जिज्ञासूंसाठी हा आधीचा भाग -
http://www.misalpav.com/node/2432
पोळपाट-लाटणं हे स्वैपाघरातलं एक अत्यावश्यक आयुध मानलं जातं. पण सुदैवानं अ आणि मी दोघींनाही पोळ्या नावाच्या प्रकारात यत्किंचितही इंट्रेष्ट नव्हता - नाही. पोळी तव्यावर उलटली की त्यातल्या वाफेचा जो एक विशिष्ट वास येतो, त्यानं मला भरल्या पोटी मळमळूही शकतं - इतकी माझी नावड टोकाची आहे. अ लाही असंच वाटतं, हे कळल्यावर आपण योग्य रूममेटच्या घरात पडल्याचं माझ्या लक्षात आलं आणि सुमारे अडीच महिने कणीक नावाचा पदार्थ आम्ही दुरूनही पाहिलाही नाही. भाताचे विविध प्रायोगिक प्रकार, पोहे-उपमा-थालिपीठ ही त्रयी, कधीमधी उकड-मोकळ भाजणी-धिरडी (होय, होय, धि-र-डी. प्लीज डोण्ट अंडरएस्टिमेट मी, ओके?) आणि भाकर्या (विश्वास ठेवणं अवघड जात असलं तरीही, मला उत्तम भाकर्या करता येतात. हवं तर अ ला विचारून खात्री करून घ्या. मला कुचकामी ठरवण्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊन खोटं बोलू शकते. पण माझ्या हातची भाकरी खाऊन तिनं तीन महिन्यांच्या इडलीचा वनवास संपल्याची जी मुद्रा केली होती, ती ती स्वत:ही विसरलेली नाही. - शिवाय अजून तरी स्वैपाघर माझ्या हातात आहे, हे ती समजून आहे.) यांवर आमचं उत्तम चाललं होतं.
पण परमेश्वराला का कुठे असं पाहवतं?
अ चे आईबाबा आमची 'वेवस्था' पाहायला येण्याचं ठरलं आणि अ च्या आईचा फोन आला.
साधारण संभाषणाचा तजुर्मा येणेप्रमाणे:
आहे का सगळं स्वैपाघरात, की आणू काही भांडीकुंडी?
कशाला भांडी-बिंडी? चितळ्यांची बाकरवडी आण तितक्याच वजनाची न विसरता.
जळ्ळं लक्षण. पोळपाट घेतलात का?
अग, नाही लागत आम्हांला. ब्रेडचा शोध लागलाय की.
हो का? बाबांनापण पाव-भिस्कुटं खायला घालू का आठ दिवस?
चालेल. व्हीट ब्रेड मिळतो ना हल्ली.
निर्लज्ज आहे गधडी. मी घेऊन येते. घरात एक जास्तीचा आहे पोळपाट.
बरं. मला काय... आण. तुलाच ओझं होईल, म्हणून नको म्हणत होते. नाहीतरी तूच आणणार, तूच करणार... बाकरवडीचं विसरू नको हां.
काकूंनी फोन टेवला असावा. कारण अ खांदे उडवून परत लोळायला लागली.
तर अशाप्रकारे आमच्याकडे पोळपाट-लाटणं, कणीक भिजवण्यासाठी परात आणि कणकेसाठी एक मोठा डबा आला. सोबत काही झाकण्या (सगळं तस्सं उघडं-वाघडं टाकतात कार्ट्या-), एक नवीन चिमटा (हा चिमटा अगदी लापट आहे. थांब, मी चांगला बघून आणते-), तेलाचा कावळा (गधडे, बाटलीनं ओततात तेल तव्यावर? बाटली वितळली म्हणजे? - अग, वितळली होती एकदा. मग सॉलिड मजा यायची किचनमधे फिरताना-), किसणी (अगबाई, परवा चतुर्थी आहे की -) अशी काही पूरक खरेदी इथल्या दुकानदाराकडून झाली. माझ्या स्वैपाघरात इकडच्या गोष्टी तिकडे, तिकडच्या इकडे अशी बरीचशी निरर्थक आवराआवरी झाली. (आठ दिवस इकडची काडी तिकडे न करता आयतं खायला मिळण्याची ही किंमत अगदीच मामुली आहे.)
पाहुणे गेले. पोळपाट-लाटणं उरलं.
तरी आम्ही काही पोळ्या-बिळ्यांचं मनावर घेतलं नव्हतं. पण आमच्या घरात यथावकाश ब चा शिरकाव झाला. आणि रोज संध्याकाळी तिची - 'हे काय, आजपण भात?' अशी केविलवाणी पृच्छा सुरू झाली. (तिला यायला उशीर होत असल्यामुळे स्वतः काही करण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे तिचा आवाज फक्त केविलवाणा होता हे सांगणे न लगे.) आणि मग - 'च्यायला, पोळ्या-पोळ्या आहे काय? मला भाकर्या येतात. पोळ्या न यायला झालंय काय?' असा दमदार आवाज काढून अखेरीस मी कणकेला हात लावला.
नंतर साधारण साडेतीन दिवस आम्ही तो पदार्थ पुरवून पुरवून खात होतो.
हळूहळू कणकेचं तंत्र जमलं. कणीक अर्धा तास आधी भिजवून ठेवली, तर पोळ्या मऊ होण्याची शक्यता निर्माण होते, हे लक्षात आलं. पोळ्या गोल दिसायला लागल्या. मधे पारदर्शक आणि कडेनं दुपटी, असं होण्याचं प्रमाण कमी झालं. 'तू तिकडून ओढ, मी इकडून ओढते' असं न करताही त्या तुटायला लागल्या. स्फुरण चढून मी घडीच्या पोळ्यांना हात घालण्याइतकी धाडसी झाले. नानसारखा आकार बदलून त्याही हळूहळू गोल व्हायला लागल्या. आणि एक दिवस -
अशा का दिसतायत पोळ्या? (बिचकत ब.)
अशा? अशा म्हणजे कशा? (अतोनात उर्मट स्वर. अर्थात माझा.)
न- नाही, म्हणजे जरा रंग वेगळा नाही वाटत? (अजूनच बिचकत.)
जराशी करपली असेल, काही नखरे करू नकोस.
नाही ग.. एकंदरीतच रंग - म्हणजे जरा चॉकलेटी वाटतेय. तू बघतेस का?
अं? चॉकलेटी? होय की ग. चवपण जरा निराळीच वाटतेय, नाही? (माझा आवाज नरमलेला.)
तशा खमंग लागतायत पण... (मधेच तोंड घालून अ. म्हटलं ना, तिला पोळ्या या प्रकरणाबद्दल अक्कल जरा कमीच.)
अशा प्रकारे 'भाजणीच्या पोळ्या' या नव्या प्रकाराचा शोध आम्ही (आत्मवाचक आदरार्थी बहुवचन. गैरसमज नको.) लावला.
ही पाककृती -
कणीक आणि भाजणी जेवढ्यास तेवढी घ्यायची. तेल, मीठ आणि पाणी घालून कणीक मळायची. हवा असल्यास थोडा ओवा (ओव्याला कन्नडमधे 'ओमम्' म्हणतात!) आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. (ही अर्थातच थर्ड व्हर्जनच्या वेळी केलेली ऍडिशन.) नेहमीसारख्या पोळ्या करायच्या. तूप सोडून भाजल्या, तर अप्रतिम लागतात. त्याच्याशी तोंडी लावायला भाजून लसणासोबत चुरडलेली मिरची आणि सायीचं दही. (हे काय तोंडीलावणं केलं आहेस? त्यात लोळावंसं वाटतंय, इतकं सेक्सी लागतंय . इति अ.)
उग्गीच नाही मी स्वतःला सर्जनशील म्हणवत.
प्रतिक्रिया
14 Jul 2008 - 10:12 am | मनिष
भाजणीच्या पोळ्यासारखे हे पण एकास-एक प्रमाणात टाकलस की काय?
ह.घ्या! :) :)
14 Jul 2008 - 10:16 am | मेघना भुस्कुटे
अरे, चुकून. :(
तात्यांना व्यनि लिहिलाय 'खोडता का' म्हणून.
14 Jul 2008 - 10:33 am | विसोबा खेचर
आत्ताच व्य नि पाहिला आणि जादा लेख काढून टाकला. परंतु जरा घाईच झाली त्यामुळे त्या लेखाला दिलेला मनिषचा प्रतिसादही उडाला. लक्षात नाही आलं!
हे अनवधानाने घडलं आहे. मनिषची मनापासून क्षमा मागतो..
तात्या.
14 Jul 2008 - 10:44 am | विद्याधर३१
आज आषाढी एकादशी....
इथे साबुदाणा वड्याची वाट बघतोय आणी हे काय पोळ्या वगैरे....
स्वगत: इकडे पाककृती बघून आज उपास मोडणार वाटते. :SS :SS :SS
विद्याधर
14 Jul 2008 - 10:53 am | विसोबा खेचर
इथे साबुदाणा वड्याची वाट बघतोय
साबुदाणावडा मुखपृष्ठावर ठेवला आहे तो ग्रहण करावा! :)
आपला,
(वारकरी!) तात्या.
14 Jul 2008 - 11:09 am | विद्याधर३१
त्या इ-वड्यामुळेच तर सपाटून भूक लागली आहे.. बारा कधी वाजताहेत याचीच वाट बघतो आहे. =P~
विद्याधर
14 Jul 2008 - 10:46 am | बेसनलाडू
अरळ चकल्यांसारखे लेखन.चवदार वाटले.येऊ द्यात आणखी
(खुसखुशीत)बेसनलाडू
14 Jul 2008 - 11:12 am | विद्याधर३१
हे अरळ चकल्या काय प्रकार आहे?
आपला
(अचंबीत) विद्याधर
14 Jul 2008 - 11:21 am | बेसनलाडू
खुसखुशीत,अरळ चकल्या = मऊ पडून वातड/चिवट झालेल्या नाहीत आणि चावताना फाइट मारावी लागेल इतक्या कडकही नाहीत; आदर्श,कुरकुरीत चकल्या :)
(चवदार)बेसनलाडू
15 Jul 2008 - 12:05 am | चतुरंग
एका दुकानात मऊ पडून लेमळ्या झालेल्या चकल्या दुकानदार मीटरच्या भावाने विकत असल्याचीही एक वदंता कानावर आली होती! ;)
चतुरंग
14 Jul 2008 - 11:26 am | मनस्वी
मस्तच मेघना.. आवडलं एकदम.. अजून येउदेत..
मनस्वी
"केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा."
14 Jul 2008 - 11:49 am | झकासराव
तू तिकडून ओढ, मी इकडून ओढते' असं न करताही त्या तुटायला लागल्या>>>.
=))
पण नवीन पाककृती चांगली आहे अस वाटतय.
:)
छान लिहिताय.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
14 Jul 2008 - 11:59 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मला पण आता अशा पोळ्या करून बघायची सुरसुरी आली आहे.
आणखी एक टीपः घावन, भजी/वड्यांचं आवरण, इत्यादींमधे बेसन / तांदूळाच्या पीठाबरोबर थोडा रवा आणि/किंवा थालीपीठाची भाजणी घातली तर अधिक कुरकुरीतपणा येतो.
चवीपरीने खाणारी संहिता.
14 Jul 2008 - 12:06 pm | सहज
दुसरा भाग लवकर टाकल्याबद्दल धन्यवाद. पाककृती हा लेखनाचा उपप्रकार म्हणुन जरुर निवडावा.
नावडत्या पालेभाज्या आम्ही ब्लँच करुन मिक्सरमधुन काढून आले लसुण मिरची पेस्ट टाकून त्या कणकेत टाकून वेगवेगळे "पोळीरोल" बनवुन त्यात रायता टाकून खातो. नावडत्या नुस्त्या भाज्या खाण्यापेक्षा ही एक सहज जमु शकणारी तडजोड.
पुढला पत्ता कुठला येतो बघु. :-)
अवांतर - फूडप्रोसेसर मधे कणिक २ मिनिटात सुंदर मळली जाते. नक्की ट्राय करा.
14 Jul 2008 - 12:32 pm | नंदन
पुढच्या भागांची वाट पाहतो.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
14 Jul 2008 - 12:55 pm | सैरंध्री
छान लिहीलंत, आवडलं
सैरंध्री
14 Jul 2008 - 6:46 pm | वरदा
सह्ही प्रयोग.....
अजुन लिही..मज्जा येतेय्...तुझी लिहिण्याची स्टाईल एवढी छान आहे की रुम वर असल्यासारखं वाटलं ...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
14 Jul 2008 - 7:18 pm | प्राजु
मेघना तुझी लेखन शैली खास आहे. पुढचे भाग लवकर लिहि.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Jul 2008 - 12:11 am | चतुरंग
मस्त लिखाण!
सुगरणीचा स(ह)ल्ला आवडला! ;)
चतुरंग
15 Jul 2008 - 7:47 am | मेघना भुस्कुटे
धन्यवाद मंडळी!
संहिता, नक्की करून पहा आणि कळव कशा होतात ते. :)
सहज, भाज्या खायची ही आयडिया चांगली आहे. ट्राय करून पाहीन, पण माझ्याकडे मिक्सर नाही ना. :( मला सुरी चालवावी लागणार.
15 Jul 2008 - 8:23 am | विसोबा खेचर
उग्गीच नाही मी स्वतःला सर्जनशील म्हणवत.
हा हा हा! :)
मस्त, खुसखुशीत लिखाण! :)
मेघनाताई, येऊ द्या अजून...
तात्या.
19 Aug 2008 - 4:19 pm | भडकमकर मास्तर
अरे ..हा लेख वाचायचा चुकला होता,....
मस्त झालाय...
....
ती पाककृती ( भाजणीची पोळी) पण करून पाहीन एकदा...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
20 Aug 2008 - 12:54 am | धनंजय
खुसखुशीत लिखाण.
पोळ्या मात्र मला जमत नाहीत, त्यामुळे हा प्रयोग बहुधा करणार नाही.