मे च्या सुट्टीत बऱ्याच ठिकाणी जाण्याचा योग आला. या निमित्त्याने आमच्या पुतणीच्या गावी मागच्या आठवड्यात गेलो होतो. आमचा नातू २ -१/४ वर्षाचा झाल्याअसल्या मुळे त्याला बालवाडीत ( के जी त )टाकण्याचा उत्साह त्यांच्या घरात वाहत होता. मी ही त्या गडबडीत सहभागी झालो होतो. त्याचे नवीन जोडे, नवीन गणवेश, छोटीशी पिशवी, ओळखपत्र इत्यादीचा थाट काय वर्णावा? घरात त्याच्या जाण्याचे, आवरासावरीचे आणि रडण्याचेही कौतुक होते.
तो शाळेत गेल्यावर सहजच विचारले की येथे मराठी शाळा चांगली आहे ना? म्हणजे बालवाडी ते १० वी पर्यंत परत विचार करायला नको ना. माझा या प्रश्नावर माझ्या पुतणीने माझ्याकडे अगदी कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकला. "अहो, काका, त्याला इंग्रजी शाळेत टाकण्याचा विचार आहे. पुढे मागे आता इंग्रजी माध्यमच राहणार आहे ना"!
मी प्रचंड अस्वस्थ झालो. मग माझ्या परीने आणि माझ्या सर्वोच्च वादविवादाने तिला मराठी माध्यम कसे चांगले आहे हे सांगण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. कधी तिच्या चेहऱ्यावर गोंधळ कधी नेमके खरे काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न चालू आहे हे मला समजायला लागले.
पण मला वाटत होते की त्याला परकीयाच्या माध्यमात टाकण्याचा विचार आमच्या जावयाचा असावा. त्यामुळे मी ते बाहेरुन येताच माझ्या मराठी शाळेच्या विचाराचे सूतोवाच केले. इंग्रजी माध्यम कसे खर्चीक आहे आणि मराठीची मुले कसे पुढे जात आहे हे सांगण्याचा प्रयत्न सुरू केला.
माझ्या समजुतीच्या आणि अपेक्षाच्या पलीकडे त्यांनी माझ्या पुतणीवर अगदी उघड हल्ला सुरू केला. अहो, काकाजी, मी मागच्या सहा महिन्यापासून किती समजावीत आहे पण ही ऐकेल तर शपथ? आता मराठीच्या माध्यमात काय कमी आहे? आपल्या घराचे चांगले संस्कार मराठीत होतात ना? उद्या इंग्रजी माध्यमात याने एखाद्या मुलीशी सलगी केली तर? तेथे वातावरण कसे असते हे आपण ऐकत असतोच ना? ( इंग्रजी माध्यमात मुलीशी सलगी करता येते याचाही शोध मला प्रथमच लागला. ). मीही शाहजुक पणे त्यांना अनुमोदन देत म्हटले की अहो आपल्या घराला बट्टा लागेल ना? नको ती इंग्रजी शाळा. पुतणी माझी निरुपाय पणे ऐकत होती. आता एकदा दोनदा चक्कर मारून त्याची शाळा बदलण्याचे पुण्यकृत्य बाकी आहे. आई जगदंबा यश देवो.
पण सर्वसाधारणपणे समाजात बघितले तर असे जाणवते की इंग्रजी माध्यमाचा सोस आयांना जास्त दिसतो. आपला मुलगा फाडफाड इंग्रजी बोलतो आहे याचे स्वप्न त्यांना भुरळ पाडते आहे असा माझा अनुभव आहे. आपल्या आर्थिक, बौद्धिक आणि कौटुबिंक क्षमतेच्या पलिकडे त्या इंग्रजीचे मोहजालात पडलेल्या दिसत आहे.
एकदा माझ्या मित्राची बायको आमच्याकडे आली असता तिला माझा मुलगा मराठीत शिकतो याचे नवलच वाटले. ती परत परत विचारत होती की मराठी वि़ज्ञान आणि गणित कसे असू शकते? ( हॉउ वंडरफुल ना? ). मित्राला माझे मराठी प्रेम माहित असल्यामुळे त्याची फजिती स्पष्ट दिसत होती.
माझ्या एका मित्राने मला असे सांगितले की या आयाच आपल्या भाषेला बहिष्कृत करत आहे.
मातृभाषा आणि विकृत मातृशक्तिचा लढा कोण जिंकेल काही समजत नाही.
बऱ्याच दिवसापासून माझ्या डोळ्यासमोर शंकराला पायदळी तुडवणाऱ्या काली चे चित्र दिसत आहे. शंकराच्या शिवाच्या भूमिकेत मराठी भाषा आहे आणि कालीच्या भूमिकेत सगळ्या इंग्रजीचा आग्रह धरणाऱ्या आया दिसत आहे. कालाय तस्मे नम: म्हणावे नाही तर काय?
प्रतिक्रिया
26 Jun 2008 - 10:11 am | संजीव नाईक
लेख छान आहे पण संस्कार मुख्य आहेत.
मातृभाषा आणि विकृत मातृशक्तिचा लढा कोण जिंकेल काही समजत नाही ???????????????
संजीव
26 Jun 2008 - 1:18 pm | भाग्यश्री
त्या मुलाच्या आईचे काही चुक नाहीये.. त्यांनी प्रॅक्टीकल विचार केला.. आजकालच्या जगात इंग्लिश येणॅ गरजेचे आहे.. मराठी माध्यमातूनही अनेक पुढे येतात.. पण हल्ली मराठी शाळांचा दर्जा खालावला आहे.. आनिपानि वाले शिक्षक निदान शिकवायला तरी नसावेत, पण असतात मराठी शाळांमधे.. त्यामानाने इंग्रजी शाळा अधिक चांगल्या वाटतात मला..
आणि इंग्रजी माध्यम म्हणजे कॉन्व्हेंट नव्हे की आपली संस्कृती विसरून जातील मुलं लगेच! अभिनव इंग्रजी माध्यमाचे उदाहरण घ्या.. मला तरी उत्तम शाळा वाटते ती..
खरंतर चावून चोथा झालेला विषय आहे हा.. आणि सेमी-इंग्लिश हा त्यच्यावरचा उत्तम उपाय आहे, हे सुद्धा जगजाहीर आहे... !!
http://bhagyashreee.blogspot.com/
26 Jun 2008 - 2:40 pm | संजीव नाईक
भाग्यश्री
खरंतर चावून चोथा झालेला विषय आहे हा.. आणि सेमी-इंग्लिश हा त्यच्यावरचा उत्तम उपाय आहे, हे सुद्धा जगजाहीर आहे... !!
आपल्या तात्यांनी याच साठी मिपा सदर आपल्या समोर ठेवले.
संजीव
26 Jun 2008 - 5:00 pm | विसोबा खेचर
तसा हा चावून चोथा झालेलाच विषय आहे तरीदेखील माझे मत देतो..
माझ्या मते आपल्या अपत्याला कोणत्या माध्यमातून शिक्षण द्यायचे हे ठरवण्याचा अधिकार हा सर्वस्वी त्या अपत्याच्या आईवडिलांचा/पालनकर्त्याचा आहे, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे.
आपल्या अपत्याचं भलंबुरं कशात आहे हे आईवडिलांनाच समजतं! त्यात इतरांनी मागता/न मागता सल्लामसलत जरूर करावी परंतु अंतीम निर्णय हा आईवडिलांचाच आहे/असतो हे जाणावे...
'विकृत मातृशक्ति' हा शब्दप्रयोग मला अत्यंत चुकीचा वाटतो/वाटला. माझ्या मते जिथे 'मातृ', 'माता' हे शब्द असतात तिथे विकृत असं काहीच नसतं!
असो..
आपला,
(मातृभक्त) तात्या.
26 Jun 2008 - 5:49 pm | टारझन
या विषयाचा चोथा पण चावुन चवुन ........ झाला आहे....
इंग्रजी-मराठी माध्यमाचे आपआपले फायदे तोटे आहेत... प्रॅक्टिकल विचार केला तर ध्यानात येईल की यावर तोडगा आहे...
इंग्रजी माध्यमाच्या एका महाभागाने "राम हा महाभारतात होता" हे विधान करून कॉलेजात आमची चांगली करमणूक केली होती.
पण तो communicataion skills च्या जोरावर पटकन एका MNC मधे चिकटला. हा आमच्या मराठी माध्यमाचा तोटा.
आपण मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालून आपले संस्कार घरी ही देवू शकता..
हे दिवे मराठी शाळांतही लागल्याचे सर्वज्ञुत आहे. माध्यमाशी याचा संबंध नाही. हा विषय पूर्णपणे त्या विद्यार्थ्यावर अवलंबून आहे.
आमच्या भाषेत सांगायचं झालं तर "म्हतारं देवळात झोपतं म्हणजे त्याला काय देवभक्त म्हणायचं का?"
तसंच पोरगं इंग्रजी माध्यमात गेलं म्हणजे वाया गेलं , असं नव्हे ....
(स्पष्टवक्ता) कुबड्या खवीस
http://picasaweb.google.com/prashants.space
26 Jun 2008 - 7:31 pm | सहज
माननीय कलंत्रीसाहेब,
केवळ त्या आईने मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले म्हणुन त्या आईच्या विचारांचा तुम्ही "विकृत मातॄशक्ती " असा उल्लेख केलात?
मराठी माध्यमातुन आपले शिक्षण झाले असावे असा एक अंदाज करुन विचारतो की "विकृत मातॄशक्ती " ह्या शब्दांऐवजी दुसरे कुठली शब्दयोजना वापरता येण्यासारखी नाही का? काय उपयोग झाला इतकी मराठी शिकल्याचा की योग्य ते शब्द सुचले नाहीत?
आपला मुलगा व्यावहारिक आयुष्यात यशस्वी व्हावा या हेतुने कुणाचे वाटोळे न करता त्या आईने काही निर्णय घेतला तर तुम्ही एकदम विकृत म्हणुन मोकळे?
ठीक आहे मध्यम मार्ग म्हणजे इंग्रजी शाळेत पहिली पासुन मराठी व मराठी शाळेत पहीली पासुन इंग्रजी शिकवा अन हा गुंता सोडला जावा. तसेच इंग्रजी शाळा म्हणजे आपोआप मराठी भाषा व मराठी संस्कृती यापासुन फारकत असा का बरे निघतो? मला वाटते काही जुन्या इंग्रजी शाळा सोडल्या तर महाराष्ट्रातील बर्याच इंग्रजी शाळा ह्या "भारतीय इंग्रजी शाळाच" आहेत.
-------------------------------------------------------------
सतत एकांगी विचार केल्याने अशी कट्टरता येते व मग आशय पुसट होत जातो.
26 Jun 2008 - 7:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मराठी माध्यमातुन आपले शिक्षण झाले असावे असा एक अंदाज करुन विचारतो की "विकृत मातॄशक्ती " ह्या शब्दांऐवजी दुसरे कुठली शब्दयोजना वापरता येण्यासारखी नाही का? काय उपयोग झाला इतकी मराठी शिकल्याचा की योग्य ते शब्द सुचले नाहीत?
आपला मुलगा व्यावहारिक आयुष्यात यशस्वी व्हावा या हेतुने कुणाचे वाटोळे न करता त्या आईने काही निर्णय घेतला तर तुम्ही एकदम विकृत म्हणुन मोकळे?
सहमत आहे. कोणत्याही पालकांची भुमिका आपली मुले भविष्यात कोणत्याही क्षेत्रात शिक्षण घेतांना कमी पडू नये अशी त्यांची भावना असते. ती विकृत मातृशक्ती कशी असू शकेल ?
26 Jun 2008 - 7:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेली पिढी कदाचित आज खूप मोठ्या पदावर असतीलही ,पण इंग्रजी माध्यमात ज्यांना परवडते त्यांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवले पाहिजेच आणि परवडत असूनही आपल्या मुलांना मराठी माध्यमातून शिक्षण देऊन त्यांचे भवितव्य आपण घडवू शकू असा विश्वास ज्या पालकांना आहे, त्यांनी मराठीतून येणारी पिढी घडवावी.
( इंग्रजी शिकणा-या विद्यार्थ्यांचे मराठीचे काय होणार त्याची चिंता करु नका, सुदैवाने त्यांच्या आजुबाजूचा समाज अजून मराठी बोलतो. आणि शासनाच्या कृपेने इंग्रजी माध्यमातील शाळेंमधे मराठी विषयही अभ्यासक्रमात आहेत म्हणे ? )
(प्रवेशाची लगबग सुरु झाल्यापासून ते जिथे जिथे शिक्षणाचा विषय निघाला की या विषयाचा इतका चोथा होतो की, कशाचा चोथा चावतोय तेही कळत नाही. )
3 Jul 2008 - 10:28 pm | llपुण्याचे पेशवेll
आजूबाजूचा समाज आणि मुले मोठ्या शहरात उदा. मुंबई (आता पुणेसुधा) मराठी बोलणारीच आहेत असे नाही. त्यामुळे जे इंग्रजी शाळेत शिकतील त्यांची मराठीशी नाळ जोडलेली राहील का असा प्रश्न माझ्या मनात उभा राहतो.
पुण्याचे पेशवे
3 Jul 2008 - 8:00 am | गणा मास्तर
एक रीपोर्ट
एक लेख
3 Jul 2008 - 7:01 pm | कलंत्री
विकृत मातृशक्ति असा शब्द मला त्यावेळी सुचला आणि मी तो वापरला.
कदाचित परक्या भाषेचा सोस किंवा आया कश्या चुकतात असा ही वापर करता आला असता.
आई हा शब्द जेथे आहे तेथे विकृत शब्द कसा येईल ही भावना महत्वाची आहे. मला या भावनेबद्दल आदरच आहे.
पण जेथे जेथे मराठी भाषा मारली जाते, डावळली जाते तेथे मला राग येतो.
आई ही आई असतानाच एक स्त्रीही असते आणि कोठेतरी अपत्यभावाबरोबर समाजात आपल्याला मिरवता यावे, आपला मोठेपणा दिसावा म्हणून काही अश्या गोष्टीना ( इंग्रजी भाषेचा पूरस्कार) घडत असाव्या.
अनेक साधारण स्त्रीया ही आपल्या लहान बाळांना डॅडी / मम्मी असे संबोधायाला भाग पाडतात, मुलांशी लाडे लाडे इंग्रजीत बोलता तेंव्हा वाईट वाटते.
असो.
3 Jul 2008 - 7:15 pm | कलंत्री
विनोबा भावे आपणा सर्वाना परीचित आहे, किंबहुना वंदनीयही आहे.
विनोबांना अनेक देशी आणि परदेशी भाषा चांगल्या पद्धतीने अवगत होत्या.
लहानपणी विनोबा पहाटे पहाटे पार्शियन अथवा अश्याच परकिय भाषेचे पाठांतर करीत होते. कुतुहलापोटी त्यांच्या आईने विचारले, "विनू कोणती भाषा आहे रे ही?", विनोबांनी त्या भाषेचे नाव सांगितले. आईने सांगितले की, विनु एक ऐकशील, सकाळी सकाळी तू संस्कृतचे वाचन, मनन आणि पठण करीत जा. सर्व भाषा चांगल्याच आहे पण संस्कृतची गोडी काही वेगळीच आहे. आईचा सल्ला विनोबांनी आपल्या आयुष्यभर पाळला.
माझ्या मनात आता हा विचार येतो की मराठी भाषेतही ज्ञानोबा, एकनाथ, तुकाराम, मोरोपंत इत्यादी असताना विनोबाच्या आईने त्याना मराठीचे वाचन, मनन अथवा पठन करण्यास का नाही सांगितले?
कदाचित एक कारण हे असेल की आपली भाषा ही सरळ र्हद्यात जात असेल आणि तीला अश्या अवडंबराची गरजही नसेल.
आई आणि मुलगा यातील भाषेचा विचार करतांना ही आठवणही आठवली इतकेच!!!
4 Jul 2008 - 1:33 pm | II राजे II (not verified)
आपल्याला बुवा ही भाषा आवडते... मराठी मध्ये लिहणे... वाचने मला सोपं जाते... पण माझ्या पुढील पिढी मराठी मध्येच शिक्षण घ्यावे असे मला वाटत नाही... कारण... एक तर मागच्या काही पिढ्यानी इंग्रजीचा ईतका उदोउदो केला आहे की आज च्या घडीला मी फक्त मराठीमध्येच संभाषण व काम करुन जिवंत राहण्यालायक देखील काहीच कमवू शकत नाही.... कंपन्यामध्ये काम करताना ईंग्रजी हाच एक पर्याय पुढे आहे... व तुम्ही मराठी भक्तांनी ईंग्रजीचा विरोध सोडून प्रथम हिंदीचा विरोध करा.... आजकाल गावोगावी तरुण मुले हिंदीमध्येच संभाषण करत आहेत हे मी येथील दिल्ली मधील उदाहरण देत नाही.. अगदी कराड, सातारा.. कोल्हापुर... मधील १०००० वस्ती असलेले आंबेवाडी गावाची उदाहरणे देत आहे.... !
आमच्या गावी देखील माझे भाचे... पुतणे हे हिंदी मध्येच संभाषण करतात व माझ्यासारखे कोणी वयाने मोठे सामिल झाले तरच मराठी व कन्नड चा उपयोग करतात... !
तुमची मराठीची तळमळ आम्हाला माहीत आहे.. व आम्ही आमच्या परिने प्रयत्न देखील करतो पण.. आज अचानक एकदम सगळेच मराठी मध्ये जरा अवघड आहे हो !
अजून एक गोष्ट... तुम्ही महाजालावर प्रयत्न करत आहात... येथे मिपावर व ऑर्कुटवर जे मराठी बांधव आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त ती लोक आहेत जी महाराष्ट्रापासून दुर आहेत्... तेव्हा मराठीचा सर्वस्वी वापर आपल्याला तरी सध्या जमणार नाही....
जाता जाता..... कोल्हापुर नगरपालिके मध्ये मागील वर्षी गेलो होतो... तेथे सर्वात जास्त ईंग्रजीचाच वापर होतो फॉर्म साठी !
राज जैन
येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता
5 Jul 2008 - 4:12 pm | प्रभाकर पेठकर
मराठी भाषा सुंदर आहे, आपली मातृभाषा आहे ती आपल्याला यायलाच हवी हे सर्व मान्य आहे. परंतु इंग्रजीचा अति दुस्वासही चुकीचाच म्हणावा लागेल. व्यावसायिक आयुष्यात भारतात आणि भारताबाहेरही इंग्रजी भाषेची गरज भासते. आणि त्या वयात नव्याने शिकणे कठीण जाते. इंग्रजी माध्यमात शिकूनही मराठी भाषा जोपासता येते.
कोठेतरी अपत्यभावाबरोबर समाजात आपल्याला मिरवता यावे, आपला मोठेपणा दिसावा म्हणून काही अश्या गोष्टीना ( इंग्रजी भाषेचा पूरस्कार) घडत असाव्या.
हा निष्कर्ष घाईघाईने काढलेला आणि म्हणुन चुकीचा वाटतो. आपले मुल बाहेरील जगाच्या स्पर्धेत, चढाओढीत मागे पडू नये, भविष्यात त्याचे नुकसान होऊ नये ह्या विचारांपोटी आई किंवा वडील असा निर्णय घेतात आणि त्यात काही गैर नाही. 'विकृत मातृशक्ती' हा शब्द तर अत्यंत अपमानास्पद आहे. फारातफार चुकीची किंवा अपरिपक्व विचारपद्धती असे म्हणता येईल.