ज्योतिष- पलभरके लिए कोई हमे प्यार कर दे झूटाही सही!

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in काथ्याकूट
15 Mar 2012 - 1:48 pm
गाभा: 

ज्योतिषाची उपयुक्तता तपासा या म.टा.मधील राजीव उपाध्येंच्या लेखावर खर तर प्रतिक्रिया मला द्यायची नव्हती. तेच तेच मुद्दे किती काळ देत राहणार. पण म्हटल त्या निमित्त पुर्वप्रकाशित लेखनाचा काही भाग वाचकांच्या समोर आणावा.ज्योतिषावरचे वाद- प्रतिवाद हे गेली दीडशे वर्ष त्याच त्याच प्रकारचे आहेत.असो लेखातील काही मुद्यांचा परामर्श घेउ.
"हे धैर्य वैफल्यग्रस्त व्यक्तिने नक्की कुठून गोळा करायला हवे होते? अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठेल्यावरुन की नारळीकरांच्या आयुकातुन? आत्म हत्या हा चुकीचा पर्याय आहे नि:संशय पण एखाद्या व्यक्तीच्या सपोर्ट सिस्टीम्स संपल्या तर त्याने येणारे वैफल्य हाताळायला कुणाकडे जायचे?"
नैराश्यापोटी आलेल्या लोकांना मन व मनाचे आजार याविषयी योग्य माहीती दिली गेली पाहिजे. चिंता, नैराश्य हे मनाचे आजार आहेत. मानसोपचार तज्ञांचा सल्ला व मानसोपचारावरील योग्य औषधांनी ते बरे होतात. शिवाय कौन्सिलिंग सेन्टर्स हे पण तुमच्या समस्या समजावून घेवून त्यावर कायदेशीर व व्यावहारिक उपाययोजना सुचवतात. सर्वांचे सर्व प्रश्न सुटतीलच असं नाही. वैज्ञानिक दृष्टिकोणाचा अवलंंब केला तर तर्कबुद्धी, विवेक व आत्मनिरीक्षण यांच्या सहायाने आपले काही प्रश्न सुटू शकतात. अनिश्चितता ही सर्वांसाठी आहे. ती पचवायला शिकलं पाहिजे. जी गोष्ट आपल्या हातात नाही त्या पेक्षा जी गोष्ट आपल्या हातात आहे तिचा विचार केला पाहिजे. प्रयत्न ही आपल्या हातातली बाब आहे.ती करत राहणे असे म्हणणे काय आणी कर्म करत राहा असे म्हणणे काय एकच.

"ज्योतिष शास्त्र आहे की नाही यावर वाद घालून धूळ उडवत बसण्यापेक्षा ज्योतिष उपयुक्त आहे की नाही हा मुद्दा महत्वाचा आहे. उपयुक्तता सिद्ध होण्यास शास्त्रीयत्वाच्या कसोटीची गरज नाही. फक्त अनुभव पुरेसा आहे."
त्याची उपयुक्तता कोणास व कशी यावर ते अवलंबून आहे. दारुच्या आहारी गेलेल्या माणसाला दारु ही त्याच्यासाठी उपयुक्तच नव्हे तर उपकारकही वाटत असते!
प्रथम, ते उपयुक्त का नाही, इतकेच नव्हे तर ते उपद्रवकारक का आहे ते पाहू. एक सश्रद्ध गृहस्थ ज्योतिषाकडे कधीही जात नसत. त्याचे कारण सांगताना ते म्हणाले, ''हात दाखवून अवलक्षण का करून घ्यायचे?`` याचा अर्थ असा की भविष्यात घडणार असलेल्या प्रतिकूल घटना आधी कळून घेउन उगीच मन:स्ताप कशाला करून घ्यायचा ? जे होणार आहे ते अटळ आहे हे जर खरे असेल तर ते आधी कळण्याने काय फायदा ? नसत्या विवंचनेला आपण होउन का आमंत्रण द्यायचे ?
यावर ज्योतिषीलोक जो युक्तिवाद नेहमी करतात तो असा. चक्रीवादळ टाळता येत नाही म्हणून वेधशाळेने ते वर्तवूच नये का? पुढे येणार असलेल्या प्रतिकूल परिस्थितीची आधी कल्पना आली तर माणूस त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करू शकतो. प्रतिकूल परिस्थितीची तीव्रता कमी व्हावी यासाठी व्यवहारी किंवा दैवी उपाय योजू शकतो. उन्हाळा आहे कडकडीत उन थोपवणे काही आपल्या हातात नाही पण चपला घालणं, टोपी घालणं, छत्री घेणं हे तर आपल्या हातात आहे ना! त्यामुळे उन्हाचे चटके तर बसत नाहीत ना या युक्तिवादात हे गृहीत धरण्यात आले आहे की ज्योतिष्यांना आगामी घटनांची कल्पना आधी निश्चितपणे येउ शकते. आणखीही एक गोष्ट नकळत गृहीत धरली आहे ती म्हणजे जे होणार आहे ते पूर्णपणे अटळ नाही. त्यात माणसाच्या प्रयत्नाने थोडाफार फेरबदल होउ शकतो. ही दोन्ही गृहीतकृत्ये वादग्रस्त आहेत. चक्री वादळाचे उदाहरण इथे गैरलागू आहे. वेधशाळेने चक्रीवादळ वर्तवल्यामुळे ते टाळता आले नाही तरी त्याची सत्यता तपासता येते. उपग्रहाद्वारे त्याचे चित्रण बघता येते. चक्रीवादळांचे अंदाज
तपासता येतात कारण त्यांचा संख्यात्मक अभ्यास उपलब्ध असतो. परंतु ज्योतिषांच्या भाकितांबाबत असा अभ्यास केला जात नाही. फलज्योतिषाचे अनिष्ट भाकित योगायोगाने खरे ठरले तर 'बघा! सांगितले होते. पण ऐकले नाही.` असे म्हणता येते. खोटे ठरले तर 'योग्य ते उपाय, तोडगे केले म्हणून अरिष्ट टळले` असेही म्हणण्याची सोय आहे.
प्रतिकूल परिस्थितीने हैराण झालेला माणूस ज्योतिष्यांचा सल्ला घेण्यासाठी पैसे खर्च करीत असतो. चांगल्या गोष्टी घडणार असल्याचे भाकीत सांगून ज्योतिषी त्याला दिलासा व आधार देउ शकतो, किंवा आताचे वाईट दिवस लवकरच संपणार आहेत अशी मनाला उभारी देउ शकतो हे जरी खरे असले तरी त्यासाठी त्या बिचार्‍याचा आधीच हलका झालेला खिसा आणखी हलका होत असतो. भरल्या गाडीला सुपाचे काय ओझे? या विचाराने दैवी उपाय करण्यासाठी प्रसंगी माणूस कर्जसुद्धा काढतो.
फलज्योतिष हे जर खरोखरीच विश्वसनीय शास्त्र असते तर हा खर्च कारणी लागला असे म्हणता आले असते. पण तशी वस्तुस्थिती नाही, आणि हेच तर आम्हाला सांगायचे आहे.
आता उपयुक्ततेबद्दल विचार करू. कुंडलीवरून माणसाचा नैसर्गिक कल कोणत्या गोष्टीकडे आहे ते कळते असे ज्योतिषी म्हणतात. तसे खरोखरीच कळत असेल तर ती फार चांगली गोष्ट आहे. पाश्चात्य देशात या अंगाने खूप संशोधन झालेले आहे. त्याचे निष्कर्ष फलज्योतिषाला बहुतांशी प्रतिकूल असेच निघालेले आहेत. म्हणजे त्याची उपयुक्ततासुद्धा वादातीतपणे सिद्ध झालेली नाही.
आता ते मनोरंजन म्हणून उपयुक्त आहे असा दावा कुणी केला तर मात्र त्याची उपुक्तता आम्ही मान्य करु. कारण जगात शास्त्रज्ञांची चलती झाली म्हणून कवी लगेच ओस पडले असे दिसून येत नाही. उपयुक्ततेच्या मुद्याचे यश हे ज्योतिषाच्या सामर्थ्यात नसून जातकाच्या मानसिकतेमध्येच आहे.

"माझे आयुष्य एखाद्या सूत्रात बांधले गेले आहे का या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास प्रत्येक व्यक्ति पुर्णपणे स्वतंत्र आहे एखादे सूत्रही त्यातील विशिष्ट घटकांच्या परस्पर संबंधाची प्रतिकृती असते. जन्म आणि मृत्युच्या या अंतिम अवस्थांनी बद्ध असलेल्या मनुष्याची पत्रिका ही म्हणूनच त्याच्या जीवनात येउ शकणार्‍या वेगवेगळ्या अवस्थांची एक प्रतिकृती मानली तर त्यात वावगे काय?"
प्रतिकृतीच आहे ती.सोप्या भाषेत आराखडा म्हणु. जन्म ते मृत्यु या दरम्यान होणार्‍या माणसाच्या वैयक्तिक आयुष्यतील घटनांचा संबंध या प्रतिकृतीच्या अन्वयार्थाशी जोडून मग त्याचा परामर्श घेणे हेच तर फलादेश म्हणुन गणले गेले आहे.फलज्योतिषातील शास्त्रत्व तपासण्यासाठी एम्पीरिकल संशोधन करुन या वादाचा निर्णय लावता येईल अशी आशा पुष्कळ बुद्धीवादी लोकांना वाटते. परंतु हे शास्त्र अशा संशोधनासाठी निरुपयोगी आहे असे आम्हास वाटते. याची कारणे :-
१) या शास्त्रातल्या फलित दर्शवणाऱ्या पॅरामीटर्सची संख्या अगणित बनत जाते. शिवाय पूर्वसंचितासारखे अज्ञेय पॅरामीटर्स त्यात आहेत.
२) ग्रहस्थितीची आयडेंटीकल पुनरावृत्ती कधीच होत नसते. त्यामुळे पुन:प्रत्यय घेणे शक्य नसते. म्हणजे हे संशोधन प्रत्यक्षात आणणे शक्य नाही.
३) सौख्य व स्वभाव विश्लेषण या गुळमुळीत अथवा सापेक्ष बाबींमध्ये एम्पीरिकल संशोधन कसे आणणार? त्यासाठी निसंदिग्ध बाबी घेतल्या पाहिजेत उदा. मृत्यू, मोठे आजारपण, मोठा अपघात, शारिरिक व्यंग, इ.
४) पुरेसा डाटा मिळणं व्यक्तिगत पातळीवर शक्य होत नाही. वि.म दांडेकरांनी संख्याशास्त्रीय निष्कर्ष काढण्याइतपत डाटा मिळाला नाही असे सांगितले होते. परदेशात पुन:पुन: एम्पीरिकल संशोधने केली गेली. पण त्यातून फारसे काही हाती आले नाही. फलज्योतिषाच्या समर्थन करणाऱ्यांविरुद्ध ते निष्कर्ष गेले की ते संशोधनात त्रुटी काढतात. गोकॅलीनच्या संशोधनाचा प्रचलित फलज्योतिष, शास्त्र म्हणून सिद्ध होण्यास काहीही उपयोग झाला नाही.

"आधुनिक ज्योतिषी हे ग्रहांचे परिणाम अजिबात मानीत नाहीत. ते ग्रहांच्या भ्रमणाचे किंवा आकाशात तयार होणार्‍या विशिष्ट भौमितिक रचनांची मानवी जीवनातील अवस्थांशी सांगड घालायचा प्रयत्न करतात."
थोडक्यात ग्रह हे कारक नसून सूचक आहेत असे हे म्हणणे आहे. आज संकष्टीला चंद्रोदय रात्री अमक्या वाजता आहे म्हणजे घड्याळात अमके वाजणे हे चंद्रोदय होण्याचे सूचक संकेत असतात कि ज्यावर उपास सोडायचा असतो. तसे ही आधुनिक ज्योतिषी भाकिताशी संबंध न लावता प्रवृत्ती कलाशी संबंध जोडतात. जातकाला ग्रह कारक आहेत की सूचक याच्याशी काहीही घेण देण नसत. त्याला भविष्यात घडणा‍र्‍या घटनांचा आढावा घ्यायचा असतो.वर्तमानात त्याची उत्तरे मिळाली तर तो काही नियोजन वा व्यवस्थापन करु शकतो. असे सांगड घालण्याचे प्रयत्न होतच असतात.त्याचे रिझल्टस हे संख्याशास्त्रीय शक्यतेपेक्षा
अधिक नाहीत हे आजमितीस तरी सत्य आहे

( आधारित ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद )

प्रतिक्रिया

लेख आवडला. भाषा थोडी क्लिष्ट वाटली तरी तर्कशुध्द आणि नेमकी मुद्देसुद आहे - त्यामुळे लेख नक्कीच पुन्हा, पुन्हा वाचला जाईल. युयुत्सुंची वाक्ये "कोट" करतांना HTML फॉर्मॅटींग केले असते तर अजून वाचनीय झाला असता.

प्रकाशकाका, एकदा निवांत भेटायचे आहे तुम्हाला, कधी जमेल?

प्रकाश घाटपांडे's picture

15 Mar 2012 - 3:50 pm | प्रकाश घाटपांडे

बरोबर एचटीएमएल फॉरमॅटींग ने कोट केले असते तर सुबक वाटले असते.
बाकी आम्ही असतोच जालनिशीत आमचा संपर्क आहेच कधीही भेटू

चक्री वादळाचे उदाहरण इथे गैरलागू आहे. वेधशाळेने चक्रीवादळ वर्तवल्यामुळे ते टाळता आले नाही तरी त्याची सत्यता तपासता येते.

शिवाय चक्रीवादळ वगैरे हे सार्वजनिक घटनाक्रम आहेत.. इथे भविष्य हे व्यक्तिगत (त्या व्यक्तीबाबत) भाकीत म्हणून वर्तवले जात असते हाही एक मुख्य फरक आहेच..

अधिक स्पष्टतेसाठी : चक्रीवादळाची सूचना मिळाली तर इव्हॅक्युएशन करुन अधिकाधिक लोकांचे प्राण वाचवता येतील.. पण तुमच्या एकट्याला चक्रीवादळापासून (किंवा पुरापासून) धोका असेल तर तुम्हाला एकट्याला वाचवले की झाले.. तेवढ्याने वादळ पूर यायचा टळेल? की तो येईलच आणि इतरांचे इतर बघून घेतील?

तर्कदुष्टतेने लडबडलेल्या गोष्टी खर्‍या असतील नसतील पण त्या व्यवहारात गृहीत धरण्यात पॉईंट दिसत नाही हे खरं.

बाकी मुद्देही बिनतोड आहेत.. स्पष्ट मांडणी केल्याबद्दल धन्यवाद...

मुळात ज्योतिष हे ठोक ताळा किंवा अंदाज पध्दति आहे.

जस पावसात दिवसा काळे ढग दाटुन आले कि आपण म्हणतो पाऊस येईल.
पण उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात अस घडल तर अस आपण नाहि म्हणु शकत.
बहुतेक वेळा ज्योतिषाने त्याला भेटायला येणार्‍या व्यक्तिचि माहिति घेतलेलि असते व त्या वर तो आपले ज्योतिष सांगतो.
जस डॉक्टर रोग्याला लक्षण विचारतो कि त्याला काय होत आहे तसच काहिस हे.

अमोल केळकर's picture

15 Mar 2012 - 3:30 pm | अमोल केळकर

चांगला २ -३ दा तरी लेख वाचावा लागेल :)

अमोल केळकर

चौकटराजा's picture

15 Mar 2012 - 3:43 pm | चौकटराजा

आपले हे पुस्तक मी वाचले आहे. स्वराज्यचे माजी संपादक श्री एस के कुलकर्णी यांचेशी पुणे ते दादर अशा प्रवासात वाद झाला होता. दादर आल्यावर मी त्यांना एक प्रश्न जाताजाता ठेवला . तो असा " जर उद्या एका बालकाचा जन्मच मंगळावर झाला तर त्याच्या जन्म पत्रिकेत मंगळ कुठे दाखवायचा ? सापडल्यास उत्तर पाठवा. पत्ता दिला . आजतागायत एस्केंचे उत्तर आलेले नाही.
ज्योतिष हे दुसर्‍याना मानसिक आधार देण्याबरोबरच लुबाडण्यास फार उपयोगी उद्द्योग आहे.तसेच वय वर्षे साठ ते सत्तर या दहा वर्षात टाईमपास
म्हणून उपयोग होतो. ग्रहांच्या चलनाचा परिणाम आपल्यावर होत असेल देखील पण त्याची महत्ता (magnitude) काय? अहो साधा ढग देखील
शेतातील पिकाची नासाडी करू शकतो. कारण सानिदध्य हे ही महत्वाचे आहे. हे गतानुगतिकाना कसे पटणार ?

प्रकाश घाटपांडे's picture

15 Mar 2012 - 7:34 pm | प्रकाश घाटपांडे

" जर उद्या एका बालकाचा जन्मच मंगळावर झाला तर त्याच्या जन्म पत्रिकेत मंगळ कुठे दाखवायचा ?

अशा वेळी त्या बालकाच्या पत्रिकेत पृथ्वी हा ग्रह असेल. पृथ्वीवर जन्मलेल्या बालकाच्या पत्रिकेत पृथ्वी कुठे असते? दाखवायची झाली तर ती कुंडलीच्या चौकटीचा मध्यबिंदू दाखवावी लागेल.
अंतर्ज्ञानाने भविष्य सांगणार्‍यांचे एक बरे असते त्यांना असले प्रश्न नसतात? :)

महेश हतोळकर's picture

15 Mar 2012 - 8:34 pm | महेश हतोळकर

पण उत्तर धृवावर (किंवा दक्षीण धृवावर) जन्माला आलेल्या माणसाची कुंडली कशी मांडायची?

म्हणजे पृथ्वी तामसी लोभी वक्री चक्री असे राशीसारखे काहीतरी तिच्या बाबतीत शोधावे लागेल. प्रत्येक ग्रहावरील मानवी वस्ती साठी वेगळे ज्योतिष मग प्रत्येक सूर्यमाले साठी वेगळे, मग प्रत्येक गॅलक्सी साठी वेगळे ज्योतिष शास्त्र . मग तुम्हाला कोणत्या गॅलक्सीच्या ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करायचा आहे त्याची स्पेशल युनिव्हर्सिटी! क्या बात है !

नगरीनिरंजन's picture

15 Mar 2012 - 4:01 pm | नगरीनिरंजन

अतिशय तर्कशुद्ध आणि मुद्देसूद लेख!
धन्यवाद!
लोकांचा बुद्धिभेद करणार्‍या लिखाणावर दरवेळी असा जालीम उतारा आलाच पाहिजे!

मन१'s picture

15 Mar 2012 - 4:25 pm | मन१

लोकांचा बुद्धिभेद करणार्‍या लिखाणावर दरवेळी असा जालीम उतारा आलाच पाहिजे!
हे म्हणायला ठिक आहे हो.
पण एक काका सगळ्या अंनिसवाल्यांना आणि बुद्धीवाद्यांना पुरुन उरलेत ना. आहे का जोर दरवेळी त्यांच्या तोंडी लागण्याचा?

शैलेन्द्र's picture

15 Mar 2012 - 6:10 pm | शैलेन्द्र

+१११११

प्रकाश घाटपांडे's picture

15 Mar 2012 - 6:53 pm | प्रकाश घाटपांडे

खरच थकलो. हात टेकले!

युयुत्सु's picture

15 Mar 2012 - 7:18 pm | युयुत्सु

खरच थकलो. हात टेकले!

वरील घोषणा वाचून फक्त या धाग्यापुरती मी माझी तलवार म्यान करत आहे. ;)

होऊन जाऊ द्या ना बिलेटेड धुरवड.. समानता वगैरे सगळ्याच्च ठिकाणी झालीय.
चलो, उठो. घाटपांडे काकांना काहीतरी पाजवा कुणी एनर्जीसाठी ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

15 Mar 2012 - 11:59 pm | अत्रुप्त आत्मा

@घाटपांडे काकांना काहीतरी पाजवा कुणी एनर्जीसाठी>>> जे काही पाजवाल त्यातलं थोडं या हुतुतू... आपलं ते हे... युयुत्सुंना पण पाजा...त्यांना ''अंनिस समोर जा'' म्हटलं की अशीच कहितरी(च) कारणे देतात... ;-)

तसंही त्यावरून काहिही सिद्ध होणार नाही

जयंत कुलकर्णी's picture

18 Mar 2012 - 9:30 am | जयंत कुलकर्णी

बिनपात्याची तलवार म्यान केलेली वाचून गंमत वाटली...... कशी करतात म्हणे ती म्यान...?

रामपुरी's picture

20 Mar 2012 - 5:32 am | रामपुरी

त्यातून त्यांना तीन जण पुढून आणि एक मागून असे चारजण आले तरी मारामारी करता येते. इथे तर दोनच आहेत, अंनिस आणि बुद्धीवादी :) :)

स्वातीविशु's picture

15 Mar 2012 - 5:01 pm | स्वातीविशु

लेख आणि लेखाचे शिर्षक दोन्ही आवडले. :)

तुमचे इ-पुस्तक वाचत आहे.

पैसा's picture

15 Mar 2012 - 7:57 pm | पैसा

या निमित्ताने तुमची 'ज्योतिष्याकडे जाण्यापूर्वी' ही मालिकाही वाचायला मिळेल. धन्यवाद! लिंक उपक्रमाची असली तरी सेव्ह करून ठेवली आहे! ;)

JAGOMOHANPYARE's picture

15 Mar 2012 - 9:24 pm | JAGOMOHANPYARE

मी गेल्या वर्षी एका ज्योतिष्याला पत्रिका दाखवली... तुझे सगळे भले होईल बेटा, असे म्हणून त्याने ताईत दिला आणि एका पुस्तकाचा १४ वा अध्याय वाचायला सांगितला.. त्यानंतर पंधरा दिवसातच मला अ‍ॅक्सिडेंत झाला आणि पाय मोडला..

हो, हो आणि मग तुम्हाला तो औषध देणारा धनगर भेटला आणि तुम्ही इथे त्या चमत्कारी औषधाबद्दल धागा टाकला..
तिथे मग बाजार उठला.
सगळे पालथे धंदे - धरुन ठोकलं का नाहीत त्या ज्योतिषाला जाऊन? अरे हो, पाय अधू होता नाही का. आता कसा आहे?

JAGOMOHANPYARE's picture

16 Mar 2012 - 12:38 am | JAGOMOHANPYARE

होय.

आता पाय बरा आहे.

अ‍ॅक्सिडेंटमध्ये लोक मरतात, तुमचा फक्त पाय मोडला, आता तो ही बरा झाला आहे हे तुमचे चांगले नशीब नव्हे काय?

ज्योतीषबाबा की जय...

(ह. घ्या)

परिकथेतील राजकुमार's picture

16 Mar 2012 - 12:02 pm | परिकथेतील राजकुमार

त्यानंतर पंधरा दिवसातच मला अ‍ॅक्सिडेंत झाला आणि पाय मोडला..

कुठला पाय ?

दादा कोंडके's picture

16 Mar 2012 - 2:52 pm | दादा कोंडके

कुठला पाय ?

लहान असताना पाच पाय, नंतर तीन व म्हातारा झाल्यावर चार पाय असलेला प्राणी कोणता?

असं एक कोडं शाळेत (इयत्ता ५-६) असताना ऐकल्याचे स्मरते. ;)

JAGOMOHANPYARE's picture

15 Mar 2012 - 9:33 pm | JAGOMOHANPYARE

लपे करमाची रेखा
माझ्या कुंकवाच्या खाली
पुशीसनी गेलं कुकू
रेखा उघडी पडली

देवा, तुझ्याबी घरचा
झरा धनाचा अटला
धन-रेखाच्या चरहानं
तयहात रे फाटला

बापा, नाको मारू थापा
असो खरया असो खोट्या
नही नशीब नशीब
तयहाताच्या रेघोटया

अरे, नशीब नशीब
लागे चक्कर पायाले
नशिबाचे नऊ गिरहे
ते भी फिरत रह्याले

राहो दोन लाल सुखी
हेच देवाले मांगनं
त्यात आलं रे नशीब
काय सांगे पंचागन

नको नको रे जोतिषा
नको हात माझा पाहू
माझं दैव माले कये
माझ्या दारी नको येऊ

-बहिणाबाई चौधरी

प्रकाश घाटपांडे's picture

16 Mar 2012 - 9:35 am | प्रकाश घाटपांडे

या प्रसंगाने आपल्याला बहिणाबाईच्या काव्याची आठवण झाली ते बरे झाले. ज्या मनाला ज्योतिषाचा आधार हवा असतो त्या मनाचे वर्णन बहिणाबाईने सुंदर केले आहे
मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।
मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा । जशा वार्‍यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।
मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन? । उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ।।
मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर आरे । इचू साप बरा, त्याले उतारे मंतर ।।
मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात?। आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।
मन चप्पय चप्पय, त्याले नही जरा धीर । तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ।।
मन एवढं एवढं, जसा खाकसचा दाना । मन केवढं केवढं? आभायात बी मायेना ॥
देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात । आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत ॥
देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं । कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं ॥

घाटपांडे परत मैदानात उतरले की काय?

अन्या दातार's picture

16 Mar 2012 - 11:48 am | अन्या दातार

घाटपांडे परत मैदानात उतरले की काय?

तुमचे ग्रह फिरले की काय ओ?? ;)

मन१'s picture

16 Mar 2012 - 11:53 am | मन१

धागा त्यांचाच आहे.
मैदान त्यांचच आहे.
एकदा तुम्हीही म्यान केलेली तलवार बाहेर काढाच बघू.
ह्या सगळ्या बुद्धीवादी का कोण आहेत त्यांची तोंडे गप्प करा.
चला, तुम्ही मागे जाहिर केलेल्या आव्हानाला तयार आहात म्हणून घोषित करुयात का?
मस्त माजच उतरवू या साल्यांचा एकदा. काय?

प्रकाश घाटपांडे's picture

16 Mar 2012 - 12:18 pm | प्रकाश घाटपांडे

आपल्याजवळ असलेला मालमसाला अधुनमधुन पेरत रहायचं! बाकी फलज्योतिषाचे सार तुमच्या सहीत नेहमीच असते
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

चला तुम्ही मैदानात उतरलात असं मानायला हरकत नाही.

चौकटराजा's picture

16 Mar 2012 - 1:16 pm | चौकटराजा

ग्रेटेस्ट कविता ऑफ ऑल टाईम .

चौकटराजा's picture

16 Mar 2012 - 9:24 am | चौकटराजा

याला म्हणायची कन्विनिसींग कविता.
बहिणाबाई,
" शिक्षण नि विचारीपणा यांचा संबंध असतो" असे आम्ही म्हणतो .खरेच असे असते का हो ?

रणजित चितळे's picture

16 Mar 2012 - 1:39 pm | रणजित चितळे

शिक्षण म्हणजे आपण सरसकट शाळा शिकलेला असे समजतो (किती चूकीचे आहे हे). जिवनाच्या शिक्षणांत बहिणाबाईं पिएचडी होत्या.

अभिजीत राजवाडे's picture

16 Mar 2012 - 9:47 pm | अभिजीत राजवाडे

खणखणित रोख ठोक लेख.

आभार.

मी कालपर्यंत भविष्‍य आणि त्यातील सत्यतेबाबत पूर्णत: कोरा होतो.
मी कधीही भविष्‍य जाणून घेतलं नव्हतं.

काल घेतलं, अर्थात बराचसा भूतकाळ आणि काही प्रमाणात भविष्‍यकाळाबद्दल असतं तसं.
मला सांगितलेल्या घटना 99 टक्के खर्‍या निघाल्या आहेत.
मला काही बाबी जाणून घेतल्याने खूप बरं वाटत आहे.. यात उत्सुकता शमवण्यापेक्षा माझ्या चुकीच्या दृष्‍टीकोनांबद्दल ते कसे चुकीचे आहेत हे कळाल्याने मला पुनर्विचार करण्‍याला वाव मिळाला.

पण यावरुन माझी भविष्‍यापेक्षा ते ज्या व्यक्तिनं सांगितलं त्यांच्यावरच श्रद्धा निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे भविष्‍य सांगणारी व्यक्ती आणि मी एकमेकांना पाहिलेलं नाही. भविष्‍य सांगणारी व्यक्ती न कळत्या लेकराइतकी निष्पाप असेल तरच भविष्‍य खरं ठरतं असं ऐकलं होतं, ते मला अनुभवायला मिळालं.

आय अॅम हॅप्पी!
पण याचा अर्थ असा नाही की उद्यापासून रोज मी भविष्‍य पाहून सगळ्या गोष्‍टी करायला लागेन.

प्रकाश घाटपांडे's picture

17 Mar 2012 - 9:16 am | प्रकाश घाटपांडे

पण यावरुन माझी भविष्‍यापेक्षा ते ज्या व्यक्तिनं सांगितलं त्यांच्यावरच श्रद्धा निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे भविष्‍य सांगणारी व्यक्ती आणि मी एकमेकांना पाहिलेलं नाही

या ठिकाणी हे हितचिंतक भविष्य आहे. हे फलज्योतिषाच्या आधारे वर्तवले होते कि अंतस्फुर्ती वा अन्य प्रकारच्या भविष्यज्ञानाधारे? हा श्रद्धेचा प्रांत असल्याने त्याची चिकित्सा होत नाही हाच तर आमचा मुद्दा आहे.

पण याचा अर्थ असा नाही की उद्यापासून रोज मी भविष्‍य पाहून सगळ्या गोष्‍टी करायला लागेन.

ही बाब महत्वाची आमच्या पुस्तकातील http://mr.upakram.org/node/854 या भागात त्याचा उहापोह केला आहेच.

हे फलज्योतिषाच्या आधारे वर्तवले होते कि अंतस्फुर्ती वा अन्य प्रकारच्या भविष्यज्ञानाधारे?

त्यांची अंतस्फूर्ती व अन्य प्रकारच्या भविष्य ज्ञानाच्या आधारे.

हा श्रद्धेचा प्रांत असल्याने त्याची चिकित्सा होत नाही हाच तर आमचा मुद्दा आहे.

मग सगळं सगळ्यांना मान्य असताना झगडा किस बात पर?
चिकित्सा हा मुद्दा आलाय म्हणून, आणि ती करायला आवडेल म्हणून माझ्या बाबतीत म्हणून सांगतो. माझी ना भविष्यावर श्रद्धा होती ना आणखी कुठल्या पद्धतीवर - आताही नाही. माझे समाधान झाले, हा विषय सर्व बाबतीत तिथेच मिटला. यात भविष्यावरील किंवा त्या विशिष्ट पद्धतीवरील विश्वास/ अविश्वास देखील संपले - त्या माणसावर श्रद्धा निर्माण झाली म्हणजेच मी जो काही, जसा आहे तेही मला कुठल्याही चुकीच्या आग्रहाशिवाय लख्ख दिसलं - ही चिकित्सा पुरेशी आहे काय? की व्यक्तिविशिष्ट असल्याने या चिकित्सेला अर्थ रहात नाही?

आणखी एक - 'हितचिंतक भविष्य' मधून कोणत्याही बाजूने वेगळा अर्थ निघण्यास वाव राहू नये म्हणून, ते भविष्यवेत्ते युयुत्सू नाहीत ही अतिरिक्त माहिती देतो.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Mar 2012 - 2:57 pm | अत्रुप्त आत्मा

@आणखी एक - 'हितचिंतक भविष्य' मधून कोणत्याही बाजूने वेगळा अर्थ निघण्यास वाव राहू नये म्हणून, ते भविष्यवेत्ते युयुत्सू नाहीत ही अतिरिक्त माहिती देतो. >>> हा खुल्ला-सा केल्याबद्दल जोरदार अभिनंदन ...

स्व's picture

17 Mar 2012 - 12:56 pm | स्व

मला खरोखरिच कुतूहल आहे. नम्रपणे मी हे सर्व पाहू इच्छितो. संपर्क कसा करु सदर व्यक्तिस ?
मला हे कुतूहल म्हणून बघायचे आहे, परिक्षा घेणे, कसोटी पाहणे असा कुठलाही उद्देश नाही, इतरांची परिक्षा घेण्याची माझी पात्रता नाही हे कबूल आहे.
संप्पक्र क्रमांक कळवलात तर बरे होइल.

कवितानागेश's picture

17 Mar 2012 - 6:48 pm | कवितानागेश

मलादेखिल उत्सुकता आहे. :)
कदाचित अजूनही काहीजणांना असेल. त्यांना व्य.नि. करावा.
पण एक 'हितचिंतक' म्हणून सल्ला देइन की, त्याची इथे उघडपणे जाहिरात करु नये.
तू तुला आलेल्या भविष्यकथनाच्या गोष्टी इथे छपल्यास तर तुझा 'नाडीवाली ओककाका' व्हायला वेळ लागणार नाही.
लोक फक्त तुला त्या भविष्यकथनातून 'कट' मिळतो, अशी आगपाखड करतील.
तुझ्या प्रत्येक धाग्यावर त्याचीच विचारणा होईल.
त्यामागची 'शेअरिंग' ची भावना कधीच लक्षात घेतली जाणार नाही.
शिवाय कुठलाही 'वैयक्तिक अनुभव; जर सामाजिक प्रश्नांशी निगडित नसेल, तर त्याबद्दल 'समाजात' बोलण्यासारखे काही नाही, असे मला वाटते.

शिवाय लेखातल्या विषयाबद्दलः अभ्यासासाठी म्हणून कुणचाही कुठलाही 'खरा' डाटा मिळणे अशक्य आहे, कारण कुणीही शहाणा माणूस आपली खरी माहिती वकील, डॉक्टर आणि ज्योतिषी यांच्याशिवाय कुणसमोरही कबूल करत नाही.

हे भविष्यकथन आहे काय?
म्हणजे मेलो!!!
तु बोललीस आणि ते होणार नाही हे संभवत नाही.
आता मला ओक, घाटपांडे आणि युयूत्सूंशिवाय कुणीही तारणहार नाही.
कोणत्या ग्रहाची शांती करू ??? काय करु?? वाचवा!!!

कवितानागेश's picture

17 Mar 2012 - 7:08 pm | कवितानागेश

हे भविष्यकथन आहे काय?>>
हे अनुभवाचे बोल आहेत. माझे वय फार नसले तरी अनुभव चिक्कार आहेत! ;)

फक्त कबूल कर की, काल पुन्हा भांग घेतली होतीस. सहीसलामत मुक्त होशील तू या पापातून. :)

हीहीही
माऊ, माझी नाय् बाबा श्रद्धा रहाणार ! ;-)
भांग बिंग काही घेतलेली नव्हती. :)
पण आता तु म्हणतेस म्हणून पापमुक्तीसाठी थोडीशी घेतोच आणि नंतर कबूल करतो ;-)