नमस्कार मंडळी,
मराठी शिर्षक सुचले नाही म्हणून ईंग्रजीमधेच लिहिले त्याबद्दल माफी असावी.
काल एका क्लिष्ट विषयावर चर्चा पाहिली आणि त्याबददल इथे लिहावसं, चर्चा करावीशी वाटली.
सध्या हा एक ज्वलंत प्रश्न आहे आणि केवळ उच्चभ्रू/अतिश्रिमंत समाजाशी निगडीत न रहाता सर्वसामान्यांच्या घरात देखील घुसू पाह्तो आहे. हा मुद्दा विवाहित, अविवाहित लग्नाळू मुला-मुलींचे पालक या सर्वांनाच लागू होतो. आजकाल घटस्फोटांचे वाढते प्रमाण आपण पहातोच आहे. त्याचप्रमाणे लग्न न करणार्यांची संख्या देखील झपाट्याने वाढते आहे. "लिव ईन" ला पसंती देणारे भारतातही आता कमी नाहीत.
वरील सर्व गोष्टींमधे बरेच चर्चेचे मुद्दे आहेत पण आजचा मुद्दा हा आहे की आयुष्यात एकदाच लग्न करणे, किंवा एकप्त्नीक रहाणे हे गरजेचे राहिले आहे की नाही? आहे तर का आणि नही तर का नाही?
लग्न म्हणजे जबाबदारी, कायद्याच बंधन आणि अॅडजस्टमेंट्स. कदाचित हे सर्व स्वतंत्र पिढीच्या मनाला पटत नसल्याने लिव ईन, किंवा सहज रित्या घटस्फोट घेऊन वेगळे होणे वाढते आहे. अगदी प्रेम विवाहामधेही लग्नानंतर स्वभावांमधे आणि अपेक्षांमधे खुप फरक पडत जातो आणि बर्याचदा शेवट वेगळे होण्यातच होतो. आजही घटस्फोटीत, वय उलटून गेले तरी अविवाहित आणि "लिव ईन" असणार्या व्यक्तीला समाज चांगल्या नजरेने पहात नाही. कारण आजही समाजाच्या मनात कुठेतरी "एकदाच आणि लग्न करणेच, आयुष्यभर एकपत्नीक रहाणे" यालाच सभ्य स्त्री किंवा पुरुष समजण्याची भावना आहे.
नोकरी करणार्या मुलींना नवर्याने घरकामात मदत करावी, वैयक्तीक स्वातंत्र्य असावं, काम दोघांनी मिळून करावं अशी अपेक्षा असते, पण बर्याच ठिकाणी मुले इथे कमी पडतात, अर्थात याला दुसरी बाजूही आहेच, त्यात नातेवाईक, मुलाचे आईवडील, मुलीचे आईवडील यांचा दबाव मुलगा आणि मुलगी दोघांवर असतोच, म्हणून लग्न कदाचित टिकून रहाते आणि मग एकदा प्रौढत्व, पालकत्व आले की नवरा बायको विचारी होऊन जुळवून घेण्यास शिकतात. इथे समाज आणि आईअवडील यांचा अप्रत्यक्ष दबाव असल्याने लहान सहान कारणाचे घटस्फोट होत नाहीत. याउलट जेथे समाज आणि पालक यांचा दबाव स्वीकरला जात नाही तेथे लहान सहान कारणावरून विभक्त होणे सोपे असते.
एका व्यक्तीबरोबर पुर्ण आयुष्य सहज काढणे सोपे नाही हे सत्य आहे. नवरा बायको एकमेकांवर प्रेम असल्याशिवाय अॅडजस्टमेंट करत नाहीत. आणि मॅचुरिटी दाखवणे, अॅडजस्टमेंट करणे म्हणजे माघार घेणे नव्हे तर एकमेकांचा आदर करणे आहे. इथे एक प्रकारची कमिटमेंट असते.
मान्य आहे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, निर्णय घेण्याची मुभा आहे. पण लहान सहान कारणावरुन विभक्त होणे आणि दुसरा जोडीदार शोधणे किंवा आयुष्यभर लिव ईन रहाणे कितपत योग्य आहे? तुम्हाला काय वाटते?
प्रतिक्रिया
8 Jan 2012 - 10:22 am | गवि
You say.े
>>>>>>
...पण लहान सहान कारणावरुन विभक्त होणे आणि दुसरा जोडीदार शोधणे
>>>>>>>
यात जरा उलटं आहे. म्हणजे मला वाटतं एकमेकांचा तिटकारा येतो आणि मग लहान सहान गोष्टीही असह्य व्हायला लागतात.
"आमटीत मीठ कमी घातलं", किंवा "नवरा घोरतो म्हणून घटस्फोट" असल्या संध्यानंदी बातम्यांना हसून आपण "लहान सहान" हा शब्द वापरतो. पण त्या कमी मिठाच्या निमित्तामागे किती दबलेला तिरस्कार साठत आलेला असतो हे बाहेर कधीच कळत नाही आणि आपण खरेच मिठावरुन बायको सोडली हो, असं मानायला लागतो.
मीठ हे एक फ़क्त उदाहरण आहे. बाकी प्रत्येकाची बातमीचे तपशील आणि वाचणा-याची जाण वेगवेगळी.
असा विचार करा की लहानसहान गोष्टींवरुनही कडेलोट होण्यासारखं नातं डळमळीत होणं ही गोष्ट लहानसहान नक्की नाही.
भारतात समाज,संस्कृती,नातेवाईक इत्यादिंच्या दबावाने विवाह टिकून राहतो हे सत्य असलं तरी दॅट इज अॅट कॉस्ट ऑफ़ वुमन. बाईने सहन करत राहणे हाच जवळजवळ सगळीकडे या टिकाऊपणाचा अदृश्य पाया असतो.
8 Jan 2012 - 11:37 am | मन१
भारतात समाज,संस्कृती,नातेवाईक इत्यादिंच्या दबावाने विवाह टिकून राहतो हे सत्य असलं तरी दॅट इज अॅट कॉस्ट ऑफ़ वुमन. बाईने सहन करत राहणे हाच जवळजवळ सगळीकडे या टिकाऊपणाचा अदृश्य पाया असतो.
-१
प्रचंड प्रमाणात समजूतदार पुरुषही त्यांच्या भांडकुदळ, हेकट व विचित्र पत्नींसकट पाहण्यात आले आहेत.
कॉस्ट कित्येकदा नवर्यालाही द्यावी लागते व ती अधिक क्रूर असते(रडून मोकळे होता येणे, social sympathy न मिळणे ह्या कारणाने) हे सांगू इच्छितो.
8 Jan 2012 - 12:43 pm | गवि
ठीक आहे...
स्त्री की पुरुष ?
कोणत्या बाजूने टिकते,तुटते?
असा माझा मुद्दा संदिग्ध आहे असं म्हणता येईल. पण मनोबा,
"लहान सहान" हे लहान सहान नसतं हे मान्य आहे का ?
8 Jan 2012 - 1:10 pm | मन१
"लहान सहान" हे लहान सहान नसतं हे मान्य आहे का ?
हो. नक्कीच मान्य. क्षुल्लक भासणारी कारणे प्रत्यक्षात "उंटावरच्या पाठिवरची शेवटची काडी" ठरतात.
दृष्य परिणाम दिसतो तो नाते तुटताना दिसते तेव्हाच, पण नात्याची जमीन आधीच भुसभुशीत व्हायला सुरुवात कधीच होउन गेलेली असते. मग साधे शिंकणे हे सुद्धा कारण म्हणून पुरते.
अविवाहित, उंटावरून शेळ्या हाकणारा....
9 Jan 2012 - 4:45 am | मराठमोळा
गवि आणि मनोबा,
>>लहान सहान" हे लहान सहान नसतं हे मान्य आहे का ?
मान्य आहे, बर्याचदा असेही असते. पण लहान सहान कारणांवरून देखील वेगळे होणे आजकाल सहज शक्य आहे किंवा जबाबदारी/बंधने नकोशी वाटल्यानेदेखील किंवा वेगवेगळ्या जोडीदाराबरोबर संबंध ठेवायची वृत्ती/सुप्त ईच्छा असल्याने दर दोन वर्षांनी कंपनी बदलण्याप्रमाणे जोडीदार बदलत रहाणे हे ही शक्य आहेच.
12 Jan 2012 - 4:44 pm | किचेन
सहमत. नाहीतर अशा गोष्टी शेवटी माणूस आहे चूक ती होणारच म्हणून सोडून दिल्या जातात..राईचा पर्वत तेव्हा गेला जातो जेव्हा काहीही कारण नसताना आपल्याला त्या व्यक्तीचा विट आलेला असतो.कंटाळा आलेला असतो. त्याच्या सवयींचा,त्याच्या बोलण्याचा ,त्याच्या आवडी निवडींचा...सगळ्याचा.अशा वेळेस आपण तो पूर्व म्हणला कि मी मुद्दाम पश्चिम अस करत राहतो.मुद्दामून त्याला न आवडणाऱ्या गोष्टी करत राहतो आणि घरात रोज एक नवीन वाद जन्माला घालतो.त्याला वाईट वाटल ,राग आला कि आपल्याला बर वाटत.त्याच्या मानाविरुध्ह मुद्दाम वागायचं अस ठरवूनच आपण पुढे जात राहतो..सासू सुना सेरीअल ह्या एकमेकांना त्रास देण्याच्या नवीन नवीन कल्पना सुचवत असतात.
शेवटी स्त्री काय आणि पुरुष काय त्रास दोघांना होत आसतो.पुरुष थोड दुर्लक्ष करतात.पण बायका मात्र बघा माझ्या वाटेला केवढ मोठ्ह दुखः आलाय. म्हणून त्याच त्याच गोष्टी कवटाळून रडत बसतात .नेहमी पुरूषाच वाईट असतात अस नसत.खर तर महिला अधिकार समितीपेक्षा पुरुष अधिकार समिती निर्माण करण्याची जास्त गरज आहे.
आणि काळ हा प्रत्येक गोष्टीचा उपाय असतो.सुरुवातीला उतू जाणार प्रेम नंतर रागात किवा द्वेषात बदलत तसाच राग हा प्रेमात बदलू शकतो.फक्त रात गयी बात गयी एवढ लक्षात ठेवाल पाहिजे.
वेगळ होण हे प्रत्येक वेळी उत्तर होऊ शकत नाही.कारण अनेक वेळा प्रश्न काय आहे हेच माहित नसत.
माझ्याकडे एक साठ वर्षांचे गृहस्त आले होते.२ मुलांची लग्न झाल्यावर दोघ वेगळे राहत होते.मुल परदेशी.हे इथे एकटेच.बायको वारल्यावर ह्यांनी पुनर्विवाहाचा निर्णय घेतला.पण त्यांची एक मुख्य अट अशी होतो ती लग्नाआधी १५ दिवस लिव इन मध्ये राहायचं.मी बोलले ४-५ भेटींमध्ये तुम्हाला त्यांच्या स्वभावाचा अंदाज येईलच. पण ते तयार नव्हते.आणि कारण सांगायलाहि तयार नव्हते.
13 Jan 2012 - 4:40 am | मराठमोळा
किचेनतै,
नवरा-बायको मधे भांडणे ही व्हायचीच.. शेवटी परमेश्वराने प्रत्येकाला वेगळं बनवलं आहे. लग्नानंतर त्यामुळे दोघांमधे नुसतेच प्रेम असून फायदा नाहीच, समजूतदारपणा आणि प्रगल्भताही तेवढीच महत्वाची आहे. त्याग हा करावाच लागतो, पण त स्वता:च्याच सुखासाठी असतो हे विसरलं की द्वेश निर्माण होतो. जोडीदार बदलत राहिल्याने हा प्रश्न निकालात निघेलच असे नाही.
>>माझ्याकडे एक साठ वर्षांचे गृहस्त आले होते
>>पण त्यांची एक मुख्य अट अशी होतो ती लग्नाआधी १५ दिवस लिव इन मध्ये राहायचं.
प्रश्नच संपला. :)
8 Jan 2012 - 1:19 pm | पिंगू
गवि आणि मनोबा दोघांनी दिलेली उदाहरणे प्रत्यक्ष डोळ्यांसमोर बघीतली आहेत.
त्यामुळे बायको निवडताना घाई करण्यापेक्षा थोडा जास्त वेळ घेणे केव्हाही चांगले. निदान स्वभाव आणि इतर ट्युनिंग जमल्यावर लग्नाची पायरी ओलांडणे केव्हाही श्रेयस्कर.
बाकी विभक्त होण्याचा प्रसंग येऊ न देणं, हेच चांगले.
- पिंगू
8 Jan 2012 - 2:18 pm | ज्ञानोबाचे पैजार
त्यामुळे बायको निवडताना घाई करण्यापेक्षा थोडा जास्त वेळ घेणे केव्हाही चांगले.
असहमत,
लग्न म्हणजे एक जुगारच असतो. यशस्वी लग्नाचा फॉर्म्युला कोणीही सांगु शकणार नाही. कोणत्याही कारणाने लग्न मोडु शकते. त्यामुळे गरजे ईतकी माहीती मिळवुन किंवा पोलीसी थाटात शहानिशा करुन केलेली लग्न तितक्याच ठिसुळ पायावर उभी असतात.
त्यातल्या त्यात दोन्ही कडुन दाखवण्यात आलेला थोडाफार समजुतदारपणाच लग्न टीकवण्या साठी उपयुक्त ठरतो.
8 Jan 2012 - 2:39 pm | संपत
१०० %
8 Jan 2012 - 2:52 pm | गणपा
लग्न म्हटलं की तडजोड आलीच, पण ती दोन्ही बाजुने असेल तरच संसार सुखाचा होऊ शकतो.
जुगारा पेक्षा मी लॉटरी म्हनेण, कुणाला कमी सुखाची तर कुणाला छप्परफाड सुखाची लायागचीच तर कुणाचं तिकिट फेल जायचं.
(मनासारखी लॉटरी लागुन सुखी असलेला) - गणा
9 Jan 2012 - 4:32 am | मराठमोळा
>>लग्न म्हटलं की तडजोड आलीच, पण ती दोन्ही बाजुने असेल तरच संसार सुखाचा होऊ शकतो
करेक्ट...
पण आजकाल तडजोड करण्यापेक्षा पटकन वेगळे होण्याला प्राधान्य देण्यात येते, आनी बंधनं नकोच म्हणून लग्नच न करणे हा पर्याय स्वीकारला जातो असे मला वाटते.
8 Jan 2012 - 7:28 pm | नितिन थत्ते
शीर्षक आणि लेखाचा काही संबंध दिसला नाही.
बाकी गविंच्या आणि मनोबांच्या दोघांच्याही प्रतिसादाशी सहमत.
9 Jan 2012 - 2:32 am | मराठमोळा
असं कसं म्हणता थत्ते काका,
लेखातील माझ्या अधोरेखीत केलेल्या वाक्यालाच अनुसरूनच सगळे मुद्दे मांडले आहेत. तरी तुम्हाला तसे वाटत असेल तर पुन्हा माझा मुद्दा स्पष्टपणे मांडतो.
एकपत्नीत्व किंवा एकपतीत्व या संज्ञावरुन लोकांचा विश्वास कमी झाल्याने किंवा गरज न वाटल्याने एकंदरीतच लग्न हा प्रकारच टाळून "लिव ईन" मधे रहाणे म्हणजे जेणेकरून जोडीदार बदलताना कायद्याच्या अडचणी येणार नाहीत आणि जबाबदारीही रहाणार नाही. त्याचप्रमाणे सहजरित्या घटस्फोट घेऊन पुन्हा दुसरा जोडीदार शोधणे. ईथे दुसरा जोडीदार सहज मिळेल आणि घटस्फोटही सहज मिळेल हा विचार कुठेतरी मनात असल्याने घटस्फोटाचा विचार पटकन मनात येणे सहज शक्य होते आणि लग्न टिकवून ठेवण्याची गरज वाटत नाही, किंवा तडजोड केली जात नाही.
माझा मुद्दा हा आहे की लिव ईन रहाणे, किंवा वाढती घटस्फोटांची ही याच कारणामुळे आहे का?
एका स्त्री किंवा पुरुषाबरोबर आयुष्य नाही काढले तरी काय बिघडले, हीच भावना मनात ठेवून पाश्चात्य देशांप्रमाणे लग्न किंवा लिव ईन रहाणे पसंत केले जाते का?
वरील ईतर प्रतिसादांशी सहमत आहेच, परंतु विभक्त होणार्यांच्या संख्येत वाढ होण्यामागे किंवा सतत जोडीदार बदलत रहाण्यामागे "एकपत्नीत्व किंवा एकपतीत्व याची गरज वाटत नाही किंवा विश्वास नाही" हे तर नव्हे?
9 Jan 2012 - 1:22 pm | अप्पा जोगळेकर
एखाद्या व्यक्तीने लग्न केले मग घटस्फोट घेतला मग पुन्हा लग्न केले तरीसुद्धा त्या प्रकाराला एकपत्नीत्व/एकपतीत्व असेच म्हणतात. एकाच वेळी अनेक पुरुष (उदा.- द्रौपदी) अथवा अनेक स्त्रियांशी (उदा. - श्रीकॄष्ण हा देव ) लग्न करणे याला बहुप्त्नीत्व (पॉलिगॅमी) किंवा बहुपतीत्व (पॉलिअॅन्ड्री) असे म्हणतात. या संदर्भाने शीर्षक आणि विषय यांचा संबंध नाही हे थत्तेकाकांचे विधान बरोबर वाटते.
बाकी विवाह,संसार,प्रेमप्रकरण,लिव्ह इन रिलेशन असल्या गोष्टींचा अनुभव नाही. त्यामुळे अधिक भाष्य करणे अयोग्य वाटते.
9 Jan 2012 - 2:43 pm | नगरीनिरंजन
एका जोडीदाराला सोडून दुसर्याशी घरोबा करणे याला "क्रमशः बहुपत्नित्व/बहुपतीत्व" (Serial Polygamy) म्हणतात.
9 Jan 2012 - 1:33 pm | नगरीनिरंजन
मुळात एकपत्नीत्व/एकपतीत्व बाळगणे ही नैसर्गिक ऊर्मी आहे की समाजस्वास्थ्यासाठी कृत्रिमरीत्या मनावर ठसवलेला 'सद्गुण' आहे याचा विचार केला पाहिजे.
पिटर विल्सन या नॄवंशशास्त्रज्ञाच्या मते समाज अस्तित्वात यायच्या आधी स्त्रीपुरुष स्वेच्छेने एकत्र येत आणि स्वेच्छेनेच एकत्र राहात. "Commitments are personal, not formal, institutionalised, or rule governed. Relationships are activated and animated through proximity, and proximity is determined by affection and friendliness ."(संदर्भः The Domestication of Human Species). अपत्यसंगोपनाचा काळही आजसारखा २०+ वर्षे नसून साधारण सात वर्षे असायचा. या सात वर्षांनंतर स्त्री-पुरुष एकत्र राहिले तर स्वेच्छेनेच राहायचे. एकत्र राहण्याचे कोणतेही सामाजिक नियम नव्हते. केव्हमन तत्वाप्रमाणे सेव्हन यिअर इच या संकल्पनेचे मूळ यात आहे का कोण जाणे?
आधुनिक काळात जर स्त्री-पुरुषांना समान हक्क आणि समान महत्वाकांक्षा असतील आणि जोडीदाराशी असलेले नाते त्याच्या आड येत असेल तर त्या आकांक्षांचा बळी देऊन आपल्या जोडीदाराबरोबर राहून लग्न "मेंटेन" करणे अर्थशास्त्राच्या नियमांविरुद्ध आहे.
जेव्हा स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा आणि आकांक्षांचा संकोच होत असे तेव्हाच आयुष्यभर लग्न टिकण्याचे प्रमाण जास्त होते. अजूनही टिकणार्या लग्नांचा विचार करता त्यासाठी एका किंवा दोन्ही जोडीदारांनी बराच त्याग केलेला दिसेल.
त्यामुळे मोनोगॅमीपेक्षा सिरियल पॉलिगॅमी जास्त नैसर्गिक आहे असे म्हणायला वाव आहे. अर्थात आयुष्यभर एकत्र राहूनही एकमेकांवरचे प्रेम कमी न होणार्या दैवी जोड्या किंवा केवळ सवय न मोडण्याचा आळस म्हणून काही बदल न करणारे लोक अल्पसंख्य असतात असे गृहीत धरले आहे.
9 Jan 2012 - 2:41 pm | मन१
सिरियल पॉलिगॅमी ही अचूक संज्ञा अवडली.
10 Jan 2012 - 9:14 am | धनंजय
त्यातल्या त्यात मी "सीरियल मोनॉगमी" हा शब्दप्रयोग ऐकलेला आहे. म्हणजे कुठल्याही काळी एकास-एक अशी जोडी असते, आणि अशा एकास-एक (मोनो) संबंधांची (गॅमींची) मालिका (सीरीज) असते. = सीरियल मोनॉगमी. हा शब्दप्रयोग कसा वाटतो?
"सीरियल पॉलिगमी" म्हटले तर एका-वेळी-एकास-एक हा अर्थ तितकासा स्पष्ट होत नाही.
10 Jan 2012 - 9:46 am | मन१
हे सुद्धा भारिच.
10 Jan 2012 - 11:09 am | नगरीनिरंजन
सीरियल मोनोगॅमी हे जास्त बरोबर वाटते आणि ते आता जास्त प्रचलित आहे असे वाटते.
10 Jan 2012 - 4:14 am | मराठमोळा
ननि,
प्रतिसाद आवडला..
>>मुळात एकपत्नीत्व/एकपतीत्व बाळगणे ही नैसर्गिक ऊर्मी आहे की समाजस्वास्थ्यासाठी कृत्रिमरीत्या मनावर ठसवलेला 'सद्गुण' आहे याचा विचार केला पाहिजे.
१००% सहमत. माझ्या मते एकपत्नीत्व/एकपतीत्व संकल्पना समाजस्वास्थ्यासाठीच अंमलात आणली गेली असावी. कारण पॉलीगॅमीची उदाहरणे आपण ईतिहासामधे बरीच पाहिली आहेत आणि आजकाल तर सुळसुळाट आहे.एका चर्चेत कुणीतरी "लग्न आधी होतच नव्हते, ते स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी सुरु झाले" असे बोलल्याचे आठवते आहे.
आपण आजचा विचार करुया. आज पुन्हा जर लग्न ही संकल्पना मोडीत काढली आणि स्वेच्छेने एकत्र रहाण्याची/विभक्त होण्याची परवानगी दिली तर त्याचे काय परिणाम होतील. किंवा आपण स्वतः आपल्या आयुष्यात हे मान्य करु का? स्त्रिया किती प्रमाणात सुरक्षित राहतील? सेक्स हंगर संपेल का? मुलांचे संगोपन व्यवस्थित होईल का?
कायद्याने जर एक लग्न करण्याची बंदी उठवली तर किती लोकं एका वेळी एकापेक्षा जास्त बायका/नवरे करतील? तो स्वैराचार असेल का?
10 Jan 2012 - 2:01 pm | नितिन थत्ते
>>आपण आजचा विचार करुया. आज पुन्हा जर लग्न ही संकल्पना मोडीत काढली आणि स्वेच्छेने एकत्र रहाण्याची/विभक्त होण्याची परवानगी दिली तर त्याचे काय परिणाम होतील. किंवा आपण स्वतः आपल्या आयुष्यात हे मान्य करु का? स्त्रिया किती प्रमाणात सुरक्षित राहतील? सेक्स हंगर संपेल का? मुलांचे संगोपन व्यवस्थित होईल का?
प्रॉपर्टी आणि इनहेरिटन्स हे लग्नसंस्थेचे मुख्य ड्रायव्हर्स आहेत हे विसरून चालणार नाही.
9 Jan 2012 - 10:57 am | चिरोटा
लेख विचार करण्यासारखा. शीर्षक गोंधळ उडवणारे आहे.मोनोगॅमी नाही त्याअर्थी पॉलिगॅमी आहे म्हणजे एकाहून जास्त पण लग्न न मोडता असे वाटले होते.
अवांतर- लगीन न मोडता असे प्रकार करणार्यांची वाढती संख्या हा ही एक चिंतेचा विषय झाला आहे म्हणतात.
(गोंधळलेला) चिरोटा
9 Jan 2012 - 2:26 pm | सुहास..
राक्या,
येव्हढा विचार करुन जगत नाय बसत ब्वा मी !! म्या हाय , ती हाय ..खेळ संपला ;)
9 Jan 2012 - 2:28 pm | गवि
आँ??
9 Jan 2012 - 2:38 pm | विनायक प्रभू
म्या हाय ती हाय,
खेळ सुरु.
9 Jan 2012 - 9:30 pm | Nile
इथे प्रश्न "म्या हाय, ती व्हती, पण आता ही हाय. तर मग खेळाचं काय?" असा आहे. त्यावर लिहा, अवांतर नको.
10 Jan 2012 - 1:36 am | मोदक
>>>>"म्या हाय, ती व्हती, पण आता ही हाय. तर मग खेळाचं काय?"
म्हन्जे आता म्या हाय, ही पण हाय... खेळ (पुन्हा) सुरू.. ;-)
मोदक.
10 Jan 2012 - 4:19 am | मराठमोळा
खेळ हा सुरुच राहणार. कलाकार बदलत राहिले तरी. ;)
पण तो भातुकलीचा करायचा की आयुष्याचा हा पण विचार केला पाहिजे.
10 Jan 2012 - 10:03 am | सुहास..
पण तो भातुकलीचा करायचा की आयुष्याचा हा पण विचार केला पाहिजे.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
आपला मुळातभोळा ;)
10 Jan 2012 - 10:52 am | विनायक प्रभू
अफकोर्स इट इज अ मिथ.
काही जण @ अॅक्च्युअल. काही जण मनातल्या मनात.
12 Jan 2012 - 1:24 am | अर्धवटराव
लग्न मोडणे, लिव्ह इन रिलेशन फॉर्मली अॅक्सेप्ट होणे, कायद्याने नसेना-पण समाजमान्य पॉलीगॅमी... थोडक्यात काय, तर आयुष्यभर एकाच जोडीदारासोबत लग्न टिकवुन ठेवण्याची पद्धत नजीक भविष्यात निकालात निघेल. किंबहुना, ही समाजाची एक जास्त परिपक्व अवस्था म्हणुन स्विकारली जाईल... पण असं होताना अपत्यपालन कसं हाताळल्या जाईल हाच काय तो गुंतागुंतीचा प्रश्न उरतो. अपत्यपालन एक अत्यंत आनंददायी आणि तेव्हढीच आवश्यक जवाबदारी म्हणुन बघितलं तर जुन्या काळाप्रमाणे गुरुकुल पद्धतीची कुटुंबव्यवस्थेला पॅरॅलल आणि काँप्लिमेंट्री सिस्टीम तयार होईल. हे सगळं ट्रांझीशन मात्र फार कष्टप्रद असणार हे नक्की.
अर्धवटराव
12 Jan 2012 - 9:38 am | मराठमोळा
>>अपत्यपालन एक अत्यंत आनंददायी आणि तेव्हढीच आवश्यक जवाबदारी म्हणुन बघितलं तर जुन्या काळाप्रमाणे गुरुकुल पद्धतीची कुटुंबव्यवस्थेला पॅरॅलल आणि काँप्लिमेंट्री सिस्टीम तयार होईल.
नव्या 'ट्रेंड' प्रमाणे बरीचशी 'लिव ईन' जोडपी अपत्ये होऊ देत नाहीत (हे माझे वैयक्तीक निरिक्षण आहे). त्यामुळे कदाचित हाही प्रश्न निकालात निघेल. (बरंय.. लोकसंख्येच्या प्रश्नाला पुर्णविराम लागेल ;) ) काका-काकू, मामा-मामी, आज्जी-आजोबा, आत्या, मेहुणे, ई. नाती देखील विरून जातील कदाचित.
असो,
"मोनोगॅमी इज अ मिथ" असाच निष्कर्ष निघतोय आतापर्यंतच्या चर्चेमधून.
12 Jan 2012 - 9:59 pm | शिल्पा ब
मग तुच आता मोनोगामी मिथ नै हे सिद्ध करायला मोनोगामस रहा अन भारतीय जनतेला आदर्श घालुन दे. काय मिपाकरांनो? मी बोलते ती बात सच्ची का नाय?
12 Jan 2012 - 10:59 pm | Nile
हा धागा जर काही वर्षांआधी काढला असता तर "मिथ नै" मोहिमेत सहभाग नोंदवण्याचा विचार केला असता...
13 Jan 2012 - 4:30 am | मराठमोळा
शिल्पातै,
मोनोगॅमस रहायचं की पॉलीगॅमस हा वैयक्तीक प्रश्न आहे. आणि सामान्य माणसांचे आदर्श घेतले जात नाहीत. आदर्श फक्त सेलीब्रेटी/मोठ्या/धनाढ्य/मान्यवर लोकांनी घालायचे असतात. ;) सामान्य माणसांनी सामान्य लोकांप्रमाणेच रहायचं :)
12 Jan 2012 - 11:01 pm | अर्धवटराव
>>नव्या 'ट्रेंड' प्रमाणे बरीचशी 'लिव ईन' जोडपी अपत्ये होऊ देत नाहीत ...त्यामुळे कदाचित हाही प्रश्न निकालात निघेल.
--- मला वाटतं, बहुतेक उलटा क्रम असेल.. म्हणजे अपत्य संगोपनाची पॅरॅलल सिस्टीम पहिले डेव्हलप होईल. जन्मदात्यांच्या स्वत: ला वेळ देण्याच्या आवश्यकतेतुन असं होईल. एकदा हि सिस्टीम तयार झाली कि लिव्ह इन रिलेशनवर मॉरल बर्डन राहाणार नाहि व लिव्ह इन जास्त प्रमाणात समाजात एक्सॅप्ट होईल. कसहि का होईना पण मोनोगॅमीचा "मीथ प्रवास" होण्याची शक्यता फार जास्त आहे.
अर्धवटराव