गाभा:
मंडळी,
या टुकार धाग्यासाठी क्षमस्व.
मी जालावर मंगेश पाडगांवकरांची "दर्शन" ही कविता शोधतोय परंतू सापडत नाही. कवितेची सुरुवात "मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन" अशी आहे.
काही ओळी मला पुसटशा आठवत आहेत.
तू नाहीस? या वसंतातून कोण फुले मग
तू नाहीस? दवबिंदूत का मग झगमग झगमग
होत्या लाटा उधळीत आपुल्या फेनिल त्या कविता (?)
फुलाफुलातून अखंड उमलत होती ती नवता (??)
तुला पाहिले ऋतू-ऋतूतुन, स्थितीगतीतून... इत्यादी.
कुणाकडे ही कविता पुर्ण उपलब्ध असल्यास इथे टंकू शकाल काय?
धन्यवाद.
प्रतिक्रिया
11 Oct 2011 - 6:03 pm | ५० फक्त
तेच म्हणलं, तुम्ही काथ्या कधी पासुन कुटायला लागलात ? इथं असावी पण माझ्याकडे फाँट चा काहीतरी लफडा आहे.
http://www.loksatta.com/daily/20050216/ch08.htm
11 Oct 2011 - 6:33 pm | धन्या
धन्यवाद.
हा दुवा मी पाहीला होता. परंतू माझ्याकडेही फाँटची अडचण आहे. आणि तसंही तिथे पुर्ण कविता नाही असं वाटतंय. गुगलच्या रीझल्टसेटमध्ये तसं स्पष्ट दिसतंय. :)
12 Oct 2011 - 12:23 pm | प्रचेतस
इथून मिलेनियम वरूण फाँट उतरवून घ्या.
http://www.loksatta.com/old/font_help.htm
उतरवल्यावर मग लोकसत्ता व्यवस्थित उघडेल आणि उघडल्यावर ती कविता तेथे नाही तेही दिसेल. ;)
12 Oct 2011 - 1:59 pm | धन्या
ती कविता तेथे नाही हे आम्हाला गुगलच्या शोध-निकालांवरुनच कळले होते. ;)
12 Oct 2011 - 12:17 pm | जागु
माझ्या कडे मंगेशपाडगावकरांचा एक कविता संग्रह आहे. संध्याकाळी बघते त्यात मिळते का ही कविता.
12 Oct 2011 - 2:02 pm | धन्या
नक्की शोधा. :)
12 Oct 2011 - 12:24 pm | गवि
यावरुन आठवलं. या धाग्याच्या निमित्ताने विचारतो.
"वगैरे" अशा शब्दाने शेवट होणारी एक कविता पंधराएक वर्षांपूर्वी कोणीतरी दिलेल्या एका रफ कागदाच्या तुकड्यावर छापलेली वाचण्यात आली होती. कोणाची आहे आणि पूर्ण शब्द नेमके कसे आहेत ते सांगितल्यास आभारी होईन.
अमुक होते कधी तमुक होते.. अशा प्रकारच्या चार ओळी आणि पाचवी वगैरे ने शेवट होणारी.
कविता जाम आवडली होती. कागद त्याचवेळी जीर्ण होता आणि हरवलाही.
पण इतकेच त्रोटक आठवते आहे. ते खाली देतोय.. शेवटचे कडवे मात्र बरेच लक्षात आहे.
उदा.
...............
...............
...............
पण मी नसतो भक्त वगैरे.
...............
...............
...............
..............
पण ते नसते प्रेम वगैरे
शेवटच्या कडव्यातः
रंगीत असले धुके धराया
सार्थ शब्द हे अपरे वाया
त्या पलिकडला दिसे जरासा
एक बरासा
फक्त वगैरे..
शब्द उलटसुलट झालेले असू शकतात..
12 Oct 2011 - 4:55 pm | जे.पी.मॉर्गन
वैभव जोशींची ही कविता "खुपते तिथे गुप्ते" मध्ये सचिन खेडेकरांनी केवळ अप्रतीम म्हणली होती.
हा बघा तिचा दुवा !
जे.पी.
12 Oct 2011 - 5:25 pm | गवि
कुठली? ती "वगैरे" वाली? मला वाटतं ती कुसुमाग्रज किंवा समकालीन आणि त्या लेव्हलच्या ज्येष्ठ कवीची असावी. जुनी आहे बरीच.
12 Oct 2011 - 7:23 pm | जे.पी.मॉर्गन
>>कुठली? ती "वगैरे" वाली?<<
हीच ती कविता का कल्पना नाही. पण ही सुद्धा छान आहे. आणि खेडेकरांनी छान म्हटली आहे. तुम्ही वगैरे ने शेवट होणार्या कवितेबद्दल म्हणालात तेव्हा मला पटकन हीच आठवली.
जे.पी.
12 Oct 2011 - 12:32 pm | गवि
इनफॅक्ट धवांनी म्हटल्याप्रमाणे हा धागा अजिबात टुकार नाही. या छोट्या धाग्याच्या निमित्ताने खूप जणांना अनेक "हरवलेली" गाणी किंवा कविता शोधायला मदत होईल. वर एक दिली आहेच.
अजून काही:
"देव भाकरीशिवाय कशाकशातही नाही" असे शब्द ज्यात येतात अशी कविता कम गाणं गाताना फार पूर्वी टीव्हीवर एका वृद्ध व्यक्तीला जाताजाता पाहिलं. गाणं फार आवडलं. नंतर कुठेच सापडलं नाही. "देव देव्हार्यात नाही" हे जवळ जाणारे शब्द सापडले पण ते गाणं वेगळं आहे. बरंच आर्त गाणं होतं.
बोरकरांची "देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे" हे एवढेच शब्द माहीत आहेत आणि पूर्ण कविता माहीत करुन घ्यायची आहे. ही जालावर सापडावी बहुधा. बघतो प्रयत्न करुन.
12 Oct 2011 - 2:11 pm | प्रचेतस
ते गाणे संत तुकडोजी महाराजांचे नव्हे का?
देव अशाने भेटायचा नाय रे, देव बाजारचा भाजीपाला नाय रे.
लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव, सोन्याचांदीचा देव त्याला लुटायचं भेव.
असे काहिसे शब्द होते. भारूड सदृश चाल आहे. अजूनही रेडियोवर सकाळी सकाळी हे गाणे लागते.
12 Oct 2011 - 2:25 pm | मेघवेडा
अतिशय सुंदर कविता आहे. आंतरजालावर सापडेलच. या कवितेच्या शेवटच्या दोन कडव्यांनी नेहमीच भरून येतं.
ही दोन्ही कडवी स्वतः बाभंच्या बाबतीत तंतोतंत लागू होतात.
कविता पानोपानी ब्लॉगवर आहे ही कविता. ब्लॉगस्पॉट हापिसात उघडत नसल्याने लिंक देता येत नाही.
13 Oct 2011 - 11:21 am | मराठी_माणूस
मिपा वर पुर्वी एक कविता आली होती. उसगावला राहणार्याचे मनोगत होते. परत यायचे आहे पण हिरव्या नोटेचा मोह सुटत नाहे असे काहीसे त्यात होते . ति लिंक कोणी देउ शकते का ?
(@ऋषिकेशः लिंक बद्दल धन्यवाद. जिथे लिंक पाठवली तिथे प्रतिसाद देतान "पेज नॉट फाउंड" अशि एरर येते म्हणुन इथेच आभार मानत आहे)
12 Oct 2011 - 4:13 pm | गणेशा
धना,
शनिवारी घरी गेल्यावर माझ्याकडील पुस्तकात आहे का ते पाहतो..
12 Oct 2011 - 4:29 pm | गणेशा
तु दिलेली कविता शोधताना ही कविता मिळाली छान वाटली म्हणुन देत आहे ...
नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं
जेवताना आजोबा लाडात येत,
मला आपल्या ताटातली भकर देत;
जेवता जेवता मधेच थांबत
आणि एक भला मोठा ढेकर देत !
मी म्हणायची रागवूनः
“आजोबा, बॅड मॅनर्स,
व्हॉट आर यू डुइंग?”
आजोबांचं हसून उत्तरः
“आय अॅम जस्ट ढेकरिंग !”
आजोबांच्या खोलीत आता
धुकं… धुकं… धुकं…
आजोबांचं जग सगळं
मुकं…मुकं…मुकं…
आजोबांना पडलं होतं भलंमोठं टक्कल !
आजोबा म्हणायचेः
“ज्याला असं टक्कल
त्यालाच असते अक्कल !”
मी खिजवून म्हणायचोः
“आजोबा, यमकासाठी
घ्या आता बक्कल !”
आजोबा मोठयाने ओरडून म्हणतः
“अरे साल्या यमक्या,
मला देतोस धमक्या?यमकांच्या धंद्यामधे
मी आहे खमक्या !”
आजोबांच्या खोलीत आता
धुकं… धुकं… धुकं…
आजोबांचं जग सगळं
मुकं…मुकं…मुकं…
आजोबा आपल्याच नादात
स्वतःशीच गात असत,
गाता गाता मधेच थांबून
स्वतःशीच गोड हसत !
मी जवळ गेले की
मला म्हणतः
बेटा एक लक्षात ठेवः
एकटं एकटं जाता आलं पाहिजे;
स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे !”
मी गोंधळून विचारीः
“म्हणजे काय?”
आजोबा मोठयाने हसून म्हणतः
” म्हणजे काय? म्हणजे काय?
म्हणजे नाकात दोन पाय !”
आजोबांच्या खोलीत आता
धुकं… धुकं… धुकं…
आजोबांचं जग सगळं
मुकं…मुकं…मुकं…
“आजोबा, एक गोष्ट विचारु?”
“विचार बेटा!”
“आजोबा, तुम्हांला मैत्रिणी होत्या का हो?”
“वा! वा! होत्या म्हणजे होत्याच की !
एक ती अशी होती,
दुसरी ती तशी होती !”
इतक्यात खोलीत आजी यायची,
आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची !
आजोबा स्वतःला सावरायचे,
चटकन विषय बदलायचे,
घसा खाकरत म्हणायचेः
“बेटा, तुला गीतेमधला
स्थितप्रज्ञ कसा असतो ठाऊक आहे?
चालतो कसा, बोलतो कसा ठाऊक आहे?”
आजोबांच्या खोलीत आता
धुकं… धुकं… धुकं…
आजोबांचं जग सगळं
मुकं…मुकं…मुकं…
आजोबा संध्याकळी
अंगणातल्या झाडाखाली
आपल्या आरामखुर्चीवर
एकटेंच बसत;
एकटक डोळे लावून
दूर कुठे बघत असत…
दूरदूरच्या ढगात असत,
कुठल्या तरी न दिसणा-या जगात असत !!
पाय न वाजवता मी हळूच
तिथे जाई,
त्यांच्या आरामखुर्चीमागे
उभी राही!
काय बघत असतील हे?
मी दूर पाहीः
मला वेगळं काहीसुध्दा दिसत नसे,
तीच घरं…तीच झाडं…
सगळं अगदी तसंच असे !
पाय न वाजवता मी हळूच
परत मागे घरात यायची;
आजोबांची आरामखुर्ची
सावल्यांमधे बुडून जायची !
- मंगेश पाडगांवकर
12 Oct 2011 - 4:47 pm | धन्या
छान आहे यार ही कविता.
12 Oct 2011 - 7:18 pm | प्रचेतस
धन्यवाद रे गणेशा, पाडगावकरांची अतिशय सुंदर कविता हुडकून दिलीस.
13 Oct 2011 - 11:02 am | रत्नागिरीकर
हि कविता मंगेश पाडगावकरांनी स्वतः म्हटली होती त्यांच्या नक्षत्रांचे देणे मध्ये,
हे पहा, साधारण ११:०७ पासुन चालु होते...
धन्यवाद,
चिन्मय कामत
13 Oct 2011 - 11:21 am | मैत्र
सुंदर कविता... बोलगाणी या कवितासंग्रहातली आहे...
13 Oct 2011 - 2:45 pm | गणेशा
अरे वा !
ह कविता संग्रह आहे मग माझ्याकडे.. सर्व वाचल्या गेला नसल्याने राहुन गेली होती म्हणजे.
12 Oct 2011 - 5:16 pm | ५० फक्त
गणेशा जबरा कविता आहे ही, बाबा गेल्यापासुन कवितेंपासुन फार लांब गेलोय अन जास्त जवळ आलो तर फार इमोशनल होईन पुन्हा, या जगात राहायला नालायक होईन म्हणुन जात नाहि हल्ली कवितांच्या जवळ,
पण मिकाप्रेच्या माळराननं आत पासुन हललोय,
यावर नाणेघाटावरुन येताना किसन बरोबर बोलत होतो, एका गाण्यावर बोलता बोलता पुढचं दिसणं अवघड झालं एवढं डोळे भरुन आले होते,
असो,
12 Oct 2011 - 5:16 pm | ५० फक्त
गणेशा जबरा कविता आहे ही, बाबा गेल्यापासुन कवितेंपासुन फार लांब गेलोय अन जास्त जवळ आलो तर फार इमोशनल होईन पुन्हा, या जगात राहायला नालायक होईन म्हणुन जात नाहि हल्ली कवितांच्या जवळ,
पण मिकाप्रेच्या माळराननं आत पासुन हललोय,
यावर नाणेघाटावरुन येताना किसन बरोबर बोलत होतो, एका गाण्यावर बोलता बोलता पुढचं दिसणं अवघड झालं एवढं डोळे भरुन आले होते,
असो,
12 Oct 2011 - 7:24 pm | गणेशा
@ हर्षद ,
मी ही कविता पहिल्यांदाच वाचली, अतिशय छान वाटली म्हणुन दिली..
तुम्हाला तुमच्या भावविश्वात जर कविता न्हेत असेल तर नक्कीच हळवे होउ म्हणुन तिच्यापासुन दूर जावु नका..
तुम्ही एक सिद्धहस्त लेखक आहात .. तरल मनाचे एक खंबीर अस्तित्व आहात .. नक्कीच तुम्ही फक्त इमोशनल होणार नाहीत.. तर त्या इमोशनल तरंगामधील असंख्य स्थित्यंतरे तुमच्या लेखनात उमटतील.. आणि अश्या ह्या कवितेप्रमाणेच तुमचे लेखन ही अनेकांच्या आयुश्याचे प्रतिबिंब बनतील ...
अलिकडच्या बर्याच कवितेला तुमचा रिप्लाय पाहुन छान वाटले होते... फक्त सांगितले नव्हते..
अवांतर :
आणि एक ... काही तरी कारणाने आपले रोजचे रुटीन बदलले/थांबले जाते.. पण त्या काहीतरी कारणाने आपल्याला हवे असलेले बरेच काही ही मिळु शकते. [:)]
12 Oct 2011 - 7:33 pm | धन्या
या वाक्याला मिपावर एक वेगळाच अर्थ, एक वेगळाच आयाम आहे वगैरे वगैरे. ;)
13 Oct 2011 - 9:26 am | ५० फक्त
तो आयाम आहे का व्यायाम आहे, ओ धनाजीराव.
12 Oct 2011 - 8:37 pm | मी-सौरभ
हर्षदः तुमच्या सारख्यांमुळे आज मिपा वर मजा आहे...
तुमी मनाला रुचेल ते करा पण
लिहिते आणि हो कट्टा कर्ते रहा
बाकी कविता मला आवडत नाही कारण तिला पुष्पक आवडतो...
12 Oct 2011 - 8:44 pm | पैसा
कधी तुझ्यास्तव मनात भरते
मेघ पिणारे चांदल नाते
दवात जे घर बांधून राही
पण ते नाही प्रेम वगैरे
तव शरिरातुनी कधी उमलती
लाल किरमिजी हजार ज्योती
त्यात मिळाया पतंग होतो
परी नसे तो काम वगैरे
कधी शिवालय पांघरुनी तू
समोर येता विरती हेतू
मनात उरते मात्र समर्पण
मी नसतो पण भक्त वगैरे
रंगीत असले धुके धराया
सार्थ शब्द हे अपरे वाया
त्या पलिकडला असे जरासा
दिसे बरासा फक्त वगैरे
-कुसुमाग्रज (प्रवासी पक्षी मधली "वगैरे")
12 Oct 2011 - 8:54 pm | गवि
@पैसा
प्रचंड आणि असंख्य धन्यवाद. जुनी आठवण ताजी झाली. मस्त.
12 Oct 2011 - 9:08 pm | गणेशा
मस्तच
13 Oct 2011 - 1:58 pm | धन्या
ईतकी सुंदर कविता इथे दिल्याबद्दल आभार.
13 Oct 2011 - 2:02 pm | मेघवेडा
सुंदरच कविता आहे. मस्त वाटलं एकदम!
12 Oct 2011 - 11:46 pm | जागु
माझ्याकडे त्रिवेणी हा कविता संग्रह आहे. त्यात दर्शन नावाची गझल आहे पण ती तुम्ही म्हणता ती नाही.
काळजांना कोंडवाडे
न्याय ? कुजलेले निवाडे
ही आहे.
13 Oct 2011 - 2:07 pm | दादा कोंडके
मी पण गरम तव्यावर पोळी भाजुन घेतो.
पुर्वी नरसिंह राव पंतप्रधान असताना दुरदर्शनवर रात्री ९चा बातम्याआधी प्रचारपर गाणी लागायची. त्या विडिओत छोटीशी स्टोरी लाईन सुद्धा असायची, एक शाळेत जाणारा मुस्लिम मुलगा एका हिंदु मुलीकडून राखी बांधून घेतो वगैरे. पण ती गाणी मात्र अप्रतिम असायची. एकुण ५-६ गाणी होती. मिळतील का ती गाणी कुठे?