साहित्यः
बटाटे - ३ उकडलेले
बेसन पीठ - १ वाटी
कांदा - १
बडिशेप - १/२ चमचा
आले-लसुण पेस्ट - १ चमचा
हिरव्या मिरच्या - २
ओवा - १/४ चमचा
लाल तिखट - १ चमचा
हळद - १ चमचा
कडिपत्ता - ४-५
तेल तळण्यासाठी
मिठ चवीनुसार
२ हिरव्या मिरच्या आणि लसुणची चटणी सजावटीसाठी
कृती:
१. कांदा बारीक चिरुन घ्यावा. उकडलेले बटाटे हाताने कुस्करुन घ्यावेत.
२. हिरव्या मिरच्या व बडिशेप मिक्सर मधे बारीक करुन घ्यावे.
३. कढईत २ चमचे तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात कडिपत्ता टाकावा.
४. कडिपत्ता थोडा तळला गेल्यावर त्यावर कांदा २-३ मिनिट परतुन घ्यावा.
५. त्यामधे हळद, आले-लसुण पेस्ट व हिरवी मिरची-बडिशेप टाकुन परतावे.
६. २ मिनिट हे परतल्यावर त्यात बटाटा टाकावा.
७. त्यात चवीनुसार मिठ व थोडी कोथींबीर बारीक चिरुन टाकवी. निट मिक्स करुन २-३ मिनिट झाकुन ठेवावे. थोड्या वेळाने गॅस बंद करावा.
८. दुसर्या भांड्यामधे १ वाटी बेसन, ओवा, लाल तिखट, हळद व चवीनुसार मिठ टाकावे. आपण भजी करताना batter बनवतो, त्याप्रमाणे ह्याचे batter बनवुन घ्यावे. batter तळल्यानंतर crispy होण्यासाठी ह्यात १ चमचा गरम तेल किंवा १ चिमटी खायचा सोडा टाकावा.
९. हे करत असताना दुसर्या कढईत तळण्यासाठी तेल गरम करण्यास ठेवावे.
१०. बटाट्याच्या मिश्रणाचे गोळे करुन घ्यावेत व त्याला वड्यांचा आकार द्यावा. प्रत्येक वडा बेसनाच्या batter मधे बुडवुन त़ळुन घ्यावा.
११. हे वडे तळलेली मिरची किंवा लसुणची चटणी ह्यासोबत गरम serve करावा.
प्रतिक्रिया
14 Jul 2011 - 5:05 am | प्राजु
फोटो कातिल!! :)
यम्म्म!
14 Jul 2011 - 5:54 am | निनाद
कसला त्रास देते आहे ही मृणालिनी... :)
बडिशेप मी घातली नाही कधी पण आयडिया चांगली आहे. करून पाहिली पाहिजे.
मिरची सोबत लसूण-खोबर्याची चटणी आहे का ती?
14 Jul 2011 - 1:34 pm | Mrunalini
हो, ती लसूण-खोबर्याची चटणी आहे
14 Jul 2011 - 6:12 am | पिंगू
आज सकाळी नाश्त्याला बटाटेवडेच असतील.. चांगलाच फडशा पाडतो..
- पिंगू वडेवाले
14 Jul 2011 - 8:30 am | ५० फक्त
जबरा फोटो,. गरवारे समोर बिपिन कडे खाल्ले असतीलच ना तु वडे म्रुणालिनी. तसेच शहाडला सेंच्युरीच्या गेट बाहेर एक दुकान आहे वड्यांचे ते पण जबरा असतात. अजुन सहकारनगर मधला वडापाव पण जबरदस्त.
14 Jul 2011 - 8:53 am | अत्रुप्त आत्मा
वडापाव-नवी पेठ विठ्ठलमंदीरा पुढे रिक्षा स्टेंड जवळचा अण्णाचा वडापाव वेळ-संध्याकाळी ६नंतर...आणी लालमहाल ते दगडूशेठ चौका कडे जाताना डावीकडच्या दुसय्रा गल्लीतला वडा(च)फक्त...येकदम टेस्टी
14 Jul 2011 - 8:59 am | अभिज्ञ
माझ्या माहितीप्रमाणे बटाटे वडयामध्ये "कांदा" घालत नाहीत.
जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.
अभिज्ञ.
14 Jul 2011 - 9:04 am | निवेदिता-ताई
त्यामुळे वडे अधिक टेस्टी होतात.....
बडीशेप पहिल्यांदाच घातलेली पहात आहे....मॄणाल.
बाकी वडे मस्त मस्त.....
14 Jul 2011 - 11:25 am | सुधीर१३७
ज......ह.......ब.......ह.........रा...........
14 Jul 2011 - 11:31 am | गवि
चटकदार.. तोंपासु.
(बादवे पाकृच्या दृष्टीने बटाटावडा (फॉर दॅट मॅटर भजी, बटाटाभाजी, पोहे, उपमा, ऑम्लेट इइ) हे अगदी कॉमन पदार्थ नाही का वाटत? त्यांची पाककृती अशी स्पेशली देण्यात नावीन्य आहे का? की बडीशेप हे व्हेरिएशन आहे? :) )
14 Jul 2011 - 11:35 am | परिकथेतील राजकुमार
कृपया सदर आयडी उडवल्या जावा.
धन्यवाद.
अवांतर :- स्टेप बाय स्टेप फटू असल्याशिवाय वड्याच्या पाकृला मजा नाही बॉ.
14 Jul 2011 - 1:13 pm | प्राजक्ता पवार
एकदम मस्तं !
14 Jul 2011 - 1:33 pm | Mrunalini
सगळ्यांचे धन्यवाद. :)
मला असा कांदा घालुन केलेला बटाटावडा आवडतो. त्यामुळे मी नेहमी कांदा घालते.
बडिशेपचे म्हणाल, तर actually ही idea माझ्या आत्याची आहे. ती असा कांदा आणि बडिशेप टाकुन वडे करते. मला तिनी केलेले हे वडे खुप आवडतात, म्हणुन मी पण असेच करते.
@५० फ्क्त : मी अजुन गरवारे समोरचा वडा नाही खाला कधी. आम्ही शाळेत असताना, दशभुजा गणपती जवळ जोशी वडेवाल्यांचे दुकान होते. वा, शाळेतुन येताना तिथला गरम गरम वडापाव खायचा, म्हणजे स्वर्ग असायचा आमच्यासाठी.
14 Jul 2011 - 2:47 pm | कच्ची कैरी
व्वा !!!! बटाटावडा पाहुन तोंडाला पाणीच सुटले आता उद्याच्या नाश्त्याचा बेत पक्क झाला.
14 Jul 2011 - 4:10 pm | सूड
कोल्हापूरला हिंदूस्थान बेकरीच्या रांगेत हॉटेल सन्मान (बहुधा ताराबाई रोड) !! तिथे वड्याची चव मस्त, कव्हरही भारी क्रिस्पी असतं. सांबर(सांभर/सांबार/सांभार जे काय असेल ते) झणझणीत असतं, पण ती चव झकासच असते. बदलापूरला खिडकी वडेवाले आलेत त्यांच्याकडचेही वडे छानच !! भांडूपला नवजीवन शाळेसमोर एक दुकान होतं तिथले वडे आणि हो भाऊ वडेवाल्यांकडेचे वडेही खासच.
कसली आठवण करुन दिलीय, बाहेर हा मस्त पाऊस आणि गरमागरम वडे आहा हा !!
14 Jul 2011 - 4:23 pm | गवि
सांबर(सांभर/सांबार/सांभार जे काय असेल ते) झणझणीत असतं,
"कट" म्हणायचं त्या प्रकाराला.
कटवडा.
14 Jul 2011 - 6:43 pm | निवेदिता-ताई
वड्यांचे कव्हरही भारी क्रिस्पी करण्यासाठी काय करायचे????
15 Jul 2011 - 7:18 am | सूड
दोन चमचे तांदळाची पिठी ट्राय करायला हरकत नाही, पण हे लोक ब्रेड क्रम्स टाकत असावेत असं वाटलं.
विजुभाउंनीही खाली एक ऑप्शन दिलाय.
14 Jul 2011 - 4:24 pm | मराठी_माणूस
कोल्हापुरला बिनखांबी गणपति जवळ एक "वाईकर" नावचे वड्याचे होटेल होते. त्या आकाराचा वडा नंतर कुठेही पहाण्यात आला नाही. ते हाटेल ही आता नाही.
14 Jul 2011 - 4:26 pm | गवि
दादर कीर्ती कॉलेज. अशोकचा वडापाव..
पूर्णविराम.
आता असतो का माहीत नाही.. :(
15 Jul 2011 - 1:23 pm | विश्वनाथ मेहेंदळे
त्याची गोड चटणी मस्त असते. तो अजूनही तिथे आहे. वडापाव मिळायला १५-२० मिनिटे लागतात. तयार असला तरीही, त्याने आपली ऑर्डर ऐकेपर्यंत तितका वेळ जातो (या बाबतीतही फार बदलला नाही तो)
15 Jul 2011 - 1:54 pm | गवि
अगदी अगदी..
भिका मागायला लागायच्या.. अशोक अशोक अशोक. ए दे ना.. दे ना रे..
आणि गर्दीतून नोट नाचवत रहायचं. मग एकदाच मिळणार म्हणून माणशी दोन तीन उगीच घेऊन ठेवले जायचे.
ह्म्म.. तो वडापावात क्रंब्ज म्हणून वडेभज्यांची तळणीतली बाळे ऊर्फ तुकडे घालायचा.
16 Jul 2011 - 1:56 pm | रामदास
(पैसे देऊन) फक्त अशोककडे खाल्लो बाबा.
अशोक म्याड आहे .
अशोक भिचो आहे ,
हलकट आहे .माजला आहे,
नालायक आहे,
पोरींना आधी देतो,
चुरा पण विकतो,आय.... मारला पायजे एकदा ,
अशी साधारण विस वाक्यं मनातल्या मनात म्हणत लाळ गाळत उभं राह्यलं की हातात वडापाव यायचा.
16 Jul 2011 - 6:27 pm | गवि
पोरींना आधी देतो,
+१०००००००००००००००
14 Jul 2011 - 5:24 pm | एक तारा
आज पर्यंत कधीच असं झालं नाही की वडा पावचं नाव निघालं आणि तोंडाला पाणी नाही सुटलं. आजही तेच. पण दुख्खं याचं आहे की ते ह्रुदयाला आवडत नाही (दुसर्या शब्दात, चालत नाही). तरी पण जितका आनंद घेऊ शकत होतो तेव्हढा घेतला :)
धन्यवाद हा आनंद दिल्याबद्द्ल :)
14 Jul 2011 - 5:36 pm | सानिकास्वप्निल
मस्तच :)
14 Jul 2011 - 7:08 pm | प्रभो
वडे मस्तच!!
मला माझ्याच वडेपुराणाची आठवण झाली.
14 Jul 2011 - 7:18 pm | विजुभाऊ
वड्यांचे कव्हरही भारी क्रिस्पी करण्यासाठी काय करायचे????
मी बेसनाच्या पिठात थोडे ज्वारीचे पीठ मिसळतो. ज्वारीचे पीठ थोडे जाडसरच असावे.
प्रमाण साधारणतः ३ वाटी बेसनपिठास एक वाटी ज्वारीचे पीठ
14 Jul 2011 - 7:43 pm | मस्त कलंदर
२६ जुलैच्या पावसात तर अडकले नव्हते, अगदी वेळेआधीच होस्टेलमध्ये पोचले होते. पहिलाच असा प्रसंग असल्याने पहिली रात्र आम्ही पिकनिक मूड मध्ये घालवली. होस्टेलचं स्वयंपाकघर तळमजल्यावर होतं, त्यातलं शक्य तितकं साहित्य वाचवून पहिल्या मजल्यावर आणलं गेलं होतं. लाईटस नव्हते, टाकीतलं पाणी किती वेळ पुरेल माहित नसल्यानं पुरवून वापरायचं होतं. मग कधी खिचडी, कधी नुसतं भात-भाजी खाऊन दोन दिवस काढले. निशाचरांनी आधीच घरचा खाऊ संपवल्याने मधल्या वेळेसाठी काहीच खायला शिल्लक नव्हतं. गुरूवारी सकाळी पाणी गुडघ्यापर्यंत ओसरलं, आणि ज्या-ज्या मुलींना बॉयफ्रेंडस होते ते त्यांच्यासाठी वडे, बिस्किटस आणि असंच काहीबाही खायला घेऊन आले. नशीब आमच्या ग्रुपमधल्या मैत्रिणीच्या मित्राने तिच्या मैत्रिणींचाही विचार केला होता. तो वडा हाती आल्यावर काय वाटलं, ते सांगायला शब्द नाहीत. 'वडा-पाव' इतका असोशीने कधी खाल्ला जाईल असं त्यापूर्वी कधीच वाटलं नव्हतं.
आजचे हे खमंग बटाटेवडे पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. :-(
15 Jul 2011 - 7:56 am | ५० फक्त
वड्यांचे कव्हरही भारी क्रिस्पी करण्यासाठी काय करायचे???? -
मी ह्याच्यासाठी जाड पोहे मिक्सरमधुन काढुन घेतो कोरडेच, आणि ते वड्याच्या पिठात टाकतो अगदि वडे करुन तेलात टाकण्याच्या आधीच. पण या साठी पिठात थोडंसं मिठ जास्त टाकावं लागेल आणि तिखट पण.
15 Jul 2011 - 10:54 am | विसोबा खेचर
क्षमा करा परंतु वड्याचे छायाचित्र जरा जास्तच तेलकट वाटते आहे. वड्याने जरा जास्तच तेल पिल्यासारखे वाटते आहे. बटाटावडा हा तळलेला पदार्थ असतो/आहे हे मान्य; तरीही त्याने इतके तेलकट असणे/दिसणे हे योग्य वाटत नाही..
तात्या.
15 Jul 2011 - 1:48 pm | Mrunalini
@ विसोबा खेचर
आहो, नाही. वडा बिलकुल तेलकट झाला नव्हता.. actually मी तो तळुन बाहेर काढल्या बरोबर लगेच फोटो काढलेत. त्यामुळे तो थोडा तेलकट वाटतोय.
15 Jul 2011 - 3:56 pm | पल्लवी
डाएटला चालणार्या वडापावची रेसिपी पण द्या ना मॄणालिनी !! :(
16 Jul 2011 - 7:45 am | ५० फक्त
पल्लवी, डायटला चालणारा वडा कशाला हवा, मस्त चापुन वडे खायचे अन फिरुन यायचे जरा जास्तच कॅलरी जळाल्याशी मतलब आहे,
16 Jul 2011 - 2:50 pm | Mrunalini
खरचं गं, मी पन विचार करतीये, कसा काय डाएटचा वडा बनवता येइल. ;)
पण काही उपाय सुचत नाहीये. वडा म्हणजे तो deep fry च असणार. जर तो deep fry नाही केला, तर तो टिक्की किंवा कटलेटचा प्रकार वाटेल. त्यामुळे ५० फक्तनी सांगितलेला उपाय चांगला आहे. ;)
17 Jul 2011 - 9:20 pm | पंगा
डाएटला चालणारा वडा म्हणजे फक्त डीप फ्राय न करणे (तेलाचा वापर कमी करणे / टाळणे) एवढेच करून चालणार नाही. बटाटाही वर्ज्य करावा लागेल.
अवांतर: यावरून आमच्या लहानपणी ऐकलेला (आणि त्या काळी जोरदार हसवणारा... अहाहा! बचपन के दिन भी क्या दिन थे...) एक फालतू विनोद आठवला.
"अहो, तुमच्या बटाटावड्यात बटाटे कुठे सापडत नाहीत ते?"
"अहो चालायचेच! शंकरपाळ्यात तरी शंकर सापडतो का?"
(किंवा, आम्ही म्हणतो तसे, "स्प्रिंगरोलमध्ये तरी स्प्रिंगा सापडतात का?")
17 Jul 2011 - 9:36 pm | पल्लवी
हा ना.. हॉट डॉगमधे कुत्रं कुठं असतय तवा...
17 Jul 2011 - 9:43 pm | पंगा
...ह्यामबर्गरात ह्याम.
यादी करायचीच म्हटली, तर बरीच मोठी होईल, अशी शंका आहे.
(अतिअवांतर: 'ह्यामबर्गर' हा शब्द मुळात 'हम्माबर्गर' असा असावा, आणि अपभ्रंशाने तो 'ह्यामबर्गर' असा झाला असावा, असा आमचा अंदाज आहे.)
19 Jul 2011 - 12:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
ह्यामबर्गर ह्याम्बुर्गातलं असल्यामुळे त्याला ह्यामबर्गर म्हणत असावेत काय?
(बर्लिनर वॉल बघून आलेली) अदिती
19 Jul 2011 - 10:18 am | पंगा
खरे तर हो, पण श्श्श्श्श्..... असे बोलायचे नसते... चांगल्या ष्टोरीचा पचका होतो...
अहाहा... जेली-भरल्या डोनटांची भिंत?
अवांतर: एक रोचक दुवा.
16 Jul 2011 - 3:18 pm | परिकथेतील राजकुमार
ऑ ? आणि त्यात सुख काय मिळणार ?
हे म्हणजे शेवयाची खीर खाऊन त्याला बासुंदी ओरपली असे म्हणण्यासारखे झाले.
17 Jul 2011 - 8:54 pm | पल्लवी
फक्त ५०, अहो रोज दीड-दीड तास घाम गाळून सुद्धा वजन एक ग्राम देखिल हलत नाही, तिथे फक्त चालण्याने काय होणार ? असो.
मृणालिनी अगं, तू जर डाएटला चालणारी पण तरीही चविष्ट, चमचमीत रेसेपी दिलीस ना, तर तुला एक पार्टी लागू. प्रॉमिस्स्स.... :) :)
परा, आता बासुन्दीची आठवण करुन दिल्याबद्द्ल निषेध. :( आता न राहावून माझं डाएट मोड्ल्यास त्याचं पाप तुझ्या माथी.
18 Jul 2011 - 6:31 pm | परिकथेतील राजकुमार
चालतय.
बिनधास्त ओरपायचे :) डाएट वैग्रे त्याच्या जागी ठिक आहे, पण उगाच मन मारायचे नाही.
16 Jul 2011 - 3:20 am | रेवती
छे छे.....
मला एकही फोटो दिसला नाहिये.;)
16 Jul 2011 - 6:10 pm | अप्रतिम
फोटो पाहुन यड लागलं.
18 Jul 2011 - 5:35 pm | इरसाल
मृणालिनी बटाटे वडे छानच.
ज्याने कोणी कर्जतच्या दगड्याचे बटाटेवडे नाही खाल्ले त्याने बटाटेवडे खाल्लेच नाही असे मी मानतो.
आणि बटाटेवड्याच्या आकारमानाबद्दल जर म्हणाल तर भुसावळच्या बोन्डेच्या वड्याबरोबर कमीतकमी ५ पाव आरामात खावू शकता. चव पण एकदम भन्नाट. १०-११ वाजता जर दोन वडे आणि पाव (५/१०) खाल्ले कि मग फक्त रात्रीचेच जेवण....
19 Jul 2011 - 10:43 am | चेतन सुभाष गुगळे
मी बेळगावात असताना काही कामानिमीत्त एका व्हेंडरकडे गेलो असता त्याने माझ्याकरिता जवळच्या हॉटेलातून बटाटे वडा मागविला. संध्याकाळी मी सहसा काही जड पदार्थ खात नाही. त्यात पुन्हा बटाटे वडा म्हंटल्यावर मी अजुनच कंटाळलो. त्याला म्हंटल, "कशाला उगाच मागविताय? पुण्यात नेहमी खातच असतो." "पण इथला वेगळा असतोय, ट्राय करून पाहा" तो उत्तरला.
बटाटे वडा आल्यावर पाहिला तर तो चांगला क्रिकेटच्या चेंडूएवढा मोठा आणि त्याच आकाराचा. त्याच्यासमोर पाव अगदीच लहान दिसत होता.
"चांगलाच मोठा दिसतोय की तुमचा वडा" मी उद्गारलो.
"आमचं सारंच मोठं असतंय की. तुम्ही अजून काय बी बघितलं नाय." तो अनेकार्थी वाक्य बोलला.