ब्याटबॉल स्टंपा आणि घामटा..

गवि's picture
गवि in विशेष
10 Feb 2011 - 12:11 pm

आता क्रिकेटशी अजिबात संबंध नाही. पण लहानपणी घनिष्ठ होता.

..त्यामुळे या मिपा जल्लोशात भर म्हणून आमचाही एक सरपटी चेंडू..

जो आपण जिंकला तो (नवसाचा) आणि त्यानंतरचा एक अशा दोन वर्ल्डकपच्या वेळी शाळकरी हापचड्डी पोरं होतो आम्ही.. तिकडे वर्ल्ड कपच्या मॅचेस सुरु झाल्या की आम्ही पोरं अंगणात त्याहून जास्त उत्साहाने फसफसत घामटा गळेपर्यंत क्रिकेट खेळत रहायचो.

टी.व्ही.चा व्हॉल्यूम फुल्ल. आणि मग त्यातून "हॉ" असा आनंदी चीत्कार आला की आम्ही गोटीब्याट टाकून तेवढा काय फोर किंवा सिक्स असेल तो शॉट रीप्ले मधे बघायला आत पळायचो.

मग परत आमचा खेळ सुरु. अगदी बॉल अंधारात दिसेनासा झाला तरी.

रात्रीच्या गिळायची वेळ झाली की घरचे शोधायला यायचे.

कोकणातल्या मातीने तांबडेलाल झालेले आम्ही रात्री आंघोळ करायचो तेव्हा लाल "खून की नदियां" टाईप ओघळ वहायचे मोरीतून.

या अंगणी क्रिकेटचे नियम तर अफलतूनच. त्याची नियमावली म्हणून एक पुस्तक बनवायला लागेल. म्हणजे, लोकल फिल्डच्या भूगोलावर ते नियम अवलंबून असायचे. चौधरीच्या कंपाउंडमधे खेळत असलो तर- कंपाउंडबाहेर गेला की आउट. एक टप्पी आउट. तिथे पलीकडे विहीर होती.. त्यात शॉट गेला की आउट तर आहेच, प्लस मारणार्‍याने बादली सोडून तो पडलेला बॉल नेम धरून बाहेर काढावा किंवा "भरून द्यावा"..अर्थात नवा आणून द्यावा.

ती शेजारच्या निर्जन आवारातली खास कोकणातली भुताळी विहीर होती..बळीबिळी घेणारी..खोल.. काळीशार..
त्यामुळे बहुधा त्यात "बाल्दी" सोडण्याऐवजी तो ब्याट्स्मन पोरगा बी.आर.आय किंवा एम.आर.आय चा नवीन लाल बॉल वाण्याकडून घेऊन यायचा.

आता खूप वर्षं झाली आहेत, पण मला आठवतील त्या गल्ली क्रिकेटच्या व्हर्शन्स आणि नियम मी सांगतो :

क्रिकेटसाठी लागणार्‍या बेसिक जिनसा :

-बॅट -

जालंधरमधे बनवलेली गुळगुळीत एरंडेलासारखा वास येणारी खरीखुरी भारी ब्याट परवडू शकणारा पोरगा माझ्या गल्लीत तरी नव्हता. त्यामुळे कोणतंही फळकूट घेऊन मेकशिफ्ट अरेंजमेंट केली जायची. शिवाय शुभ्र रंगाच्या साध्या स्वस्त बॅट विकणारे काही सज्जन फेरीवाले क्रिकेट सीझनमधे गावाबाहेर उघडं दुकान लावायचे. तिथे जाऊन साग्रसंगीत खरेदी व्हायची.

खेरीज कोकणाची देणगी म्हणून नारळाच्या झावळीच्या मधल्या लाकडाचा कोयत्याने कापलेला तुकडा हाही बॅट म्हणून वापरण्यासारखा एक आयडियल प्रकार होता. झावळीच्या मधल्या कण्याला असलेल्या निमुळत्या शेपमुळे आपोआप हातात धरायला बारीक हँडल आणि खाली फताडा किंचित वक्र फळीसारखा भाग मिळायचा. वेगळ्या तासकामाची गरज नाही.

शाळेत वापरली जाणारी पुठ्ठ्याची कडक पॅड्ससुद्धा बॅट म्हणून वापरली आहेत. बीलिव्ह इट ऑर नॉट. मात्र या प्रकारच्या बॅटचा उपयोग वर्गात किंवा खोलीत इनडोअर क्रिकेट खेळताना जास्त व्हायचा आणि त्यासाठी सरपटी बॉल चालायचा नाही. सर्व खेळ वरच्यावर हवेत चालायचा.

-बॉल -

सीझनचा बॉल गावात मिळायचाच नाही. मिळाला तर परवडायचा नाही. आणि चुकून कोणी दाखवायला आणला तरी आमच्या कोकणातल्या खडबडीत कातळी जमिनीवर तो असा काही वेडावाकडा उडायचा की आम्हाला तो जमायचाच नाही.

मग दुसरा ऑप्शन म्हणजे एमआरआयचा टेनिस बॉल. हा मऊ कव्हरवाला. हाही खूप महाग.

आमच्या उपरिनिर्दिष्ट धेडगुजरी ब्याटांमुळे आमचे बॉल दर दोन दिवसांनी फुटून दोन शकलांत परिवर्तित व्हायचे. (बाय द वे.. यातले एक शकल ..भकल म्हणावे हे जास्त उत्तम.. हे उलटं ताणून त्यात माती भरायची आणि कोणाच्यातरी पायात ठेवून पळायचं. दहाबारा सेकंदात ते फट्ट करुन सरळ व्हायचं आणि माती "टार्गेट"वर उधळली जायची. कुत्रे हे आवडतं टार्गेट असायचं कारण ते सूं सूं करुन त्या शकलाचा वास घ्यायला जायचे आणि तेवढ्यात फट्ट करुन सचैल मृत्तिकामुखप्रक्षालन करुन घ्यायचे..)

विषयांतर झालं.

तर बॉलचा पुढचा ऑप्शन म्हणजे भरीव कॉर्क किंवा बुचाचा चेंडू. शिवाय घरात खोलीच्या आत खेळायला कापडी चिंध्यांचा बॉल. अगदी ऑड म्हणजे गुलमोहोराच्या शेंगा कुटून त्याचा चिकट पल्प लाडूसारखा वळून वाळवला की बॉल व्हायचा. ("प्रोसेस"मधली चू.भू. दे.घे.)

स्टँडर्ड ऑप्शन म्हणजे बीआरआय कंपनीचा लाल नक्षीवाला रबरी बॉल. स्वस्त टिकाऊ. हरवला तरी दिलावर ओरखडा नाही.

-स्टंप-

हे कधी तीन उभ्या काठ्यांच्या स्वरुपात वापरल्याचं आठवत नाही. कोकणातला एक उभा चिरा (जांभा दगड) किंवा भिंतीवरच्या दोन-तीन रेषा, दोन चपला, स्कूटरचं चाक किंवा एकूणच सर्वानुमते मान्य असा एक चौकोनी आकारविशेष हा स्टंप म्हणून ग्राह्य धरला जायचा. या सर्व प्रकारात स्टंपला "उंची" ही डायमेन्शन नसल्याने आउट होऊ घातलेला ब्याट्समन नेहमीच बॉल उंचावरून पास झाल्याचा जोरदार दावा करायचा..

त्यानंतर पंचनामा, प्रत्येक उपस्थित साक्षीदाराने त्या काल्पनिक स्टंपवर हाताने बॉलचा उड्डाणमार्ग दर्शवणे, उच्चारवात ताणाताणी अशा मार्गांनी "आउट" की "नॉटाउट" ते ठरायचं.

भिंतीवरचा एक इमॅजिनरी चौकोन हाच स्टंप असला की मग बॉलचा "छाप" कुठे उमटलाय त्यावर "बोल्ड"आहे की नाही ते ठरायचं. बॉल ओला असला तर भिंतीवर ताजा छाप सहज दिसायचा. पण एरवी मात्र तो छाप आत्ता पडला की आधीपासूनच होता यावर कचकावून खडाजंगी व्हायची.

......

आता या तीन बेसिक जिनसा जमल्या की यायचे ते अत्रंग नियम. त्यातल्या काहींची झलक :

१) करंट आउट - बॉलरच्या साईडला एक छोटा दगडच स्टंप म्हणून ठेवलेला असायचा. बॉलरने त्याला पाय लावला आणि बॉलला स्पर्श केला तरी त्याच्या शरीरातर्फे करंट पास होऊन तो बॉल जणू स्टंपला लागला आहे असं समजून आउट द्यायचं.

२) एक टप्पी / दोन टप्पी कॅच आउट.- थेट कॅच घेतला तर आउटच पण बॉलचा एक टप्पा पडून मग कॅच घेतला तरी आउट.

३) भिंतीवर टप्पा कॅच आउट.- भिंतीवर बॉल आपटला आणि हातात आला तर तो टप्पा न समजता थेट झेल समजणे.

४) लांजेकरांच्या कंपाउंडमधे बॉल गेला की आउट. कारण तिथे वासराएवढा मोठ्ठा कुत्रा होता.

५) दीड ब्याटएवढे "क्रीज"..याची एक रेष ब्याटीनेच मातीत आखली जायची आणि रनाउटच्या मोक्याच्या वेळी ती पुसली गेलेली असायची. की परत ब्याट जमीनीवर धपाधप आडवी घालून ती दीडब्याटीची लाईन काढली जायची आणि लगेच आपण त्या रेषेच्या आत होतो हे सिद्ध करण्याचा कलगीतुरा सुरु.

६) "बॉलरला स्टंप दिसतील अशा बेताने उभा रहा" असं बॅट्समनला सांगणे म्हणजेच "कव्हर मागणे"

७) बॅटिंग "घेतली" तर फिल्डिंग "दिलीच" पाहिजे. बॅटिंग घेऊन पळून जायचं नाही.

८) कॉमन प्लेअर अलाउड आहे. विषमसंख्येच्या मित्रचमूत समसमान टीम पाडताना एका प्लेअरला कॉमन अर्थात दोन्ही बाजूंनी खेळावे लागेल.

९) टॉस म्हणजे चपट्या दगडावर थुंकून तो हवेत उडवणे.

१०) "फास" बॉल अलाउड नाही.

११) बॉल सरपटी टाकला तर रडीचा डाव.

१२) ज्याची बॅट त्याला दोनदा आउट अलाउड.

१३) लेफ्टी खेळणार्‍याला भलती प्रतिष्ठा. मग राईटी असलेली पोरंही बळजबरी डावीकडे तोंड करुन लेफ्टी बनून उभी राहायची.

१४) कितीही रीतसर आउट झाला तरी बॅट्समनने शांतपणे बॅट सोडायची नाही. बचावाचा पूर्ण प्रयत्न करायचा. आपल्या टीममधला एखादा चमचा वकील म्हणून घ्यायचा. तरीही पाड न लागल्यास जाताजाता बॅट फेकून "घे..घे बॅटिंग हवी ना तुला..तुझी लाल.." असं म्हणून कुस्करी करायची.

एक फ्रेंच क्रिकेट म्हणून प्रकार असायचा. त्यात पायाला बॉल लागला की आउट. असा नेम धरुन मारण्याला कोचून मारणे किंवा कोची बॉल म्हणायचे.

कोकणात मासे रापतात.. त्या संदर्भाने असेल, पण कॅच सोडण्याला "रापणे" म्हणायचे आणि सारखा सारखा कॅच सोडला की त्या पोराला "राप्या " म्हणून पर्मनंट नाव पडायचं.

.................

आणिही खूप काही आहे. गल्ली क्रिकेट हा नुसता खेळ नाही. ते बालविश्व आहे.

अजूनही वाटतं की त्याच कंपूसोबत त्याच अंगणात एका फळीने बॉल पिदवून घामाघूम व्हावं. दुपारच्या भाजत्या उन्हात "ड्रिंक ब्रेक" घेऊन मित्राच्या आईने केलेलं कोकम सरबत ढसाढसा प्यावं.

तशीच नेटाने सेन्च्युरी काढावी. समोरचा बॉलर रडायच्या घाईला यावा. रात्र व्हावी .. बॅट, बॉल स्टंप दिसेनासे होईपर्यंत काळोख व्हावा.. आणि आईने शोधायला यावं..घरी येऊन ती गरम पाण्याची आंघोळ (खून भरी..!!) ..आणि बाहेर कुकरची शिटी वाजावी..

या झाल्या जुन्या मेमरीज. आता स्थूल प्रकृति आणि जीवनरगाडा यामुळे क्रिकेटशी इतका कमी संपर्क उरला आहे की ज्याचे नाव ते..

..पण आता मिपाच्या क्रिकेट फीवरमुळे ही खूप वर्षांची मरगळ झटकली गेलीय आणि माझ्यासारखे क्रिकेटपासून दूर गेलेले खूप फॅन्सही पुन्हा या जोशील्या माहोलात खेचले जाताहेत ही गोष्ट एकदम धमाल आहे. त्याबद्दल मिपाचे आभार..

..कोण जाणे नवीन ब्याटबॉलची खरेदीही होईल लवकरच..

प्रतिक्रिया

अवलिया's picture

10 Feb 2011 - 1:17 pm | अवलिया

लेखन आवडले.

मस्त लिहिले आहे, शेवट जास्त मनाला स्पर्ष करुन गेला.

करंट आउट आणि खुन भरी आंघोळ भार्रीच एकदम

sneharani's picture

10 Feb 2011 - 2:14 pm | sneharani

अगदी मस्त लिहलय!
:)

नरेशकुमार's picture

10 Feb 2011 - 1:26 pm | नरेशकुमार

शिवाय घरात खोलीच्या आत खेळायला कापडी चिंध्यांचा बॉल.

आनी चिंध्यांचा बॉल वर ताणून चढविलेल्या (सायकलच्या) रबरी टायरच्या कापलेल्या गोल रबरी पट्ट्या,

लहानपनी दोन रुपयांना एक आख्खी ट्युब मिळत असे. त्यातुन दहा-बारा बॉल होत असे.

रमताराम's picture

10 Feb 2011 - 2:06 pm | रमताराम

याशिवाय स्पंजचा बॉलही वापरला जाई. जास्त उडू नये म्हणून भिजवून खेळायचे. बेक्कार लागायचा राव. आणखी भिंतीवर स्टंप्स आखले असतील तर शिक्का उमटल्याने आउट की नॉट-आउट ते ठरवायला -सुरवातीला - उपयोगी पडे. पण एकदा का पाचपन्नास शिक्के उमटले की मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या, कोणता शिक्का आताचा नि कोणता आधीच्या एखाद्या बॉलचा यावरून रण माजे. कपड्यांवर शिक्के उमटले म्हणून घरी होणारी धुलाई वेगळीच.

परिकथेतील राजकुमार's picture

10 Feb 2011 - 1:37 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त हो गवि.
लहानपणीचे क्रिकेट डोळ्यासमोर उभे राहिले :) पुढे अगदी प्रत्यक्षात कॉलेजकडून, जिल्ह्याकडून खेळण्याचा योग आला पण लहानपणीच्या क्रिकेटची सर कशालाच नाही.

वाड्यात आधी प्लॅस्टिकचा बॉल आणि तो हरवला की मग सायकलच्या ट्यूब पासून बनवलेला चेंडू घेउन खेळायला सुरुवात असायची. शाळा सुटली की वाटेतल्या सगळ्या सायकल दुकानांना (आणि कड्यापेटीच्या छापांसाठी पानपट्ट्यांना) भेटी देत देत मगच घर गाठले जायचे.

त्या काळात एखाद्या संघाबरोबर भारताचे सामने चालु असतील तर दोन्ही संघातल्या असतील नसतील त्या सगळ्या खेळाडूंच्या नकला फलंदाजी गोलंदाजी मधे करुन व्हायच्या.

नरेशकुमार's picture

10 Feb 2011 - 1:47 pm | नरेशकुमार

प्लॅस्टिकचा बॉल फुटला कि त्यात वाळु भरुन त्यावर परत रबरी पट्ट्या.
आईग्गं ! बसला की वळंच उठायचा अंगावर.

आमि करायचो, लयी मज्जा यायची

गवि जुन्या आठवणींना उजाळा देणारा लेख.
हल्लीच इथे माझ्या क्रिकेट जिवनाच्या आठवणी लिहिल्या होत्या.
त्यात काही राहुन गेलेल्या आठवणी तुमच्या या लेखांनी जाग्या केल्या.
मे मेहिन्याच्या सुट्टीत गावाला गेल्यावर आम्ही नारळाच्या झावळीच्या थोप्या पासुन बॅट बनवायचो. पण त्या वजनाला भारी असायच्या. नंतर बाबांनी पांगार्‍याच्या लाकडापासुन बॅट बनवुन दिली होती. जी एकदम फुला सारखी हलकी होती. :)

कागदाचे कपट्यांना, प्लॅस्टीकच्या पिशव्यांची आवरणे चढवुन लिंबाच्या आकाराचा बॉल बनवुन त्यावर सायकलच्या ट्युबच्या पट्ट्या चढवुन चेंडु बनवायचो. मस्त उसळायचा तो.

चित्र : जालावरुन साभार :)

सहज's picture

10 Feb 2011 - 3:44 pm | सहज

>मग परत आमचा खेळ सुरु. अगदी बॉल अंधारात दिसेनासा झाला तरी.

अगदी अगदी.. लहानपणी नेहमी वाटायचे की आम्ही साडेसात पावणेआठच्या अंधारात खेळतो व हे साले हरामखोर दुपारी साडेचारला कसले बॅडलाईटचे अपील करतात.. :-)

फार अंधार झाला की जिथे दिवा असेल तेथल्या भिंतीवर स्टंप आखुन (तसेच रबरी बॉल/ टेनीस बॉल नसेल तर) प्लॅस्टीक किंवा सिझनबॉलनी हाफपिच वन टप आउट खेळ सुरु.

>> लहानपणी नेहमी वाटायचे की आम्ही साडेसात पावणेआठच्या अंधारात खेळतो व हे साले हरामखोर दुपारी साडेचारला कसले बॅडलाईटचे अपील करतात.. <<

एकदम एकदम....... हमभी ऐसाच बोलते थे.....

बाकी 'गवि', आमच्याही आठवणी जाग्या केल्यात की हो.....

लगे रहो.....

निखिल देशपांडे's picture

10 Feb 2011 - 6:21 pm | निखिल देशपांडे

मस्त हो गवी...
फ्रेंच क्रिकेट तर विस्मरणातच गेले होते... आज खुप जुन्या आठवणी जाग्या झाल्या...
आमच्या कडे आम्ही डबल इनिंग लिमिटेड ओव्हर्स खेळायचो त्यात मॅच टाय झाली तर ज्याने पहिल्या इनिंग मधे लीड घेतली होती ती टिम जिंकली असा काहिसा नियम होता...
स्टंप म्हणुन सायकलचे चाक सगळ्यात जास्त वापरले गेले. त्यात एखाद्याचा सायकलचा स्पोक तुटला तर त्यावरुन होणारी मारामारी वेगळीच.

आम्ही गच्चीवर सुद्धा क्रिकेट खेळायचो त्यात सगळ्यात मोठा नियम म्हणजे एखाद्याने मारलेला बॉल खाली गेला की तो आउट आणि त्यानेच चार मजले खाली उचलुन बॉल आणायचा..

आवशीचो घोव्'s picture

8 Mar 2011 - 11:12 pm | आवशीचो घोव्

अह प्रह तिही मह लेख

भन्नाट आहे. प्रचंड आवडला. सगळ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.

प्रीत-मोहर's picture

8 Mar 2011 - 11:19 pm | प्रीत-मोहर

गवि लेख मस्तच!!!!

पैसा's picture

8 Mar 2011 - 11:25 pm | पैसा

आम्ही पण कधीकाळी क्रिकेट खेळायचो त्याची आठवण झाली!

साला हा गवि. एकदम्नॉस्टेल्जीक करतो.
आमच्या शाळेच्या ग्राउंडवर एकाच वेळेस आठ दहा टीम खेळत असायच्या. पन प्रत्येकाला आपल्या टीमचा बॉल ओळखू यायचा. फिल्डर्स नेहमीच एकमेकांच्या एरीयात अतीक्रमण करायचे. या टीमच्या लाँगलेगचा फिल्डर दुसर्‍या टीकच्या सिली पॉईंट फिल्डर च्या जागेवर उभा असायचा

विनायक बेलापुरे's picture

9 Mar 2011 - 12:13 am | विनायक बेलापुरे

गवि मस्तच लिहिलाय लेख.
जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

शिल्पा ब's picture

9 Mar 2011 - 1:23 am | शिल्पा ब

मस्त लिहिलंय...
आम्ही गॅलरीत क्रीकेट खेळायचो...आणि व्हरांड्यात मध्यभागी जाळीचा दरवाजा होता सुरक्षिततेसाठी म्हणून....मग आम्हाला त्या दाराबाहेर जाऊ दिले जायचे नाही म्हणून अर्ध्या व्हरांड्यात म्याची खेळायचो..
सगळे मिळुन प्लेअर फक्त ३...अन १ लिंबुटींबु....कधी गल्लीतली मुलं यायची तेव्हा संख्या ५ च्या वर जायची.

आमच्या वाड्यातलं क्रिकेट आठवलं. चौकात आणि दगडी व्हरांड्यात खेळ व्हायचा. भिंतीवर खडूने काढलेले स्टंप, एक जुनी बॅटसदृश दिसणारी हँडलवाली फळी, रबरी बॉल, तीन उघड्या गटारी असलेलं वेगवेगळ्या प्रतलातलं 'मैदान', मोक्याच्या जागी असलेले खांब, त्यातून उरलेल्या जागेत उभे केलेले फील्डर्स असल्या सगळ्या घोळातून तीन तीन चार चार तास खेळ व्हायचा. हवेतून काहीतरी येताना दिसले तरी पुरे इतपत उजेड असेपर्यंत आम्ही उजेड पाडत असू! ;)
ज्याच्यामुळे गटारीत बॉल जाईल त्याने तो काढून स्वच्छ धुवून आणायचा हा नियम. त्यानंतर त्या ओल्या बॉलचे आंगावर आणि कपड्यावर बसलेले शिक्के हा खास प्रकार असे.
आता वाटतं किती कमी किमतीच्या गोष्टीत खेळ व्हायचे. सगळेच साधारण परिस्थितीतले आणि कोणाच्याच घरी इतक्काल्ले पैसे वगैरे खर्चून मुलांसाठी खेळणी आणणे हा प्रकार नसायचा. कितीही भांडणं, लागालागी, ठेचकाळणे झाले तरी दुसर्‍या दिवशी खेळ सुरुच. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे तर पर्वणीच असायची. आई-बाबा हाका मारमारून दमायचे तरी आमचं आपलं "हां हां आलोच पाचच मिन्टं!" शेवटी कसेबसे हातपाय धुवून शुभंकरोती म्हणून पानावर बसणे.
आश्चर्य ह्याचंही वाटतं की कसल्याही घाणीत खेळून कधीही काही इन्फेक्शनं वगैरे झालेली आठवत नाहीत.
गेले ते दिन गेले!

-रंगा

अमोल केळकर's picture

9 Mar 2011 - 9:32 am | अमोल केळकर

खुप मस्त लेहिले आहे :)

अमोल केळकर

चित्रा's picture

9 Mar 2011 - 10:04 am | चित्रा

लेख आवडला. क्रिकेटमध्ये मला फार गती नव्हती पण आम्हीही विटी-दांडू, डबा-ऐसपैस, लगोरी असेच रात्रीपर्यंत खेळत असू. अर्थात आमच्या इथे तेव्हा खेळायला चांगली भरपूर जागा असे.

गल्ली क्रिकेट हा नुसता खेळ नाही. ते बालविश्व आहे.

एकदम परफेक्ट बोललात.

सुरेख लेख.

फ्रेंच क्रिकेटवरुन आठौलं. लेग क्रिकेट खेळायचो आम्ही. बॅट नसेल तर.
बाकी मग, बापानं महाजनच्या (शेजारी) खिडक्यांच्या काचं / तावदानं / बादल्या, आमची गुडघे / डोकं / कपाळं ई. ई. साठी लय खर्च सहन केला.
पण आता त्यांची नातवंडं हे सगळं पाहु / उपभोगु शकतील काय हा प्रश्न उद्भवतो?

विजुभाऊ's picture

9 Mar 2011 - 11:06 am | विजुभाऊ

अरे ते : "कुजी बात नस्से" ची अट आठवतेय का कोणाला

टारझन's picture

9 Mar 2011 - 11:11 am | टारझन

हा हा हा मस्तंच ... मला लहाणपणापासुन क्रिकेट मधे खुप गती होती . परंतु काळाच्या ओघात आता प्रेक्षकमात्र उरलो :)
मस्त लेखन :)
आम्ही आप्पारप्पी नावाचा एक राक्षसी खेळ पण खेळायचो. खौन बॉल मारायला लै मजा यायची. बॉल लागल्या पेक्षा पब्लिक चिडवायचं त्यात जास्त मजा येत असे ;)

मी-सौरभ's picture

2 Apr 2012 - 7:52 pm | मी-सौरभ

परत शाळांच्या उन्हाळी सुट्टया सुरु होतायत.
त्यासाठी गविंचा हा पेशल लेख वर काढत आहे. :)

प्रास's picture

2 Apr 2012 - 8:05 pm | प्रास

पुन्हा एकदा वाचला. तशीच मजा आली.

परत असा खेळ मांडायची इच्छा झाली.

मूळ लिखाणाबद्दल गविंचे आणि या लेखाच्या 'अपलिफ्टिंग'साठी ;-) सौरभरावांचे आभार....

मन१'s picture

3 Apr 2012 - 11:21 am | मन१

पुन्हा एकदा लहान होउन आलो.
च्यायला हे आधी कसं सुटलं आमच्या नजरेतून?
सौरभ नि प्रासचे लै वेळा आभार.

बॅटमॅन's picture

3 Apr 2012 - 1:01 pm | बॅटमॅन

आणि कोणी चिक्कीबॉल करून खेळलाय का? आमच्या गल्लीतल्या शाळेच्या ग्रौंडवरती ती २ गुलमोहोराची अजस्र झाडे होती. त्यांच्या शेंगा पडायच्या ढीगभर, त्या येकत्र करून, ठेचून लाडवाप्रमाणे त्यांचा बॉल बनवायचा. तो इतका टणक व्हायचा की आईशप्पथ कॉर्क बॉल वाटायचा..त्याचा टप्पा जाम पडायचा नाही आणि त्यामुळे निव्वळ हाफपिचवरच खेळायचो त्याने..चुकूनमाकून लागलाबिगला कुणाला तर गच्छंतीच!

अन्या दातार's picture

3 Apr 2012 - 1:28 pm | अन्या दातार

त्या शेंगांची चिक्की केल्यानंतर हाताला जो वास सुटायचा, तो दहावेळा साबणाने धुवुनही जायचा नाही!
आमच्याइथे एकत्रित उपक्रम चालायचा त्याचा बॉल बनवण्याचा. २०-३० बॉल तरी सहज बनायचे, मग दोन महिने मरण नाही. प्रचंड स्टॉक!

अगदी अगदी! लै लै बॉल बनवायचो एका वेळेस!

अक्षरशः आत्ताही आठवतोय तो गोडसर वास..

स्वाती दिनेश's picture

3 Apr 2012 - 1:03 pm | स्वाती दिनेश

उत्खनन करणार्‍यांना धन्यवाद, हे नजरेतून सुटलं होतं..
गल्ली क्रिकेट हा नुसता खेळ नाही. ते बालविश्व आहे.
अगदी...
खूप मस्त लिहिलं आहेत,
स्वाती

असल्या क्रिकेटचे आम्ही लहानपणा पासून भोक्ते. काय आठवण:( करुन दिलीत गविसाहेब. धन्यवाद.
सुरुवाती सुरुवातीला आम्ची मजल २/४ रु. मिळणार्या ह्या बॉलपर्यंत होती .


आणी हो हा बॉल लवकर फुटु नये म्हणुन आणला कि सुइने एकदा टोचुन घेत असू.
म्याच संपली कि जिंकला तो बॉल ही घेवुन जात असे.वर ५.५० रु. किंवा ११ रु. तिथल्या तिथे वाटणी पाडुन पेप्सीकोला खावुन घरी.

गडी वाढले मग कॉन्ट्री वाढली मग हा घ्यायला लागलो.

वपाडाव's picture

3 Apr 2012 - 2:17 pm | वपाडाव

आमच्या काळी विकी टेनिस बॉल येत असत. २५/- चा एक चेंडु. अन हा चेंडु वर्गात आणुन मिरवणे म्हणजे शान समजली जायची. त्यांची काही उत्पादने या लिंकवर बघायला मिळतील.

प्यारे१'s picture

3 Apr 2012 - 2:27 pm | प्यारे१

लग्न न झालेला २५-२६ चा हा तरुण... आमच्या काळी वैग्रे शब्द वापरताना पाहून ड्वाळे पाणावले... !

इरसाल's picture

3 Apr 2012 - 2:55 pm | इरसाल

मला वाट्टं अस्साच एक सफेद रंगाचा मिळायचा २१ रु. ४/५ दिवसात गोटा होवुन जायचा नाव आठवत नाहीये आता.पण कर्जत कडे ज्या टुर्नामेंट होतात त्यात तो वापरतात.

नेहमीसारखंच,वाचायचं राहुन कसं गेलं कळालं नाही, असो.

सोलापुरात चिंधी बॉलवर आख्ख्या ट्रर्नामेंट होतात, गेल्यावर्षी रोख रु. ५१०००/- अंतिम बक्षिस असलेली स्पर्धा झाली.
मॅन ऑफ द सिरिज २१०००/- आणि मॅन ऑफ द मॅच - अंतिम सामना - १०००१/- अशी बक्षिसं होती. इथं चिंधी बॉल कागदाच बोळा आणि त्यावर हातमाग /यंत्रमागातुन वेस्टेज राहिलेले कॉटन यानं बनवतात. पुर्वी हा घरगुती उद्योग होता, हल्ली एक कारखाना उघडला आहे याचा

जगात नसेल असं, सिमेंट काँक्रिटचं पिच आहे तिथं बनवलेलं, चिंधी बॉल मातीच्या पिचवर ट्प्पा घेत नाही म्हणुन खास केलेलं.

मी-सौरभ's picture

3 Apr 2012 - 3:55 pm | मी-सौरभ

डांबरी रस्त्यावर कडक प्लॅस्टिकच्या 'किटकॅट' च्या बॉल ने खेळायचो.
त्याचा उल्लेख दिसला नाही.

तुमच्या पैकी कुणि खेळायचात का कडक प्लॅस्टिकच्या 'किटकॅट' च्या बॉल ने?

वपाडाव's picture

4 Apr 2012 - 5:39 pm | वपाडाव

किटकॅटच्या बॉलनं क्रिकेटच काय अगदी धप्पंकुट्टी वेग्रे खेळायचो आम्ही...
पेकाटात लाग्ला की चामडं निघायचं अन हाडावर लागला तर झिणझिण्या यायच्या...

मी-सौरभ's picture

4 Apr 2012 - 5:45 pm | मी-सौरभ

हम्म्म

पर्भणि रिटन वप्याच्या 'धप्पंकुट्टी वेग्रे' वाचताना मराठी भाषेचे काय होणार हा प्रश्न पडला आहे.

राजो's picture

18 Mar 2014 - 11:50 am | राजो

अंधारात बॉल दिसेनासा होईपर्यंत खेळल्यानंतर रस्त्यावर मर्क्युरी लाईटखाली प्लॅस्टीक बॉल क्रिकेट व्हायचे, अगदी फ्री-स्टाईल, नो स्पीड लिमिट :) आणि मर्क्युरी लाईट मुळे दर २०-३० मिनिटांनी मिळणारी ती सक्तीची विश्रांती.

ह्म्म्म गेले ते दिवस..

विजुभाऊ's picture

24 Sep 2014 - 5:49 pm | विजुभाऊ

गवि परत एकदा वाचून तेवढाच आनंदलो.
रच्याकने : कोणी हाप्प पीच प्लास्टीक बॉलच्या मॅचेस खेळलय का?
आमच्या सातार्‍यात लैच पाप्युलर होता. त्याच्या टुर्नामेंट्स सुद्ध व्हायच्या

जुन्या आठवणी जागवलयत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Apr 2020 - 12:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन आवडलं इतकं तंतोतंत आमच्या आठवणी लिहिल्या आहेत की मला लिहिण्यासारखं काही नाही. स्टंप म्हणून सायकलंचं टायरला दीर्घ आयुरारोग्य लाभलेलं आमच्याकडे. बॅट सर्वात उत्तम म्हणजे सुताराकडून खास बनवून घेतलेली. रबरी बॉलवर खुप क्रिकेट खेळलोय. चिंध्यांच्या बॉल, आई बर्‍याचदा शिवून द्यायची. धप्पा-कुटी आणि क्रिकेटलाही तो उपयोगी पडायचा. कव्हर देणे हा प्रकार फक्त त्याच क्रिकेटमधे होता. बर्‍याचदा बॉलर स्टँप पर्यंत धावत यायचा आणि थांबायचा. आय माय वरुन शिव्या दिल्यावर बर्‍याचदा कव्हर दिल्या जायचं. त्यावरुन वादावादी पण व्हायच्या. पैशावर या गल्ली विरुद्ध ती गल्ली असा मॅच असायचे. मजा होती. अधून मधून फेकी बॉलींगचं कसब असल्यामुळे मला चांगला स्कोप होता. लेदर बॉलवरही क्रिकेट खेळलो. पण ती मजा कुछ और होती.

खुप चांगल्या आठवणी. खुप चांगलं लेखन. गविशेठ, पूर्वी तुम्ही चांगलं लेखन करायचे. पुन्हा लिहिते व्हा. वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेतच.

-दिलीप बिरुटे

बबन ताम्बे's picture

23 Apr 2020 - 8:18 am | बबन ताम्बे

हुबेहूब लहानपणीचं क्रिकेट विश्व उभं केलंय.
आमच्यात त्यातल्या त्यात बऱ्यापैकी आर्थिक स्थिती असलेल्या मित्राने खाऊचे पैसे जमवले. आम्ही सगळे दुकानात उत्साहाने नवी ब्याट घ्यायला गेलो. दुकानदाराशी भरपूर घासाघीस केली पण तो 8 रुपयाच्या खाली उतरेना. मित्राकडे 7 रुपये होते. एक रुपयासाठी आमचा व्यवहार मोडला. मग आम्ही एक जुनं फळकूट घेऊन गावातल्या सुताराकडे गेलो. त्याने एक रुपयांत सुबक ब्याट बनवून दिली. ही 1975 सालची गोष्ट.
स्टंप म्हणून तुम्ही लिहिल्या प्रमाणे चौकोनी उभा दगड, तीन काड्या, खडूचे मार्किंग, एमएसबीइच्या ऑफिस समोरची आडवी पडलेली लोखंडी बॉक्सेस- काहीही चालायचे.

चौकस२१२'s picture

23 Apr 2020 - 10:18 am | चौकस२१२

खेळाचे नियम कुठे खेळतोय त्यावर ठरायचे ( तसे खेळांचे सहाव्या ३-४ सिझन असल्याचे , गोट्या ( काँक्रीट च्या मोठ्या स्ट्रायकर ने खेळल्या कच्च्या गोट्यांवर बंदी ) विटी दांडू आणि क्रिकेट
वाडा एक : बोळ असल्यासारखी जागा त्यामुळे फक्त स्ट्रेट ड्राईव्ह आणि ठराविक रेषेच्यापुढे चेंडू मारला तर धावा ,, त्यात परत सामोरे एक खिडकी अशी कि "कथा" चित्रपटातील त्या बाई नाहीका आलेला चेंडू विळीवर चिरून परत पाठवतात तसे एक बिरहाड .. म्हणजे चेंडू तिकडे गेला तर गडी बाद व्हायचाच पण वरती तुझ्या मुले आता काही दिवस खेळ बंद म्हणून शिव्या
वाडा २ : बऱयापैकी आयताकृती जागा होती पण जागा अशी कि एका बाजूला पत्र्याचं भिंती आणि दरवाजे असलेली गोदाम त्यामुळं त्यावर चेंडू आपटला कि प्रचंड आवाज त्यातून ती गोदामं जवळच्या मारवाडी दुकानदारांची त्यामुळे त्याचाशी पंगा कोण घेणार
त्याचं विरुद्ध दिशेला संडासाची रांग म्हणजे त्या बाजूला स्टम्प नाही .. मग काय नियम तर प्रतेय्कणी "लेफ्टी खेळाचे ,, पळून धावा फक्त अर्ध्या पीच पर्यंत बाकी मग लैनीचं पुढे गेलं तर रन . त्यात पैसेवाले कोणीच नसल्यामुळे एक अर्धी तुटलेली ब्याट .. तयामुळे सगळे असे छोटा लिंबू वाकून डावरे खेळायचे गमंतशीर दिसायचे
मे च्या सुट्टीत निमशहरी भागात मात्र जरा जागा भरपूर असायची .. आणि तेव्हा शेंगेच्या चिकाचा वाळवून बुचाचं चेंडू केलेला आठवतोय... कोणत्या शेंगा आठवत नाही आता ...
अजून एक खेळ म्हणजे बॅडमिंटन पण त्यासाठी जुन्या टेबल टेनिस च्या ब्याट , जुनी फुलं आणि मध्ये बांधलेली दोरी नेट म्हणून
मज्जा यायची