हा सकाळ मध्ये आलेला लेख जरूर वाचा, जसाच्या तसा इथे पेस्ट करत आहे....लेखकाचे नाव आणि जालिय - पत्ता लेखाच्या खाली दिलेला आहे.
आपल्या पंतप्रधानांचे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत दिलेले भाषण भारताच्या दीर्घकालीन हितांना पोषक आहे काय?
कित्येक ठिकाणी एकाद्या देशाच्या सर्वोच्च नेत्याने तोंड उघडण्यापेक्षा ते बंद ठेवणेच त्या देशाच्या दीर्घकालीन हिताचे असते. काल संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बोलताना आपले पंतप्रधान आपले तोंड बंद ठेवण्याबद्दलचे "पथ्थ्य" पूर्णपणे विसरले असेच मला वाटले.
बांगलादेशबरोबरच्या संबंधांतील सुधारणा, आपल्या वाढत्या सामर्थ्यानुसार त्या सामर्थ्याला शोभेशी जबाबदारी उचलण्याची भारताची तयारी, संयुक्त राष्ट्रांच्या घटनेमधील जरूर असलेल्या रचनात्मक बदलांची निकड वगैरे योग्य मुद्दे त्यांनी उपास्थित केले पण त्यांनी एकूण उपस्थित केलेले इतर मुद्दे पहाता एकंदर गोळाबेरीज भारताच्या हितास पोषक होती असे निदान मला तरी वाटले नाहीं.
उदाहरणार्थ, लिबियाशी आपल्याला काय देणे-घेणे आहे? खरे तर तो देश आतापर्यंत पाकिस्तानच्याच जास्त जवळ होता. पाकिस्तानच्या अणूबाँब बनविण्याच्या प्रकल्पात लिबियाने पाकिस्तानला थोरल्या भुत्तोंच्या वेळेपासून भरघोस आर्थिक मदत केली होती व म्हणूनच कीं काय नंतर पाकिस्तानने त्यांना अणूबाँब बनविण्याचे तंत्रज्ञानच नव्हे तर सारी यंत्रसामुग्रीही विकली होती! पाकिस्तानने (कीं डॉ. अब्दुल कादीर खान यांनी) लिबियाला कालबाह्य (Obsolete) यंत्रसामुग्री विकली, ती यंत्रसामुग्री लिबियन लोकांना चालविता आली नाहीं याबाबत "न्यूक्लियर डिसेप्शन" या पुस्तकात उल्लेख आहेत ते पहाता त्यांचा कल कुणीकडे होता हे स्पष्ट होते!
कित्येक वर्षांपासून पाश्चात्य राष्ट्रांविरुद्ध-विशेषकरून अमेरिकेविरुद्ध-मध्यपूर्वेतील राष्ट्रांकडून सातत्याने वापरण्यात येत असलेले दहशतवादाचे तंत्र लिबिया पहिल्यापासून वापरत आलेला आहे. "पॅन-अॅम-१०३" हे विमान लिबियानेच बाँबस्फोट करून स्कॉटलंडवर पाडले होते[*१]! अशा "सद्दाम हुसेन"च्या पठडीतल्या एका जुलमी हुकुमशहाची सद्दी संपविली म्हणून भारताने पाश्चात्य राष्ट्रांचे आभार मानायचे कीं त्यांच्यावर टीका करायची? ट्युनीशिया, इजिप्त या राष्ट्रांच्या पाठोपाठ येमेन, लिबिया, सीरिया, बहरीन अशा अनेक मध्यपूर्वेतील राष्ट्रांमध्ये प्रजा बंड करून उठत आहे. लिबियात "नाटो" राष्ट्रांनी भाग घेतला नसता तर गद्दाफींनी प्रजेचे बंड ठेचून काढले असते. अनेक दहशतवादाच्या कारवाया केल्याबद्दल पाश्चात्य राष्ट्रांचा गद्दाफींवर राग होताच. कदाचित् म्हणूनच संधी मिळताच "नाटो" राष्ट्रें गद्दाफींच्याविरुद्ध बंडखोरांच्या बाजूने उभी राहिली आणि त्यांनी गद्दाफीचे हवाई दल जमीनीवरच निकामी करून टाकले यात नवल ते कांहींच नव्हते. पण त्याबद्दल भारताला कुठल्याही बाजूने बोलायचे कांहींच कारण नव्हते. गद्दाफी हे कांहीं प्रजेने निवडून दिलेले लोकप्रिय अध्यक्ष नव्हते तर पूर्वी एकेकाळी सैन्यात कर्नलच्या हुद्द्यावर असलेल्या या लष्करी अधिकार्याने कुदेताच्यामार्गे[*२] सत्ता बळकाविली होती आणि प्रजेवर अन्याय-जुलूम-जबरदस्ती करून ती सांभाळली होती. त्यांचा भारताला पुळका येण्याचे कांहींच कारण नव्हते आणि नाहीं.
राजकारणापायी भारताला कुठल्या तरी एका बाजूला समर्थन द्यायची गरज निर्माण झाली असतीच तर भारताने बंडखोरांच्या बाजूने उभे रहाणे जास्त सयुक्तिक झाले असते, गद्दाफींच्या नव्हे. मग उगीचच "नको तिथं श्यानपना" करून शत्रू कशाला निर्माण करायचे? केवळ आपण त्यांच्या बाजूचे आहोत असे या मध्यपूर्वेतील राष्ट्रांना दाखविण्याखेरीज आपल्याला त्यात काय मिळाले? आणि आपण कुणाच्या बाजूने उभे आहोत याची या सर्व राष्ट्रांना कांहींतरी पर्वा आहे का? सौदी अरेबिया, संयुक्त अमिराती (अलीकडेपर्यंत दाऊदला आश्रय देणारे यजमानराष्ट्र), इराण[*२], इराक, सीरिया, अशी बहुतेक सर्व राष्ट्रें आपल्यापेक्षा पाकिस्तानलाच जास्त जवळचा मानत होती. मग आपल्याला या राष्ट्रांबद्दल सहानुभूतीपूर्वक धोरण ठेवायची काय गरज आहे?
People in all countries have the right to choose their own destiny and decide their own future असे या आमसभेत जगापुढे मांडणार्या सिंग यांना या लिबिया-सीरिया वगैरेसारख्या देशांतील जनतेने आजपर्यंत आपले भवितव्य कधीच ठरविले नव्हते याची तरी जाणीव होती ना?
त्यांच्यावर तर हुकुमशाहीच लादली गेली होती (आणि आहे)! मग अशा तर्हेने स्वत:च्याच देशातील जनतेवर जुलूम करणार्या (आणि भारताशी फारशी जवळीक कधीच न ठेवलेल्या) या राष्ट्रांकडून आपल्याला काय देणं-घेणं आहे? अशा देशांच्या बाबतीत आपले तोंड बंद ठेवणे हाच मार्ग जास्त सयुक्तिक नाहीं कां?
सीरियाचीही तीच कथा. सध्याचे हुकुमशहा बशार अल-अस्सद (आणि त्या आधीचे हुकुमशहा बशार यांचे वडील हाफेज अल-अस्सद) हे आपल्या प्रजेवर जुलूम करणारे सर्वेसर्वा आहेत. त्यांच्या अन्यायाविरुद्ध जनता जर उठाव करून त्यांची हकालपट्टी करीत असेल तर आपण जनतेच्या बाजूला उभे रहायचे कीं अन्यायी हुकुमशहाच्या? ट्युनीशिया मध्ये सुरू झालेला "अरबी वसंतऋतू" सगळीकडे फैलावतो आहे त्याचा भारताला फायदा असेल तर अशा वसंतऋतूचे भारताने स्वागत केले पाहिजे पण असा वसंतऋतू आपल्या हिताचा नसेल तर त्या विषयावर गप्प तरी राहिले पाहिजे. मग आपल्या पंतप्रधानांनी विनाकारण तोंड कां उघडले?
इस्रायल आणि पॅलेस्टाईनबद्दलही तेच. इथे पॅलेस्टाईनला समर्थन देण्यापर्यंत टाकलेली पावले ठीकच वाटतात. पण आपले पंतप्रधान जेवढे ठामपणे याबद्दल बोलले तेवढे ठामपणे बोलण्याची गरज नव्हती. अमेरिकेने पॅलेस्टाईनला सध्या तरी एका स्वतंत्र राष्ट्राचे स्थान देण्यास मान्यता दिली नसताना आपण असे ठामपणे काय म्हणून बोलायचे? "इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोघांनी परस्परसंमत असा समझोता करून हा प्रश्न सोडवावा, त्याला आमचा पाठिंबा राहील" असे गुळमुळीत निवेदन करणे भारताच्या जास्त हिताचे नव्हते कां?
आज ना उद्या चीनबरोबर आपला संघर्ष अटळ आहे. आपल्यात युद्ध जुंपणारच आहे. त्यावेळी आपल्या बाजूने कोण उभे राहील? सौदी अरेबिया? मध्य-पूर्वेतील इतर तेलोत्पादक राष्ट्रे? मुळीच नाहीं. कुणी उभे राहिलेच (तेही नक्की नाहीं) तर ते राष्ट्र असेल फक्त अमेरिका! युरोपमधील राष्ट्रें त्यांच्या स्वत:च्या दिवाळखोरीमुळे चीनला मस्का लावायच्या तयारीत आहेत. इटलीने आपले ट्रेझरी बॉन्ड चीनला विकायची तयारी दर्शविली आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या विरुद्ध मत व्यक्त करूनच सिंग थांबले नाहींत तर "पॅलेस्टाईनची राजधानी जेरुसलेम असावी" इथपर्यंत बोलून इस्रायलला (आणि अमेरिकेला) दुखवायची काय गरज होती?
इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत पाकिस्तानचाअण्वस्त्र बनविणाचा कहूता प्रकल्प बाँबहल्ला करून उडविण्याच्या योजनेत प्रत्यक्ष भाग घेऊन आपल्याला मदत करण्याची तयारी इस्रायलनेच दर्शविली होते हे आपण कसे विसरू शकतो?
अलीकडे तर चीनची "नियत" जास्त-जास्तच उघड होऊ लागली आहे. चीनने अरुणाचलप्रदेश या आपल्या एका राज्यावरच्या त्याच्या हक्काचा हेका अद्याप सोडलेला नाहीं, त्याने आपल्या सरहद्दीवर चीनच्या बाजूने हमरस्ते बांधलेले आहेत पण आपण बांधायला गेलो तर आपल्याच हद्दीत येऊन आपल्याला तसे करण्याला त्यांचे सैन्य मनाई करते (आणि आपण माघारही घेतो). आपल्या उत्तरेकडील सीमेवर आपल्या जवानांना दमदाटी चालूच असते[*३]. अशा परिस्थितीत उद्या जेंव्हां आपले आणि चीनचे युद्ध पेटेल (ते पेटणारच आहे!) तर आपल्या मदतीला कोण येईल? पाकिस्तान? तो तर वहात्या गंगेत हात धुवून घ्यायला चीनच्या बाजूने आपल्याविरुद्ध युद्धात उतरेल. मध्य-पूर्वेतलाही कोणीही आपली विचारपूस करायलासुद्धा येणार नाहीं. मग त्यांची भलावण करून आणि ते करताना अमेरिकेला आणि इस्रायलला दुखवून आपण काय मिळविले? आपल्या हातात अशाने धुपाटण्याशिवाय कांहींही उरणार नाही!
आजच्याच टाइम्स ऑफ इंडियातील मथळ्यानुसार आपल्या संरक्षणमंत्र्यांनी चीन तिबेट-भारताच्या सीमेवर आक्रमक पवित्र्यासह आपले लष्करी अस्तित्व वाढवत असल्याची कबूली दिली आहे. चीनने तिबेटमधे ५ पूर्णपणे कार्यरत असलेले हवाईतळ व ५८००० किमी लांबीचे हमरस्ते व रेल्वे मार्ग उभारले असून त्यायोगे ३० डिव्हीजन्स (४५०००० सैनिक) आपल्या सीमेवर जलदपणे आणण्याची क्षमता निर्माण केलेली आहे. आपल्या संरक्षणमंत्र्यांनी पूर्वीचा निष्काळजीपणा मान्य केला असून यापुढे त्याला प्रत्युत्तर म्हणून जाणीवपूर्वक आखलेल्या युद्धनीतिनुसार योग्य पावले टाकली जात असल्याचेही सांगितले आहे. या परिस्थितीत आपल्या पंतप्रधानांचे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील भाषण मला तरी आत्मघातकच वाटले.
उद्या महासत्ता (Super Power) बनण्याचे सामर्थ्य असलेल्या देशाच्या नेत्याला आपले तोंड कधी उघडायचे व कधी बंद ठेवायचे याचे भान असले पाहिजे. आणि चुकून नको तिथे तोंड उघडले तर कमीत कमी आपल्या पायाचा अंगठा तरी त्या उघड्य़ा तोंडात घालायचे त्याने टाळावे!
-------------------------------------------------------------------
[*१] या कटाच्या सूत्रधारास जन्मठेपेची शिक्षाही झाली होती पण अलीकडेच त्याला "त्याचा मृत्यूकाल जवळ आलेला आहे" या सबबीखाली ब्रिटिश (कीं स्कॉटिश?) सरकारने अत्यंत संशयास्पद परिस्थितीत दया म्हणून वेळेआधीच मुक्त केले. (पण तो पठ्ठ्या अद्याप जिवंत आहे!)
[*२] अलीकडे पाकिस्तानातील शियांच्या कत्तलीमुळे इराणमधील परिस्थिती जराशी बदलत आहे असे वाटते. तसेच सद्दामनंतरचा इराक सध्यातरी स्वत:च्याच जखमा चाटत आहे.
[*३] या घटनेनंतर जम्मू-काश्मीरचे भूतपूर्व मुख्यमंत्री आणि आजचे एक केंद्रीय मंत्री फारूक अब्दुल्ला (Lion of Kashmir शेख अब्दुलांचे सुपुत्र)यांनी "हिवाळा संपून उन्हाळा येऊ दे मग मी जाऊन चिन्याना असा सज्जड दम मारेन कीं....." अशी "उत्तर" छापातली सिंहगर्जनासुद्धा केली होती. (उन्हाळा आता संपलाच आहे आणि मी बापडा अजून या चिन्यांच्या हृदयात धडकी भरविणार्या आणि त्यांच्या "धोतरांची पीतांबरे" करू पहाणार्या "अललडुर्र" गर्जनेची वाट पहात आहे!) या घटनेचा मला वैयक्तिक पातळीवर एक फायदा झाला कारण मला शाळेत शिकतांना माहीत झालेली पण दरम्यानच्या काळात विसरलेली मोरोपंतांची खालील आर्या आठवली.
कुरुकटकासि पहाता तो उत्तर बाळ फार गडबडला
स्वपरबलाबल नेणुनी बालिश बहु बायकात बडबडला!
सुधीर काळे, जकार्ता (sbkay@hotmail.com)
प्रतिक्रिया
29 Sep 2011 - 7:59 pm | रेवती
हे काय?
काळेकाका मिपाचे सदस्य आहेत.
तुम्ही त्यांची परवानगी घेतली होती काय?
जरा मिपाचे धोरण वाचा ना राव!
धोरण क्र. २.
29 Sep 2011 - 8:31 pm | इष्टुर फाकडा
हे आत्ताच कळत आहे मला. पण तरीही, हा लेख वाचून तो जास्तीत जास्त विचारी लोकांपर्यंत पोहोचावा म्हणूनच इथे सदर लेखकाच्या नावासकट टाकलेला आहे.
उद्देश लोकांना लेखन कळावे हा आहे, श्रेय लाटण्याचा नाही.
याउपर काही चूक असेल तर माफी असावी.
29 Sep 2011 - 8:43 pm | रेवती
माफी नका हो मागू!
चालायचच.
29 Sep 2011 - 7:59 pm | प्रचेतस
उगाचच???
काळे काकांचा प्रतिसाद वाचायला आवडेल.
29 Sep 2011 - 9:49 pm | कोदरकर
भारत, मध्य-पूर्वेतील इतर तेलोत्पादक राष्ट्रे विरोधात जावु नये म्हणुन अशी भुमिका घेत असावा..सोबत जरि नसले तरी विरोधात नसावेत..
देशातंर्गत लांगुल चालन ही एक कारण असु शकते..
29 Sep 2011 - 9:58 pm | मृत्युन्जय
अशा "सद्दाम हुसेन"च्या पठडीतल्या एका जुलमी हुकुमशहाची सद्दी संपविली म्हणून भारताने पाश्चात्य राष्ट्रांचे आभार मानायचे कीं त्यांच्यावर टीका करायची?
जगातल्या अनेक देशातल्या सत्ता एकाएकी उलथायला लागल्या आणि हे सगळीकडे योगायोगाने घडते आहे असे मानणे मला तरी हास्यास्पद वाटते. हे सगळे राज्यकर्ते मुरलेले होते पण तरीही एकाएकी त्यांच्या देशातली एक प्रचंड शक्ती त्यांच्यामागे उभी राहिली याचे कारण काय असु शकते? इतिहासात आजवर घडलेल्या राज्यक्रात्यांचा दाखला द्यायचा मोह इथे होणे स्वाभाविकच आहे. परंतु या सर्व देशांमध्ये या राज्यक्रांत्या वेगवेगळ्या कालखंडात झाल्या होत्या हे विसरुन चालणार नाही. सध्या मात्र अनेक देशांत अश्या क्रांत्या लागण झाल्यासारख्या एकापाठोपाठ होत आहेत्ए सगळे देश अमेरिकेच्या बॅड बूक्स मधले आहेत हा निव्वळ गंमतीशीर योगायोग आहे असे म्हणवत नाही.
देशावर ५० वर्षे राज्य करणार्या आणि देशाचे राजकारण कोळुन प्यालेल्या काँग्रेसला एकाएकी झटके बसायला लागतात. नेहमीच होणारी भ्रष्टाचाराची प्रकरणे एकाएकी बाहेर यायला लागली. एकाएकी सगळा मिडीया एकजूट होउन सरकारवर आग बरसायला लागला, एकाएकी आणि एकापाठोपाठ एक अण्णा हजारे आणि रामदेव बाबा एवढी मोठी जनशक्ती गोळा करु शकले की प्रत्येक गल्लीबोळातुन सरकारविरुद्धा नारे उठायला लागले, लाखोंचा जनसमुदाय जमवुन त्यांच्या सहाय्याने सलग अनेक दिवस आंदोलन उभारले गेले ज्याचा खर्च कित्येक कोटींमध्ये असणे स्वाभाविक आहे, या आंदोलनाला मिडीयाचा अभूतपुर्व पाठिंबा मिळणे, पाठोपाठ नरेंद्र मोदी आणि राहुल गांधीची (जे दोन प्रमुख पक्षांचे पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार असणे मतदारांना अपेक्षित आहे) तुलना होणे, एकाएकी एवढी वर्षे ज्याचा तिरस्कार केला, ज्याला विसा नाकारला त्या नरेंद्र मोदींचा पुळका येणे, त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळणे, या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करायला मला वाटते आपण कमी पडतो आहोत कारण सध्यातरी काँग्रेस बद्दल भलताच असंतोष आहे.
सर्व गोष्टींचा सारासार विचार करता मला तरी असेच वाटते की जर कुठल्यातरी बाहेरील शक्तीला हे सरकार जावे असे वाटत असेल तर मग ते न जाणेच इष्ट. सरकार स्थिर राहणे सध्यातरी आपली प्रायोरिटी असावी आणि त्यामुळे सरकार जर अमेरिकेवर टीका करत असेल तर ती अनाठायी आहे असे वाटत नाही.
बाकी मी काही या विषयावरचा तज्ञ नाही त्यामुळे अजुन अक्कल पाजळत नाही.
29 Sep 2011 - 10:57 pm | मन१
नवीन दिशेवरचा, शांत डोक्याने केलेला तर्क आवडला.
29 Sep 2011 - 10:01 pm | नितिन थत्ते
बिचारे पंतप्रधान !!! राष्ट्रहिताबाबत आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाबाबत ओ की ठो कळत नसताना त्यांना राष्ट्रसंघात भाषण करायला लागते. :) शेवटी ते पडले अर्थशास्त्रातले डॉक्टरेट. परराष्ट्रव्यवहार वगैरे कुठले त्यांना कळायला !!! ;)
काळेकाकांना एक विनंती. त्यांनी पुढच्यावेळी पंतप्रधानांना अगोदर ब्रीफिंग द्यावे. पण ते सुद्धा कदाचित लक्षात राहणार नाही, किंवा ते ब्रीफिंग डोक्यात शिरेल असं नाही. म्हणून पुढील वेळी पंतप्रधानांना भाषण लिहून द्यावे. म्हणजे त्यांच्या कडून अशा चुका होणार नाहीत.
29 Sep 2011 - 10:12 pm | प्रियाली
हा प्रतिसाद वाचून मला नुकत्याच घडलेल्या ज्ञानेश्वर-रामदेवराय संबंधांची आठवण झाली. जाल आणि वर्तमानपत्रे प्रसिद्ध आणि फॅनफोलोइंग असणार्या सुधीरकाकांचे लेख पंतप्रधानांपर्यंत पोहोचवले तर देशाचे राजकारण बदलू शकते असे तुम्हाला वाटते का थत्तेचिच्चा?
29 Sep 2011 - 10:24 pm | नितिन थत्ते
>>सुधीरकाकांचे लेख पंतप्रधानांपर्यंत पोहोचवले तर देशाचे राजकारण बदलू शकते असे तुम्हाला वाटते का थत्तेचिच्चा?
अर्थातच. काय शंका आहे का?
आपण अण्णांना "सुधीर काळे काका सांगतील तेच 'जन'परराष्ट्रधोरण अंमलात आणा" यासाठी उपोषण करायला लावूया. :)
29 Sep 2011 - 10:23 pm | श्रावण मोडक
अनुमोदन!
30 Sep 2011 - 1:39 am | हुप्प्या
पराकोटीच्या काँग्रेसनिष्ठांकडून अशीच प्रतिक्रिया अपेक्षित होती. पत्रातील कुठल्याही मुद्याला उत्तर न देता वैयक्तिक हीणकस शेरेबाजी. लगे रहो चाचाजी!
मनमोहनसिंगाच्या अर्थशास्त्रातील तथाकथित ज्ञानाचा त्याच्या मंत्रीमंडळात वारंवार होणार्या आणि आजवरचे विक्रम मोडीत काढणार्या भ्रष्टाचारावर जसा काही परिणाम होत नाही तद्वत त्या अगाध ज्ञानाचा परदेशी धोरणावरही होत नाही असे उघड दिसते आहे.
ह्या प्रकांडपंडिताला जवळपास प्रत्येक भाषणात मी केवळ सोनिया गांधीच्या कृपेने आणि तिची कृपादृष्टी असेपर्यंतच ह्या पदावर आहे असे अजिजीने का सांगावेसे वाटते बरे? का ही हुजरेगिरी ही त्यांच्या महान अर्थशास्त्रीय संशोधनाचा भाग होती?
30 Sep 2011 - 8:12 am | नितिन थत्ते
शेरेबाजी? उलट कधी नव्हे ती काळेकाकांशी सहमती दर्शवली आहे.
अहो, मी तर मनमोहन सिंगांना काही कळत नाही असंच म्हटलं ना? खरंतर काळेकाकांनच राष्ट्रसंघात भाषण करायला पाठवायला हवं. पण सोनिया गांधींची त्यांच्यावर कृपा नाही म्हणून त्यांनी भाषण लिहून द्यावं असं सुचवलं आहे. (कारण ब्रीफिंग दिलं तर तेही ममोसिंग यांच्या बालबुद्धीच्या डोक्यात शिरेल याची खात्री नाही).
मूर्ख/दुष्ट/अॅरोगंट काँग्रेसी लोकांना काळेकाकांच्या ज्ञानाची किंमत नसेल म्हणूनच तर त्यांचं मत ऐकण्यासाठी अण्णांनी उपोषणही करावं असंही मी सुचवलंय.
अवांतर: काळेकाकांच्या लेखात "तोंड कधी बंद ठेवावे कळत नाही" वगैरे पुरेशी हिणकस शेरेबाजी आहे.
(व्यथित*) नितिन थत्ते
*कोणी टीका केली की अटलबिहारी बाजपेयी "व्यथित" होत असत.
30 Sep 2011 - 10:30 am | श्रावण मोडक
चाचा, अटलबिहारी बाजपेयी हे चुकीचं आहे. अटलजी असं लिहिलं पाहिजे. तुम्ही कॉंग्रेसी असल्याचा आणखी काय पुरावा हवा? ;)
बादवे, चिंतातूर जंतूंनी 'फोर लायन्स'विषयी लिहिलेल्या लेखावर नंदननं प्रतिसाद देताना चित्रपटातील एक संवाद उद्धृत केला आहे. चित्रपटातील व्यक्तीरेखा म्हणते, 'You cannot win an argument just by being right.'
30 Sep 2011 - 10:57 am | मराठी_माणूस
ह्या प्रकांडपंडिताला जवळपास प्रत्येक भाषणात मी केवळ सोनिया गांधीच्या कृपेने आणि तिची कृपादृष्टी असेपर्यंतच ह्या पदावर आहे असे अजिजीने का सांगावेसे वाटते बरे
त्यांचे असे वागणे अत्यंत लांछनास्पद वाटते. (आपण कोट्यावधी लोकांचे प्रतीनिधित्व करतो हे ते बहुतेक विसरतात का?)
ते मालवणचे पण तसेच , ज्या बाळासाहेबांनी कुठुन कुठे नेउन ठेवले ते विसरुन त्यांच्याच बद्दल अनुद्गार काढातात आणि ज्या बाइने अजुन उंबरठ्याच्या बाहेरच ठेवले तिच्या पुढे हुजरेगिरी करतात.
बहुतेक कॉं मधे जायचे असेल तर कणा मोडुनच जायचे अशी अट असावी.
30 Sep 2011 - 10:33 am | ऋषिकेश
१. मु़ळ लेखकाची संमती नसल्यास हे पत्र इथून त्वरीत उडवावे असे माझे मत आहे.
(मात्र मुळ लेखकांचे नाव मिपावरील एका ज्येष्ठ्य सदस्यनामाशी साधर्म्य साधणारे आहे. दोन्ही लेखक एकच आहेत असे गृहित धरता यावे. मात्र तसे नसण्याची शक्यताही आहेच)
२. पत्रात श्री काळे यांनी एक दृष्टीकोन मांडला आहे. वृत्तपत्रात स्वत:ची मते देणे यात गैर काहिच नाहि. ती काहिंना पटतील काहिंना नाही. (हे लेखकालाही मंजूर असेलच). आता प्रश्न येतो स्वतःचे मत मांडताना तथ्यांपासून फारकत घ्यावी का केवळ भावनांनी आपले मत बनवावे. असो.
माझी मते:
दुवा क्रं१ : लिबियाची असलेल्या संबंधांची थोडक्यात ओळख करून देईल
लिबिया हा जगातील ९वा आणि आफ्रीतेलील सर्वाधिक तेलसंपन्न देश आहे. लिबियात जवळजवळ ४१५० कोटी बॅरल्स तेल आहे असा अंदाज आहे. सध्याचा तेलाचा उपाश्याचा दर तितकाच राहिला तर पुढची २३ वर्षे हा देश अखंड तेल पुरवठा करू शकतो. लिबियातील तेल हे मुख्यतः तीन प्रदेशात आहे: सिर्ती, मुरझुक आणि पलाजिअन.
यापैकी एकट्या सिर्तीमध्ये एकूण तेलाच्या ८०% वाटा आहे. मात्र इथून तेल मिळणं तितकंसं सोपं नाही कारण यातील काही मोठ्या तेल खाणींवर गदाफीच्या समर्थकांचा भक्कम कब्जा आहे. त्याच्या विरोधात सशस्त्र कारवाई केली तर ते प्रसंगी तेलसाठ्याला आगही लावू शकतात. (दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी अनेक ठिकाणी असा उपाय केला गेला होता. जर शत्रू यायच्या आत तेलसाठा सील करणे शक्य नसेल तर तो सरळ जाळून टाकण्यात येत असे). त्यामुळे त्यांच्याशी वाटाघाटी करून त्यांच्याकडून तेल मिळवण्यास काही महिने लागू शकतात. याशिवाय दरम्यानच्या अशांततेच्या काळात तेलवाहू वाहनांची मोठ्याप्रमाणात नासधूस झाली आहे, चोऱ्या झाल्या आहेत. अशावेळी तयार होणाऱ्या नव्या सरकारशी वाटाघाटी करून शक्य तितका जास्त फायदा पदरात पाडून घेणे बऱ्याच देशांनी चालवले आहे.
मलाही भारताची 'मध्यममार्गी' / 'अलिप्ततावादी' भुमिका पटतेच असे नाही, मात्र लिबिया आणि आपला काय संबंध असे मात्र आपण म्हणू शकत नाही
भारताला लिबियाचा पुळका नसुन हे तेल बोलते आहे!! :)
सहमत आहे. पाश्चात्य देशांनी शिडे केव्हाच फिरवली आहेत. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स हे या खेळातले प्रमुख खेळाडू असले तरी सध्या तरी इटली, रशिया व चायनानेही जोर आजमाईश चालू केली आहे. इटलीची इएन्आय (ENI) कामाला लागली आहे. त्याचे कर्मचारी पुन्हा रुजू झाले आहेत. झालेल्या नुकसानाची मोजदाद करणे सुरू सुद्धा केले आहे. सिविल वॉर मुळे झालेल्या नुकसानामुळे पुढील काही महिने तरी तेल उद्योग पूर्ववत होऊ शकणार नसला तरी ENI, रेप्सोल, गॅझ्प्रॉम, टोटल, चायना नॅशनल पेर्ट्रोलियम कॉर्प, ब्रिटीश पेट्रोलियम आणि एक्झॉन वगैरे कंपन्यांनी विविध मार्गाने आपापला खुंटा बळकट करायला सुरवात केली आहे. पाश्चिमात्य देशांना लढ्याला पाठिंबा दिल्याचा फायदाही दिसत आहे. नव्या सरकारमधील नेत्यांनी आम्हाला पाठिंबा देणाऱ्यांना अर्थातच चांगली काँट्रॅक्टस मिळतील याचे सूतोवाच केले आहे.
अर्थातच तेल!!!!
नाही वाटत उलट भारताने उघडपणे फुटीरवाद्यांना पाठिंबा देऊन लिबियाच्या तेल उत्खननात ONGC ला काहि स्लॉट मिळतात का ते बघायला हवं :)
धोरण हे (इन गिवन पॉइंट इन टाईम) ठाम हवे. गुळमुळीत राहिल्यास पुढे समझौता झाल्यावर ना इस्त्रायल आपल्याला मित्र समजेल ना पॅलेस्टाईन. आणि एकवेळ इस्त्रायलने मित्र न सम्जून तुलनेने आपल्यान कमी नुकसान आहे. मात्र उद्या पॅलेस्टाईन व त्यामुळे अरबराष्ट्रे आपल्याला शस्त्रु समजू लागली तर तेल + मुलतत्त्ववादी अश्या दुहेरी कात्रीत आपण सापडू. त्यापेक्षा भारताने अशी ठाम भुमिका घेतले हे माझ्यामते योग्यच झाले.
कशावरून?
हा हा हा हा! :) का बरे? अमेरिका का उभी राहिल? अमेरिका भारत चीन युद्ध झाल्यास मधे अजिबात पडणार नाही असे वाटते! चीन अमेरीका यांमधील व्यापार ~$३०० बिलियन होता. यावर अमेरिका का पाणी सोडेल?
सहमत आहे. मात्र यावेळी त्यांनी भाषणात (लिबिया धोरण सोडल्यास) चुक केली असे वाटत नाही
30 Sep 2011 - 9:00 pm | प्रदीप
दोन ओळींचा प्रतिसाद देता येतो हे किती चांगले आहे! ऋषिकेशने जे लिहीले आहे, त्यात अजून कसलीही भर मला घालायची नाही.
4 Oct 2011 - 12:21 pm | मदनबाण
हा हा हा हा! का बरे? अमेरिका का उभी राहिल? अमेरिका भारत चीन युद्ध झाल्यास मधे अजिबात पडणार नाही असे वाटते! चीन अमेरीका यांमधील व्यापार ~$३०० बिलियन होता. यावर अमेरिका का पाणी सोडेल?
अमेरिकेला चीन आता डोईजड होवु लागला आहे,चीन ची आर्थीक ताकद देखील आता अमेरिकेच्या पुढे जाते आहे काय असे वाटायला लागले आहे !(ती आर्थीक ताकद चीनकडे निर्माण झाली आहे असे मला तरी आत्ता वाटते.)चीनकडे आजच्या घडीला ३ ट्रीलियन कॅश रिसर्व्ह आहे असे मानले जाते.
आर्थीक आणि सामरिक दॄष्ट्या चीन हा अमेरिकेला शह देउ शकेल या स्थितीत पाहणे हे अमेरिकेला रुचणारे नाही. आशिया खंडात चीनचा वाढता दबदबा हिंदुस्थानाला नव्हेच तर अमेरिकेला देखील चिंतीत करणारा आहे.
सायबर विश्वात चीन ने घेतलेली आघाडी ही सुद्धा मोठ्या चिंतेची बाब असुन्,हल्लीच अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना महत्वाची माहिती असलेले लॅपटॉप चीन मधे घेउन जाउ नये अशी चेतावणी दिली आहे.
हिंदुस्थानाला चीन पासुन फारच मोठा धोका असुन चीनी सैन्यानी गेल्या काही वर्षा पासुन आपल्या देशात घुसखोरी केल्याची अनेक उदाहरणे आहेत. संदर्भ :--- http://jhnews.co.in/news.php?id=1218
ही घुसखोरी याही वर्षी सुरु असुन याही वर्षी जानेवारी महिन्यात अश्या घटना घडल्या आहेत
संदर्भ :---
Chinese army crosses border, threatens Indian workers
http://www.rediff.com/news/slide-show/slide-show-1-chinese-army-crosses-...
Cross-border tension: India accuses China of Ladakh incursion
http://tribune.com.pk/story/102098/cross-border-tension-india-accuses-ch...
इतक्या मोठ्या प्रमाण सशस्त्रपणे होणारी घुसखोरी इतर कोणत्या देशाने सहन केली असती ? आणि आपण का सहन करतोय ? या दोन्ही प्रश्नांचा सध्या विचार करतोय. :(
व्हियेतनाम मधे ओएनजीसी ने तेल उत्खनन करण्याचा करार करताच चीनने आक्षेप घेतला आहे, तोच चीन आपल्या देशात बिनदिकत्त खुसखोरी करत आहे. :(
ज्या प्रमाणे पाकडे+चीन ही युती झाली आहे त्याच प्रमाणे हिंदुस्थान+अमेरिका ही युती दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्वाची झालेली आहे.
या दुव्यावरचा लेख वाचनीय आहे :---
‘The China Threat’: India And US Must Forge Strategic Convergences
http://goo.gl/bvPqS
4 Oct 2011 - 1:32 pm | ऋषिकेश
चंमतग अशी आहे की जर उद्या अमेरिकेचे चीनशी युद्ध झाले तर जगात सर्वात मोठे नुकसान चीन व अमेरिका यांचेच होणार आहे कारण हे दोन्ही देश एकमेकांवर आर्थिकदृष्ट्या इतक्या प्रमाणात अवलंबून आहेत की एकमेकांविरुद्ध तो जाहिरपणे कोणताही 'नवा' स्टँड घेतीलसे वाटत नाही (नवेच काय पण तैवान काय किंवा उत्तर-दक्षिण कोरीया वाद काय; अश्या जुन्या प्रश्नांतही चीन व अमेरिकेने आपले स्टँड अधिक कठोर करण्याऐवजी क्वचित-प्रसंगी सौम्य केल्याचे व बहुतांश वेळी जैसे थे ठेवल्याचे दिसेल)
तेव्हा उद्या चीनने भारतावर हल्ला केला (ही नजिकच्या भविष्यात एक शक्यता आहे की नाही हा वेगळा व वादाचा मुद्दा, आतापुरते जरी चीन हल्ला करेल असे धरले) तरीही (समजा आपली मित्र बनलेली) अमेरिका फारतर चीनला आवाहन करेल, चिंता व्यक्त करेल अगदीच टोक म्हणजे शांततेसाठी प्रयत्न करेल मात्र प्रॅक्टीकली विचार करता चीन-भारतासारख्या दोन मोठ्या आर्थिक आघाड्या एकमेकांशी लढून कमकुवत होणार असतील तर अमेरिका मधे कशाला पडेल? त्यातही त्या चीनच्या विरोधात - ज्याच्याशी इतके व्यापारी (हित)संबंध आहेत - तर नाहीच नाही
अश्यावेळी आपल्याला गरज आहे डाव उरफाटा करणार्या 'कॅसलिंग'ची :) म्हणजे सरळ पाकिस्तानशी संबंध सुधारण्याची (किंवा तसा प्रामाणिक/अप्रामाणिक प्रयत्न करण्याची.) जेव्हा पाकिस्तान विरोधात आहे, अश्यावेळी तसंही पाकिस्तानच्या हरकतींवर सगळ्यांचा डोळा आहे. त्यात आपणही (विनाकारण) पाकिस्तानद्वेष करून वेळ फुकट घालवण्यापेक्षा पाकिस्तानशी संबंध सुधारले व त्याचा आपल्या व्यापाराला, शक्य झाल्यास इराणमधील तेल मिळवण्याला आणि त्याहुन शक्य झाल्यास अधिक पाणी मिळवण्यात फायदा झाला तर ते सरकारचे व पक्षी भारताचे मोठे कर्तृत्त्व ठरावे. (भारत सरकारही असाच विचार करते आहे असे दिसते. (आता इतर देशांनी गळा दाबल्यावर एकटा पडू लागलेला) पाकिस्तान भारताला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा द्यायला मंजूर होत आहे असेही परवा डॉनमधे आले होते)
अवांतरः
आपणही घुसखोरी केली असल्यास त्याला आक्षेप घेतला आहे. तसेही आपण चीनच्या आक्षेपाला जुमानुन व्हीयेतनामचे उत्खनन थांबवले थोडेच आहे?
4 Oct 2011 - 2:16 pm | मदनबाण
जर उद्या अमेरिकेचे चीनशी युद्ध झाले तर जगात सर्वात मोठे नुकसान चीन व अमेरिका यांचेच होणार आहे कारण हे दोन्ही देश एकमेकांवर आर्थिकदृष्ट्या इतक्या प्रमाणात अवलंबून आहेत की एकमेकांविरुद्ध तो जाहिरपणे कोणताही 'नवा' स्टँड घेतीलसे वाटत नाही
फक्त अमेरिकाच नाही तर चीन युरोपिय देशांना सुद्धा निर्यात करतो,सध्याच्या युरो संकटामुळे चीनच्या निर्यातीला त्याचा फटका बसला आहे. जगावर आपलीच सत्ता टिकुन रहावी यासाठी अमेरिका फक्त आर्थीक धोरण पाहुनच गप्प राहिल असे अजिबात वाटत नाही, उलट जेव्हा जेव्हा आर्थीक परिस्थीतीचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा अमेरिकेने युद्ध केल्याचे म्हंटले जाते.
आता दुसरा मुद्दा असा की,अमेरिका हिंदुस्थानला मदत करेल किंवा नाही,तर मी म्हणेन की याचे उत्तर सोप्पे नाही ! अमेरिकेचे हितसंबंध जिथे पूर्ण होतात तिथे अमेरिका मैत्री करते असे मला वाटते... बाकी येणारा काळच याचे उत्तर देउ शकेल ! जर हिंदुस्थान स्वतःसंरक्षणाच्या बाबतीत चीनच्या तोडीस तोड झाला तर त्याला अमेरिकेच्या भरोवश्यावर अवलंबुन रहावे लागणार नाही...अर्थात या जर तर च्या गोष्टी झाल्या.पाकव्याप्त काश्मिर चीनला आंदण देउन पाकिस्तानने आपला इरादा कधीच स्पष्ट केला आहे,तेव्हा पाकिस्तान कडुन मैत्रीची अपेक्षा करणे म्हणजे स्वतःच्या पाठीत खंजीर खुपसुन घेणेच ठरेल.
प्रॅक्टीकली विचार करता चीन-भारतासारख्या दोन मोठ्या आर्थिक आघाड्या एकमेकांशी लढून कमकुवत होणार असतील तर अमेरिका मधे कशाला पडेल? त्यातही त्या चीनच्या विरोधात - ज्याच्याशी इतके व्यापारी (हित)संबंध आहेत - तर नाहीच नाही
आशिया खंडात चीनच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी का होईना अमेरिका स्वस्थ बसणार नाही,इतकेच आत्ता सांगु शकतो.
याच अमेरिकेने पाकिस्तानात थेट कारवाई करुन लादेनला ढगात पाठवले तेव्हा त्यांनी या कॄतीने एका प्रकारे चीनला देखील इशारा दिला आहे.पाकड्यांचे आणि अमेरिकेचे संबंध या घटने नंतर बिघडत चालले आहेत्,हे तुम्हाला माहित असेलच.
अश्यावेळी आपल्याला गरज आहे डाव उरफाटा करणार्या 'कॅसलिंग'ची म्हणजे सरळ पाकिस्तानशी संबंध सुधारण्याची (किंवा तसा प्रामाणिक/अप्रामाणिक प्रयत्न करण्याची.) जेव्हा पाकिस्तान विरोधात आहे, अश्यावेळी तसंही पाकिस्तानच्या हरकतींवर सगळ्यांचा डोळा आहे. त्यात आपणही (विनाकारण) पाकिस्तानद्वेष करून वेळ फुकट घालवण्यापेक्षा पाकिस्तानशी संबंध सुधारले व त्याचा आपल्या व्यापाराला, शक्य झाल्यास इराणमधील तेल मिळवण्याला आणि त्याहुन शक्य झाल्यास अधिक पाणी मिळवण्यात फायदा झाला तर ते सरकारचे व पक्षी भारताचे मोठे कर्तृत्त्व ठरावे. (भारत सरकारही असाच विचार करते आहे असे दिसते. (आता इतर देशांनी गळा दाबल्यावर एकटा पडू लागलेला) पाकिस्तान भारताला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा द्यायला मंजूर होत आहे असेही परवा डॉनमधे आले होते)
कल्पना / विचार चांगला आहे,पण ज्या देशाने आपल्यावर आक्रमण केले,कारगिल प्रकरण घडवले,हिंदुस्थानच्या विरोधात अनेक अतिरेकी संगठनांना खत-पाणी घालुन पोसले,शिवाय आपल्या देशात अनेक बॉम्बस्फोट घडवुन आणले आहेत, आणत आहेत आणि आणतील ! त्यांच्याशी मैत्री कशी होईल बरं ? शिवाय जसा लादेन आमच्या देशात नाही तसे दाउद आमच्या देशात नाही असे देखील पाकडे म्हणतातच की ;) आणि आपण विनाकारण पाकिस्तानचा द्वेश करतो आहोत हे तुमचे विधान मात्र गमतीदार वाटले.! हे तर खरं म्हणजे पाकिस्तानी जनतेने त्यांच्या लष्कर प्रमुखांना सांगायले हवे ! की आपण विनाकारण हिंदुस्थानचा द्वेष करत आहोत.
आपणही घुसखोरी केली असल्यास त्याला आक्षेप घेतला आहे. तसेही आपण चीनच्या आक्षेपाला जुमानुन व्हीयेतनामचे उत्खनन थांबवले थोडेच आहे?
माझ्या माहिती प्रमाणे हिंदुस्थानने कुठल्याही देशात घुसखोरी केलेली नसुन्,आंतरराष्ट्रीय नियमांना अनुसरुनच व्हियतनाम मधे तेलउत्खनन विषयक काम हाती घेतले आहे.
जाता जातानाची चंमतग :--- हिना रब्बानीचा प्रभाव तुमच्यावर देखील पडला काय ? ;)
5 Oct 2011 - 4:38 pm | ऋषिकेश
कृपया एकदा माझा प्रतिसाद नीट वाचावा. मी मैत्री करावी असे म्हटलेले नाही अथवा म्हणत नाहिये. मी केवळ संबंध सुधारावे असे म्हणतोय. चीन-अमेरिका यांच्यातही मैत्री नाहि मात्र त्यांचे संबंध भारत-पाकिस्तानसारखे 'बालिश' नाहियेत.
पुन्हा एकदा प्रतिसाद नीट वाचावा ही विनंती. आपण विनाकारण पाकिस्तानचा द्वेष 'करतो' असे जनरलाईज्ड / सार्वकालिक स्टेटमेंट नसून जेव्हा इतर देश विरोधात आहेत तेव्हा आपणही जाहिरपणे विरोध करण्यात, द्वेष करत बसण्यात (खरंतर कुरवाळत बसण्यात) वेळ घालवणे मला विनाकारण वाटते. आपली भुमिका आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरेशी स्पष्ट आहे. तरीही सारखी तीच भुमिका उगाळत वेळ घालवण्यापेक्षा त्या वादाला (शक्य तितके व शक्य तिथेच - सर्वत्र नाही) बाजुला ठेऊन आपण आपला (खरंतर दोघांनीही आपापला) फायदा बघुन पाकिस्तानशी (किंवा एकमेकांशी) (सध्यातरी) संबंध सुधारणे मला योग्य वाटते. (नीट बघितल्यास काश्मिरबद्दलचा पाकिस्तानचा स्टँडही गेल्या ५ वर्षांत बराच निवळला आहे.)
:)
असो.
5 Oct 2011 - 5:38 pm | मदनबाण
ह्म्म्म...
तुमचे विचार चांगले आहेत पण पाकडे कधीच बदलणार नाहीत, भलेही आपण कितीही प्रयत्न केले तरी.
(खरंतर दोघांनीही आपापला) फायदा बघुन पाकिस्तानशी (किंवा एकमेकांशी) (सध्यातरी) संबंध सुधारणे मला योग्य वाटते.
संबंध सुधरवण्याची प्रक्रिया आत्ता पर्यंत कधीच झाली नाही का ? जसे तारीख पे तारीख तसेच चर्चा सत्रांवर चर्चासत्र घडत आहेत.आत्ता पर्यंतची फलश्रुती काय ?
तर आतंकाची विषारी फळे जसे अफझल गुरु आणि कसाब ! हे इथे व्यापार वाढवण्याचा,आपल्याशी संबंध सुधरवण्याच्या प्रक्रियेचा भाग होते का ?
दोन्ही देशांमधील व्यापार चालुच आहे आणि चालु राहिल, ते आपल्याकडची विड्याची पाने खातात आणि आपण त्यांच्याकडचे कांदे.! ;)
(नीट बघितल्यास काश्मिरबद्दलचा पाकिस्तानचा स्टँडही गेल्या ५ वर्षांत बराच निवळला आहे.)
मला तरी यात तथ्य वाटत नाही. पाकडे एक नंबरचे पाताळयंत्री आणि कांगावा करण्यात पटाईत आहेत.त्यांच्या कॄतीत आणि करणीत फरक असतो.
जरा ही लिंक वाचा बरं :--- http://www.telegraphindia.com/1110720/jsp/frontpage/story_142615480.jsp
जाता जाता :--- हिना रब्बानी बद्धल काहीच चर्चा झाली नसल्याने मला धक्का बसला आहे असे नमुद करतो. ;)
30 Sep 2011 - 11:51 am | मदनबाण
अलीकडे तर चीनची "नियत" जास्त-जास्तच उघड होऊ लागली आहे. चीनने अरुणाचलप्रदेश या आपल्या एका राज्यावरच्या त्याच्या हक्काचा हेका अद्याप सोडलेला नाहीं, त्याने आपल्या सरहद्दीवर चीनच्या बाजूने हमरस्ते बांधलेले आहेत पण आपण बांधायला गेलो तर आपल्याच हद्दीत येऊन आपल्याला तसे करण्याला त्यांचे सैन्य मनाई करते (आणि आपण माघारही घेतो). आपल्या उत्तरेकडील सीमेवर आपल्या जवानांना दमदाटी चालूच असते[*३]. अशा परिस्थितीत उद्या जेंव्हां आपले आणि चीनचे युद्ध पेटेल (ते पेटणारच आहे!) तर आपल्या मदतीला कोण येईल? पाकिस्तान? तो तर वहात्या गंगेत हात धुवून घ्यायला चीनच्या बाजूने आपल्याविरुद्ध युद्धात उतरेल. मध्य-पूर्वेतलाही कोणीही आपली विचारपूस करायलासुद्धा येणार नाहीं. मग त्यांची भलावण करून आणि ते करताना अमेरिकेला आणि इस्रायलला दुखवून आपण काय मिळविले? आपल्या हातात अशाने धुपाटण्याशिवाय कांहींही उरणार नाही!
आजच्याच टाइम्स ऑफ इंडियातील मथळ्यानुसार आपल्या संरक्षणमंत्र्यांनी चीन तिबेट-भारताच्या सीमेवर आक्रमक पवित्र्यासह आपले लष्करी अस्तित्व वाढवत असल्याची कबूली दिली आहे. चीनने तिबेटमधे ५ पूर्णपणे कार्यरत असलेले हवाईतळ व ५८००० किमी लांबीचे हमरस्ते व रेल्वे मार्ग उभारले असून त्यायोगे ३० डिव्हीजन्स (४५०००० सैनिक) आपल्या सीमेवर जलदपणे आणण्याची क्षमता निर्माण केलेली आहे. आपल्या संरक्षणमंत्र्यांनी पूर्वीचा निष्काळजीपणा मान्य केला असून यापुढे त्याला प्रत्युत्तर म्हणून जाणीवपूर्वक आखलेल्या युद्धनीतिनुसार योग्य पावले टाकली जात असल्याचेही सांगितले आहे
चीन ने आपली लष्करी क्षमता प्रचंड वाढवली आहे,तसेच त्यांचे डिफेन्स बजेट हे हिंदुस्थानच्या डिफेन्स बजेट पेक्षा किती तरी पटीने जास्त असते.
सध्या चीन-पाकड्यांची मैत्री अधीक घट्ट होत असुन त्याची अमेरिकेलाही धास्ती वाटुन राहिली आहे.
पाकिस्तान वरील कोणताही हल्ला हा चीनवर केलेला हल्ला असे समजले जाईल असे चीन ने जाहीर केलेले आहे.
एका बाजुनी पाकडे आणि दुसर्या बाजुने चीन अश्या दोन घातक देशांच्या मधे हिंदुस्थानाची कोंडी झाली आहे.
सध्याच्या परिस्थीत चीनकडे जवळपास ७,४०० टँक, ४ हजार विमाने, १३००च्या आसपास हॅलिकॉप्टर्स,५००च्या आसपास सागरी युद्ध पोत ज्यात जवळजवळ ५०-५५ पाणबुड्या आहेत्,या सर्वाची संख्या लवकरच वाढवण्याची चीन तयारी करत आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे चीन ने ब्लू वॉटर नेव्ही क्षमता विकसीत केली आहे.!
अरुणाचल प्रदेशात शेल ऑईलचे मोठ्या प्रमाणात साठे आहेत असे समजले जाते,त्या तेलसाठ्यांमुळेच चीन अरुणाचल प्रदेशावर डोळा ठेवुन आहे.पाक व्याप्त काश्मिर मधे चीन सैन्य संख्या हळु हळु वाढवत आहे.
आसाम मधील तेजपुर एयरबेस वर सुखोई विमानांचा ताफा तैनात करुन त्या क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे दिसते.
आपल्या देशासाठी पाक+चीन ही युती डोकेदुखी ठरली असुन येणार्या काळात युद्ध अटळ आहे असे वाटते.
4 Oct 2011 - 3:23 pm | चेतन सुभाष गुगळे
हे सर्व मोठे मोठे प्रतिसाद वाचून मला आपली एक जुनी म्हण आठवली.
माळ्याची मका अन् कोल्ह्यांचे भांडण
4 Oct 2011 - 3:41 pm | मदनबाण
माळ्याची मका अन् कोल्ह्यांचे भांडण
आपल्याला ही म्हण का आठवली बरं ? इथे कोणत्याही प्रतिसादात भांडणाचा प्रकार नसुन प्रत्येकानी त्यांची मते मांडली आहेत.
5 Oct 2011 - 4:40 pm | ऋषिकेश
ही म्हण माहित नव्हती. धन्यवाद!
बाकी काय वाचुन कोणाला काय आठवावे यावर माझा (किंवा कोणाचाही) कंट्रोल थोडाच आहे? :)