आज हा धागा वाचला आणि माझ्या विसापूर च्या भटकंतीच्या आठवणी ताज्या झाल्या. किस्सा तसा मोठा असल्याने वेगळा धागा काढला. (फोटो सापडल्यास नंतर डकवण्यात येतील)
जेव्हा पुण्यात शिकण्याच्या निमित्ताने नुकताच आलो होतो, तेव्हाचा हा किस्सा,
मी आणि माझा एक वर्गमित्र, दोघानाही गिर्यारोहणाची चढलेली नवखीच हौस! दोघंच जण कुठेही भटकायला जायचो, स्पोर्ट्स शूज वगैरे लाड कधी झाले नव्हते, तेव्हा चप्पल घालून जगभर भ्रमंती. (असे करता करता घोरोडेश्वर बरोबर तळेगाव, देहूरोड च्या जवळचे बहुतेक सगळे डोंगर, त्यावरील कोणत्या जगावेगळ्या वाटांनी भटकून झाले होते). लोहगड-लोहगड ऐकले होते, मग एकदा ठरवले कि जाऊया.
इकडे तिकडे चौकशी करून समजलं कि मळवली ला उतरून साधारण दीड तास चालत जावं लागतं. आणि मग फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी पहाटे लोकल ने मळवलीला उतरलो. तेथे चौकशी करून रस्ता वगैरे विचारून घेतला आणि पायपीट सुरु केली. डांबरी रस्ता संपला तेथेच एका हॉटेलसदृश ठिकाणी चापून मिसळ खल्ली. पुढे चालत चालत लोहगड च्या पायथ्याशी ९ - ९.३० च्या सुमारास पोहोचलो. पुढे गडाची पाहणी करत करत विंचूकाट्याकडे निघालो. मध्ये माकडे, साप, गरुड ई. वन्यजीवांचे दर्शन झाले. त्यांचे फोटो वगैरे काढून घेतले. कोणी माहितगार बरोबर नसल्याने (व भ्रमणध्वनी हा केवळ फोन घेणे, संदेश पाठवणे या लायकीचा असल्याने) कोठेही माहिती घेण्यासाठी थांबलो नाही. आसपासच्या डोंगरात तुंग, तिकोना एवढेच काय विसापूरच्या अस्तीत्वाची कल्पनाही नव्हती. वेड्यासारखे भटकणे म्हणजे काय ते हेच असावे.
विंचूकाट्याच्या वाटेत लागलेला तो दगड पाहून थोडी फाटलीच. होय-नाही करत त्याच्यावरून खाली उतरलो आणि गडाचे हे टोक गाठून, थोडे अजून फोटो काढून परत फिरलो.
मुख्य दरवाजाजवळ सावली आणि बसायला ऐसपैस जागा मिळाली. असेही १२.३० झालेच होते. म्हणले भोजन करून घेऊ. पाठीची शिदोरी काढली आणि खाऊ लागलो. जेवण आटोपत आलंच होतं तेवढ्यात गडाचा रखवालदार आला. कचरा करू नका वगैरे सूचना दिल्या, आम्ही म्हसोबासारख्या माना डोलावल्या, आणि तो निघून गेला.
सगळा सामान आवरून उरलेला अर्धा दिवस काय करायचं असा विचार चालू होता, एवढ्यात पोरांची एक टोळी आली. त्यांची जवळच कुठेसा विसापूर आहे अशी चर्चा सुरु होती. म्हणलं बरी कल्पना आहे, कोणालातरी विचारावं हा विसापूर आहे कुठे आणि असेल जवळ तर घ्यावा बघून!
सामान उचलून तसेच खाली पळत आलो आणि पायथ्याशी तोच रखवालदार पुन्हा भेटला. त्याला 'विसापूर कुठे ?' असं विचारलं, तर त्याने आम्हाला खुळ्यातच काढलं. समोर असलेला डोंगर म्हणजे विसापूर हे समजल्यावर आम्हालाही थोडं ओशाळल्यागत झालं. मग त्याला जायचा रस्ता विचारून घेतला आणि विसापूर च्या दिशेने कूच केलं. काळजीची बाब अशी होती कि आम्हाला रस्ता पूर्णपणे अनोळखी, लोहगडाप्रमाणे येणारे-जाणारे लोक जवळपास नाहीतच आणि आम्हा दोघांकडे मिळून जेमतेम अर्धा लिटर पाणी. पण जास्त काही विचार न करता चालत राहिलो. मधेच रखवालदाराने सांगितलेली ती पाण्याची वाट (कोरडी) दिसली. तिच्यामधून त्या गड-कम-डोंगरावर चढायला सुरुवात केली. दुपारचे २ वाजले होते, पोटातलं खाणं झोप आणत होतं आणि डोक्यावरील सूर्य घशाला कोरड पाडत होता. अर्धा- पाऊण तास लागला असेल पूर्ण चढाईला, पण तोपर्यंत जवळचे सगळे पाणी संपून गेले होते. कसेबसे आम्ही गडावर पोहचलो. वरती एक चिटपाखरूही दिसत नव्हतं. कोठेतरी थोडी सावली शोधून दोघांनीही थोडी वामकुक्षी घेतली.
३ - ३.३० च्या आसपास जाग आली. आमच्या मित्राच्या शिदोरीत २ जॅम ची पाकीट शिल्लक होती, ती संपवली. नंतर गड पाहण्यासाठी नाही तर पाणी शोधण्यासाठी भटकंती सुरु केली. अखेर एक पाण्याचं टाक दिसलं. मनसोक्त पाणी पिऊन मग आम्ही गड पाहायला सुरुवात केली. बऱ्यापैकी भटकंती झाल्यावर ५-५.१५ च्या सुमारास आठवलं कि आपल्याला त्या रखवालदाराने सांगितलेली "पलीकडे मळवलीजवळ उतरणारी" वाट माहीतच नाहीये! मग शोधाशोध सुरु!
मग काय, डोंगराच्या कडेकडेने गडाला प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. २० - २५ मिनिटानंतर अखेरीस "त्या" पायऱ्या आणि लगतचे मारुतीराय दर्शनी पडले. अगदी हायसं वाटलं.
[धन्यवाद - वल्ली ]
अंधार होऊ लागला होता. पहिल्या दहा मिनिटातच पायऱ्या संपून कच्ची वाटच सुरु होत होती. पुढील सगळा रस्ता म्हणजे भूलभूलैयाच वाटत होता. शेवटी रस्ता शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा अगदी सरळ सोपा उपाय शोधला. दूर कोठेतरी एक वाडी दिसत होती. असे ठरवले कि रस्ता काय हवा तसा असोत, सरळ त्या वाडीच्या दिशेने चालत जायचे. मग कधी घसरगुंडी करत, कधी ६-७ फुटावरून उड्या मारत, जवळपास धावतच त्या गावाकडे निघालो. ट्रेकला लोक शूज का वापरतात याची चांगलीच जाणीव या वेळात झाली. २-४ वेळा अगदी पडता पडता वाचलो. चपला आणि पायाची हालत अगदी बिकट झाली होती.
अखेरीस कसेबसे ७.३० च्या सुमारास त्या गावात पोहोचलो. वाटेवर एका घरात मागून अगदी भरपूर पाणी पिऊन घेतलं. तेथे असं समजलं कि हे पाटण गाव.
मग तिकडून चालत चालत आम्ही मळवली-स्टेशन गाठलं. आणि लोकल ने परत निघालो...
असा हा चांगलाच "अनुभव" पुढील ट्रेक्स साठी मोलाचे धडे देऊन गेला ते असे,
१. ट्रेकला जाताना रस्ते माहित असलेला एक तरी माणूस सोबत असावा (किंवा रस्त्याबद्दल व्यवस्थित माहिती तरी करून घ्यावी)
२.सोबत भरपूर पाणी असावे
३.शूज असल्याशिवाय ट्रेक ला जाऊ नये. (किमान चप्पल सदृश पादत्राणे तरी नसावीत)
४. ट्रेक म्हणजे केवळ भटकंती नाही तर, आपण जातो त्या गड-किल्ल्यांची व आसपासच्या परिसराची माहिती देखील करून घेणे. निरर्थक वेड्यागत भटकू नये.
बऱ्याच लोकांनी या सदरात भटकंती च्या दरम्यान काय करावे हे लिहिले आहेच. माझा हा ट्रेक म्हणजे, भटकंती दरम्यान काय करू नये यासाठी नक्कीच थोडी माहिती देणारा ठरेल!
प्रतिक्रिया
13 Jun 2012 - 8:21 pm | शिल्पा ब
सुचना नविन हायकर्स साठी उपयोगाच्याच आहेत पण वाईट अनुभव का बॉ? तुम्ही तयारीनिशी गेला नाहीत त्यामुळे फार तर वेगळा अनुभव नाव द्या. मला वाटलं गडावर वाईट अनुभव आला की काय!
14 Jun 2012 - 9:37 am | sagarpdy
नाव बदलण्यात आले आहे
13 Jun 2012 - 9:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मलाही वाटलं गडावर तुम्हाला काही वाईट अनुभव आला की काय. नेमका काय वाईट अनुभव आला असेल बॉ. असा विचार करता करता लेख संपला पण वाईट अनुभव काही वाचायला मिळाला नाही. वाईट म्हणजे, रखवालदारानं तुम्हाला चोपलं, लुटलं, असं असेल की काय असं वाटत होतं. असो, अनुभव छानच आहे. फक्त ट्रँकींगला काही विशेष तयारीनं गेलं पाहिजे, नाही तर थोडे हाल होतात असं म्हणायचं असावं.
असो.
-दिलीप बिरुटे
13 Jun 2012 - 9:17 pm | अत्रुप्त आत्मा
आमची पहिली सिंहगड ट्रीप अठवली, असाच काहिसा गोंधळ उडालावता.
14 Jun 2012 - 1:36 am | मोदक
चंदेरी इतक्या लवकर विसरला? ;-)
लेख वाचता वाचता डोक्यात आले होते की तुमची प्रतिक्रिया असणार.. आणि चंदेरीचा उल्लेख असणार.
सिंहगडावर काय झाले होते?
बाकी लेख मस्त रे सागर, सुदैवाने आत्तापर्यंत कधी पाणी संपणे, खूप जास्ती रस्ता भरकटणे वगैरे हाल झाले नाहीत. :-)
14 Jun 2012 - 10:09 am | अत्रुप्त आत्मा
@तुमची प्रतिक्रिया असणार.. आणि चंदेरीचा उल्लेख असणार.>>> पहिला अनुभव आणी नंतरचा अनुभव यात फरक असतो रे मोदका...! ;-) अर्थातच चंदेरी'चा तो दर्दनाक दिवस मी आयुष्यात इसरनार न्हाय..१ ;-)
14 Jun 2012 - 10:12 am | प्रचेतस
14 Jun 2012 - 10:23 am | मोदक
मेलो मेलो....
बुवा.. काय हे..?? :-D
:-D :-D :-D
14 Jun 2012 - 10:47 am | सूड
हा हा हा !! वारल्या गेलो आहे. :D
14 Jun 2012 - 11:15 am | ५० फक्त
बुवांचे बरोबर आहे, बुवा इथल्या व्यर्थ टिकेला घाबरु नका होत तुम्ही.
पहिला अनुभव येण्याच्या आधी तुम्ही अनुनभवी असता, आणि दुस-या वेळी सराव झालेला असतो अनुभवाचा, मग नंतर हळुहळु आत्मविश्वास येतो , अगदी दिवसा उजेडी, अंधारात, पाणी असताना - नसताना, डोंगरात, कडेकपारीत, बुरुजांच्या भिंतीवर, घसरडया उतारांवर, कारवीच्या रानात देखील भिती वाटत नाही, अंगावरच्या ओरखड्यांचा त्रास होत नाही, उलट ते मिरवले जातात. कधी पाय वेडेवाकडे पडतात, मुरगाळतात, पण मित्रात याची कारणं उघड करायला लाज वाटते.
अजुन काही काळ गेला की हाच आत्मविश्वास फा़जील आत्मविश्वास व्हायला लागतो मग एखाद्या बेसावध क्षणी पाय घसरतो, सॅकच्या बाहेरच्या कप्यातली बाटली फुटुन जाते, सगळं पाणी वाहुन जातं, आणि मग नंतर बराच काळ काहीही करता येत नाही,
.
.
.
.
.
.
.
.
.
मग काय हात पाय मोड्ल्यावर काय होणारंय, वेळ नको रिकव्हर व्हायला, बरोबर आहे हो बुवा तुमचं.
14 Jun 2012 - 11:27 am | प्यारे१
>>>मग काय हात पाय मोड्ल्यावर काय होणारंय
तुम्हाला गुडघे फुटल्यावर 'पण' म्हणायचं असेलच. ;)
बाकी, ५० राव, कृ शि सा न वि वि स्वीकारावा! :)
14 Jun 2012 - 11:30 am | सूड
एक नंबर प्रतिसाद !!
14 Jun 2012 - 6:57 pm | मी-सौरभ
सहमत
15 Jun 2012 - 12:25 am | मोदक
सहमतीला सहमती... :-)
14 Jun 2012 - 10:38 am | sagarpdy
14 Jun 2012 - 9:58 am | प्रचेतस
भारीच अनुभव रे.
पाटण गावातून वर चढणारी वाट जाम फसवी आहे. पण तितकीच सुंदर पण आहे. धोपटमार्गे विसापूरास जायला लोहगडाची वाट उत्तम.
15 Jun 2012 - 1:06 pm | खुशि
नमस्कार,
हा लेख वाचताना खुप वर्षापुर्वी पालीच्या गडावर आम्हाला आलेल्या अनुभवाची आठवण झाली.आम्ही किल्ल्यावर गेलो होतो सारा किल्ला बघुन झाला परत येण्यास निघालो,रस्ताच सापडेना फिरुन फिरुन एकाच जागी परत यायचो खुप घाबरलो होतो त्यात माझी तान्ही मुलगी घरीच ठेवुन आले होते तिची काळजी,दमणुक लागलेली तहान काय करावे सुचत नव्हते.फिरत असताना मला एक चमकणारा हिर्यासारखा गुलाबी खडा मिळाला होता,काका म्हणाले; तो खडा देवळात ठेवुन दे त्याच्यामुळेच चकवा होत असावा.मी तो खडा देवळात ठेवुन दिला नमस्कार केला आणि आम्ही पुन्हा निघालो थोड्याच वेळात आम्हाला खाली उतर्ण्याची वाट सापडली मी पळतच घरी आले,राणीला कुशीत घेतले.
23 May 2016 - 1:59 pm | स्थितप्रज्ञ
लोल