शाळा व त्यांचे अजब निर्णय

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in काथ्याकूट
26 Jun 2012 - 2:28 pm
गाभा: 

नमस्कार्स मंडळी,

मागील वर्षी माझ्या मुलीला मी ठाण्यातील एका प्रतिथयश शाळेत के.जी त प्रवेश घेवून दिला. नुकतेच सिनीयर के.जी. चे वर्ग सुरु झाले. या शाळेत मुलांना रोजच्या डब्यात काय द्यायचे याचे नियम आहेत ( आजकाल हा प्रकार सगळी कडेच असतो म्हणे, असो. त्याला काही हरकत नाही.) त्यानुसार प्रत्येक दिवसासाठी काही पदार्थ ठरवलेले आहेत. त्यात, सोमवारसाठी "इडली/डोसा" असा मेन्यु आहे.
काल माझ्या बायकोनी सकाळी ६:३० ला उठून, खपून तिच्यासाठी मसाला इडली केली आणि डब्यात दिली. संध्याकाळी तिने विचारले मुलीला "बाळा, इडली आवडली कां?" तर तिचे उत्तर ऐकून मी तीन ताड उडालोच. तिचे उत्तर होते, "आई, मला शाळेत इडली खाऊच दिली नाही, आणि मला टिचर म्हणाल्या की आईला सांग मसाला इडली चालणार नाही, साधी इडली असली पाहिजे."
मला कळेचंना कि यावर काय करावे? मेन्युच्या बाहेरचा (?) पदार्थ असेल तर मुलांना डबाच खाऊ द्यायचा नाही? हा कुठला नियम?
मान्य आहे कि ह्या नियमा मागचा उद्देश वाईट नाही, मुलांना सगळ्या प्रकारच्या सकस अन्नांचा आहार मिळायला हवा. पण या नियमाची अशी अमंलबजावणी योग्य आहे? शिवाय याच शाळेतील इतर काही पालक, इडली / डोसा मेन्यु असेल तर बर्‍याच वेळा दुकानातून इडली घेऊन बंद पॅकेट मधली इडली देतात, पण ती चालते आणि घरी केलेली मसाला इडली नाही चालत???
ठरलेल्या मेन्यु व्यतिरीक्त कुठलाही पदार्थ डब्यात असेल तर ते मुलं दुपार पर्यंत उपाशीच राहणारं!! आणि उपाशीपोटी ते काही शिकू शकतील कां?
पुढील शिक्षक-पालक सभेमध्ये मी यावर तिच्या शिक्षकांशी चर्चा करणार आहेचं.
पण हे सगंळ इथे टंकायचे कारण म्हणजे, जर तुमच्या मुलांच्या शाळेत असे काही नियम असतील तर वेळीच काळजी घ्या.
तर आता प्रश्न असा उरतो कि, मुळात शाळांना असे निर्णय घेण्याचा आधिकार आहे कां?

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

26 Jun 2012 - 2:35 pm | मृत्युन्जय

सगळे नियम आहेत.

मुलांना कॉन्वेंट शाळेत घातल्यावर त्यांच्यावर धार्मिक बंधने आणली जातात ती मान्य होतातच ना? कुंकु, टिकली, मेहंदी चालत नाही. ते चालतेच ना? हिंदु देव देवतांची चित्रे जवळ बाळगण्यास बंदी असते. ते चालतेच ना? तसाच हा एक नियम म्हणायचा.

पण मसाला इडली न चालणे हा एक महामुर्ख प्रकार आहे असे म्हणावे लागेल. जर ती खाऊ दिली नाही तर शिक्षकांनी काहि इतर व्यवस्था करणे गरजेचे होते.

तुमची (म्हणजे तुमच्या मुलीची) शाळा कुठली हो बादवे?

पियुशा's picture

26 Jun 2012 - 2:41 pm | पियुशा

च्यायला हे तर अतीच होतय , पेरेंटस मिटींग मध्ये झापा त्यांना सरळ सरळ .

इनिगोय's picture

26 Jun 2012 - 3:03 pm | इनिगोय

चर्चा इथे होऊ दे, पेरेण्टस् मिटिंगमध्ये मात्र 'नीट'च बोला.
आमच्या इथल्या शाळेत 'खाऊ न देणे' हा रूल जंक फूड साठी आहे. बिस्किटंसुद्धा पाठवू नका असं बजावून सांगितलं होतं ओरिएण्टेशनच्या वेळी, पण ज्या मुलाचा वाढदिवस असेल, त्याने सगळ्या मुलांना बिस्किटांचे पुडे वाटले आणि सगळ्या मुलांनी ते तिथल्या तिथे अख्खेच्या अख्खे खाल्ले तर चाल्तंय!!

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Jun 2012 - 2:46 pm | llपुण्याचे पेशवेll

आयला बरे आहे. आमच्या वेळेला डब्यात पोळीभाजीची सक्ती असायची. शनिवार सोडून अन्य वारी कोणी खाऊ आणला तर तो अपराध मानला जाई. बाई सांगायच्या पालकाना की डब्यात पोळीभाजी द्या म्हणून.
म्हणजे हल्लीच्या शाळा बरे आहेत म्हणायचे.

विसुनाना's picture

26 Jun 2012 - 2:55 pm | विसुनाना

साधी इडली की मसाला इडली? हा मूळ प्रश्न नाहीच.गणवेश एक असावा इथेपर्यंत ठीक आहे, पण 'गणखाद्य' ही कल्पना कुठून आली?
हे फारच होतंय. एकतर त्या शाळेनेच सर्वांना खाण्याचे पदार्थ पुरवावेत किंवा घरातून जे काही डब्यात दिले जाईल ते खाण्याची मुभा असावी.

अवांतरः
एखाद्या विद्यार्थ्याला काही खाद्यपदार्थाची अ‍ॅलर्जी असेल किंवा पचनाला त्रास होत असेल तर त्याच्यावर तोच पदार्थ खाण्याची सक्ती करणार का? शिवाय प्रत्येक मुलाची खाद्यपदार्थांची आवडनिवड 'मोडून' काढायलाच हवी हे कसले आले बालमानसशास्त्र? ही तर लष्करी शिस्त झाली.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 Jun 2012 - 3:04 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

एखाद्या विद्यार्थ्याला काही खाद्यपदार्थाची अ‍ॅलर्जी असेल किंवा पचनाला त्रास होत असेल तर त्याच्यावर तोच पदार्थ खाण्याची सक्ती करणार का? शिवाय प्रत्येक मुलाची खाद्यपदार्थांची आवडनिवड 'मोडून' काढायलाच हवी हे कसले आले बालमानसशास्त्र? ही तर लष्करी शिस्त झाली.

नाही या साठी वेगळा नियम आहे जर एखाद्या विद्यार्थ्याला काही खाद्यपदार्थाची अ‍ॅलर्जी असेल किंवा पचनाला त्रास होत असेल तर पालकांनी रितसर तसे डॉक्टरचे प्रमाणपत्र आणून वर्गशिक्षकाला द्यायला हवे नाही तर परत पोरगं उपाशी!!

स्पा's picture

26 Jun 2012 - 3:03 pm | स्पा

एकच मेनू ?
आयला म्हणजे वर्गातली ८० - १०० पोर फक्त इडलीच खाणार??
चायला...
म्हणजे आज इडली.. उद्या पराठे.. परवा डोसे ....

मग पोरांना वरायटी कशी मिळणार..:).. सर्वांच्या डब्यात फक्त एकच पदार्थ
त्यातून मिळून मिसळून.. डबा वाटून खायचे पण संस्कार होणार नाहीत ... :(
त्यापेक्षा.. ४- ५ ऑप्शन द्यावेत .. म्हणजे बरे पडेल

नितिन थत्ते's picture

26 Jun 2012 - 3:10 pm | नितिन थत्ते

या नियमामुळे वार ओळखण्यास फायदा होतो. ;)

पुढच्या वेळेस मुलाने शाळेत "ही साधीच इडली आहे" असे सांगावे.

शाळेचा निर्णय हा मुर्खपणाचा कळस आहे.
घरीच केलेले पदार्थ असावेत इथ पर्यंत ठिक. पण आठवड्याचा मेन्युपण ठरवुन देणे अतीच आहे.
पालकांची समिती वैगरे असेल तर तिथे मांडा हा विषय आणि सर्व पालकांनी एकत्र येउन जाब विचारा शालेयप्रशसनाला. एकट्या दुकट्याला भीक नाही घालायचे ते.

बाळ सप्रे's picture

26 Jun 2012 - 3:11 pm | बाळ सप्रे

पुढच्या मिटींगला इडलीचे वजन किती, व्यास किती, उंची किती.. ... ते आधीच विचारुन घ्या.. रंगासाठी शेडकार्ड घेउन जा..

आमच्याकडे चपाती भाजी कंपल्सरी आहे. आणि शनिवारी कोणताही खाऊ. मांसाहार आजीबात चालत नाही.

गणपा's picture

26 Jun 2012 - 3:21 pm | गणपा

मांसाहार आजीबात चालत नाही.

अरेरे !!!
आपण ३०-३५ वर्षांपुर्वी जन्मलो ते बरच झालं म्हणायचं. ;)

वेताळ's picture

27 Jun 2012 - 10:04 am | वेताळ

मी दोन तीन दा सुके मटण आणि चपाती नेली होती. मी व मित्रानी त्यावर ताव मारला होता.

टवाळ कार्टा's picture

26 Jun 2012 - 3:23 pm | टवाळ कार्टा

वा....मिपा शाळेतल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचले म्हणायचे ;)

च्यायला, ज्या टिचरने असे सांगितले ती महामूर्खच असायला हवी.

सिनियर केजीमधल्या छोट्यांनी काय खावे आणि काय खाऊ नये, निदान याची तरी माहिती यांना आहे की नाही हे तपासायला हवे.

याविषयी ऐकलं आहे. पण खरंच तो नियम लागू झाला असेल याची कल्पना आली नव्हती. सर्वच आयांना अमुकच पदार्थ हुकमी ज्या त्या दिवशी करता येईलच असं नाही हाही फार महत्वाचा मुद्दा आहे. भाज्यांची उपलब्धता आणि इतर अनेक गोष्टी यात येतात. एका दिवसाच्या मेन्यूत शाळेने काही पर्याय दिलेले असले तरी ते फार जास्त नसतात असं ऐकलं आहे.

माझ्या पोराच्या शाळेत असा नियम लागू झालेला नसावा, कारण तशी नोटीस आलेली नाही पण पोरगं रोज डबा तसाच्या तसा परत आणतंय, तेही त्याचे खास आवडते पदार्थ असतानाही. बाईंनी "टाईम इज ओव्हर" असं म्हटल्याने डबा खाता आला नाही असं किंवा तत्सम कारण तो सांगतो. फक्त दहा मिनिटांची एकच सुट्टी, तेवढ्यात पोरांना टॉयलेट-हात धुणे आदि उरकून डबा खायला पुरेसा वेळ मिळत नसावा असं वाटतं. पेरेंट टीचर मीटिंगला विषय काढणारच आहे आता. शिवाय शाळेने असा काही मेन्यू पोराच्याच हाती पालकांना देण्यासाठी दिला होता आणि तो गहाळबिहाळ झाला की काय याचीही चौकशी हा धागा वाचल्यावर करणं आवश्यक झालं आहे.

पोरांचे आणि घरच्या आई / स्वयंपाक करणारे बाबा यांचे हाल आहेत एकूण.

टवाळ कार्टा's picture

26 Jun 2012 - 3:24 pm | टवाळ कार्टा

ही शाळा कोणती? एकदा "शाखेत" जाउन सान्गा...असल्या सगळ्याच शाळांबाबत प्रश्न मिटेल :)

प्रभाकर पेठकर's picture

26 Jun 2012 - 3:50 pm | प्रभाकर पेठकर

खSSSSळ्ळSSSS - फटॅSSSSSक हा मार्ग इथे तरी योग्य वाटत नाही. संस्कारक्षम विद्यार्थ्यांवर चुकीचे संस्कार व्हायचे.

पालकांनी सामुदायिक रित्या मुख्याध्यापकांची भेट घेऊन शांतपणे पण निग्रहपूर्वक आपले म्हणणे मांडावे. लोकमतांच्या रेट्याखाली कदाचित काही विधायक बदल होऊ शकतील असे वाटते. जमल्यास वर्तमानपत्रास लेख लिहून द्यावा.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 Jun 2012 - 3:55 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

पेठकर काकांचे म्हणणे पटते आहे. इतर पालकांना एकत्र आणणे तसे जिकरीचे काम आहे, पण एक प्रयत्न करुन पाहतो.

विसुनाना's picture

26 Jun 2012 - 4:08 pm | विसुनाना

तुम्ही मानव अधिकार आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे मुख्याध्यापकास सांगा.
शिवाय बरोबर 'एबीपी माझा' च्या क्यॅमेरामनला घेऊन जा. (त्याला मसाला इडली खायला घातलीत तरी चालेल.) ;)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 Jun 2012 - 4:10 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

:)
एबीपी वाल्याला शोधायला हवे आता.

Nile's picture

27 Jun 2012 - 10:08 pm | Nile

विसुनाना आणि पेठकरकाकांशी सहमत आहे.

मुर्खपणाचा कळस आहे, च्यायला! शाळेचं नाव कळवा हो, प्लीज. व्यनी केलात तरी चालेल. (खाली दिलं असल्यास पाहतो. )

गणपा खरच हो.

मध्ये तर ऐकल होत की शाळेत जेवण बनवून देणार तेच खायच. माझ्या भाचीच्या सेंट मेरीज मध्ये तो नियम होता. माझी भाची त्याला हातच नाही लावायची. मग माझ्या वहीनीने सरळ त्यांना लेटर लिहीले व घरच्या डब्याची परमिशन मागितली.

आमच्या गावात शाळेत जेवायला देतात. डबा न्यायला लागत नाहि

इष्टुर फाकडा's picture

26 Jun 2012 - 3:40 pm | इष्टुर फाकडा

ओ साहेब आता *का आमच्या हातावर आणि शाळा कोणती ते सांगा राव.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 Jun 2012 - 3:48 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

तर असे जाहीर नाव सांगणे योग्य वाटत नाही, मी आपल्याला व्यनी धाडतो.

इष्टुर फाकडा's picture

26 Jun 2012 - 3:49 pm | इष्टुर फाकडा

लगेच धाडा !

विश्वनाथ मेहेंदळे's picture

26 Jun 2012 - 4:37 pm | विश्वनाथ मेहेंदळे

त्यात काय अयोग्य आहे? नाव सांगायला हरकत नाही. इतकी फार जहरी टीका वगैरे नाही केली आहेस तू.

दादा कोंडके's picture

26 Jun 2012 - 10:16 pm | दादा कोंडके

एकतर कै च्या कै नियम लागू करायचे आणि वर फालतू कारण दाखवून पोरीला उपाशी ठेवायचं. नुसतं शाळेचं नावच नाहितर शिक्षीकेचं नाव सुद्धा सांगा. च्यायला त्या बाईला म्हणावं इडल्यांचे खूप प्रकार असतात, बटन इडली, रवा इडली, प्लेट इडली वगैरे.

हा शुद्ध अन्याय आहे. या विरुद्ध पालक चारचौघात नुसतं शाळेचं नाव सांगायला घाबरत असतील तर अवघड आहे...पोरांचं :)

प्रभाकर पेठकर's picture

27 Jun 2012 - 2:06 am | प्रभाकर पेठकर

या विरुद्ध पालक चारचौघात नुसतं शाळेचं नाव सांगायला घाबरत असतील तर अवघड आहे...पोरांचं

श्री. दादा कोंडके साहेब,

कित्येक शाळांना राजकारण्यांचा वरदहस्त असतो. त्यांच्याशी एकट्या दुकट्याने टक्कर घ्यायची म्हणजे आत्मघाती कृत्य ठरते. शाळेला बदनाम करतो म्हणून पालकावर आणि विद्यार्थ्यावर कारवाई (अर्थात बेकायदेशीर) होऊ शकते. तसे झाले की, 'आला मोठा तत्त्ववाला. वाजले नं बारा! शिक्षण राहिलं बाजूला. क्षुल्लक इडल्यांसाठी पोराचं आणि स्वतःचही नुकसान करून घेतलं.' वगैरे वगैरे ऐकावे लागण्याची शक्यता अधिक.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

28 Jun 2012 - 10:13 am | घाशीराम कोतवाल १.२

अहो पेठकर काका माणसान किती घाबराव ?
अहो माझ्या रहीवासी श्री नानासाहेब कुटे पाटिल ह्यांनी सेंंट मेरीज शाळा माझगाव ह्यांच्या एकट्याने लढा दिलेला आहे
ह्या लिंक पहा
डि एन ए

टाईम्स

मिड - डे

अजुन

प्रभाकर पेठकर's picture

29 Jun 2012 - 2:28 am | प्रभाकर पेठकर

आपल्या चारही जोडण्या (लिंक्स) वाचल्या. मला जाणवलेले काही मुद्दे,

१) सर्व वर्तमानपत्रांमध्ये 'then parent' असा उल्लेख आहे. म्हणजे सध्या ते शाळेशी पालक ह्या नात्याने जोडलेले नाहीत. असे का? त्यांच्या पाल्याने शाळा बदलली का? कुठल्या कारणाने? आणि कुठल्याही कारणाने असेल तरी आता त्यांना त्यांच्या पाल्यावर अन्याय/काही कारवाई होण्याची शक्यता नसल्याने मुक्त मनाने ते शाळा प्रशासनाशी लढा देत आहेत का?

२) लढा दिलेला आहे हे दिसतेच आहे. त्या पालकाचे खरेच मनापासून कौतुक. परंतु, आज चार वर्षे झाली ते लढा देत आहेत. अजूनही ते 'यशस्वी' झाल्याचे दिसत नाही. ह्या चार वर्षात त्यांना झालेला मानसिक, शारीरिक त्रास नक्कीच उच्च पातळीवरचा असणार. तर, असा उच्च पातळीवरचा आणि इतक्या मोठ्या कालावधीचा त्रास क्षुल्लक 'इडल्यां' साठी समर्थनिय आहे का? दोन्ही तक्रारींमधील गंभीरता वेगवेगळी आहे, त्याचाही विचार व्हावा.

३) माहितीत शाळेकडून 'राजकारणाचा' उघड उघड आरोप होतो आहे. म्हणजे कोणीतरी राजकारणी पडद्याआडून आधार देत आहे (अर्थात, स्व'अर्था' साठी) आणि कोणी तरी राजकारणी (मलिदा मिळाला नाही म्हणून) शाळेच्या कृष्ण्कृत्यांना विरोध करतो आहे. असा तार्किक अर्थ निघतो आहे.

४) सर्वच बातम्यांमध्ये शाळेबद्दल, शिक्षणखात्याबद्दल आणि एकून 'केस' बद्दल माहीती आहे. परंतू, त्या पालकांबद्दल कुठेही जास्त माहिती नाही. ते स्वतः धावाधाव करत आहेत? की त्यांनी वकील नेमला आहे? ते नोकरीत आहेत की व्ही. आर. एस. घेतलेला आहे? की व्यावसायिक आहेत? सधन आहेत की मध्यमवर्गिय आहेत? ह्या सर्व गोष्टी 'लढा' देताना महत्त्वाच्या आहेत.

५) (आणि शेवटचा मुद्दा) सर्वच जणं 'नायक' नाही बनू शकत. सर्वांच्याच अंगी 'अण्णां हजारें' सारखं साहस नसतं. कित्येकांवर असलेलया कौटुंबिक जबाबदार्‍या त्या त्या माणसाला मनाने दुबळा बनवितात. 'किती ते घाबरावं?' हा सोप्पा प्रश्न विचारणं वेगळं आणि ४ वर्ष एखाद्या बलाढ्य संस्थेविरुद्ध लढा देणं वेगळं.

श्री. नाना कुटे पाटीलांचं कौतुक आहेच पण त्या एकाच न्यायाने सर्व 'सामान्य' पालकांना तोलणे मला तरी पटत नाही.

शिल्पा ब's picture

29 Jun 2012 - 2:45 am | शिल्पा ब

पेठकर आजोबांशी सहमत.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

29 Jun 2012 - 8:53 am | घाशीराम कोतवाल १.२

सर्व वर्तमानपत्रांमध्ये 'then parent' असा उल्लेख आहे. म्हणजे सध्या ते शाळेशी पालक ह्या नात्याने जोडलेले नाहीत. असे का? त्यांच्या पाल्याने शाळा बदलली का? कुठल्या कारणाने? आणि कुठल्याही कारणाने असेल तरी आता त्यांना त्यांच्या पाल्यावर अन्याय/काही कारवाई होण्याची शक्यता नसल्याने मुक्त मनाने ते शाळा प्रशासनाशी लढा देत आहेत का?

त्यांच्या पाल्याने शाळा गेल्यावर्षी बदलली कारण तो दहावी उत्तीर्ण झाला आहे म्हणुन..

लढा दिलेला आहे हे दिसतेच आहे. त्या पालकाचे खरेच मनापासून कौतुक. परंतु, आज चार वर्षे झाली ते लढा देत आहेत. अजूनही ते 'यशस्वी' झाल्याचे दिसत नाही. ह्या चार वर्षात त्यांना झालेला मानसिक, शारीरिक त्रास नक्कीच उच्च पातळीवरचा असणार. तर, असा उच्च पातळीवरचा आणि इतक्या मोठ्या कालावधीचा त्रास क्षुल्लक 'इडल्यां' साठी समर्थनिय आहे का? दोन्ही तक्रारींमधील गंभीरता वेगवेगळी आहे, त्याचाही विचार व्हावा.
मान्य आहे काका पण विचार करा १.४५ कोटि काहि थोडी रक्कम आहे का ? अंदाजे चार हजार विद्यार्थी सेंट मेरिज शाळेत शिकतात प्रत्येकी १२०० रुपये शाळेने तब्बल ३ वर्ष वसुल केलेत कशाला तर कंप्युटर क्लास साठी हे नक्किच समर्थनिय नाही ना.

३) माहितीत शाळेकडून 'राजकारणाचा' उघड उघड आरोप होतो आहे. म्हणजे कोणीतरी राजकारणी पडद्याआडून आधार देत आहे (अर्थात, स्व'अर्था' साठी)
हो आहेच महाराष्ट्रातील एक मोठा नेता ह्यांना पाठिंबा देतो कारण त्याच्या घरातील मुले ह्याच शाळेत शिकलीत नाव हव तर व्यनी करतो ...

४) सर्वच बातम्यांमध्ये शाळेबद्दल, शिक्षणखात्याबद्दल आणि एकून 'केस' बद्दल माहीती आहे. परंतू, त्या पालकांबद्दल कुठेही जास्त माहिती नाही. ते स्वतः धावाधाव करत आहेत? की त्यांनी वकील नेमला आहे? ते नोकरीत आहेत की व्ही. आर. एस. घेतलेला आहे? की व्यावसायिक आहेत? सधन आहेत की मध्यमवर्गिय आहेत? ह्या सर्व गोष्टी 'लढा' देताना महत्त्वाच्या आहेत.

मध्यमवर्गिय आहेत

५) (आणि शेवटचा मुद्दा) सर्वच जणं 'नायक' नाही बनू शकत. सर्वांच्याच अंगी 'अण्णां हजारें' सारखं साहस नसतं. कित्येकांवर असलेलया कौटुंबिक जबाबदार्‍या त्या त्या माणसाला मनाने दुबळा बनवितात. 'किती ते घाबरावं?' हा सोप्पा प्रश्न विचारणं वेगळं आणि ४ वर्ष एखाद्या बलाढ्य संस्थेविरुद्ध लढा देणं वेगळं.
पण जो लढतो आहे त्याला पाठिंबा तर देउ शकतो त्याच्या मागे उभे तर राहु शकतो

प्रभाकर पेठकर's picture

29 Jun 2012 - 9:25 am | प्रभाकर पेठकर

१.४५ कोटि काहि थोडी रक्कम आहे का ? अंदाजे चार हजार विद्यार्थी सेंट मेरिज शाळेत शिकतात प्रत्येकी १२०० रुपये शाळेने तब्बल ३ वर्ष वसुल केलेत कशाला तर कंप्युटर क्लास साठी हे नक्किच समर्थनिय नाही ना.

आपला मुद्दा 'एखाद्याने किती घाबरावं?' हा आहे. वरील कारण जरी मान्य असलं तरी आपल्या चर्चे बाहेरील आहे.

महाराष्ट्रातील एक मोठा नेता ह्यांना पाठिंबा देतो कारण त्याच्या घरातील मुले ह्याच शाळेत शिकलीत नाव हव तर व्यनी करतो ...

इथेच मी व्यक्त केलेल्या भितीचे कारण आहे.

पण जो लढतो आहे त्याला पाठिंबा तर देउ शकतो त्याच्या मागे उभे तर राहु शकतो

तात्विक दृष्ट्या आदर्श परिस्थिती आहे. आपल्या म्हणण्याशी सहमत आहे. पण प्रत्येकावरील घरच्या जबाबदार्‍या, त्याची दडपणं आणि अंगचे धाडस ह्याचा विचार करता वैचारिक/नैतिक पाठींबा असणं आणि सक्रिय पाठींबा देणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सर्वसामान्याकडून सक्रिय पाठींब्याची अपेक्षा करता येत नाही.

आपले सर्व मुद्दे पटणारे आहेत. मी फक्त 'एखाद्याने किती घाबरावं?' ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

महेश काळे's picture

26 Jun 2012 - 3:47 pm | महेश काळे

त्या शीक्षीकेला बहुधा मसाला ईडली खुप आवडली असावी..
पा क्रु नक्की डकवा (फोटु सकट)... वाट पाहतो अहे

सर्वसाक्षी's picture

26 Jun 2012 - 4:31 pm | सर्वसाक्षी

इडली असे सांगितले तर कोणत्याही प्रकारची इडली चालायला हरकत नाही.

जर मसाला इडली नियमबाह्य तर इडली बरोबर चटणी आणणे सुद्धा नियमबाह्य कारण 'ईडली' असे लिहिले आहे, 'इडली चटणी' नाही! या न्यायाने इतर मुलांना का खाऊ दिली?

इथे उगाच शब्दच्छल करण्याचा हेतू नाही पण असे सांगितल्याने निदान शिक्षकांना समजेल की जर एखाद्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी असे वाटत असेल तर नियम अतिशय सुस्पष्ट, तपशिलवार व नि:संदिग्ध शब्दात मांडला गेला पाहिजे. तुम्हाला काय अभिप्रेत आहे ते इतरांना समजेलच असे नाही व तशी अपेक्षा करणे चुकिचे आहे.

सदर घटनेत विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा 'आमच्या शाळेत आमचा नियम चालतो, पाहिजे तर या नाहीतर फुटा' असा माजच दिसुन येतो.

आणि समजा मसाला इडली आणणे चुकिचे मानले तरी त्यासाठी लहान मुलाला उपाशी ठेवणे योग्य नाही. हा प्रकार वेळीच थांबवला पाहिजे, नपेक्षा उद्या दुसर्‍या कुणाला नियमात न बसणारा पदार्थ आणल्याबद्दल तो पदार्थ गळ्यात बांधुन वर्गात उभे करतील. हे वर्तन म्हणजे त्या शिक्षिकेची मनोविकृती समजुन शाळेने योग्य ती कारवाई करावी.

मिका, शाळेतली पुढची पीटीएम होण्याआधी जास्तीतजास्त पालकांना गाठा व त्या माजोर्ड्या शिक्षिकेला धडा शिकवा. किमान येथे आपली मनमानी चालणार नाही हे त्या शिक्षिकेला समजुद्या.
सर्वप्रथम मुख्याध्यापकांना निषेधाचे लेखी निवेदन द्या आणि या अमानुष वर्तनाची दखल घेण्यास भाग पाडा.

काळा पहाड's picture

27 Jun 2012 - 12:55 am | काळा पहाड

अगदी बरोबर. तिला हे ही सांगा की तुझा पगार आमच्यामुळे मिळतो. आम्ही पैसे भरतो. आणि ते फुकटचे नसतात. हा तुम्ही बिझनेस केला आहे तर आम्ही ही तसाच विचार करु. जर एखादा दिवस माझा पाल्य तुझ्या मनोविकृत नियमांमुळे शिकु शकला नाहि तर ते पैसे आम्ही तुझ्याकडुन वसुल करु.

माझ्यामते पालकसभेत विषय काढा व तिथेच मिटले तर उत्तम. नाहि तर लेखी निवेदन व प्रत्यक्ष मुख्याध्यापकांची भेट योग्य ठरेल.
मात्र
१. असल्या आचरट शिक्षिकेशी तुटेपर्यंत ताणू नका, शिक्षिकेला असे चालणार नाही इतपत जाणीव झाली की आवरते घ्यावे. नाहितर, उगाच मुलावर खुन्नस काढायची.
२. शिवाय त्या शिक्षिकेविरुद्ध पाल्यासमोरही प्रमाणाबाहेर बोलु नका, त्याच्या मनात सदर शिक्षिकेबद्दल कायमची अढी बसायची आणि तो त्या (हे वर्तन सोडून इतर वेळी) काही चांगले शिकवत असतील तर त्याकडेही दुर्लक्ष करायचा!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 Jun 2012 - 5:53 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

उगाच मुलावर खुन्नस काढायची

हो, हा त्रास ध्यानात आला आहे, मला माझे वडीलही हेच सागंत होते..
पण काहीतरी करावेच लागेल. सनदशीर मार्गाने करण्याचाच प्रयत्न करणार आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jun 2012 - 5:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> मुळात शाळांना असे निर्णय घेण्याचा आधिकार आहे कां ?

पहिले ते पाचवीपर्यंतच्या शाळेतील मुलांना शालेय शिक्षण विभागाची शालेय पोषण आहार नावाची एक योजना आहे, विद्यार्थ्यांना उष्मांक व प्रथिने मिळावीत या उद्देशाने तांदुळ, मोड आलेली कडधान्ये, तेल, मीठ जीरे-मोहरी, चवीनुसार काही ठरवून दिलेल्या वारांना मूग उसळ आणि भात, वाटाणा उसळ आणि भात, वगैरे असं आहे. हा कायदा खासगी शाळेतील ज्युनियर, सिनियर केजीला लागु होईल का ? आणि लागु होत असेल तर मुद्देसूद वाद घाला.

[खाली दिलेला शासन क्र. मला महाराष्ट्र शासनाच्या सायटीवर काही शोधता आला नाही. पण, जिल्हा परिषदांच्या सायटीवरुन खाली दिलेला जीआर उल्लेख मिळाला आणि तो जीआर शालेय पोषण आहाराचा नक्कीच आहे]

”शासन परिपत्रक जावक क्रमांक शापोआ / सुधायो / प्राशिसं ३०३ / २०१०-११ /२८५७ दिनांक १४-९-२०१० नुसार” शाळेत इडली वडा सागितला आहे का असे विचारा.

( तांदुळापासुन बनवलेला पदार्थ अशी पळवाट शाळेने काढली तर आपलं एक पाऊल मागे पडु शकतं. पण, सर्वांचाच जीआर वगैरेचा अभ्यास नसतो. )

काही मुद्दे मिळाले तर अजुन डकवतोच. बाकी, शिक्षक-पालक सभेमध्ये मुद्देसुद खडाजंगी होऊ द्या.
शुभेच्छा. :)

-दिलीप बिरुटे

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 Jun 2012 - 5:51 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

बहुमोल माहिती बद्दल धन्यवाद.
बरं झाल हे सांगितलेत.
आता इतर पालकांना गाठण्याचा प्रयत्न करतो आहे.

प्रभाकर पेठकर's picture

26 Jun 2012 - 6:06 pm | प्रभाकर पेठकर

तांदुळापासुन बनवलेला पदार्थ अशी पळवाट शाळेने काढली तर आपलं एक पाऊल मागे पडु शकतं.

इडलीत फक्त तांदूळ नसतात, उडिदाची डाळही असते. तसेच, इडली बनविताना 'आंबविणे' ही प्रक्रिया अंतर्भूत आहे. आयुर्वेदाने, आरोग्य दृष्टीकोनातून, आंबविलेले पदार्थ सेवनास मज्जाव केला आहे असे ऐकतो. (नक्की माहित नाही, माहिती काढावी लागेल). ह्या मुद्यावर पाऊल पुन्हा पुढे टाकता येईल.

डावखुरा's picture

26 Jun 2012 - 6:07 pm | डावखुरा

रोज भाजी-पोळी अथवा पौष्टिक खाद्य डब्यात असावे हा नियम आमच्या शाळेत पण होता..फक्त बुधवारी गणवेश आणि पौष्टिक डबा याला सुट्टी होती..
चुकुन जर ईतर दिवशी दुसरे काही नेले तर..तो डबा सर्व मुलांना वाटुन बाकीच्या मुलांच्या डब्यातील पोळी भाजी खावी लागे..

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 Jun 2012 - 6:12 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

चुकुन जर ईतर दिवशी दुसरे काही नेले तर..तो डबा सर्व मुलांना वाटुन बाकीच्या मुलांच्या डब्यातील पोळी भाजी खावी लागे..

हा पर्याय खरचं चांगला आहे. त्या मुलाला आणि त्याच्या पालकांना त्यांची चुक लक्षात येते आणि मुल उपाशीही राहत नाही.
हे सुचवायला हरकत नाही.

मुर्खपणाचे नियम आहेत हे सगळे, माझ्या पोराच्या शाळेत दररोज पोळी भाजी मस्ट आहे + एक सॅलड , फळ नाही. त्यामुळं काकडी टोमॅटो गाजर रिपिट होतं.

श्री. डावखुरा, तुमची अन माझ्या पोराची शाळा एकच आहे काय ओ, अगदी सेम टु सेम नियम आहे, आणि मधल्या सुटीची वेळ थोडीच असली तरी, दररोज पाच दहा मिनिटं मागं पुढं चालतं तिथं.

पण पोरं जाम डांबिस आहेत, डबा शाळेत थोडा खातात आणि मग घरी येताना बसमध्ये खात बसतात, यावरुन गेल्या वर्षी दोन वेळा माझ्या पोराच्या नावानं मिटिंगित बोंब झाली आहे.

अमृत's picture

26 Jun 2012 - 6:20 pm | अमृत

तक्रार करा. असले निर्णय आणि त्यांची मुर्खपणे केलेली अंमलबजावणी नक्कीच आक्षेपार्ह आहे. IBN Live Citizen Jernalist मधे पण संपर्क करू शकता.

अमृत

सहमत.
कोणी काय खावे ह्यावर कसली आलीये बंधने? माझ्या लहानपणी माझ्या आणी बहीणीच्या (तिची वेगळी होती) शाळेत (दोन्ही पुण्यातील नावाजलेल्या शाळा) असली काहीही बंधने नव्हती. पण तरीही आमच्या आणि मित्रांच्या डब्यात पोळी भा़जीच असे. क्वचित कधीतरी फोडणीचा भात नेला जाई. आणी काहिवेळेस ईडली चटणी, दही थालीपीठ, शनिवारच्या अर्ध्या शाळेला पोहे, उपीट, खिचडी असे पदार्थ न्यायचो. मांसाहारी पदार्थ कधीही कोणाच्या ही डब्यात पाहिले नाही. मेन्यु ठरवुन देणे आणि तेच पदार्थ डब्यात आणणे, शाळेत जेवण देणे आणि जे बनवले तेच मुलांनी खाणे हे म्हणजे हुकूमशाहीचाच प्रकार. आणि त्यातून इतक्या लहान मुलीला दिवसभर उपाशी ठेवणे हा तर कहरच झाला. माझ्या मुलाला कोबीची भाजी आवडत नसेल, उपीट आवडत नसेल तर का म्हणून त्याने ते बळेच खावे? तसेही हल्लीचे पालक मुलांबाबतीत जागरूक असल्याने डब्यात रोजच जंक फूड देणार नाहीत. आणी समजा असा विद्यार्थी आढळलाच तर तशी तक्रार शाळा पालकांकडे करू शकते आणी मुलाच्या डब्यात पौष्टिक जेवण आणण्याबाबत आग्रह धरू शकते.
मी सध्या जिथे रहातो तिथे सुदैवाने असला काहिही प्रकार नाही. शाळेत अल्प किमतीत पोटभर जेवण मिळते. महिन्याचा मेन्यू महिन्याच्या सुरवातीलाच मिळतो. मेन कोर्स मध्ये ३ पर्याय असतात. जोडीला दुध किंवा जूस, आणि सॅलड असते. त्यातून विद्यार्थी निवड करू शकतो. शाळेतले जेवण नको असेल तर घरूनही डबा आणू शकतो. रोज घरचे जेवण नेत असू आणी एखाद्या दिवशी शाळेतले खायचे असेल तर त्या दिवशीचे पैसे देऊन जेवण विकत घेता येते. कॅश मुलांना द्यायची नसेल तर मुलांच्या शाळेच्या खात्यात काहि रक्क्म टाकता येते. जेव्हा जेव्हा विद्यार्थी शाळेचे जेवण घेईल तेव्हा खात्यातील रक्कम कमी होते आणी एका मर्यादेनंतर पालकांना घरी बॅलन्स कमी झाल्याचे पत्रक मिळते. शाळा जेवण पुरवणार असेल तर ही पध्दत मला तरी योग्य वाटते.
आणी घरून डबा आणायचा झाल्यास शाळेने फारतर एक मार्गदर्शक मेन्यू द्यावा पण तेच पदार्थ आणावेत असे बंधन नसावे.

हल्लीचे पालक मुलांबाबतीत जागरूक असल्याने डब्यात रोजच जंक फूड देणार नाहीत.

दुर्दैवाने असं होत नाही. कधी मुलं हट्ट करतात म्हणून तर कधी सोय म्हणून कुरकुरे, चिप्स, रिंग्स, बटाट्याच्या तळलेल्या सळ्या किंवा तत्सम नि:सत्त्व पदार्थ देणारे पालक बरेच आढळतात.

मुक्त विहारि's picture

26 Jun 2012 - 6:48 pm | मुक्त विहारि

एकूणच माझा ह्या बाबतीय निर्णय योग्य ठरला..

प्रतिसाद खूपच मोठा झाल्याने , वेगळा धागा काढीन. राग मानू नये..

शुचि's picture

26 Jun 2012 - 8:15 pm | शुचि

(१) मुलगी खरच बोलली याचा शहानिशा करा.
(२) ते झाल्यावर शिक्षिकेला कारण विचारून पहा.
(३) तरी काम नाही झालं तर मुख्याध्यापकांशी संपर्क साधा.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

27 Jun 2012 - 11:04 am | मिसळलेला काव्यप्रेमी

नाही या बाबतीत माझी मुलगी खोटे नाही बोलायची.
तिला ती इडली खायला शाळा सुटल्यावर घरी पोहचेपर्यंतपण धीर निघत नव्हता. ;)

रेवती's picture

26 Jun 2012 - 8:38 pm | रेवती

हे जरा जास्तच नाटक होतय राव!
काय ते आठ दहा पदार्थ यादीत लिहा आणि त्यातला कोणताही, कोणत्याही दिवशी चालावा असे केल्यास आयांना त्यांच्या असलेल्या वेळेत सगळे प्रकार बसवता येतील. पदार्थाची अ‍ॅलर्जी असल्यास ठीक आहे. ती गोष्ट वेगळी.
लेकरांना उपाशी कशाला ठेवायचे?
वाढदिवसाला तर शाळेत चॉकोलेटस, बिस्कीटं बंद केली पाहिजेत. रोज कोणाचा तरी वाढदिवस असतोच. मग मुलं रोज हेच खाणार का?
माझ्या भावजयीनं तुम्ही लिहिलेला प्रकार मला सांगितला होतं पण इतकं सिरियसली त्याच्याकडे पाहिलं नव्हतं. अर्थात भाच्याच्या शाळेत इतकी सक्ती नाहीये. उत्तर भारतामुळे त्यांचा मेन्यु थोडा वेगळा आहे. अमूक एका वारी मिक्स व्हेज सामोसा द्या म्हणतात. त्या दिवशी तसा डब्यात नसल्यास शाळेतल्या किचनधून मुलांना तो दिला जातो आणि पन्नास रू. पालकांनी शाळेत पाठवून द्यायचे. 'टिकिया' डब्यात देण्याच्या दिवशी कोणत्याही प्रकारची टिक्की दिली तरी चालते.
शिवाय वेंडींग मशिन्स आहेत त्या शाळेत. त्यापासून मुलांना लांब ठेवणे ही सुद्धा एक डोकेदुखी झालीये पालकांना.
कशाला अमेरिकेला नावं ठेवायला हवीत? आता तर त्यांनीही ही मशिन्स काढून टाकली आहेत.

नितिन थत्ते's picture

26 Jun 2012 - 10:08 pm | नितिन थत्ते

समान नागरी कायदा असता तर असं ज़ालं नसतं.

काळा पहाड's picture

27 Jun 2012 - 12:45 am | काळा पहाड

शिक्षिकेला डोकं तपासून घे म्हणावं. तरीच् असले फालतू लोक असले अन-स्किल्ड जॉब करतात.

योगप्रभू's picture

27 Jun 2012 - 1:39 am | योगप्रभू

सगळेजण फुकटचे सल्ले देत असताना मला गप्प कसे बसवेल?

विषय विसरुन जा. नेक्स्ट टाईम पांढरी इडली द्या. शाळेशी आणि शिक्षकांशी पंगा घेऊ नका. तुम्ही बंड कराल आणि ते तुमच्या मुलीला मार्क करतील. त्यातून विरोध नोंदवायचाच असेल तर कन्व्हिन्सिंग भाषेत अनेक पालकांच्या सह्यांचे एक निवेदन शाळेकडे/विश्वस्तांकडे पाठवा. किमान दखल घेतली जाण्याची एक शक्यता असते.

मुक्त विहारि's picture

27 Jun 2012 - 1:45 am | मुक्त विहारि

कुठल्याही , कंपू बरोबर भांडण करू नये.शेवटी, इतर लोक पळून जातात आणि आपण मात्र भरडले जातो.शाळा असो, की कूठलेही, आंदोलन..

बॅटमॅन's picture

27 Jun 2012 - 12:43 pm | बॅटमॅन

+१!!!!

वेताळ's picture

27 Jun 2012 - 10:06 am | वेताळ

मॅडम कोण हे बाबाना विचारा.

शिल्पा ब's picture

27 Jun 2012 - 11:18 am | शिल्पा ब

एक पत्र लिहा ज्यात काय, कधी, कसे, कोणाबाबतीत अन कोणाच्यामुळे घडले ते सविस्तर तारीख वार वेळ घालुन लिहा. गोष्ट का महत्वाची आहे हे लिहा. जसे पौष्टीक दिलंय ते तुमच्या मेन्युत नाही म्हणुन आमचं बाळ उपाशी राहतंय हे.

एक कॉपी मुख्याध्यापक, एक कॉपी जे कोण संचालक / मालक अन एक पीटीओ ला द्या अन एक तुमच्याजवळ असु द्या.

अजुन अशाच केसेस असतील तर त्या पालकांशी बोलुन पीटीओ कडे न्या. पीटीओची एक मीटींग घ्या. अन चर्चा करुन प्रश्न कदाचित सुटेल.

शाळा भारीची दिसतेय म्हणुन अमेरीकन स्टँडर्डने कसं करायचं ते सांगितलं इतकंच.

बाकी ती बाई म्हणजे पुतनामावशीच दिसतेय. बिनडोक.

गवि's picture

27 Jun 2012 - 3:35 pm | गवि

बाकी ती बाई म्हणजे पुतनामावशीच दिसतेय. बिनडोक.

बेंद्रेबाई (अनुशासन पर्व फेम) का?

नाना चेंगट's picture

27 Jun 2012 - 2:08 pm | नाना चेंगट

ही शिक्षिका फावल्या वेळात कुठल्या मराठी संस्थळावरती संपादक नाही ना ह्याची खात्री करा आधी.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

27 Jun 2012 - 2:15 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

च्यायला नेमकी मिपावर असली तर मेलोच....
काय घाबरवता हो नान्स?? :-|