एक न रुळलेली वाट...

सस्नेह's picture
सस्नेह in दिवाळी अंक
11 Nov 2012 - 12:03 pm

टीपः या कथेतील सर्व व्यक्तिरेखा व प्रसंग काल्पनिक आहेत. कुणा हयात वा मृत व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.'

अंगाशी चोपून बसलेली अद्ययावत जरीवर्कची अस्सल म्हैसूर सिल्क साडी, गळ्याशी चपखल बसणारा राजस्थानी पद्धतीचा हिर्‍याचा कंठा अन त्याखाली रुळणारा अस्सल मोत्याचा, मध्ये मध्ये हिरेजडित पेट्या असलेला दोनपदरी सर. एका हातात आधुनिक पद्धतीची हिर्‍याचीच दोन ब्रेसलेट्स अन् दुसर्‍या हातात दुबईहून खरीदलेले, सोन्याचा बेल्ट असलेले हिरेजडित नाजूकसे घड्याळ. शिवाय, कानभर विखुरलेली छोटी छोटी नाजूक कर्णभूषणे अन् गोर्‍या रेखीव चेहर्‍यावर मेकअपचा हलकासा मुलामा. सकाळपासून हा सगळा साज सांभाळत मंगल कार्यालयात मिरवताना मैथिलीच्या शेलाट्या बांधेसूद तनूला भलताच शीण झाला होता. त्यात आणि छोटी सिया सारखी ‘मम्मा, चल ना घरी..’, ‘मम्मा, भूक लागली’ म्हणून तिचा पदर ओढत होती. आता अक्षता पडल्या की मागच्या रिकाम्या खुर्चीवर अंमळ टेकायचं, असं मैथिलीनं केव्हाचं ठरवलं होतं. मावसबहिणीच्या लग्नासाठी ती दोन दिवस माहेरी आली होती.

‘शुभ मंगल सावधान..’चा गजर झाल्याबरोबर धाडधाड फटाके उडू लागले अन पटकन जेवणाच्या हॉलमध्ये जाऊन तिनं सियाला थोडं खाऊ घातलं अन धाकटी बहीण वृषाली बरोबर तिची घरी पाठवणी केली. ‘आता घेऊ या समाचार फारा दिवसांनी भेटणार्‍या आप्तजनांचा...’ असं मनाशी म्हणत तिने मागच्या खुर्चीला पाठ टेकली न टेकली तोच...
‘अगं मिठठू, तू केव्हा आलीयेस दिल्लीहून ? कशी आहेस ? अन् सिया कुठाय ?’ हा सवाल कानावर आला अन् त्याबरोबरच एक हलकीशी थाप पाठीवर पडली. तिने वळून बघितले अन् नको त्या व्यक्तीला समोर पाहून तिला एकदम अवघडल्यासारखं झालं. उत्साहानं नवीन कपड्याची घडी मोडावी अन् नेमका समोरच वंगणाचा डाग निघावा, तसं काहीसं. तिच्या पातळ रेखीव जिवणीला अस्पष्टशी मुरड पडली...

...नीलम‘काकू’ हसर्‍या प्रसन्न मुद्रेने अंगावरच्या गढवाल सिल्क साडीचा पदर डोक्यावरून ओढत समोर ठाकली होती. तिच्या चेहर्‍यावर मेकअपचा वाजवीपेक्षा जास्तच ठळक थर दिसत होता. लग्न झाल्यापासून गेल्या सहा वर्षानंतर मैथिलीनं तिला आजच प्रथम पाहिलं होतं. समीर - मैथिलीचा नवरा - जॉबसाठी दिल्लीला राहत असल्यामुळे तिचं माहेरी जाणंयेणं तसं कमीच होतं.

उसन्या आनंदाचा आव आणणे मैथिलीला जरा कठीणच गेलं.

“बरी आहे. परवा आले अन् उद्या संध्याकाळी जाणार परत. सिया वृषालीबरोबर घरी गेली आत्ताच.” ‘काकू ‘ असा तिचा स्पष्ट उल्लेख करणे टाळून मैथिली म्हणाली.
“उद्या संध्याकाळी जाणार ना? मग सकाळी नाष्ट्याला ये ना घरी.” डोक्यावरचा पदर सावरत नीलम अगत्यानं बोलली.
“नाही हो, खूप जणांकडे जायचं आहे...” मैथिलीने माफक हसून टाळले.
इतक्यात अम्याकाका कुठूनसा ढांगा टाकीत आला.
“वा वा, इतक्या दिवसांनी आली आहेस गावात अन् अशीच निघालीस? ते काही नाही. तुझा बाप अन् तो मोरूकाका, या दोघांनाच उचलून आणतो. मग कशी येत नाहीस ते बघू!” अम्याकाकाच्या धबधब्यासारख्या आग्रहापुढे मात्र मैथिलीचं काही चालेना.
“बरं बाई, बघू या..” म्हणाली, पण अखेर ती कबूल झाली. “येईन उद्या..”
इतक्यात चुलत, मावस, मामे बहिणींच्या गराड्याने तिला वेढले अन् यावर विचार करायलासुद्धा तिला दिवसभर फुरसत झाली नाही.

रात्रीची जेवणे आटोपल्यावर तिने सियाला झोपवले अन् खूप दिवसांनी निवांत भेटणार्‍या माहेरच्या माणसांच्या गप्पागोष्टींमध्ये ती गुंगून गेली. खूप उशिरानं, बेडवर आडवे होण्यापूर्वी मात्र तिला आईपाशी अम्याकाकाचा विषय काढल्याशिवाय राहवले नाही.
“अगं आई, अम्याकाका आता ‘ति’ला घेऊन राजरोस फंक्शनला सुद्धा जातो वाटतं?”
चादरी काढता काढता आई क्षणभर थबकली अन् मग सुस्कारा सोडून म्हणाली,
“सवय होते गं सगळ्याची लोकांना. अन् तीसुद्धा इतकी वर्षे राहिलीये ना त्याच्यापाशी. तो जाईल तरच ही कुठे जाणार, नाहीतर नाही. एकटी कधीच कुणाकडं जात नाही ती. ...चार दिवस गळ्यात घातलं की लोढण्यालासुद्धा घालणार्‍याचा शिक्का बसतो. ही तर दहा वर्षं झाली राहिलीय त्याच्याजवळ...”
“अन् तिचा तो नवरा?”‘ मैथिलीनं जरासं अडखळत विचारलं.
“तो कुठं जाईल बिचारा? असतो तिच्यापाशीच!”
जवळपास पन्नासाव्या तरी वेळी या अजब नात्याचं तिला पुन्हा मनाशी नवल वाटलं. बाळबोध संस्कारात वाढलेल्या तिला हे सगळं अतार्किक, अनैतिक, हुच्च असंच वाटत होतं. अम्याकाकासारखा सुसंस्कृत, परिपक्व माणूस असं बेलगाम वागेल, हे काही तिच्या मनाला पटेना. पाठ टेकल्या टेकल्या तिच्या मिटल्या डोळ्यांपुढे, सरातून मोती सरकावे तसा अम्याकाकाचा भूतकाळ संथपणे सरकू लागला.

अम्या उर्फ अमरेंद्रकाका तिच्या मावशीच्या नवर्‍याचा, मयूर ऊर्फ मोरूकाकांचा मित्र. मोठ्या रईस घराण्यातला, दोन बहिणी अन् दोन भावांच्या पाठीवरचं शेंडेफळ. वडिलांचे दहापंधरा उद्योगधंदे मोठे भाऊ सांभाळीत. अम्याकाका अधूनमधून कारखाने अन् ऑफिसात चक्कर टाकी. वडिलांचे मोठमोठ्या कंपन्यांचे शेअर्स होते. घरबसल्या ढिगानं पैसा घरी येत होता.

अम्याकाका दिसायला एखाद्या सिनेनटासारखा देखणा. एकदम हसरा, बोलका, उमदा, अन् दिलदार. वृत्तीने काहीसा खुशालचेंडू. नेहमी पॉश अप-टू-डेट कपडे. स्वभाव अत्यंत गमत्या. कायम कुणाची तरी फिरकी घेत असे. मोरूकाका त्याचा एक किस्सा नेहमी सांगत असे. एकदा त्यानं नवीन परफ्यूमची बाटली आणली होती. तिचं झाकण काढून वरचं बटन प्रेस केल्यावर परफ्यूमचा फवारा थांबेचना. हा पठ्ठया गल्लीच्या कोपर्‍यावर जाऊन उभा राहिला अन् सुहास्य वदनाने, जाणार्‍या येणार्‍या लोकांवर परफ्यूम संपेपर्यंत फवारा मारीत बसला!

तसेही, अम्याकाका जिथे जाईल तिथे थट्टामस्करी अन् हास्याचे फवारे उठत असत. त्याच्या लोकप्रियतेला थांग नव्हता.

मैथिली शाळा पास करून कॉलेजात गेली तेव्हा अम्याकाका कॉलेज पास करून वधूसंशोधन करू लागला होता. तसा तो मोरूकाकापेक्षा ४-५ वर्षांनी लहान. पण त्याच्या हसमिजाज, चेष्टेखोर स्वभावामुळे सर्व वयातल्या लोकांशी त्याची सारखीच दोस्ती असे. मैथिली अन् तिची भावंडे त्याला ‘ए अम्याकाका..’च म्हणत

जात्याच थोड्याशा लघळ स्वभावामुळे ‘जब भी कोई लडकी देखू, मेरा दिल दिवाना बोले, ओले ओले...’ अशी अम्याकाकाची सारखी हालत होत असे. काहीसा खर्जातला, अमीन सयानींसारखा त्याचा आर्जवी मृदू आवाज होतकरू युवतींच्या कानातून पाहता पाहता मनात घुसे. त्यात त्याची बोलण्याची मिठ्ठास शैली, देखणे व्यक्तिमत्त्व अन् सुसंस्कृत शिष्टाचार यामुळे तो आजूबाजूच्या अनेकींच्या ‘दिलकी धडकन’ बनला नसता तरच नवल. तोही फ्लर्ट करण्यात पटाईत होता. मैथिली तर तो भेटला की पहिला प्रश्न करी. “क्यूं अमरेन्द्रकुमारजी, कौन है आजकी ताजा हिरोईन?”
‘स्थळ’ म्हणून एकदम वरच्या श्रेणीत असल्यामुळे अम्याकाका चांगली पारखून वधुपरीक्षा घेऊन अन् शोभेशी हिरकणी मिळाल्यावर मगच लग्न करणार, असा सगळ्यांचा अंदाज. पण त्याला बाविसावं वर्ष सरून जेमतेम दोन महिने झाले असतील तोच अम्याकाकाचं लग्न ठरल्याचं मैथिलीच्या कानी आलं. तिला जरा आश्चर्य वाटलं. अन् त्याहून आश्चर्य वाटलं ते त्याच्या भावी वधूला पाहिल्यावर...

अश्विनी, अमरेन्द्रकाकाची भावी वधू, त्याच्या सख्ख्या मामाची मुलगी. कृश म्हणावी इतकी सडपातळ. नाकीडोळी ‘बरी’. अम्याकाका एकदम लालसर गोरा, तर ही पिवळट पांढरी. डोळे मात्र अगदी हरिणीसारखे भेदरट. अश्विनी एकदम अबोल अन् लाजाळू होती. तिला अजून अठरा वर्षे पूर्ण व्हायला दोन महिने अवकाश होता. अन् अम्याकाका म्हणे तिच्या प्रेमात पडला होता. मामेबहिणीशी लग्न करायला घरच्यांचा विरोध. पण अम्याच्या हट्टापुढे कुणाचे चालेना. शेंडेफळ म्हणून सर्वांचा लाडका ना!

अश्विनीला अठरा वर्षं पूर्ण झाली त्याच्या तिसर्‍याच दिवशी तिचं अन् अम्याकाकाचं लग्न झालं. अम्याकाकाच्या उत्साहाचा वारू आता बेफाम उधळलेला. प्रत्येक वेळी भेटला की अश्विनीचं नवीन कौतुक त्याच्या शब्दांमधूनच नव्हे, तर उत्साही चेहर्‍यावरूनही पाघळलेल्या आइसक्रीमसारखं टपकत असे. महिन्यातून पाच सहा वेळा तरी मयूरकाका अन् इतर मित्रांची ड्रिंक्स –नॉनव्हेज पार्टी व्हायची. प्रत्येक वेळी अम्याकाका अश्विनीसाठी, खाद्यपदार्थांच्या मागवलेल्या एक एक डिश पार्सल करून नेत असे. कारखान्याच्या वसुलीसाठी दोने महिन्यातून एकदा देशात सगळीकडे फिरती असे. तेव्हा अम्याकाका प्रत्येक वेळी अश्विनीलाही घेऊन जात असे. त्याच्या या काहीशा अपरिपक्व नवथरपणाची नातेवाईक अन् मित्रपरिवारात थोडीशी टिंगलसुद्धा व्हायची. पण अमरेन्द्रकाका एका वेगळ्याच विश्वात गुंग होता.

यथावकाश अश्विनी अन् अम्याकाकाला मुलगी झाली. मैथिली आईबरोबर बारशाला गेली होती. बारशाचा थाट डोळे दिपण्यासारखाच होता. अम्याकाकाच्या आनंदाचं अन् उत्साहाचं माप आता पुरेपूर भरलेलं. पण अश्विनीची मुद्रा अंमळ फिकुटल्यासारखी वाटली मैथिलीला. ओटी घालता घालता तिची आईसुद्धा म्हणाली अम्याकाकाच्या आईला, “बाळंतीण बाईला जरा बाळसं येऊ दे हो आता...”
बघता बघता सई २ वर्षाची झाली. अश्विनीच्या प्रकृतीची मात्र वरचेवर तक्रारच सुरू होती. पुष्कळदा अम्याकाकाच सईचं सगळं करायचा. डॉक्टर, वैद्य झाले, तपासण्या, औषधे झाली, अंगारे-धुपारे झाले. दोष नखातही नाही, तरी ही मात्र दिवसेंदिवस खंगत चालली. अम्यासारखा प्रेमळ नवरा, मोठं घराणं, कुणाचा जाच नाही, कामाचा त्रास नाही, तरी हिची तब्येत अशी का? याचं सर्वांना आश्चर्य वाटत असे.
सई अडीच वर्षाची झाली अन् एक दिवस बातमी आली. अम्याकाका पुन्हा एकदा बाबा होणार आहे.
झालं. अश्विनीला अगदी फुलात ठेवायचंच काय ते बाकी होतं. डॉक्टरांची सकाळ संध्याकाळ घरी चक्कर सुरू झाली. अश्विनीच्या उशा-पायथ्याला औषधं, टॉनिक्स अन् फळं यांची रेलचेल झाली. सगळं घरदार तिच्या तैनातीत. अम्याकाका तर एक क्षण तिला एकटी सोडेना. पण तिच्या मुखावर मनापासून हसू उमटलेलं काही कधी कुणी पाहिलं नाही. सदा काहीतरी तक्रार.

घरात आई अन् मावशी कुजबुजताना नंतर एकदा मैथिलीच्या कानावर आलं. अम्याकाकानं तिला खाजगीत विचारलंसुद्धा होतं म्हणे, बाळंतपण झेपणार नसेल तर एम.टी.पी. करायचं का म्हणून. पण तिनं नकार दिला.

असेच दोनेक महिने गेले अन् एक दिवस ती धक्कादायक बातमी आली.

अश्विनीनं गळफास लावून घेऊन आत्महत्या केली!

बेडरूममधल्या पंख्याला साडीचा फास अडकवला अन् स्वत:चा गळा आवळून घेतला. जाताना चिठ्ठी लिहून ठेवली होती. “प्रकृतीला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. कुणाला दोष देऊ नये. माझ्या नशिबाची मी बळी ठरले.”
*********

अम्याकाकावर दुर्दैवाचा आघात झाला. एका रात्रीत त्याचे कानशिलावरचे केस पिकले. चेहेर्‍याचा नूर पार उतरला. प्रसन्नतेची जागा अकाली प्रौढत्वाने घेतली. डोळ्यात खोल उदास वेदना पसरून राहिलेली. अखंड वाहणार्‍या वाक्-गंगेचा ओघ रोडावला. मित्रपरिवारात उठबस होती. पण बोलणे जवळजवळ शून्य.
फक्त सईशी बोलताना त्याचा उदासपणा किंचित दूर होई. शक्य तितका वेळ तो तिच्या संगतीत काढी. तिच्यामध्ये तो जणू अश्विनीचे दुसरे रूप पाहण्याचा प्रयत्न करी.

असंच एक वर्ष गेलं. अमरेन्द्राच्या घरी त्याच्यासाठी दुसरी सोयरीक करायचं घाटू लागलं. अमरेन्द्राला याची कुणकुण लागली. त्यानं एक दिवशी सगळ्यांना हॉलमध्ये जमवलं अन् स्वच्छ सांगून टाकलं.
“अश्विनीची जागा भरण्यासाठी मला मुलाखती घ्यायच्या नाहीत. तुम्हाला घ्यायच्या असतील तर खुशाल घ्या. नंतर आणखी एका आयुष्याचा खेळखंडोबा केला म्हणून मला दोष द्यायचा नाही, ...कदाचित मी करेनही पुन्हा लग्न. सईची काळजी मलाही आहे. आणि मीही काही संपूर्ण स्वयंसिद्ध नाही, याची मला जाणीव आहे. पण आता सध्या काही नको. वेळ आल्यावर मीच सांगीन.”

आता अम्याकाका पार बदलून गेलेला दिसत होता. गेला होता तो गमत्या, पाघळू अन् रंगेल मिजाज..... ती फुलपाखरी भ्रमर-वृत्ती.. ! त्याची जागा आता एका दृढ, खंबीर, निश्चयी प्रेमळ पित्याने घेतली होती. जणू आता सई हे त्याचे एकमेव ध्येय होते.

याच दरम्यान एकदा कधीतरी मैथिली मावशीकडे गेली असताना अम्याकाका मोरूकाकांकडे काही कामानिमित्त आला होता. अजून तिशी ओलांडली नव्हती त्याने. वरवर पाहिले तर लक्षात आले नसते. पण बारीक नजरेने पाहिल्यावर त्याच्या डोळ्याखाली उमटलेल्या काळ्या रेषा, नजरेतला हरवलेपणा, हालचालीतील पराभूतता या गोष्टी निकटच्या माणसांच्या काळजाला भिडत. एखादं सूर्यफुल पूर्ण उमलावं अन् त्याच क्षणी त्याला बर्फात गोठवावं, तसं काहीसं त्याच्याकडे पाहून मैथिलीला वाटलं.
“खूप प्रेम होतं गं त्याचं अश्विनीवर ! पुरुषाची जात कठोर खरी. पण तिच्या बाबतीत याचे काळीज लोण्याहून मऊ. बारीकसारीक गोष्टीतही तिची कटाक्षाने सोय, व्यवस्था पाहणार. जातच निराळी त्याच्या मायेची. अजून तिशीसुद्धा गाठली नाही बिचार्‍याने. उभं आयुष्य कसं काढणार हा?” तो गेल्यावर मावशी सहज बोलून गेली.

त्या हळव्या वयात, त्या क्षणी मैथिलीला डोळ्यांपुढे प्रेमाचा एक भव्यदिव्य आविष्कार साकार झाल्यासारखं वाटलं. कॉलेजच्या ट्रीपला गेली असताना चांदण्या रात्री ताजमहाल पाहिला होता, तेव्हा तिला असंच काहीसं वाटलं होतं.

या घटनेला एखाद दोन वर्षे गेली असतील. सई आता शाळेत जाऊ लागली होती. त्यानंतर सईला शाळेत सोडायला जाताना किंवा येताना मैथिलीला एक-दोनदा अम्याकाका भेटला होता. कॉलेजच्या अखेरच्या वर्षात, महत्त्वाच्या टप्प्यात असल्यानं अन् नवनवीन मित्रमैत्रिणींच्या भावविश्वात गुंग झाल्यामुळं यानंतर तिचं अम्याकाकाच्या घरी जाणं येणं कमी झालं.

मध्येच एक दिवशी कॉलेजमधून येताना अम्याकाका स्कूटरवर दिसला. मागे एक बाई. त्याच्याच वयाची, गोरी, नाक डोळे बेतास बात. लक्षात राहिली, ती गडद मेक-अपमुळे. नीट पाहीपर्यंत स्कूटर भुर्रकन गेलीसुद्धा.

...असेल कोणीतरी, मैथिलीनं जास्त लक्ष दिलं नाही. फार कुतूहल वाटायचं तिचं वयही नव्हतं.
मग पुढच्या काही दिवसात ती जोडी वरचेवर दिसायला लागली स्कूटरवर.
अन् त्यापाठोपाठ वार्‍यावरच्या वावड्याही कानावर येऊ लागल्या. ती - नीलम अन् अम्याकाका दिवसाचे बरेचसे तास एकमेकासोबातच घालवतात. परवा कुणीतरी त्यांना पन्हाळ्यावर बघितले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी अंबाबाईच्या देवळात....!

मग एकदा तिने आईला स्पष्टच विचारले, “आई, अम्याकाकाचं लग्न ठरलंय का?”

वयात आलेल्या तरुण मुलीच्या प्रश्नाने आईला अडचणीत टाकले.

“तुला कशाला पाहिजे त्याच्या लग्नाची पंचाईत ? आता मे महिना गेला की तुझ्याच लग्नाची वाटाघाट चालू होईल, ते बघ...” आई उगाचच डाफरली.

मग तिने मावशीच्या घराकडे मोर्चा वळवला. मावशी सर्वात धाकटी त्यामुळे मैथिलीच्या अन् मावशीच्या वयात सहासात वर्षांचाच फरक. म्हणून तिची मावशीशी कायम गट्टी असे. मावशीकडून सगळं काही तिला तपशीलवार समजलं.

नीलम सईच्या शाळेत शिक्षिका होती. विवाहित. तिलाही एकच मुलगी. ऋचा सईच्याच वर्गात होती. सईच्या पेरेंट-टीचर मीटिंगच्या माध्यमातून नीलमची अन् अम्याकाकाची ओळख झालेली. कशी वाढली, कुणालाच माहीत नाही. पण सहाच महिन्यात दोघांना एकमेकांशिवाय राहवेनासं झालं. नीलमचा मूळ गाव दूर कर्नाटकात. इथे कुणी सोयरेधायरे नाहीत. अम्याकाकाच्या घरी मात्र गहजब झाला. चर्चा, समजावणी झाली, धमक्या झाल्या. अम्याकाका बधला नाही. अखेर मित्र या नात्याने मोरूकाकांवर मध्यस्थीची जबाबदारी आली.

मोरूकाकांनी अम्याला बोलावून घेतले.
“अरे अम्या, कोण ही नीलम?”
“अश्विनीनंतर तीच मला जवळची वाटली रे, मोर्‍या .”
“अरे, लग्न का करत नाहीस मग तिच्याशी?”
“तिचं लग्न झालंय.”
“मग घटस्फोट घे म्हणावं”
“ते शक्य नाही रे... काही अडचणी आहेत...”
“मग काय विचार आहे तुझा?”
“काही नाही. आम्ही काही कुणाचा जीव नाही घेणार. ती तिच्या घरी, मी माझ्या घरी.”
“पण पुढे काय?”
“सध्या काही ठरवलं नाही. वेळ आल्यावर पाहू..”
“धन्य आहेस....!”
मोरूकाकांची शिष्टाई कृष्णशिष्टाईसारखी वाया गेली.
अम्याकाकाचे घरच्यांशी संबंध पूर्ण बिनसले. तो फॅक्टरीच्या आवारातल्या गेस्ट हाऊसमध्ये जाऊन राहिला, सई दिवसा त्याच्यापाशी, अन् रात्री घरी असे. हे असंच काहीबाही मधूनच मैथिलीच्या कानावर येत राहिलं. आता अम्याकाका लग्नाच्या बायकोसारखे नीलमबरोबर गावात उजळ माथ्यानं वावरू लागला. तिच्या नवर्‍याची काय अवस्था होती काही कळायला मार्ग नव्हता.

एकदा मैथिली मावशीकडे गेली असताना अम्याकाका नीलमला घेऊन तिथे आला. तिचा ठळक मेकअप तेव्हाच मैथिलीच्या प्रथम डोळ्यात भरला. त्याने तोंड भरून हसून नीलमची ओळख करून दिली. “मिठठू, ही तुझी नवीन ‘काकू’ ...म्हणजे...काकूसारखीच आहे.” त्याच्या डोळ्यात पूर्वीची चमक काहीशी परत आलेली.

तीही तशीच तोंड भरून हसली. खूप अगत्यानं बोलली.मैथिलीच्या आईची चौकशी केली. जणू वर्षानुवर्षे आईशी तिचा परिचय होता.... मैथिलीनं जपून जेवढ्यास तेवढीच उत्तरं दिली. अम्याकाका गेल्यावर ती मावशीला म्हणाली, “जरासुद्धा काही लाज, संकोच नाही की गं तिला ...!”
“अम्यालाच नाही तर तिला तरी कुठला आलाय? बाकी तशी बरी आहे स्वभावानं अन् बोला-बिलायला. दोन तीनदा आली होती जोडी आमच्याकडं....अम्या घर बांधणारेय नवीन तिच्यासाठी.”
“अन् तिचा नवरा?”
“काय की बै काय करतो..! आपण कशाला विषय काढा तो?”

मावशीकडून परत येताना तिचं डोकं भ्रमल्यासारखं झालं. मनातल्या ताजमहालाच्या प्रतिमेला कुठेतरी तडे जाऊन तो ढासळू लागला. बाई गं, असं असतं स्त्री-पुरुष प्रेम? यालाच म्हणतात का पुरुषाची जात? अन् तीही कशी महामाया, नवरा घरी अन् अम्याकाका बाहेर? बस बस, मैथिलीला पुढे काही विचार करवेना.

यादरम्यानच मैथिलीचं लग्न ठरलं. समीरला परदेशी जायचं असल्यामुळे पदवी परीक्षेचा निकाल लागण्याआधीच मैथिलीवर अक्षता पडल्या. मग वैवाहिक विश्वात गुरफटून गेलेल्या मैथिलीला या प्रकरणाचा जवळजवळ विसरच पडला.
आज अचानक कपाटातली जुनाट कुपी उघडावी अन् हिन्याचा दर्प नाकात घुसावा तशा या सगळ्या आठवणी भसकन वरती आल्या.
सियाची झोप चाळवल्यामुळे तिला जवळ ओढताना मैथिलीची विचारशृंखला तुटली. थोपटून सियाला पुन्हा झोपवताना तिने ठरवलं. उद्या अम्याकाकाशी स्पष्टच बोलायचं सगळं. समीरच्या श्रीमंती अन् परदेशवारीमुळे तिचा शब्द आता माहेरी कौतुकाचाच नव्हे तर वजनदारही झाला होता. शिवाय लग्न होऊन एका मुलीची आई झाल्यानंतर तिला याबाबत अम्याकाकाला काही विचारण्याइतका मोठेपणा नक्कीच प्राप्त नव्हता का झाला ?... तिनं मनाशी विचार केला. झोप लागता लागता कधीतरी समीरची आठवण आली तिला. तो काय बरं म्हणेल हे सारे ऐकल्यावर? अन् मग कधी झोप लागली तिला समजलंच नाही.
*********

सकाळी उठल्यावर तिला खूपच उत्साही अन् फ्रेश वाटत होतं. सर्वांशी गप्पा मारत चहा झाला. सियाला उठवून दूध देऊन तिनं अंघोळ उरकली अन् सियाला आईवर सोपवून ती अम्याकाकाकडे जाण्यासाठी तयार झाली. चिकनचा पांढराशुभ्र सलवार-कुर्ता अन् राणी कलरची बांधणीची ओढणी या साध्याच पोशाखात तिचं मूळचं सौदर्य खुलून दिसत होतं. मेक-अपला फाटा देऊन तिने पावडरचा हात तोंडावर फिरवला आणि पर्स अन् भावाच्या, नंदनच्या अल्टोची किल्ली घेऊन ती बाहेर पडली. सकाळी नऊचा सुमार. रस्ते अजून आळसटलेले. दिल्लीच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मैथिलीला हे रस्ते म्हणजे रिकामं मैदानच वाटत होतं.
अम्याकाकाच्या फॅक्टरीच्या मागे असलेला त्याचा छोटेखानी नवीन बंगला मैथिलीला सहज सापडला. निघताना तिने फोन केला असल्यामुळे नीलमकाकू अन् अम्याकाका स्वागताला बाहेरच आले होते.

“ये, ये मिठठू, गरीबखान्यात स्वागत..!’”अम्याकाका.
“गरीबखाना? मग आमच्या दिल्लीच्या फ्लॅटला काय म्हणशील काका?” ती हसून म्हणाली.
गाडी पार्क करून ती दोघांबरोबर बंगल्यात शिरली. मोजकंच पण देखणं फर्निचर. सगळीकडे टापटीप. तिला एकदम अम्याकाकाचे जुनं घर आठवलं. माणसं अन् पसारा दोन्ही भरपूर असलेलं अन् कुठंच काही व्यवस्था, मेळ नसलेलं.

बरोबर आणलेला सुक्यामेव्याचा बॉक्स हॉलमधल्या टीपॉयवर ठेवून तिने नीलमने दिलेला पाण्याचा ग्लास घेत बैठक मारली. नीलमच्या चेहेर्‍यावर मेकअपचा थर नसल्याचं पाहून तिला का कुणास ठाऊक, बरं वाटलं.
नेहमी प्रमाणे नीलमकाकूने आईची, तिच्या सासू-सासर्‍यांची, घराच्या सर्वांची अगत्यानं चौकशी केली. सियाला आणलं नाही म्हणून माफक रुसवा व्यक्त केला. मग परिचितांची खबरबात झाली. मैथिलीने सई अन् ऋचाची चौकशी केली

“ऋचा गेली आहे कॉलेजमध्ये अन् सई तिकडच्या घरी. अं, म्हणजे ती तिथेच असते झोपायला अन् दिवसा इकडे येऊन जाऊन असते.”
‘तिकडचं घर’ म्हणजे अम्याकाकाचं घर हे मैथिलीच्या लक्षात आलं. अम्याकाकाच्या घरच्यांनी सईला अट्टाहासाने तिकडेच ठेवून घेतलं असल्याचं आईकडून ऐकल्याचं तिला आठवलं.

मैथिली नकळत नीलमच्या हालचाली निरखून पाहू लागली. चाळीशी नुकतीच पार केल्यामुळे काहीसं स्थूल झालेलं शरीर, आता आता मिळालेल्या सुखवस्तूपणामुळे किंचित सुटलेलं. पण सराईत हालचाली. सहज बोलणं. कुठेही अवघडलेपणा, ओशाळलेपणा नाही. स्थिर नजर. छे, हे चित्र काही एका सैल चारित्र्याच्या स्त्रीचं नक्कीच नाही, मैथिलीला वाटून गेलं.

नीलम नाष्ट्याच्या तयारीला लागली अन् तोपर्यंत अम्याकाकाने फिरून तिला घर दाखवलं. चांगला चार बेडरूमचा बंगला. वरच्या तीन बेडरूम पाहिल्यावर चौथी रूम न दाखवता अम्याकाका थेट गच्चीच्या जिन्याकडे वळला, हे तिच्या नजरेतून सुटलं नाही. गच्चीतली नीलमकाकूची टेरेस गार्डन पाहून अन् तिचं कौतुक ऐकून झाल्यावर खाली येताना अम्याकाका नीलमला मदत करण्यासाठी चार पावलं पुढे गेला, तेव्हा मैथिलीला डोळ्याच्या कोपर्‍यातून दिसलं. चौथ्या रुमच्या दारातून एक उंच, किडकिडीत पुरुष झटकन आत गेला. तेवढ्यातूनही त्याचे सिगारेटमुळे काळे झालेले ओठ अन् छातीच्या काड्या झालेल्या फासळ्या तिच्या नजरेतून सुटल्या नाहीत.

‘नीलमचा नवरा...!’ तिच्या लगेच लक्षात आलं.

झरझर जिना उतरून ती स्वयंपाकघरात आली.

डोशांचा खमंग वास दरवळत होता. अम्याकाका प्लेटस मांडत होता. नीलमने पटापट डोसे टाकले.
दोन तीन प्रकारच्या चटण्या अन् सुरेख कुरकुरीत डोसे ... मैथिलीचा आवडीचा पदार्थ. बरोबर छोटे छोटे राजस्थानी पद्धतीचे पकोडे, चिंचेची चटणी, अन् अम्याकाका नीलमकाकूचा भरघोस आग्रह. नको नको म्हणत, बोलत बोलत तिने पोटभर डोसे अन् पकोडे खाल्ले.
इतक्यात कॉफी संपली असल्याचे नीलमकाकूच्या लक्षात आलं. तिने अम्याकाकाला दुकानातून कॉफी आणायला सांगितलं. “आलोच..” म्हणत तो बाहेर पडला.
संधी साधून मैथिलीने विषय काढला.
“अम्याकाकाचं बाकी कौतुक वाटतं बाई. किती बारीकसारीक अवधानं ठेवून घर बांधलंय हे! सर्व सोयी छान केल्या आहेत.”
“हो ना. पहिल्यापासून त्यांचा असाच स्वभाव... सगळ्यांची काळजी घेण्याचा...”
“‘काकू, तुमची काकांशी ओळख कुठे अन् कशी झाली विचारलं तर राग नाही ना येणार?” आडवळणापेक्षा सरळसोट मार्ग बरा वाटला मैथिलीला. अन् इतक्या वेळात तिच्या दिलखुलास स्वभावाची ओळख होऊन भीडही चेपली होती.
नीलमकाकू प्रसन्नपणे हसली. अजूनही भरघोस असलेल्या केसांचा शेपटा खांद्यावरून पुढे ओढत ती टेबलाशी बसली.
“त्यात राग कसला? उलट स्पष्ट विचारलंस याचा आनंदच झाला. तुला आहे ना वेळ पाचदहा मिनिटं? ऐक मग.”
हनुवटी तळव्यावर ठेवून मैथिली नकळत थोडी आरामात रेलली. नीलम सांगू लागली.
“दहा वर्षं होऊन गेली या गोष्टीला. माझे मिस्टर स्टार फॅब्रिक्समध्ये अकौंटंट होते. पण सहा महिने लांबलेल्या आजारपणामुळे त्यांना मालकाने कामावरून कमी केलं. डॉक्टरांनी टीबीचे निदान केलं अन् माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं... होती नव्हती ती पुंजी औषधोपचाराला खर्च झाली. ऋचा फक्त तीन वर्षाची. माहेरची परिस्थिती बेताची. सासरे निवृत्त. त्यांच्यावर आधीच धाकट्या दिराचा भार. त्यांच्यापुढे काय हात पसरायचा? यांची तब्येत औषधांनी तशी तोळामासा का होईना, टिकून राहिलेली. पण छातीचं पार खोकं झालेलं. माणूस काही काम करण्याच्या बेताचा राहिला नव्हता. अखेर मी शाळेत शिक्षिकेची नोकरी घेतली. तुटपुंजा पगार. यांच्या औषधपाण्याचा खर्च जाऊन घरखर्च जेमतेमच भागायचा. कधीकधी तर तोही नाही. परका गाव. उधार-उसनवारी तरी कुणाकडे करायची अन् कशाच्या जिवावर? महिनाअखेरीला तर कधी कधी उपासमारीचीही वेळ यायची. त्यातल्यात्यात सोय म्हणजे ऋचाचं शिक्षण, मी तिच्याच शाळेत शिक्षिका असल्याने, फ्री होते.

यांची तब्येत पुन्हा कधी मूळपदावर येण्याची शाश्वती डॉक्टरही देत नव्हते. त्यांची जगण्यावरची सगळी वासनाच मरून गेलेली. दोन वेळा जेवण मिळालं तरी वा, न मिळालं तरी वा. त्यांना डिप्रेशनमधून बाहेर काढता काढता मीच डिप्रेशनमध्ये जाऊ लागले. माझ्याकडे ‘त्या’ नजरेने तर त्यांनी पाहून वर्षे लोटली असतील. एक व्रत घेतल्यासारखंच झालं होतं बघ. कुंकवाचा धनी म्हणून का होईना, तो होता. म्हणूनच की काय, समाजातल्या विखारी कीटकांपुढे माझा निभाव लागला. तरीही कोसळणार्‍या नवनवीन आपत्तींना तोंड देणं, अन् एका अजाण मुलीला अन् तितक्याच जाणीवहीन नवर्‍याला सांभाळणे मला, कुणा एका खंबीर आधाराशिवाय दिवसेंदिवस जड पडू लागले.
अशीच एकदा उपासाने शाळेसमोरच्या रस्त्यावर चक्कर येऊन पडले ती अमरेंद्र यांच्या गाडीसमोरच! सईची शिक्षिका म्हणून ते मला ओळखत होते. त्यांनी उठवून पाणी दिलं. घरी नेऊन सोडलं. अतिशय सभ्य माणूस. एका शब्दाची फालतू चौकशी नाही केली. ना माझ्याबद्दल, ना माझ्या नवर्‍याबद्दल ना परिस्थितीबद्दल. फक्त मूक आधार.. तोही नजरेचा.
मग हळूहळू या माणसाची ओळख होत गेली, सईच्या निमित्ताने. माझी सर्व परिस्थिती समजूनही त्यांच्या नजरेत कधी फरक नाही पडला. त्यांचीही पार्श्वभूमी मला नंतर समजली. वरवरच्या बेफिकीर अन् खुशालचेंडू व्यक्तिमत्त्वात खोल कुठेतरी दडलेलं संवेदनक्षम कोमल मन पाहून मी आश्चर्य करायची. परिस्थितीमुळे मी स्वत:ला असाहाय्य समजायची. पण खरोखर आश्चर्य वाटलं ते आणखी एक गोष्ट लक्षात आल्यावर..... पुरुष जेव्हा एकाकी असतो, तेव्हा त्याची अवस्था स्त्रीपेक्षाही अधिक दयनीय होते.
दु:खाच्या एकाकी जळत्या वाटेवरच्या दोन सहप्रवाशांची मनं कधी जुळली, काही कळलंच नाही. नकळत मने एकरूप झाली तरी समाज अन् दोघांची कुटुंबे यांचे भान आम्ही कधीच विसरलो नाही. हुरहुर, कातरपणा, असल्या भावनांना थारा देण्याइतके आम्ही नवथर नव्हतो. तरी, एकमेकांच्या सहवासाच्या दोन घटकांनीसुद्धा दिवस सगळा सुसह्य होऊ लागला. रोजच्या घडीभराच्या संवादातून समस्यांशी झुंजायला बळ मिळायचं. आणि एक दुसर्‍याच्या नुसत्या दूरच्या अस्तित्वानंही दुखर्‍या, मनाला एक दिलासा मिळत असे. यापेक्षा वेगळा काही मार्ग दोघाच्याही ध्यानी मनी नव्हता.”
“अन् मग असं एकत्र राहण्याचा निर्णय कधी घेतला?” मैथिली.
“नुसत्या मानसिक आधारावर जीवन जगता येत नाही, हे जाणण्याइतके वय अन् समज दोघांनाही होती. त्यातल्या त्यात अमरेंद्र जास्त प्रॅक्टिकल. त्यांनी विवाहाचा प्रस्ताव ठेवला. पण मी घटस्फोट घेतला तर माझ्या नवर्‍याचे हाल कुत्र्यानंही खाल्ले नसते, हे मी ओळखून होते. सासरच्या लोकांना काय आजच जाणत होते? अन् आजवर सोबत केली एकमेकांना नि आता असं अर्ध्या रस्त्यात सोडायचं? छे! अन् सोडलं असतं तर बिचार्‍याला कुठेतरी सरकारी दवाखान्यात सडण्याशिवाय दुसरा काय पर्याय होता? माझ्याही मनाला पटलं नाही अन् अमरेन्द्रही सहमत होते.
पण मग काय असंच घुसमटत आयुष्य घालवायचं? अन् कुणासाठी हा एकाकी रस्ता धरायचा? मुली तर लग्न होऊन आपापल्या घरट्यात गेल्या असत्या. आमची ससेहोलपट चालूच राहिली असती. उलटसुलट गटांगळ्या खात आम्ही असे खूप दिवस घालवले. एक दिवशी मात्र एक प्रसंग घडला, त्याने अमरेंन्द्रांचं डोकं सटकलं.
अमरेन्द्रांच्या आग्रहावरून मी अलीकडे थोडीफार चार भिंतींच्या बाहेर पडू लागलेली. एकदा असेच रात्रीच्या नाटकाला गेलो होतो त्या दिवशी आम्ही. अकरा वाजता मला घराबाहेरच्या रस्त्यावर सोडल्यावर काही टगे रस्त्यावर फिरत होते ते छेड-छाड करू लागले. अमरेन्द्रनी त्यांना हुसकावल्यावर गेले. जाता जाता एकजण म्हणून गेला.. “काय रात्रभर बसणारेस काय तिच्याजवळ ? जाशील की कधीतरी...मग आहोतच आम्ही!”
झालं. अम्रेन्द्रांच्या डोळ्यात खून उतरला. त्याची अशी पिटाई केली त्यांनी की परत काही बिचारा गल्लीत फिरकला नाही. पण त्यानंतर अमरेंद्र घरी जायला तयार होईनात. मी खूप समजावलं... आता नाही येणार कुणी, इतकी धुलाई झाल्यावर, वगैरे. पण ते म्हणाले ‘नीलम, मी तुझ्या बाल्कनीत सतरंजी टाकून झोपतो आज रात्री. सईपण आजीकडे गेलीय.’
अन् खरोखरच रात्रभर ते बाल्कनीतल्या आरामखुर्चीवर शाल पांघरून झोपले. आत मी, झोपलेली ऋचा अन् माझा नवरा! तोही माझ्याइतकाच भेदरलेला. गुंडांची पुरेशी धुलाई झाल्यामुळे की काय, सुदैवाने रात्रीत पुन्हा काही गैरप्रकार घडला नाही. पण झोप मात्र नाहीच लागली.
सकाळी उजाडल्यावर मी केलेला चहा घेऊन माझा नवरा स्वत: अमरेन्द्रांजवळ गेला आणि त्याने त्यांचे पायच धरले. “मी आजवर खूप चुकीचा समज करून घेतला हो तुमच्याविषयी. पण तुम्ही खरंच खूप वेगळे आहात. नीलमला तुम्हीच खरोखरी लायक आहात. माझं काय, आज आहे, उद्या नाही. तिच्या गरजा भागवायला मी नाही हो समर्थ. मी तिला घटस्फोट देतो. तुम्ही दोघे लग्न करा....”
कितीतरी वर्षांनी मी माझ्या नवर्‍याच्या डोळ्यात पाणी बघितलं.
अमरेंद्र हसले. “वा राव, अन् तुम्ही कुठं जाता?”
“जातो हरिद्वारला...”
“ते काही नाही चालायचं. बघू या नंतर पुढे काय करायचं ते. आता अंघोळ करा अन् झोपा मस्तपैकी. रात्री झोपला नव्हतात ना?” अन् अमरेंद्र मिश्कील हसले.
यानंतर माझ्या नवर्‍यानेच हा मार्ग सुचवला. आम्ही तिघेही एकत्र राहणं. पहिल्यांदा मला धक्काच बसला. पण विचार केल्यानंतर, सगळ्यांच्या हिताचं रक्षण करणारा याशिवाय दुसरा मार्ग नाही हे माझ्या लक्षात आलं. हो, ना करत अमरेन्द्रही तयार झाले.
अन् मग त्यांनी हे घर बांधलं. विरोध अर्थातच खूप झाला. अमरेन्द्रांच्या घरच्यांकडून, समाजाकडून, परिचितांकडून. पण आम्ही तिघे आमच्या निर्णयावर ठाम होतो. मी नोकरी सोडली. अमरेन्द्राना मी चोवीस तास त्यांच्या समोर हवी असते ना. ऋचाला विश्वासात घेऊन सोप्या शब्दात सर्व समजावून सांगितलं. तिलाही अमरेंद्रकाकांचा लळा लागलेलाच होता. सई मात्र अमरेन्द्रांच्या घरच्यांकडून फितवली गेली. तरीही या घरी यायची मुभा त्यांनी तिला दिली, हा त्यांचा मोठेपणाच म्हणायचा....”
“माय गॉड! हे इतकं सगळं रामायण-महाभारत मला खरंच माहिती नव्हतं, हो, नीलमकाकू. हा अमरेन्द्रकाका तर पहिल्यापासूनच अजब आहे, पण तुमचीही धन्य आहे हो. इतकी फाईट घ्यायची समाजाशी म्हणजे येरागबाळ्याचं काम नव्हे!”
“एकदा करायचं ठरवल्यावर परमेश्वरच बुद्धी देतो निभवायची. कुत्सित नजरा, शाब्दिक तीर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अपमान, सगळ्यातून पार पडलो, ते दोघं बरोबरीनं. शक्यतो कुणाला प्रत्युत्तर दिलं नाही. अपमान झाल्याठिकाणी पुन्हा गेलो नाही अन् हक्क असेल तिथून ढळलो नाही. आता मात्र आम्हाला या सार्‍यांचा सामना शक्यतो करावा लागत नाही. काहीसे उपेक्षित का असेना, या समाजानं आमचं एक स्थान आता मान्य केलं आहे हे जाणवतंय..”
इतक्यात अम्याकाका कॉफी घेऊन हजर झाला.
“कोपर्‍यावरचं दुकान बंद होतं, म्हणून मेन रोडला जाऊन आणली कॉफी. मैथिली, बोअर तर नाही ना झालीस?”
“अरे, काका, नीलमकाकूसोबत तू तरी कधी बोअर होतोस का....?” मैथिली मिश्कीलपणे प्रसन्न हसली.
कॉफी पिऊन तिने त्यांचा निरोप घेतला. एक डौलदार वळण घेऊन गाडी रस्त्यावर काढताना मैथिलीच्या मनात कितीतरी प्रश्नांची उत्तरं मिळत होती. आणि तिच्या डोळ्यासमोर एक आरसपानी ताजमहाल उंच उंच आकाशात झेपावताना दिसत होता...अगदी एकसंध !

footer

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

12 Nov 2012 - 7:56 am | स्पंदना

हं! वेगळी खरी पण वाटच. प्रत्येकान स्विकारलेली आपापली वाट.
स्पेस्शल टच जाणवतो लिखाणात. आवडली कथा.

हे असं आपल्या आयुष्यात सुद्धा घडावं अशी कधीतरी स्वप्नं पाहिली जातात, अशा काही स्वप्नांच्या किंबहुना त्यांच्या रंगीत तुकड्यांच्या जवळ जाणारी कथा.

धन्यवाद.

खूप आबडली. नेटक्या आणि साजर्‍या शब्दात मांडलीस हि कथा.
फारच छान.

बॅटमॅन's picture

15 Nov 2012 - 11:46 am | बॅटमॅन

रेखीव!!

क्रान्ति's picture

15 Nov 2012 - 8:01 pm | क्रान्ति

छान आहे कथा.

नगरीनिरंजन's picture

16 Nov 2012 - 1:25 pm | नगरीनिरंजन

वर्णनशैली उत्तम आहे.
या आणि रामदासांच्या कथावस्तूत एक अदृष्य धागा जाणवला.