मोबाईल

विकास's picture
विकास in काथ्याकूट
17 Jun 2008 - 6:33 pm
गाभा: 

मोबाईल फोन्स वापरण्यात भारतात सर्वत्रच आणि विशेष करून शहरात, त्यातही तरूण वर्ग बराच पुढे आहे. वर्षानूवर्षे दूरध्वनी क्रमांक मिळण्यासाठी तिष्ठत राहावे लागलेल्या भारतात आता मोबाईल तरी लगेच मिळू शकतो आणि जगाबरोबर दुहेरी संवाद सहजसाध्य होतो.

अर्थात त्याच बरोबर शाळा-कॉलेजात मोबाईल्स आले त्याचे दुष्परीणाम, नंतर मोबाईल मधे असलेले कॅमेरा आणि व्हिडीओ कॅमेरा यांचे वाईट उपयोग आदी सुरू झाले. पण अशा गोष्टींना आळा घालणे शक्य असते.

आज मात्र म.टा. मधे खालील (सारांशाने दिलेली) बातमी वाचली. ज्यातील माहीती कायमच कुठेन कुठे तरी ऐकली आहे पण इतकी अधिकृत कशी आणि कोणी दिली असे वाटले:

मोबाइलचा वापर सर्वांनाच धोकादायक
16 Jun 2008, 1751 hrs IST

नवी दिल्ली ,
मटा ऑनलाइन वृत्त

मोबाइल फोनमुळे होणा-या रेडिएशनचे शरिरावर अनेक वाईट परिणाम होतात. म्हणूनच लहान मुले आणि गर्भवती महिला मोबाइल फोनचा वापर करत असतानाच्या प्रचार मोबाइल फोनचे सर्विस प्रोवायडर आणि फोन निर्मात्यांनी टाळावा अशा सूचना सरकारने दिल्या आहेत.

मोबाइल फोनमधून निघणा-या इलेक्ट्रिक मॅग्नेटिक वेव्ज या मोबाइलचा वापर करणा-यांच्या डोक्यातील टिश्यूला नुकसान पोहोचवू शकत असल्याचे
दूरसंचार मंत्रालयाने अलिकडेच जाहीर केलेल्या मार्गदर्शनपर सूचनेत म्हटले आहे. तसेच लहान मुले , गर्भवती महिलला , हृदयविकाराचे रूग्ण यांनी मोबाइल फोनचा वापर कमी प्रमाणात करावा , असेही या सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. ....

वरील बातमी मुळे काही प्रश्न उद्भवतातः (हे विचारत असताना मोबाईलच्या दूष्परीणामांबद्दल मला शंका घेण्याचा उद्देश नाही. किंबहूना अशा सुचनेचे स्वागतच आहे)

  1. सामाजीक स्वास्थ्याच्या दृष्टीने इतकी महत्वाची बातमी असून देखील इतकी शांतपणे कशी दिली जात आहे?
  2. त्यासाठी सरकारने नक्की कुठले वैज्ञानिक निरीक्षण संदर्भ म्हणून वापरले?
  3. इतरत्र (देशांमधे) इतके अधिकृतपणे (सरकारी) सांगितले गेले आहे का?
  4. वास्तवीक राजकारण्यांचा विचार करता मोबाईल कंपन्या त्यांना सहज खिशात घालून गप्प करू शकतील असे वाटते. तरी देखील असली सुचना जर दिली जात असेल तर याचा अर्थ सरकार कडे काही समाजस्वास्थ्यासंदर्भात अधिक माहीती उपलब्ध झाली आहे का? की ज्याबद्दल विशेष न बोलता फक्त अशी सुचना दिली जात आहे?
  5. आणि सर्वात महत्वाचे तुम्हाला या संदर्भात (मोबाईल वापर) काय वाटते?

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jun 2008 - 8:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल या प्राथमिक गरजा आता झाले असतांना. मोबाईल वगळून आयुष्य मग कोणत्याही वर्गाचे, गरीबातला गरीब असो की श्रीमंतातला श्रीमंत
मोबाईल नसला तर पांगळेपणा यावा इतकी ती गरज बनली आहे. वेगवेगळ्या सुविधा देणा-या कंपन्यांच्या 'स्कीम' ने तर त्याचे वेड वाढवले आहे. ५ रुपयाच्या टॉकटाइमपासून तर कितीही, अशा विविध योजना आमच्या घरात कधी घुसल्या कळल्या नाहीत. कधीतरी मोबाईलच्या वापरामुळे शरिरावर वाईट परिणाम होतो. असे कुठे तरी संशोधन झाल्याची बातमी वाचली की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचा परिणाम होतो असे स्वतःचे समाधान करुन घेण्यात धन्यता मानणा-यात आम्हीही असतो .मोबाईल कॅमे-याने काय काय टीपता येते आणि कोण-कोणत्या व्हिडियो क्लीप, ब्लुटूथ ने एकमेकांना पाठवता येतात. ते आम्ही जवळून पाहिले आहे. त्याला आळा घालणे म्हणजे काय ? दिलेल्य सुविधांचा वापर करायचा नाही असे म्हटल्यावर त्यावर नियंत्रण येईल याची शक्यता नाहीच असे वाटते.

सामाजीक स्वास्थ्याच्या दृष्टीने इतकी महत्वाची बातमी असून देखील इतकी शांतपणे कशी दिली जात आहे
सामाजिक स्वास्थ मोबाईलमुळे बिघडते हेच अजून कोणत्याच पीढीच्या ध्यानात येत नाही, आलेले नाही. त्यामुळे ती बातमी चार कॉलमचीही असती तरी त्या बातमीला शांतपणेच घेतले असते असे वाटते. अजून मोबाईल स्वास्थ बिघडवतात हेच आम्हाला पटत नाही.

त्यासाठी सरकारने नक्की कुठले वैज्ञानिक निरीक्षण संदर्भ म्हणून वापरले?
हा हा हा हा अहो, दुरसंचार विभागात एक असलेले गृहस्थ सांगतात. आमच्यावर तांत्रिक दृष्ट्या अवलंबून असलेल्या आणि बरेच आर्थिक व्यवहार गुंतलेल्या वेगवेगळ्या कंपण्यांची अधिक मदत करण्याचे धोरण सरकारचे असते, तेव्हा असले वैज्ञाणिक निरीक्षण केलेही असेल असे गृहीत धरले तरी हा इशारा म्हणजे सिगारेट पाकिटांवर असलेल्या वैज्ञानिक इशारा सारखे वाटते.

इतरत्र (देशांमधे) इतके अधिकृतपणे (सरकारी) सांगितले गेले आहे का?
माहित नाही !!! याची माहिती आपणच आम्हाला सांगितली पाहिजे :) तीही अधिकृत !!!

वास्तवीक राजकारण्यांचा विचार करता मोबाईल कंपन्या त्यांना सहज खिशात घालून गप्प करू शकतील असे वाटते.
मोबाईल कंपन्यांनी राजकारण्यांना गप्प केलेलेही असेल पण दुष्परिणाम जो पर्यंत दिसत नाहीत तो पर्यंत राजकारणी याचा विचार करणार नाही असे चित्र सध्या तरी आहे.

तरी देखील असली सुचना जर दिली जात असेल तर याचा अर्थ सरकार कडे काही समाजस्वास्थ्यासंदर्भात अधिक माहीती उपलब्ध झाली आहे का?
झाली असेल. त्यामुळे कधी भविष्यात संसदेच्या कामकाजात विरोधी पक्षाच्या सदस्याने कधी जर यावर प्रश्न विचारला तर जनतेत जागृतिचे प्रयत्न झाले होते. हे दाखवण्यासाठीची तजवीज म्हणुन तसे धोरण सरकार आखू शकते. मोबाईलचा वापर स्वास्थ बिघडवतो यासाठीही लोकशि़क्षण द्यावे लागेल.

की ज्याबद्दल विशेष न बोलता फक्त अशी सुचना दिली जात आहे?
असेच असावे !!!

आणि सर्वात महत्वाचे तुम्हाला या संदर्भात (मोबाईल वापर) काय वाटते?
दहा वर्षापुर्वी भारतात भविष्यात मोबाईलचे वेड वाढेल असे कोणी म्हटले असते तर त्याला वेड्यात काढले असते. पण एक गोष्ट खरी आहे, आधुनिक सोयी नक्कीच मोबाईलने दिल्या. दुरध्वनीच्या बाबतीतले सरकारी धोरण वेगवान नाही, आज तालुक्याच्या ठिकाणी इंटरनेटची ब्रॉडबँड सुविधा आता आता दिल्या जात आहे. अर्थात तीही सोय महागडी अशीच आहे. त्या तुलनेत इतर कंपन्यांचे मोबाईल संगणकाला जोडले की जालाची सुविधा मिळते (आता एअरटेल ने मान टाकली वेगाच्या बाबतीत ) एकीकडे सरकार सर्व विद्यार्थी, कर्मचारी यांना संगणक साक्षर आणि जालाचा वापर करण्यास प्रोत्साहित करत आहेत. त्या तुलनेत शासनाचे दुरध्वनी ( लँडलाइन)काळाच्या स्पर्धेत मागे आहेत असे वाटते. शाळेत काही ठिकाणी मोबाईलला बंदी आहे, कँम्पस मधे वापरता येतात. शासकीय परिपत्रकाने महाविद्यालयात मोबा. वापरु नये असे एक परिपत्रक वाचल्याचे स्मरते पण अंमलबजावणी कोणी करायची, महाविद्यालयात तर विचारु नका मोबा. फॅड . जो पर्यंत थेट परिणाम दिसत नाही....म्हणजे मोबाईल नसतांनाही हॆलो, हॆलो....असे बडबडणारे. आणि अधिक संखेने आरोग्यावर होणारे परिणामही दिसत नाही तो पर्यंत मोबाईल अलबेल आहे. असो, मोबाईलबद्दल इतकेच म्हणेन कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचे वाईट परिणाम भोगण्याची तयारीही ठेवली पाहिजे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिखाळ's picture

17 Jun 2008 - 9:04 pm | लिखाळ

हो ! मी सुद्धा या आधी कुठेतरी वाचले-ऐकले आहे. मोबा़ईलमधून निघणार्‍या विद्युत-चुंबकिय लहरींमुळे आपल्या शरीरातील नाजूक अवयवांना इजा होते..वगैरे. त्यात असे सुद्धा आठवते की मोबाईलवर फोन येताना त्याचा सर्वांत जास्त दुष्परिणाम होत असतो.

यावर मला सुचलेले उपाय.
१. मोबाईल शर्टाच्या वरच्या खिशात ठेवणे टाळावे..हृदय जवळ असते म्हणून. पण पँटच्या खिशात ठेवला तर तेथून किडनी जवळ असते..(आता काय करावे ! )
२. मोबाईल शक्यतोवर शरीरापसून दूर ठेवावा. उदा. कार्यालयात आल्यावर टेबलावर ठेवावा. घरात फडताळात ठेवावा :)
(पण कार्यालयात बैठे काम नसणार्यांनी काय करावे बरे !)
३. शक्यतो हँड्स-फ्री ही सुविधा वापरावी आणि मोबाईलचे यंत्र कमी वेळ चेहर्‍याच्या जवळ ठेवावे. ( अवांतर : वाहन चालवते वेळी या सुविधेचा आपल्याला आणि इतरांना खरेच फायदा होताना दिसतो)

(आता इतके सर्व करुन जीव वाचवावा.. थोडे वर्ष आयुष्य वाढले म्हणावे, तर फळांवर-भाज्यांवर फवारलेल्या किटनाशकांमुळे होणारे दुष्परिणाम वाचनात येतील.. मग पुन्हा आयुष्यातली माहित नसलेली येणारी वर्षे वाचवण्याची धडपड सुरु... हाय रे दैवा !)
-- (घाबराघुबरा) लिखाळ.

चतुरंग's picture

17 Jun 2008 - 4:53 pm | चतुरंग

संपर्क साधणे अत्यंत जलद आणि लगोलग उपलब्ध असण्याच्या आजच्या युगातला परवलीचा शब्द झाला आहे. दूरसंचार तंत्रज्ञानाचा हा गेल्या शतकाच्या अखेरीचा चमत्कार आता इतक्या वेगाने घराघरात, खिशाखिशात आणि कानाकानात घुसलाय की सांगायची सोय नाही.
योगायोगाने ह्याच फोन निर्मितीच्या क्षेत्रात मी काम करीत असल्याकारणाने थोडा शात्रीय आधार देऊन ह्या प्रश्नाची चर्चा करतो आहे.

१ - सामाजीक स्वास्थ्याच्या दृष्टीने इतकी महत्वाची बातमी असून देखील इतकी शांतपणे कशी दिली जात आहे?

आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या वारंवारतेच्या (फ्रिक्वेन्सीच्या) अनेक विद्युतचुंबकीय लहरी प्रसारित होत असतात. रेडिओ लहरी असे त्याचे सर्वसाधारणपणे वर्णन केले जाऊ शकते. त्यातल्या लहरींची ऊर्जा ही त्या वारंवारतेच्या समप्रमाणात असते. जेवढी वारंवारता जास्त तेवढी ऊर्जा जास्त. संपूर्ण ज्ञात लहरीपटाचा विचार केलात तर गॅमा रे (१० चा १८ वा घात = गीगा-गीगा हर्ट्झ - एक गीगा म्हणजे ९ वा घात) , एक्स रे, अल्ट्राव्हायोलेट रे, दृश्य प्रकाशकिरण, इन्फ्रारेड, रडार, मायक्रोवेव, मोबाईल फोन (१० चा ८ वा घात १०० मेगाहर्ट्झ) , रेडिओ असा उतरत्या क्रमाने हा लहरीपट आहे. ह्यातले गॅमा रे - एक्स रे ही बाप मंडळी आहेत. सतत संपर्क आल्यास ह्यांच्यातल्या ऊर्जेमुळे शरीरपेशींचे विघटन होऊ शकते इतकेच नव्हे तर डी.एन्.ए. मधे देखील परिवर्तन होऊन म्यूटेशन/कॅन्सर आदी होऊ शकते. म्हणूनच आपण एक्स रे काढायला डॉक्टरकडे गेलो की ते जाड लेड कोट घालून तो काढतात. म्हणजे त्यांच्या शरीरावर दुष्परिणाम होत नाही.
त्यामानाने मोबाईल फोनच्या रेडिओलहरी ह्या फारच शेवटच्या टोकाला आहेत. त्यातली ऊर्जा ही अत्यंत कमी प्रमाणात असते. आणि त्यात पेशींचे विघटन वगैरे घडवून आणण्याची क्षमता नसते. त्यापेक्षा मायक्रोवेवच्या लहरींची ऊर्जा जास्त असते.

सामाजिक स्वास्थ्याचा विचार केला तर अजूनतरी असे ठोस निष्कर्ष हाती आलेले नाहीत की ज्याचे उदाहरण देऊन मोबाईल फोनच्या वापरावरच मर्यादा येईल.
हा एक दुवा पहा.

२ - त्यासाठी सरकारने नक्की कुठले वैज्ञानिक निरीक्षण संदर्भ म्हणून वापरले?

भारत सरकारने कोणते संदर्भ ह्याकरता वापरले ह्याचे स्पष्टीकरण माहितीच्या अधिकारा अंतर्गत सामान्य नागरिकांना मिळू शकेल असे वाटते.

३ - इतरत्र (देशांमधे) इतके अधिकृतपणे (सरकारी) सांगितले गेले आहे का?

ब्रीटनमधे २००० साली 'स्टीवर्ट रिपोर्ट' प्रसिध्द केला. ज्यात शास्त्रज्ञांचे स्वतंत्र मंडळ होते ज्यांना मोफो चे दुष्परिणाम आहेत का ह्याचा अभ्यास करायचा होता. त्यात त्यांनी प्रसिध्द केलेला संपूर्ण रिपोर्ट जालावरती पीडीएफ मधे उपलब्ध आहे.
२००४ साली आणखी संशोधन करुन पुढचा रिपोर्ट देखील दिला. (तो मात्र मला जालावर मिळू शकला नाही. मिळाला तर देईन.)
त्यात त्यांनी अधिक संशोधन आवश्यक आहे असे सांगतानाच सावधगिरीच्या काही सूचनाही दिल्या आहेत - की मोबाईल फोन्स सरसकट जरी अपायकारक नसले तरी विशेषतः लहान मुलांना ते फार वापरु देऊ नयेत. त्यांच्या मेंदूची वेगाने वाढ होत असते शिवाय पेशीही नाजूक अवस्थेत असतात, कवटीची हाडे नाजूक असतात, सततच्या रेडिओलहरींच्या संपर्कामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. अगदी गरजेपुरते तातडीचे संपर्काचे माध्यम म्हणून वापरु देण्यास हरकत नसावी.

अजूनही संशोधन सुरु आहे. आता '३जी' नेटवर्क सुद्धा त्यांनी संशोधनासाठी घेतले आहे. त्यातल्या संशोधनाचे दूरगामी परिणाम दूरसंचार सुविधेवर होतील असे दिसते.

४ - वास्तवीक राजकारण्यांचा विचार करता मोबाईल कंपन्या त्यांना सहज खिशात घालून गप्प करू शकतील असे वाटते. तरी देखील असली सुचना जर दिली जात असेल तर याचा अर्थ सरकार कडे काही समाजस्वास्थ्यासंदर्भात अधिक माहीती उपलब्ध झाली आहे का? की ज्याबद्दल विशेष न बोलता फक्त अशी सुचना दिली जात आहे?

मोबाईल कंपन्या ह्या सर्विस प्रोवायडर्स असतात. प्रत्यक्ष बेसस्टेशन्स आणि मोबाईल फोनच्या निर्मितीमधे त्यांचा सहभाग नसतोच किंवा नगण्य असतो. ह्यातले जे तंत्रज्ञान आहे त्याची निर्मिती एका ठराविक स्टँडर्डने केली जाते. ज्यात वेगवेगळ्या काटेकोर नियमांचे पालन केल्याखेरीज यंत्रणा उभारण्यास किंवा फोन बाजारात आणण्यास परवानगी मिळत नाही. सरकारला गप्प करणे हे तसे त्यांच्या दूरगामी फायद्याच्या दृष्टीने फारसे सोयीचे ठरणार नाही. शिवाय हा काही फक्त आपल्या देशाशीच संबंधित विषय नाही अक्षरशः जगभरात हे चर्चिले जात आहे त्यामुळे त्यात माहिती दडवून ठेवणे इतके सोपे नाही. सूचना दिली जात आहे ही चांगली गोष्ट आहे असे मला वाटते. त्याचा अतिबाऊ करु नये तसे त्याबाबत आनास्थाही नसावी हा त्यामागचा उद्देश असावा.

५ - आणि सर्वात महत्वाचे तुम्हाला या संदर्भात (मोबाईल वापर) काय वाटते?

मोफो ही एक अतिशय उपयुक्त अशी सोय आहे ह्याबद्दल कोणाचेही दुमत नसावे. आपल्याला बसल्या जागेवरुन त्वरित संपर्क, अगदी जगभरात कुठेही, साधता येतो. चटकन काम होते, निरोप पोचवता येतात, दिरंगाई टळते. त्यातल्या म्यूझिक प्लेअर, कॅमेरा सारख्या सुविधा ह्या उपयुक्ततेच्या निकषावर प्रत्येकाच्या मतानुसार वेगवेगळ्या पातळीवर असू शकतील. पण त्या सर्वांनी एक वेगळी सोय निर्माण केली आहे हे निर्विवाद.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. त्यातून तंत्रज्ञानाच्या वापराचा अतिरेक हा तरी अपवाद कसा ठरेल? त्यामुळे यथायोग्य उपयोग असेल तर माझ्यामते मोफो सारखी सोय अतिशय महत्वाची आहे. अर्थात परवडते म्हणून लहान मुलांना मोफो देण्याच्या मी विरुद्ध आहे. ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांना मात्र ते वरदान ठरते.

(डिसक्लेमर - हे लिहिण्याबद्दल मला कोणत्याही मोफो कंपनीने अथवा कोणत्याही सरकारने प्रवृत्त केलेले नाही. मिपाचा सदस्य ह्या नात्याने हे संपूर्ण स्वतंत्र लेखन आहे.)

चतुरंग

विसोबा खेचर's picture

20 Jun 2008 - 8:46 am | विसोबा खेचर

अरे रंगा, तू मोबाईल कंपनीत कामाला आहेस हे माहितीच नव्हतं!

असो, माहिती बाकी छानच दिली आहेस. मी मोबाईलवर बोलताना शक्यतो कानात वायर लावूनच बोलतो...

आपला,
(कॅन्सरला अंमळ घाबरणारा) तात्या.

अरुण मनोहर's picture

19 Jun 2008 - 9:29 am | अरुण मनोहर

चतुरंगने वैज्ञानिक भाग खूप छान लिहीला आहे.
आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या वारंवारतेच्या (फ्रिक्वेन्सीच्या) अनेक विद्युतचुंबकीय लहरी प्रसारित होत असतात. रेडिओ लहरी असे त्याचे सर्वसाधारणपणे वर्णन केले जाऊ शकते. त्यातल्या लहरींची ऊर्जा ही त्या वारंवारतेच्या समप्रमाणात असते. जेवढी वारंवारता जास्त तेवढी ऊर्जा जास्त.

वरील विधानात एक आणखी सांगायला हवे- लहरीची उर्जा फ्रीक्वेन्सी आणि ऍम्प्लीट्यूड वर अवलंबून असते. एकाच फ्रीक्वेन्सीच्या दोन लहरी जास्त कमी ऍम्प्लीट्यूड च्या असू शकतात. अर्थात, मोफो साठी शरीराला घातक अशी ऍम्प्लीट्यूड वापरली जाते का, हाही प्रश्न आहेच.

ह्या पलीकडे मला असे म्हणायचे आहे की लहरी तर सगळी कडे असतातच. . ह्या लहरींनी मग जर अपाय होणार असेल तर तुमच्या कडे मोबाईल असो वा नसो काही फरक पडाणार नाही. आता मोबाईल जवळ असला तर काय होते ते पाहुया. मला माहित असलेल्या मूल तत्वांचा आधार घेऊन असे वाटते--- तुम्हाला जेव्हा मोबाईलवर कॉल येतो, तेव्हा फक्त तुमच्याच फोनची घंटी वाजते. बाजुला असलेल्या दुसर्‍या फोनची नाही. कां बरे? कारण तुमचा नंबर जुळल्यामुळे फक्त तुमच्या फोनची ऍन्टीना रेझोनन्स होउन रेडीयो लहरींचे रुपांतर विद्युत लहरीत करते. ह्या विद्युत लहरीचे रुपांतर मग ध्वनी लहरीत होउन आवाज ऐकू येतो. (रेझोनन्स ने तुमच्या फोन मधे आलेल्या रेडीयो लहरींची उर्जा काही वाढत वगैरे नाही, फक्त विद्युत लहरीमधे रुपांतर ऍक्टीव्हेट होते)

आता सांगा-
रेडीयो लहरी दोन्ही फोन मधे सारख्या उर्जेच्या पोहोचल्या आहेत.
एका फोनला नंबर लागला म्हणून त्यामधे विद्युत लहरी आणि ध्वनी लहरी तयार झाल्या.
बाजुच्या फोन मधे केवळ रेडीयो लहरी आल्या.
बाजुच्या माणसाजवळ मोबाईल नाही, पण त्यालाही केवळ त्याच रेडीयो लहरी मिळाल्या.

का मोबाईलला दोष देता? दोष असेलच तर रेडीयो लहरींचा असू शकेल. पण तोही नाही. कारण त्यांच्यात पुरेशी ताकदच नाही. जर असेल तर रेडीयो लहरींचा वापर करणेच थांबवले पाहिजे. सुदैवाने ती वेळ आलेली नाही.

वरील विवेचन माझ्या तोकड्या माहितीचा वापर करून लिहीले आहे. आपल्यातले शास्त्रज्ञ वेगळे सांगू शकतील तर नवीन ज्ञान घ्यायला आवडेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jun 2008 - 8:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रेडियो लहरी तितक्या तीव्र नसतील तर दुरसंचार खात्याने काढलेला निष्कर्ष चुकीचा आहे, असे म्हणावे का ?
त्याचा परिणाम तर शरिरावर होतोच असे त्यांचे म्हणने आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज's picture

19 Jun 2008 - 9:59 am | सहज

मोबाईल घातक का एकदम सुरक्षित दोन्ही बाबत अजुन तरी ठोस पुरावा आलेला दिसत नाही.

त्यामुळे वर उल्लेख आल्याप्रमाणे साधे उपाय म्हणजे मोबाईलचा कमी वापर व शरीरापासुन जरा [म्हणजे सतत खिशात, हातात न बाळगणे] दुर ठेवणे. इयरफोन वापरणे इ. उपाय करायला हरकत नाही.

अमितकुमार's picture

19 Jun 2008 - 10:45 am | अमितकुमार

मोफोच्या दुष्परिणामाचा प्रत्यय बघायचा असेल तर ....

२ ते ३ मक्याचे दाने घ्या ...
त्याच्या आजुबाजुला ३ ते ४ मोबाइल फोन ऑन करूण ठेवा....
एकाच वेळि सर्व मोबाईल वर कॉल करा व ५ ते १० मिनिटे कॉल चालू ठेवा आणि बघा.....
तूमचे पॉपकॉर्न तयार आहेत.................

धन्यवाद,
अमितकुमार

विसोबा खेचर's picture

20 Jun 2008 - 8:46 am | विसोबा खेचर

आयला! पॉपकॉर्नचा हा प्रकार अंमळ वेडझवाच म्हटला पाहिजे! :)

आपला,
(मकाप्रेमी) तात्या.

II राजे II's picture

20 Jun 2008 - 9:12 am | II राजे II (not verified)

प्रयोग करुन पाहण्याची इच्छा होत आहे.... लवकरच करुन पाहीन.
तुम्ही हा प्रयोग करुन पाहीला आहे का ??
नसेल तर ह्याची माहीती तुम्हाला कोठे मिळाली ?

राज जैन
माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?

नंदन's picture

9 Jul 2008 - 3:15 pm | नंदन

अर्थात आधुनिक दंतकथांतला हा प्रकार आहे. स्नोप्स.कॉम ह्या संकेतस्थळावर अशा दंतकथा खोट्या का आहेत, याची शास्त्रीय कारणे दिली असतात. ह्या विशिष्ट दंतकथेच्या विरूद्ध दिलेली कारणे येथे वाचता येतील.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बबलु's picture

9 Jul 2008 - 5:04 am | बबलु

ही लींक पहा:--
http://en.wikipedia.org/wiki/Mobile_phone_radiation_and_health

आपला,
बबलु-अमेरिकन

विकास's picture

9 Jul 2008 - 8:48 pm | विकास

सर्व प्रतिसादाबद्दल आभारी. चतुरंग यांनी चांगली माहीती दिली तसेच नंदन यांच्या अर्बन लिजंड दुवापण माहीतीपूर्ण.

बबलू -अमेरिकन नी दिलेल्या माहीतीप्रमाणेच ओ जे सिंपसन खटल्यामधे प्रसिद्ध झालेल्या आता दिवंगत जॉनी कॉक्रनच्या बायकोने पण सेलफोन्स विरुद्ध खटला भरला (सेल फोन मुळे तो गेला का असेच काहीसे!) आहे. मध्यंतरी सीएनएन्वर तीची मुलाखत होणार होती.

पॉपकॉर्न प्रमाणेच मी सेलफोनजवळ ठेवलेले अंडे उकडते असे पण ऐकले होते...

श्रीकृष्ण सामंत's picture

9 Jul 2008 - 10:23 pm | श्रीकृष्ण सामंत

खरं सागू का?ह्या असल्या बातम्या येतच राहणार.ह्या बातम्या म्हणजे "केवड्याची फुलं आहेत" कधीतरी उगवतात.नाहीतरी"खाणं थोडं आणि मचमच भारी" ही आपली संवयच आहे.
अमेरिकेत यापूर्वीच ह्या विषयावर "चरवीचरण" होऊन संपलं आहे.
मला सांगा,१०० किलोवॅट ते १००० किलोवॅट एव्हडी प्रचंड शक्ती ट्रान्समीट करणार्‍या एम/फेम ट्रान्समीटरच्या वातारणात काम करणार्‍या शेकडो नाहीतर हजारो इंजीनीयरस,ऍडमिनीस्टेट्र्स, कामगार वगैरे मंडळीना ह्या लहरींचा प्रादुर्भाव झालेला दिसत नाही.नव्हे तर ह्या लहरीमुळे कुणीही आजारी होऊन निर्वतलेल्याची बातमी नाही.गेल्या शंभर वर्षाहून लोक अशा ठिकाणी काम करीत आहेत.
हे असं चालायचंच
टी.व्ही आल्यावर टी.व्ही.पाहून डोळे बिघडतात असं म्हणणारी मंडळी कमी का होती?
नंतर त्याच लोकानी आपल्या घरी हळूहळू टी.व्ही आणलेच नां?

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jul 2008 - 10:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला सांगा,१०० किलोवॅट ते १००० किलोवॅट एव्हडी प्रचंड शक्ती ट्रान्समीट करणार्‍या एम/फेम ट्रान्समीटरच्या वातारणात काम करणार्‍या शेकडो नाहीतर हजारो इंजीनीयरस,ऍडमिनीस्टेट्र्स, कामगार वगैरे मंडळीना ह्या लहरींचा प्रादुर्भाव झालेला दिसत नाही.नव्हे तर ह्या लहरीमुळे कुणीही आजारी होऊन निर्वतलेल्याची बातमी नाही.गेल्या शंभर वर्षाहून लोक अशा ठिकाणी काम करीत आहेत.

पटलं बॉ !!! एका विज्ञानाच्या संशोधकानं सांगितल्यावर आम्ही बेफीकीर झालो आहोत.

धन्यवाद !!! सामंत साहेब.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नंदन's picture

11 Jul 2008 - 5:50 am | नंदन

चा व्हिडिओ हा केवळ ब्ल्यूटूथ [नीलदंत? :)] हेडसेटच्या कंपनीची जाहिरात म्हणून होता. तोही डिजिटली मॉडिफाईड. येथे पहा.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

देवदत्त's picture

28 Jul 2008 - 11:02 pm | देवदत्त

मोबाईल किरणांच्या दहशतीवरील आणखी एक दुवा मुंबई मिरर मधून.

काय करावे आता? :? आमच्या इमारतीवरच मोबाईल टॉवर आहे :S

घाटावरचे भट's picture

29 Jul 2008 - 1:15 am | घाटावरचे भट

मोफोचे प्रारण (radiation) non-ionizing प्रकारचे असते, जे तसं पाहाता आपल्या शरीराच्या पेशींसाठी घातक नाही. पण त्या प्रारणाचा एक परिणाम म्हणजे ते उष्णता निर्माण करते (उदा. मायक्रोवेव्ह रेडिएशन, जे मायक्रोवेव्ह ओव्हन मधे पदार्थ गरम करण्यासाठी वापरले जाते). आपल्या पेशींच्या संरचनेमुळे त्यांची उष्णतेचा निचरा करण्याची क्षमता अत्यंत कमी असते. त्यामुळे, ह्या साठून राहिलेल्या उष्णतेचे दूरगामी दुष्परिणाम होउ शकतात. सध्या हे दुष्परिणाम काय व कसे होतील हा वादाचा मुद्दा आहे.

तसंच मोफो च्या प्रारणाची शक्ती साधारण १ वॉट असते (साधारण मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये एक भांडं पाणी गरम करायला ३० सेकन्द लागतात, पण त्यासाठी ७००-८०० वॉट शक्तीचं प्रारण वापरलं जातं, त्यामुळे आपल्या मेंदूचा एवढ्यात भेजा फ्राय होत नाही, चिंता नसावी). एवढ्या कमी शक्तीच्या प्रारणामुळे विशेष त्रास होइल असे वाटत नाही. आपल्या कवट्या चांगल्या जाड असतात. पण लहान मुलांना मोफो वापरायला देताना काळजी घ्यावी याबाबत मात्र सर्वांचं एकमत आहे, कारण त्यांच्या मेंदूच्या पेशींची पूर्ण वाढ झालेली नसते आणि कवटी सुद्धा soft and not fully developed असते.

हे माझे २ सेन्ट्स.....

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
रितु आयी सावन की,
रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥