प्राध्यापक जयंत नारळीकरांनी सुरू केलेली "आयुका" ही संस्था सगळ्यांनाच किमान ऐकूनतरी माहित असेल. तिथे खगोलशास्त्राचा अभ्यास चालतो हेही सुज्ञास सांगणे न लगे. तुम्हाला असं वाटत असेल की मी पुन्हा काहीतरी खगोलशास्त्राबद्दल लिहिणार असेन. नाही, या वेळेस मला वेगळ्याच विषयाकडे मिपाकरांचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. आणि का प्रश्न आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा असावा असं मला वाटतं.
आयुकामधे आत्ता विश्वरचनाशास्त्राबद्दल एक कॉन्फरन्स सुरु आहे. त्यासाठी एकूण मिळून जवळजवळ १५० लोक तरी पुण्यात येऊन जातील. यात अनेक परदेशी पाहुणेही आहेत. या सर्व खगोलशास्त्रज्ञांसाठी शुक्रवारी संध्याकाळी काही सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. कालच श्रीमती प्राची (आडनाव विसरले, ढोबळे का काहीतरी) यांच्या गझल गायनाचा कार्यक्रम झाला. माझ्यासारख्या औरंगजेबांना विचाराल तर कार्यक्रम उत्तम झाला. पण विषेश सांगण्यासारखी गोष्ट ही की श्रीमती प्राची आणि त्यांचे तबला आणि पेटी वाजवणारे दोन साथीदार यांना पुष्पगुच्छ दिला नाही तर एक-एक छोटं रोपटं देण्यात आलं. "झाडे लावा, झाडे जगवा" असे बोर्ड्स कितीतरी ठिकाणी दिसतात. पण अशा पद्धतीनं त्याचं आचरण फार वेळा दिसत नाही. फुलं काय आत्तापर्यंत कोमेजलीही असती, पण ती रोपटी या कलाकारांना खगोलशास्त्राची आणि शास्त्रज्ञांची आठवण नक्की देतील ... आम्ही विश्वाच्या पसाय्राचा, उत्पत्तीचा अभ्यास करत असलो तरी आमचे पाय जमिनीवरच आहेत हे सांगणारी ती रोपं.
ही कल्पना कोणाची ते विचारायचं मला तेव्हा सुचलं नाही, पण ज्यांनी कोणी ही कल्पना सुचवली, आणि अंमलातही आणली त्यांचं मला फार कौतुक वाटलं. आणि त्यांचं जाहीर अभिनंदन करावंसं वाटलं म्हणून हा उद्योग!
(वसुंधराप्रेमी) यमी
प्रतिक्रिया
2 Aug 2008 - 10:09 pm | स्नेहश्री
सर्वानी हा पायंडा पाडायला हरकत नाही.
आपल्याला इतर वेळेस पण अस करता येइल....
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
2 Aug 2008 - 10:09 pm | प्राजु
हे मात्र एकदम मस्त. मी तर म्हणते.. अशा कार्यक्रमांनाच काय पण एखाद्याच्या वाढदिवसाला त्याच्याकडे असणार्या वस्तूंमध्ये भर टाकणारी भेटवस्तू देण्यापेक्षा एखादे रोपटेच द्यावे. त्यावर संदेश लिहावा,
"या रोपट्याप्रमाणेच आपला आनंद, सुख, समृद्धी वाढत राहो...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
2 Aug 2008 - 11:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
"या रोपट्याप्रमाणेच आपला आनंद, सुख, समृद्धी वाढत राहो..."
... आणि वयही?
स्वगतः माझं एक ठीक आहे, मला काही फरक नाही पडत; पण इतर मुली/बायकांकडून फटके मिळतील.
यमी
3 Aug 2008 - 9:33 am | भडकमकर मास्तर
ज्याला देतोय त्याची सोय आणि आवड पाहणे महत्त्वाचे असे मला वाटते...
ते दिलेले रोप / कुंडी नेणे आणणे हा पाहुणा कसा करणार आहे? त्या पाहुण्याचा घरापर्यंतचा प्रवास कसा आहे ? त्याच्या घरात रोपे लावायची सोय / कुंडीची देखभाल करायची इच्छा आहे का ? समजा नसली तर तो माणूस ती रोपे वाटेत टाकून न देता आणखी काही जणांना त्या रोपाचे पालकत्त्व स्वीकारायला लावण्याएवढा कमी व्यस्त ( बिझी ) आहे का ?
"वृक्षवल्ली आम्हा सोयरे .." वगैरे त्याची मते आहेत का ? त्याचे प्रबोधन तितके झाले आहे का ?
या प्रश्नांची उत्तरे आधी थोडी तपासली पाहिजेत...
ही उत्तरे पॉझिटिव्ह असली तर रोपे प्रेझेंट द्यायला हरकत नाही...
या संदर्भातला माझा स्वतःचा अनुभव ... ---१९९१ मध्ये दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा कोणतातरी मोठा सत्कार वगैरे झाल्यानंतर प्रत्येकाला रोपाची एक मोठी कुंडी देण्यात आली, मला पुढे दीड तासाचा गर्दीतला बस प्रवास करून घरी पोचायचे होते.....कार्यक्रमानंतर मी हळूच जाऊन ती कुंडी तिथे उरलेल्या काही कुंड्यांमध्ये ठेवून परत आलो... ( कोणा संयोजकांना सांगून ठेवली असती तर "त्याला काय होतंय ? जा घेऊन , एवढं साधं जमत नाही का? " असे कटाक्ष, उद्गार वगैरे निघाले असते.... आणि ती जड कुंडी बसमध्ये सांभाळून न्यावी लागली असती...) इतकं काही माझं प्रबोधन झालं नव्हतं ना.... !!!
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
3 Aug 2008 - 9:59 am | ऋषिकेश
हं मास्तर पुढच्यावेळी बियाणं देतो कसे ;) (ह. घ्यालच)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
2 Aug 2008 - 10:28 pm | श्रीकृष्ण सामंत
अदिती,
मला आठवतं,त्यावेळी माझ्या पुण्याला खूप खेपा व्हायच्या.रोज मुंबई ते पुणे आणि बॅक असा विमानाने प्रवास करायचा कंटाळा यायचा.त्यामुळे मी नंतर रोज पुण्याला डेक्कन क्विनने जायचो यायचो.
हे सांगण्याचं कारण असं की मी त्यावेळी माझ्या डब्यातून पाहिलं की एक सदगृहस्थ रोज एक पिशवी भरून बि-बियाणं आणून पावसाळ्यात पुणेमुंबईच्या मार्गात दोन्ही बाजूला मुठ मुठ भरून ते बि-बियाणं बाहेर शेतात भिरकाऊन द्यायचे.कुतुहल म्हणून मी त्यांना विचारल्यावर ते मला गाऊन म्हणाले,
"वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरी
पक्षीही सुस्वरे आणती"
नंतर मला कळलं गेली कित्येक वर्षे हे गृहस्थ हा उद्दोग निमुट करित आहेत.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
2 Aug 2008 - 11:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मी हल्ली असलंच काही सुरू केलं आहे. लोकांना भेट म्हणून पुस्तकं देते. पण आता घरी काही रोपटी उगवली आहेत. ती जरा मोठी झाली की तीच देत जाईन (माझे पैसेपण वाचतील). दिवाळीत लोकांना काय द्यायचं याचा विचार नको करायला!
बिया नुसत्याच टाकण्यापेक्षा त्या जर का त्या जमिनीत जरा खाली खणून टाकल्या तर जास्त बरं. पण गाडीतून उतरून शक्य नाही, तिथे हे सज्जन जसं करत आहेत (/होते) तेवढंच शक्य आहे.
मी अलिकडेच असं वाचलं की वारकरी वारीला जाताना वाटेत अशाच पद्धतीने बिया टाकतात. त्यांना सामजिक वनीकरण विभागाकडून रोपंही मिळतात. आणि आता वारीचा रस्ता बराच हिरवा झाला आहे.
प्राजु, हा संदेश पण एकदम पर्फेक्ट!
यमी
2 Aug 2008 - 11:56 pm | रवि
>>आम्ही विश्वाच्या पसाय्राचा, उत्पत्तीचा अभ्यास करत असलो तरी आमचे पाय जमिनीवरच आहेत हे सांगणारी ती रोपं.
अगदि बरोबर ..... पाय जमिनिवरच असायला हवे..........
कबुल........
3 Aug 2008 - 12:23 am | भडकमकर मास्तर
उत्तम कल्पना ....
अवांतर : प्राची दुबळे नावाच्या एक गायिका आहेत , त्यांचा एक कार्यक्रम ऐकला आहे...
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
3 Aug 2008 - 12:27 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मग त्याच त्या! कोणाचंही आडनाव दुबळे असेल असं मला वाटलं नाही म्हणून मी माझ्या कानांना आणि स्मरणशक्तिला दोष दिला.
यमी
3 Aug 2008 - 2:09 am | टारझन
यमी दिदि .. चांगला काथ्याकुट आहे. आता मला पण स्फुरण चढले आहे. मी पण अफ्रिकेत एक दोन रोप लावतो कुठे तरी... :) सगळ्यांनी रोपं लावली पाहिजेत आणि ती वाढवली पाहिजेत. पुर्ण....
अवांतर : मास्तर .. हसून हसून मेलो ... =)) दुबळे आडणावाच्यांच्या आवाजात काय ताकद असेल हे पचलंच नाही. :)
टारझन (गेल्या जन्मीचा खविस)
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
3 Aug 2008 - 6:21 am | मुक्तसुनीत
समीर नि प्राची दुबळे हे दांपत्य म्हणजे दोन गुणी गायक. त्यापैकी समीर दुबळे म्हणजे अभिषेकींच्या परंपरेतले. हे दोघेही अलिकडे अमेरिकेला येऊन गेले. त्यांचा कार्यक्रम आमच्या भागात झाला नाही ; पणा त्यांच्या गाण्याच्या मुद्रिका ऐकल्या. सुरेख गातात दोघेही. प्राची लाईट संगीत गातात. समीर अभिजात.
3 Aug 2008 - 11:37 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
कुबड्या,
आवाज ऐकून झालाय प्राचीचा म्हणून सांगते, तिच्या आवाजात ताकद आहे ... जिममधे न जाता!
आणि हे आता फारच अवांतर आहे.
यमी
4 Aug 2008 - 2:42 pm | टारझन
अहो अदिती आत्या :)
आवाज ऐकून झालाय प्राचीचा म्हणून सांगते, तिच्या आवाजात ताकद आहे ... जिममधे न जाता!
अगं मग असेल ना तिचा आवाज पॉवरफुल !!मी आडनावाबद्दल बोललो. जिम मधे आवाज पॉवरफुल बनतो या नव्या शोध लावल्या बद्दल आपले अभिनंदन.
अति अति अवांतर : प्राचीच्या ताकदवान आवाजाने तुझे अवयव शाबुत आहेत ना =)) =))
(ह.घे. हे वे.सां.न.ल)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
3 Aug 2008 - 8:17 am | विसोबा खेचर
रोपटे देण्याची कल्पना चांगली आहे! :)
3 Aug 2008 - 8:25 am | घाटावरचे भट
खरंच उत्तम कल्पना आहे. आजकाल ज्या पद्धतीने झाडे कापली जात आहेत, ते पाहाता असे उपक्रम नक्कीच स्तुत्य आहेत....
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरन्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
4 Aug 2008 - 6:26 am | सर्किट (not verified)
पैसे द्या.
वाटल्यास स्वतः रोपटी लावा, आणि ती त्या कलाकारांच्या नावाने लावली असे जाहीर करा.
कलाकारांना रोपटी देऊ नका. ती वाळून जातील. कधीही जमिनीत लावली जाणार नाहीत.
स्वानुभवावरून सांगतो.
खरंच !
- सर्किट
4 Aug 2008 - 9:27 am | श्रीकृष्ण सामंत
काय हो नावाचो अपभ्रंश !
अहो तेंचा नाव "दुबळे "नाय "डुबळे "आसा. काय समजल्यात?समिर डुबळो आमच्या वेंगुर्ल्याचो .डुबळ्याक दुबळो करून शिरा मारल्यात झाला.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
4 Aug 2008 - 9:44 am | सहज
म्हणजे ज्यांनी दुबळे यांची ओळख दाखवली आहे [सामंत, मुक्तसुनीत, भडकमकर] व जमल्यास संहीता जरा हालचाल करुन विचारा तर खरे की त्या रोपाचे त्यांनी नक्की काय केले? कलाकार संवेदनाशील असतात असे म्हणतात म्हणुन वाटते की त्या रोपाची त्यांनी काही तरी सोय केली असेल पण [सर्कीट यांचा अनुभव पाहता] जर का नसेल केली तर बघा ते रोप मिळवून वाचवता आले तर काही तरी केल्यासारखे होईल अन्यथा आहेच चर्चा चालू!!
4 Aug 2008 - 10:55 am | धमाल मुलगा
जे काही द्यायचं असेल ते सत्पात्री असावं!
एखाद्या वारकर्याला किंवा अशाच कोणाला अशी रोपं दिली तर पोटच्या पोरासारखं वाढवतीलही कदाचित.
पण,
जे प्रमुख पाहुणे, सेलिब्रिटिज इ.इ. येतात, त्यांना हे देणं, म्हणजे कितपत कामाचं ठरेल ही एक शंकाच आहे.
उपक्रम स्तुत्य आहे, वादच नाही, पण, मास्तरांच्या मुद्द्याशीही सहमत आहे. एखादा जर पुण्या-मुंबईहून लातूर-उस्मानाबादला आला, तर त्याला रोपटं/कुंडी दिली तर एकुणच त्रासिकच पडेल ना ते?
शक्यतो, ही रोपं लहान मुलांना द्यावीत अशा मताचा आहे मी.
मुलांना झाडांविषयी 'जनरली' प्रेम असतंच, त्यातून रोप लावायचं म्हणजे मातीत खेळायला मिळतं, आणि ते सांभाळायचं म्हणजे पाण्यात. त्यामुळे ही मुलं आवडीनं हे काम करतात असा अनुभव आहे.
4 Aug 2008 - 10:58 am | बेसनलाडू
कल्पना आणि तिचे राबते होणे/केले जाणे दोन्ही स्तुत्य!
(वृक्षप्रेमी)बेसनलाडू
4 Aug 2008 - 9:00 pm | प्रकाश घाटपांडे
वैयक्तिक अनुभवाचे उदाहरण देण्याचा मोह आवरत नाही म्हणून सांगतो. माझ्या "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .... प्रश्नोत्तरातून सुसंवाद " या पुस्तकाचे परिक्षण लोकसत्ता मध्ये नारळीकरांनी लिहिले. त्याचा परिणाम म्हणून ती आवृत्ती लगोलग खपली. त्यावर प्रकाशन व्यवसायातल्या एकाने मला विचारले काय हो तुम्ही नारळीकर कसे काय "मॅनेज" केले. ते तर सहसा कुणाच्या पुस्तकाला प्रस्तावना किंवा परिक्षण लिहित नाहीत, आणि ज्योतिषाच्याबाबत तर अजिबात नाही. त्यावेळी मी अवाक झालो. त्यावेळी मी त्यांना म्हटले "अहो नारळीकर हे काय 'मॅनेज' करण्यासारखे व्यक्तिमत्व आहे का?" ते म्हणाले ,"म्हणूनच तर विचारतोय". मग मी त्यांना काय घडलं ते सांगितले.
ज्योतिषाकडे जाण्यापुर्वीची प्रथम एक छोटे पुस्तक काढले.त्याच्या प्रकाशनाला मी डॉ नरेन्द्र दाभोलकर व ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांना बोलावले. दोघांचा वादप्रतिवाद व्यासपीठावर घडवून आणला. ते पुस्तक अंनिस व तत्सम वर्तुळातच खपले.[म्हणजे जो ज्योतिषाकडे जाणारा सर्व सामान्य वर्ग मला जो अभिप्रेत होता त्याच्या पर्यंत ते पोचलेच नाही] त्याची प्रत मी नारळी करांनाही आयुकात जाउन दिली. (म्हणजे त्यांच्या पीए ला) पुढे काहीच संपर्क नाही. मी मेल पाठवली. त्याचेही उत्तर नाही. नंतर एकदा सहज अरविंद परांजपे यांना भेटायला आयुकात गेलो. त्यावेळी मला कळले कि नारळीकर माझी चौकशी करत होते. मी त्यांच्या पीए कडे गेलो व केलेल्या मेल बद्द्ल सांगितले. ते म्हणाल मी उत्तर पाठवले होते. मला तर मेल मिळाले नव्हते. त्यांनी मला प्रिंट आउट दाखवला व बाउन्स ही झाले नसल्याचे सांगितले.{ अद्यापही मला ते कोडेच आहे} मग माझी व नारळीकरांची भेट झाली.{ मी त्यांना विषयामुळे ज्येष्ठ वृद्ध व्यक्ति वाटली होती} अपॉईंटमेंट च्या वेळी माझ्या डोक्यात असलेली कल्पना अशी होती कि मी आत गेल्या वर ते चेंबर मधिल खुर्चीत मग्न बसले असतील. मानेनेच खुण करुन बसा म्हणण्याचे सौजन्य दाखवतील. पण घडले ते वेगळेच. मी आत गेल्यावर ते स्वत:च सुहास्य वदनाने उठून व्हिजीटर सोफ्यात कॉर्नरला येउन बसले व दिलखुलास गप्पा केल्या. पोलिस बिनतारी खात्यात मी एक सामान्य सहा. पो.उपनिरिक्षक या खालच्या दर्जाचा सामान्य तंत्रज्ञ. या पार्श्वभूमीवर मला तो धक्काच होता.त्यानंतर मी सुधारित दुसरी आवृत्ती २००३ घेउन गेलो.त्यावेळी तुम्ही चार शब्द लिहिले तर ते लोकांपर्यंत पोहोचेल.{ पुर्वीच्या सदिच्छेची आठवण करुन} आम्हाला कोण विचारतो? त्यावेळी त्यांनी धुंडिराज लिमये यांच्या वास्तुशास्त्रावरील पुस्तकाला सदिच्छापर चार प्रस्तावनेसदृष चार शब्द लिहिले होते. त्याचा परिणाम म्हणुन मटा मध्ये त्यांच्यावर अंधश्रद्धेचे समर्थन म्हणून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. हा किस्सा सांगितला. मी ही ती बातमी वाचली होती. प्रत्यक्षात काय झाले होते कि त्यांच्या एका स्नेह्याने त्यांना या पुस्तकावर चार शब्द लिहिण्याची गळ घातली होती. कारण लेखक त्याचा कोणीतरी नातेवाईक होता. नारळीकरांनी ते पुस्तक वरवर बघून फारसे न वाचता प्रोत्साहनपर चार शब्द लिहिले होते. मटात आल्यावर त्यांनी ते नीट वाचले व दिलगिरीचा खुलासा मटाला पाठवला होता. तेव्हापासुन त्यांनी ठरवले कि कुठल्याही पुस्तकावर काही लिहायचे नाही.{ मला वाटले आपला पत्ता कट झाला.} पण जेव्हा ते लोकसत्तेत छापुन आले तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला.{ मनात गुदगुल्याही झाल्या. खोटं कशाला बोला?}
इथे परिक्षण वाचा.
प्रकाश घाटपांडे
5 Aug 2008 - 2:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मला या प्रतिक्रियेचा मूळ लेखाशी असलेला संबंध नाही समजला.
(संभ्रमित) यमी
5 Aug 2008 - 2:37 pm | प्रकाश घाटपांडे
या वरुन आयुकाची आठवण आली व प्रसंग सांगण्याचा मोह आवरला नाही हे वर उद्धृत आहेच. मूळ लेखाच्या आशयाशी त्याचा कुठलाही थेट संबंध नाही.त्यामुळे संभ्रमित होण्याची काहीही गरज नाही.
( टिमकी वाजवण्याची संधी घेतलेला )
प्रकाश घाटपांडे
5 Aug 2008 - 3:40 pm | वेदश्री
एषगोय,
काथ्याकूट छानच काढला आहे. नविन घर/फ्लॅट घेणार्या माझ्या दोस्तांना मी रोपेच देते भेट म्हणून.. अर्थात इतरही भेटवस्तूंसोबत. परवाच गावाकडच्या एकाला ब्रह्मकमळाचे रोप दिले.
मला स्वतःला बागेची आणि बागकामाचीही अत्यंत हौस आहे. परवाच येताना रोपून आलेल्या अरवीच्या कंदाला कोवळे धुमार आल्याचे आईकडून आजच सकाळी कळाले आणि माझा आजचा दिवस सुंदर जाणार याची खात्रीच पटली.