मेघना!
तेवढी भाजलेली मिरची कशी करायची ते पण सांग..
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
22 Aug 2008 - 11:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मिरची गॅसवर भाजायची! तुम्ही परदेशात रहात असाल आणि तिथे गॅस नसेल तर ग्रिल तापवून त्याच्या तापलेल्या काड्यांजवळ हिरवी मिरची नेऊन भाजून घ्या. थोडे काळसर डाग आले याचा अर्थ मिरची भाजून झाली. परदेशात रहात असाल तर एक वॉर्निंग / रिस्क असेसमेंटः गॅस आणि ग्रिल गरम असतात, भाजण्याचा आणि जळण्याचा धोका. त्याची काळजी घ्या. भाजल्यास / जळल्यास त्यावर थंडगार पाणी ओता.
भाजलेली मिरची थोडी कुस्करून दह्यात कालवा. थोडं मीठ चवीप्रमाणे घाला. आणि हापसा.
तुम्ही परदेशात असाल तर पुन्हा एकदा वॉर्निंग / रिस्क असेसमेंटः हिरवी मिरची अतिशय तिखट असते, जपून खा. जास्त झाली तर आज काही त्रास होणार नाही, पण उद्या ..... अबॉबॉबॉ .... L)
(कधीही गिचका खिचडी बनवू न शकलेली) यमी!
22 Aug 2008 - 11:25 pm | बिपिन कार्यकर्ते
तुम्ही परदेशात असाल तर पुन्हा एकदा वॉर्निंग / रिस्क असेसमेंटः हिरवी मिरची अतिशय तिखट असते, जपून खा. जास्त झाली तर आज काही त्रास होणार नाही, पण उद्या ..... अबॉबॉबॉ ....
यमुताई, ही वॉर्निंग फक्त परदेशातल्या लोकांना का गं? मला तर मिरची खाल्ल्यावर अबॉबॉबॉ कुठेही (भौगोलिक दृष्ट्या, शारिरीक नव्हे) होतं... बस मिरची खाने की देरी....
बिपिन.
22 Aug 2008 - 8:12 pm | प्राजु
साबुदाणा उत्तम भिजून मस्त आणि खमंग जिर्याच्या फोडणीमध्ये मिरचीच्या झटक्यासोबत तुझी ही खिचडी अफलातून लागते आहे...
अभिनंदन..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Aug 2008 - 8:12 pm | नारायणी
फारचं सही लिहिलंय. मी तर फॅन झाले तुमची. फ्लो ,शैली, सगळ्चं मस्त!!
22 Aug 2008 - 8:14 pm | ऋषिकेश
क्लास! अतिशय रंजक शैली :)
-(साखिवेडा) ऋषिकेश
22 Aug 2008 - 8:32 pm | चतुरंग
लिखाणाची शैली भावली! :)
दह्यातली मिर्ची!!! ह्म्म्म्..आता करुनच पहायला हवी, साखि आणि मिर्ची!! =P~
चतुरंग
23 Aug 2008 - 12:49 am | विसोबा खेचर
वरील सर्वांशी सहमत..! लेख मस्तच आहे. सुगरणीच्या सल्ल्याची बॅटिंगही मस्तच सुरू आहे... :)
आपला,
(साबुदाबा खिचडी प्रेमी) तात्या.
23 Aug 2008 - 12:57 am | मुक्तसुनीत
च्यामारी . सुगरणीचा सल्ला आहे की आत्मचरित्राचे सुटेसुटे च्याप्टर्स आहेत !
ह.घ्या. लेखन अत्यंत खमंग झाले आहे. प्रत्येक लेखाअंती दिलेले पदार्थ त्याहूनही खमंग असणार यात शंका नाही !
(पण एकूण टेष्ट तामसीपणाकडे झुकते क्क्काय ! - पदार्थांचीही ! ? ;-) )
23 Aug 2008 - 1:18 am | चतुरंग
सुगरणीचा हल्ला आहे! ;)
(खुद के साथ बातां : रंग्या, लावलास हात मिर्चीला? काही खरं नाही आता तुझं, धुरी बसणार लेका! :T :S )
चतुरंग
23 Aug 2008 - 1:26 am | मुक्तसुनीत
रंगराव !
काय खरे नाही तुमचे . "महांकाळी" आणि "सरस्वती" धडकायला लागणार आता ;-) की जैसे भडभुंजे लाह्या भाजतात तैशी गत होईल आता !
23 Aug 2008 - 12:11 pm | मेघना भुस्कुटे
तामसी... हम्म्म्म... पुढचा सल्ला एकदम सात्विक. ग्यारण्टी.
23 Aug 2008 - 1:01 am | भडकमकर मास्तर
साबुदाणा करेक्ट भिजवण्यात महान कौशल्य आहे...
...... ते भाजलेली मिरची + दही प्रकरण खाऊन पाहणार आहे... मजा येणार :)
...
साबुदाणा खिचडीचा पंखा
भडकमकर
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
23 Aug 2008 - 8:25 am | रामदास
वर्षापूर्वी एक सुगरणच आयती घरात आणली.पाच काका आणि चार आत्या (+त्यांचे बाकीचे कुलोत्पन्न) एव्हढ्या भरभक्कम घरातून आल्यामुळे सैपाक ही समस्याच नाही.उपासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी (फक्त) करणे म्हणजे बिलो डिग्नीटी.
सोबत
दाण्याच्या कुटाचा लाडू+ दाण्याची आमटी+ मखाण्याची खीर.
रताळ्याचे काप+ भगरीची खीर
किंवा
रताळ्याचा किस+ शिंगाड्याची लापशी
फारच घाईत असेल तर तळलेला किस+ मसाला दूध.
पाहुणे असले तर साबुदाण्याचे वडे ही एक ऍडीशन.
23 Aug 2008 - 12:17 pm | मेघना भुस्कुटे
आई ग... काका... काय अन्याय आहे हो हा! नुसतं वाचण्यावरच समाधान मानावं लागणार. :(
बाकी सुरणाचे काप, केळ्याच्या पिठाची धिरडी, साबुदाण्याची ताकातली लापशी, केळ्याच्या पिठाची लापशी... विसरलात?
23 Aug 2008 - 1:13 pm | पद्मश्री चित्रे
आहे लेख.. एक्दम गरम्-गरम वाफाळणार्या सा खि सारखा..
आजच साखि करुन ( आणि अर्थातच , मनसोक्त खाउन ) हापिसात आले आहे..
मी तर अजुनही साखि साठीच उपास करते..
(सवयीने चांगली साखि बनवु शकणारी)
फुलवा
23 Aug 2008 - 8:35 pm | बन्ड्या
अशीच फलंदाजी चालू राहु दे......
23 Aug 2008 - 9:02 pm | रेवती
चव छान जमलीये!
फक्त त्या गोड दिसणार्या ससुल्या गडीचं असं काहीतरी म्हणजे.....
रेवती
23 Aug 2008 - 9:21 pm | पिवळा डांबिस
हिरवी चटणी भरलेलं पापलेट, बांगड्याचं कालवण, काळ्या मसाल्यातलं चिकन... इथपासून सुरुवात करून मी 'ससापण ट्राय करून पाहिलाय मी, फार नाही वेगळा लागत. मोर खाल्ला होता एकदा चंद्रपूरला गेले होते तेव्हा. तू खाल्लायस?'पर्यंत मजल मारली आणि तिच्या खिचडीचं यथाशक्ती वाट्टोळं केलं.
जियो! क्या बात है!!:)
मेघनाताई, तुमची लिहिण्याची स्टाईल खूप आवडली. स्वयंपाकातलं काही कळत नसूनही तुमचे हे छोटेछोटे लेख मी आवडीने वाचतो.
कीप इट अप!!
उपास न करता हळूच खिचडी मात्र खाणारा,:)
पिवळा डांबिस
26 Nov 2012 - 5:46 pm | भलती भोळे
लाळेर , खिखि
:ड