नियुक्त खासदार - घटनेअंतर्गत आणि घटनाबाह्य

विकास's picture
विकास in काथ्याकूट
30 Apr 2012 - 11:52 pm
गाभा: 

तमाम भारतीयांच्या लाडक्या सचिनला राष्ट्रपतीनियुक्त राज्यसभा खासदारकी मिळणार म्हणल्यापासून विविध प्रतिक्रिया येणे स्वाभाविक होते. त्यात विशेष करून पक्षिय राजकारणाचा वाद देखील आलेला दिसून येतो. मला तो मान्य नाही असे आधीच स्पष्ट करतो. म्हणजे, सत्ताधार्‍यांनी यात राजकारण केले आहे यात शंका नाही. पण ते कोणीही केले असते. त्यात नवल नाही. पण घटने प्रमाणे: राष्ट्रपती नियुक्त खासदार हा कुठल्याही पक्षाचा नसतो. अर्थात त्याला/तिला सहा महीन्यात (हव्या त्या) पक्षात प्रवेश करण्याची मुभा आहे. पंडीत नेहरूंच्या शब्दातः "…The President has nominated some members of the Council of States who, if I may say so, are among the most distinguished, taking everybody in Parliament altogether – it is true, distinguished in arts, science, etc. – and our Constitution in its wisdom gave that. They do not represent political parties or anything, but they represent really the high watermark of literature or art or culture or whatever it may be."

लोकशाही असल्याने कुणी राजकारणात जायचे, जायचे असल्यास कुठल्या पक्षात जायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अमिताभ, राजेश खन्ना, गोविंदा, जयाप्रदा, हेमा मालिनी, वैजयंती माला, धर्मेन्द्र वगैरे अनेक लोकप्रिय कलाकारांनी राजकारणात (दिवे लावत) यशस्वी होण्याचा प्रयत्न केला. त्यात आता सचिनची भर पडली म्हणून आणि ती देखील केवळ काँग्रेसने नाव सुचवले म्हणून पोटशूळ उठायची काहीच गरज नाही असे वाटते.

पण तरी देखील एक महत्वाचा प्रश्न पडला, जो आशा करतो की काँग्रेसच्या आणि सचिनच्या मधे येणार नाही:

आजपर्यंत जे सरकार खासदारकी देण्यास तयार आहे तेच सरकार सचिनला भारतरत्न का देऊ शकले नाही? कारण भारताच्या प्रथम राष्ट्रपती राजेन्द्रप्रसाद यांनी भारतरत्न पारीतोषिक जाहीर केले तेंव्हा ते कला, वाड्मय, विज्ञान आणि समाजसेवा (Literature, science, art and social service) यांच्यापुरतेच मर्यादीत होते म्हणून. आता त्यात क्रिडा पण घातले गेले आहे. नियम बदलला गेला आहे. त्यामुळे आता मिळू शकेल आणि आशा करतो मिळेल.

पण राष्ट्रपती नियुक्त खासदारकी हे भारतरत्नापेक्षाही अधिक महत्वाचे प्रकरण आहे. कारण, नियुक्त खासदारकी हा राज्यघटनेचा भाग आहे. भारतीय घटनेच्या ८०व्या कलमा (आर्टीकल) नुसार राष्ट्रपती १२ व्यक्तींना खासदार म्हणून नियुक्त करू शकतात. पण घटनेत लिहील्याप्रमाणे:The members to be nominated by the President under sub clause (a) of clause shall consist of persons having special knowledge or practical experience in respect of such matters as the following, namely: Literature, science, art and social service (अधोरेखीत मी केले आहे).

भारतरत्नासाठीचा नियम बदलणे हे मंत्रिमंडळाला शक्य आहे. पण राष्ट्रपतीनियुक्त खासदारकीत "क्रिडा" क्षेत्र घालण्यासाठी घटनादुरूस्तीची अवशक्यता आहे असे वाटते. तशी घटनादुरुस्ती करून ८०व्या कलमात क्रिडाक्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे का? मी जे काही शोधण्याचा प्रयत्न केला त्यातून तरी काही त्या पुष्ट्यर्थ मिळालेले नाही. आत्ता पर्यंत केवळ दारासिंग हाच राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे जो खेळाडू आहे, पण त्याच बरोबर कलाकार देखील आहे (म्हणून शक्य झाले).

मग सचिनची अशी नियुक्ती करणे हे घटनाबाह्य ठरणार नाही का? तुम्हाला काय वाटते अथवा यासंदर्भात माहीत आहे? एकदा का सचिनने खासदारकीवर सही केली त्याचे नंतर हसे होऊ नये म्हणून हा प्रश्न आहे.

प्रतिक्रिया

सुहास..'s picture

30 Apr 2012 - 11:53 pm | सुहास..

लोहा गरम है , मार दो हतौडा !!

सचिनपण कलाकार आहे.. पेप्सीची जाहिरात पाहिली नाही का? जाहिरातीत काम करणारा कलाकार नसतो का?

विकास's picture

1 May 2012 - 12:07 am | विकास

जाहिरातीत काम करणारा कलाकार नसतो का?

कायद्याने तसा कलाकार धरावा का नाही याची कल्पना नाही.

शिवाय मग भारतरत्न देण्याच्या संदर्भात त्याला कलाकार का मानला गेला नाही?

भारत रत्न व्हायला त्याची कलाकारी पुरेशी नसेल, पण एवढ्या कलाकारीवर तो खासदार होऊ शकतो.

पैसा's picture

1 May 2012 - 12:05 am | पैसा

सचिन जाहिरातीत काम करतो की, म्हणजे तो पण कलाकार झाला ना! :D

अर्थात खेळत असताना त्याने भारतरत्न, किंवा खासदारकी यांच्या फंदात पडणं योग्य नाही असं मला वाटतं. (माझ्या वाटण्याला कोण काय विचारतोय म्हणा!)

हे खासदार वेगवेगळ्या समित्या वगैरेंवर नियुक्त होतात, मग या सरकारमधील स्थानाचा सहजच गैरवापर होऊ शकतो. असा फायदा करून न घेणारा एखादाच कोणी चुकून सापडेल

विकास's picture

1 May 2012 - 12:10 am | विकास

हे खासदार वेगवेगळ्या समित्या वगैरेंवर नियुक्त होतात, मग या सरकारमधील स्थानाचा सहजच गैरवापर होऊ शकतो.

अंशत: सहमत. जो पर्यंत एखादी व्यक्ती तसा गैरवापर करत नाही तो पर्यंत ती गैरवापर करेल असे समजू नये असे वाटते, मग ती व्यक्ती सचिनच काय अगदी कलमाडी असली तरी. ;)

गंमतीचा भाग दूर जाउंदेत. सचिन राजकारणात आला तर मला खरेच काही आक्षेपार्ह वाटणार नाही. अर्थात तो आला तर चांगले काम करेल, चांगलेच कशाला काही काम करेल अथवा करणार नाही, अशी कुठलीच आशा.निराशा मी त्याच्याबद्दल ठेवणार नाही आणि केवळ शुभेच्छा देईन.

चांगले काम केले तर उत्तम, नाही केले तर अजून एक आणि मार खाल्ला तर, "जेणो काम तेणो थाय, बिका करेसे गोता खाय" असे म्हणणार. पण त्याच्याकडून चांगले घडू शकेल असे तरी देखील वाटते:-)

पैसा's picture

1 May 2012 - 10:21 am | पैसा

मला इतकंच वाटतं की सचिन केवळ खेळामुळे मोठा झाला, तेव्हा खेळत असतानाच त्याने इतर "पालथे धंदे" करू नयेत, तर खेळावरच लक्ष केंद्रित करावं. खेळातून रिटायर झाल्यावर त्याच्यापुढे अजून बरंच आयुष्य असेल, आणि तेव्हा त्याला जे आवडेल ते खुशाल करू दे की! अगदी निवडणुकीचं राजकारण केलं तरी काय फरक पडतो? पण खासदार सचिन तेंडुलकर आय पी एल मधे खेळतायत हे ऐकायला जरा कसं तरीच वाटतं!!

सचिन सोशल सर्विस सुद्धा करतो.

विकास's picture

1 May 2012 - 12:15 am | विकास

मग त्यासाठी देखील भारतरत्न देयला हवे होते असे म्हणेन.

JAGOMOHANPYARE's picture

1 May 2012 - 12:23 am | JAGOMOHANPYARE

पुन्हा तेच! त्याची सोशल सर्विस भारत रत्न मिळायला पुरेशी नसेल, पण ती खासदारकीला पात्र असेल

विकास's picture

1 May 2012 - 12:30 am | विकास

घटनेत म्हणले आहे, "...persons having special knowledge or practical experience in respect of such matters as the following, namely: Literature, science, art and social service"

आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे, सचिनला सोशल सर्विस मध्ये special knowledge or practical experience असेल तर ठीकच आहे.

चर्चा प्रस्तावात आणि इतर प्रतिसादार म्हणल्याप्रमाणे, सचिनला खासदारकीसाठी नियुक्त करण्याच्या मी विरोधात नाही. पण ते घटनाबाह्य ठरू नये इतकेच म्हणणे आहे.

रामपुरी's picture

1 May 2012 - 2:13 am | रामपुरी

"सचिनला सोशल सर्विस मध्ये special knowledge or practical experience असेल तर ठीकच आहे."
सत्यसाईबाबाचा सोन्याचा पुतळा नाय दिला? विसरला काय राव इतक्यात? म्हणूनच तर हे खासदारकीचं बक्षीस मिळालंय. सत्यसाईबाबा लय पावरफुल माणूस. उगीच नाय.

पिवळा डांबिस's picture

1 May 2012 - 12:52 am | पिवळा डांबिस

नंतर हसे होऊ नये म्हणून हा प्रश्न आहे.
जनतेच्या हसण्याच्या जीवावर उठणारे तुम्ही आमचे मित्र आहांत याची आज मिपाकर म्हणून आम्हाला शरम वाटते!!!
:(
पण ते घटनाबाह्य ठरू नये इतकेच म्हणणे आहे.
अहो घटना, घटना काय करत बसलाहांत?
असो बदलू!!! त्यात काय!! ;)
जनतेच्या मर्जीपेक्षा घटना मोठी नाही हे आपल्या मान्नीय पुढार्‍यांनी (अण्णा, बाळासाहेब वगैरे) वेळोवेळी (म्हणजे वेगवेगळ्या त्यांच्या सोईच्या वेळी!) सागितलं नाहिये काय?
अरे या औटडेटेड विकासरावाला जुनी वर्तमानपत्रं पाठवा रे कुणी तरी!!!
:)

| खासदारकी तो झाँकी है, पंतप्रधानकी अब बाकी है |

-स्वयंघोषित स्वयंसेवक,
सचिनसेना

अर्धवटराव's picture

1 May 2012 - 1:09 am | अर्धवटराव

>>-स्वयंघोषित स्वयंसेवक,
>>सचिनसेना

-- हाण्ण तिच्या आयला. बेक्कार हसलो. (आता यात एव्हढे हसण्यासारखे काय असे विचारु नये. सचीन जर जाहिराती करुन खासदारकीलायक अभिनेता ठरु शकतो, वा जो काहि दान धर्म करुन एक्स्ट्रॉर्डनरी समाजसेवक ठरु शकतो तर हा विनोद आम्हाला फुटेस्तो हसण्यालायक का वाटु नये? )

अर्धवटराव

विकास's picture

1 May 2012 - 1:58 am | विकास

हसायला लावणे, ही देखिल एक कला आहे. ;)

विकास's picture

1 May 2012 - 1:57 am | विकास

जनतेच्या हसण्याच्या जीवावर उठणारे

नाही हो... तसे नाही. म्हणजे जनतेला हसू दिले तर ते केवळ या संदर्भात सचिनच्या विरोधात असलेल्या जनतेला हसू दिले असे होईल ना...

अहो घटना, घटना काय करत बसलाहांत? असो बदलू!!! त्यात काय!!

अहो मला देखील असेच म्हणायचे आहे. फक्त आधी घटना बदला नाहीतर उगाच कोणीतरी बदला घेयचे. :-)

जनतेच्या मर्जीपेक्षा घटना मोठी नाही हे आपल्या मान्नीय पुढार्‍यांनी (अण्णा, बाळासाहेब वगैरे) वेळोवेळी (म्हणजे वेगवेगळ्या त्यांच्या सोईच्या वेळी!) सागितलं नाहिये काय?

अण्णांच्या बाबतीत ते चळवळे आहेत त्यामुळे ते घटनादुरूस्तीच्या मागे लागले आहेत. त्यांनी कुठली घटना मोडल्याचे ऐकीवात नाही. बाळासाहेबांच्या बाबतीत - घटना मोडली का ते माहीत नाही, पण जेंव्हा शिवसेना निवडणुकीच्या राजकारणात शिरली तेंव्हा त्यांना राजकीय पक्ष म्हणून घटना मान्य करणे बंधनकारक ठरले. म्हणजे असे, की शिवसेनेत पण (घटनेने सांगितल्याप्रमाणे) दरवर्षी का ठरावीक वेळेने पक्षांतर्गत निवडणूका होतात, अध्यक्ष आणि पदाधिकारी ठरतात वगैरे... बाकी सरकारला घटना पाळणे सगळ्यात जास्त बंधनकारक असते. कारण ते घटनेचे रक्षक असते ना! ;)

| खासदारकी तो झाँकी है, पंतप्रधानकी अब बाकी है |

यात खासदार आणि पंतप्रधानाच्या मागे तुम्ही मराठीतील "की" लावत हिंदी वाक्प्रयोगात वापरला आहे, त्यामुळे जरा अंमळ अर्थ वेगळा होत आहे का असे वाटले ;)

-स्वयंघोषित स्वयंसेवक, सचिनसेना
मी पण!

चिरोटा's picture

1 May 2012 - 8:56 am | चिरोटा

(अपेक्षेप्रमाणे)-
About Sachin's nomination, constitutional expert and former LS secretary general Subhash C Kashyap said there was nothing unusual about a sportsperson being placed in the 'social service' category. "It looks like stretching it a little bit, but the government had been doing it in the past," he said.
http://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/series-tournaments/sac...

social service ची डिक्शनरी व्याख्या
an organized activity to improve the condition of disadvantaged people in society
(वकिल) पी.चिदंबरम ह्यानी सचिनची नियुक्ती पूर्णपणे घटनेअंतर्गत आहे असे म्हंटले आहे. सरकार social service आणि क्रिकेटचा संबंध कसा लावणार माहित नाही. social service ची व्याख्या सरकार आपल्या आवडीनुसार करणार हे ओघाने आले.

विकास's picture

1 May 2012 - 9:52 am | विकास

पण मग ह्याच न्यायाने त्याला (अथवा इतर कोणत्याही खेळाडूस) भारतरत्न का दिले गेले नाही?

तसेच दारासिंगला जरी राज्यसभासदस्य केले गेले तरी त्यात खेळाडी (स्पोर्ट्समन) बरोबरच "कलाकार" (आर्टीस्ट) असे का अधिकृतपणे सांगितले गेले?

तसेच तुम्ही दिलेल्या बातमीत Elected: Dilip Tirkey (hockey) 2012 असे तसेच लोकसभेतील अनेक खेळाडूंची नावे दिली आहेत. पण त्यातील कोणीच नियुक्त केले गेलेले नसून निवडले गेले आहेत. निवडून काय तुम्ही-आम्ही देखील जाऊ शकतो. :-)

social service ची व्याख्या सरकार आपल्या आवडीनुसार करणार हे ओघाने आले.

सहमत. पण सचिनला असले कायदेशीर खेळ खेळायची गरज आहे का?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

2 May 2012 - 10:29 pm | निनाद मुक्काम प...

दारा सिंग त्यांचा गांधी परिवाराशी असलेल्या जवळकी मुळे खासदार बनला.

विकास's picture

2 May 2012 - 11:33 pm | विकास

फोटो एकदम मस्त आहे! :-)

पण गांधी परीवाराशी जवळीक असल्याने खासदारकी मिळाली तरी ती घटनेच्या चौकटीतच होती. त्यामुळे काही बिघडले असे मला वाटत नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 May 2012 - 1:52 am | निनाद मुक्काम प...

अनेक नादान राज्यकर्ते हे घटनेच्या चौकडीत देशाच्या मोठ्या पदावर निव्वळ हुजरेगिरी करून बसतात. त्यांचे सात पिढ्याचे भले होते.
सामान्य जनतेच्या तोंडाला पाने आणी लायक व कर्तुत्ववान व्यक्तींच्या नशिबी उपेक्षा आणी अपमान

नवाब सैफ अली ह्यांना पद्म्रश्री आणी नाना पाटेकरला....
अशी शेकड्याने उदाहरणे आहेत.

नितिन थत्ते's picture

3 May 2012 - 9:56 am | नितिन थत्ते

चालायचंच.

पद्मजा फेणाणींना पद्मश्री आणि आशा भोसलेंना काही नाही असं होतच असतं.

विकास's picture

3 May 2012 - 4:17 pm | विकास

आशाताईंना पद्मविभूषण (सचिनच्या आणि प्रणवकुमार मुखर्जींच्यासोबतच) मिळाले आहे. त्याला वेळ लागला (२००८) तसेच तो पर्यंत एकही पद्म मिळाले नव्हते हे वास्तव आहे. (बर्‍याचदा आधी पद्मश्री वगैरे मिळाले असते).

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 May 2012 - 8:17 pm | निनाद मुक्काम प...

फेणाणी ह्याचे संगीतात स्वतःचे एक स्थान आहे
सैफ नसीर आणी पकंज कपूर ह्या लोकांच्या श्रेणीत अभिनयाच्या बाबतीत अजिबात बसत नाही. आणी शाहरुख आणी सलमान इतका लोकप्रिय स्टार नाही.
त्याची समाजसेवा सुद्धा समाजाला माहित नाही. त्यामुळे राजकीय लागेबांध हा एकमात्र निकष लागतो. आम्ही आता सोनाक्षी आणी विवेक ला सुद्धा कधी पद्मश्री मिळत आहे ह्याची वाट पाहत आहोत.
चाचा ह्यांच्याकडून अश्या बेजबाबदार तुलनेची अपेक्षा नव्हती.

नितिन थत्ते's picture

3 May 2012 - 9:40 pm | नितिन थत्ते

मी तर मूळ मुद्द्याला सहमतीच दर्शवली आणि आणखी एक उदाहरण दाखवले. :)

>>फेणाणी ह्याचे संगीतात स्वतःचे एक स्थान आहे

असेल ब्वॉ. पण ते आशा भोसले यांच्या मुळीच जवळपासचे नाही. (आशा भोसले यांच्या आधी पद्मश्री देण्यासारखे नाही/नव्हते)

>>सैफ नसीर आणी पकंज कपूर ह्या लोकांच्या श्रेणीत अभिनयाच्या बाबतीत अजिबात बसत नाही.

मान्य आहे. पण अशीच तुलना आशा भोसले आणि पद्मजा फेणाणी यांच्यात करता येईल. पक्षी पद्मजा फेणाणी यांचे आशा भोसले यांच्या तुलनेत जे स्थान आहे तितके सैफ अली खान याचे नाना पाटेकरच्या तुलनेत असू शकेल.

पद्मजा फेणाणी यांना २००१ मध्ये पद्मश्री का मिळाले याचे कारण त्यावेळी सर्वश्रुत होते. आणि त्यावर बरीच टीकाही झाली होती.

फारएन्ड's picture

1 May 2012 - 10:53 am | फारएन्ड

तो जोपर्यंत खेळतोय तोपर्यंत इतर फंदात पडू नये. नंतर तो काय ठरवेल ते त्याचे वैयक्तिक निर्णय.

बाकी घटनात्मक वैधतेबद्दलः एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने याबद्दल आक्षेप घेऊन प्रकरण न्यायालयात नेले तर एखादा न्यायाधीश हे अवैध ठरवेलही. कारण "क्रीडा" हा स्पष्ट उल्लेख नाही. पण हा खटाटोप करत बसण्याची गरज कोणालाही वाटणार नाही.

चिरोटा's picture

1 May 2012 - 11:14 am | चिरोटा

भारतरत्नासाठी वयाची मर्यादा नसली तरी काही अलिखित नियम आहे का ?
विकिपिडियानुसार एकूण ४१ व्यक्तींना भारतरत्न मिळाले आहे. (http://en.wikipedia.org/wiki/Bharat_Ratna )
ह्यातल्या मरणोत्तर पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती आहेत ११. म्हणजे ३० व्यक्तींना हयात असताना पुरस्कार मिळाला आहे.
भारतरत्न मिळण्याचे सरासरी वय आहे- २३४३/३०.. साधारण ७८
(ह्यात "नोबेल मिळाल्याने भारतरत्न देण्यावाचून पर्याय नव्हता" अशा व्यक्ती वगळल्यात तर सरासरी वय आणखी वाढेल.म्हणजे सी.व्ही.रामन्,अमर्त्य सेन).

नितिन थत्ते's picture

1 May 2012 - 11:22 am | नितिन थत्ते

फलंदाजी ही कला नाही का?

विश्वनाथ, अझरुद्दिन यांच्या फलंदाजीला कलात्मक म्हटले जात असल्याचे आठवते. तशी सचिनची फलंदाजी कलात्मक नसते का?

दारासिंगचा प्रिसिडंट असेल तर प्रश्नच उद्भवत नाही.

क्लिंटन's picture

1 May 2012 - 12:18 pm | क्लिंटन

तांत्रिकदृष्ट्या विकास यांचा मुद्दा बरोबर आहे असे वाटते पण त्याअंतर्गत सचिनच्या राज्यसभेवरील नियुक्तीस कोणी न्यायालयात आव्हान दिले तर तो मुद्दा न्यायालयात कितपत टिकेल याबद्दल शंका आहे.

घटनेत म्हटल्याप्रमाणे: "The members to be nominated by the President under sub clause (a) of clause shall consist of persons having special knowledge or practical experience in respect of such matters as the following, namely: Literature, science, art and social service" असे असेल तर यात "social servic"" अंतर्गत अनेक गोष्टींचा अंतर्भाव होऊ शकेल. आजही लोकसभेच्या संकेतस्थळावर सध्याच्या आणि पूर्वीच्या अनेक लोकसभा सदस्यांचे "प्रोफेशन" हे "Social worker" हे आहे. आता "Social worker" हा नक्की काय प्रकार आहे? त्याची नक्की व्याख्या काय? की "इतर" अनेक गोष्टींना encompassing अशी ही term आहे? सचिनने सुमारे ४०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या खर्चाचा वाटा उचलला आहे असे वाचले आहे. तेव्हा हे समाजसेवेअंतर्गत नक्कीच क्लेम केले जाऊ शकेल. तसेच त्याने काही समाजसेवी संस्थांना देणगी दिली असेल तर ती पण एका प्रकारची समाजसेवाच आहे असा दावा त्याने केल्यास कायद्याच्या दृष्टीने त्याला खोटे कसे ठरवणार?

राज्यसभेवर १९९९ मध्ये लतादिदींबरोबरच रा.स्व.संघाचे नानाजी देशमुख आणि कायदातज्ञ फाली नरीमन यांचीही नियुक्ती राष्ट्रपतींनी केली होती. त्यात नानाजींच्या संघटनेविषयी किंवा त्या संघटनेच्या विचारसरणीविषयी कितीही मतभेद असले तरी ते समाजसेवक होते हे संघविरोधकांनाही मान्य व्हावे. पण फाली नरीमन यांचे काय? ते साहित्य, विज्ञान किंवा कला या क्षेत्रात नक्कीच मोडत नव्हते. इतकेच काय तर त्यांनी भोपाळ दुर्घटनेतील कुप्रसिध्द डाऊ केमिकल्सचे वकिलपत्र घेतले होते. तसेच ते International Arbitration मधील तज्ञ समजले जातात. सध्याच्या काळात भारतातील कंपन्यांचे परदेशातील कंपन्यांशी व्यवहार खूपच वाढले आहेत. त्याअंतर्गत समजा दोन कंपन्यांमध्ये काही मतभेद झाले तर ते मतभेद या कंपन्या न्यायालयातील वेळखाऊ प्रक्रिया कमी करायच्या उद्देशाने लवादाकडे (arbitrator) देतात त्या क्षेत्रातले ते तज्ञ आहेत.तेव्हा नरीमन यांचा समाजसेवेशी नक्की काय संबंध आहे याची कल्पना नाही. तरीही ते "समाजसेवक" या अंतर्गत राज्यसभेत जाऊ शकले.

मला वाटते सचिनबाबतही असेच काहीसे म्हणता येईल.

चिरोटा's picture

1 May 2012 - 3:05 pm | चिरोटा

तसेच त्याने काही समाजसेवी संस्थांना देणगी दिली असेल तर ती पण एका प्रकारची समाजसेवाच आहे असा दावा त्याने केल्यास कायद्याच्या दृष्टीने त्याला खोटे कसे ठरवणार?

सचिनचे हे काम कौतुकास्पद आहेच पण अशा देणग्या देणार्‍या व्यक्ती भारतात अनेक असू शकतील, नव्हे आहेतच. तेव्हा हा criteria असता कामा नये.

विकास's picture

1 May 2012 - 7:46 pm | विकास

सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. सुरवातीस म्हणल्याप्रमाणे सचिनच्या खासदारकीमधे अडथळा आणण्यासाठी म्हणून नाही तर तसा तो येणार नाही ना ह्या संदर्भात चर्चा चालू केली होती...

चिरोटा यांनी म्हणल्याप्रमाणे मला देखील, "४०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या खर्चाचा वाटा उचलणे" काही समाज सेवक म्हणून काम वाटले नाही. पण ते व्यक्तीगत मत झाले.

मुद्दा इतकाच मांडला होता की घटनेत ते बसते का... जर भारतरत्न घटनासिद्ध पारीतोषिक नसताना देखील नियमात बदल केल्या शिवाय क्रिडा क्षेत्रात देता येत नाही तर हे घटनासिद्ध खासदारकीच्या बाबतीत (भारतरत्नाचेच नियम असताना) कसे चालवून घेतले जात आहे, हा प्रश्न आहे.

तुम्ही (क्लिंटन) म्हणलात त्याप्रमाणे: १९९९ साली, राज्यसभेत लतादिदींना नियुक्त केले पण त्या कलाक्षेत्रातील म्हणून घटनेप्रमाणेच. तेच नानाजी देशमुखांच्या बाबतीत ज्यांचे समाजसेवक म्हणून काम प्रसिद्ध आहे.

कायदातज्ञ फाली नरीमन यांच्याबाबतीत मात्र "इंटरेस्टींग" प्रकार वाटला. :-) पण त्यांना समाजसेवक म्हणून नियुक्त केले गेले नव्हते. राज्यसभेच्या संस्थळावरील माहितीनुसार त्यांचे ""senior advocate" म्हणून नियुक्त केले होते. असेच काहीसे २००६ साली शोभना भाटीया "पब्लिशर", ९० साली जगमोहन यांना अ‍ॅडमिनिस्ट्रेटर म्हणून नियुक्त केले गेल्याचे दिसले. मला वाटते, हे आणि असेच सर्वजण, "special knowledge or practical experience in respect of such matters as literature, science, art and social service" या वाक्यातील literature, science मधे बसवले असावेत.

वर थत्त्यांनी, "दारासिंगचा प्रिसिडंट" असे म्हणले आहे. ते पटणारे नाही. कारण, दारासिंगच्या बाबतीत आधी देखील म्हणल्याप्रमाणे, राज्यसभेने त्यांचे "आर्टीस्ट" असणे पण स्पष्टपणे सुचीत केले आहे. (थोडक्यात खेळाडू म्हणून नाही तर आर्टीस्ट म्हणून असे...)

Ravindra's picture

1 May 2012 - 3:21 pm | Ravindra

सचिन हा फारच चांगला माणूस आहे. आणि त्याला टेन्शन सहन होत नाही. [त्याने कप्तानी सोडल्यावर त्याची लडखडणारी फलंदाजी परत सुधारली]. राजकारणामध्ये काहीही उपयोगी काम करणे त्याला शक्य होणार नाही. आरामात राहिला तर काही फरक पडणार नाही. खरच काही करायला गेला तर अमिताभ बच्चन सारखी त्याची स्थिती होईल. तसे होऊ नये अशी इच्छा.

नावातकायआहे's picture

1 May 2012 - 9:31 pm | नावातकायआहे

बघेल ना त्याच तो.
सचिनची ओळख "क्रिकेट" आहे. तेवढिच ठेवा....

सुधीर१३७'s picture

2 May 2012 - 10:10 am | सुधीर१३७

The members to be nominated by the President under sub clause (a) of clause shall consist of persons having special knowledge or practical experience in respect of such matters as the following, namely: Literature, science, art and social service

>>>>>>>>>> वरील अधोरेखित शब्द वाचले तर लक्षात येईल की, घटनेने अशा स्वरुपाच्या असा शब्दप्रयोग केला आहे, त्यामुळे "साहित्य, शास्त्र, कला आणि समाजसेवा" यापुरताच मर्यादित असा त्याचा अर्थ लावता येणार नाही तर "साहित्य, शास्त्र, कला आणि समाजसेवा वगैरे" असा अर्थ होतो . म्हणूनच ही निवड पूर्णपणे वैध ठरते.

चिरोटा's picture

2 May 2012 - 11:07 am | चिरोटा

म्हणजे वगैरे मध्ये सोयीनुसार काही घालायचे तर.... हे असे संदिग्ध कशाला ठेवतात घटना लिहिणारे?

परिकथेतील राजकुमार's picture

2 May 2012 - 11:55 am | परिकथेतील राजकुमार

१) पालथे धंदे हे खेळ ह्या प्रकारात मोडतात का ?

२) व्यनीतून चालणारी कट कारस्थाने राजकारण / समाजकारण ह्या सदरात मोडतता का ?

३) वेगवेगळे आयडी लिलया वापरणे हे अभिनय क्षेत्रात मोडते का ?

ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे 'होय' अशी असल्यास, सचिन पेक्षा अधिक लायक उमेदवार मिपावरतीच उपलब्ध आहेत हे नम्रपणे निदर्शनास आणू इच्छीतो.

अडवानीना संपर्क करा... या कलाना तिथे वाव मिळेल. शुभेच्छा.

परिकथेतील राजकुमार's picture

2 May 2012 - 1:09 pm | परिकथेतील राजकुमार

तुमचे रामदास आठवले पण आहेत की.

रामदास आठवले आमचे नाहीत..

आणि सध्या ते अडवानींच्याच मित्रपक्षात आहेत नै का?

परिकथेतील राजकुमार's picture

2 May 2012 - 1:37 pm | परिकथेतील राजकुमार

आधी निट विचार करून मग लिहित जा हो. प्रत्येक धाग्यावरचा प्रतिसाद तुम्ही किमान ३ वेळा बदलत असता.

पहिल्यापासून 'तुमचे कोणी नाही आणि तुम्ही कोणाचे नाहीत' हे तुमच्या लक्षात यायला हवे होते.

असो...

'तुमचे' आठवले असे तुम्हीच तर लिहिलेत.

पराशेठ आणि जागोमोहनप्यारे या दोघांना मिपानियुक्त खासदार म्हणून राज्यसभेत पाठविण्यात यावे असा प्रस्ताव मांडतो. ;-)

परिकथेतील राजकुमार's picture

2 May 2012 - 2:51 pm | परिकथेतील राजकुमार

लिहायला मी काही लिहिन हो. तुम्हाला कळायला नको का ?

विकास's picture

2 May 2012 - 7:49 pm | विकास

हे महत्वाचे मुद्दे आहेत. त्यामुळे मिपा मालकांकडे मी वार्षिक "मिपा रत्न" पारीतोषिक जाहीर केले जावे असा प्रस्ताव तमाम मिपाकरांनी करावा असा प्रस्ताव करतो.... :-)

गणपा's picture

2 May 2012 - 1:10 pm | गणपा

घटनात्मक नियमांच्या बाबतीत 'ऑल आर इक्वल बट सम आर मोर इक्वल' या न्यायाने सरकारने सच्याचे नाव सुचवले असेल. :)
फक्त ते त्यांना भारतरत्नच्या वेळी आठवल नसेल. ;)

ऋषिकेश's picture

2 May 2012 - 5:07 pm | ऋषिकेश

१. सुधीर यांच्या प्रतिसाधाशी सहमत "साहित्य, शास्त्र, कला आणि समाजसेवा" हे केवळ वानगीदाखल दिलेली क्षेत्रे आहेत. (such as) मात्र भारतरत्न मधे such as नसून आधी असे काहिसे वाक्य होते This service includes artistic, literary, and scientific achievements, as well as "recognition of public service of the highest order". (सदर्भ विकी)

२. सचिनने भारतासाठी उत्कृष्ट खेळ करून त्याच्या मनाने भारतीय समाजाची सेवाच केली नाही का? का सेवा करायची म्हणजे राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रच असले पाहिजे?

३. स्पोर्टपर्सन ही कॅटेगरी भारतरत्नच्या व्याखेत सचिनसाठी घातली आहे असे कोणी म्हटले आहे?

अवांतरः
खासदारकीची सुरवात म्हणून सचिनने 'स्पोर्ट्स बिल' वर आपले योगदान/मत द्यावे अशी अपेक्षा आहे. सदर बिल कॅबिनेटने एकदा नाकारले होते. या चांगल्या बिलाला सचिनने पाठिंबा दिला / काहि सुधारणा सुचवून पाठिंबा दिला तर काहि जुन्या खोडांना (वैयक्तीक स्वार्थापायी) विरोध करणे कठीण जाईल अशी अशा करतो.

**अतिअवांतरः अनेक दिवसांनी मिपा हाफीसातून अ‍ॅक्सेस होत आहे. त्यात तुमच्या धाग्यावर प्रतिक्रीया देताना आनंद होतो आहे :)

विकास's picture

2 May 2012 - 7:47 pm | विकास

सुधीर यांच्या प्रतिसाधाशी सहमत "साहित्य, शास्त्र, कला आणि समाजसेवा" हे केवळ वानगीदाखल दिलेली क्षेत्रे आहेत.

शक्य आहे पण खात्री नाही. पण लॉजिक म्हणून मुद्दा नक्कीच पटतो. कारण आधी सांगितल्याप्रमाणे खेळाडू/क्रिडा यांना बाजूस ठेवण्यात आले होते (अगदी दारासिंगच्या बाबतीतही).

केवळ माह्ती करता भारतरत्नाच्या बाबतीत बदललेल्या सरकारी माहितीप्रमाणे: It is awarded in recognition of exceptional service/performance of the highest order in any field of human endeavour.

स्पोर्टपर्सन ही कॅटेगरी भारतरत्नच्या व्याखेत सचिनसाठी घातली आहे असे कोणी म्हटले आहे?
म्हणलेले कोणीच नाही. किमान माझ्या ऐकीवात नाही. पण सचिनला भारतरत्न देण्यावरून बरेच बोलले गेले, ते का शक्य नाही यावर चर्चा चालू झाल्या आणि त्यानंतर मंत्रिमंडळाने नियमात बदल केला. त्यामुळे अप्रत्यक्षपणे तेच कारण आहे असे वाटते. नाहीतर तसे देखील इतर अनेक समस्या होत्या ज्यांच्यावर priority ने निर्णय घेणे आजही गरजेचे आहे असे म्हणता येईल.

सचिनने भारतासाठी उत्कृष्ट खेळ करून त्याच्या मनाने भारतीय समाजाची सेवाच केली नाही का?

ह्या होकारार्थी प्रश्नाशी मी असहमत आहेच पण तुम्ही देखील असहमत असाल असे समजतो. :-)

क्लिंटन's picture

3 May 2012 - 9:15 pm | क्लिंटन

सचिनने भारतासाठी उत्कृष्ट खेळ करून त्याच्या मनाने भारतीय समाजाची सेवाच केली नाही का?

नेमक्या याच कारणामुळे कोणत्याही पेशातला मनुष्य स्वतःला समाजसेवक म्हणवू शकेल. ही संदिग्धता आहेच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 May 2012 - 10:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगली चर्चा आणि प्रतिसादही माहितीपूर्ण आहेत. सचिन राज्यसभेच्या १०३ क्रमांकाच्या आसनावर (सौ. आयबीएन लो.) आता विराजमानही होईल. सचिनसाठी कलमात बदल होणार नाही, पण सचिनला घटनेच्या चौकटीत 'बसवले' जाऊन राष्ट्रपती नियुक्त खासदार केलेच आहे, तेव्हा असे वाटते की निर्णय घेणार्‍यांनी विचार करुनच कोणत्या तरी नियमात हे बसवले असावे. फक्त कोणत्या ते अजून तितकेसे स्पष्ट होत नाही.

काल कोणत्या तरी दैनिकात वाचले की अशीच ऑफर विजय मर्चंट यांना मोरारजींनी दिली होती आणि ती ऑफर त्यांनी नाकारलीही होती. आता असेच असेल तर क्रिडा क्षेत्राचा पूर्वीही विचार झालाच होता असे म्हणायला जागा आहे.

आणि अशी नियुक्ती जर घटनाबाह्य असेल तर भविष्यात कधीतरी यावर नक्कीच चर्चा होईल असे वाटते. असो, माहितीपूर्ण चर्चा प्रस्ताव डकवल्याबद्दल धन्स.

-दिलीप बिरुटे

समंजस's picture

2 May 2012 - 11:08 pm | समंजस

यांच्या जवळपास सर्वच मुद्दयांशी सहमत.
सचिनच्या खासदारकीच्या बाजूने बोलणार्‍यांच्या प्रतिसादात सचिनबद्दलचं प्रेम भरपूर दिसून येतंय पण दुर्दैवाने योग्य त्या मुद्द्यांचा अभाव दिसून येतोय.

आता काही स्पष्ट मते (माझीच)...
१) सचिन खासदार झाला. छान! आणखी एक सन्मान प्राप्त झाल्या बद्दल अभिनंदन!
२) सचिन खासदार झाल्यावर काही भरीव काम करणार (संसदेत) या बद्दल काहींना अपेक्षा असल्यास, क्षमस्व! लता मंगेशकर पेक्षा विशेष जास्त कार्य तो करणार नाही.
(तसेही तो नुकताच बोलला आहे की शेवट पर्यंत तो क्रिकेटपटूच राहणार आहे. म्हणजे काय? माहित नाही).
३) घटनेचा आपल्याला सोईचा अर्थ लावून सरकारने सचिनला खासदार म्हणून नियुक्त करण्याऐवजी जर त्याला सरळ आणी स्पष्ट पणे एखाद्या राज्याच्या कोट्यातून (राज्यसभेतील इतर खासदारांप्रमाणे) जर निवडून आणलं असतं तर जास्त बरं ठरलं असतं.
४) सचिन करीता भारतरत्नाची मागणी होत असताना, ती पुर्ण करण्यात आलेल्या अपयशातून क्रिकेट प्रेमींचा (पर्यायाने मतदारांचा) रोष ओढवून घेण्याची भिती वाटल्या मुळे सरकारने घेतलेला हा निर्णय आहे.
५) ज्या सरकार मध्ये मोठ्या प्रमाणावर वकील, कायदे़तज्ञ हे मंत्री म्हणून कार्यरत आहेत त्या सरकारकडून हव्या त्या प्रकारे घटनेचा अर्थ (सोईचा) लावणे हे स्वाभाविक आहेच. ह्याला अति आत्मविश्वास म्हणा किंवा मुजोरपणा म्हणा. अर्थ एकच, शेवट एकच.
६) लोकपाल आंदोलनावर, अण्णांवर टीका करणार्‍यांना तसेच त्यांच्यावर घटनेचा अनादर करणारे म्हणून टिका करणार्‍यांना आता जेव्हा घटनेतील तरतुदींचा, पुर्वीच्या उदाहरणांचा विसर पडला आहे हे बघून मला आश्चर्य नाही वाटलं. हे होत आलंय आणी होत राहणार :)

काही काळ पुर्वीच एका केन्द्रिय मंत्र्याने एक योग्य विधान केलंय "ग्रामिण भागातील लोकांची प्राथमकिता मोबाईल आहे, शौचालये नाहीत".
जिथे प्राथमिकतेतच घोळ आहे तिथे काय अपेक्षा ठेवावी :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 May 2012 - 2:06 am | निनाद मुक्काम प...

देशात अजूनही "पडोगे, लीखोगे तो बनोगे नवाब ,खेलोगे खुदोगे तो बनोगे खराब" ह्याच चालीवर बहुतांशी भारतीय मानसिकता चालते.
आज सर्व प्रगत देशात आणी चीन सारख्या विकसनशील आणी भविष्यातील महासत्ता असलेल्या देशात ऑलंपिक मध्ये पदकांची लुट आणी आम्ही चुकून माकून मिळालेल्या पदकांवर समाधान .......
एका हाडाच्या खेळाडूला हा सन्मान मिळणे म्हणजे सचिनच्या शब्दात क्रिकेट चा सन्मान आहे.
उद्या सायना नेहवाल काही वर्षांनी खासदार बनू शकते.
माझ्या मते आय पी एल च्या सर्कशीत ह्या नरसिंहाचा जीव रमत नसावा म्हणून कदाचित हा गनिमी कावा असेल.
नाहीतरी सचिन निवडक कसोटी आणि वनडे खेळतो. उरलेला वेळ सभागुहात घालवेल.
एरवी आपले सभागृह म्हणजे आरडाओरड . सभात्याग क्वचित प्रसंगी डुलक्या काढणारे लोकप्रतिनिधी व मोबाईल चा विधायक वापर करणारे विधायक अशीच प्रतिमा समोर येते.
निदान युवा वर्गात सचिन सारखे व्यक्तिमत्व सभागृहात आले तर त्यांच्या दृष्टीकोन कदाचित बदलेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 May 2012 - 6:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दै. सकाळच्या वृत्तानुसार वकील अशोक पांडे यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात सचिनच्या राज्यसभेच्या सदस्य नियुक्तीला आक्षेप घेतला आहे.

करिता माहितीस्तव.

-दिलीप बिरुटे

नितिन थत्ते's picture

4 May 2012 - 8:30 pm | नितिन थत्ते

अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल दिल्लीत लागू होतो का?

विकास's picture

4 May 2012 - 8:59 pm | विकास

अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल दिल्लीत लागू होतो का?

योग्य प्रश्न आहे. मला देखील असेच वाटले.

कदाचीत एखादा घटनात्मक मुद्दा कोर्टात आणताना तो उच्च न्यायालयात आधी जावा अशी अपेक्षा (requirement या अर्थाने) तर तो देशातील कुठल्याही उच्च न्यायालयात चालू शकेल. कारण सचिन या प्रकाराच्या राज्यसभासदस्यात्वातून कुठल्याही विशिष्ठ एखाद्या ज्युरिस्डीक्शनचे प्रतिनिधित्व करणार नाही...

पुण्याचे वटवाघूळ's picture

4 May 2012 - 9:19 pm | पुण्याचे वटवाघूळ

अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल दिल्लीत लागू होतो का?

निवडून आलेल्या खासदार-आमदारांच्या निवडीला आव्हान विषयक खटल्यात त्या त्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे जुरिसडिक्शन असते.

मला वाटते की राष्ट्रपतींचे काही विशेषाधिकार असतात आणि त्याअंतर्गत घेतलेल्या निर्णयांना न्यायालयात आव्हान देता येत नाही (उदाहरणार्थ निवडणुकीनंतर सरकार स्थापन करायला कोणाला बोलवायचे, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करायची वगैरे). त्याचप्रमाणे राष्ट्रपतींच्या विशेषाधिकारा अंतर्गत जर राज्यसभेवर सचिनची नियुक्ती झाली असेल आणि त्या नियुक्तीला आव्हान दिले गेले असेल तर तो खटला कोर्टात टिकायचा नाही. राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या राज्यसभा सदस्यांच्या नियुक्तीला आव्हान देता येते का आणि येत असल्यास नक्की कोणाचे जुरिसडिक्शन असते याची कल्पना नाही.

विकास's picture

4 May 2012 - 11:08 pm | विकास

इंडीया टू डे मधील बातमीनुसारः

While hearing the case on Friday, the Bench of Justice Devi Prasad Singh and Justice Saeduzama Siddiqui ordered to place the petition before the division bench which deals with the PIL matters on May 7.

The order was passed after hearing the preliminary argument of Dr Ashok Nigam, additional solicitor general, that the petition was of the nature of PIL.

थोडक्यात सचिनला आता "आयपीएल च्य ऐवजी पीआयएल" ला सामोरे जावे लागणार असे दिसतयं. :-)

राष्ट्रपतींचे विशेषाधिकार देखील घटनाबाह्य असू शकत नाहीत. निवडणुकीनंतर सरकार स्थापन करायला कोणाला बोलवायचे, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करायची वगैरेचा "चॉईस" घटनेनेच राष्ट्रपतींना दिला आहे. त्यामुळेच अशी नेमणूक जर घटनेच्या अख्त्यारीच्या बाहेर असेल तर त्याला आव्हान देता येत असावे. अर्थात ते राष्ट्रपतींनी घेतलेल्या घटनाबाह्य असू शकेल असे वाटणार्‍या निर्णयाला कोर्टात आव्हान आहे, राष्ट्रपतींना नाही.

मला असे वाटते हे प्रकरण सरतेशेवटी सर्वोच्च न्यायालयात जाईल. जर सचिनला खासदारकी देताना घटनेचा चुकीचा अर्थ लावला गेला असला तर ते सरकारपक्ष आणि सचिन या दोघांना किमान थोड्यावेळा करता महागात जाईल - जो पर्यंत दुसरे काही प्रकरण पब्लीकला मिळत नाही तो पर्यंत. ;)

पिवळा डांबिस's picture

4 May 2012 - 9:25 pm | पिवळा डांबिस

अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल दिल्लीत लागू होतो का?
ह्या प्रश्नावरूनच तर सत्तरीच्या काळातली आणीबाणी वगैरे रणकंदन झालं की!!!
जय इंदिराजी!!

आम्हाला थत्तेकाका सॉल्लिड आवडतात, कारण ते नेहमी जबरदस्त प्रश्न विचारतात!!!
:)
आता जाणकारांच्या प्रतिपादनाच्या प्रतिक्षेत...

विकास's picture

4 May 2012 - 10:51 pm | विकास

नितिन थत्ते's picture

5 May 2012 - 12:46 pm | नितिन थत्ते

तो खटला-निकाल हा इंदिरा गांधींच्या उत्तरप्रदेशात असलेल्या रायबरेली मतदारसंघातील निवडणूकीसंदर्भात होता. त्यांच्या पंतप्रधानपदासंदर्भात नव्हता. म्हणून अलाहाबाद उच्च न्यायालयाला ज्युरिस्डिक्शन होते.

अवांतर: फलंदाजी ही कला आहे की नाही हे कोणी अजून सांगितले नाही.

अतिअवांतर: सचिनला राज्यसभेवर पाठवा अशी मागणी काँग्रेसेतर कोणी केली असती आणि सरकारने (हा वैधतेचा मुद्दा काढून) ती नाकारली असती तर "दिल्लीश्वरांना मराठी माणसांबद्दल आकस" असे धागे आले असते बहुधा. :P

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 May 2012 - 1:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फलंदाजी ही वरवर पाहता कलाच आहे. कारण कलेत कौशल्य असतं. वाचकांसाठी कलेच्या काही व्याख्या. दुव्यावरील व्याख्या पूर्णच आहेत असा माझा दावा नाही. सचिनच्या फलंदाजीत कौशल्य आहे. सचिन पुढे येऊन षटकार खेचण्यासाठी जे पदलालित्य दाखवतो ते तंत्र नाही तर ती मला कलाच आहे, असे वाटते. अर्थात हे फार ढोबळ मत झाले कारण फलंदाजी ही कला की शैली असा उपप्रश्न सुरु होईल.

रंग, ध्वनी, रेषा, भावना, शब्द प्रतिकृतीतून व्यक्त होते ती कला. आणि कलेतून आनंद मिळाला पाहिजे. सचिनची फलंदाजी ही अनेकांना आनंद देणारी असते. अझहर मनगटाच्या साह्याने ऑफसाइडचा चेंडू मनगटाच्या साह्याने लिलया ऑनसाइडला खेळायचा, हे फलंदाजी करण्याचे कौशल्य आहे.

बाकी, चौसष्ट कलेत ’क्रिकेट फलंदाजी' ही कला म्हणून दिसत नाही. म्हणून फलंदाजी ही कला नाही. तूर्तास इतकेच.

-दिलीप बिरुटे

विकास's picture

5 May 2012 - 5:36 pm | विकास

७ मे ला अलाहाबाद उच्चन्यायालयास ज्युरिस्डीक्शन आहे का ते कळेलच.

फलंदाजी ही कला आहे की नाही हे कोणी अजून सांगितले नाही.
माझ्या अल्पसमजुती प्रमाणे फलंदजाजी हा क्रिकेट या क्रिडेतला भाग आहे. तसे देखील सचिन अथवा इतर फलंदाजांना आजपर्यंत तरी खेळाडू / sportsman म्हणले आहे, कलाकार/artist नाही, असे वाटते.

अतिअवांतरासंदर्भातः
सचिनला राज्यसभेवर पाठवा अशी मागणी काँग्रेसेतर कोणी केली असती आणि सरकारने (हा वैधतेचा मुद्दा काढून) ती नाकारली असती तर "दिल्लीश्वरांना मराठी माणसांबद्दल आकस" असे धागे आले असते बहुधा. Tongue

अमान्य. पण जर कुणाला पक्षिय नजरेतून (इतरत्र धार्मिक नजरेतून) पहायचे असेल तर असे वाटल्यास आश्चर्य वाटणार नाही. हा धागा मी काढला आहे. आणि माझ्या आठवणीत तरी मी सचिनच्या / भारतरत्नच्या संदर्भात मराठी माणसांबद्दल आकस वगैरे म्हणल्याचे लक्षात नाही. "देव झाला दानव" या चर्चेतील सचिनला काँग्रेसकडून खासदारकी मिळाली म्हणून दानव ठरवणे पटले नाही आणि अधिक माहितीकरता आधी कोण कोण असे खासदार झाले आहे हे बघायला राज्यसभेच्या संस्थळावर गेलो आणि ही नवीन माहीती मिळाली, ज्यामुळे हा मला घटनात्मक प्रश्न वाटला. असो.

नितिन थत्ते's picture

5 May 2012 - 8:30 pm | नितिन थत्ते

>>माझ्या आठवणीत तरी मी सचिनच्या / भारतरत्नच्या संदर्भात मराठी माणसांबद्दल आकस वगैरे म्हणल्याचे लक्षात नाही.

तुमच्याबद्दल नाहीच म्हटलेले. तुम्ही नसताच काढला असा धागा. पण इतरांनी काढले असते.