धनंजयाचे केळ्याचे सांदण वाचून आणि (कट्ट्यातला फोटो)पाहून मला सांदणाच्या बहिणीची आठवण झाली.मी आमच्या त्सेंटा आजीला गुर्कन कुकन अर्थात काकडीचा केक ह्या नावाने तवसाळं खिलवले आहे.(तवस- काकडी)
साहित्य- जाड रवा १/४ किलो, एका नारळाच्या वाटीतले खोबरे, १/४ किलो गूळ, १ वाटी भाजलेल्या दाण्यांचे तुकडे, १/२ वाटी काजू/ बदाम तुकडे,वेलदोडा पूड, १/४ चमचा सोडा किवा १/२ चमचा बेकिंग पावडर,१ चिमूट मीठ.
१ मोठी काकडी. खिरे नव्हेत. मोठी जाड सालीची गडद हिरव्या रंगाची काकडी घेणे.
कृती- रवा कोरडा भाजून घेणे.काकडी किसून पाणी बाजूला काढणे.किसामध्ये रवा,गूळ,खोबरे, दाणे, काजू, बदाम, वेलची पूड आणि सोडा घालणे.चिमूटभर मीठ घालणे. थलथलीत भिजवणे. मिश्रण घट्ट वाटल्यास बाजूला काढलेले काकडीचे पाणी जरुर तेवढे घालणे.
अवन मध्ये १८० अंश से. वर २० ते २५ मिनिटे किवा गॅसवर केकपात्रात २० ते २५ मिनिटे बेक करणे.
प्रतिक्रिया
29 Jul 2008 - 1:59 pm | सहज
तवस = काकडी हे आज कळलं :-)
सांदण, तवसाळं हे पदार्थ धनंजय व स्वाती यांनीच करुन आम्हाला खायला घालावेत बॉ.
आम्ही सिंपल पॅनकेकवर केळ + सिनॅमन शुगर + क्रीम किंवा साधा शिरा किंवा नुस्ती काकडी तिखट मिठ लावून, नुस्ते ओले खोबरे + गुळ असे सारण खाउनच बरे!
हे तुम्ही लिहता त्या पदार्थाला करणारे तितकेच भारी पाहीजेत.
:-)
29 Jul 2008 - 2:01 pm | केशवसुमार
स्वातीताई,
काकडी ची फक्त कोशिंबीर होते, जस्तीत जास्त उपासाची भाजी येव्हढे भारतात महिती होते..
बुडापेष्ट मध्ये असताना काकडीचे उभे पातळ काप तव्यावर भाजून मीर्पुड लावून डोळे बंद करून खाल्लेत :& (याच पध्दतीने मिळणार्या वांग्या पेक्षा कितीतरी पट बर)
पण केक :O ?? अता तुम्ही म्हणताय तर तो केक छानच असणार.. :)
(युरोपियन व्हेज पदार्थांना घाबरणारा)केशवसुमार
स्वगतः ही युरोपीयन लोक कश्यात काय घालून खातील याचा नेम नाही.. :SS मध्ये एका टिव्ही शो मध्ये कांदा लसुणाच्या फोडणीत सफरचंद परतेली पाहिली... @)
29 Jul 2008 - 2:16 pm | स्वाती दिनेश
(युरोपियन व्हेज पदार्थांना घाबरणारा)..
तवसाळं अस्सल भारतीय आहे हो..गोव्याच्या बाजूचे. त्सेंटा आजीला देताना 'गुर्कन कुकन' असे जर्मन बारसे करून मी दिले ,:)
स्वाती
29 Jul 2008 - 10:08 pm | बेसनलाडू
माझी आजी हे लऽय भारी करायची :) ती तौसोळ्या म्हणायची त्याला. मी काकडीची खांडवी म्हणत असे ;) झकास!
(स्मरणशील)बेसनलाडू
29 Jul 2008 - 10:13 pm | यशोधरा
स्वाती ताई, माझी आज्जी हे मस्त बनवायची गं! :) आईही बनवते बर्याचदा, अन् एकदा मी बनवून हापिसमधे नेले तर पहिलया ५-१० मिनिटांत फस्त झालं!!:)
काय मस्त चव असते ना तौसोळीची? :)
परत एकदा बनवायला हवं... यावेळी घरीच ठेवावं का?? की हापिसमधल्या खादाडऊंसाठी न्यावं??
29 Jul 2008 - 10:20 pm | धनंजय
बॉल्टिमोरमध्ये उन्हाळ्यात रविवारचा भाजीबाजार होतो, आणि जवळपासचे शेतकरी ताजी भाजी आणतात.
मंडईची आठवण येऊन मला खायखाय सुटते! मग एकट्याचा स्वयंपाक आहे, हे विसरून कधी किलो-दोन-किलो काकड्या आणल्या जातात. एक काकडी तिखटमीठ लावून, दुसरी खमंग काकडीसाठी... आता बाकीच्यांचे तवसाळे!
गोयांत "काकडी" म्हणनात, "तवशी" अशेच म्हणतात.
30 Jul 2008 - 9:06 am | दोयल
छानच. नक्कि करून बघेन..
30 Jul 2008 - 10:58 am | नंदन
छान पाककृती. यालाच बहुधा तळकोकणात धोंडस म्हणत असावेत. काकडीचा आणि फणसाचाही छान लागतो.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
31 Jul 2008 - 12:10 pm | स्वाती दिनेश
हो रे धोंडस म्हणतात पण इतक्या गोंडस पदार्थाला धोंडस म्हणायला कसं तरी वाटतं म्हणून मग तवसाळं..
तवसाळं की तौसाळं यावर आमच्याकडे केलेलं तवसाळं संपेपर्यंत वाद होतो.
स्वाती
31 Jul 2008 - 8:48 am | विसोबा खेचर
स्वाती, जियो...!
लै भारी पाकृ!
31 Jul 2008 - 8:59 pm | चित्रा
मस्त!
आधी सांदणे आणि आता हे. करण्याच्या पदार्थांची यादी वाढतच चालली आहे.