साहित्यः
मटण १/२ किलो
डालडा तुप २ डाव
कांदे ४ नग
टोमॅटो ४ नग
मीठ चवीनुसार
आलं ४ इंच
काळीमिरी ७ ते ८
शाहिजीरं १ लहान चमचा (टी स्पून)
हळद १ लहान चमचा
काश्मिरी मिरची पावडर ३ मोठे चमचे (टे. स्पून)
गरम मसाला १ लहान चमचा
फेटलेले दही १ वाटी
कसूरी मेथी पावडर १ लहान चमचा
कोथिंबीर मुठभर.
तयारी:
कांदे लांब आकारात चिरून घ्या.
टोमॅटो लांब आकारात चिरुन घ्या.
कोथिंबीर बारीक चिरुन घ्या.
आलं काड्यापेटीच्या काडी प्रमाणे चिरुन घ्या.
वरील पैकी अर्धे कांदे (२ नग) सोनेरी रंगावर तळून त्याची थोडेपाणी घालून मिक्सरवर वाटून पेस्ट करून घ्या.
कृती:
एका मोठ्या कढईत मटण, लांब आकारात चिरलेले कांदे, लांब आकारात चिरलेले टोमॅटो, थोडं सजावटीसाठी ठेवून बाकीचं चिरलेलं आलं, आणि १ वाटी पाणी घालून मध्यम आंचेवर, कढईवर झाकण ठेवून शिजावयास ठेवा.
मधे मधे हलवून पाण्याचे प्रमाण तपासत राहा. साधारणपणे अर्धातास ते चाळीस मिनिटांत मटण मऊ शिजेल. आता त्यात मीठ घाला.
एखाद्या चिमट्याने (पापडाचा) किंवा काट्याने मटणाचे तुकडे एखाद्या पातेल्यात काढून बाकी कांदा-टोमॅटोचा चोथा गाळून ते गाळलेले पाणी घ्या. चोथा चांगला दाबून सर्व पाणी/रस काढून घ्या. चोथा फेकून द्या.
कढई धूवून पुन्हा गॅसवर ठेवा. त्यात २ डाव तुप घालून तुप तापले की त्यात काळीमिरी आणि शाहिजीरे घाला. ते तडतडले की, गॅस बारीक करून, त्यात काश्मिरी तिखट, हळद घालून परता.
आता तळलेल्या कांद्याची पेस्ट, फेटलेले दही घालून परता. मसाल्याला तुप सुटायला लागले की मटण आणि मटणाचे पाणी त्यात घाला. आता गॅस मोठा करुन परतत राहा. सजावटीसाठी थोडी कोथिंबीर बाजूला ठेवून बाकी सर्व मटणात घाला. पाणी आटून रस्सा दाट झाला, तुपाचा तवंग वर आला की गरममसाला आणि कसूरी मेथी पावडर घालून मिसळा आणि गॅस बंद करा.
एका बाऊलमध्ये मटन काढून त्यावर कोथिंबीर आणि आल्याच्या काड्या घालून सजवा. कडाई गोश्त तयार आहे. पोळी, परोठा, तंदूर रोटी, नान किंवा वाफाळणार्या भाता बरोबर आस्वाद घ्या.
शुभेच्छा....!
प्रतिक्रिया
26 Aug 2012 - 4:52 am | रेवती
इतका देखणा पदार्थ केला आहे की शाकाहार्यांच्या मनात चलबिचल व्हावी.
मस्तच फोटो!
26 Aug 2012 - 10:38 am | प्रभाकर पेठकर
शाकाहारींनी सालासकट बटाटे, पनीर, नीर फणस किंवा सुरण वापरावा.
आणि कांदा+ टोमॅटो+आलं+मीठ वाटीभर पाण्यात शिजवून आणि 'कांदा-टोमॅटोचा चोथा गाळून ते गाळलेले पाणी घ्या. चोथा चांगला दाबून सर्व पाणी/रस काढून घ्या. चोथा फेकून द्या.' इथून पुढची पाककृती वापरावी.
अंडी खात असाल तर उकडलेली अंडी वापरून ह्या प्रमाणेच बनवावित.
26 Aug 2012 - 7:24 am | नगरीनिरंजन
समयोचित आणि सणसणीत पाककृती. हीच करून आजचा रविवार सद्कारणी लावावा म्हणतोय!
26 Aug 2012 - 8:27 am | सहज
तृप्त!
26 Aug 2012 - 8:36 am | शिल्पा ब
नक्की करुन बघणार. मटण म्हणजे लँब ना?
26 Aug 2012 - 7:27 pm | विश्वनाथ मेहेंदळे
बकरा / बकरी . शुद्ध अमेरिकन मराठीत गोट.
26 Aug 2012 - 9:08 am | पैसा
पण डालड्याऐवजी तूप वापरलं तर?
26 Aug 2012 - 9:09 am | शिल्पा ब
जास्त चांगलं असं आमचं प्रायव्हेट मत .
26 Aug 2012 - 10:26 am | प्रभाकर पेठकर
पण डालड्याऐवजी तूप वापरलं तर?
चवीला चांगलंच लागेल. पण तुपाची मात्रा कमी (अर्धी?)करावी.
दोन कारणे आहेत, एवढे साजूक तुप पचायला कठीण वाटते आणि तुपाची चव मटणाच्या चवीवर आक्रमण करेल.
26 Aug 2012 - 11:08 am | चिंतामणी
पण "साजूक तुप पचायला कठीण वाटते आणि तुपाची चव मटणाच्या चवीवर आक्रमण करेल" या गोष्टिंशी असहमत.
डालडापे़क्षा साजूक तूप कधीही उत्तम. मी स्वत: साजूक तूपात बनवलेले मटन खाल्ले आहे. सुरेख चव लागते. आणि ती वेगळी लागते हे नक्की. त्यात जहालपणा कमी होता.
डालडामुळे पदार्थाला एक वेगळा फ्लेवर येतो इतकेच. पण माझ्या माहितीप्रमाणे ते पचायला जास्त कठीण वाटते.
26 Aug 2012 - 12:48 pm | यशोधरा
मीही तुपात बनवणे अधिक पसंत करेन.
26 Aug 2012 - 1:09 pm | सानिकास्वप्निल
कडाई गोश्त भन्नाट दिसत आहे :)
मस्तचं पेठकर काका :)
मला पण साजूक तूपाचा वापर डालड्यापेक्षा जास्त रास्त वाटतो :)
26 Aug 2012 - 9:55 am | चिंतामणी
तो बघून खल्लास झालो आहे.
भन्नाट.
26 Aug 2012 - 10:07 am | अप्पा जोगळेकर
तोंडाला पाणी सुटले आहे. अत्यंत हँडसम पदार्थ वाटतोय.
26 Aug 2012 - 10:28 am | नंदन
मस्त. सुशेगाद, साग्रसंगीत जेवणाची रविवार दुपार आठवली.
26 Aug 2012 - 11:12 am | विनायक प्रभू
मस्त.
असो.
प्र.पे. हे एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव ऑइल म्हणजे काय हो?
26 Aug 2012 - 12:25 pm | प्रभाकर पेठकर
उत्तर खरडले आहे.
26 Aug 2012 - 11:28 am | जाई.
झक्कास!!!
26 Aug 2012 - 12:47 pm | यशोधरा
किती देखणा आहे फोटो तो! पेठकरकाका, पुण्याला कधी येताय? :D
26 Aug 2012 - 12:59 pm | अभ्या..
वाचूनच आवडला.
बघून आवडला.
करून बघणार आज रात्री. एकाच वेळी दोन्ही (शाका+मांसा)व्हर्जन करणार आहे.
धन्यवाद पेठकर काका.
26 Aug 2012 - 1:09 pm | jaypal
कसुरी मेथी कधी टाकावी?
फोटो + पा. क्रु. एकदम झकास, दिलखुष रेसीपी.
नो वाटण नो झंझट एकदम फटाफट
26 Aug 2012 - 1:35 pm | प्रभाकर पेठकर
कसुरी मेथी कधी टाकावी?
हम्म्म! तेवढे लिहायचं राहून गेलं होतं. क्षमस्व.
आता बदल केला आहे.
एक नियम असा आहे की गरम मसाला पावडर आणि कसूरी मेथी पावडर , पदार्थ तयार झाला की उतरवायच्या २ मिनिटे आधी पदार्थात मिसळायचं. दोन्ही मसाल्यांना उच्च उष्णता जास्त वेळ मिळाली की त्यांची चव कमी होते.
26 Aug 2012 - 5:12 pm | पियुशा
चमचमीत , जिभेचे चोचले पुरवणारी पा.क्रु.
फोटो तर अगदी टेंम्प्टिंग आलाय :)
26 Aug 2012 - 6:57 pm | वेताळ
आवडले.खायला देखिल खुप आवडेल.
26 Aug 2012 - 8:00 pm | इरसाल
कलिजा खलास झाला.
जबरदस्त...जबदस्त.....जबरदस्त.
फक्त पर्सनली मला ते सजावटीसाठीचे टाकलेले आल्याचे काप मला नाय आवडत.
27 Aug 2012 - 10:03 am | कपिलमुनी
तोंपासु ..
फोटो अप्रतिम !!
एक शंका : अर्धातास ते चाळीस मिनिटांत मटण मऊ शिजेल ??
27 Aug 2012 - 11:02 am | प्रभाकर पेठकर
मध्यम आकाराच्या बकर्याचे, ताजे मटण शिजते.
मेंढीचे किंवा जून बकर्याचे शिजत नाही.
27 Aug 2012 - 12:49 pm | गणपा
एकदम साग्रसंगीत पाककृती.
नळ्या पाहुन जीव गेला आहे. :(
27 Aug 2012 - 12:54 pm | बॅटमॅन
ती पाहताच पाकृ, कलिजा खलास झाला :)
27 Aug 2012 - 7:25 pm | संदीप चित्रे
पदार्थाचा रंगच सांगतोय की चव बेस्ट असणार :)
29 Aug 2012 - 1:22 am | प्रभाकर पेठकर
रेवती, नगरीनिरंजन, सहज, विश्वनाथ मेहेंदळे, पैसा, चिंतामणी, यशोधरा, सानिकास्वप्निल, अप्पा जोगळेकर, नंदन, विनायक प्रभू, जाई., अभिजीत मी नाही, jaypal, पियुशा, वेताळ, इरसाल, कपिलमुनी, गणपा, बॅटमॅन,संदीप चित्रे तुम्हा सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
29 Aug 2012 - 12:59 pm | कॉमन मॅन
फारच छान..