पहिल्यांदाच सांगते, ही पाकृ माझी नाही हं. याची कर्ती-करवती माझी वहिनी शिल्पा. तिचं माहेर हुबळी.तीच या पाकृची अन प्रतिसादांची मालकीण.
दिवाळीचा गोडधोड फराळ खाऊन झाल्यावर भाऊबीजेला भाऊरायाला ओवाळायला कोल्हापूरला गेले होते. कोल्हापूरची पद्धत अशी की दिवाळीचा फराळ खाऊन ‘गुळमाट’ झालेलं तोंड भाऊबीजेला ‘वशाट’ खाऊन खंगाळायचं ! घरोघरी भाऊबीजेला मटण ! या भाऊबीजेला आमच्या भावांना (मायंदाळ हैत ) खिम्याच्या गोळ्यांचा आठव आला. झालं ! शिल्पा हुबळीची. मग हुबळी स्टाईल खिमा-पालकबॉल्स ग्रीन करीची फर्माईश झाली. भाऊरायानं लगबगीनं बाजारात जाऊन कवळ्या मटनाचा ताजा खिमा आणला.
शिल्पानं साहित्य जमा केलं. मी लगेच मोबाईल घेऊन फोटो काढायला उभी राहिले.
पाव किलो खिमा , १ लहान कांदा बारीक चिरून १ चमचा मीठ
पाव चमचा हळद, २ चमचे टोमॅटोसॉस १ चमचा सोय सॉस
१ वाटी तेल, १ चमचा लसूण पेस्ट १ चमचा मिरची पेस्ट
पांढरा मसाला : ७-८ लवंगा, ३ इंच दालचीन
१ चमचा जिरे, ३ चमचे धणे
४ वेलदोडे २ इंच आले,
१ वाटी खोबरे, १० पाकळ्या लसूण
३-४ काड्या कोथिंबीर देठासहित.
हिरवा मसाला : १ कांदा मोठे तुकडे करून १ टोमॅटोमोठे तुकडे करून
१ वाटी बारीक चिरलेला पालक ७-८ मिरच्या
७-८ काड्या कोथिंबीर देठे काढून चिरलेली.
या पाकृला तेल अंमळ जास्त लागतेबरं !-- कोल्हापूरपेक्षा हुबळीचे लोक तर्री खाण्यात माहीर. त्यामुळे कट पाहून नाके मुरडणार्यांनी इकडे पाहूच नये अशी णम्र इनंती.
आता खिमा धुवून निथळत ठेवला अन दोन्ही मसाले तयार केले.
पांढऱ्या मसाल्यासाठी काढलेल्या साहित्यातले गरम मसाले १ चमचा तेलात २ मिनिटे परतून घेतले व पांढऱ्या मसाल्याच्या इतर साहित्याबरोबर मिक्सरमध्ये वाटून घेतले.
हिरव्या मसाल्यासाठी कांदा व टोमॅटोचे मोठे तुकडे व मिरच्यांचे तुकडे १ चमचा तेलात वेगवेगळे परतून घेतले. मग चिरलेला पालक व कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये वाटून घेतले. आवडत असल्यास यात थोडी पुदिन्याची पाने घातली तर वेगळाच स्वाद येतो.
आता खिम्यामध्ये पाव चमचा मीठ, २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर व लसूण मिरची पेस्ट घालून २-३ मिनिटे मिक्सरमध्ये फिरवून घेतले व या मिश्रणाचे तेलाचा हात लावून पेढ्यापेक्षा थोडे लहान लहान गोळे बनवले.
गॅस पेटवून वर कुकर ठेवून त्यात तेल घातले. तेल तापल्यावर शिल्पाने कांदा घालून परतला. २ मिनिटांनी हळद घालून हलवले. मग अलगद खिम्याचा एक एक गोळा तेलात सोडला अन गॅस मंद केला.
आता ५ मिनिटे बिलकुल हलवायचे नाही. ५ मिनिटांनीगोळ्यांचा रंग बदलून पांढरट होऊ लागला. मग अगदी हलक्या हाताने गोळे खालीवर करून पुन्हा २ मिनिटे ठेवले. मग त्यात प्रथम हिरवा मसाला घालून ३-४ मिनिटे हलकेच परतले.
मग पांढरा मसाला घालून तसेच परतले.
आता मीठ , सोया सॉस व टोमॅटो सॉस घालून मिसळले अन कुकरचे झाकण लावून पूर्ण आचेवर दोन शिट्ट्या केल्या अन मंद आचेवर पुन्हा ५-७ मिनिटे ठेवले.
कुकर थंड झाला अन खिमा-पालकबॉल्स ग्रीन करी खानेको तैय्यार !
गरमागरम भाकरी, तांबडा रस्सा अन खिमा-पालकबॉल्स ग्रीन करी असे मस्त सजले ताट !
चला मंडळी जेवायला....!
प्रतिक्रिया
22 Nov 2012 - 9:37 pm | रामदास
सजावट पण चांगली केली आहे. या अगोदर तुमच्या पाककृती वाचल्या नव्हत्या.
हे पदार्पण असेल तर पहील्याच खेळीत सेंच्युरी !!!!
23 Nov 2012 - 12:42 pm | नगरीनिरंजन
पहिल्याच खेळीत सेंच्युरी!
22 Nov 2012 - 10:05 pm | मोदक
फटू दिसलेच न्हाईत. :-p
22 Nov 2012 - 10:57 pm | पैसा
पाकृ आणि फोटो दोन्ही अप्रतिम! मागच्या वेळेस वांग्याची भाजी पण खास दिसली होती ना!
23 Nov 2012 - 5:20 pm | सस्नेह
वांगी अजून आठवणीत ठेवल्याबद्दल धन्स.
एकदा करून बघच. नाहीतर इकडेच ये खायला !
22 Nov 2012 - 11:04 pm | Mrunalini
वा.... superb.... एकदम टेस्टी दिसतय..तोंपासु :)
23 Nov 2012 - 1:08 am | रेवती
फोटू आणि पाकृ छानच. शाकाहारी असल्याने चवीबद्दल काही सांगू शकणार नाही.
हुबळीकर हे कोल्हापूरकरांपेक्षा जास्त तेलाचे खाणे पसंत करतात हे माहीत नव्हते.
23 Nov 2012 - 11:24 am | सस्नेह
मीपण सध्या शाकाहारीच आहे !त्यामुळे या डिशकडे बघत बघत श्रीखंड-चपाती खाल्ली !
23 Nov 2012 - 6:26 am | स्पंदना
मी लगेच मोबाईल घेऊन फोटो काढायला उभी राहिले
बरीच दमली असशील नाही का?
वैसे मला मराठी लिहावाचाय्ला येत नाही. त्यामुळे काहीही वाचले नाही. चष्म्या शिवाय दिसत नसल्याने काहीही पाहिले नाही. (खरतर घरच्या आठ्वणीने डोळे भरलेत. त्यामुळे दिसत नसाव. हं! आमच कोल्हापुर)
23 Nov 2012 - 11:26 am | सस्नेह
मग माहेरी गेल्यावर विश्रांती नको का ?
आणि सजावटपण मीच केली ना !
23 Nov 2012 - 11:28 am | सस्नेह
घरच्या आठ्वणीने डोळे भरलेत.
डिश बघून घरीच आहेस असं समज. सध्या तरी.
इथे आलीस कि मी करून खाऊ घालीन आपल्या हाताने.
23 Nov 2012 - 10:03 am | इरसाल
मेलो मेलो.
ते कच्चे खिमा बॉल उचलुनच खावुन टाकावे असे वाटत आहे तेव्ह्ढा धीर नाहीये.
23 Nov 2012 - 10:21 am | ऋषिकेश
अरे वा! दमदार पदार्थ दिसतोय.. घरी मांसाहार बनवणे वर्ज्य असल्याने तुमच्याकडे येऊनच चापावा लगेलसे दिसते ;)
23 Nov 2012 - 11:21 am | अभ्या..
लैच भारी स्नेहातै.
हुबळीचे सावजी खिमा ऊंडे (पालक नव्हते त्यांत) आठवले एकदम.
भारीच :)
23 Nov 2012 - 12:32 pm | गणपा
पालक आणि मटणाची युती एकदम भन्नाट लागते.
तस्मात खीमा-पालक आवडल्या गेले आहे. :)
23 Nov 2012 - 2:10 pm | लीलाधर
घरी मांसाहार बनवणे वर्ज्य असल्याने तुमच्याकडे येऊनच चापावा लगेलसे दिसते पूर्णतः सहमत :-P ;) :)
23 Nov 2012 - 2:26 pm | बॅटमॅन
शेवटचा फटू निव्वळ जीवघेणा!!! नाद खुळा :)
23 Nov 2012 - 2:38 pm | सुधीर मुतालीक
येत्या बेस्तरवारला गावाकड निप्पाणला चक्कर मारनार हाय. तुमची मर्जी असल तर खिम्याचा बेत जमिवतो. त्येवडंच निप्पाणला याच तुमानी कारन गावल. तुमी शीरकंड खा, चाल्तंय की. पावन्यास्नी घ्युन या. तुमचा सांगाव धाडा.
23 Nov 2012 - 4:07 pm | सानिकास्वप्निल
पाहूनच खावासा वाटणारा पदार्थ :)
काल गुरुवार होता म्हणून मुद्दाम प्रतिसाद दिला नाही पण सारखं सारखं बघून राहवेना.
ह्या विकांताला बनवायचा विचार करत आहे :)