जून २२, २००८ रोजी जॉर्ज कार्लिन हे अमेरिकेतील ज्येष्ठ विनोदी कलाकार वारले. ते जिवंत असताना त्यांच्याविषयी मला काही माहीत नव्हते. पण त्यांच्या मृत्यूच्या संदर्भाने अनेक वर्तमानपत्रांत स्मरणलेख आलेत, त्यावरून एका काळच्या त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना आली. त्यांचा एका विशिष्ट विनोदी भाषणाचा उल्लेख बर्याच ठिकाणी आला "Seven Words You Can Never Say on Television" (दूरदर्शनवर कधीही न म्हणता येणारे सात शब्द). त्याची थोडक्यात यूट्यूबवर झलक -
अर्थात हे सातही शब्द संभोग किंवा मलमूत्रविसर्जनासंबंधी आहेत. हे भाषण कार्लिन यांनी १९७२ मध्ये दिले. प्रथम त्यांना मिलवॉकी येथील एका कोर्टात खेचले गेले पण त्या कोर्टाने त्यांना सोडून दिले. पण पुढे ते भाषण दूरदर्शनवर दिल्यामुळे त्यांना पुन्हा कोर्टापुढे जावे लागले, तो खटला थेट अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. सर्वोच्च न्यायालयाने "हे शब्द दूरदर्शनवर बोलू नयेत" या बाजूने निर्णय दिला (१९७८).
मला हा कुठला इतिहास माहिती नव्हता. शिवाय हे सात शब्द मी कॉलेजमधील दोस्तमंडळींमध्ये सोडले तर जवळजवळ कधीच वापरत नाही. पण योगायोग असा, की गेल्याच आठवड्यात मी इरावती कर्वेबाईंचा ललितलेखसंच "गंगाजल" वाचत होतो. पैकी एक लेख रँग्लर परांजपे (अप्पा) यांच्याविषयी आहे. त्यातील एक घटना माझ्या लक्षात राहिली.
अप्पांचे शब्दज्ञान अचूक. शकू आणि मी शब्द आडला की...आदमासे ठोकून देत असू. ... कॉलेजमधले संस्कृत पुस्तक चालू असता शकू मला 'नितम्ब' शब्दाचा अर्थ विचारत होती. ... मी अगदी नि:शंकपणे सांगितले, "त्या शब्दाचा अर्थ गाल." अप्पा तेथेच होते. ते म्हणाले, "काहीतरी सांगू नकोस; त्या शब्दाचा अर्थ आहे ढुंगण अथवा कुल्ले." ... मी अगदी सोवळ्या घरात वाढले होते. जे वाङ्मय अप्पा वाचून घेत, तेही सोवळेच होते. प्रियेच्या नितंबांचा उल्लेख वाङ्मयात येईल, ही कल्पनाही मला नव्हती...
खरे म्हणावे, तर मलाही लहानपणी ही कल्पना नव्हती. पण का नसावी? शरिराचा हा भाग (-आता मीच ही विचित्र भीड सोडतो-) ढुंगण, त्याचा साधारण आकार बहुतेक कपड्यांतून स्पष्ट दिसतो. सभ्य स्त्री-पुरुष एकामेकांच्या साड्या-विजारींकडे बघताना डोळे फेरत नाही. आजही पूर्वीसारखेच मनातल्या शरीरसौष्ठवाच्या ('फिगर'च्या) कल्पनेत ढुंगणाचा आकार समाविष्ट असतो. ढुंगण म्हणजे लंगोटीने झाकलेल्या अवयवांसारखे गुप्त, सभ्य लोकांनी मुद्दाम लपवलेले नाही. ढुंगणाचा विचार म्हणजे प्रत्यक्ष संभोगाचा विचार नव्हे. मलमूत्रविसर्जनासारखा हा दुर्गंधीयुक्त प्रकार नाही - उलट सौंदर्याचा भाग आहे. मग हा शब्द सभ्य बोलण्या-लिहिण्यातून हद्दपार का असावा?
"ढ"काराने सुरू होणारे शब्द आपल्याला आवडत नाही, हे कारण असावे का? म्हणजे ढेकर, ढासळणे, ढेकूण, वगैरे... पण ढुंगण शब्दासारखाच "ढंग" शब्द सुंदर गोष्टींविषयी बोलताना आपण सहज वापरतो. म्हणजे शब्दाच्या ध्वनीचा दोष नाही. दोष कसला आहे, त्यावर इरावतीबाईंनी नेमके बोट ठेवले आहे - "सोवळेपणा". पण एका सुंदर अवयवासाठीच्या उपयोगी अर्थाच्या शब्दाला, या भंपक सोवळेपणामुळे आपल्याला मुकावे लागत आहे.
बहुधा कार्लिनबुवांचे सात शब्द मी रोजच्या वापरासाठी घेणार नाही. पण रँग्लर परांजपे यांनी बाईंना सभ्यपणे शिकवलेला "ढुंगण" शब्द मात्र योग्य अर्थपूर्ण संदर्भात, सभ्य बोलण्यालिहिण्यात मी वापरायला लागेन, असे वाटते.
अशा प्रकारच्या शब्दांबद्दल, सोवळेपणाबद्दल, तुमचे काय मत आहे?
प्रतिक्रिया
25 Jun 2008 - 9:22 am | सहज
सर्वप्रथम जॉर्ज कार्लिन यांना श्रद्धांजली! तसेच नुकतेच दिवंगत झालेले टिम रसर्ट यांना देखील.
कार्लीन यांच्या अनेक चित्रफिती यु ट्युब वर आहेत, लोकांनी जरुर त्या पहाव्यात.
चारचौघात वापरण्याची भाषा म्हणुन जरुर काही शब्दांचा उल्लेख कमी होतो पण प्रत्येकजण ते शब्द कधीना कधी वापरतोच. तसेच जेव्हा काही शब्द माहीत नसतात तर ते कळुन घेण्याची स्वाभावीक प्रवृत्ती आपल्याला त्या शब्दांवर विचार करायला लावतेच.
ढुंगण हा शब्द तर जवळजवळ प्रत्येकाने वापरला असेलच. अगदी बाहेर नाही तरी घरात. फार तर जरा सॉफ्ट करुन जसे "ढु"
ऑल सेड एन्ड डन, संस्कृतीरक्षक नावाने वावरणार्या, रस्त्यावर येऊन दगडफेक करणार्या माणसापेक्षा, "घाणघाण" बोलणारा माणुस परवडला असे मला वाटते.
25 Jun 2008 - 9:25 am | भडकमकर मास्तर
मीही कुठे वापरत नाही पण मला ढुंगण हा शब्द वापरत आला तर बर्यापैकी लडिवाळ वगैरे होईल असे उगीचच वाटते.
कार्लिन यांच्या चित्रफितीबद्दल धन्यवाद...
त्यांच्या अजून काही चित्रफिती यूट्यूबवरून पाहीन आता...
अवांतर... : मलाही बारावीच्या संस्कृत श्लोकात प्रियेचे वर्णन म्हणून शिकताना नितंब शब्दाचा खरा अर्थ कळाला... मी अजून भलतेच समजत होतो...
खरा अर्थ कळल्यावर मला तेव्हा मला दोन गोष्टींची फार लाज वाटली..१. स्वतःच्या इग्नोरन्सची २. आपण भलतेच काहीतरी समजत होतो त्याबद्दलची...
पण नंतर कुठेतरी वाचनात आले की या शब्दाबद्दल बर्याच जणांना अडचण होती.. कुठेतरी वाचले होते की एक प्रेमकथा लिहिणारे लेखक चुकीच्या ठिकाणी हा शब्दप्रयोग करत असत.... :) त्यातून निर्माण होणारे विनोदही विचित्र पण मस्त होते... :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
25 Jun 2008 - 8:16 pm | चिखलू
रमेश मंत्री यांच्या लि़खाणात आहे एक ... माझा Favorite...
"तिच्या चोळीतून तिचे नितंब डोकावत होते....."
25 Jun 2008 - 9:45 am | अमोल केळकर
जॉर्ज कार्लिन या व्यक्तिमत्वाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद
25 Jun 2008 - 9:58 am | ध्रुव
--
ध्रुव
25 Jun 2008 - 11:52 am | विसोबा खेचर
वा धन्याशेठ!
एका चांगल्या विषयाला वाचा फोडली आहेस! :)
ढुंगणाचा विचार म्हणजे प्रत्यक्ष संभोगाचा विचार नव्हे. मलमूत्रविसर्जनासारखा हा दुर्गंधीयुक्त प्रकार नाही - उलट सौंदर्याचा भाग आहे. मग हा शब्द सभ्य बोलण्या-लिहिण्यातून हद्दपार का असावा?
खरं आहे. सौंदर्याचा भाग निश्चितच आहे. प्रामाणिकपणे अन् प्रांजळपणे सांगायचं तर काही काही स्त्रियांचा हा घाटदार, सुडौल भाग पाहिला की जीव क्षणभर खुळावतो! साला, उगाच खोटं कशाला बोला! :)
पण एका सुंदर अवयवासाठीच्या उपयोगी अर्थाच्या शब्दाला, या भंपक सोवळेपणामुळे आपल्याला मुकावे लागत आहे.
अगदी सहमत आहे!
पण रँग्लर परांजपे यांनी बाईंना सभ्यपणे शिकवलेला "ढुंगण" शब्द मात्र योग्य अर्थपूर्ण संदर्भात, सभ्य बोलण्यालिहिण्यात मी वापरायला लागेन, असे वाटते.
हार्टी काँग्रॅटस्! जियो धन्याशेठ!... :)
अशा प्रकारच्या शब्दांबद्दल, सोवळेपणाबद्दल, तुमचे काय मत आहे?
तुझं जे मत आहे तेच माझं आहे. याला 'भंपक सोवळेपणा' असंच म्हणणे मी पसंद करेन..!
अवांतर -
काही मराठी संस्थ़ळांवरचा 'भंपक सोवळेपणा' हे देखील मिपाच्या जन्माचे एक कारण आहे. मिपा या संस्थळावर देखील कुठल्याही प्रकारच्या भंपक सोवळेपणाला मज्जाव आहे. संस्कृती अन् सभ्यतेच्या नसत्या गफ्फांना मज्ज्जाव आहे! :)
असो...
धन्याशेठ, अजूनही येऊ दे असेच काही वैचारिक आणि सोवळेपणाच्या भंपक व धुवट कल्पनांना तडा देणारे! :)
आपला,
(बंडखोर!) तात्या.
13 Jul 2008 - 6:09 am | धनंजय
इथे वापरण्याची वेळ आली:
http://www.misalpav.com/node/2443
25 Jun 2008 - 12:04 pm | रामदास
मजा आणली या दोन्ही शब्दांमध्यें. नितब आणि ढुगण असे म्हणून बघा . बेडौल.
सखीच्या कुच कलशासी चा अर्थ नववी पर्यंत नव्हता समजला.
सवडीनी आणखी लिहीतो.
25 Jun 2008 - 8:55 pm | मुक्तसुनीत
कॉलेजमधे असताना मुलींचे वर्णन करताना एखाद्या मुलीचे "स्वभाव आणि विचार" कसे आहेत याबद्दलची चर्चा चालायची त्याची आठवण झाली !
मिपा आम्हाला कधी एकदम काही वर्षे मागे नेऊन "त्या" काळाची सफर घडवून आणेल , सांगता यायचे नाही !
25 Jun 2008 - 10:13 pm | एक
परवाच माझा भाऊ आम्हाला तो बघायला गेलेल्या मुली बद्दल सांगत होता.
"मुलगी स्वभावाने चांगली आहे आणि त्यांचे विचारही एकमेकांशी जुळत आहेत."
अर्थात मला त्याच्या बोलण्यातली मेख समजली आणि घरातल्या ज्येष्ठांनाही आनंद वाटला (अज्ञानात आनंद असतो)..
मी एकच सल्ला दिला.."विचार जुळताहेत ठीक आहे..मनं जुळली पाहिजेत.." ;)
25 Jun 2008 - 10:48 pm | चतुरंग
आमच्याही कालीजाच्या दिवसात ह्या "स्वाभाविक आणि वैचारिक" क्रांतीच्या विषाणूने काही काळ आमचीही हार्डडिस्क करप्ट झालेली होती! ;)
चतुरंग
25 Jun 2008 - 11:45 pm | पिवळा डांबिस
धमाल चाललीय, लगे रहो!!
स्वगतः मेल्या डांबिसा, ते सरपंच तुझे "शिंच्या" आणि रांडेच्या" चालवून घेतात ते ठीक आहे. आता तू या विषयावर तरी आणखी काही लिहू नको!!
25 Jun 2008 - 11:52 pm | विसोबा खेचर
आता तू या विषयावर तरी आणखी काही लिहू नको!!
आणखी काही जरूर लिही अशी डांबिसाला विनंती..
सरपंचाचा डांबिसाच्या लेखणीवर विश्वास आहे, तसेच अश्लील भाषा न वापरताही नाजूक विषयांवर लेखन करता येते यावरही संरपंचाचा विश्वास आहे! :)
तेव्हा डांबिसराव,
चालवा तुमचीही लेखणी! आम्ही वाचू... :)
आपला,
(स्थूलपणामुळे कुले अंमळ मोठे असलेला!) तात्यासरपंच.
26 Jun 2008 - 8:01 am | पिवळा डांबिस
मग आम्हीही आपली पोतडी खुली करतो.....
चतुरंगानी ज्याला "स्वाभाविक" आणि "वैचारीक" म्हटले आहे....
आम्ही मुंबयकर, तेंव्हा आमचं मराठी इतकं हाय नव्हतं....
आम्ही त्याला (थोड्याफार फरकाने) "लक्ष्मीकांत- प्यारेलाल" म्हणत असू....:)
आणखी एक वाक्प्रचार त्यावेळेस वापरात होता......
एस्पेशियली वडीलधार्या मंडळींच्या समोर बोलतांना.....
"राजगड-रायगड झकास आहेत, पुरंधर तर उत्तुंग आहे (लक्षात घ्या की पुरंधर आणि रुद्रमाळ असा तो जोडगड आहे!) पण पन्हाळ्गड कसा आहे ते अजूनी माहीती नाही":)
एक खरा किस्सा...
माझ्या एका मला वडीलधार्या असणार्या स्नेह्याबरोबर चर्चा चालू होती. सोबतीला वाईनही होती.:)
तेंव्हा मी म्हटलं, "नानासाहेब, या गोर्या अमेरिकन बायका सुंदर दिसतात, मग त्या आपल्याला सेक्शुअली ऍट्रॅक्टीव्ह का वाटत नाहीत?"
"अरे त्याचं असं आहे", लालबुंद चेहरा झालेले नानासाहेब वदले, "आपण भारतीय माणसं!! आपल्याला तव्यांपेक्षा कढया जास्त आवडतात!!! आता मला खरं सांग, तुला भजी जास्त आवडतात की चपात्या?"
क्या बात है!! आपण तर सर्द झालो.......
बरं ते जाउदे!!
नितंबांच्या जोडीला आणकी एक शब्द पाहिजे?
"रंभोरू"
आपल्याकडे संस्कृत जाणणारे बरेच मिपाकर आहेत, ते समजावून सांगतील याचा अर्थ!!
नाही सांगितला तर मग मला विचारा, मी सांगेन....
पिडाकाका म्हणे, "आता उरलो उपकारापुरता!!!!!!!"
:)
26 Jun 2008 - 8:02 am | मुक्तसुनीत
"रंभोरू"चा अर्थ केळ्यासारख्या मांड्या असा असावा. चू.भू.द्या.घ्या.
26 Jun 2008 - 8:30 am | पिवळा डांबिस
आम्हाला वाटलंच की मुक्तसुनीत तुम्ही आम्हाला निराश करणार नाही........:)
रंभोरू = जिच्या मांड्या केळीच्या गाभ्यासारख्या आहेत ती....
काय मिपाकरांनो, पाह्यलेय अशी कोणी?
ते जाऊदे, केळीचा गाभातरी पाह्यलाय कोणी?
तिच्यायला, ही हल्लीची पोरं म्हणजे बघा मुक्तसुनीतजी,,,,,,
काय कामाची नाहीत......
फक्त प्रेमभंगावरती फालतू कविता लिहीत बसतील.......
:))
रतिरंगी रंगलेला,
पिवळा डांबिस
26 Jun 2008 - 8:37 am | मुक्तसुनीत
- "अनंगरंगी" रंगलेला
मुक्तकल्याण सुनितमल्ल ! :-)
13 Jul 2008 - 12:51 pm | प्रकाश घाटपांडे
मन हे पीतरंगी रंगले!
प्रकाश घाटपांडे
26 Jun 2008 - 3:21 am | सुवर्णमयी
अशाप्रकारचे शब्द लेखनविषयात ते सहजतेने आले तर मी लिहिन, मुद्दाम त्यांचा वापर करायचाच म्हणून लिहिणार नाही. याला सोवळेपणा न म्हणता वयानुसार आवश्यक असणारा सार्वजनिक संकोच अथवा सभ्यपणा असे मी म्हणेन.
आता घरात दोन वर्षाचा डायपर (लंगोट) वापरणारा लहान मुलगा आहे. त्याचा डायपर काढताच कित्येकदा तो पळू लागतो. अशा वेळी घरी असतांना नकळत अरे थांब ढुंगण तरी धुवू / पुसू दे असे वाक्य माझ्या तोंडून निघते. (पण बाहेर वा चारचौघात असा उल्लेख करून मी काही विशेष करते असे मला वाटत नाही वा न उल्लेख केल्याने काही गमावते असेही नाही.)
त्याच वेळी वय वर्षे पाचची शाळेत जाणारी माझी मुलगी दर वेळी आई हा बाथरूमवर्ड आहे असे मला बजावते.
थोडक्यात हा शब्दांचा दोष नसून त्याच्याशी संबंधित गोष्टी अतिशय खाजगी आहेत आणि त्या खाजगी असाव्यात या धारणेचा आहे.
दुसरी गोष्ट सांगणे आवश्यक आहे , ती म्हणजे माझ्या नकळत बोलण्याचा परिणाम असा की आपले हात पाय असे अवयव विचारले असता दाखवता दाखवता (न विचारता )माझा मुलगा आपले हे ढुंगण म्हणून वाक्य पूर्ण करतो. हे त्याच्या निरागस वयाला योग्य आहे पण हीच गोष्ट जर एखाद्या पुरुषाने केली तर त्या 'ढु'चा वापर कसा ठरेल?हा मुद्दा विचार करण्याचा आहे. सार्वजनिक आयुष्यात हा सोवळेपणा नाही तर वयानुरुप अंगी आलेला संकोच आहे. माझ्या मते प्रत्यक्ष वागण्या बोलण्यात हा संकोच गरजेचा आहे.
आता दुसरा मुद्दा असा की वाचकाला शारीरिक वर्णने वाचायची एक सुप्त इच्छा असते. त्यातून बायकांचे शरीर, शृंगारवर्णने म्हणजे बहुधा पर्वणी ठरत असावी..विनोदातही शरीर व शारिरीक क्रियांमुळे होणारे विनोद अग्रणी असतात. लेखकाने विषयाला आवश्यक, एखादे पात्र रंगवतांना, गरज म्हणून हे शब्द प्रयोग जरूर करावे. त्या शब्दातील छटा, बारकावे समजून करावे....आपला लेखन विषय, आपला ऑडियन्स याची जाणीव ठेवून स्पष्ट आणि प्रामाणिक लेखन करावे असा माझा विश्वास आहे.
26 Jun 2008 - 4:17 am | चित्रा
सोवळेपणा न म्हणता वयानुसार आवश्यक असणारा सार्वजनिक संकोच अथवा सभ्यपणा असे मी म्हणेन.
यापुढे जाऊन एवढेच म्हणते - एखाद्या खाजगी शब्दाची गरज नसताना तो मुद्दाम सार्वजनिक ठिकाणी वापरणे याची मला सवय नाही (मी संकोचते असे धरू), तरी दुसर्यांच्या संकोचाची पातळी माझ्याइतकीच असावी असा मात्र माझा आग्रह नाही. पण त्याचबरोबर इतर कोणी जर असे सार्वजनिक ठिकाणी असे शब्द उच्चारले तर ती व्यक्ती कोण आहे आणि कुठच्या संदर्भात असे बोलत आहे यावर माझी प्रतिक्रिया अवलंबून राहील हेही तितकेच खरे.
पण आमची आजी आम्हाला दम भरताना अगदी नि:संकोचपणे लोकांसमोर असे शब्द वापरे हेही आठवते :-)
कदाचित यामुळेच तो "सुंदर" भासत नसावा!
26 Jun 2008 - 4:08 am | टारझन
या विषयामूळे दादांची आठवण झाली.
प्रथम त्यांना श्रद्धांजली.
मला यात काहीही गैर वाटत नाही. आपण जर दादांचे सिनेमे पाहीले असतील तर सहज ध्यानात येईल की शिवराळ मराठी चा दादांनी "ढुंगणा"सकट मूबलक वापर केला आहे, आपण ते सिनेमे घरीच पाहीले ,पोट धरून हसलो ... मला नाही वाटत ते कधी अश्लिलते कडे गेलं ... ( आणि वाटलं तर तो/ती व्यक्ती अपवादच)
कुबडया खवीस
http://picasaweb.google.com/prashants.space
26 Jun 2008 - 7:44 am | आजानुकर्ण
बंडखोरीच्या नावाखाली अशाप्रकारचे हे शब्द वापरणे कितीही 'हिप' (येथे हा शब्द वापरण्याचा मोह टाळता आला नाही ;) ) असले तरी उपलब्ध शब्दांमधील नेमका शब्द निवडणे ही कौशल्याची गोष्ट आहे.
आमच्या गावाकडे 'बूड' किंवा 'गांड' या शब्दांचा वापर होतो. नितंब वगैरे शब्द गावाकडे माहीत नाहीत. ढुंगण हा शब्द माहिती असला तरी इतर शब्द जास्त लोकप्रिय असल्याने तो प्रचलित नाही. सुशिक्षित घरांमध्ये तो वापरला जातो. मात्र पर्यायी बूड/गांड हे शब्द अधिक वापरले जातात.
'जरा नीट बूड टेकवून बस की' वगैरे सार्वजनिक ठिकाणी म्हटले जाते व कोणी 'गल्ली चुकली' या भावनेने बघत नाही.
'गांडीवर फटके हाणले पाहिजेत' असे देखील सार्वजनिक ठिकाणी म्हटले जाते पण ती सार्वजनिक ठिकाणे वेगळी आहेत. ;)
नेमका शब्द वापरण्यासाठी कंटेंट व कंटेक्स्ट दोन्हींचा विचार करणे गरजेचे आहे असे वाटते.
आपला,
(क्वचित) आजानुकर्ण
26 Jun 2008 - 7:49 am | मुक्तसुनीत
अजानुकर्ण ! क्वचित येता नि मेख मारून जाता की हो ! :-)
नेमका शब्द वापरण्यासाठी कंटेंट व कंटेक्स्ट दोन्हींचा विचार करणे गरजेचे आहे असे वाटते.
वरील वाक्य कुठल्याही उमेदवार/बनचुक्या लेखक/लेखिकेने कायमचे लक्षात ठेवले पाहीजे असे.
26 Jun 2008 - 9:46 am | विकास
टूरटूर नाटकाची आठवण झाली. त्यात सौजन्यदिन असल्यामुळे सर्वांनी सभ्य भाषा बोलायची असा फतवा प्राध्यापक असलेले सुधीर जोशी काढतात. मग लक्ष्मिकांत आणि विजय कदम यांच्यातील संवादात एकजण दुसर्यास म्हणते, "तुझ्या गाडीवर टिंब देऊन एक लत्ताप्रहार करीन :) "
बाकी धनंजय रावांनी विषय महत्वाचा मांडला आहे - बे एरीयातील अखिल भारतीय मराठी साहीत्य संमेलनात यावर चर्चासत्र आयोजीत करावे असा त्यांनी प्रस्ताव करून पहावा ;)
26 Jun 2008 - 8:44 am | चतुरंग
इंग्रजी भाषेतही योग्य असाच शब्दप्रयोग होतो. माझ्या मुलाच्या शाळेत त्यांना खाली बसायला सांगताना "सिट ऑन युवर बॉट्म" असे सांगितले जाते, "सिट ऑन युवर बट" असे नाही
पण शरीर अवयवाचे चित्र दाखवून त्याची ओळख करुन देताना "बट" असाच शब्द शिकवलेला आहे. शिवाय हेही सांगितले आहे की हा बाथरुम वर्ड आहे.
तेव्हा आजुनाकर्णाने म्हटल्याप्रमाणे काँटेक्स्ट्/कंटेंट दोन्ही महत्त्वाचे.
चतुरंग
26 Jun 2008 - 9:54 am | विजुभाऊ
पुलंच्या "दिनेश " मधे त्यानी गलावरच्या खळ्यांप्रमाणे ढु वरचे खड्डे ही गोंडस दिसतात असे दिनेश (वय वर्षे तीन्/चार) चे वर्णन केले आहे.
त्याच लेखात त्याचे एक तशाच अवस्थेतले स्केच आहे...
हे वर्णन कुठेही बिभत्स अश्लील वाटत नाही.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
26 Jun 2008 - 2:56 pm | प्रियाली
स्वाभाविक आणि वैचारिक आणि तसे सर्व शब्द वाचून गंमत वाटली. अशा प्रकारच्या पुरूषांना (किंबहुना, स्वाभाविक आणि वैचारिक मिटक्या मारणारेही त्यात आलेच) आम्ही केवळ फद्या आणि लोद्या असे शब्द वापरत असू. अरेरे! काय हा फरक!
26 Jun 2008 - 3:04 pm | ऋचा
पुलंच्या "दिनेश " मधे त्यानी गलावरच्या खळ्यांप्रमाणे ढु वरचे खड्डे ही गोंडस दिसतात असे दिनेश (वय वर्षे तीन्/चार) चे वर्णन केले आहे.
त्याच लेखात त्याचे एक तशाच अवस्थेतले स्केच आहे...
हे वर्णन कुठेही बिभत्स अश्लील वाटत नाही.
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
26 Jun 2008 - 7:59 pm | विकास
धनंजय राव आपल्या प्रश्नावर आणि शब्दप्रयोगासंदर्भात अधीक विचार केल्यावर (का करत बसलो कुणास ठाऊक :-)) अजून एक मुद्दा डोक्यात आला:
वैद्यकीय परीभाषेत मग असले शब्द का वापरत नाहीत. हे फक्त मराठीसंदर्भातच नाही तर इंग्रजीसंदर्भात पण म्हणता येईल. असे अनेक शब्द आहेत जे भाषेत असतात पण ते तसेच्या तसे नाधड डॉक्टर्स वापरतात ना पोलीस (शवविच्छेद आदीसंदर्भात) वापरतात...
थोडक्यात प्रत्येक शब्द कुठे वापरला जातो हे भाषेपेक्षा त्याचा वापर कुठल्या संदर्भात होत आहे याच्याशी संबंधीत वाटते.
26 Jun 2008 - 9:07 pm | मुक्तसुनीत
"राधा , हूज द्याट पार्ट ऑफ द फिजिक विच इज अबाव द अब्डॉमेन अँड बिलो द नेक !"
- अण्णा वडगावकर ! :-)
27 Jun 2008 - 4:21 am | धनंजय
चर्चेत भाग घेणार्या सर्वांना सारासार विचार मांडल्याबद्दल धन्यवाद. मिसळपावावरती या चर्चा खुल्लमखुल्ला पण सवंग नाही, अशा होऊ शकतात ही या स्थळाची खासियत.
शब्दाचा अर्थ आणि संदर्भ बघावा हा मुद्दा तर ठीकच आहे. पण हे सर्वच शब्दांच्या बाबतीत खरे आहे. कार्लिनबुवांच्या एकपात्री प्रयोगात हा विचार केलेला आहे, की काहीकाही शब्द हद्दपार का नाहीत - तर विशेष कॉन्टेक्स्ट मध्ये त्यांना मैथुन-मल-मूत्र यावेगळे अर्थ आहेत. उदाहरणार्थ : आता पक्षिवर्गापैकी मराठीतला पोपट किंवा इंग्रजीतला कोंबडा, हे शब्द सभ्य "टेलिव्हिजन" वापरात आहेत, कारण संदर्भ ठीक असला तर राघूचा पोपट पिंजर्यात असतो, आणि डिकचा कोंबडा खुराड्यात असतो. हा दुसरा अर्थ असल्यामुळेच अनेक सवंग द्वर्थी वाक्ये अर्ध-सभ्य टेलिव्हिजनवरती म्हटली जाऊ शकतात : मैनेला बघून पोपटाने भरारी घेतली, किंवा स्कर्टच्या वार्याने वात्रट वातकुक्कुट हेलकावणारच...
पण कार्लिन यांचे सात शब्द बघितले तर मैथुन-मल-मूत्र सोडले तर वेगळे अर्थ नाहीत.
पण ढुंगणाची बात वेगळी आहे. त्याला कुठला पक्षी-प्राण्याचा वेगळा अर्थ नाही, हे खरेच. पण त्याचा मैथुन-मल-मूत्र असाही एकुलता एक अर्थ नाही. कितीही म्हटले तरी तो मैथुनाशी थेट संबंधित नाही, आणि मलमूत्राशी कधीकधीच संबंधित आहे ("थांब बाळा, मला ढुंगण तरी पुसू दे!").
काही काही शब्दांची वेगवेगळी रूपे वेगवेगळ्या सामाजिक संदर्भात उपयोगी असतात हा योग्य मुद्दा आजानुकर्ण सांगतात.
उदाहरणार्थ
"बूड टेकून बस" सार्वजनिक/"गांडीवर नीट बस" (खासगीत)
इंग्रजीत "सिट ऑन युवर बॉटम" (सार्वजनिक)/"सिट ऑन युवर बट" (खासगीत) [चतुरंग यांचे उदाहरण]
अशी संदर्भवलये अनेक शब्दांच्या बाबतीत दिसतात.
वैद्यकीय | सभ्य-सामान्य | व्रात्य-घरगुती
पेंड्युलस ऍब्डोमेन | बिग बेली | फ्लॅबी गट (इंग्रजीत)
मूत्र | लघवी | शू
विष्ठा | परसाकडे/संडास [संदर्भाने] | गू/शी
एका संदर्भवलयातला शब्द दुसर्या संदर्भात वापरला, तर अर्थच्छटा चुकली आहे, असे राहून राहून वाटते :
मोठ्या आतड्यात विष्ठेतील (गूमधील) जलांश कमी होतो.
आजीला परसाकडे (विष्ठेला) फार कोरडे होते आहे - कुंथूनच थकते बिचारी.
गांडीत गू (परसाकडणे) असेल तर काही करेल ना...
या सर्व ठिकाणी वेगळ्या संदर्भवलयाचा शब्द वापरला, तर वाक्याचा अनर्थच होतो.
कधीकधी एखादे संदर्भवलय असलेला शब्द सापडत नाही. काही सामान्य शब्दांना खास व्रात्य शब्द नसतो
जठर | पोट | *
काही गोष्टी वैद्यकाच्या खिजगणतीत नसतात :
* | काळी-सावळी | काळी ढुस्स ("कृष्णवर्णीय" वगैरे शब्द केवळ संस्कृताळलेले आहेत, ते काही वैद्यकीय नव्हेत.)
तर काही ठिकाणी, विशेषतः मैथुन-मल-मूत्रवाचक शब्दांना सभ्य-सामान्य शब्द नसतात.
गुदद्वार | * | गांड (कोकणीत "भोंक", मराठीत बिचार्या "गांड" शब्दाला संदर्भाने वेगवेगळे अर्थ उचलून धरावे लागतात)
हा प्रकार "सार्वजनिक संकोच" म्हणता येईल. (सुवर्णमयी, चित्रा, यांचा पटण्यासारखा मुद्दा.)
शब्द नसतानाही हे अवयव आपण लंगोटीखाली लपवतो. बहुतेक लोकांना थोडासा अंधार केल्याशिवाय, पडदा सारल्याशिवाय, कडी लावल्याशिवाय काही क्रिया करण्यास कठिण जाते - मलमूत्रविसर्जन आणि मैथुन. त्यामुळे या क्रियांच्या/अवयवांच्या बाबतीत "सार्वजनिक संकोच" असावा, ही बाब पटण्यासारखी आहे.
म्हणूनच बाईंच्या लेखातील "ढुंगण" शब्द मला वेगळा वाटला. यासाठी शब्द आहेत :
वैद्यकीय | सभ्य-सामान्य | व्रात्य-घरगुती
कुल्ले | * | ढुंगण
माझे म्हणणे आहे की हा अवयव लंगोटीखालचा नाही. डोळ्यांना सहज दिसणारा आहे. संस्कृत कवीला प्रियेचा नितंब दिसला हे त्या काळच्या वेगळ्या सौंदर्यकल्पनांमुळे नव्हे. कॉलेजमध्ये मुलींच्या "स्वभाव" आणि "विचारां"कडे लक्ष देणार्या कुमारांना ढुंगण दिसतेच, नाही का? आणि काही सभ्य स्त्रिया स्वतःहून "चापूनचोपून" साडी नेसतात ती फक्त निर्यांची व्यवस्थित मांडणी दाखवण्यासाठी नव्हे. ढुंगणाच्या आकारात सौंदर्य असते हे फक्त पुरुषांचे गुपीत नव्हे. त्यामुळे ही सौंदर्याची कल्पना पूर्णपणे सार्वजनिक आहे, असे मला वाटते. ढुंगणाबाबत तरी क्रियेच्या बाबतीत एक ठीक, शब्दाच्या बाबतीत दुसरे, हे मला पटत नाही. हा लटका अर्धवट संकोच म्हणजे मला भंपक सोवळेपणा वाटतो. (लंगोटीखालच्या अवयवांच्या बाबतीत मात्र बहुतेक सभ्य स्त्रीपुरुष अवयवांचा आकार कपड्यातूनही स्पष्ट दिसू नये असा प्रयत्न करतात - इथे क्रियेत आणि वाचेत एकच कायदा आहे - त्यामुळे हा मला "भंपक" सोवळेपणा वाटत नाही.)
वयानुरूप वागण्यातल्या फरकाचा मुद्दा लंगोटीखालच्या अवयवांसाठी मला पटतो. लहान बाळाचा नागवेपणा वेगळा. मलमूत्रविसर्जन हा लहान मुलांचा विनोदाचा आवडता विषय. प्रौढपणी एक तर त्यात विनोदी काही वाटत नाही, आणि कदाचित दुर्गंधीच्या विचारामुळे किळस वाटू शकते. पण ढुंगणाबाबत हा मुद्दा लागू आहे असे मला वाटत नाही. "बूटकट जीन्स हवी, पण एकदम फिटिंग हवी"- आता "बूटकट" खाली पायांपाशी चुस्त बसणार नाही हे स्पष्टच आहे - मग चुस्त फिटिंग ढुंगणालाच हवे, नाही का? आणि यात दुर्गंधी, किळसवाणा काहीच प्रकार नाही.
ऑडियन्स, विषयानुरूपता, बघूनच शब्द वापरावेत, हा सुवर्णमयी यांचा मुद्दा पूर्णपणे मान्य. मला येथे हे म्हणायचे आहे, स्त्रीपुरुषांच्या छातीचा, ढुंगणाचा आकार आपल्या सौंदर्यकल्पनांत रूढ आहे (पण लंगोटीखालील अवयवांची नाही). हे सौंदर्यवर्णन म्हणजे 'पोर्नोग्राफी' नव्हे - मैथुनाचा आडून उल्लेख नव्हे. म्हणून शरीरसौंदर्याच्या विषयाला बोलण्याची आणि ऐकण्याची वेळ खूपदा यावी (पण लंगोटीखालील अवयवांची नाही). लंगोटीखालील अवयवांबद्दल मी असे जरूर मानीन की "प्रसंगानुरूप, ऑडियन्स बघून, विषय बोलायची गरज भासल्यास, लोकांचा संकोच मनात ठेवून" योनिशिश्नगुद-वगैरे शब्दांचा काळजीपूर्वक वापर करावा. पण थान-ढुंगण मात्र या अतिविचारी काळजीयुक्त संकोचातून मुक्त असावेत.
27 Jun 2008 - 6:25 am | विकास
मिसळपावावरती या चर्चा खुल्लमखुल्ला पण सवंग नाही, अशा होऊ शकतात ही या स्थळाची खासियत.
अचूक वर्णन
27 Jun 2008 - 6:31 am | विकास
"बूड टेकून बस" सार्वजनिक/"गांडीवर नीट बस" (खासगीत)
इंग्रजीत "सिट ऑन युवर बॉटम" (सार्वजनिक)/"सिट ऑन युवर बट" (खासगीत) [चतुरंग यांचे उदाहरण]
यावरून एक पीजे आठवला! (कदाचीत लक्ष्मिकांत/विजय कदम स्टाईल नाटकातला असू शकेल) ज्यात असे शब्द न वापरण्याच्या औपचारीकतेवर भर आहे :-)
यजमान घरात आलेल्या पाहुण्याला म्हणतो: "तशरीफ रखीये"
पाहूणा उभाच
परतः "तशरीफ रखीये"
तरी पाहुणा उभाच
असे २-३ वेळा झाल्यावर यजमान विचारतो "आप तशरीफ क्यों नही रख रहे है?"
पाहुणा म्हणतो, "मेरे तशरीफ को फोड आया है |" ;)
27 Jun 2008 - 9:37 am | भडकमकर मास्तर
उत्तम विवेचन.. विशेषतः वैद्यकीय | सभ्य-सामान्य | व्रात्य-घरगुती या पद्धतीने शब्दांचे वर्गीकरण करून.....
आणि अशा विषयावर इतकी सुंदर चर्चा इथे झालेली वाचून फार बरे वाटले... :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
27 Jun 2008 - 1:08 pm | मनिष
इतकी 'ऍकडमिक" चर्चा या विषयावर संयमाने केली जाते हे खासच! "भंपक सोवळेपणा" ह्या धनंजयच्या विवेचनाशी आणि कारणांशी एकदम सहमत!
- (धनंजयचा जबरदस्त पंखा) मनिष
27 Jun 2008 - 9:29 pm | चतुरंग
असलेला विषयाचा गोषवारा आवडला.
ह्या संदर्भात एक उदाहरण आवर्जून द्यावेसे वाटते. पुण्यातल्या एका ओळखीच्या कुटुंबातील ३-४ वर्षाची लहान मुले त्यांच्या घराबाहेर उभे राहून कुंपणाला धरुन जोरजोरात,
"ढुंगण, ढुंगण, ढुंगण.." असे ओरडत होती आणि आनंदाने उड्या मारत होती! त्याही पेक्षा गमतीची गोष्ट म्हणजे त्यांची सभोवतालच्या घरातली त्यांच्याच वयाची असलेली त्यांची मित्रमंडळी आचंबित होऊन मोठ्या विस्मयाने त्यांच्याकडे बघून कुंपणाच्या बाहेर आनंदाने उड्या मारत होती! :) (म्हणजे त्या मित्रमंडळींच्या मनातला आनंद हा की जे शब्द म्हणणे आम्हाला घरी दुरापास्त आहे ते एवढ्या उघडपणे तुम्ही म्हणता आहात! वा वा चला आम्ही तुमच्या आनंदात सहभागी आहोत!!). त्या मुलांच्या आईवडिलांनी सांगितले की मुलांना हे शब्द वापरु दिले पाहिजेत त्यांच्यावर अवाजवी बंधने घालण्यात मतलब नाही. हळूहळू वयानुसार त्यांच्यात ती परिपक्वता येत जाते आणि ते आपसूकच शब्दाचा योग्य ठिकाणी वापर करायला शिकतात. बहुतेक घरातून लहानपणापासून 'हे' शब्द वाईट आहेत म्हणू नका असा धोशा मुलांसमोर लावला जातो त्यामुळे आपण एकप्रकारे मुलांची कुचंबणाच करत असतो. त्यांना तो शब्द वापरुन बघावासा वाटला तर त्यात गैर नसते. (त्या मुलांचे आई-वडील दोघेही प्रतिथयश समुपदेशक आहेत.)
भंपक सोवळेपणा कसा नसावा ह्याबाबतीत दादा कोंडके ह्यांचे एक उदाहरण आठवते. पूर्वी काही साप्ताहिकातून 'तुमचे प्रश्न' 'अमुकतमुक ह्यांची उत्तरे' असली सदरे असत.
त्यातल्या एका साप्ताहिकात दादा कोंडके ह्यांचे असेच एक सदर होते. खेड्यातल्या एका वाचकाचा प्रश्न होता "दादा, बायका पैसे नेहेमी ब्लाऊजमधे का ठेवतात?"
दादा इरसालच होते. त्यांचे उत्तर "बाबा रे, लक्षुमी नेहेमी कमळात असते!!"
चतुरंग
13 Jul 2008 - 11:01 am | प्रकाश घाटपांडे
व्यक्तीची प्रतिमा ही त्याच्या बोली भाषेतील शब्दांवरुन देखील ठरते. कधी कधी समर्पक शब्द हे लोकलज्जेस्तव वापरले जात नाहीत. ही समर्पकता ही स्थल ,काल ,व्यक्ती सापेक्ष आहे .धनंजयाने वापरलेला संदर्भ वलय हा अत्यंत लक्षणीय शब्द आहे. लोक काय म्हणतील? या भीतीपोटी हे शब्द वापरले जात नाहीत. शब्द ओठावर रेंगाळतात पण बाहेर पडत नाहीत. कारण ते शस्त्र आहे. आपण जर ते वापरले तर आपल्या प्रतिमेची हानी होईल हे भय जागृत मनात असत. खेडेगावात 'लई घान घान श्या देत व्हता' असे म्हणुन जे शब्द असतात ते सर्रास इतरत्र वापरले त्याच व्यक्ती कडून वापरले जात असतात. केवळ संदर्भ वलय बदलल्या मुळे त्याला ते केवळ सूचक म्हणुन वापरावे लागतात. घाशीराम कोतवाल मधे "लज्जा संकोच सर्व गळले. चित्त चळले चित्त चळले. रामा शिवा हरी मुकुंद मुरारी" या ब्राह्मणांच्या पार्टीचे यथोचित वर्णन कवनात केले आहे. चतुरंग ने म्हणल्या प्रमाणे शब्द वापरुन बघायची उर्मी ही जर दाबत आलो तर होणारी घुसमट कोंडी फोडण्याची वाट पहात असते. ती कोंडी फुटली नाही तर यात व्यक्तिमत्व संकोच पावते किंवा बंड करुन उठते.
कधी कधी शब्दांपेक्षा देह बोली प्रभावी असते. कारण ती शब्दांशिवाय ही वापरता येते. शब्दांसोबत ही वापरता येते. एखादा शब्द वापरताना अगदी विरुद्ध देह बोली वापरली तर बघणार्याला वेगळा अर्थ समजतो तर केवळ शब्दांकन वाचणार्याला वेगळा अर्थ समजतो. प्रियाली ने 'फद्या' आणि 'लोद्या 'या केलेल्या वर्गीकरणात असे अनेक बारकावे लपलेले आहेत. द्वयर्थी शब्दात शब्दांच्या अर्थछ्टांची गंमत तर असतेच पण त्यासोबत वापरलेली देहबोली (येथे उच्चार व अंगविक्षेप)ही महत्वाची ठरते. 'गेला हात चोळीत' 'अंधेरे रातमें दिया तेरे हात में ' 'अहो कारभारी उठलय रामाच्या पारी जरा धीर धरा' इत्यादी दादा कोंडकेंच्या लोकप्रिय शब्दरचनेचे गमक येथे लक्षात येते. लैंगिक छळा च्या कायद्यात शब्द जरी साधे असले तरी अंगविक्षेप हे आक्षेपार्ह ठरतात. लाईन मारणे ही डोळ्यांची देहबोली न समजणारी स्री (आता पुरुष सुद्धा) बुद्दु समजली/ला जातो. स्त्री पुरुष मैत्रीत या भाषांचे आकलन/ मर्यादा या परस्परांच्या व्यक्तिमत्व आकलनावर अवलंबुन असतात. "कशाला झवतं गाढव उरावर घ्यायचं?" असं म्हणणारी माझी मैत्रीण आणी 'कुनि सांगातल दाना देउन घोडा उडवुन घ्यायला??' असं म्हणणारी गावाकडची बाजाराला येणारी खेडुत बाई मला सारख्याच मोकळ्या वाटतात. 'एवढी खाज होती तर बुधवार पेठेत जायचं होत रे!" असं म्हणणार्या एखाद्या मैत्रीणीची प्रतिमा आणि 'एवढी भुक लागली होती तर हॉटेलात जायचं होत!(दुसर्याचा डबा कशाला उघडून पहायचा) अशा शब्दात व्यक्त झाली तर होणारी प्रतिमा यांच्या चित्रमयतेत फरक असतो तो लैंगिक भुक व नैसर्गिक भुक या समाजमान्यतेतील फरकामुळे.
(निस्ता डब्याचा वास घेतलेला)
प्रकाश घाटपांडे
22 Dec 2020 - 3:49 am | चामुंडराय
बच्चन बच्चन !!
माझी मुलगी लहान असतानां एकदा तिला घेऊन एका मोठया स्टोअर मध्ये गेलो होतो तेव्हा काउंटर पलीकडील अनेक विक्रेत्यांपैकी एका कडे बघून ती बच्चन बच्चन असे म्हणत हासायला लागली. आम्हाला कळेना ती बच्चन बच्चन असे का म्हणतेय आणि का हसतेय ते. सुदैवाने त्या विक्रेत्याचे आमच्याकडे लक्ष नव्हते. आम्ही तिला काउंटर पासून दूर नेले आणि असे कोणाला हसायचे नाही हे समजावले परंतु "बच्चन बच्चन" बद्दल तिला विचारले तर तिने सांगितले हि हॅज बट चीन.
आम्ही कपाळावर हात मारला.
😄
10 Jul 2021 - 3:16 pm | देशपांडे विनायक
पुण्यात भरपूर '' स्थळे '' असतात या समजुतीने आमच्या घरात पुण्याबाहेरील
नातेवाईक यावयाचे. मुलगा किंव्हा मुलगी पाहण्याचे कार्यक्रम म्हणजे आम्हा मुलांना
बैठक घालणे वगैरे कामे असत. त्याच वेळी मुलामुलींबद्दल चाललेली चर्चा कानावर पडे.
एक मुलगी दाखवण्यास आलेली असताना तिच्या काका मामा बद्दल घरातले लोक
बोलताना माझ्या कानावर पडले.
मुलगी येऊन गेल्यावर तात्या नावाचे आमचे एक नातेवाईक म्हणाले '' आगापिछा ''
नसलेली मुलगी त्याला [ मुलाला ] कशी पसंत पडेल ?
काकामामा ,आईवडील ,भाऊबहिणी त्या मुलीला असताना तात्या आगापिछा नाही
असे कसे म्हणाले हे मला कळायला काही वर्षे लागली.
13 Jul 2021 - 11:31 am | प्रकाश घाटपांडे
पारंपारिक फलज्योतिषात वधूवर गुणमेलन करताना गण या गोष्टीला 6 गुण दिले आहेत. जन्मनक्षत्रानुसार देव गण, मनुष्य गण व राक्षस गण असे तीन प्रकारचे गण प्रवृत्तीशी निगडीत ठरवण्यात आले. हे सांगताना मी नेहमी सांगतो की सर्व मनुष्यप्राण्यात एक गण मात्र कॉमन आहे? लोक कोणता असे विचारतात मग मी सांगतो "ढुंगण". :)
13 Jul 2021 - 11:34 am | गॉडजिला
कोणती प्रवृत्ती दर्शवतो पारंपारिक फलज्योतिषात वधूवर गुणमेलन करताना ?
13 Jul 2021 - 12:53 pm | प्रकाश घाटपांडे
हा गण मलप्रवृत्ती दर्शवतो. ज्या शिवाय आयुष्य जगणे केवळ अशक्य आहे.
13 Jul 2021 - 12:59 pm | गॉडजिला
हेच वाचाना