आपले "आयडॉल्स"

मुक्तसुनीत's picture
मुक्तसुनीत in काथ्याकूट
21 Sep 2011 - 3:11 am
गाभा: 

अलिकडेच माधुरी दीक्षितला लिहिलेलं अनावृत्त पत्र आणि त्यावरून झालेली चर्चा वाचली. काही जणांनी असा सूर लावला की माधुरी दीक्षित ही काही फार मोठी अभिनेत्री नव्हे. इतरांनी त्या विरोधात नि बाजून मतं मांडली.

हे सगळं वाचताना असे विचार मनात येत होते की, माधुरी दीक्षित म्हणा किंवा अन्य अशा स्वरूपाच्या एकेकाळच्या किंवा आताच्या लोकप्रिय नटनट्यांबद्दलची चर्चा वाचताना आपण यामधे मनाने गुंतत नाही आहोत. उदाहरणार्थ या प्रकरणी ही व्यक्ती चांगली अभिनेत्री आहे की नाही हा प्रश्नच मला महत्त्वाचा वाटेनासा होता. अधिक विचार करताना असं जाणवलं की या व्यक्तीचे किंवा अशा प्रकारच्या व्यक्तींचे "फॅन" असण्याचे आपले दिवस ( कधी काळी असलेच तर ) आता संपल्यात जमा आहेत. आता याला लोक मिडलाईफ प्रवृत्तीही म्हणू शकतील. मुद्दा असा आहे की, सचिन तेंडुलकर म्हणा किंवा माधुरी दीक्षित म्हणा किंवा अमुक कुणी लोकप्रिय व्यक्ती, या लौकिकार्थाने "दैवत" किंवा "दिल की धडकन" असतील. पण कदाचित या मोठमोठ्या सितार्‍यांपलिकडे ज्याची त्याची दैवतं असतील/असू शकतील. किंबहुना या व्यक्ती अशा असतील की ज्यांचं काम प्रेरणादायक वाटू शकेल परंतु "मला पहा फुलं वहा" अशा प्रकारच्या गोष्टी त्याना स्वतःलाही पसंत पडणार नाहीत.

या पार्श्वभूमीवर सुचलेले प्रश्न चर्चाप्रस्ताव म्हणून मांडतो.

सितार्‍यांपलिकडे , ग्लॅमर/पैसा या गोष्टींपलिकडच्या क्षेत्रांमधली तुमची आदरस्थानं आहेत काय ? असल्यास कोण ? कुठल्या क्षेत्रांत ? का ?

एखाद्या अभिनेत्या/अभिनेत्री/खेळाडू बद्दलच्या प्रेमापेक्षा या अशा स्वरूपाच्या व्यक्तींबद्दलच्या भावनांमधे काही मूल्यात्मक फरक जाणवतो का ? असल्यास काय ?

विविध क्षेत्रांतील व्यक्तींबद्दल वाटणार्‍या प्रेमाची/आकर्षणाची/आदराची/स्फूर्तीची भावना या स्वरूपाच्या गोष्टींमधे काही उतरंड असते असं तुम्हाला वाटतं का ? असल्यास त्याचे निकष काय आहेत ?

ज्या व्यक्तींना तुम्ही तुमचे आयडॉल मानता त्यांचं काम तुम्ही जवळून पाह्यलं आहे का ? त्या कामाचं महत्त्व, त्याचं मर्म तुम्हाला काय जाणवलं ? इतरांना याबद्दल काही सांगू शकाल काय ?

प्रतिक्रिया

शुचि's picture

21 Sep 2011 - 5:10 am | शुचि

वेगवेगळ्या वयात सहवासात आलेले वेगवेगळे लोक तेव्हातेव्हा "आदर्श" वाटले होते. मग ती बुद्धीमान मैत्रिण असो की उत्तम वक्तृत्व असलेले गणिताचे शिक्षक असोत. या लोकांमधील समान धागा आता जेव्हा मी शोधते तेव्हा हा जाणवतो की त्या त्या काळात, मला त्यांच्या बुद्धीचा अतोनात आदर वाटला होता. अजून एक समान धागा हा होता की दोघे जण अतिशय "वेल मॅनर्ड" लोक होते. पैकी मैत्रिण आय-आय-टी नंतर आय-आय-एम मध्ये शिकून आता मोठ्या कंपनीत पार्ट्नर आहे. तर त्या शिक्षकांनी आय-आय-टी मध्ये प्रवेश मिळवण्याकरता स्वतःची संस्था काढली आहे. आजही या दोन व्यक्ती जवळून पाहीला मिळाल्याबद्दल मला खूप कृतज्ञ वाटते.
बाकी खेळाडू, अभिनेते, अभिनेत्री यांचे आकर्षण कधीच वाटले नाही. लेखक, शास्त्रज्ञ , चित्रकार, सामाजिक कार्यकर्ते हे देखील खूप दूरचे वाटत राहीले. जे लोक जवळून पहायला मिळाले त्यात हे दोघे वेगळेपणा आणि बुद्धीची चमक यामुळे उठून लक्षात राहीले.
खासच सांगायचं झाले तर त्या मैत्रिणीचे "अ‍ॅनॅलीटीकल स्किल्स" अत्युत्तम होते. सरांविषयी तर काय बोलावे! गणिताचे शिक्षक, आय आय टी मधून शिकलेले परत चाळीशीत आय आय टी त डॉक्टरेट करण्याकरता दाखल झालेले. अतिशय अतिशय बुद्धीमान होते/आहेत.

क्रेमर's picture

22 Sep 2011 - 7:44 am | क्रेमर

आदर्श असू नयेत, असे माझे मत आहे. आधी माझ्यावर अनेकांचा प्रभाव होता. मर्यादांचा हिशोब ध्यानात यायला लागल्यापासून तसे काही होत नाही. कुणाच्या (स्वत:च्याही) कर्तृत्त्वाचेही फारसे अप्रुप राहिलेले नाही. याचा अर्थ मी अगदीच विरक्त झालो आहे (किंवा तसे नाटक करत आहे) असे कृपया समजू नये. अजुनही घोषणा कदाचित देईन पण घसा बसल्यास स्वत:च्याच गाढवपणाला दोष देईन.

लोकांच्या वागण्यासंदर्भातल्या संशोधनाकडे थोडेसे काटेकोरपणे पाहीले जावे असे मला वाटते. तसेच उत्क्रांतीच्या संदर्भात सर्वच वर्तणुकीकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाविषयीसुद्धा वाटते.

छान चर्चाविषय. उत्तर देताना विचारलेल्या प्रश्नांच्या भोवती राहुनही थेट हा प्रश्न आणि हे त्याचं उत्तर असा प्रतिसाद देण्याचं जाणीवपूर्वक टाळणार आहे. (थोडंस स्वगत लिहिन ते चालेल असे समजतो)

वेगवेगळ्या वयात वेगवेग़ळ्या व्यक्तींनी प्रभावित केलं आहे. जसजसं अनुभव विश्व विस्तारत गेलं तसतसं अनेक व्यक्तींची भर तर पडत गेलीच मात्र त्याच बरोबर गंमत अशी की काही 'आदर्श' किंवा 'प्रभावशाली' व्यक्ती कालांतराने तितक्याशा प्रभावी वाटेनाशा झात्यांकिंवा प्रभाव कमी झाला तर काहिंचा प्रभाव दृढ होत गेला.

अगदी प्राथमिक शालेय जीवनात व्यक्तीचा प्रभाव हा सापेक्ष होता. म्हणजे स्वतःला ज्या व्यक्ती आवडतात- जसे आई, बाबा, शाळेतील सिक्षक, जवळचे सवंगडी, भावंडं, 'आवडते' नातेवाईक - त्यांनी जर एखादी व्यक्ती 'ग्रेट' आहे असं सांगितलं की मलाही ती व्यक्ती ग्रेट वाटू लागे. मात्र १४-१५ वर्षांचा होईपर्यंत- झाल्यावर- केवळ ऐकीव नाही तर वाचलेल्या माहितीवर या व्यक्तींविषयी आदर वाढला अथवा कमी झाला. एक लक्षात घेण्यासारखी बाब अशी की या वयात आदर्श म्हणण्यापेक्षा प्रभावीत करणार्‍या वाटणार्‍या बहुतांश व्यक्ती राजकीय होत्या. जसे छतीचा कोट करून स्वराज्य स्थापणारे छ. शिवाजी महाराज, 'मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफले उचलणार नाहीत' म्हणणारे लो. टिळक, जहाजातून यशस्वी पलायनाचा प्रयत्न करणार वीर सावरकर, देशासाठी हसतहसत मरण झेलणारे भगतसिंग इ.
या प्रभावशाली व्यक्तींमधे समकालिन व्यक्ती बघाल तर कोणीही नव्हती. आता विचार केला तर पटते की या व्यक्तींचा प्रभाव पडण्याची कारणे त्यांचे कर्तृत्त्व तर होतेच त्याच बरोबर लहानपणापासून घरात, शाळेत, समाजात झालेले 'कंडीशनिंगही' होते. गंमत अशी की याच 'सामाजिक कंडीशनिंग' मुळे महात्मा गांधींचा आदर्श वाटणे दूर त्यांनी देशाची 'वाट' लावली इथपर्यंत विचार गेले होते. तर 'हिटलर' बद्दल कुठेतरी सहानुभुती वाटत असे.

पुढे जसजशी समज, वाचन वाढले तेव्हा हा परीघ अधिक रुंदावला. तेव्हा राजकीय व्यक्तींबरोबरच सामाजिक व्यक्तींचा यात समावेश होऊ लागला. शिवाय भारताबाहेरील व्यक्तीही या परीघात येऊ लागल्या. कॉलेज जीवनात असताना बाबा आमटे, मेधा पाटकर, बंग दांपत्य या नवीन प्रभावासोबत मार्टीन ल्युथर किंग विषयी वाचनात येऊ लागले होते. खरंतर हे वय राजकीय दृष्ट्या तत्कालिन प्रभाव पडण्याचं. मात्र का कोण जाणे, त्याकाळच्या एकाही राजकीय नेत्यामागे मी डोळे झाकून जाईन किंवा त्याच्या बोलण्याने माझ्यावर प्रभाव पडेल असे घडले नाही. त्यावेळी मी बाळासाहेब ठाकरे, आमच्या भागतील त्यावेळचे खासदार श्री राम नाईक आणि श्री अडवाणी या नेत्यांची भाषणे ऐकली होती. त्यांच्या वक्तृत्त्वाने, मुद्दे मांडण्याच्या शैलीने मी प्रभावीत झालो मात्र त्यांच्या भाषणातील मुद्द्यांनी तित्कासा प्रभावित होऊ शकलो नाही. राजकीय, सामाजिक क्षेत्राच्या विपरीत सांस्कृतिक क्षेत्रात मात्र माझे ठोस आदर्श घडत होते. 'पु.ल. देशपांडे' यांनी माझ्या एकुणच मनोराज्यावर जादू केली होती. कोणी कितीही नाके मुरडोत अजुनही माझ्यावर प्रभाव असणार्‍या गोष्टींमधे पु.लं.चे लेखन येते. मात्र हे लेखन बाजूला केले पुलंनी एक व्यक्ती म्हणून माझ्यावर प्रभाव टाकला का? तर नाही.

कॉलेज जगताच्या शेवटी माझ्या हातात 'माझे सत्याचे प्रयोग' पडले आणि माझ्या 'आदर्शवादात' एका महत्त्वाच्या व्यक्तीची भर पडली. तेव्हा साशंक मनाने मी त्यांना मानत होतो. पुढे जसजसे वाचन वाढले तसतसे माझ्यावरील श्री. गांधी यांच्या राजकीय विचारांपेक्षा त्यांच्या सामाजिक विचारांचा प्रभाव अधिकाधिक पडत गेला व तोही अजुनही आहे. अर्थातच वाचन वाढल्यावर त्याहीपेक्षा अधिक वेगाने एकेकाळी 'सॉफ्ट कॉर्नर' असलेला हिटलर केवळ आदर्श वाटेनासा झाला नव्हता तर त्याबद्दल एकप्रकारची घृणा उत्पन्न झाली आहे तीही आजतागायत आहे.

अजुनही यापैकी अनेक जणांच्या प्रभावाखाली मी आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात त्या त्या क्षेत्रापुरते मला अनेकांनी प्रभावित केले आहे. मात्र तो प्रभाव केवळ त्या त्या कार्यापुरता आहे. माझ्यावर सर्वार्थाने प्रभाव टाकेल, जिच्या बोलण्यावर, वागण्यावर मी डोळे झाकुन विश्वास ठेवेन अशी व्यक्ती मलातरी अजुन भेटलेली नाहि. विविध विचारांनी भरलेल्या आणि भारलेल्या या भोवतालच्या जगात एखाद्या विचारानी प्रेरित होऊन, प्रभाव पडून कधी भरीव तर कधी विनाशकारी घटना घडताना मी बघतो. कोणातरी नेतृत्त्वामागे, आदर्शामागे, विचारामागे धावणारे- त्यात चिंब भिजणारे- लोक मी विस्फारून बघत असतो. मात्र इतक्या वेगवेगळ्या विचारांचा वेगवेगळ्या वेळी प्रभाव असूनही एकुणात मी कोणा एकाच्या प्रभावाखाली नाही -भोवताली विचारांचा, आदर्शांचा समुद्र असुनही लोकार्थाने असे कोरडे रहाणे- हा माझ्यातील दोष आहे का? हा विचार मात्र मला नेहमी अस्वस्थ करतो

अजुनही क्षेत्रे आहेत जसे धार्मिक, आर्थिक, अध्यात्मिक, वैज्ञानिक वगैरे ज्यांबद्दल वेगळे लिहिता यावे मात्र विस्तारभयाने आता थांबतो.. आधीच जरा जास्तच लिहिलंय.. रटाळपणाबद्दल क्षमस्व!

नगरीनिरंजन's picture

21 Sep 2011 - 1:06 pm | नगरीनिरंजन

माझे बरेचसे विचार यात आले आहेत. फक्त गांधींचे सत्याचे प्रयोग वाचल्यावर त्यांचा आदर्श घ्यावा असं वाटण्यापेक्षा अहिंसा, सत्य इत्यादी तत्त्वांचीही कशी नशा चढू शकते आणि असा माणूस प्रसंगी किती अ‍ॅब्सर्ड आणि वेगळ्याप्रकारे हिंसक होऊ शकतो असे वाटले.
सावरकर, बोस हे कधीकाळी मला हिरो वाटायचे पण आता फक्त त्यांचे विज्ञानवादी आणि वस्तुनिष्ठ विचार आवडतात.
एकंदरीतच समजायला लागल्यावर व्यक्तिपूजेचं इतकं स्तोम भवताली पाहत आलोय की स्वतःला कोणी आयडॉल असावा असे वाटतच नाही.
तेंडुलकर, लता मंगेशकर, माधुरी दिक्षीत इत्यादी मंडळींवर कणेकर, संझगिरी या लोकांनी इतका हात साफ करून घेतला आहे की त्यांच्याबद्दल विचार करताना दुसर्‍याने चघळून दिलेलं चॉकलेट खातोय असं वाटतं.

याचमुळे प्रश्न विचारला होता की बरंच जास्त वय होऊनही एखाद्या व्यक्तीच्या / पंथाच्या प्रभावात (नादात ? ) टिकून घट्ट राहणारे लोक कसे दिसतात आजुबाजूला?

सनातन, संघ, चिन्मय मिशन, बाबाबुवामाता, निसर्गसेवक, वगैरे.

की यात एका व्यक्तीपेक्षा संघटनेचा प्रभाव जास्त टिकाऊ असतो?

नगरीनिरंजन's picture

21 Sep 2011 - 1:26 pm | नगरीनिरंजन

की यात एका व्यक्तीपेक्षा संघटनेचा प्रभाव जास्त टिकाऊ असतो?

तसंच असावं. बर्‍याच वेळा व्यावहारिक फायदा, सुरक्षितता या गोष्टी जास्त असाव्यात त्या मागे.
एखाद्या बाबाचा भक्त वगैरे असल्याचे कळताच दुसर्‍या माणसाने त्या माणसाला अत्यंत चांगली वागणूक आणि तत्पर सेवा दिल्याचे पाहिले आहे. इकडे (म्हणजे आग्नेय आशियात) बौद्ध धर्मियांचे चांगले नेटवर्क आहे. बौद्ध असल्याचे व्यावहारिक फायदे बरेच असल्याचे माझा सहकारी मला सांगत होता.
काही सर्वभीरू लोक कसला तरी मानसिक आधार मिळतो म्हणून भजनी लागत असावेत.
बहुतेक वेळा कमकुवत मनाचे किंवा तर्कशक्तीचा अभाव असणारे लोक आत्यंतिक व्यक्तिपूजेत तल्लीन असलेले दिसलेले आहेत. वरपांगी ती व्यक्तिपूजा असली तरी कोणत्यातरी गटाचा भाग असणे हे त्यात अंतर्भूत असते.

अर्धवटराव's picture

21 Sep 2011 - 11:02 pm | अर्धवटराव

>>की यात एका व्यक्तीपेक्षा संघटनेचा प्रभाव जास्त टिकाऊ असतो?
संघटनेचा प्रभाव, "ती संघटना करीत असलेल्या कार्याचा परिणाम आणि त्याची आवश्यकता" या अर्थाने जास्त असावा, उदा. संघाच्या ईशान्य भारतात काम करणारे कॅडर. तेच परिमाण निसर्गसेवकांना लागू.
बाकी सनातन बद्दल फार माहिती नाहि, पण बाबाबुवामाता "संकटमोचन" असल्याची प्रचिती (खरी/खोटी) एकदा आली कि तिचा प्रभाव उतरणे शक्य नाहि. (माझा एक बालमित्र याचं बोलकं उदाहरण आहे... त्याच्या मते त्यांचा रसातळाला जाणारा खानदानी व्यवसाय त्यांच्या गुरुंच्या कृपेने तरला, इतर कौटुंबीक समस्या देखील सुटल्या ).

(प्रभावी) अर्धवटराव

चेतन सुभाष गुगळे's picture

21 Sep 2011 - 10:06 am | चेतन सुभाष गुगळे

<< सितार्‍यांपलिकडे , ग्लॅमर/पैसा या गोष्टींपलिकडच्या क्षेत्रांमधली तुमची आदरस्थानं आहेत काय ? असल्यास कोण ? कुठल्या क्षेत्रांत ? का ? >>

होय आहेत. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर, सर बर्ट्रांड रसेल, संत गाडगेबाबा, विनोबा भावे, बाळासाहेब भारदे, नानाजी देशमुख, डॉ. श्रीराम लागू (त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्याबद्दल), स्टीव्ह वॉ (समाजसेवे बद्दल), दत्तप्रसाद दाभोळकर, श्रीकांत जिचकार, अनिल अवचट, लीना मेहेंदळे, समीरण वाळवेकर ही काही चटकन आठवलेली नावं. अजुनही बरीच आहेत.

<< विविध क्षेत्रांतील व्यक्तींबद्दल वाटणार्‍या प्रेमाची/आकर्षणाची/आदराची/स्फूर्तीची भावना या स्वरूपाच्या गोष्टींमधे काही उतरंड असते असं तुम्हाला वाटतं का ? असल्यास त्याचे निकष काय आहेत ? >>

नाही तशी काही उतरंड मला वाटत नाही. उलट सितार्‍यांपलिकडे / ग्लॅमर पैसा या गोष्टींपलिकडली आदरस्थानं विचारली असल्याने मी देव आनंद, लता मंगेशकर ही नावे वरच्या यादीत समाविष्ट केलेली नाहीत. अन्यथा यांच्याबद्दलही मला तितकाच आदर आहे.

अत्यंत उत्कृष्ट मुद्दा काढल्याबद्दल आधी आभार मानतो..

कोणा ना कोणाच्या प्रभावाखाली राहून त्यांचे चाहते / अनुयायी होणं हा टीनएज ते विशीच्या सुरुवातीपर्यंतचा एक स्वाभाविक भाग आहे असं वाटतं. म्हणजे आपले एखादे प्रोफेसर म्हणा, ओशो, युजी, चिन्मयानंद अशांपैकी कोणी.

किंवा विवेकानंद, शिवाजी महाराज अशा होऊन गेलेल्यांचे..

कोणाचे ना कोणाचे फॉलोअर होणं ही आपली गरजच असावी. नंतर नंतर व्यक्तिपूजेचा उत्साह निघून जात असावा म्हणा किंवा काळं पांढरं दोन्ही सगळीकडेच आहे हे लक्षात आल्याने म्हणा, हे "प्रभावित" असणं निघून जात असावं.

तरीही बरेच लोक वयाच्या पन्नाशी साठीतही एखाद्या आयडॉलशी चिकटून एकनिष्ठ असतात हे पाहून आश्चर्य वाटतं. हे अनाकलनीय आहे माझ्यासाठी.

प्रदीप's picture

21 Sep 2011 - 10:42 am | प्रदीप

सितार्‍यांपलिकडे , ग्लॅमर/पैसा या गोष्टींपलिकडच्या क्षेत्रांमधली तुमची आदरस्थानं आहेत काय ?

ह्यातील ग्लॅमरचा भाग समजू शकतो. पण एखादी व्यक्ति केवळ सितारा/सितारी आहे आणि/किंवा पैसेवाली आहे म्हणून ती (इतर अन्य कारणांमुळे) आदरस्थानी असू शकत नाही काय?

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Sep 2011 - 11:54 am | बिपिन कार्यकर्ते

उत्तम चर्चाविषय! प्रतिसादासाठी जागा राखून ठेवत आहे.

सुनील's picture

21 Sep 2011 - 12:13 pm | सुनील

चांगला विषय. ऋषिकेश यांचा प्रतिसाद आवडला.

छोटा डॉन's picture

21 Sep 2011 - 12:19 pm | छोटा डॉन

छान चर्चाप्रस्ताव मुसुशेठ.
सविस्तर प्रतिसादे देणे कधी शक्य होईल ते माहित नाही पण आत्ता उगाच ४ ओळी लिहुन ठेवतो, बाकीचे नंतर.

मुळात आयडॉल्सची कक्षा मी त्या व्यक्तीच्या त्या स्कीलपुरतीच मानतो.
त्या स्लीलबाहेर तो काय करतो व काय नाही करत ह्याच्याशी मला देणेघेणे नसते.
स्वतःच्या स्कीलच्या जोरावर त्याने एखादे चूकीचे किंवा अनावश्यक विधान, कार्य केले व त्याचे समर्थन तो स्वतःच्या सोशल स्टेटसच्या जोरावर करु पहात असेल तर ते मला पटत नाही व तेव्हा त्याच्यावर टिका करण्यात मला अडचण होत नाही.
त्या आयडॉलने स्वतःच्या प्रतिभेच्या जोरावर काही कमवले तर त्याचे मला वाईट वाटत नाही, मात्र तोच आयडॉल उगाच दातृत्वाचा आव किंवा गाजावाजा करत असेल तर मला ते ही पटत नाही.

काही उदाहरणे देतो, त्यात बरेच कव्हर होईल.
१. बाबा आमटे आणि त्यांचा वंश हे नेहमीच आदराचे स्थान राहिले आहे, त्यांनी जे काही केले त्याच्यासमोर नेहमीच आदराने मान झुकली आहे.
मात्र सध्याच्या पिढीत काही घटनांमध्ये आत्तापर्यंत न आढलेल्या 'प्रसिद्धी'ची घटना दिसल्या व माझ्या मनातुन त्यांच्याबद्दलचा आयडॉल फॅक्टर कमी होऊ लागला.
केलेल्या कार्याबद्दल सन्मान स्विकारणे अजिबात वाईट नाही, मात्र तो कुठल्या मंचावर स्विकारावा ह्याबाबत काही ठोकताळे आहेत.

२. तेंडल्या लै भारी बॅट्समन आहे, अगदी शुन्यातुन वर आला आहे. क्रिकेटमधला 'देव' आहे म्हटले तरी चालेल.
तो दरवर्षी गुप्तदान करतो व बर्‍याच लोकांना मदत वगैरे करतो हे ही मान्य.
पण त्याला ह्या जोरावर 'मुंबईवर असलेल्या हक्कांबाबत पॉलिटिकल विधाने' वगैरे करण्याचा हक्क कुणी दिला ? त्याने असे बोलुन चूक केली व ती आम्हाला आवडली नाही.
त्याने टॅक्स चुकवुन फेरारी आणली होती ते ही नाही आवडले.
सध्या त्याला 'भारतरत्न' द्यायचे चालले आहे ते ही पटत नाही, तेंडल्या मोठ्ठा असला तरी 'भारतरत्न'च्या जवळ पोहचायला अजुन बराच वेळ आहे.

३. चेल्सीचा कॅप्टन आणि एक सर्वोत्तम डिफेंडर ... जॉन टेरी.
त्याच्या क्षेत्रात त्याला जवळ जाणारे फार थोडे आहेत, मैदानात त्याचा जो प्रभाव स्वतःच्या आणि प्रतिपक्षाच्याही टिमवर दिसतो त्यामुळे तो आम्हाला नेतृत्व आणि सर्वोत्तम डिफेन्ससाठी नेहमीच आयडॉल वाटतो.
मात्र त्याने वैयक्तिक आयुष्यात स्वतःच्या टिममेटच्या बायको (की गर्लफ्रेंड, जे असेल ते) बरोबर 'लफडे' केले त्याचा परिणाम आम्हाला त्याच्या आयडॉल फॅक्टरवर व्हावा असे वाटत नाही.
त्याला मित्रांच्या/ टिममेट्सच्या वाढदिवसाला पब्समध्ये लाखो रुपये उधळायची सवय असेल तरीही ह्या गोष्टी आम्हाला त्याच्या आयडॉलनेसबाबत महत्वाच्या वाटत नाहीत.

४. विकिलिक्सचा सर्वेसर्वा ... ज्युलियन असांज
जे काही करतो आहे त्यासाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदु असेल.
आता हे सोडुन तो कुणाचा टॅक्स बुडवतो की अजुन कुणाबरोबर लफडे करतो ह्याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही.

बाकी थोडक्यात सांगायचे तर आता कुणाचेच 'ब्लाईंड फॉलोवर' होऊ वाटत नाही, 'व्यक्तिपुजा' तर अशक्यकोटीतली गोष्ट.
जेवढ्या स्कील्सपुरताच तेवढाच आयडॉलनेस, बाकीच्या इतर बाबी गेल्या उडत...

तुर्तास एवढेच , वाटले तर अजुन लिहु.

- छोटा डॉन

ढब्बू पैसा's picture

21 Sep 2011 - 12:21 pm | ढब्बू पैसा

अजुन मिडलाईफ प्रवृत्ती माझी तरी झालेली नाहीये :) थोडं अजुन मोठं झाल्यावर होईलही कदाचित!
माधुरी , सचिन हे आपापल्या क्षेत्रात मोठे आहेत आणि मल प्रचंड आवडतात पण त्यांचा आयडॉल म्हणून विचार मी करू शकत नाही.
माझ्यापुरती आदरस्थानं म्हणायची तर (Taking risk of sounding cliched) प्रचंड पुरोगामी कुटुंबात राहूनही स्वतः लिबरल असणारी माझी आई माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे.
सामाजिक जाणीवा तीव्र असणारे आणि सतत to make a difference साठी काम करणारे श्रावण मोडकही माझ्यासाठी आयडॉल आहेत.
अशी यादी बरीच मोठी आहे. आज ह्या विषयावरून विचार करताना लक्षात आलं की ग्लॅमरस लोक आवडत असतील मला , पण जेव्हा आदरस्थान किंवा प्रेरणा देणार्‍या लोकांविषयी बोलताना कायम "खर्‍याखुर्‍या" माणासांची नावं जिभेवर आधी येतात :)
(चर्चा वाचण्यास उत्सुक)
ढब्बू

श्रावण मोडक's picture

21 Sep 2011 - 2:20 pm | श्रावण मोडक

सामाजिक जाणीवा तीव्र असणारे आणि सतत to make a difference साठी काम करणारे श्रावण मोडकही माझ्यासाठी आयडॉल आहेत.

एवढा मोठा नाही मी. आपल्या जगण्यात सामाजिक जाणिवांचे पोषण आणि पूर्तता करण्यासाठी थोडा अवकाश निर्माण केला आहे मी. तो अवकाश मी त्या कामातून व्यापतो मी. असे अनेक जण असतात, आहेत, असतीलही. मला त्यांच्यासारखं व्हावंसं वाटतं. अशांपैकी काहींनी अशा जाणिवांपोटी आयुष्य उधळून दिलेलं मी पाहिलं आहे. ते मला अद्यापही जमलेलं नाही. ती मर्यादा आहे माझी. त्यादृष्टीने आयडॉल असा मोठा शब्द मला लागू होत नाही.
माझ्यासारखं काही करावंसं वाटणं ही भावना ढब्बू पैसाच्या या लेखनामागे आहे. त्या भावनेचा आदर ठेवूनही हे स्पष्टीकरण करतोय.
ढब्बे, थोडी लहान होच आता! :)

नितिन थत्ते's picture

21 Sep 2011 - 1:13 pm | नितिन थत्ते

आयडॉल्स म्हणजे ज्यांच्यासारखं व्हावं असं आपल्याला वाटतं किंवा तसा प्रयत्न आपण करतो असे लोक अशी माझी व्याख्या आहे.

या व्याख्येत बसणारे माझे कोणी आयडॉल्स आहेत का या प्रश्नाचं उत्तर देणे कठीण आहे.

सध्या इतकेच. बाकी प्रवास ऋषिकेशसदृशच आहे.

इंटरनेटस्नेही's picture

21 Sep 2011 - 1:58 pm | इंटरनेटस्नेही

सितार्‍यांपलिकडे , ग्लॅमर/पैसा या गोष्टींपलिकडच्या क्षेत्रांमधली तुमची आदरस्थानं आहेत काय ?

आहेत.

असल्यास कोण ? कुठल्या क्षेत्रांत ? का ?

१. अविनाश धर्माधिकारी (माजी सनदी अधिकारी आणि सध्या चाणक्य मंडल परिवार या संस्थेचे संस्थापक संचालक)
२. पी चिदंबरम (त्यांच्या वकृत्वामुळे, ज्ञानामुळे)

एखाद्या अभिनेत्या/अभिनेत्री/खेळाडू बद्दलच्या प्रेमापेक्षा या अशा स्वरूपाच्या व्यक्तींबद्दलच्या भावनांमधे काही मूल्यात्मक फरक जाणवतो का ? असल्यास काय ?

नाही. उत्कृष्ट अभिनेता/अभिनेत्री/खेळाडु होण्यासाठी देखील तेवढीच मेहनत घ्यावी लागते जेव्हढी अन्य क्षेत्रात घ्यावी लागते. काही सितारे देखील केवळ त्यांच्या अपार बुद्धी आणि कौशल्यांमुळे आदरस्थान आहेत. त्यांच्या ग्लॅमर/पैसा मुळे नव्हे. उदा.: रॉन अ‍ॅट्कीन्सन http://en.wikipedia.org/wiki/Rowan_Atkinson

विविध क्षेत्रांतील व्यक्तींबद्दल वाटणार्‍या प्रेमाची/आकर्षणाची/आदराची/स्फूर्तीची भावना या स्वरूपाच्या गोष्टींमधे काही उतरंड असते असं तुम्हाला वाटतं का ? असल्यास त्याचे निकष काय आहेत ?

सर्वात प्रथम आदर महत्त्वाचा, आदर नसेल तर प्रेम, आकर्षण स्फूर्ती इ. गोष्टी फार दूर राहिल्या.

ज्या व्यक्तींना तुम्ही तुमचे आयडॉल मानता त्यांचं काम तुम्ही जवळून पाह्यलं आहे का ? त्या कामाचं महत्त्व, त्याचं मर्म तुम्हाला काय जाणवलं ? इतरांना याबद्दल काही सांगू शकाल काय ?

मी धर्माधिकारी सरांना विद्यार्थी म्हणुन साधारण ७ वर्षांपासुन पाहिलं आहे. सर खर्‍या अर्थाने श्री गुरु श्री ब्रम्हा , श्री गुरु श्री विष्णु , श्री गुरु श्री देवो श्री महेश्वरा:। श्री गुरु साक्षात् श्री परब्रह्म , तस्मे श्री गुरवे नमः म्हणावेत असे आहेत एवढंच मी म्हणू शकेन. त्यांच्या चाणक्य मंडल परिवार या संस्थेमध्ये विविध कोर्सेच्या माध्यमातुन इयत्ता ९ वी (वय वर्षे १४-१५) ते थेट युपीएससी (सरासरी वय वर्षे २४-२५) मुलामुलींवर डायरेक्ट इनडायरेक्ट पद्धतीने अतिशय उत्तम संस्कार होतात. सरांनी स्वतः आयएएसचा राजीनामा दिला, त्याला आता पंधरा वर्षे झाली, एवढ्या काळात सरांनी एका नव्या पिढीचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. चाणक्य मंडल परिवार या संस्थेबद्दल अधिक माहिती http://www.chanakyamandal.org/frmDisplayPageHome.aspx येथे पाहता येईल.

चर्चाप्रस्ताव आवडला. ऋषिकेशचा प्रतिसादही छान. थोडे अवांतर लिहिण्याचे स्वातंत्र्य घेऊन (आणि चर्चाप्रस्तावात लिहिलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं विस्तारभयास्तव टाळून) ह्या 'फॉलोअर' वृत्तीबद्दल जे डोक्यात विचार आले, त्याबद्दल लिहितो. हे बरेचसे 'थिंकिंग आऊट लाऊड' स्वरूपाचे असल्याने त्यातल्या विस्कळीतपणाबद्दल (आणि नेम-ड्रॉपिंगबद्दल) आधीच क्षमा मागतो.

१. बहुसंख्य लोक हे अनुयायी असतात. प्रमाणात, तीव्रतेत आणि त्या गोष्टीची जाणीव असणे/नसणे ह्या बाबींत व्यक्तिगणिक भेद असतील, पण मोजक्या व्यक्तींचा अपवाद सोडला तर आपण सारेच जण कुणाच्या ना कुणाच्या प्रभावाखाली थोडेफार येतच असतो. (कृपया हे विधान ढोबळ स्वरूपात घेऊ नये. सारासार विचारशक्ती गहाण टाकून आंधळेपणाने 'बाबा वाक्यं प्रमाणम्' म्हणत चालत राहणे, ह्या अर्थाने प्रभाव इथे अपेक्षित नाही.)

२. ह्या मागे उत्क्रांतीतून मिळालेलं शहाणपण असू शकेल का? प्रत्येकवेळी चाकाचा शोध नव्याने लावण्याऐवजी पूर्वसुरींच्या खांद्यावर उभं राहून पाहिल्यावर अधिक दूरवर नजर पोचू शकते ह्या अर्थाने? ह्या विधानाला ठोस आधार नसला तरी ह्या विषयावर काही संशोधन होत आहे. अशाच एका संशोधनातील हा एक महत्त्वाचा वाटणारा भाग -

So the crowd loses its wisdom when it gets random pieces of information about what its members think, but it regains its wisdom if it finds out what the most successful individual said. King says that this mirrors what happens in real life. The crowd may be a social beast, but it isn’t an indiscriminate one. Certain individuals wield disproportionate influence, and groups of soldiers, employees, players and even animals often rely on leaders when they make decisions...King writes, “Copying successful individuals can enable accuracy at both the individual and group level, even at small group sizes.” [मूळ रिसर्च पेपर येथे]

३. मोठ्या प्रमाणात बोलायचं झालं तर हीच प्रेरणा धर्मांमागे असावी. [एकेश्वरवादी अब्राहमिक धर्म तर आहेतच पण गीतासुद्धा 'अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्'ची हमी देते (सर्व धर्म परि त्यजुनि येई शरण मला...).] मात्र गेल्या शतकभरात धर्माचा पगडा कमी होऊ लागल्यावर, त्यांची जागी व्यक्ती किंवा निसर्ग ह्यांनी घेतली असावी. उदाहरणंच द्यायची झाली तर टॉलस्टॉयन पंथ (पहा - 'द लास्ट स्टेशन' हा चित्रपट. "You all think he is Christ! He thinks he is Christ", असे हताश उद्गार त्याची पत्नी ज्या प्रसंगात काढते, तो पुरेसा बोलका आहे), आयन रँडच्या ऑब्जेक्टिव्हिस्ट(!) चळवळीने नंतर घेतलेले व्यक्तिपूजेचे स्वरूप, गांधीजींच्या निष्ठावंत अनुयायांनी शब्दशः अर्थ घेऊन ('आहे मनोहर तरी'मधले शिळ्या भाकरीचे उदाहरण) त्यांच्या विचारांची केलेली विटंबना, पुलंच्या लेखनातून जाणवणार्‍या carpe diemसदृश तत्त्वज्ञानाचा मध्यमवर्गीय वाचकावर पडलेला प्रभाव इथपासून ते अलीकडे तीन वर्षांपूर्वी ओबामाच्या लोकप्रियतेचा पंथ म्हणता येईल इतपत वाढलेला ज्वर ही होऊ शकतील.

४. ही मूळची यशस्वी व्यक्तीचे अनुकरण करण्याची (कदाचित उत्क्रांतीतून जन्मलेली) अंतःप्रेरणा, धर्मांचा ओसरता प्रभाव व त्याची व्यक्तींनी (नेते, खेळाडू, अभिनेते इ.) किंवा निसर्गाने घेतलेली जागा आणि एकंदरीतच ज्याच्यावर आपल्या भावभावनांचे, आशाआकांक्षांचे आरोपण करता यावे अशा एखाद्या प्रतीकाची गरज - ह्या सार्‍याचा एकत्रित परिणाम 'आयडॉल-वर्शिप'मध्ये होत असावा. वर गविंनी विचारलेल्या प्रश्नाचं ('बरंच जास्त वय होऊनही एखाद्या व्यक्तीच्या / पंथाच्या प्रभावात (नादात ? ) टिकून घट्ट राहणारे लोक कसे दिसतात आजुबाजूला?) हे पूर्ण उत्तर नाही; पण त्याचा एक भाग असू शकेल. [अनेकदा असे लोक, त्यांच्यावर टीका केली असता जितके रागवत नाहीत; तितके त्यांच्या दैवतावर टीका केल्यास खवळतात. स्वतःवरील टीका वरकरणी हसतखेळत स्वीकारावी हा एक सामाजिक संकेत आणि आपला अहं दुखावला गेला आहे हे दिसू न देण्याची दक्षता - ही जी बंधनं स्वतःवरील टीकेचा वा दोषांचा प्रतिवाद करताना जाचक ठरू शकतात - ती बहुधा अशा व्यक्तीच्या (आयडॉल) समर्थनार्थ हिरीरीने सरसावताना गळून पडत असावीत; हे त्यामागचे एक कारण असू शकेल.]

ऋषिकेश's picture

21 Sep 2011 - 5:15 pm | ऋषिकेश

वेगळ्या परंतू समांतर वाटेवरचा हा प्रतिसाद आवडला.
खरंतर माझ्या प्रतिसादाच्या पुढचा विस्तारीत विचार म्हणून हा प्रतिसाद वाचुन एक विचारचक्र पूर्ण झाले.

मूळची यशस्वी व्यक्तीचे अनुकरण करण्याची (कदाचित उत्क्रांतीतून जन्मलेली) अंतःप्रेरणा

मलाही ही प्रेरणा 'नैसर्गिक' (म्हंजे कदाचित उत्क्रांतीतून जन्मलेली) वाटते आणि माझ्यापुरते बोलायचे तर स्वतः मात्र तितक्या नैसर्गिकपणे कोणत्याही एका दिशेने (विचारांकडे, व्यक्तीकडे हेच पुढे खेचुन धर्माकडे) खेचला जात नाही तेव्हा हा स्वतःमधेच असणारा दोष (अनैसर्गिक वागणे या अर्थी) असावा या कल्पनेने अधिक अस्वस्थ होते.

कधी कधी तर अधिक कठोर आत्मपरिक्षण करू लागलो तर मग संदीप खरेच्या या ओळींसारख्या (करड्या ओळी सोडल्यास उरलेल्या) व्यक्तीमत्वाकडे प्रवास चालला आहे का असे वाटू लागते:

भवताली संगर चाले तो विस्फारून बघताना
कुणी पोटातुन रडताना, कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होऊनी थिजलो रस्त्याच्या बाजुस तेव्हा
मज मारायाला देखील मग कुणी उचलले नाही

अर्थात मी निषेध वगैरे भरपूर (व योग्य ठिकाणी) नोंदवत असल्याने बाकी कविता अ‍ॅप्लिकेबल नाही याचेच समाधान मानायचे ;)

अर्धवटराव's picture

21 Sep 2011 - 11:15 pm | अर्धवटराव

या अशा चर्चा प्रस्तावांसाठी आणि प्रतिसादांसाठी :)

(मिपाकर) अर्धवटराव

यकु's picture

21 Sep 2011 - 6:41 pm | यकु

>>>सितार्‍यांपलिकडे , ग्लॅमर/पैसा या गोष्टींपलिकडच्या क्षेत्रांमधली तुमची आदरस्थानं आहेत काय ? असल्यास कोण ? कुठल्या क्षेत्रांत ? का ?

अशी कित्येक आदरस्थानं माहित असतील.. पण आत्ता नाव आठवतं ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं ! ते व्याख्याते होतेच, पण अत्यंत ऋजू स्वभावाचे लोकशिक्षकही होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात जी महान माणसे पाहिली, अभ्यासली त्यांचे गुण येणार्‍या पिढ्यांनी शतांशाने तरी घ्यावेत म्हणून त्यांनी त्या महनीय व्यक्तींच्या गुणसंकिर्तनात स्वतः जी वाणी व जीवन अर्पण केले. विद्यार्थी जीवनात मी त्यांची व्याख्याने ऐकली तेव्हा व्यासंगाने, आचरणाने शब्दांना सामर्थ्य मिळत असते याचं चालतं-बोलतं उदाहरण पहायला मिळाले.

एखाद्या अभिनेत्या/अभिनेत्री/खेळाडू बद्दलच्या प्रेमापेक्षा या अशा स्वरूपाच्या व्यक्तींबद्दलच्या भावनांमधे काही मूल्यात्मक फरक जाणवतो का ? असल्यास काय ?

वरचं माप धरायचं तर कुठलाच अभिनेता/ अभिनेत्री तेवढी आवडत नसे.

विविध क्षेत्रांतील व्यक्तींबद्दल वाटणार्‍या प्रेमाची/आकर्षणाची/आदराची/स्फूर्तीची भावना या स्वरूपाच्या गोष्टींमधे काही उतरंड असते असं तुम्हाला वाटतं का ? असल्यास त्याचे निकष काय आहेत ?

अशी उतरंड असावी असे वाटते. माणसाला एकाच वेळी अनेक काही व्हायचे असते, हवे असते या आकांक्षाच उतरंड ठरवतात आणि आयडॉलने टाकलेल्या प्रभावाची तीव्रता यावरून निकष ठरत असावेत.

ज्या व्यक्तींना तुम्ही तुमचे आयडॉल मानता त्यांचं काम तुम्ही जवळून पाह्यलं आहे का ? त्या कामाचं महत्त्व, त्याचं मर्म तुम्हाला काय जाणवलं ? इतरांना याबद्दल काही सांगू शकाल काय ?

ज्यांच्याकडे पाहून तसं ( त्यांच्यासारखं) जीवन जगण्याची आकांक्षा निर्माण होते ते आयडॉल असा अर्थ असेल तर असे अनेक आयडॉल्स पाहू शकलो. त्यांच्या कामाचं महत्व याबाबत वर प्राचार्यांच दिलेलं उदाहरण पुरेसं ठरेल.

यकु's picture

21 Sep 2011 - 6:43 pm | यकु

प्र.का.टा.आ.

पुनरावृत्ती.

चित्रा's picture

21 Sep 2011 - 7:08 pm | चित्रा

>सितार्‍यांपलिकडे , ग्लॅमर/पैसा या गोष्टींपलिकडच्या क्षेत्रांमधली तुमची आदरस्थानं आहेत काय ? असल्यास कोण ? कुठल्या क्षेत्रांत ? का ?

सितारे हे आदरस्थान असण्याइतकी ओळखच नाही. त्यामुळे आदर वगैरे वाटत नाही, कौतुक वाटते पण ते वर्तमानपत्रांतून त्यांच्या कामाची ओळख झाल्यावर. यापलिकडची आदरस्थाने म्हणजे काय? तिन्ही त्रिकाळ आदरस्थाने असलेल्या व्यक्ती कमीच आहेत. पण काही लोकांच्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आदर आणि कौतुक जरूर आहे.

माझ्या दूरच्या ओळखीत एक शिल्पकार आहेत, त्यांच्या पत्नी चित्रकार आहेत. मला या पतीपत्नींचे मित्रमंडळ पाहून कुतुहल आणि आदर वाटतो. गेली अनेक वर्षे अतिशय मोठे मित्रमंडळ हे पतीपत्नी सांभाळून आहेत, ते माझ्या तसे जवळचे नाहीत, म्हणून खूप कुतुहल वाटते की फारसे पैसे बाळगून नसलेले हे दांपत्य कसे काय लोकांच्या मित्रत्वाचा विषय असते?

ओळखीचे एक डॉक्टर आहेत आणि त्यांच्या सुविद्य, सुगरण पत्नी आहेत. हे दोघे वयाची पंचाहत्तरी ओलांडली तरी एकमेकांबरोबर आयुष्याची मजा घेण्यात मश्गुल असतात- हौस आली की कधी उठून गाडी काढून २०० किमी दूर असलेल्या गावी जाऊन येणे, तेही एक हार्ट अ‍टॅक येऊन गेल्यानंतर, पंचाहत्तरीनंतर. हे डॉक्टर गातात, एका शाळेमध्ये मानद सल्लागार म्हणून नेमाने जाऊन कामे बघतात, पुस्तकांची भाषांतरे करतात. स्वतःच्या धुंदीत असतात.

एक व्यक्ती अतिशय व्यवस्थित, टापटिपीची आहे. हे गृहस्थ एका संस्थेचे अमेरिकेतले थोडे काम बघतात. कसलेही नियोजन करण्याची त्यांची पद्धत अतिशय आदरणीय आहे. आणि संस्था चालवताना आलेले अनुभव कितीही वाईट असले तरी घेतलेले काम तडीला नेण्याची त्यांची जिद्द, कुवत ही माझ्या आदरास पात्र आहे.

व्यक्ती म्हणून अशा लोकांशी सर्वत्र आणि सदाकाळ पटण्याचे कारण नाही, पण आपण डोळे उघडे ठेवले तर प्रत्येकाचा आदर वाटू शकतो :-) एकाच व्यक्तीत सगळे काही असावे असा अट्टाहास म्हणजे आयन रँडच्या कथांमधील आदर्श पुरुषाची आठवण झाली. मला वाटते ते असंभवनीय नाही, पण शक्यता कमी आहे.

>एखाद्या अभिनेत्या/अभिनेत्री/खेळाडू बद्दलच्या प्रेमापेक्षा या अशा स्वरूपाच्या व्यक्तींबद्दलच्या भावनांमधे काही मूल्यात्मक फरक जाणवतो का ? असल्यास काय ?
नाही.

>विविध क्षेत्रांतील व्यक्तींबद्दल वाटणार्‍या प्रेमाची/आकर्षणाची/आदराची/स्फूर्तीची भावना या स्वरूपाच्या गोष्टींमधे काही उतरंड असते असं तुम्हाला वाटतं का ? असल्यास त्याचे निकष काय आहेत ?

प्रेम जवळिकीची भावना असल्याशिवाय होत नाही असे मला वाटते. आकर्षण लांबूनही असू शकते. उदा. सचिन तेंडुलकरमुळे क्रिकेटकडे आकर्षित झालेले लोक अधिक असतील, त्याच्याविषयी प्रेम हे विविध इतर भावनांनी (जसे मराठी म्हणून किंवा मुंबईचा मुलगा म्हणून) असे आपण अनुभवत असतो. आदर आणि स्फूर्ती ह्या भावना देश, भाषा, पेहराव या बंधनांपलिकडच्या असतात.

> ज्या व्यक्तींना तुम्ही तुमचे आयडॉल मानता त्यांचं काम तुम्ही जवळून पाह्यलं आहे का ? त्या कामाचं महत्त्व, त्याचं मर्म तुम्हाला काय जाणवलं ? इतरांना याबद्दल काही सांगू शकाल काय ?

मी आयडॉल कोणालाच मानत नाही. मी कोणा मोठ्या लोकांना फारसे ओळखत नाही. लहानसहान कामे करणार्‍या लोकांनाच ओळखते. त्यांचे काम प्रसिद्ध नाही, पण नेटके, देखणे, मेहनत घेऊन आणि पैशाची बेसुमार हाव न ठेवता केलेले असे.

मी मुंबईच्या कमल तांबे या जुन्या काही थोड्या लोकांना माहिती असतील या गायिकेस ओळखत असे, जवळून पाहिल्याने गाण्यावर खूप मेहनत घेणारी गायिका - तीही अतिशय साधी म्हणून ओळखत असे. गाणे ऐकण्याची आवड लागली ती कमलताईंमुळेच असे म्हणायला हवे.

काम चांगले व्हावे तर मेहनत घ्यावी लागते हे कळण्यासाठी अशी उदाहरणे आपल्या आजूबाजूला भरपूर असतात. ती सर्वच माझ्या आदराला पात्र आहेत.

प्रतिसाद नेहेमीप्रमाणेच आवडला :)

तिमा's picture

21 Sep 2011 - 7:19 pm | तिमा

सर्व प्रतिसाद आवडले आणि बर्‍याच सभासदांशी सहमत.
आयडॉल म्हणून कधीच कोणी व्यक्ति १०० टक्के पूजली नाही. पण प्रत्येक व्यक्तिमधे चांगले गुण हे असतातच. ते सगळे आपल्याला आत्मसात करणेही शक्य नसते. अशा अनेक प्रसिद्ध व अप्रसिद्ध व्यक्तिंच्या चांगल्या गुणांविषयी कौतुक वाटत आले आहे.

राजेश घासकडवी's picture

21 Sep 2011 - 7:53 pm | राजेश घासकडवी

छान चर्चाप्रस्ताव. ऋषिकेश आणि नंदन यांचे प्रतिसाद आवडले.

शाळेच्या वयात असताना अर्थातच आपले आईवडील हे आयडॉल्स असतात. थोरांची ओळख मधून, इतिहासाच्या पुस्तकांतून येणारे शूरवीर आवडतात तेही त्याच काळात. पण तो काळच वाईड आईड वंडर चा असतो. छोट्या डोळ्यांवर भव्य दिव्य पटकन बिंबतं.

या सगळ्यांना अगदी लादलेले नाही, पण काहीसे समाजाने जाणीवपूर्वक चमच्याने पाजलेले आयडॉल्स म्हणता येईल. पण जेव्हा आपण थोडे मोठे होतो, तेव्हा स्वतःसाठी स्वतःच्या विचाराने शोध घेतो. अशा काळात आपल्याला गवसलेले ते माझ्या मते खरे आयडॉल्स. कधी सुरूवातीला हाती लागलेले नंतर अजून मोठं झाल्यावर टिकतातच असं नाही. कधी आपण नशीबवान असतो आणि सुरूवातीलाच अगदी शंभर नंबरी सोनं हाती लागतं. माझ्या बाबतीत मला तसे दोन सापडलेले आहेत.

रिचर्ड डॉकिन्स - याचं सेल्फिश जीन पुस्तक वाचलं आणि माझ्या आयुष्यात क्रांती झाली. आपण कोण आहोत, कसे झालो, या सृष्टीचं कारण काय याविषयीचे सर्व प्रश्न लक्कन सुटले. आणि तेही मला आवडणाऱ्या व्यक्तिनिरपेक्ष पद्धतीने उत्तर शोधण्यातून. खरं तर त्याने दिलेलं उत्तर पूर्णपणे त्याने शोधून काढलं होतं असं नाही. पण ते त्या पद्धतीने मला समजावून सांगणारा तो पहिला होता. पुढे त्याने घेतलेली विज्ञानवाद्यांच्या प्रवक्त्याची भूमिका देखील आवडली. एकाच वेळी तर्कसंगत आणि तरीही रसरशीत व दमदार लेखन करण्याच्या बाबतीत तो माझा आदर्श आहे.

डग्लस हॉफस्टॅडर - ग्योडेल, एश्चर, बाख. हे उच्चारलं की शब्दच संपतात. माझ्या मते ते बौद्धिक विषयावरचं महाभारत आहे. संगीत, चित्रकला व गणित या तिन्हींमधून आढळणाऱ्या समान सूत्रांना घेऊन त्याने एक सुंदर गोफ विणला आहे. हे करताना त्या गोफाचा घाट त्या सूत्रांच्या स्वरूपातच केलेला आहे. भाषा, उत्क्रांती, झेन या विषयांना त्या गोफांत गुंफलेलं आहे. सत्य म्हणजे काय, सिद्धता म्हणजे काय या प्रश्नांवर उत्तम भाष्य केलेलं आहे. फॉर्म आणि कंटेंट यांचा इतका सुंदर संगम करणारं, इतक्या ज्ञानाचा इतका विस्तृत कॅनव्हास समर्थपणे सजवणारं, आणि नवीन दृष्टी देणारं पुस्तक इतर कोणी लिहिलं असेल असं वाटत नाही. त्यामुळे तो लेखनाबाबत माझा आदर्श आहे. या पुस्तकासारखं काहीतरी लिहावं असा माझ्या मनात नेहमी विचार येतो, पण ते मला झेपणारं नाही. निदान या पुस्तकावर कधीतरी विस्तृतपणे लिहायचा विचार आहे.

बाकी अनेक आहेत. कवितेच्या बाबतीत मर्ढेकर व कोलटकर आहेत. तशी यादी खूपच मोठी होईल. उतरंडीपेक्षा मला वाटतं की एक डिस्ट्रिब्यूशन असतं. भक्तीसदृश दृष्टीकोन असावा असे हाताच्या बोटावर मोजण्यासारखे असतात, त्याखालोखाल वेगवेगळ्या क्षेत्रातले पंचवीस-पन्नास असतील, आणि उतरत्या क्रमाने वाढत जात असावेत.

मुक्तसुनीत's picture

21 Sep 2011 - 8:19 pm | मुक्तसुनीत

सर्वप्रथम , ज्यांना या धाग्यात आवर्जून लिहावेसे वाटले त्यांचे आभार. उत्तम प्रतिसाद आलेले आहेत आणि यातून मला व्यक्तिश: काही नवे निश्चित मिळते आहे.

आपल्यावर कुणाकुणाचा नि कसकसा प्रभाव पडला आहे हा विषय बहुपदरी असू शकतो. आयुष्याच्या एका वळणावर प्रभाव टाकणार्‍या व्यक्ती पुढील प्रवासामधे अस्पष्ट अस्पष्ट वाटायला लागतात खर्‍या. आपण आपल्याच मूल्यांना आणि विश्वासांना प्रश्न विचारतो आणि बर्‍याचदा यातून श्रेयस-प्रेयसाचे पुनर्वर्गीकरण होत रहाते. असे होणे आरोग्यकारक आहे असं मी मानतो. "दैवत" , "आयडॉल" हे शब्द केवळ सोयीकरता प्रस्तावामधे लिहिलेले आहेत. त्याचा शब्दशः पूजासदृष अर्थ घेऊ नये. जोवर "Question everything, believe nothing at its face value" या तत्वावर आपली वाटचाल होते आहे तोवर कुणाचेच देव्हारे माजवण्याचा धोका संभवत नाही. (गवि यांनी या संदर्भात काही प्रश्न विचारले आहेत. त्याचं मला जाणवलेलं उत्तर मी वरील परिच्छेदात दिलंय.)

प्रदीप विचारतात :
पण एखादी व्यक्ति केवळ सितारा/सितारी आहे आणि/किंवा पैसेवाली आहे म्हणून ती (इतर अन्य कारणांमुळे) आदरस्थानी असू शकत नाही काय?

माझ्या प्रस्तावामधे असा सूर लागला असेल तर मला तसं म्हणायचं नव्हतं हे नमूद करतो. माधुरी दीक्षितचंच उदाहरण घ्यायचं झालं तर किती वर्षं ती अमुकच सुंदर दिसते म्हणूनच आवडते अशा प्रकारची विधानं आपण करणार ? थोडक्यात, "ती रुपवती होती/आहे आणि ग्लॅमरस आहे म्हणून ती आवडती आहे" या प्रकारचे विचार पौगंडावस्थेपलिकडे टिकणं मला गमतीदार वाटतं. सिनेमाच्या माध्यमात तिने केलेलं कुठलं काम तिच्या सौंदर्याव्यतिरिक्त उल्लेखनीय ठरेल असा माझा प्रश्न होता. असो. आशा आहे की मला जे सांगायचं ते ( या संदर्भात) अधिक स्पष्ट झालं असेल.

बाकी ज्युलियन असांज यांचं नाव प्रस्तुत संदर्भात कुणीतरी घेतलं याचा मला मनापासून आनंद झालेला आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रांत देदीप्यमान कामगिरी करणारे लोक येणार हे निश्चितच होतं. मात्र ज्याच्या एकहाती कामामुळे देशादेशातल्या सत्ताधीशांची झोप उडवली , आणि हे सगळं एकही शस्त्र न चालवता ज्याने करून दाखवलं त्याचं नाव इथे घेतल्याबद्दल मला व्यक्तिशः अतिशय आनंद झालेला आहे.

नंदनचा संपूर्ण प्रतिसाद मला नवं शिकवणारा आहे. पुन्हापुन्हा वाचायला नि विचार करायला प्रवृत्त करणारा.

मी सर्वांचा आभारी आहे.

विकास's picture

21 Sep 2011 - 8:46 pm | विकास

आयडॉल या शब्दाचा शब्दशः अर्थ, "An image used as an object of worship." असा आहे. त्या अर्थाने मी व्यक्तीपूजक नसल्याने माझे "आयडॉल्स" नाहीत असे सोपे उत्तर देता येईल. (या प्रतिसादासाठी शिवाजी, टिळक, आगरकर, गोखले, फुले, आंबेडकर, गांधीजी, सावरकर, आमटे, बंग आदी नावे बहुतांशी समान असल्याने टाळत आहे.).

पण सामान्य-असामान्य व्यक्तीमत्वात असे गुण असतात ज्यांचे नुसते पूजनच नाही तर आत्मसात करता यावेत असे वाटते आणि ते जेंव्हा जमत नाही तेंव्हा ते गुण असलेल्या व्यक्तींचा हेवा देखील वाटतो.

माधुरी दिक्षितचा वर उल्लेख आला आहे म्हणून प्रथम तिच्याबद्दलचः यशाच्या उत्तुंग शिखरावर आणि ते देखील चंदेरी दुनीयेत असताना, एक दिवस सरळ राम राम म्हणून, शक्य तितके साध्या पद्धतीने लग्न करून सगळे सोडून दिले आणि संसारी झाली. हे खरेच सोपे आहे का? योग्य वेळेस मोहवणार्‍या जगाकडे पाठ फिरवण्याचा हा गुण मला घेयला आवडेल...

पुलंच्या बाबतीत त्यांच्या लेखनापेक्षा त्यांनी आणि त्यांच्याही पेक्षा जास्त सुनीताबाईंनी जे काही समाजाचे ॠण फेडले आहे ते फेडण्याचा किमान अथक प्रयत्न करायला मला आवडेल.

"शपथ लेना तो सरल है पर निभाना ही कठिन है। साधना का पथ कठिन है." असे संघातले एक गीत आहे. मात्र या कठिन पथावर काम करणारे आणि अनेक प्रकल्प तयार करणारे बघितले आहेत. काही अगदी जवळून. त्यातील भारतातील काही नावे म्हणजे कै. दत्तोपंत ठेंगडी आणि कै. लक्ष्मणराव भिडे. त्या व्यतिरीक्त अनेक नावे आहेत जे सर्वार्थाने स्वत:च्या क्षेत्रात उच्चविद्याभुषीत, प्रथितयश आहेतच पण तरी देखील पाय जमिनीवर ठेवून सामाजीक कार्य करत आहेत. काही धीरगंभिर तर काही अतिशय मिष्कील! त्याचा शो ऑफ देखील नसतो आणि इतरांवर तसे वागायचे या संदर्भात उपदेश नसतो... जसे संघात बघितले आहे तसेच अगदी पूर्ण उद्यमशिलतेशी निगडीत असलेल्या टाय सारख्या संस्थेत देखील बघितले आहेत...उच्चविद्याभुषीत, धंद्यामधे अतिशय सफल आणि तरी देखील पूर्ण जमिनीवर राहून काही ना काही स्वतःच्या बाहेर जाऊन गाजावाजा न करता कामे करणारे... या सगळ्यांचा "जस्ट डू इट" अ‍ॅटीट्यूड मला जास्तीत जास्त आत्मसात करायला आवडेल.

सरते शेवटी आदरणीय स्थाने ही घराबाहेरच असतात अशातला भाग नसतो. आई-वडील झाले अथवा मावशी-आजी झाले, मी तर असे सख्खे शेजारी आणि मित्र देखील पाहीले आहेत. अनेकांचे स्वतःच्या यातना झाकून इतरांसाठी निरपेक्ष प्रेम बघितले आहे. हा जसा माझा अनुभव आहे तसाच माझी खात्री आहे, इतर अनेकांचा त्यांच्या त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यात अनुभव असणार. अशा रुढार्थाने सामान्य असलेल्या व्यक्तींमुळे देखील प्रेमाचा ओलावा समाजात वाढतो, सगळे जग वाईट आहे ह्या गैरसमजापासून दूर जाता येते आणि माणसे घडून समाज पुढे जायला मदत होत असते. असे निरपेक्ष प्रेम करण्याची ताकद मला कायम कमवत रहायला आवडेल.

असो. तुर्तास इतकेच. :-)

पैसा's picture

21 Sep 2011 - 9:45 pm | पैसा

चर्चेचा विषय आणि बर्‍याच जणांचे प्रतिसाद आवडले. मला काय वाटलं ते नीट मांडायली जमेल का माहिती नाही. पण तरी खरडते. इथे आयडॉल्स म्हणजे देव्हार्‍यात ठेवून पूजा करण्याची वस्तू अभिप्रेत आहे का? तर अशा प्रकारची आंधळी व्यक्तीपूजा अर्धं आयुष्य सरल्यावर यापुढे मी कधी करीन हे मला तरी शक्य दिसत नाही.

लहान असतानापासून माझ्या सगळ्यात जवळची आदर्श वाटणारी व्यक्ति म्हणजे अर्थातच माझी आई. तिने आयुष्यात इतक्या प्रकारचे आघात सहन केलेत, की कुंतीनंतर बहुधा देवाकडे दु:ख मागून जन्माला आलेली तीच असावी, पण तरी आज तिच्यात आयुष्याबद्दल कडवटपणा नाही. ती सतत सगळ्यांना देतच आली. प्रत्येक गोष्टीला "का" हा प्रश्न विचारायची सवय तिनेच लावली. तिच्यासारखं कणखर व्हायला मला नक्कीच आवडेल.

मुसु, इथे तुम्ही कलाकारांबद्दल बोललात, पण लताबाईंचं आयुष्य सुद्धा खूप कठीण गेलंय. १०/१२ वर्षांच्या मुलीने अख्खं घर चालवलं आणि सगळ्या संकटांतून वाट काढत ती अत्युच्च शिखरावर पोचली अशी उदाहरणं आजतरी दुर्मिळच. आजही इतर कलाकारांसारखे पैसे त्यांच्याजवळ नसतील पण एक मोठं हॉस्पिटल सुरू करून त्यानी नक्कीच मोठं काम केलंय.

किरण बेदी, अण्णा हजारे, मेधा पाटकर अशी एका ध्येयाने वेडी होऊन हे जग जास्त चांगलं बनवायचा प्रयत्न करणारी माणसं मला आदर्शवत वाटतात. भले, काही वेळा त्यांचा अतिरेक होतोय असं वाटलं तरी त्यापाठीमागे उद्देश चांगलाच आहे हेही माहिती असतं त्यामुळे सामान्यत्वाच्या पुढे एक पाऊल उचलणारी, जास्त चांगली "माणसं" मला आदरणीय स्थान वाटतात.

आजच्या काळातील एक बर्‍यापैकी प्रामाणिक उद्योगपती रतन टाटा मला आदरणीय वाटतात, ते त्यांच्या अनेक सामाजिक उपक्रमांमुळे. त्याशिवाय ताजमहाल हॉटेलवरच्या हल्ल्याच्या वेळचं त्यांचं एकूण वागणं आणि परदेशातल्या कंपन्या ताब्यात घेऊन उत्तमरीत्या चालवण्यातून त्यानी सगळ्या जगाला दिलेला संदेश याचाही एक भारतीय म्हणून मला अत्यंत अभिमान वाटतो.

इतिहासातले शिवाजी महाराज, टिळक, सावरकर, गांधीजी आणि असे आणि कितीतरी , ज्या सगळ्यांची नावं मला एका क्षणात सांगता येणार नाहीत. हे सगळेच वेगवेगळ्या प्रकाराने असामान्यत्वापर्यंत पोचलेले महात्मे, ते सगळ्यानाच आयडॉल्स वाटतात.

थोडक्यात म्हणजे "जे जे उत्तम उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते..." मला हात जोडायला भाग पाडतं. पण ही सगळी माणसंच होती, आहेत हे भानही असतंच. त्यामुळे कोणी जरी यापैकी एखाद्याच्या चुका दाखवल्या तरी त्यात काहीतरी भयंकर घडलंय असं मला वाटत नाही. आपल्या सामान्यत्वावर मात करायला प्रेरित करणारे सगळेच माझे आयडोल्स!

सुवर्णमयी's picture

22 Sep 2011 - 12:36 am | सुवर्णमयी

माधुरी म्हटले की माझाच दिल धकधक करायला लागायचा एके काळी! हुश्श! असो. आमीरखानही आवडायचा. जे जे काही प्रसिद्ध, नावाजलेले म्हणजे एकदम ग्रेट असणार अस वाटायच, जे काही ग्रेट ते प्रसिद्ध होत असही:)गावस्कर तेंडुलकर, विवियन रिचर्ड्स इत्यादी फोटो होते माझ्या आलमारीवरः)

एके काळी शाळेतल्या बाई, त्यानंतर एकदम कुठलातरी मोठा शास्त्रज्ञ, सगळे क्रांतिकारक असे वेगवेगळे आदर्श माझ्यासमोर होते. जाणिवा जसजशा अधिक वाढल्या, डोळस झाल्या तसा हा आदर्शांचा गुंता सुटला. तेव्हा सुद्धा आदर्श होते पण त्यांचे अनुकरण करावे असे कधी वाटले नाही. एक गोष्ट लक्षात आली की आदर्श हे व्यक्ती नसून काही त्यांच्या अंगी असणारी तत्त्वे, वृत्ती होती. त्याचे आकर्षण होते म्हणू.
शाळा कॉलेजबरोबर हे सगळ संपल हे एका अर्थी बरच झाल. आपल्याजवळ कोणतीही जादू नाही, त्याचवेळी आपण कोणताही महान त्याग करू शकत नाही, आपण असामान्य नाही ही जाणीव प्रकर्षाने आतल्या आत निर्माण होत होती. तसेच इतर महान वाटणारी माणसे सुद्धा 'द परफेक्ट' नाहीत हे सुद्धा कळत होते. मग काय महत्त्वाचे शेवटी?
सगळी माणस असतात, प्रत्येकात काही तरी चांगल्या गोष्टी असतात. त्या मान्य करणे, त्याचे कौतुक करणे हे मला आवडते. अजूनही असे एखाद्या गोष्टीबद्द्दल आकर्षण वाटते, थोडे जास्त कौतुकही करते मी. पण त्याने स्वत:चा विसरबिसर पडत नाही. त्या व्यक्तीचे अनुकरण तर कधीच नाही.सुदैवाने वेगवेगळ्या प्रांतात, विषयात उत्तमोत्तम काम करणा-या अनेक चांगल्या व्यक्तीची ओळख , त्यांचा सहवास मला मिळाला. पण त्याने अगदी दिपून वगैरे जायला झाले नाही. होत नाही.
किमान लिहितांना काळे पांढरे असे वर्गिकरण न करणे ही महत्त्वाची जाणीव मेघना पेठेच्या हंस अकेला वाचल्यावर मला झाली. आधी का झाली नव्हती माहिती नाही:) हे श्रेय तिचे! पण म्हणून मेघना करते ते सर्व बरोबर आणि फक्त तीच किती मोठी असे माझे मत नाही. माझ्या लेखनात तिचे अनुकरण तर नाहीच नाही..काही इतर जणांच्या लेखनात मग मला हाच शोध लागला..
अनेकदा आपण आपल्याच स्वभावावर, वागण्यावर उपाय शोधत असतो आणि त्या प्रवासात एखादी व्यक्ती भेटते आणि काही चार शब्द बोलते, आपले बोलणे ऐकते, त्यात त्या व्यक्तीकडे आपल्याला तोलण्याचा तराजू नसतो- तुच्छता नसते,कोणताही मतलब नसतो- ही आजच्या काळात दुर्मिळ गोष्ट आहे, मला याचे आकर्षण आहे. अशा वेगवेगळ्या व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या आहेत. त्या पैकी काही रूढार्थाने प्रसिद्ध वगैरे पण आहेतः) पण मला माणुसकीचे जास्त आकर्षण आहे. शाळेत नेणारा बाबा रिक्षेवाला, बस स्टॉप वर पैसे हरवले तर शोधायला मदत करणारी अनोळ्खी मैत्रिण, घरी कामाला येणारी बाई, योग्य पत्ता सांगणारा रस्त्यावरचा एखादा माणूस... अशा अनेक व्यक्तीही मला महत्त्वाच्या वाटतात.. असाच आनंद जर मला कुणाला देता आला तर नक्कीच आवडेल. वेगवेगळ्या रूपात दिसणारी माणसातली माणुसकी हा एकच मुद्दा आता जास्त महत्त्वाचा वाटतो. त्याचवेळी
स्वतः बद्दल ची जाणीव जास्त टोकदार होते आहे म्हणून की काय अनुकरण इत्यादी कमीपणा वाटतो, यात अनेकदा चांगल्या गोष्टीचे अनुकरण करता येत नाही म्हणून करत नाही असेही म्हणता येईलः)
एकंदर चर्चा आणि प्रतिसाद आवडले.

सन्जोप राव's picture

22 Sep 2011 - 6:32 am | सन्जोप राव

असेच म्हणतो. जे आदर्श वगैरे वाटले त्यांच्याविषयीही वस्तुनिष्ठ रहाणे महत्त्वाचे. 'भारावून जाणे' वगैरे आता भाबडेपणाचे वाटते.

प्रभाकर पेठकर's picture

22 Sep 2011 - 1:16 am | प्रभाकर पेठकर

व्यक्तींचा आदर्श वाटण्यापेक्षा त्यांच्या कर्तृत्वाचा, विचारांचा, मतांचा आदर वाटला आणि तो कधीच कमी झाला नाही. व्यक्ती परिपूर्ण असतीलच असे नाही त्यामुळे त्यांचे काही वागणे, काही घटनेतील प्रतिक्रिया आवडत देखिल नाहीत तरी त्यांची जी मतं, विचार आवडलेले असतात त्यात कमीपणा येत नाही. कर्तृत्व आवडले पण खाजगी आयुष्यातील वर्तन आवडले नाही असेही होते पण त्याने कर्तृत्वाला डाग लागत नाही. म्हणूनच व्यक्ती आयडॉल होण्यापेक्षा अनेक व्यक्तीचे अनेक विचार जे माझ्या व्यक्तीमत्वास वैचारिक परिपूर्णता देण्यास कारणीभूत झाले आहेत, होत आहेत आणि होत राहतील असे सर्व विचार, ज्या कर्तृत्वांनी आयुष्यात संघर्ष करण्याचे मानसिक बळ दिले अशी सर्व कर्तृत्वं मला आदर्श वाटतात, आयडॉल वाटतात.

मोठ्या लोकांच्या गोष्टी वाचून त्यातून मला आचरणात आणण्यासारखे काही असेल तर तसा प्रयत्न जरूर करते. बाकी आजूबाजूच्या सामान्य समजल्या जाणार्या लोकांपासूनही शिकण्यासारखे, मार्गदर्शन घेण्यासारखे बरेच असते.

बाकी आयडॉल वगैरे प्रकार माझ्याबाबतीत तर कधीच नव्हते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Sep 2011 - 2:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ऋषिकेशच्या प्रवासापेक्षा माझा प्रवास फार वेगळा नाही. त्यामुळे त्यातले डीटेल्स देत नाही.
राजेशचा प्रतिसाद विशेषतः शेवटचा परिच्छेद आवडला, पटला. दोन्ही पुस्तकांची यादीत भर पडली आहे.

नंदनच्या प्रतिसादावर थोडा जास्त विचार करावासा वाटतो. (हे ही लाऊड थिंकींग म्हणून विस्कळीतच आहे.) माणसांमधे(च) अनेकदा उत्क्रांतीवादाच्या विरोधात वागण्याच्याही खुणा दिसतात, उदा. दुर्बलांचं रक्षण आणि त्यांचेही हितसंबंध जपण्याचा प्रयत्न करणे, अनेक माणसे स्वतःकडून होणार्‍या वंशवृद्धीच्या होण्याच्या विरोधात असणे इ.
पूर्वसूरींनी बनवलेल्या पायावर उभं राहून लांबचं बघण्याचा प्रयत्न करताना अनेक लोकं मळवाट सोडून चालणारे दिसतात. लौकीकदृष्ट्या हे लोक यशस्वी असतीलच असंही नाही, पण वेगवेगळ्या लोकांच्या यशस्वीतेच्या व्याख्याही वेगवेगळ्या असतात. वेगळ्या वाटांनी जाणारे लोक कालौघात यशस्वी आहेत असं वाटलं, (ज्या प्रयोगाचा नंदनने उल्लेख केला आहे, त्यात किंग यांनी म्हटलं की त्यांना त्यांचं योग्य उत्तर माहित होतं, पण प्रत्यक्षात हे माहित नसतं) तर पुन्हा त्यांचे अनुनयन करणं कशाला म्हणणार? तेव्हा त्यांनी जे विचार मांडले त्यांचं अनुसरण करण्याला का वेगळी वाट चालणं याला?

चाकाचा शोध पुन:पुन्हा लावण्याची गरज नसावी; पण चाकाचा वापर करून कोणत्या रस्त्याने जायचं तो रस्ता प्रत्येकाने आपापला शोधावा. आपले आदर्श त्यात थोडीबहुत मदत करू शकतात पण त्यांच्याच रस्त्याने चालायचं ठरवलं तर विभूतीपूजा अटळ असावी.

विचार करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल मुक्तसुनीत, ऋ, नंदन, राजेश यांचे आभार.

चांगला चर्चाप्रस्ताव, मननीय प्रतिसाद.

राही's picture

22 Sep 2011 - 7:57 pm | राही

जो जो जेथें देखिलासे गुण,
तो तो म्यां गुरु केला जाण,
गुरूसी आलें अपारपण,
जग सर्वत्र गुरू दिसे!
एकाच व्यक्तीमध्ये सर्व गुण सापडणे कठिण आहे.काही थोडे गुण आणि बरेचसे अवगुण अशीच विभागणी असते. त्यामुळे आदरणीय कोणीच नाहीत आणि सर्वच आहेत असे वाटत राहाते. अर्थात ज्या क्षेत्रातले गुण अथवा कर्तृत्व आदरणीय वाटले तेव्हढ्या क्षेत्रापुरताच त्या त्या व्यक्तीशी व्यवहार ठेवावा असे ठरवले आहे.अर्थात असे वागणे नेहमीच साधते असे नाही. कित्येक वेळा ते परस्परछेदक असू शकते. मात्र एखाद्या व्यक्तिमत्वातली काळी बाजू लक्षात आली तरी त्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर काठ मारून आपल्या परिघातून हद्दपार करीत नाही. अनुकरण आहे किंवा आदर्श आहेत पण ते संपूर्ण व्यक्ती नव्हेत तर त्यांचा काही भाग अथवा अंश.

पिवळा डांबिस's picture

23 Sep 2011 - 3:42 am | पिवळा डांबिस

सुरवातीच्या कुमारवयाच्या काळात असामान्य कर्तूत्व गाजवलेल्या व्यक्ती भेटल्या की त्यांच्याबद्दल विलक्षण आदर आणि आपुलकी वाटत असे. ह्यालाच आयडॉल बनवणे म्हणत असतील तर तसे होते कदाचित...
परंतु नंतर विशिष्ट व्यक्तीबद्दल विशिष्ट क्षेत्रापुरताच आदर ठेवण्याची दृष्टी आली. संपूर्ण व्यक्तीला सरसकट आयडॉल मानण्यातला फोलपणा कळून आला.
थोडक्यात आता एखाद्या व्यक्तिला आयडॉल बनवण्यापेक्षा तिचे आयडीयल्स आत्मसात करावेत असं वाटू लागतं. पुलं, आशा भोसले, गावसकर, बाबा आमटे हे आयडॉल्स न वाटता पुलंची निरिक्षणशक्ती, आशाताईंची मेहनत घेण्याची तयारी, गावसकरची मैदानावर बॅटिंग करतानाची एकाग्रता, बाबा आमट्यांचा समाजसेवी स्वभाव आणि धाडस यांचं आकर्षण जास्त वाटतं...

(डिस्क्लेमरः वरील प्रतिसादातील नांवं ही एक उदाहरण म्हणून घेतली आहेत. हे सगळे माझे आयडॉल्स आहेत असा समज नसावा.)