महाराष्ट्रातील बहूतेक शाळा ह्या दोन सत्रात भरतात. एक सकाळ सत्र व दुसरे दुपार सत्र असली त्यात विभागणी असते.
विद्यार्थीसंख्येत वाढ झाल्याने असे करावे लागते. या शाळांत प्राथमिक व माध्यमिक शाळा येतात.
सकाळच्या शाळेची वेळ साधारणत: सकाळी ७ ते १२ व दुपारच्या शाळा ह्या दुपारी १२ ते ५:३० ह्या वेळात असतात.
सकाळ सत्राच्या विद्यार्थ्यांना शाळा संपवून दिवसभर मोकळा वेळ मिळतो. ते विद्यार्थी या वेळेत घरी जावून, ताजेतवाने होवून दुपारच्या दरम्यान एखाद्या शैक्षणीक वर्गाला जावू शकतात. फावल्या वेळेचे छंद, वाचन, घरकाम करू शकतात. एखादा गरजू विद्यार्थी एखादे काम करून हातखर्चाला पैसे मिळवू शकतो. (बालमजूरी योग्य नाहीच पण ती त्या विद्यार्थ्यांची गरज असू शकते.)
जेव्हापासून इयत्ता १२ वी ला स्पर्धा परिक्षेला महत्व आले तेव्हापासून इयत्ता दहावीच्या गुणांचे महत्व कमी झाले. तरीही दहावीचे गुण पुढील प्रवेशासाठी महत्वाचे असतातच असतात. अगदी ०.१ टक्यांवरूनही एखाद्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. आजकाल स्पर्धा परिक्षांची तयारी अगदी नववी पासून होते आहे. अशा नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना हा मोकळा वेळ सोन्यासारखा मौल्यवान ठरू शकतो.
बहूतेक शाळांचे मोठे माध्यमिक वर्ग (आठवी ते दहावी) हे दुपारच्या सत्रात आयोजित केलेले दिसतात. या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोकळा, पुरेसा वेळ मिळणे आवश्यक असते. सकाळच्या वेळात या वर्गांचे नियोजन शाळांनी केल्यास तसा वेळ त्या विद्यार्थ्यांना निश्चीत मिळू शकतो.
याच्या नेमके उलट घडते. लहान वर्गाचे विद्यार्थी सकाळच्या सत्रात शाळेत जातात. पाचवी पासून पुढे ठिक आहे पण पहिली ते चौथीचे विद्यार्थी हे खरोखर लहान वयाचे असतात. सकाळच्या वेळी त्यांचे उठणे, तयारी करवून घेणे पालकांना जिकीरीचे असते. त्यातही दुपारचा वेळ हा त्यांच्यासाठी इतका काही महत्वाचा नसतो. त्यावेळेत ते शाळेत जावू शकतात.
शालेय व्यवस्थापनाला या गोष्टी माहीत असतीलच पण याबाबत त्यांनी काही विचार करून वेळेचे योग्य नियोजन केले पाहीजे.
आपल्यालाही शाळेच्या वेळेबाबत असला अनुभव आहे काय?
प्रतिक्रिया
28 Nov 2011 - 7:39 pm | कपिलमुनी
सकाळी ७ - ८ वाजता शाळा असणे हा लहान मुलांवर अन्याय आहे ..
छान थंडीचा रजई ओढुन साखरझोपेत रहायचे..ते आयांचे ओरडणे आणि आवरणे सहन करावे लागते ..
( फार फार सोसल हो लहानपणी... )
28 Nov 2011 - 9:30 pm | सर्वसाक्षी
पण केवळ मुलांवरच नव्हे तर पालकांवरही!
(सातत्याने मुलाची शाळा सका़ळची असलेला पालक)
साक्षी
28 Nov 2011 - 8:33 pm | रेवती
लहान मुलांची शाळा (प्राथमिक) दुपारी हवी हे मला लहानपणापासूनच वाटत आले आहे.
28 Nov 2011 - 8:38 pm | आनंदी गोपाळ
कोणतेही सत्र घेतलेत तरी शाळेचा एकूण वेळ एक्झॅक्टली तितकाच असतो. (क्लॉक अवर्स) त्यामुळे अमुक सत्रामुळे जास्त वेळ मिळतो वगैरे पटले नाही. (सकाळच्या सत्रातील मास्तरांस कमी वेळ काम करून तितकाच पगार मिळू लागला तर आपल्याकडे किती बोंबाबोंब होईल याची कल्पना केलीत का कधी?;) )
दुसरे म्हणजे आपल्याकडे दुपारी भयंकर ऊन असते. अन उन्हाळा हा डॉमिनंट ऋतू आहे. थंडी फार कमी दिवस असते. त्यामुळे लहान मुलांसाठीची वेळ सकाळची बरोबर वाटते. बर्याच शाळा ऐन थंडीत,७ ऐवजी ८ वाजेपासून सुरू होतात.
28 Nov 2011 - 8:48 pm | पाषाणभेद
तुम्ही घड्याळी वेळ बघत आहात.
शाळेचा वेळ तितकाच असणे अभ्यासाच्या, शिकवण्याच्या हेतूने गरजेचेच आहे. त्यात वेगळे काय?
सर्वसाधारण विद्यार्थ्याचा दिवस सकाळी चालू होतो. सकाळी त्याचे आवरणे जेवण आदी मध्ये मोकळा वेळ फार कमी उरतो. तिच शाळा (मोठ्यांची) सकाळची असेल तर त्याला दुपारच्या वेळी क्लास, छंद, कमाई करता येते हा मुद्दा लक्षात घ्या. प्राथमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांना क्लास, छंद, कमाई आदींची तुलनात्मकरित्या कमी गरज असते.
त्याचप्रमाणे लहान मुलांची आवराआवर हा मुद्दादेखील महत्वाचा आहे.
बर्याचशा शाळा त्यांची ठरलेली वेळ बदलत नाही, हे पण सत्य आहे.
माझे म्हणणे मोठे वर्ग सकाळी अन लहान वर्ग दुपारी असे असावेत हा आहे.
28 Nov 2011 - 9:58 pm | आनंदी गोपाळ
नियोजन. हे यास उत्तर आहे.
टाईम म्यानेजमेंट.
सकाळी ७ वाजता शाळेत पोहोचण्यासाठी जर ६.३५ ला स्कूलबस येणार असेल तर तुम्ही/सौ. ५ ला उठून, स्वतःचं आवरून, डबा तयार करून, बाळाला उठवून, त्याला शंभोऽ करून बरोब्बर ६.३० ला चौकात नेता.
हेच दुपारी १२:२० ची शाळा असते तेंव्हा होते, पण मग आपण थोडे तास रात्रीकडून चोरून आणत नाही. अन म्हणून मग दिवस छोटा भासतो. वरच्या उदाहरणात शाळा ७ ची, अन तुम्ही दिवस सुरू करता ५ ला. संपवणे नाईलाजाने रात्रौ ११ ला.
चिरंजीवांची शाळा १२.२० ला असली तर आपण आरामात ७ ला उठणार? अन बाळाला केंव्हा उठविणार? त्याने रात्री ११.३० पर्यंत टीव्ही पहाण्यात घालवलेला वेळ कुठे मोजलात तुम्ही?
दिवसातले 'वेकिंग अवर्स' अन वर्किंग अवर्स ची सांगड योग्य प्रमाणे घातलीत तर बरोबर जमेल. शिवाय मुले फार रेझिलियण्ट असतात. काळजी करू नका.
28 Nov 2011 - 11:30 pm | मन१
वेळ अशी काही जबरदस्तीने ठरवलेली असूच नये. माझ्या कल्पनेतील शाळा अशी:-
साधारणतः एखाद्या खेळाच्या तालमीचं, खेलाच्या स्पर्धेचं रूप त्याला हवं.
म्हणजे, सकाळी ७ ते संध्याकाळी ६ ह्या वेळात विविध वर्ग उपलब्ध असतील, ज्याला जे आवडेल त्याने तिथे जाउन बसावे. वर्षाखेरिस कुठल्याही आवडीच्या ५ विषयात काहिएक performance चे बंधन मात्र असावे. विद्यार्थ्याने ते स्वतःहून शिकायचे आहे.
माझ्या बुजरेपणाची व एकाकीपणाची सुरुवात झाली तेव्हा मी आठवीच्या आसपास उगीच गावातून चक्कर मारी. खावेसे वाटले ते खाई.कधी ऐन दुपारी शांत वेळी दूरच्या मंदिरात शांत पहुडण्याचा आनंद काय असतो, ते मला तेव्हाच समजले. कधी गावाबाहेरच्या शेतातल्या लोकांशी गप्पा मारी. सगळं पहायची, फिरायची एक विचित्र हौस होती तेव्हा. असाच फिरत फिरत एकदा आमच्याकडे जुन्या औरंगाबादेत मुस्लिम बहुल भाग आहे, तिथे गेलो होतो. तिथे कुणीतरी फार पूर्वी आमच्याकडे काम करणार्या खाला/मौसी भेटल्या.घरी चल म्हणून कौतुकाने घेउन गेल्या. त्यांच्या व्हरांड्यातच कुणीतरी कोकरु हलाल करीत होते. त्याचा गळा चिरत होते. त्याला थेट एका घावात मारण्यापेक्षा असे रक्त वाहून मारले जाते, त्यालाच हलाल म्हणतात, हे नंतर समजले. दोळे उघडे थेउन, टाचा घ्स्शीत ते मेले. ते नीट मरावे म्हणून त्याची तडफड होत असताना काही जणांनी त्याचे पाय घट्ट धरून ठेवले होते. तेव्हा हे सगळे इतके थेट प्रथमच इतक्या जवळून पहात होतो. तोवर मी नंबर एकचा खादाड असूनही सडपातळ अंगकाठी असल्याने मला कौतुकाने,थट्टेने सगळे " खातय बोकडावनी अन् होतय माकडावानी" असे म्हणत. ह्यानंतर मला कुनी "बोकड", "कोकरु" म्हटल्यास कसेसेच होइ.
पण एकूणात वेळ मस्त जायचा. मनाला वाटेल ते करायचो. घरी समजल्यावर बोलणी बसली थोडी, पण मला जोवर तसे करावेसे वाटले, तोवर मी केले. कसं अगदि हलकं हलकं वाटायचं.
माझ्यासाठी हाही शिक्षणाचा भागच होता असे आता वाटते.
विषय काय, मी लिहितोय काय.
विषयाच्या एखाद्या शब्दातून अचानक मनातील साचलेल्या विचारद्रव ढवलला जातो, गढूळ होउन तळाशी असणारे काहीतरी असे अचानक वर येते. ते लिहून मोकळा होतो. हळूहळू सगळे कसे पुन्हा तळाशी जाते आहे. मी पुन्हा क्रियाविहीन व सामान्य बनतो आहे.
29 Nov 2011 - 12:13 am | रेवती
अगदी सहमत.
लहानपणी सुदैवाने मी फारशी आजारी पडले नाही.
एकदाच आजारपणामुळे शाळा बुडली आणि घरातली अख्खी दुपार कशी असते ते पहायला मिळाले.
सकाळी लवकर शाळेला पळाल्यावर नंतर काय होते ते कधी समजलेच नाही.
आजी आजोबा पूजा करतात, नैवेद्य, वडील हापिसला जातात वगैरे माहित असणे आणि पाहणे यात प्रचंड फरक होता. एकतर मी तिथे होते आणि असूनही नसल्यासारखी होते (झोपून होते म्हणून). दुसर्या दिवशीही माझी इच्छा नाही म्हणून बाबांनी शाळा बुडवायला परवानगी दिली. त्यानंतर आजारपणाने कधीही शाळा बुडली नाही पण घरी आत्ता काय चालू असेल हा विचार कधितरी मनात येऊन जायचा.
3 Dec 2011 - 3:50 pm | आनंदी गोपाळ
म्हंजे रविवारीपण शाळा असायची सकाळी? अन बाकी सुट्या? गणपती, दिवाळी, उन्हाळा सणवार, जयंत्या मयंत्या इ.इ??. कद्धीच नै समज्ल??
29 Nov 2011 - 2:41 am | गणपा
बालवाडी ते १० वी पर्यंत मला दुपारची शाळा मिळाली.
पण खर तर त्याचा वैतागच यायचा. सकाळच्या शाळेतल्या मुलांचा तेव्हा हेवा वाटायचा. मस्त दुपारी सुटले की बाकीचा अर्धा दिवस उनाडायला मोकळा. आम्ही आपले ९ ला कंटाळत आईच्या शिव्या खात उठायचो.
मग थोडावेळ टिवल्या बावल्या केल्याकी १० वाजेतो भुक लागायची. तोवर आईच जेवण तयार असे.
मग जेवलो की इतकी सुस्ती यायची की ज्याचं नाव ते. पण मग आदल्या दिवसाच्या गृहपाठाची आणि बाईंच्या धपाट्याची आठवण याची. (संध्याकाळी शाळेतुन आल्यावर अभास करायला आम्ही काही स्कॉलर नव्हतो.) तो कसाबसा पुर्ण होईस्तो शाळेची वेळ झालेली असायची. मग १२ ते ६ शाळा. घरी येता येता ७ - ७:३० वाजायचेच. (लांब होती शाळा.) घरी येऊन खेळायला जाव तर तो वर सगळ्या मित्रांचा खेळ आटोपलेला असायचा.
पण आता लेकीला सकाळी ६:३०-७ ला उठवताना जीवावर येतं. आता थोडी फार थंडी पडायला लागेल. अश्यावेळी मुलांना झोपेतच उचलून दात घासा, आंघोळ करा ते पार तयारी करेपर्यंत बिचार्यांची झोप काही उडलेली नसते. (आमची बया परिक्षेच्यावेळी तर लवकर लवकर पेपर सोडवून चक्क हेड डाऊन करुन झोपुन जाते.)
त्यामुळे निदान प्राथमिक शाळांचे वर्ग दुपारीच असावेत या मताचा मी आहे.
29 Nov 2011 - 8:29 am | रेवती
हा हा हा.
तुझ्या कन्येला बरोबर समजलय, आत्ता काय महत्वाचं आहे ते.;)
29 Nov 2011 - 9:18 am | मदनबाण
मोठे वर्ग सकाळी अन लहान वर्ग दुपारी असे असावेत हा आहे.
दफोरावांशी सहमत...
29 Nov 2011 - 10:13 am | प्रभाकर पेठकर
लहानपणी शाळा हवीच का? असा प्रश्न मला नेहमीच पडायचा. पण नाईलाज होता, जायला लागायचेच.
पुढे मोठेपणी एकदा मेंदूच्या कार्यक्षमतेबद्दल काही वाचनात आले. ते जर खरे असेल तर ही विभागणी योग्यच असेलसे वाटते.
आपला मेंदू सकाळी दहा/साडेदहापासून जेवणापर्यंत (दुपारी एक?) ताजातवाना असून दिवसभरातील सर्वात गुंतागुंतीच्या बौद्धीक समस्यांना चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. दुपारी जेवल्यावर मेंदूला शैथिल्य येते. पुन्हा दुपारी ३ ते साडेपाच मेंदू तरतरीत असतो. पण तरीही सकाळच्या सत्रातील क्षमता जरा जास्तच असते.
लहान मुलांना शिक्षणातल्या सर्व गोष्टी प्रथमच कळत असतात, पाया घडत असतो. त्यामुळे त्यांना सकाळच्या सत्रात त्या आत्मसात करणे सोपे जाते. संध्याकाळी गृहपाठ करून, तौलनिक दृष्ट्या कमी तरतरी असताना, आयुष्यातल्या प्राथमिक शिक्षणाला पक्के करणे मेंदूला शक्य होते.
माध्यमिक शिक्षणाच्या पातळीला पोहोचे पर्यंत विद्यार्थ्याचा मेंदू ग्रहणशक्ती वाढवून 'प्रशिक्षित' झालेला असतो. त्यामुळे नविन शिक्षणातल्या गुंतागुंती जास्त समर्थपणे (समजण्याच्या दृष्टीने) हाताळू शकतो. ह्या वयापासून मिळविलेले ज्ज्ञान त्याला जन्मभर उपयोगी पडणार असते. गृहपाठाचा वाढता बोजा (आकारमान आणि दर्जा) हाताळण्यासाठी मेंदूला सकाळची वेळ (जेंव्हा मेंदूची क्षमता जास्त असते) जास्त सुयोग्य असावी असे वाटते.
ह्याच्याही पुढे जाऊन, पुढील आयुष्यात नोकरी, व्यवसाय करताना. जास्त गुंतागुंतीच्या समस्या सकाळच्या सत्रात सोडवाव्यात. महत्त्वाच्या व्यावसायिक बैठकी सकाळी साडे दहा ते एक ह्या वेळेत घ्याव्यात असे त्या लेखात दिले होते.
ह्या सर्व विवेचनाचा अर्थ सकाळच्या वेळात मेंदू काम करतो नंतर तो कामच करीत नाही असे नाही. मेंदू २४ तास काम करीत असतो. फक्त त्याच्या दिवसभरातील क्षमतेत चढ-उतार असतात. असा त्या लेखाचा सारांश काढता येईल.
29 Nov 2011 - 2:03 pm | गणपा
काकांचा मुद्दा बसाचसा पटला.
(तरीच आमचं बेसीक कच्चं राहिलय.)
29 Nov 2011 - 7:32 pm | रेवती
मलाही मुद्दा पटला. निदान ९ वाजताची शाळाही चालू शकेल पण नोकरीवाल्या पालकांचा प्रश्न उभा राहील.
सकाळी मेंदू तरतरीत असणे आणि त्याच वेळात महत्वाची कामं केली गेली की दिवस कसा पदरात पडल्यासारखा वाटतो.
आजकाल खरच हे सगळं होण्यासाठी रात्री वेळेवर दिवस संपवला जातो का? टिव्हीवरचे कार्यक्रम, हापिसातून उशिराने येणे, साडेनऊ दहाची जेवणे असे असल्यावर मुलेही उशिरा झोपतात. सकाळी मग उठवत नाही.
29 Nov 2011 - 10:58 am | ५० फक्त
शाळा सकाळी असलेलीच चांगली, एकदम बेस्ट प्रकार आहे तो. दिवसभर पोरं मोकळी दंगा करायला, टिव्ही बघायला, कारण असाही जो कॉमन वेळ मिळतो आई बापाबरोबर तो संध्याकाळीच, सकाळी आई बापाच्या ऑफिसला जाण्याच्या गडबडीत पोरांची शाळेची गडबड अॅडजेस्ट करणं अवघड होतं. त्यापेक्षा एक गडबड सकाळी सातच्या आत, दुसरी नउ ते दहा, मग दुपारी पोरं घरी आली की जे करायचं आहे ते १२ ते ६ पर्यंत करुन मोकळे, पुन्हा सातला आई बाप आले की एकत्र कुटुंबाचा दंगा करायला सुरु.
29 Nov 2011 - 2:18 pm | गवि
मुद्दा १०० टक्के मान्य आहे पण माझ्या आसपास पाहतोय तर तुम्ही वर्णन केलेलं असं काही कन्व्हेन्शन दिसत नाहीये. लहान मुलांची शाळा दुपारी (११.४५) आणि मोठ्यांची सकाळी असाच क्रम दिसतो आहे.
कदाचित गावागावानुसार आणि शाळेशाळेनुसार हा पॅटर्न बदलत असेल.
(ज्यु केजी पाल्याचा पालक) - गवि
29 Nov 2011 - 2:35 pm | पाषाणभेद
तसंही असेल कदाचित पण महाराष्ट्रातील बहुतांशी शाळांच्या वेळेचा क्रम चुकलेला आहे. मोठे वर्ग नेहमी दुपारी असतात.
29 Nov 2011 - 4:02 pm | चिगो
वेळ आल्यावर विचार करु... (तसेही पोरं मला "शाळेत जावुन (सकाळच्या असो का दुपारच्या) तुम्ही काय असे झेंडे गाडलेत?" असं विचारतील, हीच मला भिती वाटते..)
शाळा कधीचीही असो, दंगा करायला मिळायला पाहीजे..
29 Nov 2011 - 4:17 pm | ५० फक्त
''वेळ आल्यावर विचार करु..''''
वेळ आल्यावर विचार करायला वेळच मिळणार नाही असे प्रश्न आहेत हे, पोरांच्या अॅडमिशन नेहमी निम्मा पगार आयकरात जायच्या वेळी आणि अॅप्रायझलच्या टेन्शनच्या महिन्यात का येतात हा एक न सोडवता आलेला प्रश्न आहे.