"नमस्कार, राजवाड्यांचं घर हेच ना? "
"हो, हेच. पण तुम्ही कोण? एक मिनिटं, सांगू नका, मी अंदाज लावते."
"त्याच्याऐवजी दारावर पाटी लावली असतीत तर बरं झालं असतं."
"पाटी लावली असती, तर तुम्ही मला विचारलं असतंत का?"
"हे पण खरंय.."
"बरं मी गेस करते हं, तुम्ही इतके सुटाबुटात आलायत, म्हणजे तुम्ही सेल्समन असणार. बरोबर?"
"नाही.."
"मग, इन्शुरन्स एजंट?"
"नाही.."
"नक्कीच जनगणनावाले आहात तुम्ही"
"तुम्ही वेधशाळेत नोकरीला होतात का हो?"
"तुम्ही कसं ओळखलंत?"
"प्रत्येक वेळी नेमका चुकीचा अंदाज लावताय, त्यावरून."
"अगो बाई, हा पण अंदाज चुकला का?"
"अर्थात"
"आता शेवटचा, तुम्ही पोलिओ डोसवाले असणार, पण आमच्याकडे कुणीच लहान मूल नाही. हो, म्हणजे एक मुलगी आहे आम्हाला, पण ती कॉलेजात जाते."
"त्याच मुलीबद्दल सांगायला आलोय मी."
"अय्या, तुम्ही कोण?"
"हितचिंतक"
"इश्श, हे कसलं आडनाव... हितचिंतक?"
"ते आडनाव नाही हो, मी तुमचा हितचिंतक आहे, वेल विशर. जरा मुलीकडे लक्ष द्या."
"म्हणजे? ती नापास झाली की काय? परीक्षेच्या वेळी जरा आजारी पडली हो ती, नाहीतर एकदम अभ्यासू आणि सरळ मुलगी आहे हो, प्रिन्सिपल सर."
"चुकीचे अंदाज आहेत तुमचे."
"नक्की कुठले? "
"दोन्ही, माझ्याबद्दलचा आणि तुमच्या मुलीबद्दलचा.."
"काय झालं?"
"मी प्रिन्सिपल नाही आणि तुमची मुलगी सरळ नाही."
"काय सांगताय?"
"सत्य, तुमची मुलगी हल्ली एका मुलाबरोबर फिरत असते, दिवसाढवळ्या...."
"संस्कार आहेत हो,"
"हे असले संस्कार ?"
"तसं नाही, कुठे जायचं असेल तर दिवसाढवळ्याच, संध्याकाळी सातच्या आत घरात.."
"आता कसं समजावू मी तुम्हाला? हो, तुमच्या मुलीचं चोरून प्रेमप्रकरण सुरू आहे."
"असं? बोलली नाही कधी."
"घ्या, आता तुम्हाला बोलली असती तर ते चोरून झालं असतं का?"
"तेही खरंच. पण तुम्हाला कसं माहीत?"
"मी पाहिलंय ना तिला, बॉयफ्रेंडसोबत"
"तुम्हाला बॉयफ्रेंड आहे?"
"भलते अंदाज नका लावू, तुमची मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत असताना मी पाहिलंय."
"ओह, कसा आहे हो मुलगा?"
"तसा बरा आहे. शिकलेला आहे, अगदी भरपूर."
"इंजिनियर असणार."
"नाही, आता आणखी चुकीचे अंदाज वर्तवू नका. दहावीची परीक्षा सात वेळा दिलेय त्यानं, म्हणजे एकूण सत्तरवी शिकलाय म्हणा की."
"सत्तरवी? "
"हो, दहा गुणिले सात, सत्तरवी."
"अरे देवा, मग काही कमावतो वगैरे का?"
"आता तुमच्या मुलीचे सगळे हट्ट पुरवतो म्हणजे कमावत असणारच, तसाही पत्त्यात हात चालतो पोराचा."
"तो जुगार खेळतो?"
"नाही हो, टाईमपास म्हणून पन्नास पैसे पॉइंटनं रमी खेळतो, सहज आपला...."
"दिसायला बरा आहे का?"
"एकदम राजबिंडा, डोळे तर अतिसुंदर.."
"काय सांगताय काय?"
"मग, सारखा एक डोळा दुसर्यांकडे पाहत असतो."
"मुलगा चकणा आहे?"
"थोडासा तिरळा म्हणायचा, पण चेहरा.. आहा, एकदम हसमुख."
"हसमुख माणसंच मला आवडतात."
"हा तर एकदम हसमुख, चोवीस तास हसत असतो,"
"बापरे, वेडा आहे की काय?"
"वेडा नाही हो, दात पुढे आहेत त्याचे, म्हणून कायम हसतानाच दिसतो."
"शी, मुलाचे दात पुढे आहेत."
"थोडेसेच म्हणजे अगदी मोजून दीड इंच असतील, तसा तो आंबटशौकीनही आहे."
"अरे देवा, आंबटशौकीन?"
"हो ना, घरचा लोणच्याचा धंदा आहे आणि मुलगा तो आवडीनं करतो."
"असं होय? मग चांगला बिझनेसमन आहे की, मेहनती दिसतोय.."
"हो ना, रोज घरोघरी फिरून लोणच्याची पाकिटं संपवायची म्हणजे मेहनत तर घ्यावीच लागणार ना!"
"आत्ताच तर म्हणालात ना लोणच्याचा धंदा आहे ...."
"म्हणजे त्याची आई लोणचं घालते आणि हा विकतो."
"मग त्याचे वडील काय करतात ?"
"त्यांचा शोध चालू आहे अजून, सापडले की कळेल."
"रंगानं तरी बरा आहे का?"
"थोडासा काळा आहे, एवढं सोडलं तर छानच.."
"काळाही आहे?"
"थोडासाच, म्हणजे बघा, फक्त रात्रीच दिसत नाही, दिवसा अगदी स्पष्ट दिसतो तो."
"देवा रे, आणि काही व्यसनं वगैरे?"
"आठवड्यातून चार-पाच वेळा बारच्या समोर दिसतो...."
"बाप रे, म्हणजे दारुड्या आहे की काय?"
"आता बारच्या बाजूलाच त्यानं घर बांधलंय तर मोकळ्या वेळात काय करणार ना!"
"स्वभावानं तरी बरा आहे काय?"
"आता स्वभाव, म्हणजे.... कुणी एक शब्द जरी वाकडा बोललं, तर लगेच मारतो बघा."
"म्हणजे कसा? नुसताच मारतो, की जीव घेतो..?"
"यातलं काहीच नाही, दडी मारतो तो."
"म्हणजे भित्राही आहे....."
"आता घाबरेल नाहीतर काय करेल? त्याच्या किडमिडीत शरीराला चुकूनही कुणाचा धक्का लागला तर दोन-चार हाडं बाहेर यायची,"
"मुलगा हडकुळा आहे? असा हाडांचा सापळा?"
"नाही नाही, हाडांवर अर्धा सेंटीमीटर मांस असेल ना त्याच्या."
"म्हणजे मुलगा तिरळा, दातांच्या फळ्या असलेला, भित्रा, किडमिडीत आणि......"
"अहो, यादी कसली करताय? तुमची मुलगी पळायची तयारी करत असेल एव्हाना."
"आहेच माझी पोर गुणाची, शाळेत असतानाही लवकर उठून प्रॅक्टिस करायची, शंभर मीटरची सात मेडल्स मिळवलीयेत तिनं."
"पण आता ती आणखी लांब पळणार आहे."
"चारशे मीटर का?"
"तुम्हाला कळत कसं नाही? ती त्या मुलासोबत पळून जाणार आहे."
"काय? थांबा, येऊ दे घरी. बघतेच तिच्याकडे."
"नुसत्या बघता काय? लग्न लावून द्या तिचं...."
"त्या तसल्या तिरळ्या, दाताड्या सापळ्याशी? पोरगी बिनलग्नाची राहिली तरी चालेल, पण मी एखाद्या चांगल्या मुलाशी तिचं लग्न लावून देईन."
"मग तो सावळा असेल तर?"
"चालेल."
"त्याला चष्मा असेल तर?"
"तिरळ्यापेक्षा बरा, तरी चालेल.."
"तो खानदानी श्रीमंत नसेल तर?"
"तरी चालेल."
"मग सासूबाई, मला आशीर्वाद द्या."
"तुमच्याशी लग्न करून देऊ? त्यापेक्षा पोरीला विहिरीत ढकलून देईन."
"मी दिसतो तसा म्हातारा नाहीये, तरुण आहे मी (मेकअप काढत) हा पाहा."
"बरा दिसतोस की, पण माझ्या मुलीला तू पसंत पडायला हवास रे.."
"तिला मी आधीच पसंत आहे, तुमचीच परवानगी हवी होती."
"म्हणजे माझ्या मुलीचा बॉयफ्रेंड तूच?"
"हो, मीच."
"मग मघापासून ते काय चाललं होतं?"
"तुमची मुलगीच म्हणाली, काही झालं तरी माझी आई आपल्या लग्नाला परवानगी देणार नाही म्हणून, हे सगळं नाटक केलं."
प्रतिक्रिया
12 Nov 2012 - 6:40 am | रेवती
हा हा हा.
सासू आणि होणार्या जावयातली शाब्दिक आतषबाजी आवडली.
12 Nov 2012 - 7:20 am | सोत्रि
चाफ्या लेका, धमालच आणलीस की रे तू!
:D:D:D
- ( बायकोचा बॉयफ्रेंड ) सोकाजी
12 Nov 2012 - 9:08 am | प्रचेतस
चटपटीत आणि खुसखुशित संवाद.
मजा आली वाचून.
12 Nov 2012 - 10:40 am | बहुगुणी
मजा आली!
या लेखनाचा द्विपात्री प्रयोग व्हायला हरकत नाही :-)
14 Nov 2012 - 3:46 pm | मी-सौरभ
रेवती आज्जी अन सूड यांना चान्स द्यावा असे सुचवले तर चालेल का???
12 Nov 2012 - 12:53 pm | गणपा
मस्तच रे.
संवाद वाचताना दोन्ही पात्रं डोळ्यासमोर उभी राहुन स्वत:च बोलत असल्याचा आभास झाला.
12 Nov 2012 - 1:14 pm | सुहास झेले
हा हा हा ... लई भारी :) :)
12 Nov 2012 - 2:21 pm | क्रान्ति
भारीच जुगलबंदी आहे. सासू नंबरी तर जावई दस नंबरी :)
14 Nov 2012 - 11:50 am | तिमा
वेगळ्याच प्रकारचे आहे. तरी आवडले. एरवी 'चाफा' म्हटले की वैज्ञानिक गूढकथा असेल असे वाटले होते.
14 Nov 2012 - 2:58 pm | ऋषिकेश
अपेक्षित शेवट.. संवाद वाचून शोले आठवला
15 Nov 2012 - 11:05 am | बॅटमॅन
+१.
हेच्च म्हणतो. शोलेची आठवण झाली एकदम!!
14 Nov 2012 - 3:00 pm | अनन्न्या
चपखल संवाद, त्यामुळे वाचताना खूप मजा आली.
16 Nov 2012 - 2:30 pm | चाफा
आपल्या सगळ्यांच्याच प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद,
तिरशिंगराव म्हणतात तसं माझं ब्रँडेड लेखन देण्याच्या प्रयत्नात होतो पण दुसर्याच एका कामात अडकल्यानं ते जमलं नाही, दोन-तीन कथा अर्धवट पडूनच राहील्या :( जसा वेळ मिळेल तश्या त्या पुर्ण करून प्रकाशीत करेन असं मी 'आश्वासन' देतो ;)
16 Nov 2012 - 5:47 pm | प्रेरणा पित्रे
संवादांमुळे दोन्ही पात्रे डोळ्यासमोर उभी राहिली.
16 Nov 2012 - 9:52 pm | पैसा
शोलेतेला जय आणि मौसीचा संवाद आठवला. पण इथली कलाटणीही आवडली.
19 Nov 2012 - 4:46 am | स्पंदना
चाप्टर दिसतोय जावई!!
मस्त! असल्या हुषार माणसाला कोणीही हसत हसत देइल मुलगी.
29 May 2015 - 9:39 pm | उत्खनक
हलकं-फुलकं खुसखुशीत लेखन! आवडले!
30 May 2015 - 12:00 am | रुपी
मस्तच..