सटायर-रायटर्स वृत्तसंस्थेचा अलिकडील एका लेख अस्वस्थ करणारा आहे. लेखातील निदान बरोबर असेल, तर मिपाची विडंबिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे असे दिसते.
{([मूळ लेखा])}चा दुवा येथे देतो. व थोडक्यात त्यातील मुद्दे मांडतो.
http://www.misalpav.com/node/20076
कमीकमी होणारे स्तंभन, व हाताबाहेर जाणारी हातभट्टी ह्यांमुळे वाचकाच्या विडंबिक परिस्थितीवर ताण आहेतच. (गेल्या वर्षांत अनेकदा इंटरेस्ट वाढूनही उत्पादनाचा दर्जा सुधारण्याची लक्षणे नाहीत). ह्या कारणांमुळे तसेच विशेषतः वरिजिनल साहित्याची मागणी कोसळल्यामुळे मुळे मिपावरती कथा व कवितांमधे गुंतवणूक करणारे लेखक-कवी वेगाने गुंतवणूक कमी करीत आहेत. ह्यामुळे विडंबनावर ताण येवून ते खाली जात आहे. (गेल्या चार महिन्यात १६ % अधोगती).
आपले करंटे क्रिएटिव्ह डेफिसिट, अकौंटिंगच्या ह्या वर्षाच्या (एप्रिल २०११ - मार्च २०१२), दुसर्या तिमाहीत, पहिल्या तिमहीच्या तिप्पटीने वाढले (सुमारे १४ यू. आर. एन. एस.). सर्व वर्षभरात ते सुमारे ५४ यू. आर. एन. एस. होईल असा अंदाज आहे.
लेखांत म्हटले आहे की दर्जाची पिछेहाट थांबवण्यात सर्व लेखकांस 'इकडे आड, तिकडे विहीर' अशा परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. एका टोकास काहीच विडंबन न केल्यास मिपावर काहीच लिहिले जाणार नाही. दुसर्या टोकास सरधोपट विडंबने केली तरी ती स्वस्त होत जातील. आपल्याकडे सध्या सुमारे दर शब्दास पाच पाणचट प्रतिशब्दांची चलनी मुळामुठाजळी आहे खरी, पण करंटे क्रिएटिव्ह डेफिसिट व नजीकच्या काळांत इम्मॅच्युअर होणार्या मागणीची फेड, ह्यांत जी रक्कम खर्ची पडेल त्यानंतर जेमतेम दिवसाला वीतभर विडंबन इतकीच चलनाचा भैरोबानाला शिल्लक राहील.
-उदाहरणार्थ (१)-
आक्रमकपणे परकीय बदचलन विकत घेण्याच्या प्रयत्नात बुधवाराच्या बाजारामधील चलन कमी होईल, त्याचे परिणाम बायकांच्या गंगावनांवर व त्यानंतर सर्वच व्यवहारांत (कुंटिणींना कपडे मिळणे इ.) दिसू लागतील.
तेव्हा ह्यातून सर्व दलालांस एक मार्ग सुचवला आहे तो बायकांचे तोकडे कपडे कमी करण्याची परवानगी देणे, हा. तो कितपत परिणामकारक असेल, ह्याविषयी लेखात काही म्हटलेले नाही.
नजीकच्या भविष्यात सौदे अगदी ५५ च्याही खाली जातील, असे सर्वसाधारणपणे म्हटले जात आहे.
मी कामशास्त्रज्ञ नाही, तेव्हा ह्यावर त्या क्षेत्रातील जाणकारांनी प्रकाश टाकावा, अशी विनंती करतो. चघळचविष्ट, चर्वितचूर्ण चर्चा अपेक्षित आहे. लेखात काही "गोळा"बेरीज "माल"मसाला दिलेला आहे. काही गरम चुटके आहेत, त्या अनुषंगाने, व आपल्याकडील माहितीवरून, ह्याविषयी चर्चा व्हावी. कॉपी-पेस्टी ढकलपत्रे मांडायची असली तरी ती चटकदार असावी.
-उदाहरणार्थ (२)-
तसेच आगेमागे परकीय दारू घेण्याच्या प्रयत्नात देशी दारूची नशा मिळणार नाही, त्याचे परिणाम गुत्त्यांच्या "गंगा"जळावर व त्यानंतर सर्वच व्यवहारांत (चखणा चरबट होणे इ.) दिसू लागतील.
तेव्हा ह्यातून रॉयल रिझर्व हातभट्टीस एक मार्ग सुचवला आहे - भट्टीतील अल्कोहल रेशो कमी करण्याची परवानगी देणे, हा. तो कितपत परिणामकारक असेल, ह्याविषयी लेखात काही म्हटलेले नाही.
नजीकच्या भविष्यात अल्कोहल टक्केवारी अगदी ५५% च्याही खाली जाईल, असे सर्वसाधारणपणे म्हटले जात आहे.
मी पोचलेला बेवडा नाही, तेव्हा ह्यावर त्या क्षेत्रातील जाणकारांनी प्रकाश टाकावा, अशी विनंती करतो. बरळणारी, गटांगळ्या खाणारी चर्चा अपेक्षित आहे. लेखात काही देशी खांब खर्चलेले आहेत, काही ओव्हरप्रूफ विलायती आहेत. त्या झिंगेने, व आपल्याकडील नशेवरून, ह्याविषयी चर्चा व्हावी. आपल्याच खाजगी भट्टीची खपवायची असली तरी ती पहिल्या धारेची असावी.
प्रतिक्रिया
18 Dec 2011 - 9:07 pm | llपुण्याचे पेशवेll
चायला काय आहे हे?
गद्य विडंबनात टार्यानंतर जरा दर्जेदार विडंबन हेच असावे.
19 Dec 2011 - 4:33 am | इंटरनेटस्नेही
+१
विडंबन वाचुन टारझनच्या लेखनाची आठवण आली.
18 Dec 2011 - 9:10 pm | आशु जोग
या लेखाची एखादी सटीप आवृत्ती यावी
जीवनात सोपेपणा येइल
Life will become easy
18 Dec 2011 - 9:14 pm | देविदस्खोत
भले....... शा............ब्बा.............स !!!! मानलं राव आपण तुम्हाला...... एकदम खंग्री .......!!!!!!!
18 Dec 2011 - 9:29 pm | यकु
दुवा दिसत नाही.
पण वर जे काही लिहीले आहे त्यात काही मुद्यांचा विचार करायचा राहून गेलेला आहे.
विडंबनं होतं नाहीयेत याचं कारण इथे काही काळापूर्वी आश्रयाला असलेली ट्रोल्सची जमात दुसरीकडे गेली आहे हे पहिलं कारण.
दुसरं कारण म्हणजे या जमातीने मिपावर कितीतरी वेळा मज्जाच मज्जा करुनही मिपावरुन जाहीरपणे काडीमोड घेतला नसला तरी दुसरा घरोबा केला, पण तिथे सगळेच पंडीत से पंडीत मिले हो गई दो-दो बात होताना दिसते.. या पंडीतांना 'हो गई दो-दो लाथ' करायचा मार्ग तिथेही आणि इथून मोठ्या तावातावाने निघून गेल्याने इथेही खुंटला आहे.
आपल्यासारखे काही लोक 'स्थलाचे तारतम्य' यावर विचार करुन सगळेकडेच आपला वाटा उचलत आहेत हे बरंय.
आणखीही बरेच मुद्दे आहेत त्यावर जाणकार प्रकाश टाकतीलच.
18 Dec 2011 - 9:43 pm | llपुण्याचे पेशवेll
यशवंतरावाच्या प्रतिसादास सुप्परलाईक.
18 Dec 2011 - 10:33 pm | आत्मशून्य
.
19 Dec 2011 - 10:03 pm | राजेश घासकडवी
अरेरे, मज्जाच मज्जा करणारी जमात निघून गेल्यावर मिसळपावचं विडंबन खातं ओस पडायला लागलं हे ऐकून वाईट वाटलं. ती मंडळी गेल्यावर मग त्यांना ट्रोल्स म्हणण्याचं कसब आवडलं. (स्वगत - हा नवीन शब्द कुठे शिकला असावा बरे?)
अहो, त्याचं काय आहे, काहींना पंडितांची दो दो बात देखील झेपत नाही, आणि थोड्याशा सभ्य बातांनी आपले लेख उडवून टाकतात. तेव्हा कशाला उगाच लाथांच्या बाता कराव्यात?
21 Dec 2011 - 12:03 am | यकु
आपण लिहीलं तरच जगात प्रकाश पडतो आणि लोक शिकतात असं काही लोकांना वाटतं. जुनी खोड दुसरं काय.
सभ्य बातांमुळे नव्हे, तर जमातीतले प्रतिसादच ठेऊन प्रतिकूल प्रतिसादांच्या 'धोरणीपणाने' एकतर मुसक्या आवळल्या किंवा प्रतिसाद काढून टाकले यामुळे काही लोकांनी लेख डिलीट केले असतील.
18 Dec 2011 - 10:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला, तुम्ही सुद्धा. :)
आपल्याकडील विदावरुन वाटतंय की परिस्थिती ढासळली आहे. पण जागतिक स्तरावर मराठी लेखनाच्या निर्मितीवर आणि संकेतस्थळावर सध्या मंदीची लाट आहे. गुंतवणूकदारांना वरीजनल लेखन कुठे गुंतवावे आणि खात्रीशीर प्रतिसादाची अशी बाजारपेठ कोणती आहे, अशी खात्री नसल्यामुळे अशा अवस्थेतही मिपाची स्थिती तुलनेत बरी आहे. आणि परिस्थिती अधिक सुधारेल अशी आशा आहे. :)
-दिलीप बिरुटे
18 Dec 2011 - 10:25 pm | पैसा
पण मिपाची विडंबक परिस्थिती ढासळली आहे अशी शंकाही मला येत नाही कारण हा लेख हाच उत्कृष्ट विडंबनाचा नमुना आहे!आणि गेल्या काही दिवसातील मेवे, रंगा, संजोप राव, वल्ली आणि ५० फक्त यांच्या 'भारी' विडंबनांची आठवण सहजच झाली!
18 Dec 2011 - 11:45 pm | ५० फक्त
जबरदस्त निरिक्षण आणि विडंबन,
अवांतर -
आता प्रत्यक्ष पैसाताईंनी नाव घेतली म्हणल्यावर सुरुवात केलीच पाहिजे, काय म्हणताय वल्लीशेट ?
19 Dec 2011 - 9:02 am | प्रचेतस
आपण तर सुरुवात केलीच आहे. ;)
19 Dec 2011 - 12:31 am | चिंतामणी
दर्जेदार गद्य विडंबन
19 Dec 2011 - 2:41 am | गणपा
धनंजय यु टू?
आवांतर : पुप्याच्या पहिल्या प्रतिसादाशी बाडिस.
19 Dec 2011 - 7:32 am | धनंजय
हा माझा दर वर्षा-दोन वर्षांनी येणारा अंक आहे... (@यशवंत एकनाथ, नवीन तक्रार नाही)
२००८ मध्ये "रुद्ध प्रतिभा चतुरस्र वाहू दे", २०१० मध्ये "टंकेल वीडंबक जैं न काही", आणि हा २०१२चा अंक थोडा आधीच टाकला.
- - -
मी वर केलेल्यासारखी विडंबने करणे फार म्हणजे फारच सोपे आहे. कशी करायची ते बघा :
दारूशी संबंधित काही डझन-शेकडा शब्द आहेत. टवाळकीचे ओबडधोबड, आणि लैंगिक व्यवहारांशी आडून संबंध असलेले काही शेकडा शब्द आहेत. कुठल्याही भाषेत. मराठीतले (किंवा हिंदीतले किंवा इंग्रजीतले) कोणतेही वाक्य घेतले, तर त्यात एकतरी शब्द बदलून, यमक जुळवून दारू-बायको-*णे-शौच याच्याशी संबंध लावता येतो. किंवा एखादा तरी टवाळकीचा शब्द बदलून देता येतो.
शिवाय यमक जुळत नसले, अनुप्रास साधत नसला, तर कुठल्याही गोल वस्तूला "गोळे" अर्थ लावता येतो, आणि कुठल्याही जोडणीला शरीरसंबंधाचा अर्थ लावता येतो. असा विचार केला तर रोजच्या भाषेत फुल्लटॉसच फुल्लटॉस आहेत. उलट फुल्लटॉस नसलेले वाक्य हवे तर शोधून-शोधून जेरीस येऊ.
उदाहरणार्थ आताच्याच "नवीन लेखन" मध्ये आलेली काही शीर्षकेच घ्या (विडंबने असलेली शीर्षके सोडून, सगळ्यात वरपासून यादी) :
यात काहीएक कौशल्य नाही - फटाफट पाच मिनिटांत सुचलेली विडंबने आहेत.
जर प्रत्येक शीर्षकच फुल्लटॉस आहे, तर नुसते फटके मारण्यात काहीच खास नाही. हायस्कूल आणि ज्यूनियर कॉलेजनंतर असली सोपी विडंबने केली तर कोण भाव देईल?
- - -
मराठीत तर दर्जेदार विडंबनांची परंपरा आहे. माझ्या शिघ्रविडंबनांपेक्षा त्यात खूप जास्त कल्पकपणा पाहिजे. "झेंडूच्या फुलां"नी तर मराठी वाचका-विडंबकाच्या हातात मस्त उदाहरणांचे पाठ्यपुस्तक दिलेले आहे. अत्र्यांनी म्हटले आहे, की त्यांनी विडंबन मूळ केलेल्या कविता त्यांच्या आवडीच्या होत्या. (म्हणून का काय मराठी संकेतस्थळांवर "स्फूर्ती अमुकतमुक यांची अप्रतिम कविता क्षक्षक्ष" असे लिहायची सक्ती आहे. पण पुष्कळदा हा नुसता उपचार असतो.) तरी रविकिरण मंडळाच्या कवितांमध्ये काही थोडे दोष होते, ते गडद करणारी अशी त्यांची काही विडंबने होती. प्रत्येक विडंबकाने असा काही आदर्श ठेवला पाहिजे असा काही कायदा नाही. पण अत्र्यांच्या मताचे थोडे तरी मनन केले पाहिजे. आधीच सुमार दर्जा असलेल्या कवितेचे-पाठ्याचे विडंबन केले, तर त्या विडंबनाचा पोत तरी काय असणार आहे? चंद्रावरील डाग दाखवले तर कोणी निरखून बघेल. पायपुसण्यावरचे डाग मोठ्या कौशल्याने दाखवले, तर? छ्या : आधीचे कळकट, नंतरही कळकट.
खास बाब अशी : झेंडूच्या फुलांतील कितीतरी विडंबने स्वतंत्र विनोदी कविता म्हणून सुद्धा उभी राहातात. कित्येकदा मला मूळ कविता ठाऊक नाही. तरी विनोदी कविता म्हणून विडंबन समजते. म्हणजे वाक्याला वाक्य, कडव्याला कडवे, असे अत्र्यांनी रचलेले नाही.
उलट मूळ कविता-निबंधातील प्रत्येक कडव्यात-वाक्यात एक-एक असंबद्ध कोटी घुसवली, तर मजा येत नाही. विडंबकाच्या स्फुर्तीत काहीतरी घोटीव-घडीव एकसंध अनुभव आला पाहिजे.
मिसळपावावरती (सर्व मराठी संकेतस्थळांवरील) कितीतरी लेखका-कवींना यमके जुळवणे, वृत्त सांभाळणे, कोट्या सापडणे - या सगळ्यांची हातोटी आहे. स्वत:चे लेखन करताना कविता-निबंध-कथा एकसंध बनवायची कशी, हेसुद्धा त्यांना कळते. मग विसविशीत विडंबने करताना त्यांच्या आतला क्वालिटी कंट्रोल गप्प कसा बसतो, हे मोठे कोडे आहे.
अहो कुशल विडंबकांनो! रला ट जोडणारी आणि (माझ्यासारख्याला सुद्धा जमणार्या : वरची यादी बघा) स्वस्त कोट्यांनी बरबटलेली विडंबने का करता? ते काम माझ्यासारख्यांकरिता सोडा. वाचकांनी कीव म्हणून दिलेल्या फोपशा शाबासक्या आम्हाला मिळवू द्या.
मिसळपावावर (सर्व मराठी संकेतस्थळांवर) दर्जेदार विनोदाची जाण आणि तहान असलेले कित्येक वाचक आहेत. त्यांच्यासाठी तुमचे कौशल्य खर्च करा. अशी कळकळीची (द्वैवार्षिक) विनंती आहे.
- - -
मी केल्यासारखे (साध्यासुध्या) अर्थशास्त्रीय निबंधाचे विडंबन करणे म्हणजे खरोखर अस्थानी खटाटोप आहे. अर्थशास्त्र म्हणा, भौतिकी म्हणा, रसायनशास्त्र म्हणा... यांच्यात यमक-किंवा-अनुप्रास जुळवून दारू-वेश्या वगैरे कथानक घुसवणे किती सोपे आहे, ते मी वर दाखवलेच आहे. सोपे आहे, म्हणून प्रशस्त आहे काय?
या संबंधात माझा एक अनुभव सांगावासा वाटतो. माझ्या तरुण वयातली गोष्ट आहे. एकदा कंपूमधील एक गिटारवादक काही तंत्र समजावून सांगत होता. छान सांगत होता, आणि आम्हा सर्वांना त्याचे बोलणे आवडतही होते. बोलताबोलता त्याने सांगितले की "गमकाकरिता चांगली wrist action लागते". आणि आमच्यापैकी एक जण म्हणाला - "हो, हस्तमैथुनात पण wrist action चांगली असावी लागते." सगळेच हसू लागले. कोट्यांवर लैंगिक कोट्यांची चढाओढ सुरू झाली. संगीताचा विषय बंद पडला. पण "wrist" आणि "action" हे साधे शब्दच जर फुल्लटॉस समजून विडंबनाचे षटकार मारू लागलो, तर काय होईल? गमक-मींड विरुद्ध हस्तमैथुनाच्या चढाओढीत हस्तमैथुन नेहमीच जिंकेल. त्या दिवशी हस्तमैथुनाबाबत विनोदात मजा आली, हे मान्य करतो. पण संगीताचा विषय बंद झाला, हा तोटा झाला, असेही मला वाटते. ज्या मित्राला त्या दिवशी हस्तमैथुनाची कोटी सुचली, त्याने संयम राखला असता, तर बरे झाले असते. कारण संगीताबद्दल मस्तपैकी गप्पा जमण्याचा योग रोज येत नाही.
19 Dec 2011 - 8:20 am | पाषाणभेद
लेख अन प्रतिसादही छान. अत्रेसाहेबांचा आदराने उल्लेख झालेला पाहून अभिमानाने छाती १० हजारपट फुगली.
19 Dec 2011 - 9:17 am | नितिन थत्ते
विडंबन वाचताना ते हुकले आहे असे वाटत होते. हा प्रतिसाद देऊन खुलासा केल्याबद्दल धन्यवाद.
19 Dec 2011 - 10:02 am | राजेश घासकडवी
विडंबकांचं विडंबन करण्याचा प्रयत्न धनंजय यांनी प्रस्तुत लेखात केलेला आहे. निदान वरील प्रतिसादात तसा त्यांचा दावा आहे. पण एकदा या प्रांतात शिरलं की नक्की कशावर विश्वास ठेवावा हा प्रश्नच पडतो. कारण या प्रतिसादात कदाचित त्यांनी कृतक अभिनिवेशात एकंदरीत तक्रार करणाऱ्यांचंही विडंबन केलं असू शकेल. मात्र त्यांच्या अनेक मुद्द्यांबाबत असहमती दर्शवता येते.
एकंदरीत प्रतिसादात 'सोपे म्हणजे कलात्मक नाही' असा काहीसा सूर प्रकट केलेला आहे. हा तत्वतः चुकीचा नाही का? मला वाटतं मिसळपाववर सर्वात गाजलेलं विडंबन हे सर्वात सोपं असं होतं - परिकथेतील राजकुमार यांनी केलेलं उजव्या शेपटीचा मारुती. त्यासाठी पडलेले कष्ट काय? गणपतीऐवजी एक मारुतीचा फोटो चिकटवणे व 'गणपती' व 'सोंड' या शब्दांच्या जागी 'मारुती' व 'शेपटी' हे शब्द वापरणे. पण या सकृद्दर्शनी सोपेपणापोटी त्या विडंबनाला 'हॅ, हे कोणीही पाच मिनिटात करू शकेल' असं म्हणून झिडकारणं योग्य ठरेल का?
मला तरी असं वाटतं की सोपं म्हणजे भंकस किंवा अत्यंत कष्ट घेऊन केलेलं म्हणजे कल्पक व स्तुतीस पात्र असा सरळ सरळ हिशोब लावता येत नाही. विडंबनामागचा विडंबकाचा हेतू लक्षात घेणं महत्त्वाचं ठरतं. खरं तर हे विधान केवळ विडंबनालाच नाही, तर कुठच्याही कलाकृतीला लागू ठरू शकतं. आता प्रस्तुत लेखकाने केलेलं विडंबन हेदेखील जाणूनबुजून त्याच 'सोप्या' विडंबनांतच बसतं, मात्र लेखकाचा उद्देश कळल्यावर त्याची व्यापकता जाणवते.
दुसरा टीकेचा मुद्दा असा वाटतो की एकंदरीतच विडंबनांचा सुकाळ झाला असल्यामुळे या प्रकाराचा कंटाळा आला आहे. एके काळी जे भारी वाटायचं ते इतक्या लोकांनी केल्यामुळे काही विशेष वाटत नाही. आता बार थोडा उंच झाला आहे. मानदंडच थोडे लांब झाले आहेत. त्याबद्दल शंका घेण्याचं काही कारण नाही.
मात्र अत्र्यांनी केलेली सर्वच विडंबनं श्रेष्ठ होती असं नाही. काही उत्कृष्ट होती, काही छान होती, काही सुमार (केशवसुमार यांच्या नावाचा इथे काहीही संबंध नाही) होती. अत्र्यांची प्रतिभा उच्च तेव्हा उत्कृष्टाचं प्रमाण अधिक हेही मान्य. मात्र त्यांनी विडंबनं प्रसिद्ध केली तेव्हा मराठीत इतर कोणी तसलं फार लिहिलं नव्हतं. नव्याच्या नवलाईचा फायदा निश्चितच त्यांना मिळाला. मिसळपाववर गेल्या दोनतीन वर्षांत आलेल्या गद्य व पद्य विडंबनांमध्ये अशी अनेक उदाहरणं सापडतील ज्यात अत्र्यांप्रमाणेच कल्पकता वापरली गेलेली आहे. सुमार विडंबनाच्या अतिरेकापोटी चांगल्याला त्या सुक्याबरोबर जाळणं योग्य नाही.
विडंबन ही विधा म्हणून वापरताना या नव्याच्या नवलाईचा अत्र्यांना फायदा व अतिरेकाचा मिपाविडंबकांना तोटा होणं साहजिकच आहे. पण कुठेतरी ही बदललेली परिस्थिती मनात ठेवली पाहिजे. मला खात्री आहे की अत्र्यांची झेंडुची फुले मधील वीस चांगली विडंबनं घेतली तर त्याला दर्जाच्या बाबतीत जवळ जाणारी विडंबनं मिपावर शोधून सापडतील.
(वरील प्रतिसाद लांबलचक झाला आहे, पण तो लांबलचक प्रतिसाद लिहिण्याच्या पद्धतीचं विडंबन नाही, हे नमूद करू इच्छितो :) )
19 Dec 2011 - 11:52 am | धनंजय
सोपेपणा हा माझ्यालेखी दोष आहे, असे का वाटले, समजले नाही.
थोडक्यात मुद्दे हे :
१. मूळ प्रतीचा दर्जा चांगला असणे, मगच त्यातील विरूपता दाखवण्यात हशील
२. विडंबनामध्ये एकसंधता असायला हवी - नुसते खिळखिळे भाग नकोत (मी पाच मिनिटांत केलेली शीर्षकांची विडंबने म्हणूनच हिणकस आहेत. सोपेपणामुळे नव्हेत.)
३. विडंबनातील फक्त फिदीफिदी हसवणार्या विनोदामुळे आदली चर्चा खुंटणार असेल, तर विचार करावा : त्या फिदीफिदी हसण्याचे मूल्य मूळ विषयाच्या मूल्यापेक्षा अधिक आहे काय?
- - -
माझ्या मुद्द्यांशी विसंगत, तुमचा गैरसमज झालेला आहे. मी म्हटलेले आहे : "माझ्या शिघ्रविडंबनांपेक्षा त्यात खूप जास्त कल्पकपणा पाहिजे." कल्पक असणे महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट आहे. डाव्या शेपटीचा मारुती मला आवडल्याचे मी तेव्हा म्हटले होतेच. पण त्या विडंबनात कथानक सुसंगत करण्याचे "कष्ट" घेतले होते. नुसते दोन शब्द बदलून बाकी वाक्यांची जोडणी करायची सोडून दिली असती, तर ते बेढब राहिले असते. पुन्हा स्पष्ट करतो : "कष्ट" घेण्याचा उदो-उदो मी करत नाही आहे. बेढबपणा नाही, याची काळजी घेतली, याची प्रशंसा करतो आहे.
होय. त्याच प्रमाणे मी गातो तेव्हा माझ्या मनात सुरेल-तालबद्ध गायचा हेतू लक्षात घेतला पाहिजे. (पण मी गातो ते बरेच बेसुरे आणि बेताल आहे ते कुठल्या हद्दीपर्यंत खपवून घ्याल? पूर्णपणे दुर्लक्ष करणार असाल, तर माझ्या ध्वनिफितींचा संच विकत घ्या - पुट वन्स मनी व्हेर वन्स माऊथ इझ ;-) )
नेमके असे नव्हे. माझा मानदंड गेल्या पाच वर्षांत फारसा बदललेला नाही. ज्या लेखक-कवींचे आणि रसिकांचे बिगर-विडंबन रचनांसाठीचे अंतर्गत मानदंड बुलंद आहेत, तेच विडंबनासाठी इतके तोकडे मानदंड कसे काय वापरतात, हे माझे अरण्यरुदन आहे. आणि २००८ सालापासून मी हे रडगाणे रडत आहे.
अर्थात. पण हे ना धड इथे ना तिथे. त्यातील उत्कृष्ट विडंबनांबाबत वरील संदर्भ आहे. आणि त्यांच्या स्वतः केलेल्या विडंबन-विश्लेषणाचा संदर्भ आहे.
हा मुद्दा मुळीच माझ्या मुद्द्यांशी संबंधित नाही. सुके आणि ओले यांच्यात काही लेखक-कवी खुद्दच क्वालिटी कंट्रोल करत नाहीत. अशी तक्रार आहे. सुक्याबरोबर मी ओले जाळत नाही आहे. सुक्या-ओल्यामध्ये फरक हवा तसा होत नाही, अशी माझी तक्रार आहे.
- - -
प्रस्तुत विडंबनाबाबत प्रशंसा जर "सेकंड ऑर्डर" असेल तरच मान्य आहे. "फर्स्ट-ऑर्डर"मध्ये प्रस्तुत विडंबन भिकार आहे. प्रस्तुत विडंबनात कित्येक वाक्ये निष्काळजी आहेत, इतके, की कित्येक शब्द वाक्यातील आदल्या-मागल्या शब्दांशी असंबद्ध आहेत. उदाहरणार्थ :
"गंगावन" हा मुळातल्या "गंगाजळी"च्या ठिकाणी अनुप्रास साधून घातलेला आहे. "कुंटिणींना कपडे मिळणे" हे मुळातल्या "कंपन्यांना कर्जे मिळणे" याच्याशी अनुप्रासाने योजलेले आहे. पण पूर्ण वाक्यातून कुठले विनोदी कथासूत्र कळते आहे?
ही रचना विनोदाची कुचंबणा करणारी आहे. अर्थातच मी ही रचना मुद्दामून गचाळ केली आहे. "हा बेढबपणा हेतुपुरस्सर आहे, हे कळले. अशा प्रकारच्या असंबद्ध लिखाणात विनोदाचा खून पडतो हे उलगडून दाखवले आहे" अशी तुमची प्रशंसा असेल, तरच ती मान्य आहे.
19 Dec 2011 - 6:06 pm | पैसा
एका साध्या विडंबनाच्या मागे एवढा विचार असू शकतो, हेच बर्याच जणांना नवीन असेल. घासूगुर्जींचा प्रतिसादही जरा वेगळा विचार व्यक्त करणारा आहे. एकूणच चर्चा आवडली आहे.
इथे हे विडंबन सुसंगत नाही म्हणून उत्तम दर्जाचं नाही असा काहीसा विचार मला धनंजय यांच्याकडून दिसतो आहे. पण ही विसंगती म्हणजे 'कै च्या कै" लिहिलेलं सुद्धा कोणाला अतिशय मनोरंजक वाटू शकेल. चार घटका विरंगुळा एवढ्याच मर्यादित उद्देशाने वाचलं तर हे विडंबन चांगलंच मनोरंजक मला तरी वाटलं.
20 Dec 2011 - 4:19 pm | मूकवाचक
लेख आणि प्रतिसाद आवडले.
20 Dec 2011 - 9:15 am | राजेश घासकडवी
पण त्यात विडंबन हे नेहमीच बांडगुळाप्रमाणे मूळ कलाकृतीवर जगणारं असावं असं काहीसं येतं. माझ्या मते तुम्ही आधी अत्र्यांचं केलेलं कौतुक हे जास्त लागू ठरतं - मूळचे संदर्भ विसरले असले तरी ती स्वतंत्र विनोदी कविता म्हणून उभी राहिली पाहिजे. मूळ प्रतीतली विरूपता दाखवणं हेच केवळ रेसॉं दे ऐत्र असेल तर मूळ कविता किंवा लेख विस्मृतीत गेल्यावर विडंबनाचाही आत्मा नष्ट होईल. म्हणून मला विडंबन हे मूळ कृतीचा आधार घेऊन उभं राहिलेली पण स्वतंत्र विधानही करणारी कृती मानायला आवडते. मग मूळ प्रतीच्या दर्जाची अट थोडी ढिली होते.
हे मान्य.
फिदीफिदी हसण्याला इतकं कमी लेखलं का जातं हाच प्रश्न मला विचारावासा वाटतो. विनोदाला कायमच गौण स्थान मिळतं. उत्कृष्ट दर्जाचा विनोद करणं हे उत्तम शोकांतिका लिहिण्याइतकंच कठीण असतं. पण तरीही समर्थांनी म्हटलेलं 'टवाळा आवडे विनोद' लागू होतं. आत्तापर्यंतच्या साहित्याच्या पुरस्कारांची यादी बघितली तर विनोदी लेखकांची अतिरेकी वानवा दिसते.
मला वाटतं हा कळीचा मुद्दा आहे. जर विनोदाला क्षणभर खिदळणं यापलिकडे मान मिळत नसेल, तर त्यातून कल्पकतेची अपेक्षा करणं कितपत योग्य आहे?
या प्रश्नाचं उत्तर विडंबनाकडे बघण्याचा, फक्त फिदीफिदी हसण्याच्या अपेक्षेतच दडलेलं आहे असं वाटतं.
आता साधं उदाहरण देतो. पुलंनी विनोदी लेखन केलं, तसंच वैचारिक विडंबक लेखनही केलं. फार लोकांना माहीत नसेल, पण एकअक्षरकळलतरशपथ हे सौंदर्यवाचक विधान ही मर्ढेकरांच्या सौंदर्याची व्याख्या करण्याच्या प्रयत्नाची टिंगल आहे. मात्र त्यांना पुरस्कार मिळाला तो त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली सारख्या 'हृद्य' समजल्या जाणाऱ्या पुस्तकाबद्दल. ते पुस्तक वाईट आहे अशातला भाग नाही. पण आइन्स्टाइनला सापेक्षतावादाच्या सिद्धांताबद्दल नोबेल न मिळता फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट बद्दल मिळावं तसंच हे अस्थानी.
वाचकांच्या अपेक्षेप्रमाणेच माल मिळाला तर त्यावर नक्की तक्रार कसली करावी?
20 Dec 2011 - 11:13 pm | धनंजय
फिदिफिदी हसण्याचे उदाहरण दिलेले आहे. माझ्या मित्रांमधील संगीताची चर्चा. (माझा मूळ प्रतिसाद, शेवटचा परिच्छेद.)
विनोदाला गौण स्थान मिळणे वगैरे आरोप का होतो आहे, ते कळत नाही. दर्जेदार विनोदाचा गौरव मी स्पष्ट शब्दांत सांगितलेला आहे. "फिदिफिदी" हसणे आणि "हसणे" यांच्यात फरक करण्यासाठी मी वरील उदाहरण दिले आहे. स्पष्ट शब्द, स्पष्टीकरणात्मक प्रसंग, सगळे बळेच बाजूला सारून असे म्हटले जात आहे :
मला प्रत्येक विनोद हीन दर्जाचा वाटतो - प्रत्येक हसणे हे मला "फिदिफिदी हसणे वाटते" या गुप्त शोधावर तुम्हाला हे दडलेले उत्तर सापडले आहे. पण तो गुप्त शोध होण्यापूर्वी माझे स्पष्ट शब्द अप्रामाणिक मानावे लागतात, आणि मी सांगितलेला प्रसंग संदिग्ध मानावा लागतो. (त्याच्या पुढचे पुलंनी केलेल्या विडंबनाचे उदाहरण विनोदाचा सार्वत्रिक शत्रू असलेल्यासाठी लागू आहे. तुम्हाला सापडलेले दडलेले उत्तर मला लागू नाही ही माझी ग्वाही मान्य करा, अशी विनंती. पुलंचेच "खुर्च्या" हे विडंबन मला उत्कृष्ट वाटते, अशी तुमची-माझी बहुधा चर्चा झालेली आहे - खरडचर्चा नसेल, तर प्रत्यक्ष चर्चा झाली आहे.)
कदाचित "फिदीफिदी हसणे" आणि "हसणे" यांच्यामध्ये जो करडा भाग आहे, तो संदिग्ध आहे, हे तुम्हाला सुचवायचे असेल. पण "ग्रे झोन आहे" हे मी मान्यच केलेले आहे. "मूळ विषयाच्या आणि असंबद्ध शाब्दिक कोटीच्या मूल्याची तुलना करून बघावी" असे काही म्हटले आहे. "तुळायचे मूल्य" हे द्वि-संख्यामूल्य असल्याचा संदर्भ कधीच नसतो. तुळायचे मूल्य जवळजवळ कंटिन्युअस-स्केलवर असते. त्यामुळे ग्रे झोन ची जाणीव पुन्हा करून देणे म्हणजे विषयांतर होते.
स्वतंत्र दर्जाबाबत होय! हेसुद्धा वर म्हटलेले आहे. पण मग ते विडंबन स्वतंत्र रचनांच्या मानदंडापुढे उभे राहिले पाहिजे. प्रत्यक्षात आणखी मोठा मानदंड लागेल. तो असा : स्वतंत्र कृतीकरिता कोणी मुद्दामून कुचकामी सांगाडा का निवडेल? शो-ऑफ करण्यासाठी. "बघा बघा, तराजूच्या एका पारड्यात माझ्या प्रतिभेची सोन्याची रास आणि दुसर्या पारड्यात भंगार सांगाडा, आणि वाहावा! भंगारापेक्षा सोने ढीगभर अधिक भरते."
पण अशी शो-ऑफ करायची महत्त्वाकांक्षा असेल, तर तेवढी असामान्य प्रतिभा खरेच समोर ठेवावी लागते. दिखाऊपणासाठी स्वतःला हँडिकॅप करून घ्यायचे, आणि मग सामान्यच काही करून दाखवायचे, तर बरे दिसत नाही.
21 Dec 2011 - 12:29 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
या चर्चेशी खूप जास्त संबंध नसेल पण तरीही पुन्हा एकदा मिपावरच्या सकस आणि दर्जेदार लेखांपैकी एक, हुकुमशहांना विनोदाचं वावडं का असतं? आठवला.
येता जाता मज्जाच मज्जा करणारे उथळच असतात का? एखादा अप्रिय किंवा अशक्य वाटणारा विचार पोहोचवण्यासाठी विनोदाच्या आश्रयाला जाता येतं. तर्कहीन आणि कर्कश विचारांवर टीका करण्यासाठी विनोदाचा आधार घेतला तरीही तो वाईटच का? धनंजयने उदाहरणार्थ पाडलेली विडंबनं ही अर्थातच मिश्किल अथवा विनोदी वाटली नाहीत पण 'द अनियन'वगैरे मधे येणारे लेख विनोदी वाटत नाहीत का; उदाहरणार्थ एक, दोन.
विनोद नसणार्या साहित्यातही चांगले वाईट प्रकार आढळतात तर विनोदातही सकस, निकस आणि हिणकस असे प्रकार सापडणारच. विनोदबुद्धी नसणार्यांनी हिणकस विनोदांकडे बोट दाखवून विनोदाला तुच्छ लेखणं अपेक्षितच आहे. पण म्हणून एकजात सर्व प्रकारच्या विनोदाचं सरसकटीकरण करून विनोदाला कमी का लेखावं?
अनेक औषधांना साखरे आणि/किंवा रंगाचा मुलामा दिलेला असतो. तासाभराच्या व्याख्यानातही मधेमधे विनोद पेरणारा वक्ता, शिक्षक लोकप्रिय होतो. तर मग विनोदासाठी केलेला विनोद वाईट का समजावा? तब्येतीला फार पोषक नसलं तरी केक, वेफर्स तोंडात टाकण्याची इच्छा होतेच की आपल्याला; राजेशने इतरत्र दिलेला एक प्रतिसाद मला या संदर्भात दाखवावासा वाटतो. साखरेचा मुलामा फक्त औषधासाठीच का वापरावा? अधूनमधून हसणं तब्येतीला वाईट नसतंच. उगाच का लाफ्टर क्लब्ज एवढे लोकप्रिय झाले असते?
21 Dec 2011 - 1:53 am | धनंजय
या "तरीही"चा अर्थ काय आहे? जो थोडा संबंध आहे, तो जोडण्यालायक आहे, असे तुम्हाला वाटते.
मी विडंबनाचा दर्जा सुधारण्याबद्दल बोलतो (द्वैवार्षिक) आणि त्याचा थोडा तरी संबंध हुकुमशाहीच्या मुस्कटदाबीशी तुम्ही कसा लावता? हुकुमशाहीविरुद्ध केलेल्या व्यंग्यांना माझा छुपा विरोध आहे, किंवा माझ्या निष्काळजी लेखनामुळे तशा स्वातंत्र्यलढ्यांचा विरोध होतो आहे, हे तुम्हाला "तरीही" कसे काय सुचले?
ऑनियन मधले दाखले दुव्यासकट मला देऊन काय साधले? दर्जेदार विनोद मी कधी वाचले नसतील, तर "इथून सुरुवात", असे हे शैक्षणिक दुवे आहेत काय?
तुम्ही म्हणता
मी काळजीपूर्वक सरसकटीकरण टाळले आहे. सरसकटीकरण न-केल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे (औपचारिक नव्हे). उदाहरणार्थ :
मराठीत तर दर्जेदार विडंबनांची परंपरा आहे. माझ्या शिघ्रविडंबनांपेक्षा त्यात खूप जास्त कल्पकपणा पाहिजे.
मग विसविशीत विडंबने करताना त्यांच्या आतला क्वालिटी कंट्रोल गप्प कसा बसतो, हे मोठे कोडे आहे. म्हणजे क्वालिटी कंट्रोल चालू ठेवला तर विडंबने विसविशीत राहात नाहीत, हा निर्देश.
मिसळपावावर (सर्व मराठी संकेतस्थळांवर) दर्जेदार विनोदाची जाण आणि तहान असलेले कित्येक वाचक आहेत. त्यांच्यासाठी तुमचे कौशल्य खर्च करा. अशी कळकळीची (द्वैवार्षिक) विनंती आहे.
हे सगळे स्पष्ट म्हटल्यावर सरसकटीकरणाचा मुद्दा कुठून उपटला?मी काहीही म्हटले, तरी खरे सरसकटीकरणच करतो, असे म्हणायचे, तर हा तर "वरची वाक्ये अप्रामाणिक आहेत" असा गंभीर आरोप आहे.
या आरोपाने चिडलो हीच बाब माझ्या विनोदशून्यतेचा पुरावा म्हणून घेता येत नाही. अप्रामाणिकपणाचा आरोप केल्यास सरासरी व्यक्ती कधी हलके घेईल आणि कधी चिडेल - साधारण तितक्या प्रमाणात या दोन्ही भावना मी अनुभवू शकतो.
21 Dec 2011 - 9:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
नाही. धनंजय या आयडी अथवा व्यक्तीला विनोदबुद्धी नाही किंवा विनोदाची जाण नाही असं मी चुकूनही म्हणू शकत नाही. माझा आधीचा प्रतिसाद सरसकटीकरण करण्याबद्दल जास्त होता. तसं सुस्पष्ट लिहीणं आवश्यक होतं, जे मी तिथे लिहीलं नाही.
या निमित्ताने धनंजयने केलेलं एक मजेशीर विडंबन आठवलं.
दर्जाहीन विडंबनांवर आक्षेप घेणं मला समजतं आणि मान्य आहे. पण विडंबनाकडे स्वतंत्र कलाकृती म्हणून पहावं आणि मूळ कलाकृती फार महान नाही असा आक्षेप निदान दर्जा असणार्या विडंबनावर घेऊ नये. अर्थात निदान दर्जा कोण ठरवणार?
19 Dec 2011 - 5:54 pm | मेघवेडा
द ण द णी त!
19 Dec 2011 - 7:48 pm | श्रावण मोडक
धनंजय अनुभव थोडा कमी पडला.
यात 'प्राण तळमळला' यापेक्षा 'कान फडफडला' असं हवं. ;)
21 Dec 2011 - 3:14 am | चित्रा
धनंजय यांचे तुळेचे उदाहरण देऊन लिहीलेला वरचा मुद्दा पटण्यासारखा आहे.
विडंबन म्हणजे Parody असे धरले तर http://en.wikipedia.org/wiki/Parody यावरून
A parody ... in current usage, is an imitative work created to mock, comment on, or trivialise an original work, its subject, author, style, or some other target, by means of humorous, satiric or ironic imitation.
मिपावरील विडंबने ही mock, comment on, यासाठी नसून trivialise करण्यासाठी असतात म्हणजेच खालीलपैकी burlesque पद्धतीत बसण्याच्या दृष्टीने केलेली असतात असे वाटते. (चू. भू. द्या. घ्या). त्या दृष्टीने पाहिल्यास धनंजय यांचे म्हणणे पटते.
---
The writer and critic John Gross observes in his Oxford Book of Parodies, that parody seems to flourish on territory somewhere between pastiche ("a composition in another artist's manner, without satirical intent") and burlesque (which "fools around with the material of high literature and adapts it to low ends").
--