http://www.misalpav.com/node/21806
" दक्षिण भारतीयांच्या विचित्र उच्चार पद्धती व स्पेलिंग लिहिण्याच्या त-हा" या लेखावरील माझी प्रतिक्रिया म्हणून आणि आंतर्जालातील इकडून तिकडून आलेले खालील इ पत्र.
मध्यंतरी माझ्याकडे एक तामिळ मुलगी मराठी शिकायला येत असे. असेल आठवी-नववीत. पण
चेन्नईहून थेट पुण्याला; मग मराठीचा गंध कसाअसणार? थोडं शिकवल्यावर मी तिला कही छोटी पुस्तकं वाचायला दिली होती. एकदा तिने काही अडलेले शब्द लिहून आणले.तीन चार शब्दांचे अर्थ सगितले. शेवटचा शब्द होता-- लाव/लावणे. मी तिला म्हटलं, 'अगं, वाक्य लिहूनआणायचंस,नुसता अर्थ कसा सांगू? काहीही असू शकेल'. एका शब्दाचा/व्हर्बचा अर्थकाहीही? तिला कळेना.
'ओके, टेल मी ऑल द मीनिंग्ज'. ती म्हणाली.तिला वाटलं असतील दोन तीन अर्थ! पण मराठीचा इंगा तिला अजून कळायचा होता. मी मनात म्हटलं,चला, आजचा वेळ या लावालावीतच घालवू.
'हे बघ, तू मराठीचा क्लास लावला आहेस '.
'ओह्, आय हॅव जॉइंण्ड द क्लास '. लगेच वहीत क्लास लावणे =जॉइंन असं लिहिलं.
'क्लासला येताना तू आरशासमोर काय तयारी केलीस? पावडर लावलीस? '
'ओ येस '.
'आपण पार्टीला,फंक्शनला जाताना लिपस्टिक, कुंकू/टिकली लावतो. '
'येस, आय अंडस्टँड '.---टु अप्लाय. तिनं लिहिलं.
'पण आपण केसांना पिन्स, हेअरबॅंडही लावतो.तिथे तो अर्थ नाही होत '.
'ओके; वी पुट ऑन दॅट''.
'आता बघ. मी चहाचा कप तोंडाला लावला, आणि बेल वाजली. कालच्या तुझ्या पुस्तकात गाईने चाऱ्याला तोंड लावलं. आपण बाळाच्या गालाला हात लावतो. इथेकाय? प्रत्यक्ष स्पर्श करतो. टच्! 'चौथा अर्थ लिहिता लिहिता तिची ट्यूब पेटली. म्हणाली,हां, तुम्ही पार्कमधला बोर्ड वाचून दाखवला ना त्यादिवशी; फुलांना हात लावू नये. आणि त्या छोट्याला त्याची आई म्हणालीना, पुस्तकालापाय लावू नको. सो—टु टच्.
'मॅम, मी आले तेव्हा यू टोल्ड मी दार लाव. मीन्स शट् द डोअर '.
'हो. दार लाव किंवा दार बंद कर म्हणजे तेच '.
'मीन्स लाव,बंद कर सेम! पण मग तुम्ही दिवा लावतेम्हणता, देअर इट इज ऑपोझिट ऑफ दिवा बंद कर! '
'बरोबरच आहे. कारण दाराच्या बाबतीत लाव = शट् = बंद कर. पण दिवा लाव = स्विच ऑन.
म्हणूनच तुला म्हटलं वाक्य लिहून आण बाई! संदर्भ/रेफरन्स शिवाय नुसता लाव कसा समजणार? आणखी खूप ठिकाणी लावणे हे व्हर्ब आपणवापरतो, पण तुला आत्ताच एवढ्या गोंधळात नाही टाकत. '
'नो,नो. प्लीज टेल मी मोअर '. म्हणत ती उत्साहानं सरसावून बसली.
'बरं! आता अपण इलेक्ट्रिकचा दिवा, टी.व्ही, रेडिओइ. लावतो तेव्हा स्विच ऑन करतो.पण देवासमोरनीरांजन,उदबत्ती,समई लावतो तेव्हा काय करतो? लाइट ऑन! पेटवतो.फटाकेलावतो, आग लावतो, .गॅस लावतो = पेटवतो.' ती भराभरा लिहून घेत होती.
तेवढ्यात आतून कुकरची शिट्टी आली. 'बघ, मी कुकर लावलाय. दोघी हसलो. आधीचा कुठला अर्थ आहे का यात? खरं तर यात अनेक क्रिया आहेत. सगळ्याला मिळून एक सुटसुटीत शब्द—लावलाय.
आंघोळीचं पाणी लावलंय मधे असंच! '
'मी रोज सकाळी अलार्म लावते. ती अचानक म्हणाली आणि हसत सुटली. ओह्! एव्हरीथिंग इज सो डिफरंट! '
'सो कनक्लूजन? –एव्हरी लाव इज डिफरंट! ' जिगसॉ पझल घेऊन बसलेल्या नातवाला मी हाक मारली. तर तो म्हणाला, 'थांब गं आजी! मी हे लावतोय ना! '
'हे,लुक. तो लावतोय= ही इज अरेंजिंग द पीसेस. टु अरेंज! '
'तो शहाणा आहे.वह्या-पुस्तकं कपाटात नीट लावून ठेवतो. कपाट छान लावलेलं असतं त्याचं '.वहीत लिहून घेऊन ती उठली, गुड बॉय, असं त्याचं कौतुक करून ती घरी गेली.
पण माझं विचारचक्र चालूच राहिलं.आता मनाच्या अदृश्य स्क्रीनवर लाव,लावते, लावले हे सगळंबोल्ड मधे यायला लागलं.
रोजच कोणालातरी आपण फोन लावतो.
बडबड, कटकट करणाऱ्यांना आपण म्हणतो, ए, काय लावलंय मगापासून?आजीने कवळी लावली = फिक्स केली आणि आजी कवळी लावते म्हणजे रोज वापरते.(यूज)
पट्टा लाव=बांध. बकल, बटन लाव = अडकवबिया लावणे, झाडे लावणे = पेरणे, उगवणे.
इतके इतके मजूर कामाला लावले.(एम्प्लॉइड.)
वजन ढकलणारा,ओढणारा नेट/जोर लावतो. (अप्लाइज स्ट्रेंग्थ)
आपण वडिलांचं, नवऱ्याचं नाव लावतो म्हणजे काय करतो?सुंदर गोष्ट मनाला वेड लावते. या शब्दांच्या खेळानंही मला वेड लावलं.
इतक्यात आमची बाई आली. आल्याआल्याच म्हणाली, 'विचारलं काओसायबांला?' (मुलाच्या नोकरीबद्दल)
'विचारलं की, पाठव म्हणाले उद्या '.
'हा, मंग देते त्याला लावून उद्या'. (ओहो! लावून देते = पाठवते!)
आणि लावालावी मधे तर कोण,कुठे काय लावेल! अशी आपली ही मायमराठी! शिकणाऱ्याला अवघड, पण आपल्याला सुंदर!
साभार : इकडून तिकडून आलेले इ-पत्र.
प्रतिक्रिया
3 Jun 2012 - 12:40 pm | प्रभाकर पेठकर
गुगल ग्रुप मधून आलेला हा लेख इथेही वाचता येईल.
3 Jun 2012 - 1:00 pm | प्रास
छान आहे हे.
अनेक दिवसांपूर्वी पेठकरकाकांच्याच एका प्रतिसादात वाचल्याचं आठवतंय.....
3 Jun 2012 - 6:40 pm | तिमा
हे पत्र वा लेख, जो इंटरनेटवर फिरत आहे त्याचे मूळ ज्या लेखिकेचे आहे, तिला काहीच श्रेय न मिळता भलतीच मंडळी ते उपटत आहेत.
मूळ लेख हा सौ. चंदा कोलटकर यांनी ग्लोबलमराठी.कॉम यावर लिहिला आहे व तो अंजली रानडे यांनी संकलित केला आहे.
मूळ लेखाच्या खाली ही नांवे स्पष्ट आहेत. त्या ओरिजिनल लेखाची लिंक खाली देत आहे.
ही उठाठेव करण्याचे कारण म्हणजे हा लेख माझ्या बहिणीनेच लिहिला आहे. तो अचानक जालावर काहीही संदर्भ न देता फिरायला लागला तरी आम्ही लक्ष दिले नाही. पण आता हा मिपावर बघितल्यावर खुलासा करणे भाग पडले.
http://www.globalmarathi.com/20110919/5702686357179698581.htm
तिरशिंगराव
3 Jun 2012 - 6:52 pm | jaypal
एक प्रत ईमेल व्दारे मला पण आली होती. दुर्दैवाने त्या मधे सुध्दा लेखकाचे/ लेखिकेचे नाव नव्हते.
असो सौ. चंदा कोलटकरांचे एका चांगल्या लेखा साठी मना पासुन आभार व पुढिल लिखाणास हार्दीक शुभेच्छा.
अवांतर = एक विनंती आहे तिरशिंगराव , सौ.चंदा ताईना ईथे मिपा वर देखिल लिहीण्यास सांगाकी.
म्हंजे कस डायरेक भगवंता कढुन गिता ऐकवी तस लंबरी काम हुईल बघा.
3 Jun 2012 - 7:20 pm | प्रभाकर पेठकर
श्री. तिरशिंगराव माणूसघाणेसाहेब,
हे पत्र वा लेख, जो इंटरनेटवर फिरत आहे त्याचे मूळ ज्या लेखिकेचे आहे, तिला काहीच श्रेय न मिळता भलतीच मंडळी ते उपटत आहेत.
मलाही हा लेख ईमेलद्वारे आला होता. त्यातही मूळ लेखिकेचे नांव दिलेले नव्हते. मीही तो इथे मिसळपाववर देताना 'ईमेलद्वारे आलेला' असा ऋणनिर्देश केला आहे. माझा म्हणून खपवलेला नाही. कलंत्री साहेबांनीही तसे केलेले नाही. त्यामुळे श्रेय उपटण्याचा प्रयत्न मिसळपाववर तरी कोणीही करीत नाहिए.
आज मूळ लेखिकेचे नांव कळले. त्यांचे मनापासून अभिनंदन. त्यांच्या ह्या लेखाने आमचेही मन क्षणभर रिझविले आहे. तेंव्हा त्यांना आमचे धन्यवाद पोहोचवावे ही विनंती.
3 Jun 2012 - 8:46 pm | तिमा
मिपावरील कोणी श्रेय घेतात असे मी कधीच म्हणणार नाही. जे लोक हा लेख इ मेल द्वारे फिरवत आहेत त्यांना उद्देशून ते म्हटले होते.
@जयपाल, तुमचा निरोप त्यांना पोचवला आहे.
@ कलंत्रीसाहेब, व @प्रभाकर पेठकर,
माझ्या प्रतिक्रियेत तुम्हाला दुखावण्याचा हेतू नव्हता. तुम्ही ते लेखाच्या आधीच स्पष्ट केले आहे.
3 Jun 2012 - 8:50 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद श्री. तिरशिंगराव माणूसघाणेसाहेब.
3 Jun 2012 - 11:00 pm | सुधीर
लेख आवडला.
5 Jun 2012 - 3:09 pm | कलंत्री
चंदाताईंचा लेख अतिशय सुंदर होता. हा लेख मी मिपा वर टाकल्यामूळे अनेकांना खर्या लेखकाचा पत्ता मिळाला हेही नसे थोडके. याचबरोबर चंदाताईना अजूनही लिहायला / पुस्तक रुपात लिहण्यास विनंती करा.
लोभ असू द्यावा.
3 Jun 2012 - 1:12 pm | अविनाशकुलकर्णी
मराठी सदा बहार भाषा
१]सासू: किती वेळा सांगितले बाहेर
जाताना टिकली लावत जा..
सून: जीन्स वर कोणी टिकली नाही लावत अहो..
सासू: अग जीन्स वर नाही.. कपाळावर लाव..:)
२]डॉक्टर : तुमच्या आजाराचं नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाहीय. कदाचित दारू प्यायल्यामुळे हे होत असावं.
.पेशंट : हरकत नाही. तुमची उतरल्यानंतर येतो मी परत....
मराठी जशी वळवावी तशी वळणारी लवचीक भाषा...
म्हणून टिकणारी सदा बहार भाषा आहे.
शाब्दिक कोट्या कराव्यात तर मराठीतच
कावळा सरळ रेषेत का उडतो?
कारण तो विचार करतो..उगाच का वळा.
एक ना दोन अनेक किस्से.
.मराठी माणसास विनोदाची देणगी आहे...
कोल्हट कर..गडकरी ..अत्रे..पूल..विआ.बुआ ..शंकरपाटील..व अनेक मान्यवर यांनी मोलाची भर घातली आहे या वैभवात.
खवचट पणाने बोलावे .टोमणे मारावे...व त्याला तसेच प्रत्युत्तर द्यावे तर मराठीतूनच...आणी मराठी माणसानेच.
नाटक.तमाशातले विनोद..शाब्दिक कोट्या..प्रसंग निष्ट विनोद..द्व्यर्थी..कमरेखालचे..बोचरे...ग्राम्य
म्हणी..
एक ना अनेक प्रकार मराठीत आहेत..
मजा येते ..
हसा अन हसवा..
खूश राहा...
3 Jun 2012 - 1:39 pm | jaypal
लावालावी आवडली. अशीच लावत चला. पुढिल लावालवीसाठी शुभेच्छा
आवांतर = आता "घातली" या क्रियापदावरील लेखची वाट पाहणे आल.
3 Jun 2012 - 2:05 pm | बॅटमॅन
"मारणे" हे क्रियापद सांगली मिरज कोल्हापूर भागात असेच सर्वव्यापी आहे.
3 Jun 2012 - 6:59 pm | पक पक पक
"मारणे" हे क्रियापद सांगली मिरज कोल्हापूर भागात असेच सर्वव्यापी आहे.
आमच्या पुण्यात त्याला 'ठासणे' असे म्हणतात....
3 Jun 2012 - 8:34 pm | श्रीरंग_जोशी
सदर लेखाकरिता चंदा कोलटकर व अंजली रानडे यांचे अभिनंदन!!
चर्चाविषयाचे शीर्षक वाचून खालील वाक्ये आठवली...
माझिया मऱ्हाटीची काय बोलू कौतुके, परी अमृताही पैजा जिंके...! (संदर्भ - तरुण भारत वृत्तपत्राचे घोषवाक्य)
देवाचिया दादूलेपनाचा उबारा, न साहावेची साता हि सागरा, भेण वोसरूनी राजभरा, दिधली द्वारावती (संदर्भ - इयत्ता १०वीतील कुमारभारतीमधील पहिलाच पाठ 'नरिंद्रबासा भेटी अनुसरण' लेखक नेमके कोण यावर खात्रीदायक उत्तर नाही ).
आपला आपण करावा विचार, तरावया पार भवसिंधू...! (संदर्भ - इयत्ता १०वीतील कुमारभारतीमधील आचार्य विनोबा भावेंचा पाठ).
4 Jun 2012 - 12:04 am | JAGOMOHANPYARE
छान
4 Jun 2012 - 8:36 am | चौकटराजा
डॉक्टर : तुमच्या आजाराचं नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाहीय. कदाचित दारू प्यायल्यामुळे हे होत असावं.
पेशंट : हरकत नाही. तुमची उतरल्यानंतर येतो मी परत...
च्यायला हे लई भन्नाट हाय !
खरे तर जगात एकही भाषा अशी नाही( नसेल बहुदा) जी बरोबर १०० टक्के व्याकरणाप्रमाणे
चालते.
वाटणे - चटणी वाटणे, पेढे वाटणे, वाईट वाटणे या प्रकार मराठी शिकणार्या अमराठी माणसाला किती कटकटीचा वाटत असेल नाही ?
4 Jun 2012 - 10:05 am | ५० फक्त
लेख आधी कुठंतरी वाचलेलं आठवत होतं, तिमा, तुमच्या खुलाशाबद्दल धन्यवाद.
4 Jun 2012 - 12:08 pm | परिकथेतील राजकुमार
घाईघाईत 'भाषा' शब्द वाचायचाच राहीला.
असो..
4 Jun 2012 - 12:14 pm | शिल्पा ब
अहो, मग आधि घाईचं काम उरकुन मग निवांत मिपा मिपा खेळा..कसें?
4 Jun 2012 - 1:10 pm | प्रभाकर पेठकर
घाईघाईत 'भाषा' शब्द वाचायचाच राहीला.
फारच हातघाईला आलेले दिसताहात...
4 Jun 2012 - 2:24 pm | नाना चेंगट
मराठीचे महामहोपाध्याय प्रा डॉ यांचे मत वाचण्यास उत्सुक.
6 Jun 2012 - 9:18 am | नाखु
"मि.पा." वेल लावला
संपादकानी शिस्त लावली
डायरिया सभासदानी "जिलबी"टाकून वाट लावली.
वाचनमात्राना प्रतिसादाची सवय लावली.
तुमच्या धाग्याने मला हि यादी लिहायला लावली.
तुर्त ईतकेच पुरे...