मर्ढेकरांची कविता पिंपात मेले ओल्या उंदिर - दुसऱया महायुध्दातील ज्युंच्या हत्यांकांडांचा संदर्भ

लांबदेव's picture
लांबदेव in काथ्याकूट
14 Mar 2011 - 3:20 pm
गाभा: 

मर्ढेकरांची कविता पिंपात मेले ओल्या उंदिर ह्या कवितेला दुसऱ्या महायुध्दात झालेल्या ज्यूंच्या हत्याकांडाचा तसेच तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचा संदर्भ आहे. खालील ब्लॉग मध्ये ही सर्व माहीती तसेच कवितेचा ह्या संदर्भातील असू शकणारा अर्थ यांचा समावेश केलेला आहे.
खालील दुव्यावर टिचकी मारा

पिंपात मेले ओल्या उंदिर

प्रतिक्रिया

टारझन's picture

14 Mar 2011 - 3:36 pm | टारझन

धंन्यवाद लांब देव ... मला बालपणापासुन ह्या कवितेबद्दल माहिती होती. संपुर्ण ग्रंथालये उलथी पाडल्या गेली , पण मला ही कविता आणि संदर्भ सापडल्या नव्हते.
आपण माझ्या साठी अगदी देवासारखे धावुन आलात .

- खांबदेव
खांबाव केले ओल्या खंबीर

छोटा डॉन's picture

14 Mar 2011 - 3:45 pm | छोटा डॉन

नमस्कार,

प्रतिक्रिया इथे द्यायची की तुमच्या ब्लॉगवर ?
की तुमच्या ब्लॉगवर आमची प्रतिक्रिया आम्ही आमच्या ब्लॉगवर नवा लेख म्हणुन टाकली आणि त्याची इथे लिंक दिली किंवा नवा धागाच काढला तर चालेल काय ?

कळावे, आम्ही आवश्य खरडु ...
धन्यवाद

- छोटा डॉन

मी_ओंकार's picture

14 Mar 2011 - 3:50 pm | मी_ओंकार

कोण भाऊ पाध्ये ?

धन्यवाद.

- ओंकार.

५० फक्त's picture

14 Mar 2011 - 3:55 pm | ५० फक्त

बाकीचं सोडा, माहिती आणि संदर्भ फार छान वाटला. या कवितेच्या जीवावर ब-याच लोकांनी मराठित डॉक्टरेट मिळवली असे ऐकुन आहे.

योगप्रभू's picture

14 Mar 2011 - 4:17 pm | योगप्रभू

मर्ढेकरांच्या कविता दुर्बोध वाटल्या तरी त्यात एक निश्चित सूत्र आहे. त्यातील प्रतिके वरकरणी गूढ वाटली तरी एकदा ती समजली की कवितेतील आशयगर्भता मनाला भिडते.

'पिपात ओल्या मेले उंदिर
माना टाकून मुरगळलेल्या

या कवितेचा अनेकांनी आपापल्या परीने अर्थ लावण्याचा प्रयत्न केलाय. एक अर्थ असाही वाचण्यात आला होता, की ओले पिंप हे स्त्रीच्या योनीचे प्रतिक असून मेलेले उंदिर म्हणजे शुक्राणू. यातही गूढ अर्थ असा, की वीर्याच्या एका मिलिलिटरमध्ये दहा लाख शुक्राणू असतात आणि स्त्रीबीजाशी संयोग होण्यासाठी त्यातील एकच यशस्वी होतो. बाकीचे सगळे मरुन जातात. म्हणून या वरच्या ओळी.

संभोग किंवा सृजन या दृष्टिकोनातून पाहिले तर कवितेचा एक वेगळा अर्थ लागतो. पण बेलसरे यांनी जे विवेचन केले आहे ते मनाला पटण्यासारखे आहे. याचे कारण मर्ढेकर यांनी दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात केलेल्या कवितांवर तत्कालीन वातावरणाची गडद छाप आहेच. उदाहरणार्थ 'या दु:खाच्या कढईची गा, अशीच देवा जडण असु दे' या कवितेत महायुद्धातील संहार व विनाशामुळे सर्व समाजावर जी एक बधीरता, निराशा, सुन्नता पसरलीय त्याचेच प्रतिबिंब आहे. या कवितेत एक ओळ आहे.
'दु:ख दे देवा, परंतु सोसण्याची शक्ती दे'
(आता इथे कुंतीचे प्रतिक आहे. महाभारतात असाच संहार झाला होता आणि लहानांपासून ते वृद्धांपर्यंत डोळ्यासमोरील सर्व पिढ्या मारल्या जाण्याचे बघणे माता कुंतीच्या नशिबी आले होते. तेव्हा तिने श्रीकृष्णाकडे ही आळवणी केली होती. दुसर्‍या महायुद्धानंतरची स्थिती बघून कुंतीचेच मागणे मर्ढेकर मागत आहेत.)

म्हणून मेलेले उंदिर म्हणजे 'वंशसंहार झालेले ज्यू' हे जास्त सयुक्तिक आहे. मला वाटते, की त्यातून या कवितेच्या अर्थाबाबतचे गूढही उकलण्यास मदत झाली आहे.

ही कविता एका वेगळ्याच अंगाने जाते असं मला कालपासुनंच वाटत होतं खरं :)

-भोगप्रभु

परिकथेतील राजकुमार's picture

14 Mar 2011 - 5:00 pm | परिकथेतील राजकुमार

च्यायला असे आहे होय भेंडी !

मला वाटायचे हि कविता त्यांना शाहरुख खानला देवदास मध्ये दारू पिउन पाण्यात पडताना पाहून स्फुरली. धन्यवाद बरका लांबदेव, च्यायला रमेश देव नंतर आता आपण तुमचेच फ्यान तेज्यायला !!

ताडदेव

jaydip.kulkarni's picture

14 Mar 2011 - 8:25 pm | jaydip.kulkarni

ह्या कवितेचा अर्थ अनेक लोकांनी अनेक प्रकारे लावला आहे ...... पण हा संदर्भ पटतो .............
शिंडलर्स लिस्ट मध्ये अशा प्रकारे झालेली कत्तल दाखवली आहे ........हा चित्रपट पहावा ........

राजेश घासकडवी's picture

15 Mar 2011 - 9:54 pm | राजेश घासकडवी

छोटा डॉन यांच्याशी सहमत. ब्लॉगवरच्या मूळ पोस्टमधले किमान दोन परिच्छेद कॉपी पेस्ट करून टाकले असते तर दुसरीकडे कुठेतरी न जाता मुद्दा अधिक स्पष्ट करता आला असता.

असो. आता कवितेच्या लावलेल्या अर्थाविषयी.

कविता लिहून झाल्यावर त्याचा अर्थ कोणाला कसा भिडेल यावर कवीचा ताबा नसतो. म्हणूनच कदाचित मर्ढेकर हा अर्थ काढणाऱ्यांना माफ करतील असं वाटतं. एरवी त्यांनी जवळचं ओलं पिंप पाहून तळातल्या चुल्लूभर पाण्यात आत्महत्या केली असती असं वाटतं.

ज्यू कॉन्सेंट्रेशन कॅंपमध्ये तडफडून मेले - उंदीरही मेले - तेव्हा उंदीर हे ज्यूंचं प्रतीक आहे - इतका शब्दशः अर्थ काढणं फारच बाळबोध वाटलं. त्यात अमुकतमुक गार्डचे डोळे घारे होते, म्हणून कवितेत घाऱ्या डोळ्यांचा उल्लेख आहे किंवा उदासतेचे जहरी काचेचे डोळे म्हणजे भिंतीतली काचेची भोकं वगैरे वाचल्यावर काय म्हणावं कळलं नाही. इतका बटबटीत अर्थ मर्ढेकरांच्या कवितेतून काढला हे त्यांचं दुर्दैव वाटलं. मर्ढेकरांची ही कविता खूपच अधिक तरल आहे.

मर्ढेकरांसाठी हे जीवन म्हणजे काय? हा प्रश्न आहे. हे जीवन दुःखी का? ज्यूंप्रमाणे माणसं तडफडून मरतात का? हा प्रश्न नाही. किंबहुना हे जीवन म्हणजे काय, याचा अर्थ लावता येत नाही हेच दुःख आहे. कोण कुठले उंदीर कुठल्यातरी बिळात सक्तीने जगतात, कुठल्यातरी पिंपात जाऊन ओलेगिच्च होऊन सक्तीने मरतात. तेवढ्यातल्या तेवढ्यात कुठल्यातरी ओठांवर ओठ टेकण्यात धन्यता मानतात. या सगळ्याला काय अर्थ आहे? हे जीवन आपण का जगतो? असे प्रश्न आहेत.

असो. या कवितेबद्दल अजून खोलात लिहायला आत्ता वेळ नाही.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

15 Mar 2011 - 10:23 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>या कवितेबद्दल अजून खोलात लिहायला आत्ता वेळ नाही.
वेळ मिळेल तेव्हा जरूर लिहा. वाचायला नक्की आवडेल.

विकास's picture

16 Mar 2011 - 8:19 am | विकास

मर्ढेकरांसाठी हे जीवन म्हणजे काय? ...कोण कुठले उंदीर कुठल्यातरी बिळात सक्तीने जगतात, कुठल्यातरी पिंपात जाऊन ओलेगिच्च होऊन सक्तीने मरतात.

१००% सहमत! या कवितेबद्दल अधिक लिहीता आले तर आवश्य लिहा. वाचायला आवडेल.

या कवितेतील उपमेच्या संदर्भात मर्ढेकरांच्याच दुसर्‍या कवितेच्या काही ओळी आठवल्या...(चु.भू द्या. घ्या.)

मी एक मुंगी, तू एक मुंगी
ही एक मुंगी, ती एक मुंगी
या एक मुंगी, त्या एक मुंगी
पाच येथल्या पाच फिरंगी
----
या मुंग्यांतील एकेकीला
बनेल खाऊन राजा कोण
पार्थिवतेच्या पराकोटीचे
अपार्थिवाला नेईल लोण
----

आला स्वस्त दरावर आला, आला हो आला
हा मुंग्यांचा लोंढा आला, खोला फाटक खोला
दहा दहाची लोकल गाडी सोडीत आली पोकळ श्वास
घड्याळतल्या काट्यांचा अन सौदा पटला दीन उदास

---

फक्त या कवितेत मर्ढेकर शेवटी त्यांच्या मनातील अर्थ स्पष्ट करताना म्हणतातः

या नच मुंग्या, हीच माणसे
असेच होते गांधीजीही
येशू ख्रिस्त अन कृष्ण कदाचीत
कालीदास अन टैकोब्राही

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Mar 2011 - 8:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुंग्यांच्या लोंढ्यांत काही मुंग्या वेगळ्याच असतात. :)

-दिलीप बिरुटे

या नच मुंग्या, हीच माणसे
असेच होते गांधीजीही
येशू ख्रिस्त अन कृष्ण कदाचीत
कालीदास अन टैकोब्राही

या चार ओळी वाचुन शरदिनीतैंना कुठुन प्रेरणा मिळते याचा शोध लागला :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Mar 2011 - 8:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कवितेचा दुवा वाचल्यानंतर खरेच असा अर्थ तर नसेल या कल्पनेने जरा शोधाशोध करत होतो आणि शोधाशोध केल्यावर लक्षात आले की, राजेश म्हणतात तसे ’ मर्ढेकर हा अर्थ काढणाऱ्यांना माफ करतील असं वाटतं’ या मताशी सहमत आहे असेच म्हणावे लागेल. ’मर्ढेकराची कविता स्वरुप आणि संदर्भ' विजया राजाध्यक्ष यांचे पुस्तक पुन्हा चाळावे लागले आणि लक्षात आले की, असा काही संदर्भ कवितेच्या अर्थाबाबत दिसत नाही. उंदराच्या गतप्राण देहाकडे पाहून मनात आलेलेच ते विचार आहेत यात काही शंका नसावी. 'सामान्य माणसाचे संज्ञाशुन्य जगणे, जगण्यातील सक्ती,अर्थशुन्यता, खोटेपणा,आणि त्या जगण्याच्या तितकाच निरुपद्रवी शेवट यांच्यावरील विदारक भाष्य कवितेत दिसते आणि ते भाष्य 'उंदीर' या प्रतिमेचा मूलभूत अर्थ'' आहे. आशयसुत्राचा शोध या प्रकरणात वरील अवतरणातील भाष्य विजया राजाध्यक्ष व्यक्त करतात. विजया राजाध्यक्षांचे नाव आणि संदर्भ यासाठी मी लिहितो की त्यांनी जवळ-जवळ अठरा वर्ष मर्ढेकरांच्या कवितेवरील संशोधनात घालवली आहेत. म्हणून त्यावर विश्वास ठेवता येते. असे असुनही ब्लॉग लेखकाने भाऊ पाध्ये यांच्या लेखनाचे अजून काही संदर्भ इथे डकवले तर संदर्भ पुस्तकांच्या आधाराने अधिक चर्चा करता येईल. तो पर्याय खुलाच आहे.

मर्ढेकर मराठीबरोबर इंग्रजी, फ्रेंच, इटालियन या भाषेचे उत्तम जाणकार होते. मर्ढेकरांवर एलियट चा प्रभावही होता. मर्ढेकरांची जडणघडण विज्ञानयुगात झालेली होती. त्यांनी विविध विषयांचे वाचन केलेले होते त्यामुळे त्यांच्या कवितेमधून विज्ञान,गणित,ग्रह, आणि यंत्रयुगातल्या विविध प्रतिमांचे चित्रण कवितेतून येतांना दिसते.

असो...... आवरतो.

-दिलीप बिरुटे

मी_ओंकार's picture

17 Mar 2011 - 11:57 pm | मी_ओंकार

प्रा. डॉ.,
विजया राजाध्यक्षांपेक्षा धोंडांचे स्पष्टीकरण ज्यास्त संयुक्तिक वाटते याचे कारण म्हणजे धोंडांना मर्ढेकरांवर संशोधन करायची प्रेरणा मिळाली तीच मुळी विजयाबाईंच्या 'मर्ढेकरांची कविता : स्वरुप आणि संदर्भ' या प्रबंधाच्या वाचनामुळे. पुस्तकाच्या सुरवातीलाच ऋणपत्रिकेत ते म्हणतात. -
'१. सर्वात मोठे ऋण डॉ. विजया राजाध्यक्ष यांचे. त्यांचा 'मर्ढेकरांची कविता' हा प्रबंध मी वाचला नसता, तर मर्ढेकरांच्या वाटेला मी गेलोच नसतो.'
धोंडांच्या काही लेखांमध्ये त्यांनी विजयाबाईंची मते खोडून काढली आहेत आणि ती पटण्यासारखी आहेत. (उदा. बन बांबूंचे पिवळ्या गाते). 'पिपांत मेले' बद्दल मात्र त्यांनी विजयाबाईंच्या किंवा अन्य कोणाच्या मतांचा उल्लेख केलेला नाही.
आधीच्या प्रतिसादात कवितेबद्दल लिहिले नव्हते कारण माझी जी मते आहेत ती धोंडांचा लेख वाचून झालेली आहेत. आता इथे वेगवेगळे अर्थ तपासून पाहिले जात आहेत तर त्या लेखातील मत मी मांडतो.

धोंडांच्या मते ही कविता हातावर पोट असणार्‍या मजूर, हमाल, शेतमजूर यांच्यावर आहे. कवितेत आलेले पिंप हे दारूचे आहे. दिवसभर राबून हातात आलेल्या पैशाने दारू पिऊन मेल्यासारखे पडणार्‍यांना उंदीर ही प्रतिमा आहे. 'पिपांत मेले उचकी देऊन' या ओळी हे पाण्याचे पिंप नसून दारूचे आहे हे स्पष्ट करतात. आजही आपण रात्री आठ-साडेआठच्या सुमारास पाहिले तर कष्टकरी वर्गाची आणि 'नाही रे' जनतेची प्रचंड गर्दी देशी दारूच्या गुत्त्यांसमोर आणि दुकानांसमोर दिसते. प्रचंड दारू (न्हाले, न्हाले) प्याल्यावर या लोकांची अवस्था 'ओठावरती ओठ मिळाले, माना पडल्या मुरगळल्याविण', अशी होत असेल यात शंका नाही.
बाकी गोष्टींची उकल लेखात आहे. पण ती प्रत्येकाला पटेलच असे नाही. धोंडांचे हे लेख/पुस्तक एकदा आवर्जून वाचून पहा.

- ओंकार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Mar 2011 - 7:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> धोंडांचे हे लेख/पुस्तक एकदा आवर्जून वाचून पहा.
ओंकार, 'तरीहि येतो वास फुलांना' आज विकत घेतले आणि 'पिपात मेले ओल्या उंदिर' आणि पुन्हा एकदा 'पिपांत मेले' वाचून काढले. बाकी, काही वाचले नाही. वरील कवितेचा आशय शोधण्याचा तोही एक उत्तम प्रयत्न म्हणूनच तो आवडला. म.वा.धोंडांना तो दारुच्या गुत्त्यावरचा प्रसंग वाटतो आणि तो अर्थ वाचतांना मजा आली.'जहरी काचेचे डोळे' म्हणजे 'डर्टी लूक. 'न्हाले, न्हाले' ही द्विरुक्ती म्हणजे 'पी,पी प्याले' हे आणि इतरही काही गोष्टी मला खूप ओढून आणल्यासारखे वाटले. पण आपण म्हणालाच आहात की अशी एखादी उकल सर्वांनाच पटेल असे काही नाही. कवितेच्या आशयाचा शोध घेतांना वरील कवितेवर कोणाचा प्रभाव असावा याचा संबंधही बरा वाटला पण इतके करुनही म.वा.धोंड म्हणतात तेच खरे आहे.-

''एक वाह्यात विचार सुचतो. मर्ढेकर स्वतःच्या कवितांविषयी अजिबात बोलत नसत. पण त्यांच्यावर अश्लीलतेच्या आरोपावरुन फौजदारी खटला झाला आणि त्यांना आपले मौन सोडावे लागले. आरोपपत्रातील चार कवितांचा आशय आणि त्यातील आक्षेपार्ह ओळींचा अर्थ त्यांनी आपल्या बचावात स्पष्ट केला. या आणि अशाच इतर तीन-चार दुर्बोध कवितांवर तसा खटला व्हायला हवा होता. तो झाला असता तर त्या कविता आणि त्यांच्यावरील भाष्ये यांनी होत असलेला वाचकांचा छळवाद टळला असता. ''

म.वा.धोंडांना इतका आशयाचा शोध घेऊनही समाधान नाही. याचाच अर्थ असा की, आशयाच्या बाबतीत अजूनही त्यांना स्पष्टपणे हाच आशय असावा अशी खात्री नाही.

असो, बाकी पुस्तक वाचून खरडीत अभिप्राय कळवतोच. खंडन-मंडनासाठी एक उत्तम पुस्तक सुचवल्याबद्दल धन्यु.

-दिलीप बिरुटे

मी_ओंकार's picture

19 Mar 2011 - 12:05 am | मी_ओंकार

'तरीहि येतो वास फुलांना' आज विकत घेतले आणि 'पिपात मेले ओल्या उंदिर' आणि पुन्हा एकदा 'पिपांत मेले' वाचून काढले.

माझ्या म्हणण्यावरून पुस्तक विकत घेऊन वाचलेत याबद्दल खूप धन्यवाद.

म.वा.धोंडांना इतका आशयाचा शोध घेऊनही समाधान नाही.

अशीच अवस्था त्यांची इतर काही कवितांबद्दलही झालेली दिसते. त्यामुळे 'वाचकांचा छळवाद' असाच चालू राहणार यात शंका नाही.

लेखाच्या निमित्ताने पुस्तकाला परत एकदा हात लागला.

मी_ओंकार's picture

16 Mar 2011 - 12:05 am | मी_ओंकार

टंकण्याचे कष्ट घेतल्याबद्दल आभार. कोण कुठली बाई. जर्मनीत असलेल्या लाखाहून ज्यास्त गेस्टोपोंपैकी एक. तिचे डोळे घारे म्हणून कवितेत घार्‍या डोळी हे शब्द ? काय बादरायण संबध आहे हा? पोळे, बेकलायटी बद्दलतर आनंदच आहे.

मर्ढेकरांच्या कवितांबद्दल म. वा. धोंड यांचे 'तरीहि येतो वास फुलांना' हे राजहंस ने प्रकाशित केलेले पुस्तक वाचावे. यात मर्ढेकरांच्या जवळपास १२-१३ कवितांवर लेख आहेत. 'पिपांत मेले' वर दोन लेख असून पहिल्या लेखात झालेल्या चुकीच्या उलगड्याबद्द्ल दुसर्‍या लेखात त्यांनी प्रांजळपणे माफी मागितली आहे. धोंडांची मी 'जाळ्यातील चंद्र' (विविध विषयांवरचे लेख), चंद्र चवथीचा (गडकर्‍यांवर ललेखमाला) आणि वर लिहिलेले अशी तीन पुस्तके वाचली आहेत. त्यात त्यांचा प्रदीर्घ अभ्यास व लिहिताना मुद्दे स्पष्ट उलगडून दाखवण्याची हातोटी दिसते.

- ओंकार.

विटेकर's picture

21 Mar 2011 - 5:56 pm | विटेकर

असेच म्हणेन..
सुरेख ! विवेचन आवडले पण पटले नाही. तर्किक दृष्टया पट्तेही पण मर्ढेकरांना असेच म्हणायचे होते असे म्हणवत नाही. त्त्या काळातील विशेषत: सर्व सामान्य कामगाराचे आयुष्य देखिल असेच होते .. त्यातही हे सारे( माना पडल्या.. बेकेलाइट.. ) सन्दर्भ शोधता येतात. कदचित माझ्या शिकण्याच्या वयात कवितेचा अर्थ तसा लावला गेला म्हणून मला तसे वाटत असावे..
एका सुंदर कवितेचे सुंदर रसग्रहण !

धनंजय's picture

21 Mar 2011 - 8:45 pm | धनंजय

सुरेख ! विवेचन आवडले पण पटले नाही.

असेच म्हणतो.
कवितेचा वैश्विक संदर्भ (जीवन-मरण दोहोंची सक्ती असलेले सर्व मनुष्य किंवा जीव) इतका पटतो की तो संदर्भ संकुचित करण्याची गरज वाटत नाही.

मात्र तो वैश्विक अर्थ ज्यू-महाहत्याकांडाच्या तपशिलांनाही जुळतो हे विवेचन आवडले.

लोकसत्ताच्या २९ नोव्हेंबर २००९ च्या अंकात ह्या कवितेवर खालील लेख प्रसिध्द झाला आहे.

मर्ढेकरांच्या ‘पिपांत मेले’ या कवितेने आजवर चर्चेचा एवढा प्रचंड धुरळा उडविलेला आहे, की अजूनही तो खाली बसलेला नाही. या कवितेवरील मत-मतांतरे..

म. वा. धोंड :
प्रत्येक कविता आपल्याला कळलीच पाहिजे, असा हट्ट धरण्यात अर्थ नाही. संतांच्या काव्यात अशा कित्येक कूट रचना आहेत, त्या कुठे आपल्याला उलगडतात? एवढे मागेही जायला नको. ग्रेसच्या कविता मला आवडल्या तरी अजिबात कळत नाहीत. नाही कळली तर सोडून द्यावी, हे उत्तम! पण ही कविता तशी सहजपणे झटकून टाकता येत नाही. या कवितेने मर्ढेकरांच्याच नव्हे, तर मराठी कवितेनेही नवे क्रांतिकारी वळण घेतले. यामुळे हिला मराठी कवितेच्या जडणघडणीत मानाचे स्थान आहे.

विजया राजाध्यक्ष :
‘पिपांत मेले’ या कवितेच्या पूर्वार्धात उंदरांचे मरण ही घटना आहे. ‘गरीब बिचारे’ बिळात जगलेले उंदीर. ते ‘पिपांत’ शिरले व तेथेच उचकी देऊन मेले. त्यांचे जगणे बिळापुरते मर्यादित आणि मरणही निरुपद्रवी. हे मरण कुणीही मान न मुरगळता आपोआप आलेले. (माना पडल्या, मुरगळल्याविण.) उंदरांच्या जीवनात आसक्ती नव्हती. (कारण ओठांवरती ओठ नुसते मिळालेले.) ती आसक्ती मरतानाही लाभली नाही. ही संज्ञेच्या जन्मजात व संपूर्ण अभावाची साक्ष. संज्ञेवाचून शृंगार जसा हलका (‘संज्ञेवाचून संभोगाची/ अशीच कसरत असते हलक्या’. कां. क. क्र. ४१) तसे संज्ञेवाचून जगणेही. सगळा सक्तीचा मामला. स्वेच्छेला अवसरच नाही. उंदीर रात्री मेले. त्यानंतर दिवस उजाडला. मरताना उघडय़ाच राहिलेल्या उंदरांच्या डोळ्यांत हा ‘दिवस सांडला’ (उजेड शिरला)- आणि उंदरांच्या शरीरातले (गात्रलिंगांचे) उरलेसुरले सत्त्वही या नव्या दिवसाने निपटून (धुऊन) घेतले. अत्यंत केविलवाणे असे हे मरण आहे.

प्रभा गणोरकर :
या कवितेचा अर्थ सांगताना एकतर तो गोळाबेरीज सांगितला आहे- ती ‘दुबरेध’ कविता, हे गृहीत धरून. ‘पिपांत मेले ओल्या उंदिर’ ही लिंगसूचक प्रतिमा म्हणून कविता ‘अश्लील’- पण मर्ढेकरांना अश्लील कसे म्हणायचे, म्हणून मग गोळाबेरीज अर्थ चाचरत मांडण्याचाही एक प्रकार वर्गा-वर्गात चालतो. बेकलाइटी म्हणजे कृत्रिम असे म्हटले जाते. कधी उंदरांचे जहरी डोळे (का? तर विष पोटात गेल्याने उंदीर मेले ना, म्हणून?), तर ‘मधाळ पोळे’ म्हणजे त्या उंदरांच्या अंगावर घोंगावणाऱ्या माश्या इथपर्यंतदेखील अर्थ सांगण्याची मजल गेली. हे सारे मर्ढेकरांच्या कवितेत अनावश्यक अर्थ कोंबणे आहे. असा प्रकार मर्ढेकरांच्या अनेक कवितांच्या बाबतीत झालेला आहे. ‘पिपांत मेले’ ही खास मर्ढेकरी शैलीतली, अत्यंत सूचक, पण स्पष्ट अर्थ सांगणारी एक सरळ कविता आहे. ती आजच्या अनैसर्गिक जीवनरीतीचे वर्णन करू इच्छिते. ‘पिपांत मेले’ हा आधुनिक माणसांच्या विपरीत स्थिती-दशेचाच आणखी एक निराळा पैलू. जरा वेगळ्या शैलीतला. प्रतिमांनी कूट बनवलेला, एवढेच.

प्रभाकर पाध्ये :
या कवितेत काव्यानंद आणि नेहमीचा व्यावहारिक आनंद यांत तडाख्याचा फरक आढळतो. व्यवहारात आनंद देणारा विषय तर नाहीच, पण व्यवहारात किळस आणणारा विषय म्हणजे पाण्यात बुडून मेलेले उंदीर हा विषय येथे निवडलेला आहे. (हा प्लेगचा उंदीर नाही, याबद्दल आपण कवीचे आभार मानू या!) नुसता विषय नव्हे, तर मेलेल्या उंदराचे काही किळसवाणे वर्णनही केलेले आहे. ‘माना पडल्या’, ‘पिपांत मेले उचकी देऊन’, ‘गात्रलिंग अन् धुऊन घेउन’, ‘ओठांवरती ओठ मिळाले’ हे शब्दप्रयोग किळसवाणी दृश्येच निर्माण करतात. मग प्रश्न असा, की अशा किळसवाण्या विषयाने आणि वर्णनांनी काव्यानंद कसा निर्माण होईल?
यमके, अनुप्रास, अर्थाचे खटके यामुळे आनंद होईलच असे नाही. कारण या सर्व गोष्टींमुळे त्या किळसवाण्या वर्णनांकडे लक्ष वेधले जाते. माझ्या मते, या कवितेमुळे जो काव्यानंद निर्माण होण्याची शक्यता आहे, तो तिच्यात आलेल्या तात्त्विक विचारांमुळे. या कवितेच्या मधोमध आलेली ही काव्यपंक्तीच पाहा :
जगायची पण सक्ती आहे;
मरायची पण सक्ती आहे.
या दोन ओळींवरून हे स्पष्ट आहे की, या कवितेत जीवनाचे काही तत्त्वज्ञान ग्रथित झालेले आहे.
गरिब बिचारे बिळांत जगले,
पिपांत मेले उचकी देउन
त्याचप्रमाणे-
उदासतेला जहरी डोळे;
पुन्हा
मधाळ पोळे;
ओठांवरती जमले तेंही
बेकलाइटी, बेकलाइटी!
या सर्व ओळींतून जीवनाचे विफल, उदासवाणे तत्त्वज्ञान सांगितलेले आहे. मनुष्य साधारणपणे आपल्या संकुचित जीवनात (बिळांत) जगत असतो. कधीतरी तो जीवनाच्या चावडीवर फेकला जातो. त्याला इच्छा असो वा नसो, जगावेच लागते. उदासवाणे जीवन जगावे लागते. जगताना काही माया, काही श्रेय जमा झाले तरी ते तकलादूच असते. दुर्दैव असे की, जगता जगताच जगण्याची गोडी लागते. पण जगणे सक्तीचे, तसेच मरणेही सक्तीचे. असे पराभूत, निष्फळ, तगमगणाऱ्या जीवनाचे तत्त्वज्ञान या कवितेत सांगितलेले आहे. हे नुसत्या उंदराच्या जीवनाचे तत्त्वज्ञान नव्हे. हे तुम्हा-आम्हा मानवाच्या जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. येथे उंदीर हे नुसते प्रतीक आहे. मानवाचे प्रतीक!

सुधीर रसाळ :
मर्ढेकरांच्या काव्याने नवे वळण घेतल्यानंतर लिहिलेल्या सुरुवातीच्या कवितांपैकी ही एक कविता आहे. या सुरुवातीच्या काळात मर्ढेकर आपली कविता तीव्र उपहासाने संपविताना दिसतात. या कवितेची ‘पिपांत उंदिर न्हाले! न्हाले!!’ ही शेवटची ओळ अशीच तीव्र उपहासपर आहे. या ओळीत समाधानाचा व्याजस्वर असून तो असमाधानाचे सूचन करीत आहे. ‘न्हाणे’ या शब्दातून हवी असलेली गोष्ट विपुल प्रमाणात मिळणे हा लक्ष्यार्थ प्राप्त होतो. उदाहरणार्थ- एखाद्याचे ‘प्रेमाने न्हाऊन निघणे’. वाईट व नको असलेल्या गोष्टी जर विपुल प्रमाणात मिळाल्या, तर त्यासाठी न्हाऊन निघणे हा शब्द आपण सामान्यत: वापरत नाही. या उंदरांना ‘ओल्या’ पिंपाकडून जगण्यासाठी सामग्री हवी होती. ओठांवर पोळे जमावे आणि सहजपणे मध मिळावा, असे त्यांना वाटत होते. परंतु त्यांना मिळाले मरण. त्यांचे मध चाखायला आसुसलेले ओठ फक्त एकमेकांना लागले. पोळे बेकलाइटी नसते आणि त्यातून मध खरोखरच टपकला असता तर ते मधाने न्हाऊन निघाले असते. पण याउलट, त्यांच्या गात्रलिंगावर दिवस सांडला. कोरडय़ा, प्रकाशमान दिवसानेच त्यांना न्हाऊ घातले. संपन्नता, समृद्धी आणि जीवन यांचे वैपुल्य त्यांना हवे होते. त्याऐवजी त्यांना उदासता, वैफल्य आणि शेवटी मृत्यू प्राप्त झाला.

निशिकांत ठकार :
‘पिपांत मेले..’पासून ‘पिपांत न्हाले’पर्यंतच्या काव्यजाणिवेत उचकी देण्याचा एक अंतिम क्षण आहे. बिळात जगलेले उंदीर पिपांत मरताना ‘उचकी’ देऊन मरतात. वस्तुत: उंदीर आचके देऊन मरतात. पण आचक्याची उचकी करून मर्ढेकरांनी मरणक्षणी पूर्वस्मृतींची मानवी जाणीव सूचित केली आहे. या उंदरांना बिळातले जगणेच आठवत असणार, म्हणूनही ते ‘गरीब बिचारे’.
आधी मेले, मग शेवटी न्हाले (कारण िपप ओले.) अशा अंत्यविधीचे हे मूषक महानिर्वाण आहे! ‘न्हालेल्या’ गर्भवतीची सुंदर उत्प्रेक्षा मांडणाऱ्या कवीला पिपांत न्हालेल्या उंदरांचे बीभत्स वास्तव आपल्या कवितेत मांडावेसे वाटते, हा त्या कवीच्या व्यापक मानवी संवेदशीलतेचाच प्रत्यय होय.

(पद्मगंधा प्रकाशनाच्या ‘पिपांत मेले ओल्या उंदिर’ या प्रा. एस. एस. नाडकर्णी संपादित ग्रंथातून साभार)

संकलक - लांबदेव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Mar 2011 - 10:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

समीक्षकांची मतं डकवल्याबद्दल धन्यु. मर्ढेकरांच्या काही दुर्बोध कवितेतील आशयाच्या बाबतीत चर्चा न संपणारी अशीच आहे, ’सौंदर्य आणि साहित्य’ या मर्ढेकरांच्या पुस्तकात मर्ढेकरांनी ’मी का लिहि्तो’ या बद्दल त्यांनी काही विचार डकवले आहेत. वाद-संवादाच्या निमित्ताने काही समीक्षकांनी किंवा स्नेह्यांनी त्यांना कवितेच्या बाबतीत बोलते केले असते तर पुस्तकाच्या निमित्ताने ते बोलतेही झाले असते असे वाटायला लागले आहे.

-दिलीप बिरुटे

मर्ढेकरांची कविता - झोपली ग खुळी बाळे - वैश्विक व दुसऱया महायुध्दकालीन संदर्भ
मर्ढेकरांची ही कविता दुसऱ्या महायुध्दाच्या पार्श्वभूमीवर आहे. ह्या कवितेत अणुबाँब आहेत. रॉकेट आहेत. भारतीय , अमेरीकन शास्त्रज्ञ आहेत. आंतरराष्ट्रीय शस्त्रस्पर्धा आहे. भगवतगीता आहे. जागतीक शांततेचा प्रश्न आहे. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत.
खालील दुव्यावर टिचकी मारा
झोपली ग खुळी बाळे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Apr 2011 - 10:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद लिहिण्यासाठी जागा धरुन ठेवतो.

-दिलीप बिरुटे

भडकमकर मास्तर's picture

7 Apr 2011 - 10:48 am | भडकमकर मास्तर

:)