दिल्ली पोलिसांनी ऑगस्ट २०१० मध्ये ओखला मार्केट येथे फकरुद्दीन ह्या किशोरवयीन मुलास अटक केली होती.त्याच्यावर एटीएम कार्ड अन २०० रुपये चोरी केल्याचे आरोप फिर्यादीने दाखल केले होते. न्यायदंडाधिकारी महोदयांनी त्याला तिहार जेलमध्ये पाठविले.त्याला जामीन नाकारण्यात आला.९ महिन्यांनी त्याला १० हजार रु.चा जामीन मंजूर झाला.पण तेव्हढे पैसे तो भरू... शकत नसल्याने तो परत तिहारमध्ये रवाना झाला.२०० रु.चोरीची अधिकतम शिक्षा ३ महिने इतकी आहे .
मुद्दा हा आहे की.पोलीस अन न्यायाधीशांनी फक्रुद्दीनला १ वर्षे जेलमध्ये का अन कशाच्या आधारे ठेवले? शेवटी फक्रुद्दीनने तो गुन्हा कबुल केला अन त्याची त्वरित सुटका झाली.न केलेला गुन्हा त्याने कबुल केला अन त्याची ४ पट शिक्षाही भोगली.त्याचा खरा गुन्हा होता त्याची गरिबी ...तो कोणाचेही हात ओले करू शकला नाही हे त्याचे दुर्दैव....
टाइम्स ऑफ इंडिया ने मुखपृष्ठावर याची कव्हरस्टोरी छापली अन मग यावर पाकिस्तानात देखील प्रतिक्रिया उमटली.
अशा कायद्यांमध्ये किंवा त्यांच्या अंमलबजावणी मध्ये लक्षवेधी बदल होणे आवश्यक आहे हे या प्रकाराने प्रकर्षाने जाणवले हे नक्की ! तुम्हाला काय वाटते ?
सोबत पाकिस्तानातील सर्वाधिक खपाच्या दैनिक डॉन मधील लिंक दिली आहे.
http://www.dawn.com/2011/07/31/power-of-the-small-story.html
फकरूद्दीनची व्यथा
गाभा:
प्रतिक्रिया
31 Jul 2011 - 6:26 pm | नितिन थत्ते
(निवडणुकीला सामोरे न जाणार्या) न्यायव्यवस्थेला कसलीच अकाउंटेबिलिटी नाही ही भारतीय लोकशाहीतली काहीशी त्रुटी आहे.
"मोलकरणीस दोन वर्षे डांबून ठेवले" टाईप बातम्या आपण मधून मधून वर्तमानपत्रात वाचतो. तेव्हा त्या डांबून ठेवणार्यावर ज्या कलमांखाली गुम्हा दाखल केला जातो त्या कलमाखाली त्या न्यायाधीशावर गुन्हा दाखल करता यायला हवा. परंतु तशी सोय भारतीय कायद्यात नाही.
जेव्हा ठेवलेल्या आरोपाच्या शिक्षेच्या तिप्पट काळ आरोपीने आगोदरच तुरुंगात काढला आहे असे असताना त्याला तसेच मुक्त करायला हवे होते. १०००० रु चा जामीन मागणे हे न्यायाधीशाचे गुन्हेगारी कृत्य मानायला हवे.
एखाद्या आरोपीला न्यायाधीशांनी फाशीची शिक्षा सुनावली. त्या शिक्षेवरील अपीलात वरच्या न्यायालयात आरोपी "निर्दोष" सुटला तर खालच्या न्यायाधीशावर "खुनाचा प्रयत्न केल्याचा" गुन्हा दाखल करता यायला हवा.
आताही या घटनेचे खापर पोलीसांवर फोडले जाईल.
31 Jul 2011 - 7:16 pm | पंगा
...एकंदर अॅनालिसिस गंडले आहे, असे वाटते.
तशी तरतूद जगातल्या कोठल्याच कायद्यात असल्याचे ऐकिवात नाही.
आदर्शवादी दृष्टिकोनातून असे म्हणणे साहजिक वाटते, परंतु जगात हेही कोठे घडत असल्याबद्दल ऐकलेले नाही.
डिट्टो. (स्पष्टीकरण: हे 'डिट्टो' आपल्या वरील विधानाला नव्हे. माझ्या वरील विधानाला.)
शिवाय, अशी तरतूद केल्यास सर्वोच्च वगळता कोणतेही न्यायालय चालू शकणार नाही, असे वाटते. (पण मग सर्वोच्च न्यायालयाच्या अकाउंटेबिलिटीचे काय, असा प्रश्न निर्माण होतो.)
जज्जमंडळींच्या निवडणुका ठेवल्याने परिस्थितीत काही फरक पडेलसे वाटत नाही. (तसेही अशा निवडणुकींत 'मतदार' कोण असावेत? आरोपी? कारण अन्य कोणास अशा बाबतींत न्यायाधीशाच्या नाय्यतेत पुरेसे स्वारस्य असेलसे वाटत नाही, सबब आरोपी वगळता इतरांच्या मतदार म्हणून पात्रतेबद्दल साशंक आहे. कदाचित वेगवेगळ्या चालू आणि भूतपूर्व अभियोगांतील - फाशीची अंमलबजावणी अजूनपर्यंत न झालेल्या अथवा अन्यथा हयात - आरोपींचा मतदारसंघ बनवता येईलसे वाटते. किंवा - प्रस्तुत मंच हा 'मिसळपाव' असल्याने, सबब 'विवेकवाद' वगैरे गोष्टी नसत्या ठिकाणी आड येण्याची सुतराम् शक्यता नसल्याने - फाशीची अंमलबजावणी होऊन गेलेल्या अथवा अन्यथा मृत मतदारांच्या मतांची नोंदणी प्लँचेटद्वारे करण्याच्या तरतुदीचाही विचार करता येईल.)
सबब, 'अकाउंटेबिलिटीचा अभाव आहे' एवढे प्रतिपादन वगळता अन्य अॅनालिसिस पटले नाही.
अवांतर: पोलिसांचा यात नेमका हातभार काय? कळले नाही.
1 Aug 2011 - 8:30 am | नितिन थत्ते
इतरत्रही अशी पद्धत नसते (नसणार) याच्याशी सहमत.
मा़झ्या मूळ प्रतिसादातील "भारतातील लोकशाहीतली त्रुटी" हे "सर्वत्रच्या लोकशाहीतली त्रुटी" असे बदलता येईल.
तसेच जजमंडळींच्या निवडणुका असाव्यात असे सुचवण्याचा हेतू नाही. परंतु लोकशाहीच्या बॅलन्स ऑफ पॉवरमध्ये एक (लोकनियुक्त नसलेले) सत्ताकेंद्र अनियंत्रित झाले आहे असे वाटते. सरकारविरुद्ध पोष्टकार्डावर न्यायालयाकडे तक्रार करण्याची सोय आहे तशी न्यायालयाविरुद्ध नाही.
कदाचित घटना बनवणारे बहुतांश लोक वकील असल्यामुळे तसे झाले असेल.
1 Aug 2011 - 2:37 pm | प्यासा
पोलिसांचा नेमका हातभार काय हे विधान अनेक अर्थी आहे .
१)पोलिसाना आरोपीची आर्थिक परिस्थिती अन गुन्ह्याचे स्वरूप माहिती होती .
२)या गुन्ह्यातील शिक्षा कालावधीही त्याना ज्ञात असतो .
३)कोणत्या आरोपीला जामीन मिळाला तर 'फायदा' आहे हे त्याना ठाऊक होते,येथे त्याना फायदा आढळला नाही,त्यांनी तो लवकर सुटावा यासाठी प्रयत्न केला नाही हे सकृतदर्शनी दिसते.
४)रेकॉर्ड वर कोणते गुन्हे आणायचे अन कोणते तोडीपाणी द्वारा मिटवायचे हे कसब त्याना चांगलेच अवगत असते,येथे एक पोजीटीव रेकॉर्ड वाढविण्यासाठी गुन्हेगार अडकविण्यात आला अन त्याचे १ वर्ष त्या नादात बरबाद झाले .
५)पोलीस गुन्हेगारावरील कलमे निर्धारित करतात अन त्या कलमांच्या अनुषंगाने न्यायाधीश जामीन रक्कम सांगतात,या गुन्ह्यामधील कलमे निश्चितच मोठी लावलेली असणार .
६)प्रत्येक शहरात,गावात अनेक गुन्हे घडत असतात.त्यापैकी कशाचा छडा लावायचा.कोणते आरोपी पकडायचे,केस कोणती कमजोर ठेवायची,कच्चे दुवे कोठे ठेवायचे,कलमे कोणती लावायची.स्टेशनडायरीत काय नोंदी करायच्या,तपास अहवाल कसा द्यायचा,कुठे कोणाला गुंतवायचे,निरपराध माणसाना कसे गुन्हेगार करायचे अन अपराधी उजळ माथ्याने कसे मोकळे सोडायचे ह्या सर्वच गोष्टीत पोलिसांचा हातभार असतो.तो येथेही असणार .
31 Jul 2011 - 7:38 pm | विजुभाऊ
दिलेल्या न्यायासाठी न्यायाधीश हा जबाबदार नसतो...
हे न्यायव्यवस्थेचे दुर्दैव आहे.
खलील जिब्रानच्या भाषेत सांगायचे तर एखाद्या मुलाला खेळणे बनविल्या नंतर ते मोडण्यात जास्त आनंद येतो तद्वत वकीलांचे आहे. एकासाठीचा न्याय हा दुसर्यासाठी अन्याय होऊ शकतो. न्याय हा सापेक्ष असतो.
असो.
चोरीच्या गुन्ह्यासाठी चोर जितका दोशी असतो तितकाच ज्याच्याकडे चोरी झाली तो देखील जबाबदर असतो.
भारतीय कायद्यांची पायमल्ली व्यवस्थेकडून जितकी होते तितकी इतर कोनाकडून होत नसावी.
मुंबई मोटर वाहन कायदा (आर टी ओ / रस्त्यावर वाहन चालवताना ) अंतर्गत सारखे गुन्हेगार पकडले जातात त्यांच्याबाबत न्यायदान कसे होते हे वेगळे सांगावयास नको. ही न्यायदानाची कॄर थट्टा आहे. हे स्वतः जज्ज लोक देखील खाजगीत कबूल करतात
31 Jul 2011 - 8:04 pm | तिमा
जंगल, अरण्य, रान, वन आणि भारत यात काय फरक आहे ?
इथे प्रत्येकाने फक्त आपले नशीब, बुध्दी वा पैसे वापरुनच आपले रक्षण करायचे आहे.
31 Jul 2011 - 8:48 pm | वेताळ
पण सर्वात चांगले असे कि जगातील सर्वोत्तम अश्या विकसित व यशस्वी लोकशाही राबवणार्या देशाने ह्याची दखल घेतली हे कौतुकास्पद आहे. तसेच तुम्ही त्या देशाची वृत्तपत्रे किती काटेकोर वाचता पाहुन मन हळवे झाले आहे.
31 Jul 2011 - 8:53 pm | पंगा
धाग्याला ही कलाटणी पुढेमागे मिळणार, हा अंदाज होताच.
'निंदकाचे घर (अनायासे) आहेच शेजारी' एवढेच निरीक्षण नोंदवू इच्छितो.
31 Jul 2011 - 9:22 pm | श्रीरंग
हाहाहाहाहा.... करेक्ट. मी हेच लिहिणार होतो. आपल्या प्रेमळ शेजार्यांचा संदर्भ या धाग्यात देण्यामागील प्रयोजन समजले नाही.
31 Jul 2011 - 10:46 pm | नितिन थत्ते
शिवाय सदरचा डॉनमधला लेख एम जे अकबर यांनी लिहिलेला दिसतो.¦ म्हणजे घर शेजारी पण नाहीये. घरातलाच निंदक आहे.
1 Aug 2011 - 2:14 am | पंगा
(लेख अगोदर उघडून पाहिला नव्हता.)
म्हणजे 'डॉन'चा यातील संबंध कदाचित फक्त सिंडिकेटेड लेखाचे परवानगीने - आणि पैसे देऊन - पुनःप्रकाशन करण्याइतपतच असावा. मूळ लेख येथे असून, श्री. एम. जे. अकबर यांनीच चालवलेल्या नवी दिल्ली येथून प्रसिद्ध होणार्या वृत्तपत्रात प्रकाशित झालेला आहे.
(ही प्रथा वृत्तपत्रजगतात साधारण असावी. म्हणजे एखाद्या लेखकाने एखाद्या विशिष्ट वृत्तपत्रासाठी लेख न लिहिता एखाद्या वितरणसंस्थेद्वारे तो प्रकाशित करणे आणि मग त्या वितरणसंस्थेने तो लेख त्यांच्या वर्गणीदारयादीतील जे कोणी विकत घेऊ इच्छितील अशा जगातील कोणत्याही आणि कितीही वृत्तपत्रांस आपापल्या वृत्तपत्रांत छापण्याकरिता विकणे. 'डॉन'मध्ये अनेक भारतीय लेखकांचे लेख अशा प्रकारे प्रकाशित झालेले पाहिलेले आहेत. श्री. कुलदीप नय्यर, श्री. प्रफुल्ल बिडवाई ही नावे यात अनेकदा दिसतात. श्री. एम. जे. अकबर यांचा एखादा लेखही 'डॉन'मध्ये छापून येण्याची ही पहिलीच वेळ नसावी. अनेक युरोपीय / अमेरिकन लेखकही यात दिसतात. फार कशाला, अनेक भारतीय इंग्रजी वृत्तपत्रांतही ख्यातनाम आंतरराष्ट्रीय लेखकांचे लेख अनेकदा छापून येतात.
याचा अ(न)र्थ 'श्री. एम. जे. अकबर किंवा श्री. कुलदीप नय्यर हे 'डॉन'साठी लिहितात' किंवा 'ख्यातनाम आंतरराष्ट्रीय लेखक 'टाइम्स ऑफ इंडिया'करिता लिहितात' असा होत नसून, 'सदर लेखक आपापले लेख लिहून वितरणसंस्थांना देतात, आणि सदर वृत्तपत्रांना आपापल्या वाचकांस ते लेख रोचक वाटू शकतील असे वाटल्याने अशी वृत्तपत्रे ते लेख पुनःप्रकाशनासाठी अशा वितरणसंस्थांकडून वर्गणी देऊन परवानगीसहित विकत घेतात' एवढाच याचा अर्थ व्हावा.
वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होणार्या कॉमिक स्ट्रिपाही बहुतकरून याच तत्त्वावर वितरित होतात, असे दिसते.
अधिक माहिती येथे.)
थोडक्यात, निंदक घरातलाच आहे (एवढेच नव्हे, तर तो घरीच बसून निंदा करत आहे) याबद्दल सहमत.
1 Aug 2011 - 5:51 am | सुनील
याचा अ(न)र्थ 'श्री. एम. जे. अकबर किंवा श्री. कुलदीप नय्यर हे 'डॉन'साठी लिहितात' किंवा 'ख्यातनाम आंतरराष्ट्रीय लेखक 'टाइम्स ऑफ इंडिया'करिता लिहितात' असा होत नसून, 'सदर लेखक आपापले लेख लिहून वितरणसंस्थांना देतात, आणि सदर वृत्तपत्रांना आपापल्या वाचकांस ते लेख रोचक वाटू शकतील असे वाटल्याने अशी वृत्तपत्रे ते लेख पुनःप्रकाशनासाठी अशा वितरणसंस्थांकडून वर्गणी देऊन परवानगीसहित विकत घेतात' एवढाच याचा अर्थ व्हावा.
सहमत.
असो, निंदक घरातील आहे किंवा नाही, तो घरीच बसून टीका करतो आहे किंवा नाही, यापेक्षा त्याने केलेली टीका योग्य आहे किंवा नाही, यावर मतप्रदर्शन (सर्वांकडून, केवळ पंगा यांच्याकडून नव्हे) आवडले असते.
माझ्या मते, टीकेत तथ्य दिसत आहे.
1 Aug 2011 - 6:35 am | पंगा
नेमका मुद्दा! म्हणूनच तर 'धाग्याला ही कलाटणी पुढेमागे मिळणार, हा अंदाज होताच', असे म्हटले.
अर्थात. टीकेत तथ्य आहेच. त्याबद्दल वाद नाही.
पण 'टीकेत तथ्य आहे' म्हटले, तर तीन शब्दांत प्रतिसाद आटोपतो. आणि प्रत्येकाने (श्री. पंगा यांनीच नव्हे, तर सर्वांनी) असे तीनतीन शब्दांचे प्रतिसाद दिले, तर चर्चा थोडक्यात आटोपते. त्याचे काय?
चर्चेचे निरनिराळे पैलू समोर यायला नकोत? (किंवा, दुसर्या शब्दांत, चर्चेला पुरेसे फाटे फुटायला नकोत?) त्याशिवाय चर्चा पुढे चालायची कशी?
1 Aug 2011 - 4:07 am | इंटरनेटस्नेही
.
1 Aug 2011 - 2:43 pm | प्यासा
आपल्या प्रेमळ शेजार्यांचा संदर्भ -
आपला शेजारी आपल्या बारीकसारीक गोष्टीवरही ध्यान ठेवतो अन ही माहिती आपलेच घरभेदी ( हे विशेषण एम जे अकबर याना योग्य आहे कि नाही ते माहिती नाही ) पुरवत असतात.ते समजावे म्हणून अन धाग्याचा संदर्भ म्हणूनही दि डॉन ची लिंक दिली आहे.
1 Aug 2011 - 2:47 pm | प्यासा
तुमचा प्रतिसाद वाचुन माझेही मन काटेकोर हळवे झाले...'त्या' देशाबद्दलचा तुमचा दृष्टीकोन खूप कौतुकास्पद वाटला.
1 Aug 2011 - 10:23 am | स्वर भायदे
वृत्तपत्राच्या !
भारतात असे अनेक निरपराध शिक्षा भोगत असतील... परंतू बातमी ऐते ती एखाद्या फकरूद्दीनचीच आणि त्यावर आपल्या मित्र राष्टामध्ये(मनमोहन सरकारचे घनिष्ट मित्र) प्रतिक्रीया उमटतात यावरून भारतात विशिष्ठ लोकांवर ( अल्पसंख्य म्हणत नाही कारण संख्या ब-यापैकी आहे) हे जगाला दाखवण्याचा प्रयत्न असावा. काही वृत्तपत्र व न्यूज चॅनल भारताची प्रतीमा मलिन करण्याची सुपारी घेतल्या प्रमाणे बातम्या प्रसिध्द करतात.
सदर मत वैयक्तीक असून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. अर्थात न्यायमिळण्यास उशिर होणे हे न्याय नाकरण्यासारखेच आहे
1 Aug 2011 - 11:04 am | नितिन थत्ते
१. डॉनमधील सदर लेख भारतीयानेच लिहिलेल आहे असे वर स्पष्ट झालेले आहे.
२. त्या लेखाचा मूळ विषय २जी स्कॅममधील आरोपींना जामीन मिळण्याविषयी आहे. सदरची गोष्ट त्याच प्रकारची एक गोष्ट (न्यायालयाने उगाच डांबून ठेवणे) म्हणून लिहिलेली आहे.
३. डॉनमधील लेखात कुठेही "फक्रुद्दिन मुस्लिम असल्यामुळे असे झाल्याची" दूरान्वयनेही सुचवणी नाही. किंवा "भारतात मुस्लिमांचे कसे हाल होत आहेत" असाही सूर नाही.
४. त्या घटनेची दखल शेजारी "राष्ट्राने" घेतली अशी काही माहिती पुढे आलेली नाही.
तेव्हा चर्चेला ते वळण उगाच देऊ नये.
1 Aug 2011 - 12:28 pm | श्रीरंग
चर्चेला "ते" वळण मिळणार हे स्वाभाविक आहे. मुळात,डॉन मध्ये ही बातमी कोणी छापून आणली वगैरे मुद्दाच नाहिये. सदर धाग्याच्या लेखकाला, फकरुद्दिनबद्दल सहानुभूती, आपल्या न्ययव्यवस्थेतील त्रुटींबद्दल उद्विग्नता इत्यादि व्यक्त करताना पाकिस्तानी व्रुत्तपत्राने हे छापले, याची एवढी दखल का घ्यावीशी वाटली याचे कुतुहल आहे.
1 Aug 2011 - 12:32 pm | श्रावण मोडक
;)
1 Aug 2011 - 2:48 pm | प्यासा
नितिन थत्ते यांच्या मताशी सहमत आहे.
1 Aug 2011 - 8:49 pm | हुप्प्या
काही पाकिस्तानी माझे मित्र आहेत. पण त्यांच्याशी बोलताना हेच जाणवले की भारतातील मुस्लिम लोकांवर भारतीय लोक अगदी सहज अन्याय करतात असे त्यांना वाटते.
मागे सलमान खानने काही लोकांना त्याच्या वाहनाखाली चिरडले तेव्हा ह्या मित्राकडून अशी प्रतिक्रिया ऐकली होती. ये तो मुसलमान है. अब ये नही बचेगा. वगैरे.
कलाम राष्ट्रपती असताना मी त्याच्याशी वाद घातला होता की बघ आमचा राष्ट्रपती मुस्लिम आहे. पाकिस्तानात कधी हिंदू राष्ट्रपती असणे शक्य आहे का? त्याचे उत्तर असे की कलाम हा नामके वास्ते मुस्लिम आहे आणि नामके वास्ते राष्ट्रपती आहे. त्याला काही अर्थ नाही.
अन्य काही लोकांकडून असेही ऐकले आहे की मुस्लिम नटांवर सक्ती करुन त्यांच्याकडून देवासमोरचे, देवळातले प्रसंग चित्रित करतात.
हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आणि डॉन हे वृत्तपत्र बर्यापैकी नि:पक्ष आहे. पण तरी मलाही असेच वाटते की बातमीतला पीडित मनुष्य मुस्लिम आहे ह्याचे पाकिस्तानात "जरा जास्त" महत्त्व आहे.
2 Aug 2011 - 11:54 am | मराठी_माणूस
कलाम राष्ट्रपती असताना मी त्याच्याशी वाद घातला होता की बघ आमचा राष्ट्रपती मुस्लिम आहे. पाकिस्तानात कधी हिंदू राष्ट्रपती असणे शक्य आहे का? त्याचे उत्तर असे की कलाम हा नामके वास्ते मुस्लिम आहे आणि नामके वास्ते राष्ट्रपती आहे. त्याला काही अर्थ नाही.
आपल्या कडे पतौडी, अझर सारखे कप्तान होते , त्यांच्या कडे हे शक्य आहे का ?
2 Aug 2011 - 11:06 am | स्वर भायदे
शमसुद्दीन फक्रुद्दीनवर कलम ३७९ व ४११ अन्वये गुन्हा दाखल झाला
१) कलम ३७९नुसार चोरीकरीता ३ वर्षापर्यत शिक्षा होऊ शकते व कलम ४११ नुसार चोरीची मालमत्ता ही चोरीची असल्याचे माहीत असताना अप्रामाणिकपणे स्वीकारणे याकरीता ७ वर्ष कारावास किंवा दंड किंवा दोन्ही प्रकारची शिक्षा होऊ शकते. सदर गुन्हे हे दखलपात्र आहेत म्हणजेच पोलिस वॉरंट शिवाय अटक करू शकतात.
२)सहा महिने शिक्षा भोगल्यानंतर २६ फेब्रु. २०११ ला शमसुद्दीनला गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन जामीन नाकारण्यात आला. असे म्हटले आहे का ? न्याय दंडाधिकारी किंवा न्यायालयाने असे म्हणण्याचे कारण काय ? चोरीचे २०० रूपये त्याकडे सापडले की चोरी झालेले ए. टी. एम. कार्ड त्याकडे सापडले ?(चोरी झालेले ए. टी. एम कार्ड त्याच्याकडे सापडले की नाही याबद्दल सदर बातमीत कोणताही उल्लेख नाही.) त्यामुळे त्याला फक्त तिन महीने शिक्षा झाली असती हे कस ठरवलं?
३)सदर बातमीत म्हटल्याप्रमाणे हुमन राईटस चे वकील शमसुद्दीनला भेटले. परंतू जर तो र्निदोष हेता तर ते हि गोष्ट सिध्द का करू शकले नाही?
त्यामुळे सदर बातमीत शमसुद्दीन र्निदोष आहे असे गृहित धरल्या सारखे वाटते.( तो दोषी की र्निदोष हे ठरविण्याचा अधिकार कोणाचा ? पत्रकार , नागरीक कि न्यालयाचा) आपल्या कडे न्याय उशीरा मिळतो हे मान्य.
आजच्या जगात बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल म्हणतात ( शमसु्द्दीन र्निदोष असेल तर माझी पूर्ण सहानभुती या व्यतीरीक्त आमच्या हाती दुसरे काही नाही) काही चुक झाली असल्यास मिपाकरांनी दुरूस्त करावी.
2 Aug 2011 - 12:06 pm | परिकथेतील राजकुमार
टारुद्दीनची व्यथा पण लिहा रे कोणीतरी.
परुद्दीन
2 Aug 2011 - 5:13 pm | बाप्पा
सध्या परीस्थिती अशीच आहे या बद्दल वाद नाहि. आपली न्यायव्यवस्था कोलमडलेली नाहि, कारण कोलमडायला न्यायव्यवस्था आहे कि नाही अशीच मला शंका यायला लागली आहे.
बाकी पाकीस्तान ने हे व्रुत्त का प्रकाशीत केले या बद्दल नवल नाही वाटले. फकरुद्दीन च्या जागी कुणी जमुनाप्रसाद नावाचा इसम असला असता तरी या पाकड्यांनी हे व्रुत्त का प्रकाशीत केले असते का?
2 Aug 2011 - 5:26 pm | नितिन थत्ते
पाकिस्तानने (डॉनने) हे वृत्त प्रकाशित केलेले नाही.
एम जे अकबर यांचा वेगळ्याच विषयावरचा लेख प्रकाशित केला आहे त्यात या घटनेचा उल्लेख आहे. जमुनाप्रसादविषयी घटना असती आणि अकबर यांनी त्याचा उल्लेख केला असता तर तो लेख प्रकाशित झाला असताच.
अवांतर: लोक आधी आलेले प्रतिसाद वाचत नाहीत की काय?