प्रथमतः , "मिसळलेला काव्यपेमी" ह्यांचा (http://www.misalpav.com/node/22081) लेख वाचला.आज ते ज्या काळातून जात आहेत आणि त्यांना जी अडचण आली, जवळजवळ तशीच अडचण आम्हाला (मी आणि माझी बायको) आली होती.आम्ही त्यातून कसा मार्ग काढला आणि त्याचे काय फायदे झाले , ते अनूभव लिहीत आहे.
हा कूठलाही सल्ला नाही आहे किंवा शिफारश पण करत नाही आहे आणि सर्वात मह्त्वाचे म्हणजे शाळेने काय करावे किंवा पालक सभा घ्यावी का नाही, ह्याचा पण मी उहापोह करत नाही आहे.कुठल्याही , कंपू बरोबर भांडण करू नये.शेवटी, इतर लोक पळून जातात आणि आपण मात्र भरडले जातो.शाळा असो, की कूठलेही, आंदोलन..माझे मार्ग, हे शक्यतो, कूणालाही त्रास न देता ,मुद्दाम वाकड्यात न शिरता, आपले कसे भले होईल, असेच असतात.
२००० सालातील गोष्ट आहे.त्यावेळी मी, घरडा केमिकल्स, लोटे परशूराम इथे काम करत होतो.कं.च्या कॉलनीमध्ये आम्हाला घर दिले होते.मुलगा , ज्यु.के.जी.मध्ये होता.शाळा होती, इंग्रजी माध्यमाची (परशूराम, लोटे)..एक दिवस त्यांनी पालकांची सभा बोलावली. मार्च २०००.
सभेत त्यांनी सांगातले, की पूढील वर्षांपासुन , फी वाढ करणार आहेत.आज जी ६०रु. मासिक फी आहे, ती ३०० रु. होणार.
पगार जेमतेम ४००० त्यात हा खर्च, परत दूसर्या मूलाला पण त्याच शाळेत घालायचे. म्हणजे ६०० रु. गेले. अधिक इतर खर्च आहेतच. म्हणजे पगारातील, २५% रक्कम इथेच खर्च होणार. शिवाय शाळेतील इतर नियम पण जाचकच होते.डबा असाच हवा आणि तसाच हवा.
ही , एव्हढी , फी वाढ का? तर गेले ४/५ वर्ष शाळा तोटा सहन करत आहे आणि आता तो तोटा सहन करणे शाळेला शक्य होणार नाही म्हणून.मला काही ते लॉजीक पटले नाही.मला पगार कमी आहे, म्हणून मी काही , दरवडे घालणार नाही.उत्पनाचे दूसरे साधन शोधीन किंवा दूसरी चांगल्या पगाराची नौकरी शोधीन.
त्याच सुमारास, लोकसत्तेमध्ये, एक लेखमाला (वर्षभर) येत होती.शैक्षणिक माध्यम कूठले हवे? इंग्रजी की मराठी? बर्याच शैक्षणिक तज्ञांनी त्यात भाग घेतला.सर्वात शेवटी त्यात ह्या लेखमालेचा "गोषवारा" दिला की,
७वी पर्यंत मराठी आणि ८वी पासुन , सेमी इंग्रजी, हा सर्वोत्तम पर्याय आहे.
एप्रिल मध्ये, मुलाची (वय वर्षे ५) सायको टेस्ट करून घेतली.त्याचा कल, मराठी भाषेतून शिक्षणाकडे दिसून आला.माझे सगळे नातेवाइक , मराठी माध्यमातूनच शिकले आणि ते सगळेच मोठ्या मोठ्या पोस्ट वर आहेत.माझे एक काका , शिक्षक आहेत , त्यांच्याशी विचार-मिनिमय केला.त्यांनी पण सेमी-इंग्रजी उत्तम , हाच निर्णय दिला.
चला... एक ठरले की ७वी पर्यंत मूलाला मराठी शाळेत घालायचे आणि ८ वी ते १० वी सेमी इंग्रजी.
आता शाळा शोधणे आले. २/३ शाळा बघितल्या.चिपळूणची एक शाळा होती (नांव विसरलो, १०० वर्षे जूनी शाळा आहे, तिथे ही सगळी सोय होती, पण डोनेशन बरेच जास्त होते)मग ती रद्द केली आणि शाळा ठरली... पेढे-परशूराम.. मला स्वत:ला ही शाळा आवडली, मस्त कौलारू शाळा होती आणि शिक्षक एकदम टिपि़कल. मूलाला शाळेत घेवून गेलो.(हो आमच्याकडे , मुलेच शाळा निवडतात)त्याला पण ती शाळा आवडली.आपणच ही शाळा निवडली आणि बाबांनी पण , आपले एकले, ह्या गोष्टीचा त्यांच्या मनावर सकारात्मक परीणाम झाला.शेवटी, शाळेत त्यांनाच जायचे असते.
ते त्यांचे पहिले लग्नच असते म्हणा ना...आयुष्यातील बर्या-वाईट गोष्टींचा पाया "शाळाच" पक्का करते, ह्यावर माझा ठाम विश्वास आहे.
त्या शाळेचे मला खूप फायदे झाले..
१. शाळेत, खिचडी मिळायची, सरकार तर्फे (डब्याचा त्रास वाचला आणि मुलाला ती आवडायची, तो २/३ प्लेट्स खायचा)
डबा करायला लागत नाही म्हणून बायको खूष.बाहेरचे खायला मिळते, म्हणून मुलगा खूष आणि पैसे वाचतात ना, म्हणून अस्मादिक पण खूष.असा सगळा राजी-खूषीचा मामला सूरू झाल. तो अजूनही सूरू आहे.नंतर तेच पैसे मुलांच्याच पूढील शिक्षणाला कामी आले.
२. फी कमी (जेमतेम १०रु. मासिक फी होती.. ३००रु वार्षिक खर्च होता...)
३. शाळेतील शिक्षक आम्हाला मान देत होते.(माझी बायको, त्या शाळेत पालक-प्रतिनिधी म्हणून दर वर्षी होती..मूख्याधिपिका बाईंनी. तसा अलिखित नियमच केला होता म्हणाना, कारण घरडा कं.च्या स्टाफ मधून , फक्त माझीच मूले, त्या शाळेत जात होती.)
४. इंग्रजी मूळाक्षरे शिकायला , मुलाला ६ महिने लागले , आणि मराठी मूळाक्षरे शिकायला फक्त १ महिना (आम्ही केलेल्या सायको टेस्टचा फायदा).पूढील एका महिन्यात त्याने जोडाक्षरे शिकली आणि तो वर्गाच्या बरोबर आला.
५.मूलांनी शाळी भरपूर एंजॉय केली. अगदी भर परिक्षेच्या काळात, क्रिकेट खेळणे, कैर्या पाडायला जंगलात जाणे. (त्या कॉलनीच्या आसपास जरा बर्यापैकी जंगल आहे.) उन्हात भटकणे इ. कॉलनीतील इतर मूले अभ्यास करत असतांना , हे दोघेही उनाडक्या करत असत.माझ्या कडून फूल्ल परवानगी होती. काय वाट्टेल ते करा. हे दिवस परत येणार नाहीत.अभ्यासाचे दडपण घेण्यापेक्षा, गोडी लागलेली उत्तम.मात्रुभाषा, माध्यमातील मूले क्वचितच नापास होतात.
६. सगळे विषय मराठीत असल्याने, आम्हाला मूलांचा अभ्यास घ्यावा लागला नाही.आमचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचले.इतर क्लासेस न लावल्याने पैसे पण वाचले.आम्ही दोघांनीही (मी आणि माझी बायको) आमची वैयक्तीक उन्नती करून घेतली.तिने "जर्मन भाषेची" पाया भरणी केली. तर मी शेतीचे आवश्यक ज्ञान मिळवायचा प्रयत्न केला.मी कॅरम खेळणे, चिकटवह्या तयार करणे.मनसोक्त वाचन करणे इ. व्यसने केली.
७. योग्य ती वेळ येताच ,पेढे-परशूराम शाळेला , सेमी इंग्रजी चालू करावे यासाठी प्रयत्न केले. पालक सभा बोलावली, इतरही काही प्रयत्न केले.पण... ते अपयशी ठरल्यावर , जास्त मनाला लावून न घेता, डोंबिवलीला, टिळकनगर शाळेत, मूलांनी प्रवेश घेतला.शाळा सरकारी असल्याने, प्रवेश सहज आणि डोनेशन न देता मिळाला.
८. दोन्ही शाळेत, मध्यमवर्गीय मूले असल्याने, वॉटर बॅग, फॅन्सी दप्तरे इ. अनावश्यक खर्च वाचला.टिळक नगर शाळेत तर दप्तर पण मिळायचे.दोघेही, आज देखील, शीत-पेयाची रिकामी बाटली वापरतात.
९. माझा स्वतःचा , शाळेत व्यवहारोपयोगी शिक्षण मिळते, संस्कार चांगले होतात वगैरे (माझ्या द्रुष्टीने भाकड) कथेवर विश्वास नाही.(दहावीत ८५% मिळवलेला मित्र , व्ही.जे.टी.आय. ला गेला. डिप्लोमा केला, आणि ऑपरेटर म्हणून नौकरी करायला लागला.तर दूसरा ५०% मिळवून , जेमतेम बी.कॉम. झाला आणि मग सी.ए. झाला....कोणाला कधी , त्यांचे ध्येय मिळेल, काही सांगता येत नाही.)
१०. कधीही माझ्या मूलांची इतर मूलांबरोबर तूलना केली नाही. इतरांना किती गूण मिळाले त्याच्याशी मला किंवा माझ्या मूलांना काय करायचे आहे? त्यांची कुवत सध्या ७०% टक्यांची आहे ना? आणि ते तो ग्राफ मेंटेन करत आहेत ना? मग झाले.योग्य वेळी घेतील झेप..... १००ला फक्त ३०च कमी आहेत, हे जेंव्हा त्यांनाच समजेल, त्या दिवशी ते स्वतः होवून प्रयत्न करतील आणि त्या वेळेपर्यंत वाट बघायची माझी आणि माझ्या बायकोची तयारी आहे.
११. दोन्ही मूलांनी स्वप्रयत्नाने, सेमी इंग्रजी मिळवले.(शाळेत लिमिटेड जागा आहेत)
१२. दोन्ही मूले, शाळेत जातांना खूष असायची.शाळा म्हणजेच मस्ती आणि धूडगूस असेच त्यांना वाटते आणि मी पण ती समजूत दूर करायचा प्रयत्न केला नाही.
आज मोठा मूलगा, दहावी नंतर, डिप्लोमा करत आहे.सध्या तो तिसर्या सेमीस्टरला आहे..पहिल्या दोन्ही सेमिस्टरला, पहिल्या वर्गात पास झाला....दूसर्या सेमीस्टरच्या परीक्षे नंतर स्वतः होवून सुट्टीत, C आणि C++ चा क्लास लावला.
तर धाकटा मूलगा , ९वीत असून , शाळा एंजॉय करत आहे.शाळेत त्याला आवडेल त्या ऊपक्रमात भाग घेतो आणि हसत -खेळत शाळेत जातो.
दोन्ही मूलांची गाडी, प्रचंड स्पीड मध्ये नसली तरी, रूळावरून घसरलेली नाही.... माझी मूले, मी घरी गेलो की, माझ्या बरोबर गप्पा मारतात, माझी चेष्टा-मस्करी करतात आणि रोजचा घरचा अभ्यास स्वतः , कूणीही मागे न लागता पूर्ण करतात.
....शेवटी मुलांच्या मार्कात समाधान मानावे, की त्यांच्या निकोप वाढीत आणि आपण घरी गेल्या नंतर मूले अभ्यास करतात, की स्वतः होवून हा ज्याचा-त्याचा प्रश्न...
प्रतिक्रिया
27 Jun 2012 - 7:23 pm | नाना चेंगट
तुम्हाला जे समजले ते ज्या दिवशी महाराष्ट्रातील आपल्या पोराचं भलं व्हावं असंच वाटणार्या आईबापांना समजेल त्यादिवशी मराठी बद्दल गळा काढावा लागणार नाहीच पण मुलं अभ्यास करत नाहीत, त्यांच्यावर फार पैसा जातो वगैरे रड सुद्धा थांबेल.
कधी कधी बापाला इच्छा असते मुलाला/ मुलीला मराठीतून शिकवायची पण आईच्या डोक्यात भलत्या कल्पना असतात. कधी उलटे पण असते.
असो. तुम्ही तुम्हाला जो निर्णय योग्य वाटतो तो घेतलात आणि त्यावर ठाम राहिलात याबद्दल अभिनंदन. खरोखर कौतुकास तुम्ही दोघेही पात्र आहात. तुमच्या मुलांचे अभिनंदन त्यांनी तुमचा विश्वास सार्थ ठरवला.
जियो !!
27 Jun 2012 - 7:31 pm | मुक्त विहारि
पण , आता अपयशाची शक्यता , मात्र धूसर होत चालली आहे..
27 Jun 2012 - 7:38 pm | गणपा
असेच म्हणतो.
27 Jun 2012 - 7:31 pm | चैदजा
> कधी कधी बापाला इच्छा असते मुलाला/ मुलीला मराठीतून शिकवायची पण आईच्या डोक्यात भलत्या कल्पना असतात.
अगदी माझ्या मनातले बोललात.
27 Jun 2012 - 7:34 pm | दशानन
वाचून खूपच बरं वाटलं!
तुम्हां दोघांचे अभिनंदन!
28 Jun 2012 - 10:08 pm | जाई.
+१
27 Jun 2012 - 7:48 pm | Dhananjay Borgaonkar
लेख मनापासुन आवडला. तुम्ही घेतलेल्या निर्णयाला तुमच्या पत्नीची पण साथ लाभली हे सगळ्यात मह्त्वाचं.
तुमच्या दोन्ही मुलांना पुढील वाटचाली करता खुप खुप शुभेच्छा.
27 Jun 2012 - 7:57 pm | पैसा
माझी मुलं पण अशीच चौथीपर्यंत मराठी आणि पुढे इंग्रजी माध्यमात शिकली. मुलीने बी. ए. पदवीपरीक्षेत इंग्लिश पूर्ण घेऊन ८३% मार्क्स मिळवले. मुलगा दहावीच्या संपूर्ण वर्षात शाळेच्या क्रिकेट टीममधून सामने खेळत होता. ११ वीत शास्त्र शाखेत प्रवेश घ्यायला आवश्यक तेवढे ७६% पेक्षा जास्त मार्क्स त्याने शेवटचा एक महिना अभ्यास करून मिळवले.
सुरुवातीला मातृभाषेत शिकलेली मुलं नंतर कोणताही विषय समजून घेऊन उत्तम यश मिळवतात यात अजिबात शंका नाही. मुलांचं लहानपण हिरावून घेऊ नका. आपल्याकडे गावात राहिल्याच्या आणि डोंगरात भटकल्याच्या आठवणी आहेत तशा या मुलांकडे असणार नाहीत पण निदान त्याना आयुष्य म्हणजे ताणतणाव असं आताच वाटणार नाही याची खबरदारी आपणच घ्यायला पाहिजे.
27 Jun 2012 - 8:49 pm | श्रीरंग_जोशी
आदर - माझ्यासारख्या अनेकांनी (निम्न व मध्यम - मध्यम वर्गातले लोक) विद्यार्थीदशेत जे दडपण भोगले त्यापासून तुम्ही तुमच्या पाल्यांना धोरणात्मकरीत्या दूर ठेवले आहे म्हणून.
आभार - आपला अनुभव आमच्या बरोबर वाटल्या बद्दल व आम्हालाही असेच पालक बनण्यास प्रेरणा दिल्याबद्दल.
अभिनंदन - या कार्यात आपण यशस्वी झाला आहात म्हणून.
आपल्या पाल्यांना मनापासून शुभेच्छा, ते जातील त्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवतील व त्यासाठी जगण्यातला आनंद गमावणार नाही हा विश्वास वाटतो.
27 Jun 2012 - 8:55 pm | रेवती
लेखन आवडले. आपण मुलांचे मूलपण जपण्यात यशस्वी झालात म्हणून अभिनंदन.
आमच्याकडे सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्यात म्हणून मराठी शिकणे चालू आहे.;)
27 Jun 2012 - 9:56 pm | अर्धवटराव
याला म्हणतात सुजाण पालकत्व.
पुर्वी शिक्षणातली मौज छडी नामक राक्षसी घालवायची आणि आजकाल मातृभाषेबद्द्लची उदासीनता, अनावष्यक स्पर्धेची भिती या हडळी ते काम करतात. तुम्ही कल्पकतेने सुवर्णमध्य साधला, अभिनंदन.
मिपावरच्या या सर्व प्रतिक्रिया तुमच्या मुलांना वाचायला द्या. तुम्ही एक परिवार म्हणुन जो सामुदायीक निर्णय घेतला त्याची मिपापरिवाराने घेतलेली नोंद आणि प्रशंसा कळु देत त्यांना.
अर्धवटराव
27 Jun 2012 - 10:18 pm | दादा कोंडके
उत्तम निर्णय!
पोरांना इंग्रजी मिडीयम मध्ये घालून मराठीच्या नावाने गळे काढणार्यांच्या बैलाला हो! :)
(सेमी इंग्रजी मिडीयम मध्ये शिकलेला) दादा
27 Jun 2012 - 10:25 pm | श्रीरंग_जोशी
पो चा हो कधीपासून झाला हो दादा?
28 Jun 2012 - 11:30 pm | आनंदी गोपाळ
आमच्याकडे बैलाला भो अस्तो. पो नवीन ऐकला.
27 Jun 2012 - 10:33 pm | सुधीर
अनुभव आवडला! नुकतेच आई-बाबा बनलेल्या काहींना तुमचा अनुभव मार्गदर्शक ठरावा.
कधी कधी बापाला इच्छा असते मुलाला/ मुलीला मराठीतून शिकवायची पण आईच्या डोक्यात भलत्या कल्पना असतात. कधी उलटे पण असते.
१+
भलत्या कल्पनांमध्ये "स्टेट्सचा" नंबर पहिला असावा. (आजकाल नुसतंच इंग्रजी माध्यम नाही, सि.बि.एस.ई वा आय.सि.आय.सि.आय ला झुकतं माप देण्याचा कल दिसतो. एस. एस. सी कडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलला आहे)
दुसरं म्हणजे, नवश्रीमंत पालकवर्गामध्ये ही एक भिती आढळून येते की, "आपल्या पाल्याला सुसंस्कृत? संगत मिळणार नाही/वाईट संगत मिळेल"
तिसरं काही जणांचे जोडीदार आंतरभाषिक आहेत, तर काहिंचे इंग्रजी माध्यमातून शिकलेले. अशांनी मराठी माध्यमाची निवड करणं खूप कठीण वाटतं .
29 Jun 2012 - 3:44 pm | प्यारे१
>>>सि.बि.एस.ई वा आय.सि.आय.सि.आय ला
;)
-('भावना' पोचलेला )प्यारे
30 Jun 2012 - 9:42 am | सुधीर
:)
28 Jun 2012 - 12:10 am | Pearl
चांगला लेख.
धन्यवाद.
28 Jun 2012 - 8:40 am | ५० फक्त
उत्तम लेख आणि तुमच्या संपुर्ण कुटुंबाचंच अभिनंदन.
28 Jun 2012 - 8:49 am | नाखु
असं "अस्सल " वाचल की मि.पा. वर आल्याच सार्थक झाल ....
28 Jun 2012 - 8:59 am | मराठमोळा
प्रामाणिक, डाउन टु अर्थ विचार, सुजाण पालकत्वाची भुमिका, संयत भाषेत माडणी आणि उत्तम लेख.
अभिनंदन आणी आभार. :)
28 Jun 2012 - 9:06 am | सहज
लेख आवडला.
हा लेख महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्रात छापून यावा. जेव्हा शाळाप्रवेशासाठी धावपळ सुरु होते त्यासुमारास.
अभिनंदन
28 Jun 2012 - 9:48 am | ऋषिकेश
लेख आवडला.
अनिल अवचटांनी आपल्या लहानग्यांना म्युनसिपाल्टीत घातले होते त्याची आठवण झाली (अवचटच ना ते?)
सहजरावांशी +१
28 Jun 2012 - 10:53 am | अस्मी
लेख आवडला.
तुमचे विचार आणि निर्णय खरंच स्तुत्य आहे.
28 Jun 2012 - 10:57 am | उदय के'सागर
खुप छान लेख.... खुप काहि घेण्यासारखं आहे ह्या लेखातुन... खरंच सगळेच जण किती "ट्रेंड" च्या मागे धावण्यात व्यस्त असतात, त्यामुळे कोणी विचारही करत नाहि मुलांना असंही शिक्षण देऊ शकतो आपण आणि ह्या पध्दतिच्या शिक्षणानेही प्रगती होऊ शकते. कदाचित बरेच पालक ह्याचा विचार करतहि असतील पण आपण प्रवाहा बरोबर वाहिलो नाहि तर आपलं नुकसान होईल हि असुरक्षितता असते बहुदा.
बाकि मुक्त विहारि साहेब तुमच्या बद्दल काय बोलणार, तुमचे हे विचार - संस्कार वाचुन ते आचरणात अणायचे म्हंटल तरी ती इंग्रजी मधली म्हण आठवते "It is very difficult to be simple"
:)
28 Jun 2012 - 11:07 am | sneharani
चांगला लेख. चांगला विचार मांडलात.
:)
28 Jun 2012 - 11:44 am | मिसळलेला काव्यप्रेमी
तुमचा लेख आवडला, मुलांना वाढवतांना होणार्या चुका खुप सोप्या भाषेत समजावून सांगितल्यात आणि नुसत्या चुका नाही तर त्यांचे निराकारण कसे करावे हे ही छान मांडले आहे, म्हणून आवडला.
अर्थात आजचे पालक, जे सुशिक्षीत, सुसंस्कृत आहेत, ते असाचं प्रयत्न करत असतात कि, मुलांचे शिक्षण हे तणावविरहीत आणि त्यांची सर्व बाजूने प्रगती साधणारे असावे. पण बहुसंख्य पालकांना त्याचे मार्ग कधी सापडतात तरी कधी सापडत नाही. अश्या वेळेला असे मार्गदर्शन नक्कीच मोलाचे ठरते.
आपले असेच अजून काही अनुभव असतील तर तेही येऊ द्या. फक्त शैक्षणीकच नव्हे तर इतरही बाबतीत...
28 Jun 2012 - 12:05 pm | गवि
उत्तम लेख आहे. माझं बालपण कोंकणात आणि म्युनिसिपल शाळेत गेल्याने आणखीनच जवळचा वाटला. शाळेसोबत कैर्या करवंदं आणि पर्यातले मासे पकडणं असे आता खूपच अनोखे वाटणारे उद्योग केले आहेत.
अर्थात करियर उत्तम झाली वगैरे म्हणता येणार नाही. ते शेवटी त्या त्या विद्यार्थ्याच्या पिंडावर अवलंबून आहे.
शिवाय लोटे-पेढे-लांजा-हातखंबा-निवळी आणि मुंबई-पुणे-ठाणे अशा मेट्रो सिटीज, यात बरीच समीकरणं खूप बदलतात हेही खरं. पण लेख तळमळीने लिहीलात, आवडला. विषय मोठा आहे.
28 Jun 2012 - 10:53 pm | सुधीर
विषय फार मोठा आहे
सहमत! कदाचित, योग्य निर्णय व्यक्तिसापेक्ष बदलू शकतो.
28 Jun 2012 - 11:30 pm | दादा कोंडके
कुठला विषय मोठा नसतो? सोईप्रमाणे विषय काय लहान-मोठे होतच असतात.
कदाचित का? नक्कीच. आइनस्टाईनने सापेक्षतेचा सिद्धांत उगिच लावला का?
अवांतरः एक स्नेही अगदी नाईलाजाने अमेरिकेत रहायला गेले. त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणजे त्यांना तिथलच नागरिकत्व मिळालं. तिथंच मुलंही झाली. आता त्यांची कितीही इच्छा असली तरी तिथे मराठी माध्यमातली शाळा असणं शक्यच नाही. त्यामुळे मनावर दगड ठेउन त्यांना मुलांना नरक यातना भोगायला इंग्रजी शाळेत घातलं. बिचारे, सगळ्या आप्तांना मराठी विषयीची कळकळ बोलून दाखवतात, पण दैवाचं दान थोडंच मनाप्रमाणे पडतं? पण अमेरिकन.. नाही विश्वमराठी साहित्य संमेलनाला वगैरे हजेरी लाउन थोडं बरं वाटतं म्हणतात. असो.
28 Jun 2012 - 3:16 pm | इनिगोय
धाडसी निर्णय आणि उत्तम लेख. 'आमच्या मुलांची शैक्षणिक धमाल' असे शीर्षक हवे होते :)
हा दृष्टीकोन फारच आवडला.
28 Jun 2012 - 4:08 pm | स्मिता.
लेख वाचला आणि तुमचे विचार, प्रयत्न, कृती आवडले.
उगाच इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच घालून मुलांच्या शिक्षणाची वाट लावण्यापेक्षा मुलाला ज्या भाषेतून सोयिस्करपणे आकलन होतं त्या भाषेतून शिक्षण देणं अगदी पटलं! जास्तीत जास्त पालकांना हे कळेल तो सुदिन.
तसंच नातेवाईकांच्या लहान मुलांना 'ते मिल्क ड्रिंक करून घे' वगैरेचं घरगुती शिक्षण मिळतांना बघून खूपच विचित्र वाटतं. मुलाला इंग्रजीच शिकवायचं असेल तर सरळ व्यवस्थित इंग्रजी तरी बोलावं. हे काय धड मराठी नाही की धड इंग्रजी नाही.
28 Jun 2012 - 11:17 pm | निशदे
अतिशय उत्तम निर्णय घेतल्याबद्दल आणि तो पूर्ण केल्याबद्दल खरे तर तुमचे आणि तुमच्या पत्नीचेदेखील कौतुक करायला हवे. केवळ अभ्यासच नव्हे तर अभ्यासेतर गोष्टींमध्ये देखील तुम्ही मुलांना प्रोत्साहन दिलेत आणि त्यांचा सर्वांगीण विकास करवून घेतलात याबद्दल खरेच अभिनंदन......
-एक मराठी+सेमीइंग्रजी माध्यमातून शिकलेला मुलगा. :)
28 Jun 2012 - 11:21 pm | jaypal
तुमचे आणि वहीनींचे अपार कौतुक वाटते आणि मुलांचा हेवा :-)
28 Jun 2012 - 11:40 pm | आनंदी गोपाळ
धागाकर्त्यांच्या तत्वाशी सहमत!
आमचे एकुलते एक कन्यारत्न १७ वर्षांपुर्वी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेते झाले. एकमेव कारण. ती एकच शाळा 'देणगी' मागत नव्हती. (पैसे वाचविणे हा क्रायटेरिया नाही. शाळेच्या व्यवस्थापनाने 'प्रिन्सिपल' सोडले नसल्याचे ते निदर्शक होते. माझ्या 'सोशल स्टँडिंग' / ओळखी इ. चा वापर करून अथवा पैसे फेकून कुठेही प्रवेश घेणे तेंव्हाही आवाक्यात होतेच. परंतू एकुलतेच कन्यारत्न असण्याचा निर्णय जसा जाणून बुजून घेतला, तसाच हाही.) जुन्या नामांकित सर्व शाळा (मराठी माध्यम) देणगी शिवाय प्रवेश देत नव्हत्या.
कधीच कुठेही काहीही अडले नाही. शाळेने 'कॉन्व्हेंट' असूनही कधीच जाचक नियम लावले नाहीत. केशभूषा/वेशभूषेचे युनिफॉर्म या संकल्पनेशी सुसंगत असे जितके नियम होते तितकेच.
१२वी नंतर सीईटीला यंदा १८१ मार्क आहेत.
योग्य अन हव्या त्या कालेजात (पुन्हा सरकारी) प्रवेश मिळेल.
सर्व शाळा/कॉलेज सरकारी. मुलगी असल्याने फी = शून्य
(अपत्य सुखाने आनंदी) गोपाळ
29 Jun 2012 - 12:23 am | रेवती
जुन्या नामांकित सर्व शाळा (मराठी माध्यम) देणगी शिवाय प्रवेश देत नव्हत्या.
अगदी. माझ्यासाठी पूर्वी मराठी शाळेत प्रवेशासाठी ५०० रू. डोनेशन घेतले होते. डोनेशनची पद्धत नसलेल्या काळातील गोष्ट असल्याने बातमी चांगलीच पसरली होती. "बापरे!!!" अशी चर्चेची सुरुवात असायची हे आठवते. शिवाय तो मोठा खर्च समजला गेला होता.
आपले व आपल्या कन्येचे अभिनंदन. स्कोअर चांगला आलाय.
30 Jun 2012 - 1:34 am | आनंदी गोपाळ
धन्यवाद!
28 Jun 2012 - 11:41 pm | भरत कुलकर्णी
अभिनंदन
29 Jun 2012 - 12:03 am | शिल्पा ब
एक उदा. म्हणुन : आपण मराठीत शिकलो त्याचा दर्जा अन मुलांना ज्या मराठी शाळेत घालतो त्याचा दर्जा यांची तुलना करुन मग निवड केलेली चांगली.
समजा शाळा भले मराठी पण शिक्षक, अभ्यासाव्यतिरीक्त खेळ, कला वगैरे असं काहीच नसेल किंवा नावालाच असेल तर काय उपयोग?
30 Jun 2012 - 1:45 am | कुंदन
>>एक उदा. म्हणुन : आपण मराठीत शिकलो त्याचा दर्जा अन मुलांना ज्या मराठी शाळेत घालतो त्याचा दर्जा यांची तुलना करुन मग निवड केलेली चांगली.
काळ बराच बदलला आहे.
30 Jun 2012 - 3:06 pm | प्रभाकर पेठकर
अतिशय योग्य आणि धाडसी निर्णय. अर्धांगिनीची साथ फार महत्त्वाची. ती लाभली नाही तर कित्येक धाडसी निर्णय घेण्यासाठी लागणारे मानसिक बळ लाभत नाही. हे अर्थात दोन्ही अर्धांगांना लागू आहे.
मातृभाषेत शालेय शिक्षण पुढील शिक्षणाचा पाया मजबूत करते.
डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट वगैरे वगैरे व्यवसायांनाच 'सोने' लागलेले आहे असे नाही. 'व्यक्तिमत्त्वाला' नक्कीच 'सोने' लागलेले असते. उत्तम व्यक्तिमत्त्व घडविले तर कुठल्याही 'व्यवसायाचे' 'सोने' करता येते.
30 Jun 2012 - 4:17 pm | रमताराम
आम्ही तर चक्क 'मंडई विद्यापीठ' म्हणून ओळखल्या जाणार्या शाळेत शिकलो. वर्गात सगळा गावगाडा, मंडईतल्या गाळेवाल्यांपासून गुंडांपर्यंत (आंदेकर-माळवदकर टोळीयुद्ध जोरावर असताना त्यातल्या एका माळवदकराचे पोरगे आमच्या वर्गात होते), भवानी पेठेतल्या दुकानदारापासून मनपाच्या सफाई कामगारांची पोरे आमच्या वर्गात होती. पण आम्हाला वाईट संगत लागेल असे आमच्या आई-बाला कधी वाटल्याचे स्मरत नाही (आमच्यामुळे इतरांबाबत त्यांच्या आई-वडिलांना तसे वाटले असेल अशी दाट शक्यता आहे. :) ) त्याने आमचे मराठी बिघडले नाही की इंग्रजीही. कालेजात गेल्यावर संबोधनासारखी आईवरून शिवी घातल्याशिवाय- भले इंग्रजीत का असेना - वाक्य सुरू न करणारी नि ती शिवी ऐकून मित्राच्या कानाखाली आवाज काढण्याऐवजी कानाआड करणारी संभावितांची पोरे पाहिली की आमच्या वर्गातली मुले खूपच सुसंस्कृत होती असे म्हणावे लागेल. असो.
1 Jul 2012 - 4:12 pm | नाना चेंगट
अगदी अगदी ! सारखाच अनुभव... :)
1 Jul 2012 - 4:11 pm | चिगो
मी आणि माझे भाऊपण ह्याच प्रकारे शिकलो. प्राथमिक शाळा मराठीत, माध्यमिक सेमी इंग्लिश आणि त्यानंतर इंग्लिश.. आता शालेय जीवनात मी काही झेंडे गाडले नसले तरी अभ्यासाचा ताण आणि त्यामुळे चीड नव्हती.
तुमच्या निर्णयाचे अभिनंदन ... मुले तुमचा निर्णय सार्थ ठरवतील ही आशा आणि शुभेच्छा..