राम राम मंडळी.
धाग्याच नाव वाचुन बीगी बीगी आला असान तर जरा सबुर. तो उजवीकडच्या फोटो खालचा 'पाया' वायला आन आमचा ह्यो 'पाया' वायला. उगा येगळ्या आशेने ह्यो धागा उघीडला आसनं तर वांदे हुयाचे.
मी म्हंत्यो तो पाया म्हंजी बकर्याच्या पाया पासुन बनीवलेला रस्सा. तवा फुडलं झ्येपनार आसनं तरच खाली बगा.
आमचा बा ह्यो पाया बनीवन्यात यकदम येक्ष्पर्ट. आम्ही तेच्या कडनचं धडं गिरवलं ल्हान आसताना. आज लै दिसानं बकर्याचं पाय दिसलं दुकानात, तवा बाची आठवन आली. लगेच बकयाचं पाय घेतलं आन बाला फोन लावला. थोडी उजलनी केली. आन खुशीत घरला निघालू.
आवं आवं जरा दम खावा. सांगतु की सम्द बैजवार. पर दोस्तहो तुमचाकडं मोप टैम आसान तरच जा जी याच्या वाटेन. रांधल वाढलं खाल्लं आसं शिंपळ नस्तय ह्ये. वाईच टैम खानारी रेशीपी हाय ही.
पन ते म्हंत्यात नंव्हका सब्र का फल चवदार व्हताय. ते आक्षी खरं बगा.
साहित्य :
सगल्यात पैल घ्या बकर्याचं चार पाय. खाटका कडनच यवस्थीत साफ करुन घ्या.
(आता ह्यो फटु मुद्दाम टाकत न्हाई. उगा कुनाच्या प्वटात कालव कालव हुयाची. ;) )
योक मोठा कांदा.
३ तांबोटी/टमाटी.
३-४ मोठं चमचं आल लस्नाच वाटन.
थोडं सुक मसालं.
यात योक योक चमचा हळद , धनं पुड , जीरं पुड , लाल तिखटं , घरचा मसाला / पाया मसाला.
थोडा खडा मसाला घ्या. जीर, लवंग, दालचीनी, काळीमीरी, तमालपत्र, चक्रीफुल, येल्ची.
थोडी कोथमीरी, आल्याचं बारीक लांब तुकडं, लिंबू.
१/२ वाटी ताज दही नाय तर नारलाचं दाट दुध.
तेल, मीट तुमच्या मर्जी वानी.
कृती :
सर्वात पैले बकर्याचं पाय स्वछ धूउन घ्या. (तुकडं खाटकाकडनच करुन घ्या.)
आन बाजुला ठिउन द्या.
कांदा आन तांबोटी जित्की बारीक कापता येतीन तित्की बारीक कापून घ्या. तुमच्या कडं ते फूड प्रोफेसर असान तर त्याले कामाला लावा.
आम्ही गरीबं आपलं सुरीनच कापतू.
एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल टाकुन मंग तेच्यात कांदा टाका. कांद्याच्या गालावं गुलाबी
आली की मंग त्यात आल-लस्नाचं वाटान टाकुन त्येचा कच्चा वास जाई पर्यंत परतत र्हा.
नंतर त्यात बारीक चिरलेली तांबोटी टाका. आन कांद्या तांबोट्याचा पार लगदा हुईस्तव शिजवून घ्या.
नंतर त्यात सम्दे मसाले (पावडर वाले) टाका. आवडी परमान मीट टाका आन बसा ढवळत.
ह्यो मसाला यकदम नीट शिजाया होवा. बाजून तेल सुटाया लागलं की कळनच तुमास्नी.
नंतर पायाचे तुकडे टाकुन, यवस्थित ढवळुन घ्या. मसाला सगळी कडुन बसला पायजे. जरा २ -४ मींट मोठ्या धगीवर परतत र्हा.
आता यात बर्यापैकी म्हंजे निदान ३/४ लिटर पाणी टाका. यवस्थित ढवळा.
वर जो खडा मसाला सांगीटलाय नव्ह, तो येका तलम कापडात गुंडाळुन त्याची पुरचुंडी बांधा, आन द्या सोडुन यात.
वरन झाकन ठेउन ३-४ तास लहान धगीवर शिजाया ठेवा.
आता तुमच्याकडं तेवढा टैम नसन ( त्यातच ते बेणं ग्यासच पण पैसं बी वाढल्याल) तर मंग कुरला झाकन लावून तेच्या ७-८ शिट्या घ्या. पटापट न्हाई बरका. शेगडी मध्यम धगीवरच ठेवा.
(आता शिट्या घ्या म्हनलं की आमचे काही मित्र लगेच येनार आन सांगनार शिट्या घेयाची गरज न्हाई. ठिक है बाबा तुमाना शिट्या घेतल्या बिगर जमत आसन तर तुम्ही शिट्या नका घीउ.)
कोळश्याची शेगडी आसन तर लैच ब्येष्ट.
कुकर बंद केला की गप गुमान झोपी जायाच. कुकर उघडाचा ते डायरेक्ट दुसर्या दिवशीच.
आता कळ्ळ म्या वर का म्हन्लो की तुमचाकडं मोप टैम आसान तरच जा जी याच्या वाटेन. ;)
दुसर्या दिवशी झाकंन काडल्यावर हे आसं दिसन. ती खडा मसालावाली पुरचुंडी काडुन फेकुन द्या.
आत्ता टेस्ट घ्याया हरकत नाय. :)
आसच थोडं गरम करुन खाल्लं तरी चालल की.
पर थोडं चवीत बदल कराचा आसन. रस्सा थोडा दाट पायजे आसन तर त्यात १/२ वाटी ताज दही किंवा नारलाचं दाट दुध टाका. चांगलं ढवळा आन मंग थोडं गरम करा.
वरनं थोडं लिंबू मारुन, आलं, कोथमीरी टाकुन सजवा.
येच्या सोबतीला जर तंदुर मधली, नै तर आपली ज्वारी बाजरीची रोटी आसन तर आजुन काय पायजे राव.
पर मी येच्या संगटीनं अप्पम बनवलं तेबी एकदम भन्नाट लागल बगा.
तर मंग कवा बुलाविताय आमास्नी 'पाया' खाया?
अप्पमचा इडो :
अप्पमसाठी २ कप तांदुळ भिजत ठिवलेला, १ कप भात, ३ कप नारलाचा चव आन चवी परमान मीट ह्य सम्द एकत्र वाटुन रातभर आंबाया ठेवा.
प्रतिक्रिया
4 Dec 2011 - 7:12 pm | तर्री
निवेदन , पाकृ , फोटो सहित "पाया" एकदम हायक्ल्लास....
4 Dec 2011 - 7:21 pm | वेताळ
नाद खुळा......कोलावरी कोलावरी डी
4 Dec 2011 - 7:50 pm | पप्पु अंकल
मला तर अस्सा आवड्तो .......
पाकृ जबरदस्त आवडली.
__/\__
4 Dec 2011 - 8:06 pm | अत्रुप्त आत्मा
हे आद्य खाद्य साहित्तिका,तुझिया चरणी आमुचे शे-कोटी ;-) प्रणाम... आज पाया च पडलं पाहिजे... :-)
धन्य धन्य ते अन्नोदक तीर्थ,केवळ पहाणे व्यर्थ।
शा-का?-हाराचा अर्थ ,बदलुन घ्यावा म्हणतो आता॥
आपुल्या या पाक-कृती,कालवाकालव करिती चित्ती।
खाल्या शिवाय खरी शांती,कैची लाभे खादाडा॥...... ---^---
6 Dec 2011 - 6:28 pm | मी-सौरभ
गणपा भौ..
या रेशिपीत मटनाऐवजी चिकन टाकता येतं का??
6 Dec 2011 - 6:35 pm | गणपा
चालतय की. तुम्हाला चिकनचे पाय(पंजे) आवडत असतील तर ते टाकावे वा चिकनच मांस ही टाकता येईल.
चिकन शिजायला मटणा येवढा वेळ नाही लागायचा.
उलट इंधन आणि वेळ दोघांची बचत होईल. :)
6 Dec 2011 - 6:43 pm | मी-सौरभ
कधी येऊ तुमच्याकडे 'पाया' खायला???
6 Dec 2011 - 6:47 pm | गणपा
पारपत्र, व्हिजा आणि तिकिट झालं की निघाच ताबडतोब.
जंगी पार्टीच करु. काय म्हणता?
6 Dec 2011 - 6:50 pm | मी-सौरभ
वाट बघावी म्हणतो ;)
4 Dec 2011 - 8:06 pm | Mrunalini
आई गं....... मेले मी......
4 Dec 2011 - 8:51 pm | कुंदन
खपलो
6 Dec 2011 - 12:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खुराचं मटन आन नळ्या ओरपायला लै मजा येते.
गणपा चालू दे.
-दिलीप बिरुटे
5 Dec 2011 - 12:10 am | सुहास झेले
खल्लास.... !!!
5 Dec 2011 - 12:48 am | आशिष सुर्वे
धुमशान रे लेका.. लय झ्याक.. जल्ला तोंडाक पानी सुटलंय बग...
5 Dec 2011 - 1:58 am | नंदन
सदेह वैकुंठास जाऊन परत आलो आहे. थोडा स्थिरस्थावर झालो की प्रतिक्रिया देईन म्हणतो :)
5 Dec 2011 - 10:19 am | रामदास
पण त्याच विमानात होते आणि म्हणून ते असेच म्हणतो असे म्हणतात.
5 Dec 2011 - 5:10 am | रेवती
अप्पमचा व्हिडीओ आवडला.
त्यावरचा पदार्थ झेपला नाही.
माझ्याकडे आल्यावर तुला जे काही रांधून वाढीन ते कसं रे आवडणार?
5 Dec 2011 - 5:19 am | धनंजय
आप्पम तरी करायला पायजे. रेड्ड मीटाऐवजी वैट्ट मीटाला रस्सा चालतो का बघायला पायजे.
5 Dec 2011 - 5:26 am | स्वाती२
लै भारी!
आमच्याकडे पायाचे सूप नावाचा प्रकार आजारपणात केला जातो. त्यामूळे हा असा रुचकर पाया बनू शकतो हेच माहित नव्हते.
5 Dec 2011 - 5:53 am | चित्रा
विडिओ छानच, रस्सा पन भारी.
5 Dec 2011 - 6:35 am | सन्जोप राव
पाया आवडला.खाया पायजे....
5 Dec 2011 - 7:08 am | कपिलमुनी
'रोमँटीक गणपा : "कांद्याच्या गालावं गुलाबी आली ".. :)
ये है पाया , पाया या गाण्याची आठवण झाली..
गणपा भौ , पाया सूप कसा करतात ठाव है का ?
5 Dec 2011 - 8:04 am | कौशी
बनविण्याचे आणि लिखाणचे कौशल्य्.....काही तोड नाही.
गणपा,खरोखर अप्रतिम रेसिपी...
5 Dec 2011 - 9:18 am | चतुरंग
विंजिनिअरिंगला असताना तांबड्या लाल रश्श्यातल्या तंगड्या, सोबत भाकरीची चळत अन बुक्कीनं फोडलेल्या कांद्याबरोबर खायचो त्याची आठवण आली! नंतर कधीतरी शाकाहारी झालो.
पण आता तुझे हे 'पाया'भरणीचे लेखन ओरपून पुन्हा एकदा सामिष आहाराकडे वळावे लागणार असे दिसते!
(सध्यातरी कसाबसा निरामिष) रंगा
5 Dec 2011 - 10:13 am | जाई.
मस्त
तोँपासु
5 Dec 2011 - 11:34 am | ५० फक्त
कांदे आणि टोमॅटो लई भारी चिरलेत गुरुवर्य ,
एकदा भेटु अन वेळ काढा सोलापुरला घेउन जातो विजापुर वेशीत पाया अन खिमा खायला, याच एकदा. गेला बाजार कोथरुड डेपो मागच्या पठाणची बिर्याणी तरी खाउच.
5 Dec 2011 - 12:00 pm | परिकथेतील राजकुमार
तद्दन खराब आणि काहीतरी बेचव पदार्थ दिसत आहे. फटू पाहूनच हा पदार्थ किती बेचव बनला असेल ह्याची कल्पना येते आहे. बकवास पाकृ.
*शाकाहारी पाकृ येईपर्यंत असेच प्रतिसाद दिल्या जातील. *
5 Dec 2011 - 2:24 pm | इरसाल
लै भारी, जाम भारी,
मस्त पायाभरणी केलीय.
पुढच्या रविवारी केला जाईल. पण इतकी वाट खरच बघितली जाईल कि नाही याबद्दल शंका आहे.
5 Dec 2011 - 4:09 pm | स्मिता.
अप्पमचा व्हिडो अतिशय आवडला. तयार झाल्यावर चॉपस्टिकने किती नजाकतीने काढलाय त्याला.
त्याआधीचा पाया बघूनच अतिशय झणझणीत दिसतोय. हा असाच मसाला वापरून त्यात चिकन किंवा अंडी घालूनही चांगले लागेल ना?
5 Dec 2011 - 4:16 pm | गवि
आहा..
5 Dec 2011 - 5:33 pm | शिल्पा नाईक
मस्त एकदम,
माझ्या माहेरी खास पायापार्टी व्ह्यायची थंडीच्या दिवसांत, त्याची आठवण आली. कडाक्याच्या थंडीत गरम गरम पाया अन पाव/भाकरी खायला मज्जा यायची.
5 Dec 2011 - 6:08 pm | विसुनाना
मेलो. आता काय करावे बरे? - हम्म्म!
अवांतरः
'पाया'वरून एका (पेताड) रात्री पहाटे ३ वाजता हॉटेल शादाबमध्ये मोठ्या भगुन्यात उकळत असलेले खुरासकटचे पाय आठवले.
पाया,घुटना, झबान, भेजा, कलेजा इ.इ. - काही काही सोडणार नाहीत हो 'ही' माण्सं. 'ही' असे म्हणताना चारही बोटे माझ्या स्वतःकडे आहेत याची कृपया नोंद घ्यावी. ;)
5 Dec 2011 - 8:06 pm | श्रावण मोडक
काय राव, मुंडी का लिहिली नाही? वडणगे पाडळी (किंवा तुमच्या जोरावर तत्सम गावांत) ला जायचं का एकदा?
5 Dec 2011 - 7:27 pm | वेताळ
मस्तच परत एकदा
5 Dec 2011 - 8:11 pm | जागु
तोपासु एकदम दोन आठवड्यापुर्वी पारंपारीक पद्धतीने सुप बनवले होते.
5 Dec 2011 - 8:36 pm | प्रभो
ज ह ब ह रा!!!
5 Dec 2011 - 9:22 pm | संदीप चित्रे
पाया आनि गनपा कॉम्बिनेशन म्हन्ल्यावरच म्हन्लं ना भौ की पिच्च्चर येकदम कड्डक हाये म्हनून :)
6 Dec 2011 - 1:04 am | सानिकास्वप्निल
साष्टांग दंडवत ....
तुफान दिसतायेत दोन्ही पाकृ :)
6 Dec 2011 - 7:32 am | नगरीनिरंजन
काय बोलू? शब्दच खुंटले.
6 Dec 2011 - 10:40 am | पैसा
कांदे अन तंबाटी चिरण्याचे कौशल्य एखाद्या खिसेकापूला लाजवणारं आहे. आप्पमचा व्हिडो पण आवडला. "पाया" कडे बघायला भीती वाटते. एकदा म्हापश्याच्या बाजारात मोठे मोठे पाय लटकत ठेवलेले पाहून चक्कर आली होती त्याची आठवण झाली.
7 Dec 2011 - 4:47 am | पिंगू
ह्या भेटीत म्हापश्याच्या मार्केटमध्ये आणखी काही आयटम बघितले.. ते बघून तर पोटात ढवळून आले होते..
बाकी पाया खाल्लेला असल्याने नो कॉमेंट..
- पिंगू
6 Dec 2011 - 11:51 am | sneharani
जबरदस्त पाककृती!!
:)
6 Dec 2011 - 12:00 pm | खादाड
आदल्या दिवशीच्या खुर्/मटन रश्श्याची मजाच काहि वेगळी सोबत भाकरी आणि कांदा !
6 Dec 2011 - 12:05 pm | खादाड
आदल्या दिवशीच्या खुर्/मटन रश्श्याची मजाच काहि वेगळी सोबत भाकरी आणि कांदा !
हम्म्म मुंडि खाण्याची मात्र अजुन पर्यंत हिम्मत झाली नाहि !!
6 Dec 2011 - 5:20 pm | सुहास..
ठार !!
ज ह ब ह रा !
तारीफ करायला लब्ज नाहीत !!
6 Dec 2011 - 5:25 pm | jaypal
6 Dec 2011 - 6:42 pm | मोहनराव
लई भारी गड्या!!
6 Dec 2011 - 6:58 pm | सोत्रि
गणपाभौ,
त्या पाया सुपात उभे कापलेले आल्याचे लहान लहान काप एकदम कातिल हो.
सौदीतल्या वास्तव्यात पाकिस्तानी हाटेलात चापलेला पाया आठवला आणि वजन कमी करण्याच्या प्रयन्तांचा 'पाया'च खचला :)
- (गणपाच्या 'पाया'शी तोंडघशी पडलेला) सोकाजी
18 Dec 2011 - 7:54 pm | श्रीयुत संतोष जोशी
च्या मारी
गणपा शेठ , जीव घेता का आता ...................... :) रेसिपी ११११११११११११११११११११११११११११११११११११११ नं. फोटो पण१११११११११११११११११११११नं.
क्लासिक .
22 Jan 2020 - 9:00 pm | फुटूवाला
तर मंग कवा बुलाविताय आमास्नी 'पाया' खाया?
तुमची रेसिपी वाचून तिसऱ्यांदा सैंपाकघरात कामाला लागलोय... याच उद्या :)