मंडळी आपल्यापैकी बर्याच जणांना सिनेमे पहायला आवडतात. काहींना लगेच त्यावर परीक्षण(लेख) लिहायला त्याहून जास्त आवडते. कोणताही सिनेमा पहायच्या आधी त्या सिनेमा बद्दल थोडे भले-बुरे वाचायला मिळाले तर मला बरे वाटते. मुख्य म्हणजे हा सिनेमा बघायचा की नाही हा मुख्य हेतू.
पण बरेचदा परीक्षणाचे धागे व त्यातल्या चर्चा पाहून, मतभिन्नता पाहून गोंधळायला होते खरे. म्हणून वाटलं परीक्षणांच्या धाग्यांचाच काथ्या कुटावा. इतर लोकांना परीक्षण चर्चा वाचून काय आकलन होते हे तरी बघूया. मला लक्षात आलेले काही मुद्दे खाली. तुम्हा लोकांना काय वाटते ते देखील येउ द्या.
१) बरेचसे सदस्य अक्षरश: आलेला प्रत्येक सिनेमा बघतात. मग तो अत्यंत दगड असो की प्रचंड यशस्वी माईलस्टोन असो. मग परीक्षणांचा नेमका उपयोग काय?
२) तुम्ही जितके जास्त सिनेमे बघीतले असतील तितके तुम्ही जास्त प्रगल्भ आहात असा दावा करता येतो त्याकरता हे संख्याबळ असणे गरजेचे. जर काही सिनेमे बघीतले नाही तर मोठा गहजब होईल, आपली पत कमी होईल असे भय असावे. घ्या लोकशाहीत, पुन्हा एकदा हे संख्याबळ, प्रथा परंपरा चालवणे अनिवार्य.
३) बॉलीवूड, हॉलीवूड कोणताही असो, तो सिनेमा आवडणारे व नावडणारे दोन्ही बाजुचे बरेच सदस्य असतात. फक्त बिचार्या मराठी सिनेमाच्या बाबतच मात्र सिनेमा न आवडलेल्यांची मेजॉरीटी असते. :-)
४) सिनेमा आवड-निवड, मतप्रदर्शन यात बरेचदा हा फरक दर्शकांच्या अनुभवात, योग्य माहितीपूर्ण उदाहरणात दिसण्याऐवजी, फक्त वयात आणी सरसकटीकरणात दिसतो.
५) आवडता सिनेमा यावर लिहायला तुलनेत कमी लोक पुढे येतात पण सिनेमा नावडला हे सांगायला लोक जास्त हिरीरीने येतात.
६) 'मला अमुक सिनेमा आवडला नाही' हे वाक्य पुरेसे नसते. संदर्भासहीत स्पष्टीकरण द्या प्रमाणे तो सिनेमाच अमुक अमुक तत्वांना, मुल्यांना हरताळ फासणारा असल्याने, ती विचारसरणीच कशी वाईटच आहे हे सिद्ध करता येणे गरजेचे. प्रत्येक माणसाच्या, समाजाच्या कालानुरुप, अनुभवानुरुप, तत्वे, सवयी, आवडीनिवडी बदलू शकतात हे पुरेसे नसते.
७) २०-२० क्रिकेट मधे बॅटींग करताना उत्तम फूटवर्क, शॉट सिलेक्शन जजमेंटपेक्षा, हँड आय कोऑर्डीनेशन बरे असणे महत्वाचे समजले जाते. त्याप्रमाणे कोणत्याही सिनेमाला फोडताना चित्रपटसृष्टी, फिल्म मेकिंग प्रक्रीया, त्यातले महत्वाचे घटक, उदाहरणे, समीक्षेचे शास्त्र माहीत असलेच पाहीजे असे नाही. तुमचे हक्काचे पैसे, वीज, डाउनलोडचा वेळ, खराब प्रींट बघतानाचा डोळ्यावरचा ताण याचा हिशोब चुकता करता येणे महत्वाचे. थोडा संयम दाखवला की कोणतरी एकजण टोरंट, ऑनलाईन लिंक मागतो व लगेच कोणतरी एक देतोच, मग आपण गुन्हा करायला मोकळे. 'चोर तो चोर वर शिरजोर' म्हणीचा उत्तम प्रत्यय सिनेमा परीक्षण चर्चा वाचताना येतो.
८) समोर टिव्हीवर, संगणकावर दिसतेय ते बघणे इतकेच काय ते सत्य असताना, आपली प्रगल्भता, व्यासंग, चोखंदळपणा यांना चार चौघात पॉलीश करणे हे आद्य कर्तव्य असल्याचे दाखवून देणे महत्वाचे. (हेच रोज ताटात पडेल ते गिळणे असताना खाद्यसंस्कृतीची तुतारी वाजवणे, लायब्ररीतून, मित्रांकडून, उधार पुस्तके मिळतील ती वाचणे असताना समीक्षेचा पुलित्झर मिळाल्याच्या थाटात लिहणे बाबत म्हणता येईल.)
एकंदर तुमच्या वाचनात येणार्या परीक्षणांबद्दल तुम्हाला काय वाटते? तुम्हाला परीक्षणातून काय हवे असते?
प्रतिक्रिया
23 Oct 2012 - 4:15 pm | सस्नेह
+१००
चित्रपट नको पण परीक्षणे आवरा...
23 Oct 2012 - 4:39 pm | इरसाल
हा मुद्दा राहीला असे वाटते.
१०. काहीजण तर अक्षरशः संकेतस्थळांवर पैला लंबर लागावा "परीक्षण टाकण्यात" म्हणुन पण शुक्रवारीच पिच्चर बघतात.
बर्याच जणांनी तो धंदा सध्या बंद केल्याचे जाणवत आहे हे विषेश नमुद करावे लागेल.
23 Oct 2012 - 4:52 pm | मदनबाण
काही जण आपण पाहिलेला पिक्चरच कसा ग्रेट आहे,यावर भर देण्यात पटाईत असतात ! ;)
असो,जास्त टंकन कष्ट घेत नाही... उगाच काही जणांना पोळशूळ व्हायचा ! ;)
मराठी सिनेमाच्या बाबतच मात्र सिनेमा न आवडलेल्यांची मेजॉरीटी असते.
हे खरं माय मराठी वरचं प्रेम ! ;)
बाकी मराठी चित्रपट बनवणारे चित्रपटाचे शिर्षक इतक रद्दड का निवडतात ते अजुन मला कळालेले नाही ! हळद ,कुंकु टिकली साडी धोतर हिचा भाउ तिचा भाऊ बहिणीची माया ,ताईचे प्रेम,बंड्या आणि अश्या छापाची नावे वाचुन वीट येतो,तर चित्रपट पहाण्याचे धारीष्ट्य कोण करणार ? ;)
जाता-जाता :--- सहजराव हा "अय्या" इफेक्ट तर नाही ना ? ;)
23 Oct 2012 - 4:58 pm | कपिलमुनी
फारएन्ड आणि परा यांची परीक्षणे आवडतात
23 Oct 2012 - 5:21 pm | प्रकाश घाटपांडे
ओह! तसे आम्ही चित्रपट उदासीन! पण ओह माय गॉड च्या परिक्षणामुळे तो चित्रपट पाहिला. आन आवडला.
23 Oct 2012 - 5:32 pm | तर्री
मिपा वरील चित्रपट लेखांना फार फार तर चित्रपट परिचय किंवा चित्रपट-ओळख म्हणता येईल.
परीक्षण तथा समीक्षा म्हणणे झेपत नाही.
एकूणच हल्ली चित्रपट हा एक करमणुकीचा सवंग प्रकार होतो आहे असे माझे मत होते आहे.
23 Oct 2012 - 7:26 pm | गणपा
सहमत.
पण याला काही अपवाद आहेत.
उदा: रमताराम यांचे जंगलवाटांवरचे कवडसे, तुकाराम, देवी, आउट्सोर्सड् इत्यादी.
सहजराव भापो. :)
24 Oct 2012 - 3:10 am | अरुण मनोहर
ह्या लेखाचे शिर्षक "परिक्षणांचे परिक्षण" असे वाचले.
24 Oct 2012 - 9:24 am | सांजसंध्या
परीक्षणाच्या पलिकडे जाऊयात. इंटरनेट हे माध्यम हाताशी आल्याने प्रत्येकाल व्यक्त व्हावेसे वाटू लागलेले आहे. मग यात ज्याला जे काही येतं ते तो लिहीतो. कविता, लेख, कथा, कादंब-या या जोडीने आता परीक्षणं. काहींना हे छान जमतं. पण काहींच्या बाबतीत मात्र आपलं लिखाण आणि त्यावर येणा-या प्रतिक्रिया हा विरंगुळा न राहता त्याचं छंदात रुपांतर होतं. त्यातूनच रोजच एखादी कविता, कथा लिहीली जाऊ लागते. चित्रपटविषयक लिखाण तुलनेने सोपे असल्याचे लक्षात आल्यावर काही जण तिकडे वळतात. पण फारएण्ड सारख्यांची प्रतिभा असेल तर ही परीक्षणं परीक्षणं न राहता खुमासदार लेख बनतात. असे लेखक रोजच लिखाण करताना दिसत नाहीत. याउलट, काही जण लेख लिहीण्यासाठीच सिनेमाला जात असावेत असं वाटू लागतं. सिनेमा एन्जॉय करण्याऐवजी माझा लेख सर्वात आधी कसा येईल असाही खटाटोप पहायला मिळतो.
एखादा आवडलेला सिनेमा आणि त्यातून उस्फूर्तपणे झालेलं लिखाण आणि स्वयंघोषित चित्रपट समीक्षक यांच्या लिखाणातला फरक वाचकांना समजतोच. गरज आहे ती संबंधितांनी समजून घेण्याची !
24 Oct 2012 - 12:06 pm | रमताराम
सहजराव बरेच दिवसांनी पुन्हा एकवार विचार करायला लावणारे काही प्रश्न घेऊन आलेत.
बहुतेक मुद्दे अचूक आहेत.
फक्त बिचार्या मराठी सिनेमाच्या बाबतच मात्र सिनेमा न आवडलेल्यांची मेजॉरीटी असते.
कुणाला आवडो न आवडो यात 'मराठी माणसाच्या मनात आपल्याच भाषेबद्दल असणारा न्यूनगंड हाच मोठा भाग आहे' असे माझे मत आहे. कितीही नाकारा, चार लोकात बोलताना - विशेष करून अमराठी लोकांशी - तुम्ही किती आवर्जून एखाद्या मराठी चित्रपटाबद्दल सांगू पाहता याचा विचार करा, त्याचे कारण स्वतःशी तपासा, तुमचे तुम्हाला उत्तर मिळेल. कितीही नाकारा, कितीही मराठीप्रेमाचे अवडंबर माजवा, मनातून आपण मराठी चित्रपट पाहतो हे सांगायला बहुतेकांना लाज वाटते हीच वस्तुस्थिती आहे. रच्याकने मराठी संगीत नाटक कुणी कुणी प्रत्यक्ष पाहिले आहे? नसेल तर ते एकदा तरी पहायला काय हरकत आहे? या माझ्या प्रश्नाचे उत्तर स्वतःच स्वतःला देऊन पहा. गेलाबाजार मराठी गद्य नाटके आपण किती पाहतो? मराठी रंगभूमी भारतातील -कदाचित सर्वाधिक- प्रगल्भ रंगभूमी मानली जाते हे किती जणांना ठाऊक आहे? आवडलेल्या हिंदी चित्रपटाची आवर्तने करताना या आपल्या अधिक प्रगल्भ माध्यमाला निदान संधी द्यावी असे आपल्याला का वाटंत नाही? किंवा एकुणच चित्रपटाकडून आपली जी अपेक्षा आहे ती क्षणभंगुर करमणुकीची नि अफाट पसरलेली हिंदी चित्रपटसृष्टी ती भागवते आहे. त्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीकडे वळण्याची आपल्याला आवश्यकताच वाटत नाही.
मुळात सार्या दोन चार स्क्रिप्टवर वर्षानुवर्षे हजारो चित्रपट काढणार्या हिंदी चित्रपटांपेक्षा मराठी चित्रपट अधिक चांगले असतात असा माझा समज आहे. नुसती माणसे, प्रसंगांचा क्रम, घटनेची स्थाने इतके बदलून त्याच त्याच स्टोरीज आपल्या माथी मारणारे हिंदी चित्रपटसृष्टीचे अध्वर्यू चक्क कल्पनाशून्य, बुद्धीहीन आणि धंदेवाईक आहेत असे माझे मत आहे. त्यावर पैसे घालणे हा अपव्यय आहे. याउलट अगदी 'श्वास' पासून सुरू झालेला अर्वाचीन मराठी चित्रपटाचा प्रवास आज वेगवेगळ्या कथा, पैलू, दृष्टिकोन घेऊन आपल्यासमोर येतो. हां आता मुळात लोकसंख्येची मर्यादा, त्यामुळे असणारा भांडवलाचा तुटवडा यामुळे तांत्रिकदृष्ट्या मराठी चित्रपट उणा दिसला तरी विषय-निवड, सादरी करण, प्रयोगशीलता याबाबत तो हिंदी चित्रपटांपेक्षा कितीतरी दर्जेदार म्हणावा लागेल. पण आलेला प्रत्येक हिंदी चित्रपट पहायचा नि त्यावर बोलायचे हे खळ्यात बांधलेल्या बैलांसारखे वर्तन 'लाईफस्टाईल' म्ह्णून ज्यांना स्वीकारायचे त्यांनी स्वीकारावे, आमच्या दृष्टीने ते अनुकरणीय नाहीच.
मुळात मला चित्रपटावर का लिहावेसे वाटते हा उत्तर अपेक्षित असलेला प्रश्न आहे माझ्या दृष्टीने. जर लिहिण्यासारखे, इतरांना काही सांगण्याजोगे सापडले तरच मी लिहितो, उगाच 'मोले घातले लिहाया' असे नसतेच.
शिवाय मुळात चित्रपटाकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन (कदाचित एकाहुन अधिक दृष्टिकोनांपैकी एक) मला सापडला आहे असे वाटले तरच लिहिण्यात अर्थ असतो. नाहीतर मग वडाची साल पिंपळाला लावून विजोड पणाचा आरोपही मीच करायचा असे काहीसे होईल. उदाहरणच द्यायचे तर 'तुकाराम' जुना नि नवा यांच्या कालखंडात, दृष्टिकोनात, मांडणीच्या हेतू यामधे मुळातूनच फरक आहे. त्यामुळे त्या दोन चित्रपटांची तुलना करत मी नव्या चित्रपटाबद्दल अपेक्षा बांधू लागलो नि त्यावर त्याचे मोजमाप करू लागलो तर फसणार हे ओघाने आलेच. 'काकस्पर्श' हा विशिष्ट समाजाशी निगडित - तोही विशिष्ट कालखंडातील संबंधित असलेल्या - एका विषयाची मांडणी करतो आहे हे ध्यानात घेऊन त्याच्याकडे पहायला हवे. याचे मूल्यमापन करताना मी एखाद्या गुन्हेगारी हिंदी चित्रपटाकडे पाहण्याच्याच दृष्टीने पाहिले तर मीच फसतो आहे. हे दोन चित्रपट वेगवेगळ्या प्रकारे पाहिले गेले पाहिजेत. राशोमोन सारखा चित्रपट तर सरळ एक वेगळा दृष्टिकोन, एक तत्त्वज्ञान घेऊनच समोर येतो आहे. तिथे माणसे महत्त्वाची नाहीतच, विचार महत्त्वाचा आहे. तो दिग्दर्शकाला अपेक्षित प्रकारे प्रेक्षकांपर्यंत ('दर्शक' नाही हां सहजराव. :) )पोचला आहे की नाही हा प्राधान्याचा प्रश्न असतो, सामुराईची तलवार योग्य मापाची आहे का किंवा लाकूडतोड्याच्या कपड्यांचा तपशील बरोबर आहे का, त्यात गाणी का नाहीत हे प्रश्न घेऊन काथ्याकूट करणार्याचा चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टीकोनच चुकला - खरंतर वेगळा - आहे असे म्हणावे लागेल. मग जे समोर येते तो केवळ तुमच्या नि दिग्दर्शकाच्या दृष्टीकोनातला फरक असतो. आता असे पहायचे झाले तर प्रेक्षकांपैकी अनेकांचा स्वत:चा दृष्टीकोन असेल नि तपशीला ते सारेच एकमेकांहुन वेगळे असतील. या सार्यांचेच समाधान त्या बापड्या लेखक-दिग्दर्शकाने कसे करायचे?
आता आवडलेला नावडलेला प्रत्येक चित्रपटच त्याबाबत लिहावे इतके काही देणारा असतोच असेही नाही. 'फिराक़' सारखा हिंदी चित्रपट अतिशय आवडून गेला पण त्याबाबत आवर्जून लिहावे, नोंदवावे असे काही सापडले नाही. याउलट 'राजनीती' नावाचा अतिसामान्य चित्रपट पण त्या कथेचे महाभारत कथेशी असलेले साम्य सापडल्याने त्याबाबत छोटा का होईना लेख लिहावासा वाटला.
मी जे लिहितो त्याला परीक्षण, समीक्षा, परिचय असे नेमके नाव मी तरी देत नाही. वेगवेगळ्या चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असल्याने त्या त्या चित्रपटाबाबत जी भूमिका मी घेईन तसे लिखाण मी करतो.
तसा मी थोडा आवडलेल्या चित्रपटांचा पक्षपाती आहे. न आवडलेल्या चित्रपटाबद्दल लिहिण्यात वेळ दवडत नाही मी.