शिवतीर्थ रायगडवारीची बीजे ३ महिन्यांपूर्वीच रोवली गेली होती. पुण्याहून मी आणि मोदक निघालो ते सकाळी ६.३० च्या पिंपरी चिंचवड-दापोली एसटी बसने. स्वारगेटला धनाजीराव आणि प्यारे त्याच बसमध्ये आम्हांस येऊन मिळाले. वप्याला ऐनवेळी हापिसात काम निघाल्यामुळे येता आले नाही. भरपूर गप्पा टप्पा करतच ११.३० च्या सुमारास महाडमध्ये पोहोचलो. मुंबईहून किसनदेव, मन्या फेणे, विमे, चतुरचाणक्य उर्फ चचा, सौरभ उप्स आणि नवमिपाकर तानाजी मालुसरे हे ६ जण सकाळी ६ वाजताच निघाले होते पण कर्नाळ्याच्या आसपास त्यांची एसटी पंक्चर झाल्यामुळे त्यांना महाडात पोचायला २.३० वाजले तोपर्यंत आम्ही चौघे एकाच हाटेलात बसून कणाकणाने खाद्य ग्रहण करत क्षण क्षण वेळ वाढवत होतो. महाड एसटी स्थानकावर मन्या फेणेचा 'फास्टर फेणे टोला हाणतो' हे पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. ३ वाजताची महाड-रायगड बस ऐनवेळी रद्द झाल्यामुळे रायगडपायथ्याला जाण्यासाठी प्रवासी जीप ठरवून अर्ध्यापाऊण तासातच पायथ्याला पोहोचलो. एकंदरीत झालेला उशीर, उन्हाची काहिली या सर्वांचाच विचार करून रज्जुमार्गाने जायचे ठरले. अवघ्या ४ मिनिटात गडावर पोहोचलो. रज्जुमार्गाचा प्रवास थरारक आहे. रायगडाच्या उत्ताल कड्याचे, सभोवतालच्या खोल दरीचे एका वेगळ्याच कोनातून अनोखे दर्शन होते.
१. रज्जुमार्ग
धन्याने रायगडावरील डॉर्मिटरीचे अगोदरच बुकिंग करून ठेवले असल्याने तिथे पोहोचताच सर्वांनी आपापल्या पाठपिशव्या खोलीत टाकल्या. मुंबैकर तसे उपाशी असल्याने त्यांनी तिथे नाष्टा उरकून घेतला मग लगेचच आम्ही गडदर्शनासाठी बाहेर पडलो. रज्जुमार्गाचा प्रवेश गडावर येणार्या राजमार्गाच्या विरूद्ध बाजूस असल्याने आम्ही मेणा दरवाजातून राजवाड्यात प्रवेश केला. डावीकडे राणीवसा अर्थात राण्यासाठी बांधलेले सात महाल आहेत. तर उजवीकडे मंत्र्यांची निवासस्थाने आहेत. आजमितीस महालांच्या मोठमोठ्या भिंती व आतमध्ये फक्त चौथरे शिल्लक राहिले आहेत. मेणा दरवाजा ते पालखी दरवाजा हा मार्ग एका सरळ रेषेत बांधून काढला आहे. उंचसखल भागात चढ उतार करण्यासाठी पायर्या बांधलेल्या आहेत. मंत्रीमंडळ निवासाच्या पुढे एक तळघर आहे. ती पूर्वीची रत्नशाळा अर्थात खजिना ठेवण्याची जागा असावी. स्थानिक लोक त्याला धान्यकोठार म्हणतात पण हे पटत नाही. एकतर धान्यकोठाराच्या मानाने हे तळघर लहानच आहे. शिवाय राजाच्या निवासस्थानापाशीच धान्यकोठार असावे असे वाटत नाही. हे सर्व पाहातच आम्ही सर्व मिपाकर पालखी दरवाजात पोहोचलो. पालखी दरवाजाच्या शेजारीच दोन मोठाले स्तंभ अथवा मनोरे बांधलेले आहेत. द्वादशकोनी असलेल्या त्या स्तंभावर विविध कमानी कोरलेल्या असून त्यावर नक्षीकाम केले आहे. एका स्तंभामध्ये कारंजासदृश रचना दिसते. हे स्तंभ पूर्वी पाच मजली होते असे म्हणतात सध्या त्यांचे ३ मजले शिल्लक आहेत. स्तंभामध्ये जायला सदरेतूनच भुयारी जिने खोदलेले आहेत. या दोन्ही स्तंभांच्या वरच्या बाजूला अजून एक देखणा स्तंभ कोरलेला आहे. त्याच्या बाजूने आम्ही आता मुख्य राजभवनात प्रवेश केला. हे ठिकाण राजसिंहासनाच्या मागील बाजूस आहे. अतिशय प्रशस्त असलेले महाराजांच्या ह्या निवासस्थानी सध्या फक्त एक प्रचंड चौथरा शिल्लक आहे. एका ठिकाणी कोपर्यात न्हाणीघरासदृश बांधकाम दिसते. तसेच इतरही अनेक लहानमोठी बांधकामे दिसत जातात. सिंहासनावरच्या मेघडंबरीच्या मागील बाजूस दोन प्रवेशद्वारे आहेत. ह्या राजभवनातच महाराजांचा राज्याभिषेक होऊन यापैकी एक दरवाजातून राजे सिंहासनारूढ होण्यासाठी निघाले.
२. मेणा दरवाजा
३. राणीवसा
४. राणीवसा
५. मंत्रिमंडळाची निवासस्थाने
६. मंत्रिमंडळाची निवासस्थाने
७. मेणा दरवाजा, उजवीकडे राणीवसा, डावीकडे मंत्र्यांची निवासस्थाने
८. राजभवन
९. राजभवन
राजभवनातून आम्ही सर्वजण राजसभेत- तिथे असलेल्या सिंहासनापाशी आलो. मेघडंबरीत शिवाजी महाराजांचा पुतळा हल्लीच बसवला आहे. यादवांच्या विनाशानंतर ३५० वर्षांची काळरात्र संपवून स्वतंत्रपणे प्रस्थापित झालेले हे आपले स्वराज्य. सर्वजण अक्षरश: भारावून गेले होते. महाराजांना मुजरा करतच आम्ही नगारखान्यापाशी आलो. राजसभेचे प्रवेशद्वार असलेला नगारखाना ही अतिशय भव्य वास्तू आहे. प्रवेशद्वारावर दोन सुंदर कमळाकृती कोरलेल्या आहेत. त्यांचा अर्थ येथे श्री आणि सरस्वती म्हणजेच लक्ष्मी आणि विद्या ह्या दोन्ही सुखेनैव नांदत आहेत. कमळांच्या बाजूला शरभाचे शिल्प कोरलेले आहे. सिंहासदृश असलेल्या या काल्पनिक पशूच्या चारही पायात चार हत्ती दाबलेले असून त्याने शेपटीत एक हत्ती उचललेला आहे. मोंगल, आदिलशाही, सिद्दी, इंग्रज आणि पोर्तुगीज ह्या पाच सत्तांच्या नाकावर टिच्चून ह्या राजाने आपले स्वतंत्र, बलाढ्य राज्य स्थापन केले आहे असा याचा अर्थ आहे.
१०. राजसभा
११. मेघडंबरीत विराजमान झालेले महाराज
१२. भव्य दिव्य नगारखाना
१३ व १४. शरभ
नगारखाना बघतच आम्ही होळीच्या माळावर आलो. होळीचा माळ हे गडावरचे प्रशस्त पठार. माळावरच गोनीदांच्या प्रयत्नाने स्थापन झालेला शिवाजी महाराजांचा देखणा पुतळा आहे. समोरच एका सरळ रेषेत असणारी बाजारपेठ आहे. पेठेच्या दोन्ही बाजूंस प्रत्येकी २२ दुकाने आहेत. मध्येच एका दुकानावर नागाची मूर्ती कोरलेली आहे.
१५. होळीच्या माळावरील शिवपुतळा
बाजारपेठ बघूनच आम्ही जगदीश्वर मंदिराच्या वाटेवर लागलो. जगदीश्वराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या पश्मिमेकडच्या प्रवेशद्वारातून आम्ही प्रांगणात प्रवेश केला व पूर्व बाजूस आलो. प्रवेशद्वारासमोरच नंदीची सुरेख कोरीव मूर्ती आहे. सभामंडप, गर्भगृह अशी याची रचना. कळसाचा आकार कमळासारखा आहे. जगदीश्वराच्या पायरीवरच गडाचा शिल्पकार हिरोजी इंदुलकर याच्या नावाचा शिलालेख कोरलेला आहे.
सेवेची ठायी तत्पर हिरोजी इटळकर
सभामंडपात भलेमोठे कासव कोरलेले आहे. भिंतीपाशी वीर हनुमानाची रेखीव मूर्ती आहे. पायाखाली राक्षस चिरडलेला आहे. हा हनुमान पूर्वी गडाच्या प्रवेशमार्गावर असावा. बहुतेक शिवकालीन किल्यांवर गडाच्या प्रवेशमार्गानजीक हनुमानाच्या मूर्ती आढळतात. तो तिथून जगदीश्वर मंदिरात कधी आला असावा याची कल्पना नाही. गाभार्यात गेलो. जगदीश्वराची पिंडी साक्षात शिवाजी महाराजांनी स्थापन केली आहे. मंदिराच्या डाव्या बाजूस अजून एक अतिशय स्पष्ट असा संस्कृत शिलालेख कोरलेला आहे.
श्री गणपतये नमः|
प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनुज्ञय
श्रीमच्छत्रपते: शिवस्यनृपते: सिंहासने तिष्ठत:|
शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ||१||
वापीकूपडागराजिरूचिरं रम्यं वनं वीतिकौ स्तम्भे: कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रं लिहे मीहिते|
श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हिराजिना निर्मितो यावच्चंद्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ||२||
सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमत् छत्रपती शिवाजीराजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजीने विहीरी, तलाव, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे अशांची उभारणी केली आहे. ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.
१६. जगदीश्वर मंदिर
१९. जगदीश्वर महादेव
१८ व १९. जगदीश्वर मंदिरात असलेले शिलालेख
शिवपिंडीला मनोभावे वंदन करून आम्ही पूर्वेकडेच असलेल्या महाराजांच्या समाधीनजीक आलो. एका किल्ल्यावरच जन्म घेतलेल्या थोर राजाने आपले संपूर्ण आयुष्य गडांवरच घालवून शेवटी एका गडावरच अखेरची चिरनिद्रा घेतली. सभासद म्हणतो "क्षत्रियकुलावतंस श्रीमन्ममहाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२ चैत्र शुद्ध १५ या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्वराचा जो प्रासाद त्याच्या महाद्वाराच्या बाहेर दक्षणभागी केले."
समाधी म्हणजेच अष्टकोनी जोते असून वरून दगडी छत्र बांधलेले आहे. आतमध्ये फरसबंदी केली असून शिवस्मारक केले आहे. फरसबंदीखालच्या पोकळीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षामित्र मृत्तिकारूपाने सापडतो.
शिवसमाधीच्या बाजूलाच कमानीकमानींची रचना असलेली ओसरी बांधलेली आहे.
२०. राजांचे विश्रांतीस्थान
आता सूर्यास्त होऊन अंधार पडू लागला होता. त्यामुळे लांबवरच्या भवानी टोकावर जायचा बेत रहित करायला लागला. शिवसमाधीच्या पठारावरच पुढे भग्न इमारतींची रांग आहे. त्यालाच शिबंदीची घरटी असे म्हणतात. समाधीपासच्या असलेल्या हिरवळीवर आम्ही सर्वजण बसलो. समोरच सह्याद्रीच्या रांगेत असलेला भव्य लिंगाणा ठळकपणे दिसत होता. रायगडाला तिन्ही बाजूंनी सह्याद्रीच्या अजस्त्र रांगांनी फेर घातलेला आहे ते दृश्य मोठे मनोरम दिसत होते. आता आमच्या गप्पाटप्पांना बहार आली. वेगवेगळे किस्से, मिपावरील गंमतीजंमती सांगणे चालू झाले. आता अंधार गडद होऊन एकेक चांदणी चमकायला लागली. दरीतल्या छोट्या वाड्यावस्त्यांवरचे दिवे लुकलुकायला लागले. दूर सह्याद्रीच्या डोंगरात कुठेतरी वणवा लागला होता. साधारण ८.३० ला आम्ही तिथून निघालो. बाजारपेठेनजीक अवकीरकरांच्या धनगराच्या झापावर झुणका भाकरीची ऑर्डर दिली होतीच त्या झापावर गेलो. मिणमिणत्या दिव्यात सारवलेल्या अंगणात झुणका भाकर, ठेचा, पापड, ताक, दही असे सुग्रास जेवण उरकले. सन १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरच्या वरवंट्याखाली गड भाजून निघाल्यानंतर वेबसाऊ झाला. तेव्हा ही धनगरं चार्याच्या ओढीने गडावर शिरली. ओसाड गड त्यांनीच आतापर्यंत जागता ठेवला. तेव्हापासूनच ही घरं येथे नांदती आहेत.
२१. शिबंदीची घरटी, दूरवर भवानी टोक
२२. शुक्राची चांदणी
२३. भोजनाच्या तयारीत बसलेले मिपाकर
आता परत खोलीवर यायला निघालो. होळीच्या माळावरून खोलवणांत उतरलो. धर्मशाळेवरून गंगासागरापाशी आलो. तिथून एक टेप चढून पालखी दरवाजाच्या मार्गाने गडद अंधारातून चालत मेणा दरवाजा उतरून परत खोलीत आलो. परत गप्पाटप्पा चालू झाल्या. मिपाचे संदिप खरे श्री चचा यांनी तेथे आपली 'मन' ही कविता सर्वांना म्हणून दाखवली. विमे अणि धनाजीराव वाकडे यांनी आपले अमेरीकेतील काही मजेदार किस्से ऐकवत सर्वांचेच मनोरंजन केले. थोडावेळ गप्पा टाकून आम्ही परत एकदा शिवसमाधीपाशी जाण्यास बाहेर पडलो. पुन्हा बाहेर पडण्यास अनुत्सुक असलेले प्यारेकाका आणि सौरभ उप्स हे दोघेही तसे नाईलाजानेच निघाले.
मेणा दरवाजातून पुन्हा राजभवनातून सिंहासनापाशी गेलो. सिंहासनापाशी पणत्या आणि उदबत्या प्रज्वलित केल्या. महाराजांच्या पुतळ्यावर त्यांचा पडलेला मिणमिणता उजेड अतिव समाधान देऊन गेला. तिथून होळीच्या माळावर आलो. तिथल्या महाराजांच्या पुतळ्यापाशीही पणती प्रज्वलित केली. तिथून बाजारपेठेमार्गे जगदीश्वर मंदिरात आलो. जगदीश्वराच्या पिंडीपाशीही पणती लावून आम्ही समाधीपाशी आलो. तिन्ही बाजूं मोकळ्या असल्याने भर्राट वारा येत होता त्यामुळे तिथे पणत्या पेटू शकल्या नाहीत मात्र धूप आणि उदबत्ती मात्र लावल्या गेल्या. भावविभोर होऊन आम्ही सर्व समाधीपाशीच गप्पा मारत बसलो. रात्रीचे बारा, सव्वाबारा वाजलेले. प्यारेकाका, मोदक, विमे आणि स्पा यांची अध्यात्मावर खोलवर चर्चा सुरु झाली. बाकी मंडळी चर्चा एकदम तन्मयतेने ऐकत होती. मी आणि धन्या मात्र समाधीकडे एकटक पाहात अध्यात्माचीच अनुभूती घेत होतो. मधूनच एखादी तेजाळती उल्का झगझगीत प्रकाश टाकून निमिषार्धात अदृश्य होत होती. सप्तर्षी डोक्यावर येऊन मृग क्षितीजाला टेकलेला होता. चंद्रोदय पहाटेचा असल्याने नभांगण तारकांनी गच्च भरून गेले होते. तिथेच १/१:३० पर्यंत बसून आम्ही परत निघालो. ह्यावेळी मात्र राजवाड्यामार्गे मेणादरवाजातून उतरलो. गडद अंधारामुळे वातावरण एकदम गूढरम्य भासत होते. परत तिथल्या पायर्यांवर बसून आम्ही खोलीवर गेलो. मंडळी थकलेली असल्याने लगेच निद्राधीन झाली.
२४. राजसिंहासनापाशी लावलेल्या पण पणत्या
२५. रात्रीच्या अंधारात शिवसमाधी
मी पहाटेच उठलो. मिपाकर गाढ झोपलेलेच होते. आंघोळ उरकून बाहेर पडलो. एकटाच. शेजारचे दोन मोठे खळगे ओलांडून मोकळवणात आलो. तिथे काही इमारतींचे अवशेष आहेत. एक टेप ओलाडून एका छोट्या शिवमंदिरापाशी आलो. बाजूलाच कुशावर्त तलाव आहे. त्यापासून थोड्या वरच्या बाजूस मूर्ती नसलेली, कळस नसलेली एक मंदिरासदृश भग्न वास्तू आहे. तिथेही काही इमारतीचे चौथरे शिल्लक आहेत. वरील बाजूस असलेली नगारखान्याची अर्धवट दिसणारी वास्तू तिथून फार सुरेख दिसते. जवळच पायर्या आहेत. त्या चढून नगारखान्यापाशी आलो. तिथून होळीच्या माळावरून गडाची मुख्य देवता शिर्काई हिच्या छोटेखानी मंदिरापाशी आलो. अष्टभुजा शिर्काईचे दर्शन घेऊन खालच्या लवणांतून गंगासागरापाशी पोचलो. तिथे स्नानं उरकून आलेले स्पा आणि चचा भेटले. त्यांना घेऊन एमटीडीसीच्या उपाहारगृहात आलो. प्यारेकाका नाष्ट्याची वाट बघत होतेच. पोहे खाऊन परत खोलीवर आलो. एव्हाना इतर मंडळी आंघोळी उरकत होतीच. सकाळी एकटाच मी बाहेर पडल्याने मिपाकरांच्या थोड्याफार शिव्या बसल्याच. त्या निमूटपणे ऐकून घेऊन आम्ही सर्वांनी चेकआउट केलं. परत पायर्या चढून मेणादरवाजातून शिवसिंहासनाला मुजरा करून आम्ही बाजारपेठेच्या पुढे असलेया टकमक टोकावर जाण्यास निघालो. टकमक वर जाण्यासाठी एक टेप उतरून जावे लागते. तिथेच एका दारूकोठाराचे अवशेष आहेत. तिथल्या कड्यावरून सह्याद्रीच्या रांगा अतिशय सुरेख दिसतात. धारेसारख्या अरूंद मार्गावरून चालत आम्ही टकमक टोकावर पोचलो. तिथून राजवाडा, स्तंभ यांचे अतिशय सुरेख दर्शन होते. गडाचा महादरवाजा, खाली उतरणारा पायर्यांचा मार्ग, गडाचा उत्ताल कडा अतिशय सुरेख दिसतो.
२६. काही अवशेष
२७. शिवमंदिर, पाठीमागे नगारखाना
२८. बाजारपेठ
२९. स्तंभ
३०. स्तंभाचे एका वेगळ्याच कोनातून दर्शन
३१. शिर्काई मंदीर (फोटोसौजन्यः मन्या)
३२. टकमक टोकावरून दिसणारा राजवाडा
३३. टकमकावरून दिसणारी रायगडाची पायवाट , महादरवाजा व उत्ताल कडा
आता आम्हाला गड उतरून पायथ्याला जायचे होते. नेहमीच्या बाजारपेठेतून जाणार्या वाटेने न उतरता आम्ही टकमकाखालच्या एका अरूंद पायवाटेने महादरवाजानजीक मुख्य पायर्यांना गाठायचे ठरवले. एक एक टेप उतरत आम्ही टकमकाच्या खळग्यांत आलो. तिथे अगदी बारीकशी वाट होती, खाली घसारा, तीव्र घळघळीत उतार. ती वाट उतरताना प्यारेकाकांची भंबेरी उडाली. मूर्तीमंत भीती त्यांच्या चेहर्यावर दिसू लागली. कसेबसे प्यारेकाकांना सावरून आम्ही बर्यापैकी रूंद पायवाटेला लागलो. तिथून तीन फाटे फुटले. मी आणि विमे वरच्या फाट्याने निघून पुरुषभर उंचीची तटबंदी चढून पायरीमार्गाला लागलो, मधल्या वाटेने मन्या आणि प्यारेकाकापण पायरीमार्गाला लागले .प्यारेच्या चेहर्यावर आता प्रचंड सुटकेचे भाव होते. बाकी मिपाकर मंडळी अजून थोड्या खाली पायर्यांना मिळाली. तिथून थोड्याच खालते असलेल्या महादरवाजात आलो. महादरवाजाची रचना गोमुखी बांधणीची असून बाजूला दोन भव्य बुरुज आहे. बुरुजांवर जायला दगडी जिने आहेत व जागोजागी बंदूकांचा मारा करण्यासाठी जंग्या खोदलेल्या आहेत. दरवाजावर नगारखान्याप्रमाणेच हत्ती पायांतळी घेतलेल्या शरभाचे शिल्प आणि कमळचक्रे खोदलेली आहेत. अजिंक्य असा हा महादरवाजा उतरऊन आम्ही गड भराभरा उतरूलागलो. कड्याला ट्रॅव्हर्स मारत पदरातल्या दाट झाडीतल्या वाटेपाशी पोहोचलो. दाट झाडी ओलांडताच वाटेच्या खालच्या बाजूस पठारावर मशीद मोर्चाची नावाचे ठिकाण आहे. तिथे पहार्याचे मेटाचे अवशेष आहेत. रायगडवाडीतून येणारी नाना दरवाजाची वाट तिथून स्पष्ट दिसते.
३४. रायगडाचा महादरवाजा त्यावरील शरभ आणि कमलचक्रांसह
३५ व ३६. महादरवाजाची गोमुखी बांधणी
३७. रायगडावरून येणारी नाना दरवाजाची वाट
३८. खूबलढा बुरुजावरून होणारे रायगडाचे अप्रतिम दर्शन
वाळूसर्याच्या खिंडीशेजारून उंच उंच पायर्या उतरत आम्ही खूबलढा बुरुजापाशी आलो. इथून रायगड आणि टकमक टोकाचे अतिशय भव्य दर्शन होते. अजून काही उंच पायर्या ओलांडत आम्ही चित्त दरवाजापाशी आलो. इथे डांबरी रस्ता आहे. तिथून महाडला जाण्यास खाजगी वा एसटी बस मिळू शकतात. तिथल्या हाटेलापशी सर्वजण एखाद्या वाहनाची वाट पाहू लागले. पलीकडच्या बाजूस असलेल्या डोंगरात वाघबीळ म्हणून एक निसर्गनवल आहे. मी, किसनदेव आणि धनाजीराव तिकडे निघालो. अरूंद अशा पायवाटेने लहानसा चढ चढत पाचेक मिनिटातच वाघबिळापाशी पोहोचलो. ही एक आरपार नेढं असणारी नैसर्गिक गुहाच आहे. रायगडाच्या बाजूला एका छिद्र आणि पाचाडच्या बाजूला दोन छिद्र आहेत. गुहेत बसून रायगड आणि पाचाडचे अतिशय सुंदर दर्शन होते.
३९. वाघबीळ -पाचाडकडंच नेढं
४०. वाघबीळ - रायगडाकडंच नेढं
हे बघून आम्ही परत उतरायला लागलो. तेवढ्यात प्यारेकाका आणि तानाजी मालुसरे सोडून इतर सर्व मिपाकर वाघबीळ बघायला येतांना दिसले. वाघबीळ बसून सर्वजण परत चित्त दरवाजापाशी आलो. तितक्यात एक पिकअप व्हॅन आलीच त्यात बसून आम्ही सर्वजण महाडात पोहोचलो. जेवण उरकून स्टँडवर पोहोचायला जवळजवळ साडेतीन झाले. ३.३० च्या मुंबई आणि पुणे या दोन्ही एसट्यांचे रिझर्वेशन आधीच झाले असल्याने लगेचच गाडीत बसलो. धानाजीराव लोणेरे फाट्यानजीक असलेल्या त्यांच्या गावी मुक्कामाला निघून गेले. प्यारेने पोलादपूर मार्गे वाई गाठले. मुंबैकर पनवलेला तर आम्ही मी आणि मोदक पुण्यात निघालो ते रायगडाच्या आठवणी कायमस्वरूपी मनात जतन करूनच.
४१. गडावरचे मिपाकरांसोबात घालवलेले काही क्षण: पालखी दरवाजात
४२. टकमक टोकाजवळील दारूकोठाराजवळ
एकाच भागात रायगडाचा वृत्तांत टाकायचा ठरवल्याने हा भाग तसा मोठाच झालाय. सहभागी मिपाकर प्रतिसादांमधून अजून भर टाकतीलच.
सहभागी मिपाकरः विश्वनाथ मेहेंदळे, मन्या फेणे, किसन शिंदे, चचा, तानाजी मालुसरे, सौरभ उप्स, मोदक, प्यारे१, धन्या आणि वल्ली
प्रतिक्रिया
18 Apr 2012 - 9:32 am | मोदक
झक्कास वृत्तांत. सगळे लिहीले आहेसच म्हणून जास्ती काही लिहीत नाही. फक्त कांही चित्ररूप आठवणी..
होळीच्या माळावरील शिवराय..
महाड ला मन्या फेणेचा "फास्टर फेणे टोला हाणतो" हे पुस्तक देवून सत्कार..
सहभागी मिपाकर - (डावीकडून) चचा, सौरभ उप्स, प्यारेकाका, सत्कारमूर्ती मन्या, मोदक, विमे, धन्या, किसन, तामा. फटूसहकार्य- वल्ली
राणीवश्या मागे प्यारे काका - हा फोटो २ सेकंद लेट आहे. ;-)
Silent Spectators ...
एक निवांत क्षण...
18 Apr 2012 - 10:25 am | गवि
मूळ धागा खास... आणि त्यावर दिलेल्या या मोदकच्या प्रतिसादातला "एक निवांत क्षण".. एकदम स्वप्नवत वाटतोय.
अफाट गड आणि त्यावरची तुमची अफाट स्वारी.. आणि त्याचं झकास वर्णन.. मस्त मेजवानी...
18 Apr 2012 - 11:12 am | ५० फक्त
महाड ला मन्या फेणेचा "फास्टर फेणे टोला हाणतो" हे पुस्तक देवून सत्कार.. - या वाक्यांत ' देवुन' या शब्दाच्या जागी श्री. स्पाजींची ज्येष्ठता लक्षात घेता ' अर्पण करुन' असे शब्द घालावेत अशी नम्र दुरुस्ती सुचवतो.
18 Apr 2012 - 6:12 pm | मोदक
इथे आम्ही "झिंदाबाद" आणि "विजय असो" च्या घोषणा देत आहोत आणि तुम्ही "अमर रहे" चा आग्रह करताय.. ;-)
19 Apr 2012 - 4:39 pm | इरसाल
अर्पणच म्हटला....तर्पण म्हटला असता तर ? (डोळे उडव्णारी स्मायली हाये इते.)
17 Apr 2012 - 9:38 pm | बिपिन कार्यकर्ते
अप्रतिम! _/\_
17 Apr 2012 - 10:03 pm | छोटा डॉन
हेच म्हणतो.
लेख भलताच आवडला, हळुहळु आस्वाद घेतो आहे.
- छोटा डॉन
18 Apr 2012 - 12:05 am | गणपा
असेच म्हणतो.
18 Apr 2012 - 2:00 pm | विजय नरवडे
असेच म्हणतो.
19 Apr 2012 - 12:26 pm | मूकवाचक
_/\_
18 Apr 2012 - 5:37 pm | अत्रुप्त आत्मा
ऐतिहासिक ट्रिपचा ऐतिहासिक वृत्तांत :-)
खरोखरच कभी न भूले कोई, असे क्षण जगलात रे,,,राजाच्या गडावर... आणी आज मला अंशतः का होइना पण वृत्तांत वाचुन तिथे तुमच्यात असल्याचे सुख लाभले... पुढच्यावेळी सहभागी योग लाभावा,हे मात्र आता मनात येतय...
@तिन्ही बाजूं मोकळ्या असल्याने भर्राट वारा येत होता त्यामुळे तिथे पणत्या पेटू शकल्या नाहीत मात्र धूप आणि उदबत्ती मात्र लावल्या गेल्या. भावविभोर होऊन आम्ही सर्व समाधीपाशीच गप्पा मारत बसलो. रात्रीचे बारा, सव्वाबारा वाजलेले. प्यारेकाका, मोदक, विमे आणि स्पा यांची अध्यात्मावर खोलवर चर्चा सुरु झाली. बाकी मंडळी चर्चा एकदम तन्मयतेने ऐकत होती. मी आणि धन्या मात्र समाधीकडे एकटक पाहात अध्यात्माचीच अनुभूती घेत होतो. मधूनच एखादी तेजाळती उल्का झगझगीत प्रकाश टाकून निमिषार्धात अदृश्य होत होती. सप्तर्षी डोक्यावर येऊन मृग क्षितीजाला टेकलेला होता. चंद्रोदय पहाटेचा असल्याने नभांगण तारकांनी गच्च भरून गेले होते. >>> हाच तो क्षण ज्याचे वल्लीनी जाण्यापूर्वी खूप वर्णन केले होते,आणी तो निसटणार याची मला हुरहूर लागलेली होती...पण वल्लीच्या लेखनानी तो मला आज खरोखरी लाभला... या बद्दल त्या क्षणाचे सर्व साथिदार आणी वल्लीचे मनःपूर्वक धन्यवाद ....
3 May 2012 - 11:05 am | वपाडाव
कसं रे... तु अन मी लै लै लै म्हंजे लै मिस केला राव हा ट्रेक...
17 Apr 2012 - 10:30 pm | रेवती
भारी वृत्तांत व फोटू.
फोटूतील मिपाकर मागल्या जन्मी मावळे असल्याची शक्यता वाटते.;)
एक प्रश्न. गेली अनेक वर्षे गड किल्ले यांची स्वच्छता राखण्याबाबत जनजागृती चालू आहे.
त्याचा थोडातरी परिणाम दिसतो का? याच गडावर असे नाही तर बाकीही गडांवर.
18 Apr 2012 - 7:11 pm | प्रचेतस
रायगड बराच स्वच्छ आहे. इतर ठिकाणी दिसणार्या गुटख्याच्या पुड्या, प्लास्टिकच्या पिशव्या येथे फारश्या दिसत नाहीत.
खटकण्यासारखी गोष्ट एकच. महाराजांचे सिंहासन, समाधीस्थान या जागी कायमस्वरूपी दिवाबत्तीची सोय व्ह्यायला हवी. सूर्यास्तानंतर या जागा अंधारात बुडून जातात.
इतर गडांपैकी सिंहगडाची तर बरीच वाट लावली आहे. पन्हाळा, विशाळगडाबद्दल तर बोलायलाच नको. जे गड मूलतःच दुर्गम आहेत आणि जेथे प्रवासाच्या फारश्या सोयी नाहीत अशाच वास्तू बर्यापैकी सुस्थितीत आहेत.
18 Apr 2012 - 7:27 pm | रेवती
धन्यवाद.
17 Apr 2012 - 10:51 pm | पैसा
मस्त वर्णन आणि फोटो सुद्धा! शाबास म्हणायला शब्द कमी आहेत. तू लई नशीबवान रे वल्ल्या!
17 Apr 2012 - 10:57 pm | सूड
वृत्तांत नेहमीप्रमाणेच झकास !!
17 Apr 2012 - 10:57 pm | चित्रगुप्त
अप्रतिम फोटो आणि लिखाण
एक विनंती अशी, की शेवटल्या दोन्ही फोटोत नेमके कोणते कोण आहे, ते लिहावे, म्हणजे माझ्यासारख्या दूरस्थांना माहिती होइल.
18 Apr 2012 - 9:29 am | स्पा
शेवटच्या फोटूत उजवीकडून
वल्ली
किसन
धनाजीराव वाकडे
प्यारे
मोदक
विश्वनाथ मेहेंदळे
तानाजी मालुसरे
सौरभ उप्स
चचा
आणि मी उर्फ (स्पा )
17 Apr 2012 - 11:13 pm | सोत्रि
खास वल्ली टच असलेला वृत्तांत एकदम मस्तच जमलाय!
- (शिवप्रेमी) सोकाजी
17 Apr 2012 - 11:14 pm | सोत्रि
प्र का टा आ
18 Apr 2012 - 12:57 am | पिवळा डांबिस
सुरेख फोटो आणि उत्तम वृत्तांत!
जियो!!
18 Apr 2012 - 12:58 am | सुनील
सुरेख माहिती आणि फोटो.
विस्मृतीत गेलेली महाराजांची समाधी ज्योतिबा फुले यांनी १८६९ मध्ये प्रकाशात आणली असे समजले जाते. तिच्या डागडुजीकरीता (ब्रिटिशांची खप्पामर्जी होण्याच्या भितीने) कोणी आर्थिक मदत करायला तयर नव्हते तेव्हा बडोद्याचे गायकवाड महाराज पुढे आले आणि त्यांनी मदत केली. (त्या बदल्यात बडोदेकरांच्या नुकत्याच दिवंगत झालेल्या आवडत्या कुत्राचीदेखिल समाधी त्यांनी बांधून घेतली). सध्या मात्र ती समाधी महारांच्या "वाघ्या" नामक कुत्र्याची आहे असे सांगितले जाते. परंतु हे सत्य नव्हे.
18 Apr 2012 - 7:15 pm | प्रचेतस
मूळात तिथे महाराजांच्या राणीसरकार पुतळाबाईसाहेब यांची समाधी होती. सतीच्या चौथर्याचे बांधकाम होते. महाराजांच्या देहावसानानंतर पुतळाबाईसाहेब त्याच ठिकाणी सती गेल्या होत्या. नंतर गायकवाडांनी त्याच जागी कुत्र्याची समाधी बांधली.
18 Apr 2012 - 1:25 am | सुहास झेले
नेहमीप्रमाणे मस्त वृत्तांत वल्लीशेठ.....
माझी ही रायगड स्वारी थोडक्यात चुकली :( :(
18 Apr 2012 - 2:53 am | प्रभाकर पेठकर
रायगडाला एकदा धावती भेट दिली होती. पण आज हा वृत्तांत वाचून समग्र रायगड दर्शन झाले. वाचताना मन भरून येते. एकाच भागात सर्व वृत्तात्त बांधताना जरा धावपळ होऊन वाचकांची दमछाक होईल असे वाटते आहे. असो. पण मजा आली वाचताना. अभिनंदन.
18 Apr 2012 - 4:45 am | स्पंदना
जवळ जवळ तिनदा रायगड पाहिला पण अस वाटतय वल्ली तुमच्या सारख्या जाणकाराबरोबर जो आनंद मिळतो तो वेगळाच असावा. तुम्हा सोबत असलेल्या मिपाकरांचा हेवा वाटतो.
बाकि टकमक टोकावरुन खाली उतरण शहारा आणुन गेल. उगा अशी धाडस करु नका. आम्ही तर त्या टकमक टोकावर रांगाव लागत की काय अश्या अवस्थेला आलो होतो, खाली दिसणार एक छोटेखाणी गाव अन बंधारा अक्षरशः खेळातले वाटावे असे दिसत होते.
शेवटी मेघडंबरीत शिव प्रतिमा स्थापन झाली तर, आम्ही जायचो तेंव्हा फक्त होळीच्या माळावरच होती, अन मग जोग त्यांच्या व्हिडिओत ही प्रतिमा राज सिंहासनावर स्थापित असायला हवी अस दाखवत.
रोप वे न वर जाताना गडाला छोटी छोटी माकड चिकटलेली दिसतात, अगदी लक्ष देउन पाह्यल तर दिसतात, कारण जवळ जवळ मातिच्याच रंगाची असतात.
तुम्ही जे वाघबिळ म्हणताय ते टेहळणी साठी असाव का? कारण तिथुन लांब वरचा पल्ला नजरेत येतो.
ब्रिटेशांनी जेथुन तोफा चढवुन हा गड भाजुन काढला तो उंचवटा बघ्ताना अक्षरशः वेदना होतात.
समाधि जवळ मात्र मला कधिच एकांत नाही लाभला, तुम्ही काढलेल्या फोटोतली ती माणस विरहित समाधी मला कधिच नाही पहायला मिळाली. एकदा तर शाळेची सहल आलेली , अन सारी मुल त्या समाधीवर चढुन उस खात बसलेली पाहिली अन कालाय तस्मै नमः अस खेदान म्हणाव लागल.
अग्दी शेवटी गडाच्या पायथ्यालगत्च्या रस्त्यान आम्ही चालत आत पर्यंत गेलो होतो, अहो सुर्य प्रकाश पोहोचत नाही राव तिथ, अन तिथुन गड जसा एक रुंद खांद्याचा पुरुष उभा असल्यासारखा दिसतो.
फोटो अन वृतांत वाचुन पुन्हा एकदा गडावर जाउन आल्याच समाधान लाभल अस म्हणेन, पण खर सांगु? हेवा वाटला.
मन्या तुझा फोटो ढापु का रे? आहेस बाबा कसबी , मानल.
18 Apr 2012 - 9:26 am | स्पा
आहा रे वल्ली...
कसल लिहील आहेस रे बाबा...
फोटो तर भन्नाट आलेत :)
वल्ली आणि इतर मिपाकारांसोबत लैच धमाल आली
अपर्णा तै :) बिनधास्त घे ग फोटू
वल्लीला लेख हि लिहायचा होता म्हणून जास्त फोटू टाकता आले नाही..
फक्त फोतूंचा असा एक वेगळा धागा काढेन
बाकी तुझा प्रतिसाद सुद्धा झकास
18 Apr 2012 - 7:41 am | ५० फक्त
उत्तम वृतांत आणि ट्रिप धमाल केल्याबद्दल अतिशय धन्यवाद सर्वांना. ऑफिसच्या कामामुळे येउ शकलो नाही याची खंत होतीच, ती काही प्रमाणात भरुन निघाली एवढंच समाधान.
18 Apr 2012 - 9:49 am | निनाद मुक्काम प...
हर हर महादेव
जय शिवाजी ,जय भवानी
शाळेची सहल येथे आली असता बस मध्ये व प्रत्यक्ष गड चढतांना दिलेल्या घोषणा आठवल्या.
रायगडचे रुपडे गेल्या काही वर्षांमध्ये कमालीचे बदलले आहे.
ह्या रायगड परिक्रमेत सहभागी झालेल्या सर्व मिपाकरांचे मनपूर्वक अभिनंदन.
व पुढील दुर्ग मोहिमेस शुभेच्छा.
18 Apr 2012 - 9:52 am | पियुशा
चेपस फोटु़ज :) विथ झक्कास वुतांत !!!!
18 Apr 2012 - 9:57 am | प्रास
कसली झकास भटकंती केलीत रे! महाराजांचे गड - किल्ले मनसोक्त बघणं काही अजून झालेलं नाही. आत्ताची ही संधी हुकली याचंही वैषम्य राहून राहून वाटेल पण पुन्हा असा योग येईल तेव्हा हुकवणार नाही हे मात्र नक्की.
वृत्तांत आणि फोटो अगदी जबरदस्त आहेत. मन्याभाऊचा योग्य त्या पुस्तकाद्वारे सत्कार केलात हे उत्तम झालं.
लवकरात लवकर गडकिल्ल्यांची मोहीम पुन्हा निघावी अशीच प्रार्थना.
18 Apr 2012 - 10:12 am | चौकटराजा
वल्ली, वृतांत मस्तच .त्यात काही वाद नाही. मन्या फेणे फोटोशॉप वाला आहे त्याला हे फोटू आवडले आहेत याचा विस्मय.
११ क्रमांकाचा फोटो पहा . त्यात मेघडंबरीत महाराज विराजमान झालेत . पण महाराज दिसताहेत कुठे ? यात अशी दुरूस्ती करावी. ही
कविता नसल्याने काही मिपाकरांची ( त्यातला एक तिथे आला होता ) दुरुस्तीला हरकत नसावी.
फोटोशॉप- मेनू-इमेज -अॅडज्ट्समेट्स- लेव्हल्स असे करीत गेल्यास फोटूचा हिस्टोग्राम दिसेल. त्यात ङाव्या बाजूला डोंगर दिसेल. याचा अर्थ चित्रात काळोख जास्त झाला आहे. त्या ग्राफ चा मधला बदाम डावीकडे वळविल्यास महाराज प्रकट होतील.
याच पद्ध्तीने मिपाकर, भिंती दरवाजे ई ना प्रकट करावे. महाराजांचा साईडने घेतलेला फोटू हा "शिल्होटी" या प्रकारचा असल्याने तो मस्त आला
आहे ,तो नको बदलू.
पुढच्या वेळी माझ्या घरी आल्यास तुला चहा तर मिळेलच पण उदेपूरचा व्रुतांत असेल तर राणाप्रताप लगेच प्रकट होतील. ( इथे डोळा मारलेली
स्माईली आहे वल्ल्या ) .
फोटो शॉप मधे इतरही सोयीनी फोटो दुरुस्त करता येतात हे सर्व इमेज मेनू मधे आहे.
18 Apr 2012 - 10:19 am | स्पा
मन्या फेणे फोटोशॉप वाला आहे त्याला हे फोटू आवडले आहेत याचा विस्मय.
११ क्रमांकाचा फोटो पहा . त्यात मेघडंबरीत महाराज विराजमान झालेत . पण महाराज दिसताहेत कुठे ? यात अशी दुरूस्ती करावी. ही
कविता नसल्याने काही मिपाकरांची ( त्यातला एक तिथे आला होता ) दुरुस्तीला हरकत नसावी.
फोटोशॉप- मेनू-इमेज -अॅडज्ट्समेट्स- लेव्हल्स असे करीत गेल्यास फोटूचा हिस्टोग्राम दिसेल. त्यात ङाव्या बाजूला डोंगर दिसेल. याचा अर्थ चित्रात काळोख जास्त झाला आहे. त्या ग्राफ चा मधला बदाम डावीकडे वळविल्यास महाराज प्रकट होतील.
याच पद्ध्तीने मिपाकर, भिंती दरवाजे ई ना प्रकट करावे. महाराजांचा साईडने घेतलेला फोटू हा "शिल्होटी" या प्रकारचा असल्याने तो मस्त आला
आहे ,तो नको बदलू.
चौरा काका.. तुमच्या सतत सूचना करण्याच्या स्वभावाला सलाम \
हि काही छायाचित्राची स्पर्धा नव्हे .. चुका काढायला...
फोटो काढण्यापेक्षाही.. वृतांत जास्त महत्वाचा आहे असे मला वाटते
आणि वल्ली चा फोटोग्राप्फिक सेन्स इतर कोणापेक्षाही खूप चांगला आहे, हे त्याच्याबरोबर फोटोग्राफी करताना जाणवले
त्यामुळे या अशा शुल्लक चुका काढण्यात काहीच पोइंत नाही..
असो...
तुमच चालुद्या
18 Apr 2012 - 10:39 am | चौकटराजा
या चुका नसतील तुझ्या मते तर तुझ्या फोटोशॉप चे सेन्स ला व ज्ञानाला माझाच त्रिवार दंडवत !
न ही ज्ञानेन सदृशं पवित्रं इह विद्यते
विद्या विनयेन शोभते
चौ रा.
18 Apr 2012 - 10:49 am | स्पा
या चुका नसतील तुझ्या मते तर तुझ्या फोटोशॉप चे सेन्स ला व ज्ञानाला माझाच त्रिवार दंडवत !
मी चूक नाही अस कधी म्हणालो?
आणि असल्याच चुका त्याच्या तर त्याला फोटोशोप येत नाही.. तर तो काय करणार ?
अहो तुम्हाला फोटोशॉप येत म्हणून अक्ख्या जगाला यायला हव अस आहे का?
आणि माझा फोटोशॉप सेन्स काय आहे.. हे माझ्या क्षेत्रातली माणस चांगलंच ओळखतात ..
त्यामुळे तुमच्यासारख्या माणसाशी वाद घालण्याची काडीचीही इच्छा नाही.. आणि गरज नाही...
धन्यवाद
18 Apr 2012 - 10:55 am | चौकटराजा
वल्लीला जर थोडेफार शिकायची ईच्छा असेल तर ..... ? कारण तो प्रतिसाद त्याला लिहिलेला आहे बरे ! बाकी तुझ्या नम्रते बद्द्ल कौतिक करावे तेवढे थोडेच. वल्लीचा लिखाणाला मस्त असा अभिप्राय दिलेला आहेच ना ?
हंस शुक्ल बक शुक्ल को भेद बक हंसयो:
नीरक्षीर विविकेतू हंस हसो बको बक:
18 Apr 2012 - 10:58 am | स्पा
हंस शुक्ल बक शुक्ल को भेद बक हंसयो:
नीरक्षीर विविकेतू हंस हसो बको बक:
स्वतःला काय सुरेख ओळखता हो तुम्ही
18 Apr 2012 - 11:38 am | चौकटराजा
प्रत्येक ठिकाणी छानच अभिपाय हवा असे बगळा म्हणतो तर हंसाचा आग्रह दूध ते दूध पाणी ते पाणी असा असतो .मग ते दूध एकाच माणसाच्या
मालकीचे का असेना !
बाय द वे मी फोटोशोप फ्लॅश ,थ्री डी मैक्स व माया काही प्रमाणातच शिकलो आहे .कोणताही क्लास न लावता. हे किती प्रचंड कपॅसिटीचे आहेत
व त्यात आपल्याला फारसे येत नाही हे मला कळून येण्याइतके तरी मी शिकलो आहे. त्यामुळे माझे कोणत्याही क्षेत्रात नाव वगैरे काही नाही. पण
वल्लीने मला होकार दिला तर तो माझ्या घराजवळच रहात असल्याने त्याला काही अधिक आयडीयाज देता येतील हा मूळ प्रतिसादाचा उद्देश आहे
याची नीट नोंद घ्यावी.
18 Apr 2012 - 11:52 am | सूड
ओ काका, हंस शुक्ल बक शुक्ल करुन धाग्याला कशाला शुक्लकाष्ठ लावताय. वल्लीला खरंच शिकवायची इच्छा होती तर ते खरडवहीतही लिहीता आलं असतं की !! हे आपलं माझं मत.
18 Apr 2012 - 12:44 pm | चौकटराजा
याने धाग्याला शुक्लकाष्ट कसे लागते बुवा ? धाग्याचा प्रतिसादच सांगतोय धागा जमला आहे. व वल्ली हा प्रशंसेला पात्र आहे. पण शिकताना
मांडी पोखरली तरी चालेल अशी जिद्द बाळगली तर काय हरकत आहे बुवा ? मी एका फोटोग्राफरकडे हॅडऑन अनुभवासाठी गेलो होतो.वयाने माझ्यापेक्षा वीस वर्षानी लहान असलेला तो विद्येने मोठा असल्याने त्याने केलेली हिडीस फिडीस सहन करीत मी काही शिकलो. माझे वय त्यावेळी
सत्तावन वर्षाचे होते.
18 Apr 2012 - 2:26 pm | सूड
पुन्हा तेच !! मी फक्त एवढंच म्हणतोय की शिकवायची इच्छा असेल तर तुम्ही खवत लिहू शकता त्याला. त्यापुढे ज्याची त्याची समज.
18 Apr 2012 - 2:26 pm | सूड
पुन्हा तेच !! मी फक्त एवढंच म्हणतोय की शिकवायची इच्छा असेल तर तुम्ही खवत लिहू शकता त्याला. त्यापुढे ज्याची त्याची समज.
18 Apr 2012 - 2:34 pm | चौकटराजा
पण हे ज्ञान इतराना मिळाले तर काय बिघडले ? काही तरी आलतू फालतू " अवांतर " खरडण्यापेक्शा बरे ना ? जास्तच चर्चा करायची झाली तर
आम्ही दोघेही प्रत्यक्ष भेटूच ना . एका सूचनेने तुम्हा सर्वांच्याच पोटात का वेदना व्हायला लागल्या ?. अशानेच धागा भलतीकडे जातो.
18 Apr 2012 - 4:35 pm | सूड
बरं, तुमचा बैल दूध देतो !! खूश ??
18 Apr 2012 - 4:43 pm | चौकटराजा
ही भाषा नाईलाजाने व मनात चडफडून सत्य स्वीकारणारा वापरतो. सु(डा)ज्ञास अधिक काय सांगावे ?
18 Apr 2012 - 3:33 pm | कवितानागेश
अस्तंगत होणारा वडिलधार्या माणसांचा मान आणि सौजन्य! !!!!! ;)
18 Apr 2012 - 3:41 pm | परिकथेतील राजकुमार
प्रतिसाद ऑफ द डे !
=)) =))
मस्त ग माउ.
18 Apr 2012 - 11:05 am | चौकटराजा
वल्लीला जर थोडेफार शिकायची ईच्छा असेल तर ..... ? कारण तो प्रतिसाद त्याला लिहिलेला आहे बरे ! बाकी तुझ्या नम्रते बद्द्ल कौतिक करावे तेवढे थोडेच. वल्लीचा लिखाणाला मस्त असा अभिप्राय दिलेला आहेच ना ?
हंस शुक्ल बक शुक्ल को भेद बक हंसयो:
नीरक्षीर विविकेतू हंस हसो बको बक:
18 Apr 2012 - 7:22 pm | प्रचेतस
चौराकाका, फोटोशॉप शिकायला तुमच्याकडेच येईनच. पण फक्त चहावरच भागवणार काय? ;)
बाकी मला व्यक्तिश: फोटोंवर कृत्रिमतेचे संस्कार करायला फारसे आवडत नाहीत. जरी त्याने फोटो कितीही उठावदार होत असला तरी. नैसर्गिक फोटोच मला जास्त भावतात. तरी नविन तंत्र शिकायला काहीच हरकत नाही. ते जेवणाचं फक्त तेव्हढं लक्षात ठेवा.:)
18 Apr 2012 - 9:01 pm | चौकटराजा
वल्ली , याला म्हणतात प्रतिसाद !
नैसर्गिकता काढायची म्हणजे आकाश पिवळे नाही करायचे आपल्याला की पॅरिसचा आयफेल राजगडावर न्यायचा नाही. आपल्या व आपल्या कॅमेर्याने अनवधानाने केलेल्या काही गफलती तिथे काहीशा सुधारता येतात, डीफोकस झालेला फोटो सुधारता येत नाही, हललेला फोटोही नाही.
जास्त एक्सपोझर च्या फोटोत काही करता येत नाही, कमी एक्स्पोझर असलेला फोटो ब्राईट केला तरी नॉईज ( ग्रेन ) येतो वगैरे.
वि सू - चहाने सुरवात करू . तू किती टिकतोस नाठ्या बुढ्या पुढे त्याप्रमाणे पोहे , समोसे, मग जेवण अशी वाढ करू.
( हे सारे मी अपमान सहन करीत चिंचवड मधे शिकलो . थोडेफार हेल्प )
18 Apr 2012 - 9:58 pm | मोदक
संभाषणावर लक्ष ठेवून आहे.
18 Apr 2012 - 10:16 pm | अत्रुप्त आत्मा
मी पण आलो लक्ष्य-ठेवायला ;-)

19 Apr 2012 - 2:03 am | प्रभाकर पेठकर
मीही कधीचा विचार करतो आहे फोटोशॉप शिकून घ्यावे म्हणून.
19 Apr 2012 - 9:19 am | मोदक
चौराकाका.. माझ्यामुळे दोन (ज्येष्ठ) मेंबर विद्यार्थी म्हणून मिळाले आहेत..
कमीशनचे काय..? हॅ हॅ हॅ.. ;-)
20 Apr 2012 - 7:47 pm | चौकटराजा
मोदका लेका, कमिशन कसचे? तो वल्ल्या शिकण्याबद्द्ल माझ्याकडूनच जेवण मागतोय ! पेठकर काका तर दुबई ते पुणे विमानाचे भाडे मागणार !
18 Apr 2012 - 10:19 am | मृत्युन्जय
ज्जे बात. अभिनंदन.
सालं अति झालं आणि हसु आलंच्या मांदियाळीत असले भन्नाट लेख आणि अनुभव लै म्हणजे लैच सुखद वाटतात. भिक्कार, बकवास, रद्दड विडंबनांच्या आणि जिलब्यापाडु लेखांच्या पसार्यात वल्लीशेट तुमचा लेख लैच उठुन दिसतो आहे. जियो.
18 Apr 2012 - 11:23 am | तुषार काळभोर
लाईक!!
18 Apr 2012 - 10:40 am | इरसाल
उत्तम माहीती आणी फोटो सुध्हा.
एक शंका - ते जगदिश्वर मंदिर बांधणी मुस्लिम धाटणीची आहे असे वाटतेय.
18 Apr 2012 - 10:47 am | ऋषिकेश
मस्तच की!
लगे रहो!
18 Apr 2012 - 11:18 am | मी कस्तुरी
व्वा....भारी वृत्तांत आणि फोटोसुद्धा :)
18 Apr 2012 - 11:24 am | अक्षया
छान वर्णन, छान फोटो!!
जाऊन आल्यासारखे वाटले रायगड ला :)
18 Apr 2012 - 11:34 am | अभिष्टा
छान वृत्तांत आणि फोटोसुद्धा. आधी रोपवे पाहिल्यावर वाटलं हॅ! रोपवेनेच जाऊन रोपवेनेच येणार! मग काय मजा नाही :D
शिवरायांच्या राजधानीचे अवशेष पाहून तेव्हाच्या काळात राबता असल्यावर हीच राजधानी कशी दिसत असेल, तिचा कसा दबदबा असेल? हे मनात आल्यावाचून राहिले नाही.
18 Apr 2012 - 11:35 am | तुषार काळभोर
अतिशय सुंदर, ओघवतं, आणि डिट्टेलवार वर्णन...मस्स्त!!
18 Apr 2012 - 12:22 pm | तुषार काळभोर
रोपवेतून काढलेले फोटू कुठायत?
18 Apr 2012 - 12:54 pm | यकु
मस्त रे! मजा आली वाचताना.
18 Apr 2012 - 1:04 pm | परिकथेतील राजकुमार
संपूर्ण लेखमालेचा मजकूर एकाच लेखात का बसवला आहे ?
चांगले ३/४ भाग आणि सविस्तर माहिती आली असती तर अजून मजा आली असती असे वाटते.
बाकी भटकंती आवडली.
दोन प्रश्न :-
१) ४१ क्रमांकाच्या फटूत श्री. विमे असे हर्षवायू झाल्यासारखे का बघत आहेत?
२) स्पावडूचे प्रिय मित्र श्री. इंटेश ह्यांना तुम्ही बरोबर का नेले नाहीत ?
18 Apr 2012 - 1:54 pm | स्पा
४१ क्रमांकाच्या फटूत श्री. विमे असे हर्षवायू झाल्यासारखे का बघत आहेत?
काही कळायला मार्ग नाही..पण आपण आवर्जून नोंद घेऊन त्यांची चौकशी केलीत.. बरे वाटले
स्पावडूचे प्रिय मित्र श्री. इंटेश ह्यांना तुम्ही बरोबर का नेले नाहीत
एके काळी ते आपले सर्वात लाडके विद्यार्थी आणि अनुयायी होते हे विसरलात वाटत ;)
18 Apr 2012 - 2:13 pm | विश्वनाथ मेहेंदळे
हाच प्रश्न खुद्द विमेंना पण पडला होता. फोटो धड येण्याचा योग पत्रिकेत नाही आहे माझ्या बहुतेक. एकही फोटो मनाजोगता येत नाही. कधी डोळेच उन्हाने बारीक होतात. कधी मी बोलतानाचा फोटो काढला जातो. याच ट्रीपच्या एका फोटोत समोरून आलेल्या वाऱ्याने शर्ट अंगाला चिकटला, त्यामुळे फोटो फक्त पोटच दिसते आहे. त्यातून आधीचा फोटो स्पा चा. त्यामुळे मी अजून उठून दिसत होतो. तो फोटो न टाकल्याबद्दल वल्ली चे आभार ;-)
बाकी मूळ लेखाला प्रतिक्रिया देतो निवांतपणे.
18 Apr 2012 - 2:24 pm | परिकथेतील राजकुमार
मात्र क्रमांक दोनच्या प्रश्नास दिलेली बगल आमच्या बरोब्बर लक्षात आलेली आहे.
अवांतर :- श्री. विमे ह्यांना येणारा प्रॉब्लेम लक्षात घेता, हाच प्रॉब्लेम अनेकांना येत असावा असे वाटते. मिपावरील तज्ञ फटूग्राफर फोटो कसे काढावे ह्याच बरोबर फोटोसाठी कसे उभे रहावे ह्याचे देखील मार्गदर्शन का करत नाहीत ?
@स्पा :-
भिषण अपघातातून सावरत असलेल्या माणसास शक्यतो त्या प्रसंगाची पुन्हा आठवण देवू नये.
18 Apr 2012 - 1:08 pm | अमृत
फोटो आणि वृत्तांत.
अमृत
18 Apr 2012 - 1:16 pm | नंदन
फोटो आणि वर्णन - दोन्ही सुरेख!
18 Apr 2012 - 1:56 pm | सहज
नंदनशी बाडीस
18 Apr 2012 - 2:17 pm | कपिलमुनी
>>सन १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरच्या वरवंट्याखाली गड भाजून निघाल्यानंतर वेबसाऊ झाला ..........
या बद्दल कोणी मिपाकर जास्त माहिती देउ शकेल काय ?
18 Apr 2012 - 2:44 pm | तुषार काळभोर
जास्त नाही पण येथे थोडी फार आहे.
18 Apr 2012 - 2:33 pm | तुषार काळभोर
आताच विकीवर रायगडाचे फोटो पाहिले. अगागागा!!!
ड्वाळे दिपले! रायगडावर पावसाळ्यात स्वर्ग अवतरल्यासारखं वाटत असंल...
कोणी गेलतं का पावसात तिथं?
18 Apr 2012 - 2:43 pm | कवितानागेश
मस्त, सुंदर, अप्रतिम.... :)
18 Apr 2012 - 2:52 pm | नगरीनिरंजन
वृत्तांत खूप आवडला!
अजून येऊ द्या.
18 Apr 2012 - 7:39 pm | लीलाधर
तसे पाहीले तर हा माझा दुसरा कट्टा मिपाकरांसोबत आणि तोही खुद्द रायगडावर एकंदरीत फारच मजा आली रायगडवारी करायला. जेवढी मजा रायगडवारी करायला आली तेवढाच मस्त वृत्तांत आणि फोटोसुद्धा. धन्यवाद वल्लीदा.
शिवाजी महाराजांवर आधारीत मी ऐकलेले एक गीत खास मिपाकरांसाठी...
जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय !
तू रक्षियले देशाला, न्यायरुपी आदर्शाला, तू जागविले धर्माला,
जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय !
तू प्रेरक नवतरुणांचा, तू प्रतिक चारित्र्याचा,
राष्ट्रपुरुश या देशाचा, जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय !
देशाच्या एकत्वाचे, ध्येयपूर्तता करण्याचे, राज्य हिंदवी मोलाचे,
जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय !
बोला शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय !
18 Apr 2012 - 7:42 pm | प्यारे१
>>>जेवढी मजा रायगडवारी करायला आली तेवढाच मस्त वृत्तांत आणि फोटोसुद्धा
व्यक्ती आणि वल्लीतली एक व्यक्तीरेखा आठवली. असो. :)
18 Apr 2012 - 7:47 pm | लीलाधर
प्यारे व्यक्तिरेखेचे नांव काय ते देखील नमूद करा म्हणतो म्हणजे आम्हासही कळेल :)
18 Apr 2012 - 7:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वृत्तांत झकास.............!
-दिलीप बिरुटे
18 Apr 2012 - 7:40 pm | प्यारे१
वल्ली आजोबा,
मस्त वृत्तांत! परा म्हणतो तसा आणखीन फुलवता आला असता.
जगदीश्वर मंदिरात आम्हाला सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल जाहिर आभार!
बाकी ३३ व्या फटुतल्या एखाद्या वाटेवरुन जायचं झाल्यास, जाताना आमची फाटते ब्वा!
कबूल एकदम.........! काय करायचं? :)
मोदक, दोन सेकंद 'आधीचा' फोटो काढला असतास तर 'निवांत क्षण' खाली २-२ फोटो देता आले असते रे!
असे 'दर्जेदार' फोटो काढायला वल्ली बरोबरच 'क्लास'ला जा हो! :)
बाकी, काही मिपा आयडींमागच्या तर्कदुष्टांना टकमक टोकावर न्यायला आणि ..... मज्जा आली असती.
लास्ट बट नॉट लिस्ट पब्लिक, डोन्ट फीड द ट्रोल्स असे आपले एक दुसरे का ?का ? म्हणून गेले आहेतच.
लक्षात राहू द्या!
19 Apr 2012 - 12:01 am | मोदक
अवघड वाट...?
प्यारे काका, खालचा फोटो बघा.. मी स्वत: काढला आहे. या मित्राच्या फक्त चार पावले अलिकडे होतो मी फोटो काढताना. सांगा आता आपली वाट अवघड होती का सोपी. :-)
19 Apr 2012 - 4:29 pm | प्यारे१
बिगरीच्या पोराला ४-५ चा पाढा पण 'जास्त' असतो रे! :)
बाकी, चिंचवडचं पाणी 'जड' आहे का रे जास्त?????
चेसुगु, चौरा, वल्ली , तू.... पचायला जड आहात रे! ;)
20 Apr 2012 - 1:14 pm | मोदक
ज्याची त्याची क्षमता..
काही लोकांना नाहीत पचत जड गोष्टी.. मग काय सकाळी साध्या भातावर फोडणीचे वरण आणि संध्याकाळी फोडणीच्या भातावर साधे वरण.
बरोबर ना..? ;-)
20 Apr 2012 - 2:46 pm | प्यारे१
असो. :)
18 Apr 2012 - 8:32 pm | यशोधरा
मस्त मस्त
18 Apr 2012 - 9:25 pm | किसन शिंदे
एवढा डिट्टेलवार वृत्तांत फक्त तुझ्याकडून लिहला जाऊ शकतो. :)
18 Apr 2012 - 10:20 pm | तानाजी मालुसरे
तुमचा वृत्तांत अतिशय छान वाटला.!
अगदी पुन्हा एकदा रायगडावर फिरून आल्याचा आनंद मिळाला. :)
संपुर्ण ट्रेकमध्ये खेळीमेळीचे वातावरण ठेवल्याबद्दल बाकी मिसळपावकरांचेही आभार!