'पृथ्वी वाचवा' ही घोषणा बर्याच लोकांना विनोदी वाटते. मलाही वाटते. शिवाय 'पृथ्वी' वाचवण्यासाठी लोकांना सुचवले जाणारे उपायही बरेच गमतीदार आहेत. उदाहरणार्थ, प्लॅस्टिकच्या पिशव्या न वापरणे, घरातले दिवे विनाकारण लावून न ठेवणे किंवा घरात पाणी जपून वापरणे वगैरे. काहीतरी बिघडलंय आणि हे असे उपाय केल्याने बराच फरक पडेल अशी समजूत असलेले भाबडे लोक ते उपाय प्रामाणिकपणे करतही असतील. या 'पृथ्वी वाचवा' वरून एक व्हिडिओ पाहिल्याचे आठवले, तो इथे डकवण्याचा मोह आवरत नाही.
पृथ्वी वाचवायची गरज असो वा नसो, मानवाने स्वतःला वाचवण्याची गरज आहे यावर बर्याच लोकांचे आजकाल एकमत झालेले दिसते. मानवजात नष्ट व्हायचा धोका आहे वगैरे बरेच शास्त्रज्ञही मासिकांमध्ये खळबळजनक विधाने करत असतात (खळबळ होत नाही ही गोष्ट वेगळी). पर्यावरणवाद्यांचा आणि तंत्रभीतांचा (Luddites) तर हा एक आवडीचा विषय आहे. गेल्या दोन-अडीचशे वर्षांत औद्योगिकीकरणामुळे झालेला पर्यावरणाचा र्हास, तपमानवाढ, लोकसंख्येचा विस्फोट, अन्न-पाण्याचे दुर्भिक्ष्य, आण्विक युद्धे आणि अगदी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात बदल, सौर वादळे इत्यादीपर्यंत अनेक कारणे दिली जातात. यातली सौर वादळे, उल्कापात वगैरे नैसर्गिक कारणे सोडली तर बाकीची सगळी मानवनिर्मित आहेत असे म्हटले जाते आणि हा तंत्रज्ञानाने साधलेल्या प्रगतीवर मोठा आरोप आहे. एकीकडे तंत्रज्ञानातील नवनवीन शोधांमुळे मानवी आयुष्य खूपच सुखकर झाले आहे, प्रदीर्घ झाले आहे असे विविध आकडेवारीने सांगितले जात असताना दुसरीकडे अमुक एक टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, अमुक इतके लोक उपाशी आहेत, अमुक अब्ज लोकांना स्वच्छ पाणी मिळत नाही अशीही आकडेवारी कानावर येत असते. एकीकडे सगळ्यांना शिक्षण, कामधंदा वगैरे देऊन सगळ्या जगातल्या लोकांचे जीवनमान सारखे करण्याची धडपड आणि दुसरीकडे मानवाच्या स्वच्छंद नैसर्गिक जीवनावर घाला येत असल्याची बोंब. एकीकडे लोकसंख्या भयानक वाढतेय आणि लोकांना उपाशी मरावं लागेल असा आकांत तर दुसरीकडे लोकसंख्येच्या वाढीचे आलेख काढून ती कशी स्थिर होईल हे सिद्ध करण्याची धडपड. हे सगळं पाहून नक्की काय चाललंय हे कळेनासं होतं.
माझा स्वतःचा स्वभाव अत्यंत आळशी असल्याने तंत्रज्ञानामुळे आयुष्य सुकर झाले आणि प्रचंड प्रमाणावर श्रमबचत झाली वगैरे गप्पांवर विश्वास नाही. उलट जितकी तंत्रज्ञानात प्रगती होईल तितकी भोगस्पर्धा आणि त्यामुळे कामाचे तास वाढलेलेच दिसतात. तरीही होताहोईतो तटस्थ राहून मी उत्तरे शोधण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला.
वर्तमानात खरोखर आपण म्हणतो तसा नैसर्गिक साधनसंपत्तीचा भरमसाठ वापर होतोय की नाही आणि खरंच नैसर्गिक स्त्रोत संपत आले आहेत का हे शोधताना मला Global Footprint Network बद्दल माहिती मिळाली. ही संघटना पर्यावरणाचं अकाऊंटिंग करून मानवी उपभोगाचा नैसर्गिक स्त्रोतांवर कितपत परिणाम होतो याची आकडेवारी काढते. सप्टेंबर २०११ मध्ये त्यांनी "Earth Overshoot Day" 'साजरा' केला. म्हणजे २०११ या एका वर्षात जितकी साधनसंपत्ती तयार झाली असती ती सप्टेंबर महिन्यातच वापरली गेली हे जाहीर केलं. त्यांच्या ब्लॉगवर तो लेख वाचता येईल.आता हे पाहून कोणालाही अशी शंका येईल की माणसाच्या उद्योगांचा निसर्गावर परिणाम होतोय हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले की काय? तशी ती मलाही आली आहे, पण अजून तसे म्हणण्यासाठी कोणाकडून मान्यता मिळायला पाहिजे ते मला महित नाही. त्यांच्या संस्थळावर त्यांनी लोकसंख्येचे अंदाज दिले आहेत. विशेष काहीही घडले नाही आणि जसे चालले आहे तसेच चालत राहिले तर २०५० साली लोकसंख्या ९ अब्ज असेल असा अंदाज त्यांनी बांधला आहे.
त्याचदरम्यान UNO च्या Food and Agriculture Organization (FAO) चा एक अहवाल प्रसिद्ध झाला. त्यातही २०५० साली ९ अब्ज लोकसंख्या असेल असा अंदाज केला गेला आहे. या ९ अब्ज लोकसंख्येसाठी सध्याच्या अन्नधान्य उत्पादनात ७०% वाढ झाली पाहिजे, त्यातच उपलब्ध शेतजमिनीपैकी २५% जमीन निकामी झाली आहे, ८% अर्धवट निकामी आणि १०% सुधारत आहे असे आव्हानात्मक प्रश्न उभे केले आहेत. अर्थातच नव्या तंत्रज्ञानामुळे आणि सुधारित पद्धतींमुळे आपण हे आव्हान पेलू शकू असा विश्वासही व्यक्त केलाच आहे.
मग हे नवे तंत्रज्ञान म्हणजे काय ते शोधणे आले. उत्तर थोडेसे माहितीतलेच होते. पाण्याचा अतिकिफायतशीर वापर आणि जेनेटिक्स. जेनेटिक्समधील वाईड क्रॉसिंग, सेल/टिश्यू/प्रोटोप्लास्ट कल्चर आणि सोमॅटिक सेल हायब्रिडायझेशन अशा तंत्रांची भारदस्त नावं वाचता वाचता जेनेटिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी आणि रोबोटिक्स या तीन क्षेत्रात प्रचंड वेगाने होत असलेल्या प्रगतीबद्दल कुणकुण लागली. (http://www.foresight.org/). Molecular Manufacturing आणि cell computing वगैरे भन्नाट विषय पाहून हतबुद्ध झालो आणि तशाच अवस्थेत Singularity या नवीनच संकल्पनेशी ओळख झाली. सिंग्युलॅरिटी समिटच्या संस्थळावर महिती तंत्रज्ञानातल्या चढत्या भाजणीत होणार्या वाढीबद्दल माहिती देणारी रे कर्झ्विल यांची एक चित्रफीत पाहण्यात आली. रे कर्झ्विल यांच्या मते या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ही सिंग्युलॅरिटी २०२९ सालापर्यंत गाठता येईल. त्यानंतर काय होईल हे सांगणे अवघड असले तरी माणसाने आपल्यापेक्षा कित्येकपटींनी बुद्धिमान असे यंत्र तयार केले असेल एवढे नक्की. असे हे यंत्र स्वतःपेक्षाही जास्त बुद्धिमान यंत्रं तयार करू शकेल आणि 'बुद्धिमत्तेचा स्फोट' होईल. या बुद्धिमत्तेच्या स्फोटापुढे माणसाचे सध्याचे प्रश्न अगदीच किरकोळ असतीलच शिवाय खुद्द माणसाची बुद्धिमत्ताही खूपच किरकोळ असेल. आता यावरही दुसर्याच दिशेने विचार करणारे महाभाग आहेतच. सन मायक्रोसिस्टीम्सचे संस्थापक आणि प्रमुख संशोधक, जावा या प्रोग्रॅमिंग लँग्वेजच्या रचनेचे तपशील लिहीणारे श्री. बिल जॉय यांनी लिहीलेला एक लेख (Why The Future Does Not Need Us) या बाबतीत अतिशय उद्बोधक ठरावा.
हे सगळं पाहून डोकं गरगरायला लागलं आणि "Man moves in mysterious ways his problems to resolve." यातल्या पहिल्या भागाबद्दल खात्री पटली.
पण दुसर्या भागाचं काय? तुम्हाला काय वाटतं? माणसाचे प्रश्न सुटतील? की आणखी वाढतील? वाढणार असतील तर उपाय काय?
प्रतिक्रिया
21 Dec 2011 - 1:52 pm | परिकथेतील राजकुमार
झकास हो ननि.
एक वेगळाच विषय आणि त्यावरची रोचक माहिती इथे दिल्याबद्दल धन्यवाद. तुमची मुद्दे मांडण्याची पद्धत देखील आवडली.
तुम्ही ज्या लेखांचे अथवा बातम्यांचे दूवे दिली आहेत, त्यातला आशय अजून थोडा विस्ताराने दिला असतात तर अजून मजा आली असती.
21 Dec 2011 - 3:17 pm | नगरीनिरंजन
जरा जास्त विस्ताराने सारांश द्यायला पाहिजे होता हे खरंय. लेख बदलण्यापेक्षा इथेच जास्तीची माहिती द्यायचा प्रयत्न करतो.
फोरसाईटच्या संस्थळावर नॅनोटेक्नॉलॉजी क्षेत्रातल्या नवनवीन घडामोडींची आणि विचारधारांची माहिती मिळते. तिथे मला मॉलेक्युलर मॅन्युफॅक्चरिंगबद्दल माहिती मिळाली. सध्याच्या वस्तूत्पादन पद्धतींमध्ये सामान्यतः आपण पदार्थाचा एक तुकडा घेऊन त्यातून हवी ती वस्तू कोरून किंवा ठोकून आकार देऊन किंवा साच्यात ओतून बनवतो. यात बराचसा कच्चा माल वाया जातो आणि वस्तूही अचूक मापात बनत नाही. त्यासाठी पदार्थाचा एक-एक रेणू किंवा अणू जोडून वस्तू तयार करण्याची कल्पना मांडण्यात आली. यालाच मॉलेक्युलर मॅन्युफॅक्चरिंग म्हणतात. यासाठी अर्थातच अतिशय सूक्ष्म आकाराची यंत्रणा लागते. सध्या हे तंत्र वापरून एक कॉम्प्युटर बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ बघावा. सिवाय मॉलेक्युलर कॉम्पुटिंग म्हणजे पदर्थाच्या रेणूंना ट्रान्झिस्टर आणि लॉजिक गेट सारखे वापरून कॉम्प्युटरचे छोटे छोटे प्रोसेसर बनवायचे असाही प्रयत्न आहे. ते यशस्वी झाल्यास खिशात ठेवता येईल असा सुपरकॉम्प्युटर बनवता येईल.
त्याच संस्थळावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) क्षेत्रातल्या प्रयोगांचीही माहिती मिळू शकेल.
जेनेटिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी , रोबोटिक्स आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या प्रगतीचा वाढत जाणारा वेग पाहून सिंग्युलॅरिटी ही कल्पना पुढे आली. सिंग्युलॅरिटी म्हणजे अशी अवस्था जिथे माणसाचे आयुष्य ज्या कल्पनांवर आधारित आहे त्या कल्पना पूर्णपणे बदलून जातील, आपली सध्याची जीवनपद्धती तशीच चालू राहणे अशक्य होऊन जाईल आणि आपल्या सध्याच्या भविष्याच्या कल्पना पूर्णतः गैरलागू होतील.
वरती लेखात म्हटल्याप्रमाणे माणसाने स्वतःपेक्षा बुद्धिमान यंत्र तयार केले असेल. असे यंत्र माणसापेक्षा हुशार असल्याने अर्थातच स्वतःपेक्षा हुशार यंत्र तयार करू शकत असेल आणि करेल. अशी साखळी तयार होऊन माणसापेक्षा अगणित पटींनी बुद्धिमान असलेली यंत्रे तयार होतील. या यंत्रांच्या सहाय्याने माणूस आपले कोणतेही प्रश्न लीलया सोडवू शकेल.
सिंग्युलॅरिटीची कल्पना काही शास्त्रज्ञांसाठी खूपच उत्साहवर्धक आहे आणि ती लवकरात लवकर गाठावी असे पयत्न आहेत. शेतीमध्ये भरघोस उत्पादन देणार्या वनस्पतींची जनुके तयार करता येतील, हवेतून थेट नायट्रोजन घेता येईल असे जनुकीय बदलही घडवून आणता येतील. अशा बदलांमुळे जमीन कशी आहे त्याने पिकावर परिणाम होणार नाही किंबहुना पिकांसाठी जमिनीची आवश्यकताच उरणार नाही. फळांच्या नवनव्या जाती सहज निर्माण करता येतील इतकेच काय पूर्णपणे नवीच फळेही तयार होतील.
प्राण्यांमध्ये विशिष्ट प्रकारचे मांस असणारी गुरे, डुकरे निर्माण करता येतील आणि त्यासाठी जिवंत प्राणी असण्याची गरज नाही. डोके नसलेले प्राणी तयार केले जातील. अर्थात कोणाला भेजाफ्राय खायचा असेल तर त्यांच्यासाठी डोके असलेले काही प्राणी असतीलच म्हणा. आपण ज्या प्राण्यांच्या नष्ट होण्याबद्दल काळजी करतो, ते आणि आधीच नष्ट झालेले प्राणी पुन्हा निर्माण करता येतील.
शिवाय सर्व प्रकारचा कचरा रिसायकल करता येईल.
अशा रीतीने या पृथ्वीवर अन्नाची कधीही ददात राहणार नाही.
मानवी अवयवांची शेती करून निकामी झालेले अवयव बदलता आल्याने माणूस प्रदीर्घ आयुष्य जगेल. किंबहुना मेंदू डाऊनलोड करता आल्याने क्लोनिंगच्या सहाय्याने माणूस अमर होऊ शकेल किंवा म्हातारपणासाठी जबाबदार असलेला जनुक काढून टाकल्याने माणूस म्हातारा होणारच नाही.
अर्थात या सगळ्यात धोका आहेच. या यंत्रांपुढे माणूस दुय्यम ठरून अनावश्यक ठरण्याचाही धोका आहेच. त्याबद्द्ल सखोल उहापोह बिल जॉय यांच्या लेखात आहे. नॅनोटेक्नॉलॉजीतल्या धोक्या बाबत Engines of Destruction हे E. Drexler च्या "Engines of Creation" या पुस्तकातले प्रकरण वाचण्यासारखे आहे.
21 Dec 2011 - 4:50 pm | परिकथेतील राजकुमार
खूप खूप धन्यवाद ननि :)
21 Dec 2011 - 3:17 pm | गणपा
वेगळ्या विषयाला हात घातलाय.
लेख उत्तम झाला आहे. एकदम मुद्देसुद आणि योग्य ठिकाणी पेरलेल्या दुव्यांमुळे वाचनिय.
धन्यवाद.
21 Dec 2011 - 3:56 pm | मोहनराव
उत्तम माहीतीपुर्ण लेख. तुम्ही दिलेल्या लिंक्स वाचतोय. खुप नविन माहिती मिळतेय. धन्यवाद.
21 Dec 2011 - 4:32 pm | साबु
वरील दिलेल्या चित्रपटाप्रमाणे ..माणुस विरुद्ध मशीन असे होइल काय?
21 Dec 2011 - 6:53 pm | नगरीनिरंजन
ही यंत्रं बुद्धिमान असली तरी आणि स्वतःच्या प्रति़कृती बनवत असली तरी त्यांच्या आज्ञावलीच्या प्रतीत फरक पडणार नाही याची काळजी घेतली गेली असेल. त्यामुळे विचित्र वागणारी यंत्रं तयार होणार नाहीत.
परंतु निर्णयक्षमता आणि अनुभवांवरून शिकण्याची क्षमता या यंत्रांकडे असेल आणि अशी यंत्रे माणसाच्या सतत सहवासात असतील तर माणसाच्या वागणुकीवरून त्यांना बर्याच नको त्या गोष्टी कळण्याची शक्यता आहे. तरीही 'स्व'ची जाणीव त्यांना नसेल तर स्वतःचा फायदा वगैरे त्यांना कळणार नाही. हे सगळं अर्थातच कृत्रिम बुद्धिमत्ता कितपत नियंत्रित आहे त्यावर आहे.
दुसरी एक शक्यता वर्तवली गेलेली आहे ती ही की माणूस हळूहळू या यंत्रांवर इतका विसंबून राहू लागेल की स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता गमावून बसेल आणि आपोआप नकळत सगळे नियंत्रण यंत्रांकडे जाईल आणि आपण गुलाम झालोय हे माणसाच्या लक्षातही येणार नाही.
21 Dec 2011 - 10:36 pm | अन्या दातार
आज एक्स्पर्ट सिस्टम्स वर इतका रिसर्च चालला आहे की विचारु नका. कुठलीही गोष्ट घ्या. ती मशिनने स्वतःहून केली पाहिजे असाच सर्वांचा अट्टाहास असतो. इतकी High End मशिन्स जर काम करु लागली तर पुढे इंजिनीअर म्हणून बाहेर पडणार्या नव्या पिढीला नेमके काय काम असेल हेच कळत नाही. कारण प्रत्येक बाबतीत मशिन्सच निर्णय घेत राहणार व त्यानुसार वागत राहणार.
सर्जरीमध्ये सुद्धा हाच प्रकार सध्या रुढ होत आहे. मानवी कौशल्ये किती दुर्मीळ होतील याचा आपण फक्त अंदाजच करावा.
फार लांब कशाला जा? मोबाईल आल्यापासून किती नंबर आपल्या लक्षात राहतात? तितके नंबर्स आपल्या स्मृतीतून गेल्यानंतर 'वाचलेली' आपल्या मेंदूची स्मरणशक्ती आपण इतरत्र कुठेतरी वापरली का?
22 Dec 2011 - 1:30 am | अर्धवटराव
>>...'वाचलेली' आपल्या मेंदूची स्मरणशक्ती आपण इतरत्र कुठेतरी वापरली का?
-- नाहि राव. आणि हा विचारच केला नहि मुळी.
अर्धवटराव
22 Dec 2011 - 4:30 am | शिल्पा ब
भलतंच टेक्नॉलॉजिकल काम चाललंय जगात. असे लेख आल्याने काही समजो नै समजो किमान माहीतीतरी मिळते.
@ अन्या...यंत्रच सगळं करणार असतील तरी ते करवुन घ्यायला माणुस नावाचा मुकादम लागेलंच ना!!
ते स्मरणशक्तीबाबत अगदी % ते % १०० %.
22 Dec 2011 - 11:22 am | अन्या दातार
तो सुद्धा एआय (आर्टीफिशिअल इंटेलिजन्स) मधला कच्चा दुवा म्हणून बघितले जाते. अजुन काही वर्षांनी साधारण फॅक्टरीतले काम कसे चालेल याचे एक उदाहरण देतो. त्यावरुन मला नक्की काय म्हणायचेय याची प्रचिती येईल.
फॅक्टरीत एकाच माणसाने (मॅनेजर) रोजचा प्रॉडक्शन प्लॅन संगणकाद्वारे द्यायचा. मशिन्स त्याप्रमाणे काम करायला सुरु करतील. तयार झालेले उत्पादन गुणवत्तापूर्ण आहे का याच्या तपासणीसाठीही मशिन्स उपलब्ध आहेत. त्यावरच गुणवता तपासणीचे काम होईल. यापैकी अनेक गोष्टी आजही काही सूतगिरण्यांमध्ये बघायला मिळतात. तिथे मजूर नावाचा प्रकार अस्तित्वातच नाहीये.
गेलाबाजार कच्चामाल इकडून तिकडे वाहून नेण्यासाठी माणसाची गरज लागेल; तीसुद्धा फॅक्टरीबाहेर. फॅक्टरीच्या आत माल वाहून नेण्यासाठी स्वयंचलित वाहने (एजीव्ही) उपलब्ध आहेत.
एकंदर फक्त हातावर मोजण्याइतके लोक संपूर्ण फॅक्टरी चालवू शकतील.
22 Dec 2011 - 12:55 pm | शिल्पा ब
अहो हो!! पण असं कीती देशात होतं? म्हणजे जपान, जर्मनी अशा ठीकाणी शक्य आहे पण अमेरीका, भारत, चीन वगैरे मोठी लोकसंख्या असलेल्या ठीकाणी जमायचं नाही. उत्पादन करुन लोकांना काम नसेल तर पैसा नाही तर मग कोण घेणार? नै का? म्हणजे मला काही समजत नाही पण एक शंका.
22 Dec 2011 - 3:47 pm | नगरीनिरंजन
एक कारखाना चालवायला एक-दोन माणसे लागणे हे सध्याच विकसित देशांमध्ये होत आहे. सिंग्युलॅरिटीनंतर कारखानेच काय पब्लिक ट्रान्सपोर्ट पासून फास्ट फूड जॉईंटपर्यंत सगळे यंत्रंच चालवणार.
हा तुमचा प्रश्न रास्त आहे पण मला सांगा सध्याच्या सुखवस्तु (affluent) लोकांमधले किती लोक कारखान्यात कामगार म्हणून काम करतात? ०%. कामगारांच्या क्रयशक्तीवर अर्थव्यवस्था चालत नाहीत. म्हणजेच केवळ कामगारांची श्रमशक्ती सध्या आवश्यक आहे म्हणून ते अस्तित्वात आहेत आणि कारखान्यात काम करत आहेत. सिंग्युलॅरिटीनंतर जर बौद्धिक काम करण्याची कुवत नसेल तर तो माणूस पूर्णतः निरुपयोगी ठरणार आहे. हे कटू असले तरी तर्कसुष्ट आहे.
शिवाय सध्याच्या बुद्धिजीवी वर्गापैकीही किती लोक स्वतःची उपयुक्तता टिकवू शकतील ही एक शंकाच आहे.
कोणत्याही तंत्रज्ञानाचे आगमन होताना ते कसे 'सगळ्यांच्या सुखासाठी' आहे असे अगदी पटवून सांगितले जाते, पण प्रत्यक्षात इतकी अमर्याद शक्ती कोणीही सामान्य माणसासाठी फुकट वापरणार नाही. सिंग्युलॅरिटीनंतर यंत्र डिझाईन करणारे डिझाईनर आणि त्या यंत्रांचे मालकतरी टिकतील की नाही अशी शंका असताना, अगदीच मेंढरांसारख्या असलेल्या सध्याच्या गरीब जनतेचा कोण विचार करील? तेही भारत आणि चीनमधल्या? अर्थात निरुपयोगी लोकांना लगेच मारून टाकतील असे नाही. तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या समप्रमाणात समाजातली गरिबी वाढत जाते.
माझ्या वरच्या प्रतिसादात मी "Engines of Destruction"चा दुवा दिला आहे ते वाचले तर तुम्हाला कल्पना येईल.
23 Dec 2011 - 10:38 pm | पैसा
लेख प्रचंड माहिती आणि भीती देणारा आहे. या सगळ्या यांत्रिकीकरणाची खूप भीती वाटते. पण असं कृत्रिमरीत्या वाढवलेलं आयुष्य मला तरी आवडायचं नाही. माझी एक्सपायरी डेट २०५० च्या बरीच अलिकडे असलेली मला आवडेल!
27 Dec 2011 - 10:42 am | नगरीनिरंजन
अगदी अगदी. बहुतेक लोकांना असेच वाटेल अशी आशा आहे.
"I don't think the time is quite right, but it's close. I'm afraid, unfortunately, that I'm in the last generation to die."
- Gerald Sussman.
18 Jul 2012 - 11:30 am | चित्रगुप्त
वाचनीय लेखाची लिंक मिळाली. धन्यवाद.
सावकाशीने वाचणार आहे.
18 Jul 2012 - 2:36 pm | रणजित चितळे
कधी कधी चांगल्या चर्चा हूकतात तसे ह्या बाबतीत झाले. बापरे किती छान विषय. प्रतिसाद देतो लवकरच.