या हो मंडळी... गोडखाऊ...साखरखाऊ...गुळखाऊ.... या हो या....
अशी जोरदार हाळी द्यावीशी वाटल असं ठिकाण बगितलं आंम्ही..http://www.misalpav.com/node/23073 पांडवेश्वर दौर्याहुन परतताना. अगदी येक नंबर जागा बघा... येकदम मेमरेबल. त्याचं काय हे ना,गुर्हाळ मंजे गावकडच्या पब्लिकला म्हाइत असनारी गोष्ट...! पन शेराकडल्या मानसास्नी ह्ये असलं काय बगाया मिळालं,की ल्हान पनी जत्रेत बापाकडनं न मागता जंबो मिळायागत आनंद हुतो बगा...म्हनुन आज आपुन त्येची सफर करायची. अता तसं म्हनाया ग्येलं तर ही जागा,मंजी गुर्हाळात इशेष त्ते क्काय,यितक उलगडून सांगन्या सारखं??? असा ट्नाक उसा सारखा आपटल्या बिगर न फुटनारा प्रश्न पडू शकतोच की...!
हा...पन हितच तं सग्ळी गोम हाय वो...! जरा आमचं ह्ये गुर्हाळ बगा तरी कसं हाय,येवढं लांबरुंद् आनी म्होटं चरंखं बगाया घावतं काय तुमच्या शर्हात...? न्हाय ना? मग बगा कसा हाय ह्यो चरका..म्होट्टाच्या म्होट्टा...उसच काय येळ पडली तर... ;-)
असो... तर ह्या गुर्हाळाची गंम्मत सुरु व्हती ती आपुन गाडी रोडच्या साइडला सोडल्या पास्नं... गाडीतनं खाली उतरेपर्यंत ह्ये ना मंडळी, त्या रसाचा अस्सा काही खमंग आनी गो...ड वास सुटतो,की असं वाटतं त्या गुर्हाळात जाऊन गुळ खान्या परास ह्यो वासच खात र्हावं...! त्याच नशेत आपन म्होरं सरकल्याव, वेंट्रीला दिसते ती ही सगळी पडल्याली सुक्या चिपाडाची रास,,,
आनी गाळायच्या पेश्शल उसाचा खच...
अता जाऊ आपन गुळ कराच्या म्हा... रेशिपिकंड...
सग्ळ्यात आंदी त्यो सॉर्टिंग क्येलेला उस व्हता न्हवं का,त्यो ह्या म्होट्या चरक्यात जातु..
काय पट्टा फिरावनारी मोटार दमदार हाय बगा मंडळी...
दुपारच्या टाय्माला कडाडून भांडनार्या बाईच्या तोंडाचा पट्टाच जनु...
तर अश्या ह्या दमदार मोटर असलेल्या चरख्यात ऊस मंजी, जेवनात कचाकचा खाल्लेल्या कांद्या सारका जतोय बगा...आनी नंतर मग त्येचा काळाकभिन्न म्हनावा,पन मुळचा आमच्या इटुरायासारखा गोड असावा,असा रस ह्या हौदात सोडत्यात बरं...!
आन मग त्यो रस फुडं जातो तो ह्या तिन कडईच्या ओपन बॉयलर मदी...
हा पन ह्या बॉयलरची येक गंम्मत दाकवायची र्हाइल बर का.. ती दावतो आदी... त्या अदुगर ह्ये पोरगं बगा बंरं काय करु र्हायलय...
मला बी पयल्यांदा त्येच वाटलं की भुश्श्यात पोरगं करतय तरी क्काय??? जवळ जाऊन नीट बगितलं तर काय?,,,आहो...अलम मानसाच्या जातीचा अवडता ख्येळ चाल्लावता त्याचा... त्या तीन कढयांच्या असलेल्या बॉयलर खालच्या आगीत-काड्या सारत होतं पोरं....!
हाय का न्हाय इब्लिस ब्येनं... मी ग्येलो जवळ बगाया तरं मला,,''पडशीला आत'' असं हसत म्हनलं ल्येकाचं...!
त्येला बखोटिला धरुन दूर सारलं आनी बगितलं,तर खाली काय हो त्यो जाळ... बाब्बो...! जाळ कसला?अगदी खर्राखुर्रा तिखट जाळ...! उगीच रसाला गुळाकड न्येतो व्हय तो...
जाऊ दे अता आपन पुन्ह्यांदा वर जाऊ...कढयां कडं,तर ह्या लाइननी ३ कढया...यातल्या फय्ल्या कडईत रस येऊन पडतो,तो हळू हळू अळायला सुरवात हुती,काळे पना बी जराजरा कमी होऊन आक्शी वाटलेल्या मेंदिवानी हिरवट व्हाया लागतो.
त्येच्या नंतर या दुसर्या कढईत त्येला ढकलतात,आनी थितंत्येच्या मदी प्रक्रीया होन्यासाठी कसलं तरी वंगान त्यात घालत्यात,त्यानं मळी खाली बसती आनी रस अज्जून फ्रेश मंजी सफेद हुतो.
आनी थितं त्यो रटारटा उकळाया लागुन,फ्येस सोडाया लागला...की त्याला लग्गेच हल्लीच्या शैक्षनिक धोरना परमानं भराभर फुडं ''पास'' करत्यात...
हां.............पन ह्या श्येवटच्या यत्तेत सग्ळ्ळा घाम निग्तो बर्का...! ह्या तिसर्या कढईत रस चांगला इत इत खाली जाईपरेंत कडतो...! येकदम कढुन कढुन केशरी रंग धारन क्येल्या बिगर सोडत न्हाईत ब्येन्याला...!
आनी मंग त्येच्या कडच्या पन्हाळीतनं उकळता गुळ,फुडं येका चौकोन्हात ढ्येपा करायला सोडत्यात... आला गरम गरम गुळ,की वोढ फावड्यानी आनी भर ढेपाच्या बादलीत(साच्यात) अस्सा सपाटा लागुन र्हातो बगा...
आनी मंग ह्यो भगवंताच्या रसाळ अभंगा सारखा गोड गुळ तय्यार होतो,तो आपल्याला थितं गरम गरम खाया मिळन्यासाटी,,,
आनी बाजारला जान्या साटीही...
मंग काय मंडळी कसं वाटलं आमी लावलेलं गुर्हाळ,,,हाय का नाय त्येच्यातल्या गुळावानी गोड....??? :-)
======================================================================================
प्रस्तुत ठिकानी आमी क्येल्येलं व्हिडो री-पोर्टिंग... खास पण्णास रावांच्या http://www.misalpav.com/comment/435394#comment-435394 आग्रहास्तव ;-)
प्रतिक्रिया
9 Nov 2012 - 12:36 am | पिवळा डांबिस
तुमची गुर्हाळाची ष्टोरी लई झक्कास!!!
काय मग ढेप आनली का नाय घरी?
:)
9 Nov 2012 - 12:47 am | अभ्या..
धागा ओपन करताच वास आला बगा ताज्या गुळाचा. ब्येस्ट.
मस्त काढलाय गूळ. स्टोरी बी एक्दम भारी लिवलाव.
त्ये भ्येंडी चिरडून टाकतेत पाकाला तार यावी म्हणून ती नाय दिसली. :(
त्यो चटका बी लै भारी बर्का तार बगायचा.
9 Nov 2012 - 1:11 am | सूड
काय वो बुवा, ह्या वक्ताला टाकलासा व्हय ह्यो धागा. गुळाचा त्यो खमंग वास डोस्क्यात घुमाया लागला ना राव.
9 Nov 2012 - 1:26 am | प्रास
अक्शी गूळावानी ग्वाड धागा.
मागल्या लई आठौनी उभारून ग्येला नि थ्वोडी सर्दी हूनपन गूळाचा झ्याक् गंध् नाकामंदी भरून र्हायला.
गुर्हाळात पायजेल् तेवढा रस पिता येतू म्हणून मोठ्या बादलीभर पिल्याची आठौन पुन्यांदा ताजी झालीय.
व्वा बुवा, लई मजा आली.....
9 Nov 2012 - 1:40 am | रेवती
धागा आवडला. मदनबाणची आठवण येतीये. का ते त्यालाच विचारा.
9 Nov 2012 - 4:30 am | रेवती
आणखी एक सांगायचे राहिले. पाचसात वर्षांपूर्वी गूळ विकत आणला की दोनेक अठवड्यात त्याला बुरशी यायची. आता तशी येणे बंद झाले आहे. सध्याचा गूळ तर स्वप्नातच इतक्या पर्फेक्ट रंगाचा मिळेल पण फार खडे असतात म्हणून हा ब्र्यांड नको, तो नको करत एक काळाठिक्कर गूळ आणलाय. बघते तो तरी बरा निघतोय का. गूळ तयार झाल्यावर ज्या च्यानलमधून ढकलल्यासारखा दिस्तोय तिथला कचरा जात असणार ढेपेत. उसाच्या चिपाडाच्या काड्या मिसळल्या गेल्याचं एकवेळ काही नाही पण खडे दाताखाली अगदी त्रासदायक ठरतात मेले.
9 Nov 2012 - 5:04 am | श्रीरंग_जोशी
गुळ थोडा फार कुटल्यास त्यातील खडे निवडून वेगळे काढता येतील.
मिनी खल बत्ता येथे मिळेल.
9 Nov 2012 - 6:42 am | रेवती
ढेपेच्या आकारानुसार दीड मिनिट मायक्रोव्हेवात गरम केल्यास आणि चटका बसणार नाही याची काळजी घेतल्यास मऊ झालेल्या गुळाचे हव्या त्या आकाराचे तुकडे करण्यास सोपे पडते व त्यावेळी दिसतील तेवढे खडे काढता येतात. बाकी देवाची इच्छा! ;)
10 Nov 2012 - 10:55 am | मदनबाण
का ते त्यालाच विचारा.
अरे वा ! तुझ्या लक्षात आहे याचे नवल वाटलं. :)
गूळाची गोडी.
9 Nov 2012 - 1:49 am | श्रीरंग_जोशी
चित्रे व वर्णन दोन्हीही खासंच.
गुर्हाळ प्रत्यक्षात कधी पाहिले नसले तरी या धाग्यामुळे ते नेमके कसे असते याची कल्पना आली.
गुळाच्या भेलीला ढेप असेही म्हणतात हेही प्रथमच कळले.
नाहीतर ढेप हा गायी म्हशींना खाऊ घातला जाणारा पदार्थ असतो. भुईमुगाचे तेल बनवताना तेल गाळून झाल्यावर जे शिल्लक राहते त्याचे सुकलेले तुकडे म्हणजे ढेप. तळल्यापासून अनेक तासांनी वात्तड झालेली पालक पुरी कशी दिसेल तशी ढेप दिसते.
9 Nov 2012 - 2:27 am | टिल्लू
नाहीतर ढेप हा गायी म्हशींना खाऊ घातला जाणारा पदार्थ असतो. >>
आम्ही त्याला पेंढ पण म्हणतो उदा: शेंगदाणा-पेंढ, सुर्यफुल-पेंढ ई.
गुळाच्या भेलीला ढेप असेही म्हणतात हेही प्रथमच कळले.>>
भेली हा नवीन शब्द कळला.
9 Nov 2012 - 2:35 am | इष्टुर फाकडा
मस्त माहिती मस्त लेख आणि चित्रफित :)
श्री रंगराव आहो तुम्ही ज्याला ढेप म्हणताहात त्याला आम्ही 'पेन्ड' असे म्हणतो. तो भेली हा नवीन शब्द कळाला. धन्यवाद :)
9 Nov 2012 - 7:34 am | यशोधरा
एवढा लहान मुलगा त्या आगीकडे काय करतो आहे? :(
9 Nov 2012 - 8:16 am | अन्या दातार
वल्लीचा कित्ता गिरवत काड्या सारत आहे. ;-)
9 Nov 2012 - 7:54 pm | मी-सौरभ
गडाबडा लोळ्त हसणारी स्मायली
9 Nov 2012 - 11:29 pm | यशोधरा
वल्ली, हे पहा काय म्हणतयत तुला अ दा.
10 Nov 2012 - 8:38 am | प्रचेतस
=))
काडीसारक अन्याभौना तशी सवयच आहे.
11 Nov 2012 - 3:11 pm | मोदक
अन्याशी सहमत. ;-)
9 Nov 2012 - 8:05 am | लीलाधर
नैवेद्य दाखवला गेला आहे. ओम प्राणाय स्वाहा:! चालूंदे पूढे त्रुप्ती झाली बुवा माझी तरी ;) :)
9 Nov 2012 - 8:12 am | सोत्रि
मस्त हो गुर्जी!
हे गुर्हाळ प्रत्यक्ष अनंत वेळा पाहिल्याच्या आठवणी जाग्या झाल्या.
आताशी माझ्या गावाकडे सगळ्या दादा आणि नानांनी साखर कारखाने जिल्होजिल्ही चालू केल्यामुळे ह्या गुर्हाळांचे प्रमाण कमी झाले आहे. नाहीतर मामाच्या शेतात ५-७ वर्षांपूर्वी दरवर्षी हे गुर्हाळ असायचेच
-(गुळासारखा गोड) सोकाजी
9 Nov 2012 - 8:14 am | अन्या दातार
झ्याकच हो बुवा.
मळी बाजूला करण्यासाठी हायड्राक्स पावडर टाकतात.अन काकवी न्हाय का मिलाली??
9 Nov 2012 - 10:36 am | गवि
काकवी लहानपणी खाल्ल्या / प्यायल्याचं आठवत आहे. तिचा रंग त्यातल्यात्यात दारुशी जुळणारा असल्याने (जरा जास्तच काळपट खरा..) हिंदी सिनेमातल्या मद्यपि रोलमधल्या अमिताभ आदिंची नक्कल करण्यासाठी काचेच्या लहान ग्लासात अर्धी काकवी भरुन अॅक्टिंग करायचो आम्ही पोरं.
बादवे.. काकवी म्हणजे नेमकं काय? पातळ गूळ का?
9 Nov 2012 - 6:36 pm | प्रसाद प्रसाद
काकवी म्हणजे गूळ तयार होण्याआधीच्या स्टेजला असलेला काहीलीत तयार झालेला रसाचा पाक. वर्षभर टिकतो. बाटलीत भरून ठेवला की थोड्या दिवसानंतर चांगल्या काकवीची, बाटलीच्या तळाशी साखर (तत्सम दिसणारा घट्ट झालेला पाक) जमते. कावीळ झाल्यावर लवकर बरी व्हावी म्हणून जेवणातून (फुलका/चपातीबरोबर) काकवी खावी असं इकडच्या भागात समज आहे. (खरे खोटे माहित नाही).
मजा सांगायची म्हणजे काहिल जेंव्हा उतरवतात गूळ ओतण्यासाठी तेंव्हा काहीलीचा तळ बिलकुल गरम नसतो, मी स्वत: हात लावून पाहिला आहे (घाबरत घाबरत), कसे ते, शास्त्रीय कारण वगैरे माहित नाही. (माझ्या मावशीकडे गुऱ्हाळ असायचे ५-७ वर्षापूर्वी, आता डायरेक्ट कारखान्याला ऊस घालतात).
वरच्या फोटोतल्या गुळाच्या ढेपेचा रंग अंमळ गडद दिसतोय. मी पाहिलेला गूळ असा दिसतो –
9 Nov 2012 - 8:33 am | ५० फक्त
लैच भारी ओ बुवा, घरात पुरण शिजताना सगळ्या घरभर धुमाकुळ घालणारा वास तो, अजुन पर्यंत मेंदुत आहे. लईच बेक्कार आणि तिथं खाल्लेल्या गुळाची चव आणि तो वास याचा अनुभव इथल्या लोकांना आपण वाटु शकत नाही याचं लई बेक्कार वाईट वाटतंय.
पण तुम्ही लिहिलंय लई भारी, बाकी ते पट्ट्यच्या आवाजाबद्दल लिहिलंय ते धागा शंभरी करण्याबद्दल का ?
9 Nov 2012 - 9:04 am | श्री गावसेना प्रमुख
काय भाव दिला राव्?
9 Nov 2012 - 9:05 am | स्पा
लैच जबराट हो बुवा...
बेक्कार पाणी सुटलंय तोंडाला .
कोल्हापूर वारीत एकदा अशीच एका गुर्हाळाला भेट दिलेली , त्या आठवणी जाग्या झाल्या
गरम गरम ताजा गूळ खायची मजाच काही और
9 Nov 2012 - 9:39 am | प्रचेतस
काय तो गूळ बनत असताना पसरलेला खरपूस गोडसर वास!! एरवी धूर नकोस वाटतो. पण त्या गुळाच्या धुरात तसंच थांबून राहावसं वाटत होतं.
बाकी त्या रस उकळणार्या कढईला काहील असा खास अस्सल मर्हाठी शब्द आहे.
हे अजून काही फोटो
गुळाची उकळती काहील
ढेपेचा लागलाय ढीग
9 Nov 2012 - 10:04 am | मी_आहे_ना
अ.आ., धागा मस्तच, त्यात ह्य वल्लींच्या पुरवणी फोटोनी अजून मजा आणली. लहानपणी बघितलेले गुर्हाळ, त्या आठवणी आणि चवही जागी केलीत, अनेक धन्यवाद.
9 Nov 2012 - 9:43 am | किसन शिंदे
झक्कास!!
गुर्हाळाची कथा अगदी बुवांच्या अवखळ स्टायलीत लिहली गेलीय.
ते काड्या सारण्याचं वाचून हसू आलं.
9 Nov 2012 - 9:46 am | ज्ञानराम
काय चव असेल ना गुळाची...! फटू बघूनच तोंपासू... मस्तच..
9 Nov 2012 - 9:47 am | जेनी...
काकवी .
गुर्जि मस्त माहिती .
लहान होती तेव्हा गावी एकदा काकवी सोबत बाजरीची भाकरी
खाल्ल्याचं आठवतय . एकदाच खाल्लीय .
9 Nov 2012 - 9:50 am | गवि
एखाद्या (आपल्या रुटीनमधल्या किंवा अनवट) ठिकाणी गेल्यावर त्यातलं नेमकं काय इतरांसोबत शेअर करावं याविषयीच्या अपेक्षा पूर्ण करणारा आणखी एक उत्तम माहितीपर लेख. (मिसळ बनवण्याचा प्रक्रियेचे फोटोफीचर आणि तशाच अन्य लेखांप्रमाणे हाही जमून आलाय.)
9 Nov 2012 - 10:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे वा. चित्रलेखन आवडलं.
-दिलीप बिरुटे
9 Nov 2012 - 10:51 am | चौकटराजा
आयला... या बुवाला कशा आयडेच्या कल्पना सुसतात ? मागं, जुना बाजाराव आसाच धागा टाकला होता . आता गुळावानी ग्वाड प्वोरगी आन म्हनाव घ्ररला ! शाजीत केती दिस खानार ? आं ? ( पन ठेपेवानी बया नको )
आगाउ चौ रा चा अगांतुक सल्ला !
9 Nov 2012 - 11:23 am | अत्रुप्त आत्मा
@ आता गुळावानी ग्वाड प्वोरगी आन म्हनाव घ्ररला ! >>>
@शाजीत केती दिस खानार ? आं ? >>>
9 Nov 2012 - 10:57 pm | जेनी...
व्हय व्हय ... खरच गुर्जि आता गुळावाणी ग्वॉड बायकू .. आन काकवी वानी झ्याक पोरं
कसं ?? ;)
च्यामारी , फेमिली कंप्लिटच,करुन टाका ! ;)
=))
9 Nov 2012 - 11:07 pm | प्रचेतस
अगागागागागागा =)) =))
9 Nov 2012 - 11:25 pm | अत्रुप्त आत्मा
@आन काकवी वानी झ्याक पोरं
कसं ?? smiley>>> =)) म्येलो.....म्येलो....
10 Nov 2012 - 8:18 am | अन्या दातार
मरु नका, जगू द्या. कसे??
12 Nov 2012 - 1:06 pm | ५० फक्त
ते वर काकवी वानी झ्याक पोरं म्हणल्यावर पुढं १०१ चा आकडा काय नाचतोय,काय अर्थ धरायचा त्याचा ?
12 Nov 2012 - 5:43 pm | अत्रुप्त आत्मा
@पुढं १०१ चा आकडा काय नाचतोय,काय अर्थ धरायचा त्याचा?> धरायला गेलं तर बरेच अर्थ निघतात तसे.
तरी तुंम्हाला (माहित असलेला) अर्थ हा(च) आहे... हवा असलेला काय आहे??? आंम्हाला काय माहित????? :-p
12 Nov 2012 - 3:32 pm | बॅटमॅन
अगायायायायाया पार इस्कोटच करून टाकलायसा !!!!!!!!!
9 Nov 2012 - 11:04 am | निश
फोटो व गुळ बनवण्याची प्रक्रिया समजावण म्हंजे एकदम झ्याक बघा.
तुमच्यातल्या एका गुणी साहित्यिकाला माझा सलाम.
9 Nov 2012 - 11:34 am | बॅटमॅन
लै भारी, कोल्लापुरजवळ येक गुर्हाळ पाह्यलतं त्ये आटवलं :) बाकी गुळाच्या ढेपीला भेली असे म्हणतात हे प्रथमच कळाले.
9 Nov 2012 - 1:18 pm | पियुशा
आक्शी भारी काम केलत गुर्जी तुमी
आमी अजुन उभ्या जन्मात ह्ये गुर्हाळ पाह्यल नवत तुमच्यामुळ चान्स गावला बघा ;)
एक लंबर :)
9 Nov 2012 - 1:36 pm | सुहास झेले
व्वा व्वा..... धम्माल एकदम.
9 Nov 2012 - 1:36 pm | गणपा
आत्मागुर्जींचे तेज तर्रार रिपोर्टींग आवडले.
आजवर गुर्हाळ न पाहिलेल्या आम्हा गाढवांना त्याची चव दाखवल्या बद्दल मंडळ आभारी हाये.
9 Nov 2012 - 7:30 pm | मेघवेडा
खंप्लीट शमती.
बाकी या गूळ तयार करण्याच्या काहिलीवरूनच ’जीवाची काहिली होणे’ वाक्प्रचार रूजू झाला असावा काय या विचारात आहे.
9 Nov 2012 - 7:57 pm | मी-सौरभ
बुवा: परत जवा जाल तवा आमाला बी न्या बरं का :)
9 Nov 2012 - 11:12 pm | जेनी...
सरसकट सगळेच का बरं ?? :-/
11 Nov 2012 - 1:13 pm | अत्रुप्त आत्मा
:-)
9 Nov 2012 - 11:10 pm | पैसा
काड्यांसकट रिपोर्ट आवडला. इतरांचे फोटो आणि प्रसाद प्रसाद यानी दिलेली माहिती आवडली.
10 Nov 2012 - 10:37 am | सांजसंध्या
पराग अतिशय सुंदर झालंय भटकंतीचं गु-हाळ !
सचित्र वृत्तांत आणि त्यावरच्या मार्मिक टिप्पण्या, प्रत्येक प्रक्रिया एखाद्या शिक्षकासारखी समजावून सांगणे हे मिसळीच्या लेखाचे वैशिष्ट्य इथेही दिसतेय. मिसळ असो कि गूळ , तुझा कॅमेरा आणि लेखणी रसग्रहणात तरबेज आहेत ;)
10 Nov 2012 - 11:00 am | स्पा
सांज सध्या यांचेशी सहमत
("पराग" च्या मार्मिक लेखणीचा फ्याण ) स्पा
10 Nov 2012 - 11:55 am | अत्रुप्त आत्मा
@ तुझा कॅमेरा आणि लेखणी रसग्रहणात तरबेज आहेत smiley>>> धन्यवाद...हो मॅडम......! :-)
10 Nov 2012 - 10:58 am | मदनबाण
गुर्हाळ वर्णन आवडले. :)
10 Nov 2012 - 12:00 pm | सुधीर
माहिती श्टाईल आडिवली.
12 Nov 2012 - 12:46 pm | लाल टोपी
काकवी बरोबरच शेंगादणे टाकून चिक्की सारखी साय मिळायची .. लहानपणी खाल्लेल्या सायीची चव अजून आठवणीत आहे.
30 Mar 2015 - 12:21 pm | प्रचेतस
कालच अन्या दातार आणि प्रगोबरोबर भुलेश्वरला जाणे झाले.
तिकडील धडधडणारी गुर्हाळं. गुळाचा मस्तपैकी दरवळणारा गोडसर वास पाहून ह्या धाग्याची आठवण झाली.
30 Mar 2015 - 12:41 pm | अत्रुप्त आत्मा
>>> अस्सं!
30 Mar 2015 - 1:19 pm | प्रसाद गोडबोले
गुळ पाडण्याच्या सांप्रदायिक पध्दतीचे उगम स्थाण पाहुन अंमळ भारावुन गेलो होतो ...
30 Mar 2015 - 1:33 pm | अन्या दातार
गुळ पाडण्यात हातखंडा असणारे (गुळवे) काहीजण तिथे पहायला मिळाले तर काहींची आठवण आली. :)
30 Mar 2015 - 1:35 pm | प्रसाद गोडबोले
आणि हो ...
त्यांन्नी गुळ / काकवी फुकट दिली नाही हो ... दुत्त दुत्त कुठले :-\ =))
30 Mar 2015 - 1:56 pm | अत्रुप्त आत्मा
@गुळ पाडण्यात हातखंडा असणारे (गुळवे) काहीजण तिथे पहायला मिळाले तर काहींची आठवण आली. :)>>> अरे वा! फारच सूक्ष्म निरिक्षण शक्ति आहे की टुम्हाला.
@त्यांन्नी गुळ / काकवी फुकट दिली नाही हो ... दुत्त दुत्त कुठले :-\ =)) >> पांडु मोड ऑन - ऑ...अच जालं तल! - पांडु मोड ऑफ!
30 Mar 2015 - 2:02 pm | अन्या दातार
>>फारच सूक्ष्म निरिक्षण शक्ति आहे की टुम्हाला
धन्यवाद.
बादवे - टुम्हाला हा शब्द काळजास भिडला.
30 Mar 2015 - 2:29 pm | कहर
गुळावरल्या सायीपरास जगात काय बी ग्वाड न्हाय म्हंत्यात… चाखली का न्हाई साय ?