साहित्यः- एक बांबूचा कोवळा कोंब.
पाव वाटी तूरडाळ.
अर्धा चमचा मालवणी मसाला.
पाव चमचा हळद.
हिरवी मिरची.
थोडा गुळ.
मिठ.
खवलेले खोबरे.
तेल.
मोहरी व हिंग फोडणीसाठी.
कृती :-हा बांबूचा कोंब.
किल्लाचे आतील कोंब आदल्या दिवशी रात्री बारीक कोचून (काकडी कोशिंबीरीसाठी कोचतो तसे)
पाण्यात घालून ठेवावे.(त्यामुळे उग्रपणा कमी होतो).
तूरडाळ भिजत घालावी.कोचलेली भाजी घट्ट पिळून घेऊन कुकरमध्ये शिजवून घ्यावी.तेलात हिंग,मोहरी
व हळद घालून फोडणी करावी.त्यात तूरडाळ घालावी.जरा परतून त्यात हिरवी मिरची घालावी. नंतर
शिजवलेली भाजी घालावी.त्यातच मालवणी मसाला,गुळ व मिठ घालावे. चांगले ढवळून झाकण ठेवून पाणी
आटू द्यावे.पाणी आटत आल्यावर खोबरे घालावे.
प्रतिक्रिया
28 Jul 2011 - 2:49 am | धनंजय
किल्लाची भाजी मस्तच लागते.
(यू. एस. मध्ये राहाणार्यांसाठी टीप : मला बांबूचे कोवळे कोंभ कोरियन/आग्नेय आशियाई दुकानानांत मिळालेले आहेत - भल्यामोठ्या बांबूचे कोवळे कोंभही धिप्पाड! )
कोचून भिजवलेल्या किल्लाला अगदी साधा लिंबू-मसाला लावला तर ते लोणचेही मस्तच होते. (लिंबाचा रस, भाजलेल्या-कुठलेल्या मेथ्या, हिंग, हळद, तिखट, मीठ.)
28 Jul 2011 - 9:43 am | प्रीत-मोहर
+१......
लोणचे ही सहीच लागते किल्लाचे
माझी आई किल्लाचे लोणचे लिंबु व आल घालुन करते. अगदी यम्मी
28 Jul 2011 - 3:07 am | स्मिता.
वेगळीच पाकृ... छानच!
बांबूचा कोवळा कोंब आजपर्यंत फक्त चायनीज मध्येच पाहिला होता. भारतीय पध्दतीत पहिल्यांदाच पाहिला.
काकडीसारखे कोचून घेणे याचा अर्थ काय? कोचून घेणेही पहिल्यांदाच ऐकले :(
28 Jul 2011 - 4:05 am | धनंजय
कोचून/कोचवून/चोचवून असे पर्यायी शब्द मी ऐकले आहेत.
उभट आकाराच्या भाज्यांना हा शब्द लागू आहे. (आजवर काकडीसाठीच ऐकला होता.)
काकडी एका हातात उभी धरायची. (त्याच्या वरचे देठ कापून वर सपाट भाग असतो.) दुसर्या हातात सुरी घेऊन त्या काकडीच्या सपाट भागावर खचाखचा खूप घाव करायचे. (विळी वापरत असल्यास काकडी उभ्यात विळीवर पुन्हा-पुन्हा आपटायची.) घाव वेगवेगळ्या दिशांनी पडावेत, म्हणून काकडी एक-दोनदा चतुर्थांश गोलात (उभ्यातच) फिरवायची. काकडीच्या टोकाचा वरचा अर्धा-एक इंच भाग आता छिन्न-विच्छिन्न झालेला असेल, पण सगळे तुकडे अजून काकडीला जोडलेलेच असतील. (कारण सुरीचे सगळे घाव उभ्यातच आहेत.)
मग आडव्यात काकडी एखाद-दोनदा कापायची. म्हणजे घाव केलेले बारीक बारीक तुकडे चिरून पडतात.
मग काकडी पुन्हा उभात धरून तिच्या टोकावर भरपूर घाव करायचे...
अशा तर्हेने पूर्ण काकडीचे छोटे-छोटे तुकडे होतात. चिरल्यापेक्षा किंवा किसल्यापेक्षा अशा तर्हेने तुकडे होतात. केले, तर "कोचलेल्या" भाजीची चव वेगळी लागते, आणि तुकडे हाता-तोंडात स्पर्शाला वेगळे लागतात.
28 Jul 2011 - 6:25 pm | स्मिता.
कोचूनचा अर्थ व्यवस्थित समजावून सांगितल्याबद्दल आभार!
बारीक-बारीक काप करण्यासाठी सोयीचे असावे असे वाटते.
28 Jul 2011 - 8:04 am | ५० फक्त
''काकडी एका हातात उभी धरायची. (त्याच्या वरचे देठ कापून वर सपाट भाग असतो.) दुसर्या हातात सुरी घेऊन त्या काकडीच्या सपाट भागावर खचाखचा खूप घाव करायचे. (विळी वापरत असल्यास काकडी उभ्यात विळीवर पुन्हा-पुन्हा आपटायची.) घाव वेगवेगळ्या दिशांनी पडावेत, म्हणून काकडी एक-दोनदा चतुर्थांश गोलात (उभ्यातच) फिरवायची. काकडीच्या टोकाचा वरचा अर्धा-एक इंच भाग आता छिन्न-विच्छिन्न झालेला असेल, पण सगळे तुकडे अजून काकडीला जोडलेलेच असतील. (कारण सुरीचे सगळे घाव उभ्यातच आहेत.)
मग आडव्यात काकडी एखाद-दोनदा कापायची. म्हणजे घाव केलेले बारीक बारीक तुकडे चिरून पडतात.
मग काकडी पुन्हा उभात धरून तिच्या टोकावर भरपूर घाव करायचे...''
प्रत्यक्ष खुनाचा रिपोर्ट देतात ना पोलिस टाइम्स मध्ये तसं लिहिलंय, मजा आलि वाचुन.
28 Jul 2011 - 12:54 pm | प्यारे१
नायगाव्करांची ती फुटकळ कविता आठवली. भाज्यांचे खून बिन ( हात वेळावत असं सगळं वगैरे)
28 Jul 2011 - 8:23 am | निवेदिता-ताई
मी पहिल्यांदाच पहाते आहे ही भाजी....
चव पहायला पाहिजे...दे पाठवुन
28 Jul 2011 - 8:47 am | पिंगू
फक्त माहित होतं.. आज प्रत्यक्ष कृती आणि फोटु पाहून मस्त वाटले.
बाकी धनंजयने कृती भारी समजावून दिली आहे. त्याबद्दल आभार्स..
- पिंगू
28 Jul 2011 - 9:23 am | सहज
पण अगदी अश्याच प्रकारे केलेली (साल काढून, बारीक काप, कोवळी/शिजवलेली फळभाजी) मग ती बांबू असो की नवलकोल की दुधीभोपळा की टिंडा की पडवळ की अजुन काय बर्यापैकी (उन्नीस बीस) सारखीच लागणार ना?
कृपया अश्या अनवट पाकृ सांगाव्यात की पद्धत किंवा पदार्थ पर्यायी नसले पाहीजेत. म्हणजे स्पेशल डीश!
28 Jul 2011 - 9:38 am | प्रीत-मोहर
आईच्या हातच्या किल्लाच्या भाजीची आण्नि लोणच्याच्या आठवणीने नोस्टाल्जिक
- प्रीमो
28 Jul 2011 - 1:01 pm | कच्ची कैरी
मला तर सगळ काही नविनच आहे -कोचवण्,चोचवणं आणि किल्ल वैगरे सगळच :(
28 Jul 2011 - 1:12 pm | गणपा
ह्याला आमच्याकडे ओस्ते म्हणतात.
पावसाळ्याचा सुरवातीस मिळणारे ओस्ते हल्ली फार दुर्मीळ झालेत. पुर्वी गोरेगावला बोरिविलीला मुबलक प्रमाणात मिळायचे.
आम्ही इतके बारीक चिरत (कोचत) नाही. याच्या गोल गोल चकत्या करतो. (साधारण १ ते २ मीमी जाडीच्या) बिरड(वाल) आणि ओस्ते घातलेली भाजी केवळ अप्रतिम.
खालचा भाग जो जरा पाकट असतो, तो खारात आंब्यासोबत टाकतात. आणि मग ओल्या बोंबलांचा सिझन चालु झाला की त्यात हे खारातले ओस्ते टाकतो.
साला जमाना लोटला ओस्ते खाउन. :(
28 Jul 2011 - 1:04 pm | परिकथेतील राजकुमार
पहिल्यांदाच ऐकले.
छान पाकृ.
बादवे मालवणी मसाला हा काही पेश्शल मसाला असतो का? तो बजारात दिडक्या फेकुन विकत मिळत असेलच म्हणा, पण घरी बनवता येतो काय ?
28 Jul 2011 - 3:27 pm | ज्योति प्रकाश
मालवणी मसाल्याची रेसिपी मागे एकदा दिलेली आहे.ती पहा.
28 Jul 2011 - 3:39 pm | गणपा
अस नै करायच. सोबत दुवा द्यायचा असतो. :)
28 Jul 2011 - 6:34 pm | परिकथेतील राजकुमार
धन्स रे गणपादेवा.
बाकी कोवळ्या बांबूला जर वास्ता म्हणत असतील तर हा वास्ता आणि तो 'माँ के खून का वास्ता' , 'भगवान का वास्ता' वैग्रेचा एकमेकांशी काय वास्ता नै ना ?
3 Aug 2011 - 8:45 pm | चित्रा
भगवान का वास्ता म्हणजे भगवान कृष्णाच्या बासरीची आठवण करून दिली जाते.
राही यांच्या खालील माहितीपूर्ण प्रतिसादावरून हे अगदी स्पष्ट झाले आहे. (वंश -- वंशी -- बास -बासुरी --बासरी).
3 Aug 2011 - 8:54 pm | पंगा
... 'आईच्या रक्ताचा बांबू' म्हणजे काय?
(बादवे, बासरी कोवळ्या बांबूची बनते?)
3 Aug 2011 - 9:30 pm | चित्रा
संस्कृतमधील वंश म्हणजे कोवळा बांबू का काय ते तुम्हीच बघा.
आईच्या रक्ताचा बांबू नसून बासरी असावी. आईच्या रक्तातून जी मधुर हाक फक्त रक्ताच्या नात्यातील मुलांनाच ऐकू येते आणि मोक्याच्या क्षणी चित्रपटात काँप्लिकेशन्स करायला वापरता येते तो हा संदर्भ असावा.
3 Aug 2011 - 9:38 pm | पंगा
'वंशा'बद्दल नाही, 'वास्त्या'बद्दल बोलत होतो.
आईच्या रक्तातून मधुर हाक ऐकू येते?
'हिस्टरी ऑफ द वर्ल्ड' आठवला. ('आदिमानवास संगीताचा शोध कसा लागला', तो एपिसोड.)
म्हणजे त्या कुठल्याशा गोष्टीत ते कायसेसे (राजाचे नवीन कपडे?) फक्त पुण्यवंतांनाच दिसायचे, तसे?
4 Aug 2011 - 1:31 am | चित्रा
वास्ते,ओस्ते,वासे,वासोटे,बांस,(बांसरी,वंशी) ही बांबूची नावे वंश ह्या संस्कृत शब्दापासून आलेली आहेत.
>>'हिस्टरी ऑफ द वर्ल्ड' आठवला. ('आदिमानवास संगीताचा शोध कसा लागला', तो एपिसोड.)
हाहा.
>> म्हणजे त्या कुठल्याशा गोष्टीत ते कायसेसे (राजाचे नवीन कपडे?) फक्त पुण्यवंतांनाच दिसायचे, तसे?
हो अगदी तसे. तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूंही नहीं दिल .... इ. कसे आहे तसेच हे.
4 Aug 2011 - 1:34 am | पंगा
टू बी स्पेसिफिक, त्या प्रसंगाच्या शेवटीचा ऑर्केस्ट्रा आठवला.
(आता पुरे.)
28 Jul 2011 - 9:08 pm | ज्योति प्रकाश
सॉरी गणपाभौ, दुवा कसा टाकतात ते मला येत नाही,शिकून घेईन व यापुढे नक्की देईन.
28 Jul 2011 - 9:51 pm | विजुभाऊ
तो बजारात दिडक्या फेकुन विकत मिळत असेलच म्हणा,
परा शेठ सगळ्याच गोष्टी काही दिडक्या फेकून मिळतात असे नाही
हिम्मत असेल तर दिडक्या ( तुमच्या कडे असल्याच तर दमड्या/ चव्वल वगैरे) फेकुन पुण्यात शेपूची भाजी किंवा केळफुलाची भाजी , भारंगीची भाजी , फणसाच्या आठिळ्यांची भाजी , कच्च्या फणसाची भाजी . पोळीचा लाडू ,वगैरे मिळवून दाखवा. आपले चॅलेन्ज तुम्हाला ..अगदी पेरू गेटाजवळ सुद्धा आढळणार नाहीत हे पदार्थ
28 Jul 2011 - 5:13 pm | प्रियाली
आम्ही कोवळ्या बांबूला वास्ता म्हणतो. ही वास्त्याची भाजी. मस्तच लागते.
28 Jul 2011 - 5:17 pm | प्रचेतस
तो बांबूचा कोवळा कोंब असा जळाल्यासारखा / करपल्यासारखा का वाटतोय? का असाच असतो?
बाकी पाकृ छानच.
28 Jul 2011 - 5:21 pm | प्रियाली
किंचित जांभळट छटा असते.
28 Jul 2011 - 5:55 pm | JAGOMOHANPYARE
मालदीवला असताना डब्यात मिळाले होते... छान लागतात.
29 Jul 2011 - 5:52 pm | राही
वास्ते,ओस्ते,वासे,वासोटे,बांस,(बांसरी,वंशी) ही बांबूची नावे वंश ह्या संस्कृत शब्दापासून आलेली आहेत.भाजीसाठी अगदी कोवळे कोंभच घ्यावे. कोंभांना पेरे फुटली की त्यांचा कोवळेपणा जाऊन त्यांचे जाळीदार,जून,करकरीत लाकूड बनू लागते. ते चिरायला कठिण जाते आणि शिजतही नाही. शिवाय कोंभांच्या वरची जांभळट रंगाची सर्व आवरणे काढून टाकून फक्त आतला पिवळट सफेद गरच घ्यायचा असतो. ह्या आवरणांवरून आदिवासी लोकांमधे एक कोडे अथवा पहेली प्रचलित आहे.(आपल्याकडच्या 'सूपभर लाह्या, त्यात रुपया'-ओळखा कोण च्या धर्तीवर.) "जन्माला येताना भाराभर कपडे आणि मोठे झाल्यावर मात्र अगदी ना*डे".
हे कोंभ बारीक चिरून मिठामध्ये घालून (जराही पाणी लागू न देता) काचेच्या अथवा प्लास्टिकच्या बरणीत ठेवले तर वर्षभर टिकतात. मिठामुळे त्यांना पाणी सुटते आणि त्यात बुडलेले असल्यामुळे ते टिकतात. भाजी करतेवेळी आपल्याला पाहिजे तितकी भाजी बरणीतून काढून घेऊन ती साध्या पाण्यात घालून पाच मिनिटे उकळावी. निथळून घ्यावी. पाणी टाकून द्यावे. वास्ते अथवा किल्लांच्या चौकोनी फोडी करूनही ठेवतात. त्या डाळीच्या आमटीत घालतात. मुळे, शेंगा,वांगी घालतात तसे. त्यांचा ओला,हिरवा तुरट वास आणि स्वाद कित्येकांना आवडतो. लोणचे तर फारच सुंदर लागते.
बांबू साठ वर्षांनी फुलतो. फुलांत गव्हाच्या किंवा भाताच्या दाण्याप्रमाणे दाणे धरतात. त्यानंतर ती झाडे मरून जातात. ह्या बिया जमिनीत पडून रुजतात व त्यातून नवीन झाडे येतात. ह्या बिया खाऊन उंदिर वगैरे रोडंट्स भरमसाट वाढतात आणि नंतर जवळच्या शेतात घुसून धान्य फस्त करतात. त्यामुळे बांबू फुलला की दुष्काळ पडतो असे पूर्वी म्हणत असत. हे साठ वर्षांनी फुलणे त्या त्या बांबूंमध्ये आनुवंशिक म्हणजे जनुकीय असते. म्हणजे ठाणे जिल्ह्यातला बांबू जर आसाममध्ये (अथवा उलटही) नेऊन लावला तरी त्याचा फुलण्याचा काळ मूळ बांबूप्रमाणेच असेल. अशी लागवड झालेली आहे त्यामुळे एखादे बांबूचे बेट आता फुलले तर जवळच्या परिसरातले दुसरे बेट त्याच्या मूळ निसर्गचक्राप्रमाणे वेगळ्या वर्षी फुलेल आणि साठ वर्षाचे चक्र मोडले जाते आहे की काय अशी शंका येऊ शकेल. मुंबई आणि जवळपासच्या प्रदेशातला बांबू गेल्या वर्षी फुलला आणि मरून गेला. त्यामुळे गेल्या वर्षी आणि यंदा बांबूचे कोंभ तयार झाले नाहीत आणि बाजारात आले नाहीत. यंदा बोरिवलीच्या नॅशनल पार्क मध्ये छोटी छोटी एक वितीच्या उंचीची रोपे उगवलेली पाहिली. पुढच्या चार पाच वर्षात ती कोंभ फुटण्याइतकी मोठी होतील. बांबूचे खोड हे रायझोम प्रकारातले म्हणजे आले,केळी अळू यासारखे जमिनीसरपट अथवा अंतर्गत धावून पसरणारे असते. कोंभ वारेमाप प्रमाणात खुडले गेले नाहीत तर अल्पावधीतच त्याचे सुंदर घनदाट रान माजते.
29 Jul 2011 - 7:20 pm | गणपा
छान माहिती राही.
3 Aug 2011 - 8:25 pm | चित्रा
असेच म्हणते!
फारच उत्कृष्ट माहिती.
29 Jul 2011 - 7:32 pm | स्वाती दिनेश
राही, छान माहिती.
बांबूचे लोणचे मस्तच! ही भाजीही चांगली दिसते आहे.
स्वाती
29 Jul 2011 - 7:55 pm | रेवती
वेगळीच भाजी.
राहीनं दिलेली माहितीही छान.
3 Aug 2011 - 9:38 pm | पैसा
सहमत.
29 Jul 2011 - 9:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला जर कोणी म्हटलं असतं की, बांबूच्या कोवळ्या कोंबाची भाजी होत असते तर मी त्याला बाकडावर वाकून कान धरायला लावले असते. :)
ज्योती प्रकाश यांच्या पाकृ आणि राहीच्या माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल आभारी.
-दिलीप बिरुटे
(अडाणी)